निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश, आमच्याकडले झाड छाटून छाटून बरेच पसरट झाले आहे आणि पाने पण इतकी दाट नाहियेत. त्यामुळे चिमण्यांना तरी बसता यायला हवे. तशा तर चिमण्या अगदी नाजूक झुडपावर पण पंख फडकावीत बसतात (त्यांचे वजन पण त्या झुडपाला पेलवणारे नसते) मग आसूपालव, तुम्ही म्हणताय तशी वेडी बाभूळ, महारुख अशा काही झाडांवरच चिमण्या (इतर पक्षीदेखील) का बसत नाहीत?

वेडी बाभूळ, महारुख अशा काही झाडांवरच चिमण्या (इतर पक्षीदेखील) का बसत नाहीत? >> इतर पक्षी का बसत नाही हे माहित नाही....पण रात्री 'वटवाघुळ' नक्कीच या झाडांवर आढळतात.

चितमपल्ली ने कारण नव्हते लिहिले. पण मी देखील प्रत्यक्ष पाहिले आहे.
चातका, टेक्नीकली वटवाघुळ पक्षी नाही ना !

माझ्या माहेरी घराच्या बाजुलाच जांभळाचे झाड आहे त्या झाडावर काही वर्शापुर्वी रात्री वटवाघळे बसायची. सकाळी जांभळांचा खच पडलेला असायचा. आता बसतात की नाही ते पहाव लागेल.

दोन वर्षा पुर्वी लोणावळ्याच्या नर्सरीमधुन मी ह्या तुर्‍याच झाड आणले होते. फोटो मध्ये नारळाला लागलेला दिसतोय. पण ते झाड कुंडीत आहे. वर तुरा आला आहे. आणले त्यावर्षी छान फुले आली. आता पण आता दोन वर्षे येतच नाहीत. झाडाची पण वाढ होत नाही.

माधव,
चिमण्या नाहिसे होण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचा अधिवास (habitat) नष्ट झालाय. पूर्वी वाडा संस्कृती होती त्यामुळे त्याना वळचणी मिळायच्या,शिवाय फरशी नसलेलं अंगण असायचं. त्यामुळे वर लिहिल्या प्रमाणे अळ्या,किडे त्यांना सापडायचे.धान्य निवडताना त्यातला काही भाग चिऊताईला द्यायच्या बायका.मोबाईल टॉवर्समुळे ज्या वेव्हज बाहेर पडतात त्यांचा पक्ष्यांवर फार वाईट परिणाम होतो. शिवाय आजकाल बर्‍याच शहरांमधून काचांच्या भिंती असलेल्या बिल्डिंग्ज असतात.सूर्याचे किरण परावर्तित होऊन पक्ष्यांच्या डोळ्यांना त्रास होतो,आणि ते किरण त्यांना सहन न होऊन पक्षी बेशुद्ध होऊन किंवा मरून खाली पडतात.आणि आसुपालव,कुबाभूळ(वेडी बाभूळ),हे आपले देशी वृक्ष नाहीएत; हे पक्ष्यांना बरोबर माहित असतं.त्यामुळे पक्षी शक्यतो त्यांवर घरटी करत नाहीत किंवा फारसा त्यांचा आश्रय घेत नाहीत.
महारुख म्हणजे तुम्हाला कोणते झाड म्हणायचे आहे ते समजले नाही. कारण आपल्याकडे २/३ झाडांना महारुख म्हणतात.त्याचे botanical name कळले तर समजेल की तो देशी वृक्ष आहे की नाही.पण ज्याअर्थी पक्षी (चिमण्या) त्यावर बसत नाहीयेत म्हणजे बहुधा ते झाड परदेशी असावे.
जागू तुर्‍याच्या फुलांचा रंग फारच सुंदर आहे हं!
साधना,पारव्यांचा खरंच फार त्रास होतो गं! त्यांना हाकलूनही ते परत परत येतात.आणि चोरटे असतात ते.कुठलंही धान्य वाळत घातलं की मारलाच यांनी डल्ला!

दिनेशदा,
सी बिन्स बद्दल प्रथमच वाचलं तुमच्याकडून.फारच अनोखी माहिती आहे. नविन माहिती मिळाली.खूप खूप धन्यवाद.तुम्ही मागे शैवालावर,दगडफुलावर,उंबराच्या फळांवर लेख लिहिले होते तशा लेखांची वाट पहातिये.

मागे एकदा मी एका वेलीचा फोटो टाकला होता,कलिंगड की टरबूज? पण दिनेशदांनी बरोबर ओळखले होते. ती वेल कलिंगडाचीच आहे. आणि तिला आता चक्क एक कलिंगड लागले आहे. त्याचेच हे फोटो. आणि मला आणखी एक गोष्ट जाणवली ती ही की सगळ्या फुलांना फळ धरत नाही. आणि ज्या फुलाला फळ लागणार असेल, त्या फुलाला देठाकडे अगदी छोट्टुस्से फळ लागलेले असते आणि मग ते फूल फुलते.कारण या वेलीला अजून एक छोटे फळ लागले आहे.

Image0512.jpgImage0513.jpg

शांकली, किती क्यूट आहे ते कलिंगड. जपानमधे काचेच्या चौकोनी बाटलीत हे फळ घालून ठेवतात. (वेलीवर असतानाच ) मग ते कलिंगड बाटलीच्या आकाराचे होते. तिथे चौकोनी बाटल्या वापरतात, म्हणून ते चौकोनी आकार धारण करते. बाकि फायदा काही नाही, जागा कमी लागते आणि एकावर एक नीट ठेवता येतात.

महारुखाचे झाड, पुण्याला साधु वासवानी चौकात आहे. कडूनिंबासारखीच पाने, पण पानांचा रंग पोपटी पानांचा आकार बराच मोठा आणि एकेक संयूक्त पान मीटरभर लांब. त्या चौकात सहज ओळखू येईल.

धन्स लोकहो! आपल्याकडच्या नवागताचं आपल्या इतकंच इतरांना पण तितकंच कौतुक पाहून कोण आनंद झाला मला!
महारुखाची झाडं मी भोरला (म्हणजे भोरला लागल्यावर एक आंबराई लागते त्या रस्त्यावर) बरीच बघितली आहेत. फांद्यांचा आकार साधरणतः दीपमाळेसारखा असतो. आणि या झाडावर मी ६ वर्षात एकाही पक्ष्याचं घरटं बघितलं नाही. पण इथे (पुण्यात) अजून एका वृक्षालापण महारुख म्हणतात. पण तो खरंच महारुख आहे की नाही हे मला माहित नाही, कारण त्याला फळं लागलेली असतात,आणि पानं साधारणतः आसुपालवाच्या पानांसारखी दिसतात.

धन्यवाद,जिप्सी आणि जागू तुमचे.
दिनेशदा तुम्ही जो महारुख म्हणताय तो, आणि मी भोरच्या रस्त्यावर बघितलेला महारुख एकच आहे. Ailanthus excelsa. त्याची पानं तुम्ही वर्णन केल्याप्रमाणेच आणि फांद्यांची रचना दीपमाळेसारखी असते. श्री.चितमपल्लिंच्या एका पुस्तकात वृक्ष-पंचक म्हणून एक प्रकरण आहे. त्यात या महारुखाचा उल्लेख आहे. पुस्तकाचे नाव आता आठवत नाहीये. पण चैन पडेना म्हणून गूगलवर याचं botanical name शोधलं,फोटो बघितले आणि ओळख(खात्रीच) पटली.

शांकली माझ्याकडेही दोन कलिंगडे धरली आहेत Happy एकाचे वय सेम तुझ्या कलिंगडाएवढे आहे, नी एक लहान आहे. (माझ्याकडे कॉम्प्युटरची बोंब आहे, त्यामुळे फोटो टाकताच येत नाहीत. कालच नविन कॉम्प घेण्याविषयी चर्चा सुरू केली Happy )

पहिल्या कलिंगडाचे परागीभवन माझ्या डोळ्यांसमोर झाले. फुलांकडे बघत बसलेले तेव्हा एक अगदी लहान मधमाशी, २ मीमी लांबीची, नरफुलावर बसलेली दिसली. ती बराच वेळ फुलातल्या मधल्या भागात फिरफिरुन त्यातला मध खात होती. आता त्या फुलात मध असुन असुन कितीसा असणार? पण बहुतेक तो आपल्या नजरेला न दिसणारा मध शोषण्यासाठी मधमाशीला एवढा वेळ लागत असणार. मी तिथेच बसुन 'आता ह्या बयेला वरच्या मादीफुलावर जायची बुद्धी दे रे देवा..' म्हणुन प्रार्थना करत होते. दोन मिनिटे लक्ष दुसरीकडे गेले नी परत पाहते तो मधमाशी मादीफुलावर. Happy हुश्श .. झाले.. आता कलिंगड लागणार.. पण मादीफुलावर जेमतेम बसुन मधमाशी उडाल्यावर मात्र जरा धास्ती लागली. पण ओव्हरी वाढताना दिसल्यावर हुश्श झाले. Happy

ह्या आधी एका कलिंगडाचे परागीभवन करायचा प्रयत्न मी ब्रशच्या साहाय्याने केलेला पण तेव्हा पाऊस खुप असल्याने बहुतेक माझा प्रयत्न अयशस्वी झाला.

भोपळ्याचेही दोन भलेमोठे वेल लागलेत. आताशा कुठे पुष्पकोष दिसु लागलेत. अजुन फुले आली नाहीत.

छोट्या छोट्या किटकांना दिव्यदृष्टी असते तसेच त्यांचे गंधज्ञानही अतितीव्र असते. कुठल्या फूलात मध शिल्लक आहे ते त्यांना नूसते बघून समजते. गंधाचा सूक्ष्मसा कणही त्यांना जाणवतो. मग त्या गंधाचा मागोवा घेत ते जातात.
शिवाय फूले पण लब्बाड असतात. फूले उमलल्याबरोबर परागकण तयार होत नाहीत. पुंकेसर तयार असणे आणि परागकण तयार असणे (ज्या झाडात नर आणि मादि फूले वेगवेगळी नसतात त्या झाडात) यांच्या वेळा कटाक्षाने वेगळ्या ठेवल्या जातात. स्वपरागीभवन शक्यत टाळले जातेच.

मागे आपले कलाबाश (मराठी नाव कमंडलु) वर बोलणे झाले होते. हे आहेत नायजेरियातले कलाबाश.
(फोटो मीच काढला होता. आणि फोटोत दिसतोय तो माझा मित्र रमण गुलेरिया, त्याने परवानगी दिली आहे, फोटो वापरायला.)

एवढे मोठे फळ, पण कुठलाच प्राणी वा पक्षी खात नाही. हे फळ सुकले कि पाणी भरुन आणण्यासाठी उपयोग केला जातो.

मोठ्या झाडाला एवढे मोठे फळ? तुटुन डोक्यावर पडले की झाले Happy

पण किती छान दिसतेय ना झाड हिरवेगार कमंडलु अंगावर मिरवित.

साधना, अभिनंदन! कलिंगडाबद्दल! जणू काही 'आपल्याच घरात' कुणी 'नविन' पाहुणा आलाय/पाहुणी आलिये असं वाटतय नाही?मी खूपच excite झालीये. मात्र तू लिहिल्याप्रमाणे मधमाशीचं निरीक्षण नाही करू शकले. पण आता यापुढे लक्ष ठेवीन.
कीटक खरंतर आपल्यापेक्षा अनेक बाबतीत कितीतरी पटींनी advance आहेत.समाजव्यवस्था, एकी, गंध-ज्ञान इ.

बाप्रे ते कलाबाश/कमंडलू केवढे मोट्ठे आहेत! खरंच डोक्यात बिक्यात पडलं एखादं तर पाणी पण मागू शकणार नाही. अर्थात जशा नारळाच्या झावळ्या आणि नारळ कधी डोक्यात पडत नाही तसंच असेल ह्याचं पण. झाडांना पण कळतं (आणि माणसांपेक्षा नक्की जास्त समजत असणार).

या फोटोबद्दल, तो मागे हौद दिसतोय त्यात मगरी होत्या. (हा फोटो एका झू मधला आहे.) त्या हौदात एक फळ पडले होते, बहुतेक तिच्या डोक्यात पडले नसावे. आणि तिनेही, चाळा म्हणून किंवा दात शिवशिवतात म्हणूनही, त्याला तोंड लावले नव्हते. दुसर्‍या बाजूला गाढव बांधले होते. (हो नायजेरीयात गाढव हा झू मधे ठेवण्याजोगा प्राणी आहे.) त्याच्या बाजूला पण काही फळे पडली होती. त्यानेसुद्धा या फळाकडे दुर्लक्षच केले होते.
आम्ही मात्र ती फळे घेऊन वेगवेगळ्या पोझेसमधले फोटो काढले. वाटताहेत तेवढी ती फळे जड नव्हती. त्यामूळे डोक्यात पडली तरी अपाय नाही व्हायचा.

ज्यांना माहित नाही, त्यांना आम्ही हा फोटो दाखवून ती, नायजेरियातली कलिंगडं आहेत म्हणून सांगतो.

मी गेली अडीच वर्षे झाली सौदी अरेबिया मधे अल जुबैल या गावी आहे. इथे वाळवंटात कुठले पक्षी ? असे आधी वाटले होते. पण अगदी लहान पणी विदर्भात परतवाडा इथे असतांना पाहिलेला सुतार पक्षी नंतर थेट इथेच पहायला मिळाला मला. अन गेल्या महिन्यात तर चक्क एक ससाणा ! काय रुबाबदार पक्षी!! दुर्दैवाने कॅमेरा सोबत नव्हता. इथे फार दुर्मिळ पक्षी म्हणजे कावळा!! पण या वर्षी ४-५ कावळेही दिसले. आता उन्हाळा सुरु झालाय बिचारे कावळे काळ्या रंगा मुळे हीट सहन न झाल्याने बरेच से मरुनच जातील असे मित्र म्हणाला. ज्यांना घरांभोवती मुद्दाम लावलेल्या मोठ्या झाडांचा आसरा मिळेल तेच जगतील कसेबसे. अन हो इथे चिमण्या ही मुबलक आहेत.

श्रीकांत तुमचे स्वागत आहे निसर्गगप्पांवर.. काही चांगले पाहायला/वाचायला मिळाले तर आम्हालाही सहभागी करुन घ्या त्यात Happy

श्रीकांत, तिथे समुद्रकिनार्‍यावर गेलात तर नक्कीच अनेक पक्षी दिसतील. तिथे वाळवंटात हरणेदेखील आहेत. बाकिचेही पक्षी दिसतील.
आणि त्या निसर्गाचेही एक आगळे असे सौंदर्य आहेत. इथे अवश्य फोटो टाका त्याचे.

ज्यांना माहित नाही, त्यांना आम्ही हा फोटो दाखवून ती, नायजेरियातली कलिंगडं आहेत म्हणून सांगतो.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>(हसणारी बाहुली,मला अजून text area त smileys टाकता येत नाहीत. प्लीज दिनेशदा शिकवाल का?)

गाढव आणि मगर एकाच झू मधे ठेवणारे नायजेरियन किती समदृष्टीचे आहेत नाही?(त्यांना मनापासून दाद द्यायला हवी.)

गंमत म्हणून काही कुंड्यांमधे मिरच्या,मोहोरी आणि दोडक्याची वेल लावली होती त्यांचे काही फोटोज

ही दोडक्याची वेल.

Image0515_0.jpg

ही मिरचीची रोपं.

Image0514.jpg

ही मोहोरी.

Image0517_0.jpg

ही गुळमेंडी/झुडुप तामण(Lagerstromia indica)

Image0524.jpg

आणि ह्या आळीने माझ्याकडच्या सर्व लिलींची पानं खाऊन टाकली ,

Image0519.jpg

उरलेल्या एका पानावर ताव मारताना......(रडणारी बाहुली)

Image0525.jpg

शांकली इथेच खाली Textual Smileys लिहिलेय तिथे आहे हि माहिती.
ती अळी सुंदर आहे कि. तिच्यावर लक्ष ठेवल्यास तिचा कोष आणि एखादा किटकही बघायला मिळेल.

हो ना नायजेरियात, प्राण्यांत भेदभाव करत नाहीत. बूशमीट म्हंटले तर ते कुठल्या प्राण्याचे मटण आहे, त्याची कुणी चौकशी करत नाहीत !!

अळी सुंदर आहे, आणि अशा खूप संख्येने त्या आहेत. पण माझ्या लिलीज.....................

त्या smileys टाकायला गेले ना की text save होत नाही. नुस्त्याच त्या येतात.

जागू, शेवळाच्या कंदाचा फोटो पाहिला. त्या कंदातून थेट उगवलेला पिवळसर कोंब छान दिसतो.पण त्याच्या आजूबाजूला बिनकंदांची आणि कोवळ्या तुर्‍यांच्या लोंब्या असलेली नुसती कोवळी रोपे दिसतात ती शेवळे नव्हेत. गोव्याकडे त्यांना लुतीची भाजी म्हणतात. ही भाजी सुद्धा शेवळांसारखीच दुर्मीळ आणि निगुतीने करून खाण्याची असते. सुरणाच्या किंवा अळवाच्या जीवनचक्राच्या शेवटी म्हणजे पाने जून होऊन पिवळी पडू लागली की त्यांना शेंड्यातून मोठे फूल येते. हे अगदी शेवळाच्या आतल्या कोंबासारखेच दिसते.पण खूप मोठे असते. ह्याचीही भाजी शेवळांसारखीच करतात आणि अर्थातच ती छान लागते.

Pages