निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, या शेवळासारखेच दिसणारे अनेक कंद असतात आणि त्याला तसेच कोंब येतात. त्यापैकी काहि विषारी पण असतात. आम्ही एकदा कर्नाळ्याला ते गोळा करत होतो त्यावेळी तिथल्या अधिकार्‍याने अशी सावधगिरीची सूचना केली.

तूमच्या घराच्या परिसरातच अनेक झाडे उगवलेली असतील. आजूबाजूला जी झाडे आहेत, त्यापैकी अनेकांची रोपे असतील. आणि या दिवसात ति उपटली तरी १०/१२ तास तग धरु शकतात.

तसे जंगलात लावायला काजूचे झाड पण चांगले, त्याने मातीची धूप थांबते. खरे तर पोर्तुगीजांनी गोव्यात त्याची लागवड याच कारणासाठी केली होती. पण आता झाडे लावली तर भट्ट्या लागण्याचा धोका आहे !!

साधना, मोबाईल टॉवर्स हे खरेच कारण आहे का ? माझ्या इथल्या ऑफिसच्या बाहेर, पुत्रंजीवीचे मोठे झाड आहे. त्यावर रात्री वस्तीला किमान पाच ते सहा हजार चिमण्या येत असाव्यात. त्या गटागटाने तिथे येत असतात आणि संध्याकाळी ते दृष्य मजेशीर दिसते. त्या झाडाचा पर्णसंभार इतका दाट आहे कि कितीही निरखून बघितले तरी त्यावरच्या (कि आतल्या) चिमण्या दिसत नाहीत. पण प्रचंड चिवचिवाट करत असतात. (माझा गुजराथी मित्र त्याचे मस्त भाषांतर करत असतो, आ चकली छे ने आ कहे छे एक सारु अने हैंडस्म चकला मिळ्या हत्या.... )

दिनेशदा, काही महिन्यांपुर्वीपर्यंत आम्ही महिन्यातून २ रविवारी आदिवासी पाड्यांत (शहापूर तालुक्यातील) जायचो तेव्हा वाटेवर एक तिठा लागतो. त्या तिठयावर एक चहाची टपरी होती व त्यावर असाच प्रचंड विस्तार असलेलं झाड होतं. तिथेही तिन्हीसांजेला चिवचिवाट ऐकू यायचा पण चिमण्या दिसायच्या नाहीत. मी चहाचा ग्लास घेऊन त्या विस्ताराच्या बाहेर जाऊन उभी रहायचे Proud

माझ्याकडे रामफळांची झाडे उगवली आहेत
माझ्यासाठी ठेव एक...

साधनाने अशी एकापेक्षा एक झाडे गोळा करुन घरी मोठ्ठी बागच तयार केली असणार,यासाठी एकदा सगळ्यांनी बागेला भेट दिली पाहिजे,दुसरं म्हणजे त्या या पानाच्या निर्माणकर्त्या आहेत म्हणुन देखील.

सावली,दिनेशदा,जागु
डेक्कन क्वीनच्या प्रवाशांचे उद्योग मात्र भन्नाट, आवडले, अनुकरण करायला हरकत नाही.
Happy
बाभळीची,करंजाची झाडे तर कुठेही सहज उगवलेली दिसतात,फक्त माती आणि पाणी मिळालं कि झालं.

रात्रीची वस्ती करायला, किंवा घरटी बांधायला पक्ष्यांची पसंती एका खास झाडालाच असते. वटवाघळांचे पण एखादेच झाड लाडके असते.

साधना, चिमण्या केवळ शहरातूनच गायब झाल्या का ? गावाकडे काय परिस्थिती आहे, ते लक्षात येत नाही.

अनिल बाभळीचा प्रसार कसा होतो ते मी एका लेखात लिहिले होते. करंज्याच्या बियांचा प्रसार कसा होतो, त्याची कल्पना नाही. माझ्या कयासाप्रमाणे, कुठलाही पक्षी / प्राणी त्या बिया खात नाही. वार्‍यावर उडून प्रसार होत असेल म्हणावे तर तेवढ्या त्या शेंगा हलक्या नसतात. कदाचित पावसाच्या पाण्याने होत असावा.

हिरडा पण सावलीसाठी चांगला. अंबाघाट, राधानगरी, दाजीपूर भागात खूप आहेत हि झाडे. अंबोलीला पण आहेत.

दिनेशदा,
करंजाची झाडे ही बहुतेक करुन नदीकाठी,ओढ्याकाठीच खुप पाहायला मिळाली...
या मोबाईलच्या लहरीमुळे तर चिमण्या खुप कमी होत आहेत अस कुठेतरी वाचलं होतं

राम राम, मित्र-मैत्रिणींनो.
ज्याना कुणाला चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायचा असेल त्यांनी, गोंदवल्याला, गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला जावे. आणि किमान एक दिवस मुक्काम करावा. संध्याकाळी ६-६.३० पासून चिमण्यांचा व इतर पक्षांचा असा किलबिलाट चालू होतो, कि मंदिरात चाललेले किर्तनही ऐकू येत नाही. Lol

हो म्हणजे पाण्यामूळेच होत असणार.
जागू / साधना तूम्ही सी बीन्स ची वेल बघितलीय का ? अंबोलीला लाडांच्या घरी याची सुकवलेली शेंग आहे आणि तिच्या वेली समुद्रकिनार्‍यावर पण असतात, म्हणून दोघीना विचारले.
या बीन्सची मजाच असते. याच्या शेंगा सहा ते नऊ फूट (हो !) लांब असतात. याच्या बिया दोन ते तीन इंच व्यासाच्या चपट्या गोलाकार असतात. याचा प्रसार कसा होतो ते बघणे मजेशीर आहे.
आपल्या फरसबी किंवा पावट्याच्या शेंगाना जश्या दोन्ही बाजूंनी शिरा असतात तश्याच या शेंगेला पण असतात, पण अर्थातच शेंगेच्या आकारमानानुसार ते दोरही मजबूत असतात. बीच्या एवढ्या मोठ्या आकारामुळे ना पक्षी ती खाऊ शकत ना माकडे. यासाठी या वेलीचीच एक युक्ती असते. बिया नीट तयार झाल्या, कि या बिया शेंगेतून सुट्या होऊन गळतात. बाजूचे दोर तसेच राहतात, फक्त बी आणि तिच्या भोवतीचे आवरणच गळते. तेसुद्धा एकेका बीचेच. फेसपावडरचे चपटे डबे असतात तसे हे दिसते. हि वेल सहसा नदी, किंवा खाडीच्या किनारीच असते. पाण्यात पडल्यावर हि डबी व्यवस्थित तरंगते. आकाराने गोल असल्याने कशालाही न अडकता ती वहात राहते. त्यावरचे आवरण बी सुरक्षित ठेवते. पाण्याबरोबर वहात वहात हि बी दूरवर आणि कधी कधी अख्खा समुद्रही ओलांडते. शेवटी वरचे आवरण कुजून जाते पण बी मात्र सुरक्षित राहते. एखाद्या किनार्‍यावर ती रुजते.

इथे आफिकेच्या किनार्‍यावर या वेलींचा बिया सापडतात. हे लोक त्या बियांच्या माळा वगैरे करतात.
पण तूमच्या लक्षात एक गोष्ट आली का ? जर हि बी प्रवाहाबरोबर वहात असेल तर नदी च्या वरच्या अंगाला ती मूळात कशी रुजली असेल ? तर हे अजून गूढच आहे.

नाही, मी पाहिली नाही अजुन ही शेंग..

नदीच्या वरच्या अंगाला पण अशीच एखाद्या हलक्या लाटेच्या आघाताने कोप-यात ढकलली गेली असेल आणि मग रुजली असेल.

बाकी झाडांच्या जगण्याच्या ओढीविषयी मला खरेच आश्चर्य वाटते. कुठुन काय कधी रुजुन येईल सांगता येत नाही. अगदी पुर्ण कापलेल्या खोडालाही लगेच कोवळी पालवी फुटते.

लग्नानंतर दोनेक महिने मी पुण्यात निगडीला होते. घर भाड्याचे होते आणि अतिशय सुंदर (बांधकाम मात्र भिकार, पावसाळ्यात भिंतींवर धारा लागलेल्या). दारात बाग होती आणि मालकाने दोनचार वेली लावलेल्या. एका वेलीला आधार म्हणुन एक दांडा रोवलेला. दांडा म्हणजे नुकतीच कापलेली कुठल्यातरी झाडाची एक इंच जाड अशी फांदीच होती, बाहेरची साल तासलेली वगैरे नव्हती. तर त्या जमिनीत रोवलेल्या दांड्याला काही दिवसांनी चक्क पालवी फुटली.. मी मनात म्हटले, याचे एक टोक जमिनीत आहे पण तिथे अन्न-पाणी शोषायला मुळे नाहीत. तरी त्या टोकाकरवी या दांड्याने अन्न मिळवले आणि जगायची धडपड सुरू केली. माणसे त्या मानाने खुपच लवकर हार मानतात.

साधना, चिमण्या केवळ शहरातूनच गायब झाल्या का ? गावाकडे काय परिस्थिती आहे, ते लक्षात येत नाही.

गावी चिमण्या नाहीयेत. निदान आंबोलीला तरी चिमण्या नाहीत. पण पुण्याला ऐशुच्या शाळेजवळ भरपुर होत्या. इथल्या चिमण्यांपेक्षा जराशा मोठ्या आणि रंगाने अजुन थोड्या गडद. माझ्या वडलांची आई पहिल्यांदा मुंबईत आली तेव्हा घरात येराझा-या घालणा-या चिमण्या पाहुन तिला धक्का बसलेला. गावी सगळ्यांसाठी भरपुर जागा असते त्यामुळे माणसांच्या घरात पोटभाडेकरु म्हणुन राहायची वेळ चिमण्यांवर येत नाही.

मी रोज शिजवलेले अन्न, जसे भात, चपाती, बिस्किटे इ.इ. पक्ष्यांसाठी टाकते. (घरात जास्तीचे उरलेले सगळे अन्न नी आपण खाताना सांडलेले खरकटे मी त्यांना खायला घालते. कच-यात कधीच अन्न टाकत नाही). पण कधी वाटते आपले हे अन्न खाऊन त्यांना त्रास तर होणार नाही ना? कारण त्यांची सिस्टिम शिजलेले अन्न खाण्यासाठी बनलेली नाहीय.

पुर्वी तांदूळ गहू निवडताना, चिमण्या हमखास आजूबाजूला घुटमळायच्या. त्या धान्यातून वेचून काढलेले खडे, किडके दाणे, अळ्या हेच तर त्यांचे आवडते खाणे ना. (हो पक्ष्याना खडे गिळणे आवश्यक असते, कारण त्या खड्यांमूळेच त्यांच्या पोटात दाणे दळले जातात.) आपले शिजवलेले अन्न, तसे कुठल्याच प्राणी पक्ष्याच्या उपयोगाचे नाही. कुत्रे नाईलाज म्हणून खातात कारण शिकार करुन अन्न मिळवायची क्षमता आता त्यांच्याकडे उरलेली नाही, आणि उंदीर, घूशी माज आलाय म्हणून खातात.

----
आपण झाडांची लागवड करायचा, बिया रुजवायचा अतोनात प्रयत्न करत असतो. पण त्यांची ती समर्थ असतात. आपण जिथे त्यांच्या स्वरुपाचीच वाट लावलीय (ऊस, गहू, बटाटा ) त्या ठिकाणी मात्र ते हतबल ठरलेत. आणि बाहेरुन दांडगट प्रतिस्पर्धक आणले, कि त्यांचाही नाईलाज होतो.
-------

श्रावणात कोल्हापूर परिसरात घरांच्या कौलावर आणि पत्र्यावर एक जांभळट रंगाची फूले येणारी वनस्पति अनोनात वाढते. फार सुंदर दिसतात ती फुले. एक वर्षभर त्यांच्या बिया या संधीची वाट बघत असतात.

आताही माझ्या गच्चीत चिमण्या घुटमळत असतात. खायला घातले की नालायक कबुतरे आधी डल्ला मारणार. कावळे नी चिमण्या लांबुन आंवढे गिळत राहणार. मग कबुतरे उडुन गेली की कावळे उतरणार. चिमण्या मात्र कधीकधी चान्स मारुन कबुतरांचय मध्येच घुसतात. साळूंक्या भरपुर आहेत पण अगदी क्वचितच शिजलेले अन्न खातात. आणि सुर्यपक्षी तिकडे बघतही नाहीत. त्यांना फक्त फुलातला मध हवा असतो.

खाताना कबुतरे कशी भांडतात आणि इतरांना हुसकावतात ते बघायला पाहिजे. आणि हे म्हणे शांतीदुत..... माझ्या घरी येऊन बघा एकदा यांची अशांती. मला कबुतरांइतका राग दुस-या कुठल्याही पक्ष्याचा नाही. आणि प्राण्यांमध्ये मांजराचा Happy

दिनेशदा त्या शेंगेचा व वेलीचा फोटो मिळाल्यास टाका. कदाचित पाहीली असेल पण लक्षात नाही येत.

साधना मी पण राहीलेल अन्न सकाळी पक्षांनाच घालते. मी बाहेर एखाद भांड घेउन गेले अन्न उडवण्यासाठी की सगळ्यात आधी साळुंख्या येतात. आमच्याकडे साळुंख्या भरपुर आहे. त्यानंतर बुलबुल, कावळे, भारद्वाज्,दयाळ, पोपट, कोकीळ टिटवी चिमण्यांपेक्षा लहान दिसणारे पक्षी काळे आणि चिमणीच्या रंगाचे नाव माहीत नाही हे कायम दिसतात तर कबुतरे, धनेश,घार, घुबड व अजुन काही पक्षी मधुन मधुन दिसतात. डाळी वाळत लावल्या की कबुतरे मात्र हजर असतात. आता पावसाळ्यात बगळे दिसायला लागतात.

दिनेश, चिमण्यांचा विडिओ भारतात दिसत नाही Sad

not available in your area असे दिसतेय. कदाचित ऑफिसात विडिओ बॅन असेल म्हणुनही हा मेसेज येत असेल. घरी जाऊन पाहते... (घरी अजिबातच वेळ मिळत नाही Sad )

सावली, मी हे एकदा टिव्हीवर पाहिलं होतं.

आज सकाळी मला स्वयंपाकघरामागच्या आंब्यावर चिमण्यांची चिवचिव ऐकू आली पण चिमणी दिसलीच नाही.

अश्विनी, चिमण्या कमी झाल्या कारण त्यांचे मुख्य अन्न लहान अळ्या व किडे हे खूप कमी झालय. ते कमी झालय कारण पर्यावरणाचा र्‍हास. रस्त्याव्रर सांडणारे पेट्रोल, वंगण यामुळे किड्यांची पैदास खूप कमी झालीये तसेच बहुतेक सगळ्या इमारतीच्या भोवतालची जागा फरशा, कोबा वगैरेने आच्छादल्यामुळे 'जमीन' उघडी क्वचीतच रहाते मग किड्यांची पैदास कशी होणार?

माझे आणखी एक निरीक्षण आहे: इमारतीत माझ्या बाजूला अशोकाचे (आसूपालव) झाड आहे त्यावर चिमण्या अजिबात येत नाहीत (तसं तर कावळे सोडून कोणत्याच पक्षाला ते झाड मानवत नाही) पण इमारतीच्या दुसर्‍या टोकाला लहानसे आवळ्याचे झाड आहे त्यावर मात्र बर्‍याच चिमण्या येतात (हो ठाण्यात चिमण्या आहेत Happy ). आसूपालव मुळचा भारतिय वृक्ष नाहिये का? त्याच्यावर इतके कमी पक्षी असायचे कारण काय असावे?

चिमण्या आणि मोबाईल यांच्या संबंधांचा अभ्यास कोणी केला आहे का? अमेरीकेत एवढी झाडे अशूनही पक्षी खूपच कमी का आहेत (मोबाईल-पूर्व काळापासूनच)?

जागू, लवंगाची फूले पण छान दिसतात. अर्थात लवंगा हव्या असतील तर मूक्या कळ्याच खूडाव्या लागतात.
माधव, आसुपालाची जी उभी जात असते, त्यातल्या फांद्या निमुळत्या असतात. आणि पक्ष्यांना बसण्याएवढी पोकळी नसते आत. पण मी पुण्याला या झाडात चिमण्या शिरताना बघितल्या आहेत, कदाचित काहितरी दुसराच हेतू असेल. वेडी बाभूळ, महारुख यावर पण पक्षी बसत नाहीत !

अमेरिकेबद्दल माहित नाही, पण एकाच पट्ट्यात असलेल्या नायजेरिया आणि केनयात परिस्थिती अशी आहे. केनयात आजूबाजूला अनेक रंगाचे आणि आकाराचे पक्षी वावरत असतात. पण नायजेरियात फारच कमी. कारण नायजेरियात कुठलाही पक्षी मारुन खातात. त्यामानाने केनयात फळे आणि भाज्यांचा सुकाळ असल्याने, पक्ष्यांना भक्ष्य केले जात नाही.

शेतात अजुनही ज्वारीच्या पिकात मात्र या चिमण्या खुप,झुंडीने येताना दिसतात, पुर्वीइतकं त्यांच प्रमाण नसेलही,पण एवढ्या बाकी कुठल्याच पिकात बहुतेक दिसत नाहीत.ज्वारी त्यांना खुप आवडत असेल.

ज्वारीचा दाणा तसा उघडाच असतो ना (म्हणजे गव्हासारखा आवरणात नसतो) म्हणुन त्यांना खायला सोपा जातो. कणसात अळ्या असतील तर त्याही खातात.
मक्याचे कणीस कसे छान आवरणात असते. शिवाय त्यातले दाणे काढणे चिमण्यांना जमत नाही. इथे पोपटासारखे छोटे पक्षी असतात, ते मात्र लिलया मक्याचे दाणे खातात.

न्यू झीलंड मधे एक समुद्री पक्षी दिसतो. त्याची चोच त्याच्या डाव्या बाजूला बांकदार असते. तो किनार्‍यावरच्या दगडाखालचे किटक वगैरे खातो. असा बांक असलेली चोच असणारा तो एकमेव पक्षी आहे. (बहुतेक पक्ष्यांच्या बांकदार चोची, खालच्या दिशेने बांकदार असतात.)

Pages