गेल्या एका वर्षात तुम्ही काही केलंत?

Submitted by अजय on 6 March, 2011 - 23:24

मला काहितरी करायचंय हा लेख मी लिहून १ वर्ष झालं. त्यावर ११० प्रतिक्रियाही आल्या? पण त्यानंतर कुणी काही केलंय? कारण नुसती प्रतिक्रिया लिहणे म्हणजे काही करणे नाही. जे काही तुमचं स्वप्न असेल ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने काही केलंय का?

आणि लेख न वाचता देखील तुम्ही काही तरी केलं असेल तर ते वाचायला आवडेल. आम्हालाही त्यापासून स्फूर्ती मिळेल. तुमच्या स्वप्नाच्या दिशेने अगदी "माहिती मिळवली" इतकी छोटी पायरी ओलांडली असेल तरी चालेल. "कागदावर लिहून काढलं" हे सुद्धा चालेल.

पण मी गेल्या वर्षी काही केलं नाही पण या वर्षी हे करणार आहे अशा प्रतिक्रिया नकोत. उलट ते जे करायचं असेल ते आधी करा आणि मग सांगा.

कुणितरी "लोका सांगे ब्रम्हज्ञान" असे म्हणायच्या अगोदर सांगतोय Happy . किंवा मागे वळून पाहताना काही गोष्टी /चुका मी केल्या, करतोच आहे त्या ही सांगतोय.

योग्य वेळ घालवला:
अनेक ग्राहक, भागीदार यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यातून खूप शिकायला मिळालं. " No Good idea survives a first real customer interaction" याचाही अनुभव घेतला. म्हणजे जी Idea आपल्याला great वाटत असते त्याबद्दल ग्राहकाला काहीही देणेघेणे नसते. त्याला वेगळेच हवे असते आणि ते शोधून काढून विकता येणे हाच उद्योगाचा मूलभूत पाया आहे.
काही वेगळ्या कल्पना , मार्केटींगच्या कल्पना चाचणी करून पाहिल्या. स्केल वाढवण्याच्या दॄष्टीने प्रयत्न केले. नवीन प्रकल्प सुरु केले. मार्केटींग बद्दल पुस्तके वाचली आणि काही कल्पना प्रत्यक्षात आणल्या.

कुणाचे तरी चरित्र (कितिही स्फूर्तिदायक असले तरी) या वर्षी वाचायचे नाही असे ठरवले होते आणि ते पाळले. अशी खूप पुस्तकं वाचून झाली आहे आणि आता वाचन सोडून त्यातलं प्रत्यक्ष काही आचरणात आणल्याशिवाय नवीन वाचायचं नाही असं ठरवलं आहे.

चुकीचा वेळ घालवला:
"Startup porn" म्हणतात ते वाचण्यात वेळ घालवला. उदा. Tech Crunch , Yourstory.in सारख्या वेबसाईट किंवा काही मासिकातले स्फूर्तीदायक लेख. यातून आपल्याला वाटते नवीन नवीन Idea मिळताहेत. हे करावे का ते करावे? काही लेखातून कधितरी एक ज्ञानाचा कण सापडतो पण ९०% वेळा काय वाचले काय मिळवले ते आठवत नाही. जर तुमच्या कडे काही आयडिया नसेल तर किंवा स्फूर्ती कमी पडत असेल तर अशा लेखांचा उपयोग होतो. पण तुम्ही प्रत्यक्ष एखाद्या कल्पनेवर काम करत असाल तर असे लेख वेळेचा अपव्यय ठरतात (माझ्यासाठी तरी) अजून तरी या सवयीवर उपाय सापडला नाही. माझ्या माहितीतल्या बर्‍याच उद्योजकांच्या मते ही सगळ्यात वेळखाऊ सवय आहे.
http://twitter.com/wadenick/status/27516895945
कुणाकडे या सवयीवर उपाय असेल तर जरूर सांगा ! Happy

तुम्ही काय केलंत?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा आणि एआर्सी धन्यवाद.....!!!

उशीर झाला हे खरय, वर्ष फुकट घालवलं. पण आता नक्की तो प्रयत्न करतोय.

सगळ्यांचे अनुभव वाचुन खूप बरं वाटलं. सगळयांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! Happy

मी संगणक क्षेत्रात काम करतो (building IT Infrastructure for SMBs). सगळ्या क्षेत्रात भेडसावणारी समस्या म्हणजे मनुष्यबळ. Service oriented industry असल्याने मला Well trained मनुष्यबळ लागतं, आणि तेच सर्वात मोठी अडचण आहे. अव्वाच्या सव्वा पगाराच्या अपेक्षा आणि नॉलेजच्या नावाने बोंब असा प्रकार सर्रास आढळतोय.भुंगा म्हणाला तसं ५०० रु साठी नोकर्‍या बदलल्या जातात. साधा प्यून गेले सहा महिने मिळाला नाहिये, कारण भुंग्याने दिलय तेच.

टेक्निशियन लेवल साठी मी आता काही मार्ग शोधुन काढतोय जसं की Thin Client Implementation, जिथे फक्त सर्वरलाच मेंटेन करायला लागतं (जे Remote Control (TeamViewer) ने देखिल करु शकतो. Distater Prevention Plan असं गोंडस नांव देऊन एक पॅकेज कस्टमरला देण्यावर काम करतोय, जेणेकरुन त्यांचा Downtime कमी होईल आणि मला मनुष्यबळ देखिल कमी लागेल. याव्यतिरिक्त Backup Software चं मार्केटींग सुरु केलय, त्यातुन नफा चांगला मिळेल असं वाटतय. येत्या वर्षात असे बरेच मार्ग शोधुन काढायचेत. बघुया कसं जमतय ते. Happy

भुंगा , भ्रमर ( समानार्थी Proud )
एक कल्पना सुचवते. तुमच्या क्षेत्रात /व्यवसायात किती वापरता येईल नक्की माहीत नाही तरिही.
कॉलेज मधल्या किंवा कसले कसले कोर्स करणार्‍या मुलांना पार्टटाईम म्हणुन घेता येईल का? अर्थातच ते दिर्घ काळ रहाणार नाहीत पण काही कामे जीथे फारशी स्कील्स नको आहेत तिथे तुम्हाला जरा कमी पगारात वगरे सुद्धा मुलं मिळू शकतील.

सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन...
@ भुंगा... मनुष्यबळ कमी पडत असेल तर कुठल्याही योग्य माणसाची निवड करा.. धंद्याच्या दृष्टीने हा मराठी हा परका हा भेदभाव जातीवादा पेक्षा महाग पडतो... आपल्या दृष्टीने सर्वात टॉप प्रॉयोरीटी धंदा आणी फक्त धंदा हीच असते.. अर्थात हे माझे वैयक्तीक अनुभव किंवा मत आहे...
दुसरे सगळ्यानाच एक सल्ला, तुमच्या धंद्यातील टॅक्स चा योग्य अभ्यास जरुर करा.. तुम्ही टॅक्स वाचवु शकलात तर तुमचे प्रॉफीट ३ ते ५ टक्क्याने वाढते....

शेवटी थकून थकून मग विचार येतो..... सोडा मराठी बाणा, आणि भैया घरात आणा. >>>> अगदी बरोबर. माणसे काम करणारी हवीत. मग कोणी का असेनात.

सगळ्यांचे अभिनंदन असेच लिहा, वाचुन स्फुर्ती घेउन पुढ्च्या वर्षी कदाचित अजुन पोस्टी येतिल इथे. Happy

एक कल्पना सुचवते. तुमच्या क्षेत्रात /व्यवसायात किती वापरता येईल नक्की माहीत नाही तरिही.
कॉलेज मधल्या किंवा कसले कसले कोर्स करणार्‍या मुलांना पार्टटाईम म्हणुन घेता येईल का? अर्थातच ते दिर्घ काळ रहाणार नाहीत पण काही कामे जीथे फारशी स्कील्स नको आहेत तिथे तुम्हाला जरा कमी पगारात वगरे सुद्धा मुलं मिळू शकतील.
>>>>>

सावली,
आयटीआय केलेली मुले बघतो आम्ही. माझ्या फॅक्टरीच्या बाजुलाच आयटीआय आहे. मुलाखतीला येणार्‍या मुलांची पगाराची अपेक्षा ऐकाल तर बुबुळं बाहेर येतात, घशाला कोरड पडते.
ईन शॉर्ट, नवीन मुलं (फ्रेशर्स) यांचा कल हल्ली "अनुभव घेऊन मोठे होणे" हा राहिलेला नाही...... "पगार किती" यावर सगळे निर्णय ठरवले जातात. शिकायला काय मिळतय का याची फिकिर नाही कोणाला...... Sad

भुंगा Sad
पण खरं सांगते माझाही आयाअयटी च्या मुलांबद्दल फारसा चांगला अनुभव नाही. कोणाला लेबल लावायची नाहित पण जी मुलं आम्ही हायर केली होती ( अगदि २५ ३०) त्या सगळ्यांना अ‍ॅटीट्युड प्रॉब्लेम होता. फार त्रास झाला.
दुसर्‍या साध्या कॉलेज मधुन बघा.

<<ईन शॉर्ट, नवीन मुलं (फ्रेशर्स) यांचा कल हल्ली "अनुभव घेऊन मोठे होणे" हा राहिलेला नाही...... "पगार किती" यावर सगळे निर्णय ठरवले जातात. शिकायला काय मिळतय का याची फिकिर नाही कोणाला......>>
अनुमोदन.
काही ठिकाणी तर मी आणखी वेगवेगळी कारणे पाहिली जसे की कुठे काम करतो त्या कंपनीचे ब्रॅण्डनेम महत्त्वाचे, काय काम करतो ते गेले खड्ड्यात.. अगदी काही उदाहरणे अशी पाहिलियेत की 'घरचे लग्न ठरवतायेत, आणि ईन्फोसिस, विप्रो, टीसीएस असे काही ब्रॅण्डनेम असेल तरच लग्न जमेल किंवा तरच चांगली मुलगी मिळेल'.....
एका तर मुलीला आता लग्न जमवायचे म्हणून तिच्या घरच्यांनी छोट्या कंपनीतील नोकरी सोडून मोठ्या कंपनीत जायला लावले. आता ती तिथे खुप काम पडते वगैर कारणांमुळे नाखुश...
Sorry हे विषयांतर होतंय का?

नविन सुरवात....अगदि शुन्यातुन.....एक अजुन पाऊल बाकि.....
गेल्या २०१० मध्ये वास्तुशास्त्राचि marashtra government approved पदवि घेतलि.स्वताचि practice चालु केलि.
नविन aura instruments from america खरेदि केले.क्लाईट बेस वाडवला.नविन astrology :-ancient science,modern concepts याचे क्लासेस चालु केले.
या गुडिपाड्व्यापासुन नविन ओफिस चालु करत आहे.टु व्हिलर बुक केलि आहे.घर पाहने चालु आहे.मुलाला प्ले ग्रुप मधे घालने आहे.मिसेस साटी नविन बिझनेस सुरु करने आहे.
जुन्या शत्रुना मित्र बनन्याचि एक अजुन सन्धि देऊन त्याचे मन जिकण्याचि शर्त केलि.
वेग वेगया टिकानि सवाद चालु आहे..........
वेग वेगया बिझनेसचा विचार चालु आहे.बघुया कश्याप्रकारे जमते ते.....एक पाऊल अजुन बाकि.....

बरं वाटलं सगळ्यांचे अनुभव वाचून.

मी आणि किरुने वेगळाच उद्योग सुरु केलाय. मायबोलीवरच मागे चर्चिला गेलेला ईमूपालनाचा व्यवसाय.

काहिही अनुभव नसताना, फारशी माहिती गोळा न करता सुरु केलेला हा उद्योग, सुरुवातीला जरा गळ्याशीच आला. इतर उद्योगांपेक्षा रीटर्न्स यायला लागणारा जास्त वेळ, उद्योग सुरु करण्यात व चालवण्यात येणार्‍या अडचणींशी अजिबात नसलेली ओळख. रिसोर्सेस शोधून काढण्यापासून करावी लागलेली सुरुवात बरच काही शिकवून गेली. यातील सामोर्‍या आलेल्या अडचणी अश्या

  1. जागा उपलब्ध होणे.
  2. पैसा जमवणे.
  3. कॅपिटल एक्स्पेंडिचरचा अंदाज चुकणे.
  4. आमच्या चुकांमुळे काही पक्ष्यांचा मृत्यू.
  5. केअर टेकर (अनस्किल्ड / सेमीस्किल्ड लेबर) मिळणे
  6. तो टिकणे.
  7. रनिंग कॉस्ट, मिसिलिनियस एक्स्पेन्सेस बाबत गंडणे

या सर्वांतून मार्ग काढत काढत अजूनही तग धरुन आहोत. सध्या ह्यासंदर्भातली इतर मार्केट्स चाचपणे चालू आहे. पुढचं वर्ष अजून खडतर जाणार आहे ह्याची मानसिक तयारी झालेली आहे.

नुकताच अजून एका व्यवसायाची सुरुवात करतो आहोत. श्वानपालन व पैदास हा एक व्यवसाय म्हणून करायचा मानस आहे. ह्याबरोबरच त्यांचं लॉजिंग बोर्डींग, खाणे पुरवणे, बिहेवियर कन्सलटन्सी देणे, राखणीसाठी कुत्रे पुरवणे, ट्रेनिंग अश्या इतर बाबींनाही सुरुवात करणे आहे. अर्थात हे सध्या थोड्या प्रमाणावरच आहे.

यापुढे मत्स्यपालन ह्या विषयात काही करण्याची ईच्छा आहे.

सध्यातरी आपल्या आवडीचं क्षेत्र व्यवसाय म्हणून निवडल्याचं सुख हेच इन्कम Happy

मला कोणीही सांगू शकेल का कि पोस्टाचे पैसे घेऊन जातात ना बरीही महिने अशी माझी दर महिन्याची ३००० हजाराची आहे. आता माझ्या आईला मला पोस्टाच्य agency उघडून द्यायची आहे त्याला काही तिला परीक्षा द्यावी लागेल का कोणालाही माहित असेल तर मला माहिती द्या
खूप मदत होईल
माझा मोबिले नो. ९९३०९६९६११( जेणे करून तीही काही उद्योग करू शकेल. )

अजय साहेब मला इथे थोडीशी माहिती तरी द्या नाहीतर तुमचा कोणी ओळखीचा असेल त्याचा दूरध्वनी क्रमांक

@ साधना ताई: माझ्या मते तुम्ही कुठल्या तरी कार्यालयात कामाला होतात ना काही दिवसापूर्वी मी प्रती बघितलेल्या रांगोळीच्या मग मधेच हे दुकान काढण्याचा निर्णय कसा घेतलात आणि आता कस वाटतंय. आणि मी इथे वरतीच केलेली टिपणी वाचा आणि तुम्हाला काही माहित असेल तर मला सांगा.................

मी सध्या तरी "नोकरी" करतो आहे. त्याला पर्याय नाही. पण...
कोणत्याही क्षणी नोकरी सुटू शकते या टान्गत्या तलवारीला वैतागुन, तसेच असलेल्या अक्कलेचा सुयोग्य वापरच करुन घेतला जात नाही हे शल्य उराशी ठेऊन, तीन वर्षापूर्वीच एकनाएक दिवस नोकरी सोडण्याचा निश्चय मनाशी केला. अर्थातच प्राप्त आर्थिक डबघाईच्या परिस्थितीस अनुसरुन, एकदम कसलीच उडी घेणे शक्य नव्हते, सबब, काडी काडी जमवत घरटे बान्धावे तशागत एकेक बाबी जमवु लागलो आहे. अहो वीस वर्षान्पूर्वी लग्नाची भेटवस्तु काय देऊ म्हणून विचारणार्‍या मण्डळाच्या कार्यकर्त्यान्ना लग्नाची भेट म्हणून "दाते पन्चागाचे १९३९ पासुनचे पन्चवार्षिक सेट घेऊन द्या - (वर्गणीत बसतील तेवढे)" असे सान्गणारा मी, एकदा "डाय्व्हर्सीफिकेशन" करायचेच ठरवल्यावर हरप्रकारे प्रयत्न करणारच. त्यातिल काही वाया जातिल, काहीतुन फारसे नि:ष्पन्न होणार नाही, काही दीर्घकालात उपयोगी पडणार नाहीत, अन हे करताना आर्थिक सोन्ग आणता येणार नाही याचि कल्पना आहेच्/असतेच. पण, मूळातच, ऐन्शीच्या दशकात, आम्ही दोघा भावान्चा निर्णय होता की एकाने व्यवसायात पडावे, एकाने नोकरीत. त्या दृष्टीने त्या काळी भरपुर प्रयत्न केले होते, काही साध्य झाले होते, काही वर अजुन काम करण्याची भान्डवली ताकद न उरल्याने व इतर आकस्मिक सन्कटान्नी, नव्वदच्या दशकात मात्र नोकरीस जाणे सक्तिचे झाले. तशात वडील व भाऊ एका मागे एक तीन वर्षाचे अन्तराने निवर्तले म्हणल्यावर, जो फटका बसला, तो निस्तरायला नोकरी शिवाय तरणोपाय नव्हता.
पण तरीही ते तत्कालिकच असे धरुन असल्याने ९९ सालिच कर्ज काढून डोन्गरी रानात गुन्तवणूक करुन ठेवली होती व पुढली काही वर्षे नोकरीतुन ते कर्ज फेडत बसलो. गेल्या दोन तीन वर्षात त्या जमिनीवर लिम्बीच्या बाबान्नी बरेच काम त्यान्चे खर्चाने केले जेणे करून लागवड योग्य अशी खाचरे बनली. गेल्या वर्षी पाण्याचे सोईकरता ओढ्यास बान्ध घालणे, चर वगैर कामे केली. अजुन बराच टप्पा गाठायचा आहे. या कामात लेबर वर विसम्बता येत नाही, तुम्ही प्रत्यक्ष हजर नसाल तर कामे होत नाहीत हा नित्याचा अनुभव असल्याने, व सध्या नोकरी मुळे स्वतः सर्वजागी खपता येत नसल्याने हा प्रकल्प सन्थ गतीने नेत आहे, पण मला फारशी घाई देखिल नाही, कारण या सगळ्या प्रोसेस मधे, मुलाचा सहभाग घेऊन त्यास त्यामागिल अर्थकारण समजावुन व त्याचा त्या प्रोजेक्ट मधे इन्टरेस्ट निर्माण होईल, त्यास आत्मियता वाटेल असे घडवणे हे शॉर्ट टर्मचे काम नाहीच. शेवटी हे सगळे करतो ते पुढील पिढ्यान्करताच ना? अन तेच जर साम्भाळणार नस्तील तर काय उपयोग? या कामास मी उपलब्ध पाठबळ/ताकदी नुसार पाच वर्षाची मुदत घालून घेतली आहे. गेल्या वर्षीचा ओढ्याचा बान्ध यशस्वी झाला, पण जास्त पाणी आत घुसले, आमच्या अनुपस्थितीत, सान्गुनही ते कुणी अडवले नाही, सबब प्रचण्ड मोठा खड्डा होऊन माती वाहून गेली, तर अनासायेच खड्डा मिळाला म्हणून तिथेच यावर्षी शेततळे करणार आणि ओढ्याकडच्या चराचे तोन्ड बन्दिस्त करणार. यावर्षी पिक घेणार नाही. व केवळ अन्य रोपान्च्या लागवडीवर/बान्धबन्दिस्तीवर लक्ष देणार.
ही एक जमिनीची बाजू जी लिम्बी व मुलान्करता राखुन ठेवली आहे.
दुसरी बाजु म्हणजे गेली सलग तिन वर्षे आमच्या मूळच्या खानदानी पण सध्या कोणीच करत नसलेल्या भिक्षुकीच्या व्यवसायात उमेदवारी सुरू केली आहे. प्रगती आहे, पण अजुन दोन वर्षाची मुदत एकुण डेव्हलपमेण्टकरता यास दिली आहे. यात वैयक्तिक स्किलचा भाग जास्त असतो. पण टीम वर्कही तितकेच महत्वाचे असल्याने मुलासही हळू हळू यात गुन्तवले आहे. तो स्वतन्त्ररित्या उमेदवारी करतो.
या व्यतिरिक्त बरीच स्वप्ने आहेत. कणा कणाने का होईना, पण आशा न सोडता, न कण्टाळता प्रयत्न करीत रहाणे, प्रत्येक कृतीतून काहीतरी भव्यदिव्यच होईल अशी गैरलागु अपेक्षा न ठेवता, अन तरीही प्रत्येक कृती मला एक पाऊल पुढे नेईल हे लक्षात घेऊन वाटचाल करतो आहे, करीत रहाणार.
सर्वात महत्वाचे म्हणजे, कितीही वाईट घडले, तरीही त्या धक्यातुन सावरुन, त्या वाईटातुनच काय चान्गले नि:ष्पन्न होतय त्याचा शोध घेऊन त्या सन्धीचा वापर करण्याचे धोरण कायम ठेवले आहे. अन म्हणूनच लिम्बीच्या शेतात दोन पुरुष उन्चीची घळ पडल्यामुळे बसत असलेल्या धक्क्यातुन तत्काळ सावरतानाची प्रतिक्रिया हीच होती की ठीक आहे, खड्डा पडलाय तर या खड्ड्याचा देखिल मी वापरच करुन घेईन!

महेश, आईसाठी तुम्ही जवळच्या पोस्टऑफिसात जाऊन चौकशी करा ना. तिथे कदाचित माहिती मिळू शकते. सेविंग्ज एजंट नेमायचे काम पोस्टऑफिस करत असते.

आणि मी अजुनही नोकरी करतेय. नोकरी आणि दुकान दोन्ही सध्या चालु आहेत. दुकानाचे बरेच वर्षे डोक्यात होते, आता मदत मिळाली म्हणुन सुरू करु शकले. आता पुढे कसे चालेल ते सांगता येणे कठिण आहे. वेगवेगळे प्रयत्न करुन पाहणे सुरू आहे. Happy

मी आणि मित्राने मिळुन Software Consultancy चालु केलीय कल्याण ला आणि जळगाव जिल्ह्यातही शाखा
ऊघडली आहे.. आताशा Clients मिळायला सुरुवात झालीये. आधी वैयक्तीक पातळी वर काम करणे चालु होते.

आमच्या कंपनी चा दुवा खाली देत आहोत. क्रुपया गरज पडल्यास नक्की संपर्क करा.

http://www.aspireworld.co.in/

सोबत मी माझे Microsoft Certification पुर्ण केले. MCTS

१) web development (HTML, PHP, JSP, AJAX etc) ई. शिकलो.
२) socail media marketing आणि SEO हे पन आत्मसात केले.
३) नुकताच नोकरी चा राजीनामा दिला.
४) स्वःत च्या web development company (in Aurangabad or Pune) साठी जमवाजमव करतोय.

नमस्कार
हा ग्रुप आणि यावरचे सर्व धागे मी नियमित वाचतो आहे. पण मला उद्योजक बनण्यासाठी काही पावले उचलण्यास प्रवृत्त केलं असेल तर ते या धाग्याने.

मुळात मी जे करतो आहे ते (सध्यातरी) उद्योजक या सदरात मोडत नाहीय, तरीही माझ्यासारख्या इतर लोकांनी देखील कमीत कमी एक पाउल पुढे टाकावे या हेतूने मी इथे टंकतोय.

छायाचित्रणात मला कॉलेजात असल्यापासून रस आहे. तेव्हा मित्रांचे कॅमेरे मागून मागून फोटोग्राफी करायचो. गेली जवळपास १०-११ वर्षे मी (स्वत:च्या ) कॅमेऱ्याने फोटोग्राफी करतोय. या १०-११ वर्षांत साध्या फिल्म वाल्या point and shoot कॅमेर्यापासून ते डिजिटल एस एल आर पर्यंत जवळपास ६-७ कॅमेरे घेऊन झाले. ओर्कुट आणि फेसबुक वरचे फोटो पाहून लोक मला फोटोग्राफी व्यवसाय म्हणून घेण्याचे सल्ले देत होते पण आतापर्यंत मी ते कधीच सिरीअसली घेतले नव्हते.

गेली ३-४ वर्षे कामामध्ये बरंच frustrate व्हायला होत होतं. कामावर पैसा चांगला आहे पण मन:शांती नाहीय. काहीतरी स्वत:चा उद्योग सुरु करायचं मनात होतं. पण त्याचबरोबर जे आवडत नाही असं काहीतरी करून पुन्हा frustrate व्हायचं नव्हतं. त्यामुळे जे काही आवडतं त्यातच काहीतरी करायचं ठरवलं. शेवटी फोटोग्राफी वर शिक्कामोर्तब केलं. पण फोटोग्राफी मध्ये नक्की काय आणि कुठून सुरुवात करायची ते कळत नव्हतं.

बरेच दिवस असेच घालवल्यावर माझ्या डोळ्यासमोर माझा सत्यानाश कॅटेगरीत मोडणारा लग्नाचा अल्बम आला. एका so called फोटोग्राफर ने माझ्या लग्नाचे काळे फोटो काढून मला अजून काळं करून टाकलं होतं. ती वेळ दुसऱ्या कुणावर येऊ नये म्हणून मी मुख्यत: वेडिंग फोटोग्राफर व्हायचं ठरवलं. त्याचबरोबर लग्नाचे फोटो हे लग्नाचे snapshot न वाटता दरवेळी पाहिल्यावर नव्याने प्रेमात पडावे असे फोटो काढण्यासाठी काय करता येईल यादृष्टीने research करायला सुरुवात केली. माझ्याकडे अगोदरच एक एस एल आर होता, पण professional वेडिंग फोटो काढायचे तर तो पुरेसा नव्हता. म्हणून बेस्ट वेडिंग फोटोग्राफर साठी लागणाऱ्या कॅमेरा असेम्ब्लीचा शोध सुरु केला. One of the best कॅमेरा, फास्ट लेन्सेस, flash असेम्ब्ली, रिफ्लेक्टर असं सर्व मिळून जवळपास ४ लाखापर्यंत बजेट गेलं. तेव्हा मनाने पुन्हा ब्रेक मारला. एवढ करून ऑर्डर मिळाल्या नाहीत तर काय. अजून कशात काही नाही तर ४ लाख घालावेत का?

नाहीच ऑर्डर मिळाल्या तरी हौशी फोटोग्राफी करू. कमीत कमी फोटो एकदम चांगले येतील हा विचार करून आणि शेवटी मनाचा हिय्या करून ती सर्व असेम्ब्ली खरेदी केली. जोपर्यंत व्यवस्थित जम बसत नाही तोपर्यंत कितीही frustrate झालं तरी हातातला सोन्याचं अंड देणारा जॉब सोडायचा नाही असं ठरवलं. पण शेवटी लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यात (शक्यतो) एकदाच येणारा सोहळा. आपणही ज्या so called फोटोग्राफर ने माझ्या फोटोंची वाट लावली तशी इतरांच्या फोटोची वाट लावली तर काय घ्या, हा विचार मनात नेहमी येत राहिला. तो प्रश्न माझ्या पुतणीच्या लग्नाच्या निमित्ताने निकाली लागला. तिच्या लग्नात आलेल्या फोटोग्राफर च्या बरोबरीने मीही थोडी फोटोग्राफी करून माझी असेम्ब्ली production environment मध्ये टेस्ट करून घेतली Happy ते फोटो मी माझ्या फेसबुक वरील फोटोग्राफीच्या पेज वर टाकले आणि त्यावर लोकांच्या खोऱ्याने कमेंट्स आल्या. एका दोघांनी तर त्यांनी आतापर्यंत पाहिलेले ते सर्वात चांगले लग्नाचे फोटो आहेत अश्या आशयाच्या कमेंट्स दिल्या. त्या कमेंट्स आणि ते फोटो पाहून माझा स्वत:चा आत्मविश्वास दुणावला. आता कमीत कमी इतरांचे फोटो आपण खराब नक्की करणार नाही हा विश्वास आला. ते फोटो पाहून मला एक अजून वेडिंग कव्हर करायची ऑर्डर मिळाली आणि त्याच बरोबर दोन टीवी स्टार बनू इच्छिणार्या हौशी कलाकारांचे outdoor shoot करण्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.

अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तो गाठता येईल की नाही ते या क्षणाला माहित नाही, परंतू पल्ला जरी गाठता नाही आला तरी कमीत कमी पल्ला गाठण्याच्या दृष्टीने पावले उचलली याचे समाधान नक्कीच राहील. तो पल्ला गाठण्यासाठी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांची (आणि काहींच्या ऑर्डर्सची ) नितांत आवश्यकता आहे Happy

कुणाला ते आणि मी काढलेले इतर फोटो पाहायचे असल्यास https://www.facebook.com/pages/Worth-a-1000-words/236853766385615 वर भेट द्यावी Happy

प्रविणपा मस्तच!
तुम्हांला तुमच्या नवीन कामासाठी मन:पूर्वक शुभेच्छा ! Happy
तुमचे योसेमिटीचे फोटो अगदी लक्षात राहिलेत रादर ते पाहूनच आमचा कॅलि ट्रिपचा मागे पडलेला प्लॅन पुन्हा ठरला.. !

सर्वाचे अभिनंदन आणि तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा...........
सावली बरोबर आहे तुझे.... मलाही तुझ्यासारखाच अनुभव आला ग्रिटींग च्या बाबतीत.... मी एका Indian grocery मधे विकायला ठेवली होती..... त्यानंतर बरेच उद्योग केले. पण सध्या मात्र सर्व बंद...

प्रविणपा अप्रतिम फोटो आहेत. लग्नाचे फोटो तर खरच एकदम युनिक आहेत. नक्की तुमच्या नव्या उद्योगामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. शुभेच्छा. Happy

>>>> अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तो गाठता येईल की नाही ते या क्षणाला माहित नाही <<<<
पल्ला नक्कीच गाठता येईल. Happy शुभेच्छा Happy
अवान्तरः
>>>> दोन टीवी स्टार बनू इच्छिणार्या हौशी कलाकारांचे outdoor shoot करण्याच्या <<<<<
हल्ली असे स्टिल फोटोन्चे अल्बम देखिल बनवुन घेतात, अगदी लहान मुलान्पासून ते मोठ्यान्पर्यन्त. या करता मात्र केवळ फोटोग्राफीच नव्हे तर, पोषाख, अ‍ॅक्शन्/पोझेस, फेस एक्स्प्रेशन्स इत्यादी अनेक बाबीन्चे मार्गदर्शन तुम्हाला करता यायला हवे, तर त्याचाही अभ्यास सुरू ठेवावात. लग्न वगैरे इव्हेण्ट्स घडत असतानाचे फोटो काढणे वेगळे, व मुद्दामहुन उभे/आडवे करुन पोझेसचे फोटो काढणे वेगळे.
सामान्यतः लोक, लग्न वगैरे इव्हेण्ट्स मधेही "पोझेस बनवुन" "क्यामेर्‍यात नजर रोखुन" फोटो काढून घेतात (ज्यामुळे घटनेतील नैसर्गिकताच संपते असे माझे मत), तर मग खरोखरच पोझेस मधे जाउन फोटो काढताना विचारायलाच नको. पण इथेच, क्यामेरा जर भारी असेल, तर घेतलेली पोझ देखिल "आखडलेली अनैसर्गिक" न वाटता सहज हालचालितुन टीपलेले सौंदर्य या पद्धतीची वाटू शकते, व कौशल्य पूर्णपणे तुमचे, तुम्ही कोणत्या क्षणाला क्लिक करता यावर राहील. जर माझ्या हातात क्यामेरा असेल, अन पोझेसचे चित्रण करायचे असेलच, तर मी पोझेस घ्यायला सागुन मग त्यान्च्या अपेक्षेप्रमाणे "त्यान्च्या सावध भुमिकेत" असताना फ्लॅश वगैरे पाडीनच, पण हे सर्व करताना, अ‍ॅन्गल सेट केलेले असतील, तर पोझेस "घेता घेताच्याच" मधल्या अवचित क्षणी देखिल क्लिक करायला विसरणार नाहि. असो. तुम्हाला हार्दीक शुभेच्छा Happy

(वरील लिन्क मी बघुच शकलो नाहीये)

Pages