केल्याने भाषांतर - प्रवेशिका १२ (स्वाती_आंबोळे)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 25 February, 2011 - 18:27

मायबोली आयडी : स्वाती_आंबोळे

मूळ (इंग्रजी) कविता :

The Gardener XXVIII: Your Questioning Eyes

Your questioning eyes are sad. They
seek to know my meaning as the moon
would fathom the sea.
I have bared my life before your
eyes from end to end, with nothing
hidden or held back. That is why you
know me not.
If it were only a gem, I could break
it into a hundred pieces and string
them into a chain to put on your neck.
If it were only a flower, round and
small and sweet, I could pluck it from
its stem to set it in your hair.
But it is a heart, my beloved.
Where are its shores and its bottom?
You know not the limits of this
kingdom, still you are its queen.
If it were only a moment of pleasure
it would flower in an easy smile, and
you could see it and read it in a
moment.
If it were merely a pain it would
melt in limpid tears, reflecting its
inmost secret without a word.
But it is love, my beloved.
Its pleasure and pain are boundless,
and endless its wants and wealth.
It is as near to you as your life, but
you can never wholly know it.

Rabindranath Tagore

भाषांतर :

तुझ्या खिन्न डोळ्यांतली प्रश्नचिन्हे
पुन्हा मागती अर्थ माझा मला
जसा जलधिचा थांग शोधे सुधांशू
दुरूनीच न्याहाळुनी त्याजला

तुला दाविण्या पूर्ण आयुष्य माझे
जसेच्या तसे मांडले मी, तरी
चहूबाजुंनी नीट निरखूनसुद्धा
कशी होत नाही तुझी खातरी?

कधी वाटते रत्न असते जरी हे
कधीचेच असते न का फोडिले
सुवर्णात गुंफून त्याचीच शकले
गळा हार असते तुझ्या घातले

जरी फूल असते, चिमुकले सुगंधी
खुडूनीच असते झणी घेतले
तुझ्या दाट केसांत माळावयाला
स्वतःहून आणून असते दिले

मनाचा परी थांग लागेल कैसा?
तयाचे किनारे कुणी पाहिले?
तुलाही नसे ज्ञात सीमा जयाची
असे राज्य चरणीं तुझ्या वाहिले

स्मितांतून झळकून जाती सुखे अन्‌
झरे वेदना आसवे होवुनी
क्षणाचे उमाळे क्षणार्धात जाती
उजळुनी, विझूनी तसे विसरुनी!

प्रिये, प्रीतिचे पण अमर्याद वैभव
सुखे, दुःख, इच्छांस ना पार त्या
जिवाला असे घट्ट बिलगून, तरिही
न उमगे कुणाला कधी पूर्णतः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! Happy

स्वाती, हा अनुवादही सुंदर आहे, पण मला वाटतंय की ह्यापेक्षाही छान अनुवाद तू करु शकशील. (तुझा ह्याआधीचा अनुवाद आठवून म्हणते आहे.) इंग्रजीतील लडिवाळ शब्दांचा जो मोहक नाद आहे तो फार सुंदर आहे.... Happy

खूप मस्त.

मराठीतील शब्दयोजना खूप आवडली. उदा: चंद्राला सुधांशु. आधीच्या दोन अनुवादांमध्ये पण.

व्वा व्वा अशीच मेजवानी चालू राहू द्या - सर्वच रसिक तृप्त होऊन जातील.
"भावानुवाद दात्री" सुखी भव |

ताई, तुझं आणि 'मीटर'चं सख्यच दिसतंय.
रच्याकने, तू अरुण कोलटकर, सौमित्रला सुद्धा दामटून मस्त बसवशील मीटरमध्ये, खात्री आहे माझी.

अभिप्रायासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार. Happy

बी, मी भाषांतरासाठी निवडलेल्या सर्व कविता प्रोजेक्ट गटेनबर्ग या संकेतस्थळावरून घेतल्या आहेत. त्यांच्या मुख्यपृष्ठावरील माहितीनुसार तिथली सगळी ई-पुस्तकं अमेरिकन वाचकांसाठी प्रताधिकारमुक्त आहेत.

मणिकर्णिका,
मीटरशी सख्य आहे खरं, पण मी मुक्तछंदातही कविता लिहिते (आणि सौमित्र स्वत: वृत्तबद्ध काव्यही उत्तम लिहितो). Happy
खरंतर या भाषांतरांच्या निमित्ताने मला कल्पना फॉर्म कसा डिक्टेट करते याचा नव्याने आणि प्रकर्षाने प्रत्यय आला. रवींद्रनाथांच्या कवितांतल्या कल्पनांमधेच एक लय आणि नाद अंतर्भूत आहे जो मला वाचतांना 'दिसला'. (हे यापेक्षा सविस्तर सांगता येणं अशक्य आहे!)
तेव्हा कोलटकरांना 'दामटायचं' ठरवलं तरी ते दामटले जायचे नाहीत, आणि बोरकरांची लय मोडू म्हणता मोडता येणार नाही. Happy

रवींद्रनाथांच्या कवितांतल्या कल्पनांमधेच एक लय आणि नाद अंतर्भूत आहे जो मला वाचतांना 'दिसला'. >>> व्वा !!..
तू केलेले सर्वच अनुवाद चपखल आणि नादमय आहेत, तरीही अर्थ पूर्णपणे झिरपतोय. काही ठिकाणी तर मूळ कविता विसरुन अनुवादच लक्षात राहील असं वाटतंय, मराठी केव्हाही जवळची असल्याने. Happy

मस्तच,

इंग्रजीतील लडिवाळ शब्दांचा जो मोहक नाद आहे तो फार सुंदर आहे.. >> +१

आधी कसा काय मिस झालेला देव जाणे Sad

स्वाती, 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असे काहीसे ! हे आपल्या मायमराठीचेही सौंदर्य.
धन्यवाद.