सात खून माफ!!!

Submitted by चिनूक्स on 20 February, 2011 - 01:08

'सात खून माफ' अफाट आहे. लेखन, दिग्दर्शन, छायालेखन, रंगभूषा, अभिनय सगळंच अफाट. सुसाना आणि तिच्या आयुष्यातील सात पुरुषांची ही कथा. या सातही पुरुषांवर ती प्रेम करते. मात्र त्यांच्याकडून तिच्या वाट्याला अपमान, विश्वासघात आल्यावर त्यांचा ती काटाही काढते. हे काटा काढणं शेवटच्या पुरुषाच्या बाबतीत अतिशय अफलातून पद्धतीने दाखवलं आहे. सातवा नवरा आणि या सातव्या नवर्‍याचा खून..ही कल्पनाच लाजवाब आहे.

प्रत्येक नवर्‍याच्या विशिष्ट लकबी, त्यांचे स्वभाव अगदी थोड्या वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. पात्र उभं राहण्यात अजिबात वेळ जात नाही. या पात्रांच्या तोंडी असलेले संवाद उत्कृष्ट. सुसानाच्या आयुष्यात हे पुरुष कधी आले, ते दाखवण्यासाठी प्रत्यक्षात घडलेल्या काही घटनांचा आधार घेतला आहे. मात्र या घटना केवळ संदर्भ म्हणून वापरलेल्या नाहीत. या घटना आणि सुसाना व तिचा तेव्हाचा नवरा यांचा संबंध सहज जुळतो. या घटना काही सेकंदांच्या अवधीत बरंच मोठं भाष्य करून जातात. पटकथेतील या हुशारीसाठी विशाल भारद्वाजला सलाम.

सर्वांचे अभिनय उत्तम. नील नितीन मुकेश, जॉन अब्राहम आपल्या नेहमीच्या पठडीपेक्षा, अभिनय आणि शरीरयष्टी या दोन्ही बाबतींत, वेगळे वावरतात. इरफान मस्त. त्याचे किंचित बायकी हातवारे, त्याचं रात्री वेगळं वागणं त्यानं सही दाखवलं आहे. नसिरुद्दीन शाह नखशिखांत बंगाली, आणि काही प्रसंगांमधले त्यांच्या चेहर्‍यावरचे सरसर बदलणारे भाव थोर आहेत. उषा उत्थुप पूर्ण चित्रपटभर असल्या तरी त्यांना फार संवाद नाहीत, तरी त्यांची देहबोली अफाट आहे.

गाणीही मस्त. विक्रम गायकवाडांचं रंगभूषासंयोजन विलक्षण आहे. वयानुसार सुटलेलं शरीर, सुरकुत्या, तुटलेला पाय हे सगळं त्यांनी फार सुरेख दाखवलं आहे.

आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे विशाल भारद्वाजचं दिग्दर्शन. हा चित्रपट त्याच्या थोरपणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डाऽहलिंग Proud

काहीतरी वेगळा म्हणून आवडला. प्रियांका चोप्राने भारी काम केलंय.
असे एकेक अनुभव येत ती सायको झालीच असावी... कर लग्न कर खून...
तिच्या मेकअप चं मात्र अगदीच वाटोळं केलंय काही ठिकाणी.

नील नितीन मुकेशने मस्त काम केलंय! घोड्यावरुन पडल्यावरच आणि फाईटचा सीन! झकास!
जॉन अबब्राहम बघवत नाही 'त्या' दृश्यात. Uhoh त्या स्कॉटीश स्कर्टमधेही..
अन्नु कपुरही भारीच लोचट दाखवलाय . चांगलं काम केलंय त्यानंही.
त्या रशियनाला का मारला असावा? (असे एकेक अनुभव येत ती सायको झालीच असावी... ???)
इरफान खानवाला शिकार्‍यातला सीन वगैरे मस्त. सृष्टीसौंदर्य लय भारी . तो ही कस्ला सायको दाखवलाय..
नासिरुद्दिन शाहला अजुन स्कोप द्यायला हवा होता.

तो पोरगा ते वर म्हटल्याप्रमाणे ढंबळंग वगैरे का दाखवलाय काय माहित खरंच! ! तो नाही शोभत... नुस्ता चष्मा लावला की वाढलं का वय? त्याची बायको जरा कमी त्याची मावशी शोभेल.. त्याला जीन्सं टीशर्टं घाला आणि तिला साडी नेसवा.

उशा उत्थुप का वाया घालवलीये?

एकूण - काहीतरी वेगळा म्हणून आवडला.

डीजे ला अगदी अगदी..
येवढा वाईट अनुभव आल्यावर तिसरं, चवथं लग्न करणच मुळात पटत नाही चित्रपट जसा घेतलाय त्यावरून..
दोन/तीन अनुभव शहाणं व्हायला पुरेसे नसतात? Uhoh
नसले तर ते प्रभावी पणे प्रेक्षकांपर्यंत पोचत तरी नाहीत..
एकूणात बंडल वाटला सिनेमा..

Pages