सात खून माफ!!!

Submitted by चिनूक्स on 20 February, 2011 - 01:08

'सात खून माफ' अफाट आहे. लेखन, दिग्दर्शन, छायालेखन, रंगभूषा, अभिनय सगळंच अफाट. सुसाना आणि तिच्या आयुष्यातील सात पुरुषांची ही कथा. या सातही पुरुषांवर ती प्रेम करते. मात्र त्यांच्याकडून तिच्या वाट्याला अपमान, विश्वासघात आल्यावर त्यांचा ती काटाही काढते. हे काटा काढणं शेवटच्या पुरुषाच्या बाबतीत अतिशय अफलातून पद्धतीने दाखवलं आहे. सातवा नवरा आणि या सातव्या नवर्‍याचा खून..ही कल्पनाच लाजवाब आहे.

प्रत्येक नवर्‍याच्या विशिष्ट लकबी, त्यांचे स्वभाव अगदी थोड्या वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. पात्र उभं राहण्यात अजिबात वेळ जात नाही. या पात्रांच्या तोंडी असलेले संवाद उत्कृष्ट. सुसानाच्या आयुष्यात हे पुरुष कधी आले, ते दाखवण्यासाठी प्रत्यक्षात घडलेल्या काही घटनांचा आधार घेतला आहे. मात्र या घटना केवळ संदर्भ म्हणून वापरलेल्या नाहीत. या घटना आणि सुसाना व तिचा तेव्हाचा नवरा यांचा संबंध सहज जुळतो. या घटना काही सेकंदांच्या अवधीत बरंच मोठं भाष्य करून जातात. पटकथेतील या हुशारीसाठी विशाल भारद्वाजला सलाम.

सर्वांचे अभिनय उत्तम. नील नितीन मुकेश, जॉन अब्राहम आपल्या नेहमीच्या पठडीपेक्षा, अभिनय आणि शरीरयष्टी या दोन्ही बाबतींत, वेगळे वावरतात. इरफान मस्त. त्याचे किंचित बायकी हातवारे, त्याचं रात्री वेगळं वागणं त्यानं सही दाखवलं आहे. नसिरुद्दीन शाह नखशिखांत बंगाली, आणि काही प्रसंगांमधले त्यांच्या चेहर्‍यावरचे सरसर बदलणारे भाव थोर आहेत. उषा उत्थुप पूर्ण चित्रपटभर असल्या तरी त्यांना फार संवाद नाहीत, तरी त्यांची देहबोली अफाट आहे.

गाणीही मस्त. विक्रम गायकवाडांचं रंगभूषासंयोजन विलक्षण आहे. वयानुसार सुटलेलं शरीर, सुरकुत्या, तुटलेला पाय हे सगळं त्यांनी फार सुरेख दाखवलं आहे.

आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे विशाल भारद्वाजचं दिग्दर्शन. हा चित्रपट त्याच्या थोरपणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सात खून माफ पाहिला..

हिरॉइन म्हणते .. सारे कमीने मर्द मेरेही नसीब मे क्यु आते हैं?

मला रडू कोसळलं...

( मी म्हटलं ... सारी घटिया मुवीज मेरेही नसीब मे क्यु आती है? Proud )
सातवा खून कुणाचा ते काही कळले नाही...... शेवटी पडद्यावर नावे येत असतानाही काही स्टोरी सुरु होती.. पण लोकांच्या गोंधळात पाहता आली नाही...

थँक्स चिनूक्सा :). टाईम्स , ग्लॅमशॅम सगळ्यांनी कमी स्टार्स दिलेत आणि बर्‍याच कमेंट्स केल्यात त्यामुळे माझा हा चित्रपट बघण्याचा निर्धार ढासळत होता , पण तो आता पुन्हा पक्का झाला , आता नक्कीच बघेन . Happy

सात खून माफ बघितला.मला तरी आवडला नाही. दर दहा मिनिटाने एक मढं, जनाजा आणि फ्युनरल.... ४-५ वेळा पिक्चर पाहिला तर कुणीही कुठल्याही धर्माचा किरवंत म्हणून नक्की काम करु शकेल. Proud

पहिलाच चांगला रिव्ह्यू वाचला... बाकी सर्व ठिकाणी त्रुटी दाखवल्यात.....
विशालवरच्या प्रेमापोटी तर नव्हे ना........ Uhoh
खूपच संक्षिप्त लिहिलाय.

पण कसाही असो.... विशालचा चित्रपट बघणारच आहे.... बघुया कसा वाटतोय.....

धन्स चिनुक्स.

मला आवडला... सगळ्यांची काम मस्त.. ! प्रियंका, विवन शहा, नसरूद्दिन शहा, इरफान, निनिमु, जॉन अब्राहम सगळेच सही.. प्रियंकाला फिल्मफेअर साठी परत चान्स नक्की..
विवन शहा नसरुद्दीन शहाचा मुलगा आहे ना? त्याचं काम पण मस्त झालय एकदम..

विक्रम गायकवाडांचं रंगभूषासंयोजन विलक्षण आहे. >>>> हे नाही पटलं पण... शेवटी शेवटी बारमध्ये प्रियंका आणि एका म्हातार्‍या माणसाचा सीन आहे (जो चर्च मधला पाद्री असतो) त्यात प्रियंकाचे केस पांढरे आणि त्वचा अगदी नितळ असं दिसतं.. आणि आधीच्या एका सीन मधे (तिच्या आणि अरूणच्या) तिच्या चेहेर्‍यावरच्या सुरुकुत्या, वाढलेलं वय, थोडासा जाडसर चेहेरा हे अगदी व्यवस्थित दाखवलय.. तिच्या चेहेर्‍यावरच्या सुरकुत्या गेल्या का नंतर ? Happy
तसच कोंकणा सेन बरोबरच्या सीन्सना अरूणला मोठं "दाखवलेलं" कळून येतं... तो स्वतः वयाने लहानच आहे..त्यामुळे विद्यार्थ्याच्या सीन्समध्ये एकदम व्यवस्थित दिसतो...
उषा उत्थपला वाया घालवलय असं वाटतं... म्हणजे त्या जागी कोणीही असतं तरी चालल..
बाकी पात्र परिचय करून द्यावा लागत नाही.. भेट कुठे कशी झाली हे मुद्दाम बोलून दाखवावं लागतं नाही ह्या करता "अगदी अगदी".. !
दिग्दर्शन रॉक्स.. !

पराग,
ते चर्चमधले पाद्री म्हणजे खुद्द रस्किन बॉण्ड.
बाकी, रंगभूषेविषयी -

सहाव्या नवर्‍याचा खून होईपर्यंत प्रियांका म्हातारी झाली आहे. चेहर्‍यावर सुरकुत्या आहेत, चेहरा रापला आहे. शरीरही सुटलं आहे. नंतर तर ती चक्क भीक मागते. पण पुड्डुचेरीला परत आल्यावर ती बर्‍यापैकी सुंदर दिसते कारण आता जुनी सुसाना मेली आहे. आणि मध्ये काही वर्षं गेली आहेत. ही नवीन सुसाना आहे. आधीची दु:खं चेहर्‍यावर न बाळगणारी. मागे विक्रम गायकवाडांशी बोललो होतो, तेव्हा त्यांनी या शेवटच्या रंगभूषेबद्दल सांगितलं होतं. प्रियांकाचं वय ५८ वर्षं आहे. पण स्वतःची बर्‍यापैकी काळजी घेणारी प्रौढा जशी दिसेल तशी आता ती दिसते.

मला सातवा नवर्‍याचा खून काहि कळला नाही. खरे तर सातवा नवरा नक्की कोण? लॉर्ड जीज्स?

मठ्ठपणाबद्दल माफी.. पण कोणी सांगेल का सातवे नवरा प्रकरण समजावून?

मला सिनेमाचा पूर्वार्ध अधिक आवडला. एकतर पूर्वार्धात तिच्या भोवती एक वलय दाखवलय. काहिशी गूढ भासणारी साहेब नंतर फारच झपाट्याने सामान्य पातळीवर येते. एक अनु कपूरचा अपवाद वगळता, इतर सर्वांशी ती प्रेमात पडूनच लग्न करते पण नंतर नंतर प्रेमापेक्षाही ती मेंटल असल्यासारखं वाटतं. तिच्यात आणि अरुणच्यात असलेलं नातंही विचित्र आहे. आधी त्याला तिच्याबद्दल गूढ आकर्षण असतं नंतर तीच त्याच्यापुढे जो प्रस्ताव ठेवते तो तो स्विकारत नाही.

काही अ आणि अ गोष्टी आहेतच.
१. पॉंडिचेरीत राहिलेली, त्याच संस्कृतीत मुरलेली साहेब, डायरेक्ट काश्मिरला जाऊन उर्दु शेरोशायरी ऐकते. आणि फर्डं हिंदी बोलते.
२. अरुण सहजपणे रशियात पोहचून रशियन भाषेत डॉक्टरी करून येतो.
३. ही बया येवढी फटाफट लग्न करत असते पण गावातल्या लोकांना काही फारसं वाटत नाही. लोकच न दाखवून हा प्रश्न सोडवला आहे.
४. तिच्या बरोबर तिची टीम काश्मिरात जाऊन टकाटक राहते. इकडे त्यांच्या घोडाशाळेकडे कोण बघणार? असो.
५. जो काळ दाखवलाय त्यात एवढ्या सहजपणे आंतरधर्मीय लग्ने व्हायची?

कामं प्रियांकासकट सगळ्यांचीच सुरेख आहेत. नसिरुद्दिन, अनु कपूर, नील उल्लेखनीय. रस्कीन बाँडला बघून आता याचा खून होतोय की काय अशी धास्ती वाटली होती. Happy कोंकणा मात्र अति-सहजपणे अभिनय करण्यामुळे खुप तीच तीच वाटायला लागलेय.

सातवा खून हा तिच्यातल्या वाइटाचा असतो आणि ती प्रभूला शरण जाऊन आपले जुने व्यक्तीमत्त्व उतरवून नविन जीवन सुरू करते असे काहीसे असावे. (मात्र प्रियांका आणि येशू यांचं सूफी स्टाईलने नाचणं काही झेपलं नाही बघा.)

खरंतर, विषय वेगळा होता, तो अजून खुलवता आला असता असं वाटत राहिलं. (मी मूळ कादंबरी वाचलेली नाही.)

प्रतिसाद सुद्धा नवीन धाग्यांशी लग्न करु लागले.. ! माझा प्रतिसाद चित्रपटाच्या धाग्यावर होता... इथे प्रतिसाद लिहायला आलो, तर तो प्रतिसाद आधीच हजर आहे. Happy आता याचा सिक्वल येऊ दे... अजुन हिंदु, जैन, बौध्ह, पारशी असे ढीगभर धर्म शिल्लक आहेत.. Happy

कशाला माफ करताय.. ? सिक्वल येईल मग.. त्यापेक्षा... Proud ( नंतर येशु येशु करत गोल फिरलं की झालं, खून माफ )

सहाव्या नवर्‍याचा खून होईपर्यंत प्रियांका म्हातारी झाली आहे. चेहर्‍यावर सुरकुत्या आहेत, चेहरा रापला आहे. शरीरही सुटलं आहे. >>>> ही नवीन सुसाना आहे. आधीची दु:खं चेहर्‍यावर न बाळगणारी. >>>> पण स्वतःची बर्‍यापैकी काळजी घेणारी प्रौढा जशी दिसेल तशी आता ती दिसते. >>>>>>>
अरे.. स्वतःची काळजी घेणारी प्रौढा जरी असली तरी तिची त्त्वचा नितळ तरूण रहाणार नाही.. तिचे केस जसे पांढरे दाखवलेत वयापरत्त्वे झालेले, तसेच तिच्या चेहेर्‍यावर वयाच्या खुणा दाखवणं गरजेचं होतं..

आणि तू लिहिलेलं तुला विक्रम गायकवाडांशी बोलल्यावर कळलं असेल तरी ती रंगभुषा थोड्याफार प्रमाणात फसलीच असं नाही का म्हणावं लागणार ? कारण सगळे प्रेक्षक काही गायकवाडांशी बोलायला आणि हे समजून घ्यायला जाणार नाहीत...
विक्रम गायकवाडांच्या कामाबद्दल दुमत नाहीच पण म्हणून त्यांच्याकडून काही त्रुटी राहून शकत नाहीत असंही नाही...
असो.. !

कालच चित्रपट पाहीला. आपल्याला तर आवडला ब्वा. विशालचे सगळेच सिनेमे ग्रेट आहेत. तो माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. नेमके संवाद, दिग्दर्शनाची हाथोटी... विशालला सलाम..!!

आवडला. दिग्दर्शनातले बारकावे अप्रतिम!
चित्रपट dark, gory at times आहे. हे सर्व प्रेक्षकांना आवडेलच असं नाही, अशी थीमच मुळात नवी आहे. आपल्याकडे वाईट हीरो चालेल एकवेळ. पण खून करणारी हीरॉईन? Happy

शेवट अतिशय आवडला. अनपेक्षित आहे, तरीही वेल-डन असा!

सर्व नवरे मस्त! पण नील नितीन मुकेश भारी भारी!! Happy अन्नु कपूरही ग्रेट!

नसरुद्देन शहा : जिसने कम मे जीना सीख लिया उसी ने जीना समझ लिया | और, ज्यादा कभी ज्यादा थोडे ही होता है, वो तो हमेशा कम ही होता है ...

( आनि एवढं तत्वज्ञान माहीत असुन सात नवरे आणि सात मुडदे पाडले विशाल भरद्वाजने .. Proud माया मेमसाबने कसं ३ की ४ वरच आटोपतं घेतलं होतं Happy )

काल बघीतला हा सिनेमा. सिनेमाची स्टोरीलाइन आणि एक्झिक्युशन एकदम मस्त. पहिल्या तासानंतर थोडा संथ झाल्यासारखा वाटला, थोडा अजून faster pace चालला असता.

शनिवारी 'सात खून माफ' पाहिला. अजिबात आवडला नाही. टायटल्सनंतरच्या पहिल्याच प्रसंगात निवेदकाच्या चेहर्‍यावरचा (बळजबरीने वयस्क दाखवण्यासाठी केलेला) मेकअप इतका भडक्क दिसतो की नंतरचा सगळाच सिनेमा नाटक-नाटक खेळल्यासारखा खोट्टा खोट्टा वाटतो. नवरे झालेल्या नटांची कामं चांगली आहेत, पण प्रियांका चोप्रा ना चांगली दिसली आहे, ना बिलिवेबल वाटते. तिचंच कॅरेक्टर नीट उभं राहत नाही असं खेदाने म्हणावंसं वाटतं. ती पुन्हा पुन्हा हे असले प्रकार करायला टेम्प्ट का होते हे कुठे भिडत नाही. (वडील गेले म्हणून प्रत्येक पुरुषात फादर फिगर शोधते, नंतर चटक लागते इ. उल्लेख निवेदनात येतात, पण सिनेमा हे दृश्य माध्यम आहे.) शिवाय एकामागोमाग असे अनुभव आल्यावर आणि असे गुन्हे केल्यावर तिच्यात काहीतरी खळबळ उडत असेल की नाही? ती कुठे दिसतच नाही! अर्थात, हा तिच्यापेक्षा दिग्दर्शनाचा प्रॉब्लेम वाटतो मला.
पहिले एक दोन खून होईपर्यंत त्यातलं 'थ्रिल' टिकतं. नंतर त्या पॅटर्नचा (शी लाइक्स हिम.. शी लाइक्स हिम नॉट!) कंटाळा येतो आणि प्रयोजनही कळत नाही.
उषा उत्थुपला वाया घालवलं आहे.
साहिबचं वाढलेलं वय प्रियांका चोप्राच्या आवाज/देहबोलीत कुठेही दिसत नाही. मेकअपही सतत 'दिसत' राहतो! फावड्याने खरवडून काढावासा वाटतो.
बाकी ते साप पाळणे वगैरे प्रकार अ.अ. आहेत. पटकथेत एक खून करण्याची सोय - यापलिकडे त्याला काही प्रयोजन नाही! घर जळल्यावर भिकेला लागलेली साहिब पुन्हा कशाच्या जोरावर 'खाऊन पिऊन सुखी' होते काही कळत नाही.
एकूणात लेट डाऊन.

सर्वात 'बिलिवेबल' पाच मिनिटांच्या रोलमधली कोंकणा सेन वाटते! Happy

स्वातीला प्रचंड अनुमोदन. अजिबात आवडला नाहि.
प्रियांका सायको वाटते.ईरफान आणि नसरुद्दिन सोडता बाकिच्यांचे खून पटत नाहित.
आणि ते साप पाळणे ,त्यांना दुध पाजणे तर अ.आणि अ.

मला एक खुन माफ केला तर विशाल भारद्वाजचा करेन ... ७ खुन म्हणजे विशालला भन्साळी चावल्यामुळे आलेला ताप वाटला. सगळ्यात आवडलेला शॉट जेंव्ह स्क्रीन वर "फोर मोअर टु गो" अशी पाटि येते तो.

मला स्वतःला विशाल भारद्वाज अतिशयच आवडतो....त्याचे सिनेमे हे खास 'त्याचे' असतात .. कदाचित म्हणूनच 'सात खून माफ' इतका 'सरळ सरळ सोपा' केलेला पाहून व्यक्तीशः वाईट वाटलं.
मॅकबेथ, ऑथेल्लो सारख्या जगानी कोळून प्यायलेल्या विषयावर अतिशय उत्तम 'स्क्रीनप्ले' लिहिणारा विशाल भारद्वाज ! 'सात खून माफ' मधे माझ्यामते अतिशय उत्तम कलाकार असताना, एक चांगली कथा असताना (मी मूळ कादंबरी अजून वाचली नाहीये, पण आता वाचेन !) शिवाय चित्रपटाचं दिग्दर्शनही उत्तम असताना, माझ्या मते या चित्रपटाचा 'स्क्रीनप्ले' कमी पडतो.
उत्तम पटकथा लेखन ही विशाल भारद्वाजची खासियत आहे.. त्याच्या पटकथा आणि त्यावरचे लेख, त्याचं भाष्य हे अभ्यास करण्यासाठी उदाहरण म्हणून देतात... शिवाय नुकताच मकबूल आणि ओंकारा परत एकदा अभ्यासल्याने असेल... पण इतका सरधोपट स्क्रीनप्ले, आधी खून होताना दाखवणे आणि शेवटी summary/take home slide असल्यासारखे दीड मिनीटात सगळ्या खुनांचा recap घेणे (जे पाहण्या-याला कोणी आणि कसे केले आहेत ते आधीच माहितीये!) हे विशाल भारद्वाज कडून अपेक्षित नव्हते.
सगळ्यांची कामे उत्तम.. तरूण प्रियांकापेक्षा म्हातारी प्रियांकाचं काम आवडलं...
नील नितिन मुकेश त्याच्या रोल मधे परफेक्ट.. नासिर, इरफान खान अप्रतिम...
मला तर अन्नू कपूरचं काम अतिशय आवडलं... तो आल्यावर 'कहानी कुछ नया अंदाज लेके आयेगी' अशी खूप अपेक्षा होती... त्याचं सगळं पात्रच सिनेमाचा टोन बदलवू शकलं असतं असं वाटत असताना त्याची कथा पण त्याच 'आधीच्या' मार्गाने जाते !!!
कॅमेरा, दिग्दर्शन, अभिनय सगळं मस्त.. पण पटकथा कमी पडली माझ्यामते या सिनेमात !!!
(तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील, तर त्या सातत्यानं पूर्ण करणं खूप अवघड आहे - थिएटरमधून बाहेर पडताना हा विचार माझ्या मनात चालला होता !)
तरीही.....मला सिनेमा आवडला... कारण सिनेमा आहे, तो आवडायला हा हवाच, मला सिनेमा न आवडण्याचा चॉइसच नाहीये !!!!!!!!!! Happy

मला तर मटामधले परीक्षण वाचुनच पैसे घालवायची इच्छा नाहीये. एक दोन नवरे मारुन सुद्धा ही बाई परत लग्न का करत असेल हेच मला एक कोडे आहे. माणुस इतकाही सकारत्मक असु शकतो?

Pages