प्रेयस

Submitted by जया एम on 13 January, 2011 - 02:14

गे कांचनमृग मायावी
झोकात मिरवुनी गेले
सीतेचे गहिरे कुंडल
रानात हरवुनी गेले

गे पांचालीचे कुंतल
दरवळले शकुनफुलांनी
राधेय तिच्या हृदयात
धगधगला रक्तखुणांनी

गे उभी कोण काठाला
मोहाच्या ऐन प्रवाही
वनवासी कंथ तियेचा
उर्मिला वाटुली पाही

गे वादळ यमुनातीरी
गोकुळात पाऊस खेळे
राधेच्या चिंब मनात
कृष्णाचे आतुर डोळे

गुलमोहर: 

क्या बात है! सुरेख कविता!
राधेच्या चिंब मनात
कृष्णाचे आतुर डोळे
हे म्हणजे तर कळसच!

आह! सुरेख!

गे पांचालीचे कुंतल
दरवळले शकुनफुलांनी '

गे उभी कोण काठाला
मोहाच्या ऐन प्रवाही'

खूप आवडली!

ही पण छान ! एका दिवसात मी एवढ्या कविता कधी वाचल्या नव्हत्या, ही तुमच्या कवितेची जादु आहे.

Pages