भक्ती

Submitted by अश्विनी के on 6 June, 2008 - 01:40

viththal rakhumai.jpg

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर |
चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर ||

भक्ती, भक्तीचे नऊ प्रकार (नवविधा भक्ती), गुरु शिष्य परंपरेतून / कथांमधून जाणवणार्‍या भक्तीचे विविध पैलू, संतांच्या कथांमधून होणारे परमात्म्याचे गुणसंकिर्तन आणि अनुषंगाने होणारी भक्तीविषयीची चर्चा.

saint tukaram.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवळात गेलं की प्रचंड रडायला येतं अगदी कंट्रोल न करण्याइतपत, त्यामुळे फारच कमी वेळेस देवळात वगैरे जाते.
माझं नक्कीच काहीतरी चुकत असणार, त्याचाच शोध चालू आहे. >>>> कॉलेजात असताना श्री स्वामी समर्थांच्या मठात नामसप्ताहाच्या वेळी गेल्यावर नेहमीच हा अनुभव येत असे. घळाघळा अश्रू वहात. हे काय होतंय आणि ते आपल्याला का थांबवता येत नाहिये ये न कळल्याने, आजुबाजुचे लोक्स आपण रडतोय हे पाहतील असे वाटून मीही तिथून निघून येत असे. परत गेलं की परत तेच...

आता कळतंय की असं होणं म्हणजे अष्टभाव जागृत होणं. अर्पणा, यात चुकत काहीच नाहिये. तिथे जाणं टाळू नकोस. कधी कधी गजर, आरती करत असताना असं होतं.

अष्टभाव म्हणजे काय? तर या अखिल ब्रह्मांडांत परमेश्वरी संगीत ठायी ठायी आहे. जो कुणी या संगीत सौंदर्याचा शोध घेतो त्याला ते सौंदर्य आपल्या पिंडातही अनुभवायला येते. ते संगीत, त्याची व्यक्तता म्हणजे अष्टभाव होय.

भरताने नाट्यशास्त्रात सांगितलेले अष्टभाव-
१) स्तंभन २) स्वेद ३) रोमांच ४) स्वरभेद ५) वैपथू ६) वैवर्ण्य ७) अश्रू ८) प्रलय

याबद्दल जास्त काही नीट वाचून लिहावं लागेल Happy स्वेद, रोमांच, स्वरभेद, अश्रू अनुभवलंय.

@महेश : मला कोणीच कधीच देवळात जा / चल असंच काय पण साधा नमस्कार कर असंही सांगितलं नाहीये. त्यामुळे इच्छेविरूद्ध देवळात गेलेय असं नाहीये...पण स्वतःच कधी गेले ( दर्शन म्हणून, पिकनिक, ट्रिप म्हणून अगदी कसंही ) तरी हाच अनुभव येतो, नेहमी. गणपतीची मिरवणूक इ. वेळेस पण डिट्टो.

@अश्विनी के : तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण मला दु:ख होत असतं तेंव्हा..नुसतं गळा दाटून येणं, भरून येणं असं नाही होतं. आणि हो, हे आरती वगैरे चालू असतानाही ( टिव्हीवरची सुद्धा ) होतं पण इतक्या तीव्रतेने नाही.

आमच्या इथे "विश्वशान्ती" करता महायाग सुरू आहे, सलग पाच दिवस (चार रात्री) महामृत्युंजय मन्त्राने आहुती आहेत. माझ्याकडे रात्री १२ ते २ या वेळेत आहुतीन्चे काम आहे. सबब गेल्या दोन रात्री तिकडे गेलोय, अजुन दोन रात्री शिल्लक आहेत.
मी आणि लिम्बी मिळून जातोय, दोघात मिळून एकुण जपसन्ख्या दोन तासात २००० चे आसपास होत्ये. (तासाला साधारणतः पाच माळा) सध्यातरी दोन श्वासात एक मन्त्र ही सलग गती ठेवली आहे. इथे संख्येचे बंधन नाही, पण मोजदाद करायची जन्मजात सवय कशीकाय जाणार? असो.
हे उल्लेखायचे कारण की, नुकत्याच झालेल्या चंद्रग्रहणाचे वेळेस मी अन्गिकारलेल्या बाकी सर्व मंत्रान्चे पुनःश्चरण (हा शब्द बरोबर आहे का? की पुरःश्चरण असा हवाय?) केले पण महामृत्युंजय मन्त्र केला नव्हता. त्याची रुखरुख राहीली होती. अचानक समोर आलेल्या संधीमुळे ती इच्छाही पूर्ण होत आहे.
प्रत्यक्ष आहुती देत जप होत असताना, मनातील विचारांचे आवेग नियंत्रीत करण्याचा अभ्यास होत आहेच, शिवाय, एक अनुभव पहिल्याच दिवशी दीडेक तासानन्तर येऊ लागला, तो म्हणजे, कंठातून होणारे उच्चार, असे काही मधेच जाणवायचे की तिथुन होत नसून छातीचे मध्यभाग व नन्तर पोटातून (बेंबीच्या मागून) होत आहेत. ही अवस्था क्षणिकच असायची, व कोणत्यातरी विचारामुळे भन्ग व्हायची. छातीवर हात ठेवला असता, तिथे मन्त्राचे उच्चारागणिक त्यानुसार कंपने हाताला जाणवायची (जी एरवी बोलताना वगैरे जाणवतातच असे नाही). याबाबत अधिक माहिती हवी आहे.

रात्रीचे आत्यन्तिक शान्त वातावरण, माणसान्ची वर्दळ थाम्बलेली, जे एखाददोघेजण उपस्थित ते देखिल झोपी गेलेले, अशा वेळेस आपण एकट्यानेच बसून आहुती देत रहाणे हा अनुभव विरळाच! नशिबाने मिळतोय.

महेश, अश्विनी ...अनुमोदन!
मंदिरात किंवा घरीसुद्धा मला 'गजानन विजय' "श्रीपाद श्रीवल्लभचरीत्र" वाचतांना हा अनुभव येत असतो.

अश्विनी...छान पोस्ट!

<<रात्रीचे आत्यन्तिक शान्त वातावरण, माणसान्ची वर्दळ थाम्बलेली, जे एखाददोघेजण उपस्थित ते देखिल झोपी गेलेले, अशा वेळेस आपण एकट्यानेच बसून आहुती देत रहाणे हा अनुभव विरळाच! नशिबाने मिळतोय.<<
लिंबुभौ...भाग्यवान आहात तुम्ही.

सलग पाच दिवस (चार रात्री) महामृत्युंजय मन्त्राने आहुती आहेत. माझ्याकडे रात्री १२ ते २ या वेळेत आहुतीन्चे काम आहे. सबब गेल्या दोन रात्री तिकडे गेलोय, अजुन दोन रात्री शिल्लक आहेत.
>>> लिंबुभाऊ, मी कुठेतरी असं वाचलंय की संध्याकाळनंतर महामृत्युंजय मन्त्राचा जप करु नये. हे जर खरे असेल तर मग तुमच्या वरच्या पोस्टवरुन तर तुम्ही आणि इतरांनी रात्री जप केलेला आहे असे दिसते, ते कसे काय ?

कृपया मला याबाबत व आणखीही काही गोष्टींबाबत इथल्या सन्मामनीय जाणकारांकडुन माहिती मिळु शकेल का ?

१. महामृत्युंजय मन्त्राचा जप करताना शंकराची प्रतिमा किंवा पिंडी जवळ असणे आवश्यक आहे का ?
२. माझ्याकडे महामृत्युंजय मन्त्राचे यंत्र आहे. देव्हार्‍यामध्ये इतर देवांबरोबर ते नेहमीसाठी ठेवायचे की महामृत्युंजय मन्त्राचा जप करतानाच फक्त ठेवायचे ?
३. शंकराची पिंडी देव्हार्‍यात ठेवली तर चालते का ? असल्यास ती आपल्याकडे तोंड करुन की आडवी ठेवायची ? महामृत्युंजय मन्त्राच्या यंत्राबरोबर ठेवली तर चालेल का ? की दोनांपैकी एकच ठेवायचे?
४. 'ओम नम: शिवाय' हा मंत्र दिवसाच्या कोणत्याही प्रहरी म्ह्टला तर चालतो का की महामृत्युंजय मन्त्रासारखा याचाही संध्याकाळनंतर जप करु नये असे काही आहे का ?
५. महामृत्युंजय मन्त्राचा जप करताना रुद्राक्ष माळेचाच वापर करणे असेही कुठेतरी वाचले होते. काऊंटींग मशिन किंवा तुळशीमाळेचा वापर चालत नाही का ?
६. मी नेहमी संध्याकाळी श्री गणेशध्यानम, संकटमोचन महागणपती स्तोत्र, श्री महालक्ष्मीध्यानम, श्री महालक्ष्म्यष्टक, श्री दुर्गासप्तशतीसार, रामरक्षास्तोत्र, मारुतीस्तोत्र, दत्तात्रेयस्तोत्र, सर्वरोगशमनार्थ स्तोत्र म्हणते. मी हे सारे खड्या आवाजात म्हणते. मी श्वसनविकाराने आजारी असल्याने मला हे लागोपाठ म्हणत असताना खोकला सुरु होतो. त्यामुळे थांबत थांबत मला ह्या सार्‍या प्रार्थना म्हणाव्या लागतात. मी म्हणत असलेल्या प्रार्थनांपैकी फक्त स्तोत्रे खड्या आवाजात म्हणुन बाकीच्या प्रार्थना मनातल्या मनात म्हटल्या तर चालेल का ?

मी म्हणत असलेल्या प्रार्थनांपैकी फक्त स्तोत्रे खड्या आवाजात म्हणुन बाकीच्या प्रार्थना मनातल्या मनात म्हटल्या तर चालेल का ?
>>> तुमच्या बाकीच्या प्रश्नांबद्दल माहित नाही. पण त्रास होत असताना खड्या आवाजात म्हणू नका. तुम्हाला जसे कंफर्टेबल असेल तसेच म्हणा. एखादं स्तोत्र एखाद्या दिवशी नाही म्हणायला जमलं तरी देव रागावणार नाही कारण तुमच्या स्वतःपेक्षा त्याला तुमची जास्त काळजी वाटत असेल.

शंकराची पिंडी दक्षिणोत्तर ठेवतात... >>> जागोमोहनप्यारे, धन्यवाद !

त्रास होत असताना खड्या आवाजात म्हणू नका. तुम्हाला जसे कंफर्टेबल असेल तसेच म्हणा. एखादं स्तोत्र एखाद्या दिवशी नाही म्हणायला जमलं तरी देव रागावणार नाही कारण तुमच्या स्वतःपेक्षा त्याला तुमची जास्त काळजी वाटत असेल. >>> धन्यवाद अश्विनीताई ! तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय. मलाही हे कळतंय पण वळत नाहीय. तुमच्यासारख्यांकडुन व इतरही जाणकरांकडुन अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले की नि:शंक मनाने मी मला जमेल तशी दैनंदिन पुजाअर्चा करु शकेन ना, म्हणुन ही पोस्ट टाकली.

कृपया माझ्या बाकीच्या प्रश्नांबद्दल मला कुणी माहिती देऊ शकेल का ?

अहो आतून जे आलं तेच लिहिलंय. अधिकृत वगैरे असं काही नसतं. आता पुजा किंवा पठण शुचिर्भूत होऊन करावे हे अगदी खरं किंवा अधिकृत/सर्वमान्य. पण नुसत्या शरिराची शुचिर्भूतता असण्यापेक्षा आपण मनानेही तसंच बनावं असा आपण प्रयास करतोच कीनै (नाही निर्मळ मन, काय करील साबण.. वगैरे वगैरे)? समजा एखादा दिवस आपल्याला बरं नाही आणि आपण अंघोळही केली नाही, तर काय आपण भगवंतापासून दूर रहायचं? त्याची आपल्या मनात रेंगाळणारी आठवण दूर सारायची? नाहीच ! आपण पारोश्यानेही पठण करायचंच. अगदी झोपूनही करायचं. आणि मनातच भगवंताबद्दल प्रेम नसेल तर कुठल्याच कवायतींना अर्थ नाही. त्यामुळे... बिन्धास्त Happy

दवबिन्दू, तुमचे प्रश्न नेमके आहेत.

>>>>> १. महामृत्युंजय मन्त्राचा जप करताना शंकराची प्रतिमा किंवा पिंडी जवळ असणे आवश्यक आहे का ?
= नाही. मी केलेला आहुतीसहीतचा जप देवीच्या मन्दिरात होता. मात्र, देवघरात आधी शन्कराच्या प्रतिमा/पिन्डिची पूजा करुन मग जप केल्यास केव्हाही चान्गले. उगिच मनात आले अन जप सुरु केला-थाम्बवला असे होऊ नये. त्यास एक शिस्त असावी. शिवाय, जपकरताना, एकाग्रता साधण्यासाठी देखिल पिंडी/प्रतिमा वा प्रत्यक्ष लिहीलेला मन्त्र, यान्चा उपयोग होतो. मी तसा तो केला.

>>>>> २. माझ्याकडे महामृत्युंजय मन्त्राचे यंत्र आहे. देव्हार्‍यामध्ये इतर देवांबरोबर ते नेहमीसाठी ठेवायचे की महामृत्युंजय मन्त्राचा जप करतानाच फक्त ठेवायचे ?
= हे यन्त्र योग्य तितक्या मन्त्रजपसन्ख्येने सिद्ध केलेले असेल, व "जातकाचे" परिस्थितीनुसार, एकतर त्याने/तिने जवळ बाळगावे अथवा कुटुम्बावरील एक्रत्रित शुभ परिणामाचे दृष्टीने "घरात देवघरात नेहेमीसाठी ठेवावे" अशा प्रकारचा सल्ला दिला जातो.
आपण स्वतःचे स्वतःच जर हे यन्त्र आणले/मिळवले असेल, तर ते देवघरात ठेवावे अन्यथा, ज्यान्चे सल्ल्याने आपण यन्त्र घेतले आहे, त्यान्नाच नेमकी कृति विचारुन घेणे.
तसेही, या यन्त्राचे दु:ष्परिणाम नाहीत. मात्र हेळसाण्ड होऊ नये.

>>>>> ३. शंकराची पिंडी देव्हार्‍यात ठेवली तर चालते का ? असल्यास ती आपल्याकडे तोंड करुन की आडवी ठेवायची ? महामृत्युंजय मन्त्राच्या यंत्राबरोबर ठेवली तर चालेल का ? की दोनांपैकी एकच ठेवायचे?
= हिंदू धर्मात प्रत्येकाकडेच "पंचायतन" पूजणे अपेक्षित असते. पंचायतनात गणेश, विष्णू, देवी, सूर्य यान्चे बरोबरच शिवाचाही सहभाग आहेच. सबब पिंडी असायलाच हवी.
पिंडीची "पाणि वाहून जाणारी" लाम्बोडकी बाजू उत्तरेकडे करुन पिंडी ठेवावि.
यन्त्र हा पूर्णतः स्वतन्त्र विषय आहे. व देवघरात ते देखिल स्वतन्त्र मान्डलेले असल्यास अडचण नाही. फक्त पन्चायतनाच्या माण्डणिच्या अधेमधे अन्य काही ठेऊ नये.

>>>> ४. 'ओम नम: शिवाय' हा मंत्र दिवसाच्या कोणत्याही प्रहरी म्ह्टला तर चालतो का की महामृत्युंजय मन्त्रासारखा याचाही संध्याकाळनंतर जप करु नये असे काही आहे का ?
= मन्त्रसाधनेमधे, मन्त्राचा जप हा अजपाजप अवस्थेपर्यन्त पोचला पाहिजे (अजपाजप चा मूळ अर्थ श्वासाच्या आत घेणे व सोडणे या क्रियातील कोहं-सोहं शी आहे पण बोलीभाषेत हा शब्द सातत्यपूर्ण जप या अर्थानेदेखिल वापरला जातो), म्हणजेच श्वासागणिक, श्वास जितक्या सतत, सहजतेने घेतलासोडला जातो तितक्याच सातत्याने जप होत राहील इथवर प्रगती साधणे अपेक्षित असते. अर्थातच, श्वास घेण्याच्या क्रियेला दिवस-रात्र असा फरक नाही, तसेच जपालाही नाही.
मात्र, गृहस्थाश्रमी सामान्य व्यक्तिने, काही शक्तिन्चे जप विशिष्ट काळात करु नयेत असे बंधन घातले जाते.
वरील दोन्ही मंत्रान्ना खरे तर असे काही बन्धन नाही, तरी शंकर हे दैवत स्मशानवासी असल्याने, व आवाहित केल्यावर त्याचे "गणां"सहित अर्थात भूतप्रेतपिशाच सहित येते अशी श्रद्धा असल्याने, हळव्या/नाजुक मनाच्या व्यक्तिने, शिवाचे आवाहन, पूजन दिवसाउजेडीच करावे असा प्रघात बरेचजण पाळतात. हे बन्धन व्यक्तिसापेक्ष असते.
माझे बाबतीत, व मला ज्ञात होते/आहे त्याप्रमाणे, महामृत्युंजयाचा जप रात्री करणे अतिउत्कृष्ट मानले जातेच, त्यातुन मध्यरात्रीनन्तर जास्तच! व मी अन लिम्बी सलग पाच रात्री, रात्री १२ ते २, "दोन श्वासात" एक पूर्ण उच्चारण," या गतीने विना अडथळा, जपासहित हवन केले.
तरीही, माझा सल्ला असाच राहील की, ज्यान्नी तुम्हाला हा जप सुचविला आहे, त्यान्नाच तुमच्या परिस्थितीनुसार मार्गदर्शन विचारावे.

५. महामृत्युंजय मन्त्राचा जप करताना रुद्राक्ष माळेचाच वापर करणे असेही कुठेतरी वाचले होते. काऊंटींग मशिन किंवा तुळशीमाळेचा वापर चालत नाही का ?
= बरोबर. साधारणतः तुळशीची माळ (वारकरी संप्रदायाच्या प्रभावामुळे) घरोघर असतेच, पण तुळशीला शिवाच्या पुजेचे पाणी देखिल वर्ज्य आहे, अर्थात तुळशीच्या माळेवर शिवाचा कोणताच जप करु नये. त्याचबरोबर, पोवळे (मन्गळ) वा स्फटिक (चन्द्र) यांच्या माळादेखिल मन्त्रअर्थाचे विरुद्धार्थी-असामानार्थी कारकत्व असणार्‍या त्यान्चे कारक ग्रहान्चेमुळे या जपाला वर्ज्यच मानल्या जातात. रुद्राक्ष हे शिवास प्रिय असल्याने, शिवाचे वा एकन्दरीतच इतर सर्व जपान्चे बाबतीत रुद्राक्ष माळ केव्हाही उत्तमच. विशिष्ट सिद्धतेकरता मात्र, पोवळे/स्फटीक/पाचू इत्यादिन्च्या माळा विशिष्ट जपाकरता सुचविल्या जातात. तुळशीची माळ वैष्णव उपासनेतील कोणत्याही मन्त्रास चालू शकते व शक्यतो नामजपास वापरली जाते.

६. मी नेहमी संध्याकाळी श्री गणेशध्यानम, संकटमोचन महागणपती स्तोत्र, श्री महालक्ष्मीध्यानम, श्री महालक्ष्म्यष्टक, श्री दुर्गासप्तशतीसार, रामरक्षास्तोत्र, मारुतीस्तोत्र, दत्तात्रेयस्तोत्र, सर्वरोगशमनार्थ स्तोत्र म्हणते. मी हे सारे खड्या आवाजात म्हणते. मी श्वसनविकाराने आजारी असल्याने मला हे लागोपाठ म्हणत असताना खोकला सुरु होतो. त्यामुळे थांबत थांबत मला ह्या सार्‍या प्रार्थना म्हणाव्या लागतात. मी म्हणत असलेल्या प्रार्थनांपैकी फक्त स्तोत्रे खड्या आवाजात म्हणुन बाकीच्या प्रार्थना मनातल्या मनात म्हटल्या तर चालेल का ?
= होय, इतकेच नव्हे, तर जर उच्चारण अवघड असेल, तर मनातल्या मनात पण अत्यन्त एकाग्रतेने म्हणले तरी चालते. मूळात विशिष्ट मन्त्रान्चे उच्चारण मोठ्याने, काहीन्चे स्वतःला ऐकु येईल इतपत व काहीन्चे मनातल्या मनात अशी विभागणी असते. प्राथमिक एकाग्रता प्राप्त होण्याचे दृष्टीने मात्र "कायावाचामने" स्तोत्र/मन्त्र पठनावर लक्ष केन्द्रीत व्हावे म्हणून मोठ्याने/स्वतःस ऐकु येईल इतपत मोठ्याने म्हणावयासच सुचविले जाते. श्रद्धायुक्त भक्तियुक्त सरावाने नन्तर केवळ स्मरणाने देखिल एकाग्रता प्राप्त होऊन जप होऊ शकेल इतपत प्रगती होणे अपेक्षित असते. अर्थातच, जप मोठ्याने केला की मनातल्यामनात, हा भेद "भौतिक" ठरतो.
तरीही, काही विशिष्ट शक्ती जागविण्यास, व विशिष्ट वेळचे मन्त्र, हे खणखणीत आवाजातच उच्चारणे अपेक्षित असते.
आता तुम्ही म्हणत असलेल्या स्त्रोत्रान्पासुन काय प्राप्त होते त्याचा विचार बघु.
१= श्री गणेशध्यानम, संकटमोचन महागणपती स्तोत्र, = विद्याप्राप्ती /एकाग्रता /विघ्ननाश
२= श्री महालक्ष्मीध्यानम, श्री महालक्ष्म्यष्टक, = सुखसमृद्धि यान्ची प्राप्ती
३= श्री दुर्गासप्तशतीसार, रामरक्षास्तोत्र, मारुतीस्तोत्र, दत्तात्रेयस्तोत्र, सर्वरोगशमनार्थ स्तोत्र = सर्व संकट नाश.
यातिल, पहिल्या दोन्ही क्रमान्काचे पठण हे हळू, सौम्य आवाजात (स्वतःस ऐकु येण्याइतपत) वा मनातल्या मनात केले तरी चालू शकते. ही पठणे, साधकाची वैयक्तिक क्षमता वाढविण्यास उपयोगी ठरतात व स्वतःची स्वतःसच ऐकवायची असतात, त्यात गुन्गुन जायचे अस्ते.
तर तिसर्‍या क्रमान्कातील पठणे मोठ्याने खणखणीत आवाजात म्हणणे अपेक्षित आहे. ही पठणे, बाह्यात्कारी आधिभौतिक/आधिदैविक शक्तिंचे जागरण अथवा उच्चाटन करण्यास वापरताना, ध्वनीलहरी हे माध्यम देखिल वापरले जाणे अपेक्षित असते. सबब, तुम्हाला जितक्या सहजतेने उच्चारता येतिल, तितपत मोठ्याने म्हणावित. अगदिच अशक्य झाल्यास, पुन्हा तेच; मनातल्या मनात, पण पूर्ण एकाग्रतेने म्हणावित.
अवांतरः
मला गेली चाळीस वर्षे दम्याचा त्रास आहे. वरील हवनयुक्त जप करतानाही दम्याच्या त्रासाचा (धूर व श्वासगती राखण्यास ताकद लागणे) अडथळा होताच, त्यात मी नॉनस्टॉप सलग दोन तास, दर दोन श्वासात एक जप, याप्रमाणे करीत असल्याने खरे तर हे कसे शक्य होईल अशी शन्का होती. पण एकदा सन्कल्प (व निश्चय) करुन बसल्यावर एका तासात एक्/दोनदा आवन्ढा गिळण्यापुरता अन सव्वा तासाचे सुमारास व नन्तर, घसा ओला करण्यापुरता पाण्याचा घोट घेताना जितका खन्ड पडत होता (प्रत्यक्षात त्यादरम्यान लिम्बी तोच मन्त्र माझे बरोबरच तितका वेळ उच्चारित असल्याने माझे खण्डाचे वेळेस ती तो स्वर उचलुन धरायची व मी श्रवण करायचो - म्हणुन विनादोष) तितकाच व्यत्यय आला. अर्थात, मी एक अभ्यासाची सन्धी म्हणूनच या प्रकाराकडे पहात असल्याने, अत्यन्त निष्ठेने सश्रध्द बनुन ते करीत होतो. अनुभव असा की एरवी मी पन्धरावीस मिनिटापलिकडे मान्डी घालुन सलग बसू न शकणारा, या वेळी सलग दोन तास न उठता बसलो होतोच पण थन्डीमधेही मान्डी/गुढगे/पोटर्‍यात दुखणे हा प्रकारही फारसा जाणवला नाही. तात्पर्य इतकेच, की पूर्ण श्रद्धेने केलेल्या कृतीचे वेळेस देव देखिल पाठिशी उभा रहातो, अन भक्ताचे हातुन तपश्चर्या - साधना घडवुन घेतो.

माझा सल्ला असाच राहील की, ज्यान्नी तुम्हाला हा जप सुचविला आहे, त्यान्नाच तुमच्या परिस्थितीनुसार मार्गदर्शन विचारावे. >>> लिम्बुभौ, मी म्हणत असलेली स्तोत्रे व प्रार्थना आध्यात्म क्षेत्रातल्या कोणा अधिकारी व्यक्तीने नव्हे तर अशाच ओळखी पाळखीच्या, वेगवेगळ्या व्यक्तींनी सुचविल्यानुसार तसेच जालीय भ्रमंती दरम्यान आढळुन आलेल्या माहितीनुसार, सुचनांनुसार म्हणत होते. पण त्यासंदर्भातील मुलभूत शंकांचे निरसन मायबोलीवरील आपणांसारख्या अभ्यासु, अनुभवी जाणकारांमार्फत होईल याची मला खात्री होती.

लिम्बुभौ, माझ्यासारख्या अज्ञानी व्यक्तिच्या मनातल्या प्रत्येक शंकेचे तुम्ही इतके सुंदर निरसन केले आहे की मी तुमचे किती आणि कसे आभार मानु, हेच कळेनासे झाले आहे. शतशः धन्यवाद !

एरवी मी पन्धरावीस मिनिटापलिकडे मान्डी घालुन सलग बसू न शकणारा, या वेळी सलग दोन तास न उठता बसलो होतोच पण थन्डीमधेही मान्डी/गुढगे/पोटर्‍यात दुखणे हा प्रकारही फारसा जाणवला नाही. तात्पर्य इतकेच, की पूर्ण श्रद्धेने केलेल्या कृतीचे वेळेस देव देखिल पाठिशी उभा रहातो, अन भक्ताचे हातुन तपश्चर्या - साधना घडवुन घेतो. >>> हे वाचुन अक्षरशः कंठ दाटुन आला. जय शिव शंभो !

Pages