भक्ती

Submitted by अश्विनी के on 6 June, 2008 - 01:40

viththal rakhumai.jpg

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर |
चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर ||

भक्ती, भक्तीचे नऊ प्रकार (नवविधा भक्ती), गुरु शिष्य परंपरेतून / कथांमधून जाणवणार्‍या भक्तीचे विविध पैलू, संतांच्या कथांमधून होणारे परमात्म्याचे गुणसंकिर्तन आणि अनुषंगाने होणारी भक्तीविषयीची चर्चा.

saint tukaram.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माया म्हणजे ... परमेश्वराचा ( त्याच्या शक्तीचा ) अभाव.
नाही माया हीच देवाची एक शक्ती आहे.पण ती inferior आहे.एक कॉपी -पेस्ट टाकतो
Q: What is maya?
A: The derivative meaning of maya is what is measurable. Bhagavan is the Lord of maya; He cannot be measured. Where there is an attempt to measure God, there is maya and not God. 'Ma' means 'not' and 'ya' means 'what', i.e., 'what is not God' is maya. The maya as said in the Srimad-Bhagavatam is not like the Satan in the Christian theology, a separate entity from God, altogether another entity. According to the Bhagavata school, maya is in Bhagavan in the condemned state (S.B. 1.7.4-5) in order to award condign punishment on the atomic sentience (i.e. jivas) controllable by maya. In the Gita (7.4-5) God has said: "Earth, water, fire, air, sky, the mind, intelligence and egotism-these constitute My separate inferior potency, whereas other than this is My superior potency constituting the jivas by which is supported the universe." This inferior potency is the maya-potency.

इथे फारच उच्च दर्जाची चर्चा चालू आहे.
पण मला पण काही लिहावेसे वाटते. मी अनेक वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्यात लेखकाने म्हंटले होते की वैचारिक पातळ्या अनेक असतात. म्हणजे कदाचित् अत्त्युच्च पातळीवर ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या, २४ तास नुसती देवाची भक्ति करा, कशाबद्दलहि आसक्ति बाळगू नका हे ठीक आहे.
त्याच्या खालच्या पातळीवर, आपण या जगात रहातो, तिथे कर्म आपल्या नशिबी आहे. ते करणे आपले कर्तव्य आहे. पैसा मिळवणे, 'सुखात' रहाणे हे कर्तव्य आहे. सुख म्हणजे काय हा वेगळाच प्रश्न आहे. पण ज्याला आपण व्यावहारिक सुख म्हणू त्याचा विचार केला पाहिजे.
बरेच जण अजून त्या खालच्या पातळीवर आहेत. गीतेत सांगितले आहे की कर्तव्य करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका, ते देवाला अर्पण करा. ते कसे? जे जे सेल्समन आहेत, त्यांना त्यांच्या कं. चा माल खपवायचा तर खोटे बोलणे, लाचलुचपत इ. वाईट गोष्टी कराव्या लागतात (जगात कुठेहि रहात असले तरी). तसे केले नाही तर त्यांची नोकरी जाईल, पैसे मिळणार नाही! मग ते करा! पण कं साठी! त्यातून नाही जमले, किंवा इतरहि काहीच नाही जमले, (जसे माझे झाले, कारण अक्कल नाही मला!) तर मग प्रोग्रॅमिंग शिका नि ते करा! त्याला तर काही अक्कल लागत नाही! (२५ वर्षे केल्यावर सांगतो). पैसे थोडे कमी मिळतील, पण त्यात समाधान माना.

मुळात एकदा या जगात रहायचे ठरले की अभ्यास नि कष्ट यांना पर्याय नाही. त्या दोन्हींच्या सहाय्याने तुम्ही पुष्कळ काही काही कमावू शकता. ते तसे कमावले पाहिजेच. उगीच, मी फक्त भक्ति करीन, नि दु:खे सहन करीन असे म्हंटले म्हणजे तुम्ही थोर होत नाही. नि तुम्हाला सुखहि मिळत नाही!
आता माझी ऐहिक व्यावहारिक कर्तव्ये संपली. काय वाटेल ते करून पैसे मिळवावे अशी आवश्यकता नाही. केवळ जिवंत आहे म्हणून दैनंदिन व्यवहार करावे लागतात. पण आता त्यात आसक्ति नाही. जमले तर ठीक आहे, नाहीतर नाही!
आता मी म्हणतो, की ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या! भक्ति हे एकच कर्तव्य मला उरले आहे. पण दहा वर्षांपूर्वी मला तसे करता आले नसते!

|| हरि ओम ||
रामाचा अभाव शक्य नाही. जितका तो तुमच्या आमच्यात आहे, तितकाच तो अभक्तांत आहे, रावणांत होता. अहो ज्याला साक्षात रामाकडून मरण आलं, ज्याच्यासाठी देवाने अवतार घेतला, त्याच्यात देवाचा अभाव होता असे कसे म्हणाल?
भुमिका

इथे अभाव म्हणजे " देव असतोच सर्वात पण अभक्तांमधे तो साक्शीभावाने राहातो असे अभिप्रेत आहे.

माया म्हणजे आदिमाया जगदंबा नाहि तर मोहमाया अपेक्शित आहे.

>>नाही हे चुकीचे आहे. मुर्ती material elements नी बनलेली आहे पण ती माया नाही.ती spiritual आहे. आपल्या भक्तासाठी भगवान स्वतः तिथे येतात.

परत .. material elements अर्थात पंचमहाभूतांनी बनलेले सर्व मायिक असते.

अवजानंति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्‌ । परं भावमजानंतो मम भूतमहेश्वरम् ॥ ९.११॥
माझ्या पारमार्थिक स्वरुपाला न जाणणारे लोक सर्व भूतांचा (भवति इति भूत:) ईश्वर असलेल्या व मनुष्यशरीराच्या आश्रयाला न राहणार्‍या मला, काही करणारा (कर्ता), भोग घेणारा (भोक्ता), व्यक्त मानून माझी अवज्ञा करतात, मला कमी लेखतात.

माऊली सुद्धा यांवर लिहितात त्यांच्या अतिशय सुरेख अशा वाणीत. त्यांनी शुद्ध मराठीमध्ये हे सगळं इतकं आधी शुद्ध स्वच्छ सांगून ठेवलंय, की कमाल वाटते! मराठीत असल्याने कळायला सोपी.. आणि या ओव्या तर काय... अगदी भिडतात जाऊन आतमध्ये! ही मराठी भाषाच अशी गोड आहे की त्यांत सांगितलेले परमार्थाचे सैद्धांतिक निरस विषयसुद्धा किती गोड होतात बघा!

जैसा नक्षत्राचिया आभासा । साठी घातु जाला तया हंसा ।
माजी रत्नबुद्धीचिया आशा । रिगोनिया ॥

जसे पाण्य़ांत पाडलेल्या तारकांच्या प्रतिबिंबाकरतां त्या हंसांचा नाश होतो, ते त्या प्रतिबिंबांनाच रत्ने आहेत हे खाण्याच्या आशेने पाण्यात शिरून खडकांवर चोच आपटून घेतात, तसे
तैसे अश्रवणा श्रोत्र । मज अचक्षूसी नेत्र ।
अगोत्रा गोत्र । अरुपा रुपा ॥ ९.१६०॥

कान नसलेल्या मला कान, डोळे नसताना डोळे, अगोत्रा गोत्र आणि रुपरहिताला रुप आहे अशी कल्पना करतात.

>>मुर्तीमध्ये देव येतो असे मी म्हटले आहे ,मुर्ती म्हणजेच देव आहे असे नाही.
मी काही बोलणार नाही, फक्त संतांकडे बोट दाखवणार, ते काय सांगतायत त्याकडे निर्देशन करणार...

मज सहजातें करिती । स्वयंभातें प्रतिष्ठीती ।
निरंतराते आव्हानिती । विसर्जिती गा ॥

मी सहज नित्यसिद्ध असतानासुद्धा माझी मूर्ति घडवतात, मी स्वयंभू असताना माझी प्रतिष्ठा करतात , मी सर्वत्र सर्वकाळ असताना मला "तो यावा, येतो" आणि "गेला, जातो" असे सरळ सांगतात!
मी आत्मा एक चराचरी । म्हणती एकाचा कैपक्ष करी ।
आणि कोपोनी एकातें मारी । हेंचि रुढविती ॥

चराचरांत फक्त मीच एक असताना मी एकाला भक्त समजतो दुसर्‍याला अभक्त समजतो, एखाद्याचा कैवार घेतो आणि दुसर्‍याला रागावून मारतो, त्याचे वाईट करतो अशा कथा सांगतात, आणि वर हेच माझे चरित्र म्हणून सांगत राहतात.

जव आकार एक पुढां देखती । तंव हा देव म्हणून भजती ।
मग तोचि बिघडलिया टाकीती । नाही म्हणूनी ॥

जेव्हा एखाद्या मूर्तीचा आकार पाहतात तेव्हां त्यात देव आहे असे मानून त्याची पूजा करतात. पण तीच मूर्ती भंग पावली तर त्यांत आता देव नाही म्हणून टाकून देतात, विसर्जन करून टाकतात. याच ओवीचा अजून एक अर्थ आहे. एखादा सुंदर आकार पुढे पाहीला, किंवा एखादा खूप भक्तीबद्दल लिहीत असला (अगदी एकदम ज्ञानेश्वरीची उदाहरणं देऊन वगैरे... माझ्यासारखा Happy ) तर त्याला "अरे वा, तुम्ही खूप भक्त दिसता, नक्कीच देवाचा तुमच्यात वास आहे" वगैरे म्हणतात, स्तुती करतात. मला पण खूप बरं वाटतं. एवढं लिहिल्याचं साफल्य झालं वाटतं, आणि अशीच फजिती करून घेऊन आपण ज्ञानेश्वरांनी इतक्या जीव तोडून सांगितलेल्या ज्ञानाकडे निव्वळ दुर्लक्ष करतो. हेच कुणी बेंगरूळ रूप समोर आलं.. किंवा समजा एखाद्या अमावस्येच्या रात्री माळावर फिरताना वगैरे काही मध्येच दिसल्यासारखं वाटलं, कि लगेच देवा तू ये, याला घालव आणि आम्ही इतके चांगले आहोत, इतके सज्जन आहोत, इतके धुतल्या तांदळासारखे शुद्ध आहोत, त्यांचे रक्षण कर असं सगळं आठवतो... मग तिथे ईश्वर: सर्वभूतानां ह्रद्देशेर्जुन तिष्ठति वगैरे काही सुचत नाही.
असो. चालू द्या.

झक्की, खूप छान मुद्दा मांडलाय तुम्ही. अस्सल परमार्थ परवडत नाही म्हणून कोणी सहसा त्याच्या नादालाच लागत नाही हे खरंय अगदी.

हे जगत् माया वगैरे कसं मान्य होणार? वर्षानुवर्ष मनावर झालेले संस्कार असे सहजी नाही सुटत! आपली स्वत:च्या वस्तू, घर, नातेवाईक, पैसालत्ता, आपले ज्ञान, आपली भक्तीसुद्धा.. यावरची "आसक्ती" इतकी असते की ते मायिक आहे हे सांगूनही पटत नाही. चालायचंच.
पण खरं म्हणजे हे नको असे परमार्थ, आमचं शास्त्र कुठेही म्हणत नाही. हे हवं, श्रीमंतीत जगण्याला आमची ना मुळीच नाही. प्रयत्न करावेत, जितकं काम करायला पाहीजे तितकं करावं, प्रगती करावी....
आर्यांचे वंशज आहोत आपण आणि ते कसे होते म्हणून सांगितलय? तर ते "विजिगिषु" होते, म्हणजे सर्व भौतिक सुखं मिळवणारे होते...मग आपणही असं असलं तरी त्यामुळे परमार्थाचं काहीच बिघडत नाही आणि बिघडणार पण नाहीये.

पण "ते मी केलं"".. किंवा "मी केलं म्हणून झालं नाहीतर झालं नसतं".. "मी नाही तर कोण करणार".. "मी नसेन तर घरात एक पान हलत नाही" .. "मी गेलो की कळेल एकेकाला"... वगैरे वगैरे
अशी जी पालुपदे आपण चिकटवून घेतो, त्यांचीच खरी अडचण आहे. बिघडणार असेल तर याने परमार्थ बिघडेल.. (आणि बर्‍यांचदा व्यावहारीक जगातलं घोडं पण इथेच अडकतं)

क्ष्,तुम्ही श्रीधर क्षीरसागर आहात का??तुम्ही अद्वैतवादी दिसता.बाकी याच्या बरोबर उलटेही इतर संतांनी लिहिलेले आहे.
आणी अवजानंति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्‌ । परं भावमजानंतो मम भूतमहेश्वरम् चा अर्थ असा होतो की मुर्ख जेंव्हा मी मनुष्यरुपात येतो तेंव्हा माझा उपहास करतात कारण त्यांना माझे परम (transcendental) स्वरुप म्हणजे महा ईश्वर स्वरुप माहीत नसते.

समचरणदृष्टी विटेवर साजिरी| तेथें माझी हरी वृत्ती राहो ||
आणिक न लगे मायिक पदार्थ | तेथें माझे आर्त नको देवा ||

सदा माझे डोळे जडो तुझे मुर्ता | रखुमाईच्या पती सोयरीया ||
गोड तुझे रुप गोड तुझे नाम | देई सुख मज सर्व काळ||
विठो माइ हांचि वर देई | संचरोनि राहो हृदयामाजी ||
तुका म्हणे काहीं न माहे आणिक | तुझे पायी सुख सर्व आहे||

पंढरीचा महीमा | देतां आणिक उपमा ||
ऐसा ठाव नाही कोठें | देव उभाउभी भेटें ||
आहेति सकळ | तीर्थें काळे देती फळ ||
तुका म्हणे पेठ | भुमिवरी हे वैकुंठ ||

चिन्या,
मी कुठलाही "वादी" नाही की कुठल्याही संप्रदायाचा कार्यकर्ता नाही... कारण वादी म्हटलं की वाद आला.. आणि उगाचच या क्रिया प्रतिक्रियांच्या खेळात येण्याची मला गरज नाही. मी क्षीरसागर नाही आणि मी त्यांना ओळखतही नाही.

अद्वैत आणि द्वैत मी जाणत नाही. एक श्रीकृष्ण सत्य आहे आणि दुसरे काही नाही हे मला ठाऊक आहे.. त्याशिवाय बाकीच्या गोष्टींचे मला काही घेणे देणे नाही...

बाकी जागेपणी द्वैत हे असणारच... "मी" ची जाणीव आहे तोवर द्वैतापासून कुठेही सुटका नाही. दृश्य, दर्शन आणि द्रष्टा.. क्रिया, कर्म आणि कर्ता, भोग्य, भोग आणि भोक्ता हे त्रिपुटीचे खेळ समाधी अवस्थेत नसेन तर चालू राहणारच आहेत.. समाधीत असतानाचा अनुभव तुकोबा सांगतात तसा "आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे" असा आहे, म्हणजे तिथे मी ही नाही आणि तो ही नाही. आहे तो अवघा सत्चिदानंद..
जर असं असेल, तर अद्वैत आणि द्वैताच्या गप्पा मारुन काय होणार? तुकोबा जगद्गुरू याचसाठी आहेत.. त्यांच्या गाथेत भक्ति तितकीच ओतप्रोत भरलेली आहे जितके अद्वैत तत्वज्ञान आहे.. आणि त्यांत वाद कुठेही नाही..
दुजे खंडे तरी । उरला तो अवघा हरी । आपणा बाहेरी । न लगे ठाव धुंडावा ॥
तुका करी जागा । नको वासपूं वाऊगा । आहेसि तू अंगा । अंगी डोळे उघडी ॥
ज्ञानाने मायेचा, द्वैताचा निरास झाला की जे काही राहते तो एक हरीच आहे. आपल्याला आत्म्याहून अन्यत्र कुठेही त्याला शोधावे लागत नाही. म्हणून तुकोबाराय अज्ञानी नराला जागे करतात आणि सांगतात की तू निष्कारण दु:खी होऊ नकोस कारण .. आहेसी तू अंगा.. तुझे स्वरूपच ते आहे. "ते तू आहेस".. त्याच्याविषयी तू आपली ज्ञानदृष्टी उघडून पहा.

ही एक जाणिव.. किंवा एक खात्री, विश्वास, श्रद्धा असलीच पाहीजे, की या सर्वांमागे कोण आहे, माझे स्वरूप काय आहे? तर ते स्वरूप, गोविंद हे सर्वांचे साक्षी आहे.. हे अनुसंधान असलं की माझं काम झालं.
अवजानंति.. या श्लोकाचा नीट विचार केल्यावरच तो अर्थ लक्षात येईल. मी जेव्हा मनुष्य शरीररुपाला "येतो" असं सरळ भगवान म्हणतायत .. म्हणजे ते त्यांचं मूळ रूप नाहीये हे ही ते तिथे उद्धृत करतायत. असं असेल तर आपल्याला ते मूलस्वरूप जाणून घेणे आवश्यक ठरते.. त्यांच्या त्या शरीरालाच, त्या रुपालाच त्यांचे परमस्वरूप जे मानतात त्यांच्याविषयी ते इथे बोलतायत. मग असं असेल तर त्यांचं चित्र कधी म्हातारं नसतं वगैरे गौण गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज पडत नाही..

मूर्ती ही अतिशय महत्वाची आहे हे नक्की. परमार्थाच्या मार्गावरचे हे टप्पे पार करायलाच लागतात. त्यातलां पहिला टप्पा आहे चित्ताचे स्थैर्य. आणि ती स्थिरता हरीणाच्या ठिकाणी असायला हरकत काहीच नाहीये Happy पण त्याचा फायदा काय? शून्य! चित्तवृत्ती ही हरीच्याच चरणांवर स्थिर झाली पाहीजे. तरच त्यांतून जे मिळायचं आहे ते मिळेल.
पण त्याचवेळी तुकोबा म्हणतात "उपाधीवेगळे तुम्ही निर्विकार। कांहीच संसार तुम्हा नाही।" इथे उपाधी म्हणजे काय? तर उपाधीचा स्पष्ट अर्थ आहे नसती कटकट. हे शरीर ही आत्म्याची उपाधी आहे. अशी काहीच उपाधी विठ्ठलाला नाही. कशी? तर देवाची आपल्याला ठाऊक असलेली रुपे चार आहेत. १. निरुपाधीक ब्रह्म २. सोपाधिक ईश्वर ३. रामकृष्णरुपाने झालेले अवतार ४. मंदिरातील मूर्ती
यातल्या कुणाच्या चरणांवर आपली चित्तवृत्ति स्थिर करायची? ब्रह्माच्या करावी तर ते शक्यच नाही, कारण ब्रह्म हे निर्गुण, निराकार, निरवयव आहे. ती ईश्वराच्या चरणीही करता येणार नाही.. कारण तो सगुण असला तरी निराकार आहे. मग अवतारांच्या चरणी? तर अवतार तर येऊन गेलेले आहेत. आत्ता उपलब्ध कोण आहे? तर ती त्या ईश्वराची मंदिरातली मूर्ती आहे. आणि तिच्यात देखील परब्रह्म तितकेच आहे जितके बाकी दुसरीकडे कुठेही असेल. पण हो, ती मूर्ती विशेष आहे कारण तिचा निर्देश परमसत्याकडे आहे. तिचा निर्देश परब्रह्माच्या स्वरुपाकडे आहे.
अशा साधनाला, कि ज्यायोगे निर्गुण निराकार असलेल्या परब्रह्माचा निर्देश शक्य होतो, त्याचे ध्यान शक्य होते, ईश्वराची उपासना शक्य होते, अशा साधनाला आलंबन असे म्हणतात. म्हणजे ज्याला घट्ट धरून एखाद्या निश्चित स्थळी पोहोचायचे असते, ते आलंबन. भगवंताचे नाम, त्याचे रुप ही आलंबने आहेत (त्यामुळे कुणी "मी माधुरी दीक्षितची मूर्ती करून पूजा करू का" असे मुद्दे कृपा करून उपस्थित करू नयेत Happy ) त्याचसाठी तुकोबांचा हा पहिलाच अभंग आहे (समचरण दृष्टी..). कि माझी वृत्ती तुझ्या पायाशी रहावी. पण तेच तुकोबा पुढे म्हणतात
केला मातीचा पशुपती । परि मातीशी काय महती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावें॥
पूजा करा, अवश्य करा.. त्यानेच चित्तशुद्धी होणार आहे.. पण त्यां मूर्तीतले शिवतत्व ओळखा, कृष्णतत्व ओळखा. आणि इथे त्या मूर्तीला दगड म्हणण्याचाही उद्देश नाहीये, पण साध्या दगडांतही देव बघण्याची इच्छा आहे.

असो. या सर्वांपैकी एकही मत माझे नाहीये.. कारण परमार्थात "माझ्या", कुणा क्ष व्यक्तीच्या मताला काही अर्थ नाही. ही सर्व मतं.. किंवा हे सिद्धांत संतांच्या आणि संततुल्य अशा व्यक्तींच्या स्वानुभवावरून घेतलेले आहेत, सांगण्यावरून घेतलेले आहेत. आता मग ते मार्ग तुमच्या मार्गांपेक्षा वेगळे असले तरी शेवटी जे परमतत्व आहे त्या तत्वापर्यंत पोहोचण्याशी आपले कर्तव्य आहे..
माऊली म्हणतात... ठीक आहे, प्रत्येक जण काही पटकन त्या परमतत्वाचं स्वरुप आहे तसं समजावून, अनुभवून घेऊ शकत नाही..
देखें उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासी झोंबे जैसा । सांगे नर केवी तैसा । पावे वेगा? ॥
एखाद्या झाडाच्या शेंड्याला असलेले फळ, पक्षी जसा उडताक्षणी जाऊन पकडतो, त्याला झोंबतो... तसा माणूस तिथे तितक्या पटकन पोहोचू शकेल का? तर नाही.. मग? मग ठीक आहे.. ज्ञानोबा अगदी आपल्या रसाळ, मधुर भाषेत सांगतात..
तो हळुहळू ढाळेढाळे । केतुलेनि एके वेळे। मार्गाचेनि बळे। निश्चित ठाकी ॥
किती छान वर्णन केलंय बघा.. अगदी आपल्याला डोळ्य़ांसमोर दिसेल की जसा तो मनुष्य झाडाच्या शेंड्याला असलेल्या त्या फळापर्यंत पोहोचण्यासाठी, एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर पाय ठेवत, हळुहळू ढाळे ढाळे.. खालच्या फांदीवरुन वरच्या फांदीवर जात.. त्या मार्गाच्या सामर्थ्याने, आणि फांदी पक्की असेल तर.. त्या फळापर्यंत जाऊन पोहोचतो हे नक्की!

मला दुसर्‍या कुठल्या गोष्टींत स्वारस्य नाही. ही चर्चा मला श्रीहरीचे स्मरण करायला उद्युक्त करते म्हणून यात मला स्वारस्य आहे.. तिचा कुठलाही "वाद" होऊ लागला की मी तिथून आपला मार्ग पकडून वेगळा होईन..

अगा सहस्त्रकिरणाचिये दिठी । पुढा चंद्रही लोपे किरीटी । तेथ खद्योत का हुटहुटी । आपुलेनि तेजे ॥
जिथे सूर्याच्या तेजापुढे चंद्रासारखा दिव्यगोलसुद्धा लोप पावतो.. जिथे वेदसुद्धा "न इति न इति" म्हणून थांबतात, तिथे त्या परमात्म्याच्या ज्ञानप्रकाशापुढे माझ्यासारख्या काजव्याने आपल्या प्रकाशाच्या बळावर वळ्वळ का करावी? Happy

|| हरि ओम ||
बाकी जागेपणी द्वैत हे असणारच... "मी" ची जाणीव आहे तोवर द्वैतापासून कुठेही सुटका नाही.

भुमिका

मी सकाळी उठते, मी जेवते, मी हसते... हा मी म्हणाजे कोण मग ? मी म्हणजे नुसते शरीर का? मग ज्यन्चे शरीर उठत नाही बसत नाही अशांमधे ही मी असतोच. मग मी म्हणजे आत्मा ? पण ... की मी म्हणजे त्याहीपेक्शा आणाखी काहि?

बरे मी म्हणजे तो असेल ( सो हम ) तर मग मी आणि तो असे दोन शब्द का?

भूमिका,
हा तर मूळ मुद्यालाच हात घातला तुम्ही Happy
थोडं सवडीने लिहावे लागेल.

क्ष्,तुमच्या पोस्टला उत्तर आहे.पण मला त्यासाठी काही पुस्तके परत चाळावी लागतील. माझ्याकडे सध्या तितका वेळ नाहीये. मी ८-९ दिवसांनी याबद्दल लिहिन.

चिन्या, मी तुम्हाला प्रश्न विचारीत नाहीये, किंवा कुठला वादविवादही (भांडण या अर्थाने नव्हें, तर्क-वितर्क या अर्थाने :)) करीत नाहीये. माझी ती इच्छा नाही. तुम्हांला हे अद्वैत मत मान्य नसेल तर तुम्ही तुमचा मार्ग घट्ट पकडून ठेवा. या मार्गावर आहात "हे ही नसे थोडके" .. पण पुस्तकं वाचाच .. स्वतःच मत अतिशय पक्कं असणं, श्रीगुरूंवर श्रद्धा असणं आणि त्यांतून आनंदाची प्राप्ति याला अर्थ आहे. शंकाकुशंका निघाल्या की त्यांत विरजण पडलंच म्हणून समजा.
असो.

महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आढावा घेणारा एखादा चांगला लेख कुठे मिळेल माहीत आहे का???कृपया सांगा. हे urgent आहे.

नमस्कार,
ई-स्निप्स वर मी काही कीर्तनांच्या फ़ाईल्स अपलोड केल्या आहेत.
किर्तनाची आवड असल्यास या लिंक वर ऎका, डाउनलोड करा आणी आनंद घ्या.
http://www.esnips.com/web/Marathikirtan
हरीदास

मला मागिशिस गुरुवारची क्था हवी आहे
Urgently mala tyachi link pathval.

मला आवडलेली व पटलेली काही वाक्ये -

ज्या प्रमाणे केस वाढत असले तरी मृत असल्यामुळे कापल्यास दुखत नाही परंतु तेच केस मुळासकट ओढल्यास मूळ जिवंत असल्यामुळे वेदना उत्पन्न होतेच. त्याचप्रमाणे, जोपर्यंत मनुष्याच्या चुका वरवरच्या असतात, तोपर्यंत त्याला पीडा होत नाही. परंतु, जेव्हा त्याच्या चुका सत्य व प्रेम या परमेश्वरी गुणांविरुद्ध कार्य करतात तेव्हा दु:ख ही अपरिहार्य फलश्रुती आहे. प्रश्न फक्त आज की उद्या एवढाच आहे.

जो कुणी दुसर्‍याचे धन लुबाडतो तेव्हा भगवंताच्या नियमानुसार त्याच्या नशिबातील दुसरे कुठलेतरी सामर्थ्य क्षय पावत असते.

************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग

वाक्ये आवडली
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

भक्ती म्हणजे सत् वरील विश्वास. भक्ती म्हणजे असत् वरील विश्वास!

म्हणजेच भक्ती म्हणजे स्वतःच्या श्रद्धेवरचा विश्वास, स्वतःच्या कर्मावरचा विश्वास!

आपण स्वतःवर जितके प्रेम करतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे म्हणजेच 'भक्ती' होय.

ज्या अवस्थेत 'मी'पणा असत नाही ती भक्ताची परमोच्च अवस्था, तर 'मी'पणा आणि 'मी'पणाचा अभाव दोन्हीही असत नाही ती दत्तगुरुंची अवस्था.

************
विविध घटकांतून बाहेर पडणार्‍या ऊर्जेच्या उत्सर्जनाचा अभ्यास. तापमानाबरोबर उत्सर्जन लहरीमधेही फरक पडतो - "लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट" - विल्यम विन - फिजिक्स नोबेल (१९११)

स्वतःच्या कर्मावरचा विश्वास = जे कर्म मी करतो आहे ते हेतुतः!
आणि हेतु = परमेश्वराने ज्या कार्यासाठी मला निर्माण केलय ते कार्य निष्ठेने करणे! मग ते डोंबाचे असो की साधुचे!

जिहाद करणार्‍यांची देखिल भक्तीच असते.
सावता माळ्याची देखिल भक्तीच होती.

कृष्णालाही भोग सुटले नाहीत कि रामाला! आपले भोग आणि आपली कर्मे ही करायचीच आहेत. पण त्याच्यामागची परमेश्वरी प्रेरणा आहे.

केवळ पूजेने आणि नामस्मरणानेच मुक्ती आणि परमेश्वराचे सान्निध्य मिळत असते किंवा तेवढेच भक्तीचे रुप असते तर खलुभर दुधाची कहाणी किंवा चिखलात चाक फसलेल्या शेतकर्‍याची गोष्ट कोणीच कुणाला सांगितली नसती.

रोजच्या कर्मांवर विश्वास हवा.

मोठमोठे शब्द, पूजा उपचार, गुरुचा मंत्र यांच्याशिवायदेखिल परमेश्वर मदतीला येतोच, योग्य मार्ग दाखवतोच हा विश्वास हवा. परमेश्वराचे रुप शोधण्याची आस मग लागणार नाही. सूर्यकिरणांसारखा परमेश्वर सर्वव्यापी आहे नि आईसारखा क्षमाशील हा विश्वास असेल तर!

हरीदासांचे खुप आभार... त्यानी बाबामहाराज सातारकर यांची किर्तने esnips वर upload केली आहेत..
खरच खूप छान collection आहे.

जर जमले सगळ्याना तर त्यातिल हरिपाठ नक्की ऐका... ज्ञानेश्वर माउलींनी सगळ्या भक्तीचे सारच उलगडुन सांगितले आहे..आणि त्याबरओबर बाबामहाराज सातारकरांचे किर्तन ही तेवढेच श्रवणीय!

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

क्ष,
तुमची पोष्ट वाचून लिहायचे रहावले नाही म्हणून...

१)एक श्रीकृष्ण सत्य आहे आणि दुसरे काही नाही हे मला ठाऊक आहे..
२)फक्त श्रीकृष्ण एकच सत्य आहे, बाकी सर्व सर्व सर्व मायिक आहे.
३)ईश्वर भक्ताच्या ओढीने आणि अपरिमित श्रद्धेने सगुण साकार होऊन किर्तनात येतो आणि नाचतोही. पण कोणाच्या? संतांच्या. इतक्या परमकोटीची भक्ती असेल तरच तो त्या सगुणसाकार रुपात येईल.
४)जे भक्त असतात जे सतत माझ्या भक्तित रममाण होतात, त्यांनाच मी मोठ्या कृपाळूपणे बुद्धियोगाचे ज्ञान देतो.
५)तो अनुभव कसा असतो तर "आनंदाचे डोही आनंद तरंग.. तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा, अनुभव सरिता मुखा आला" अशा पद्धतीचा
६)जे उत्पत्ति, स्थिती आणि लय या तीन अवस्थांच्या पलिकडे असते ते सत्य.
७)ब्रह्मांडांच्या उपाधीमध्ये गुप्त असलेले आणि "सर्वगत" म्हणजे सगळीकडे असलेले हे चैतन्य, देव, विठ्ठल, राम, कृष्ण अशा अनेक नामांनी प्रसिद्ध असलेले, तेच चैतन्य फक्त लक्षात घ्यावे.
८)आपण ज्ञानेश्वरांनी इतक्या जीव तोडून सांगितलेल्या ज्ञानाकडे निव्वळ दुर्लक्ष करतो.
९)मूर्ती ही अतिशय महत्वाची आहे हे नक्की. परमार्थाच्या मार्गावरचे हे टप्पे पार करायलाच लागतात. त्यातलां पहिला टप्पा आहे चित्ताचे स्थैर्य. आणि ती स्थिरता हरीणाच्या ठिकाणी असायला हरकत काहीच नाहीये पण त्याचा फायदा काय? शून्य! चित्तवृत्ती ही हरीच्याच चरणांवर स्थिर झाली पाहीजे. तरच त्यांतून जे मिळायचं आहे ते मिळेल.
१०)अशा साधनाला आलंबन असे म्हणतात. म्हणजे ज्याला घट्ट धरून एखाद्या निश्चित स्थळी पोहोचायचे असते, ते आलंबन. भगवंताचे नाम, त्याचे रुप ही आलंबने आहेत

११)मला दुसर्या कुठल्या गोष्टींत स्वारस्य नाही. ही चर्चा मला श्रीहरीचे स्मरण करायला उद्युक्त करते म्हणून यात मला स्वारस्य आहे

छान,
आपण, उपासना(आपण म्हणतो ती भक्ती), चित्ताचे स्थैर्य, आणि परमकोटीची भक्ती याविषयी अजून लिहाव हा आग्रह...
धन्यवाद!

व्यालाविण करी शोधन तांतडी | चार ते गधडी करीतसे ||
कासया पाल्हाळ आणिकांचे देखी | सांगता नव्हे सुखी साखरेसी ||
कुंथाच्या ढेकरें न देवेल पुष्टी | रूप दावी कष्टी मळिण वरी ||
तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका | अनुभवेविण नका वाव घेऊं ||

Happy

अधिकार तैसा दावियेला मार्ग ।चालतां हें मग कळों येतें ॥ १ ॥
जाळूं नये नांव पावलेनि पार ।मागील आधार बहुतांचा ॥ २ ॥
तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं ।नाही करी जगीं उपकार ॥ ३ ॥

आलिया भोगासी असावें सादर ।देवावरी भार घालूं नये ॥ १ ॥
मग तो कृपासिंधु निवारी सांकडे ।येर तें बापुडें काय रंक ॥ २ ॥
भयाचिये पोटीं दु:खाचिया रासी ।शरण देवासी जातां भलें ॥ ३ ॥
तुका म्हणे नव्हे काय त्या करितां ।चिंतावा तो आतां विश्वंभर ॥ ४ ॥

Happy

समर्थ रामदास स्वामी सगुण्-निर्गुण भक्तीची दोन सुत्रे सांगितली आहेत :-

१) सगुणाचेनि आधारे | निर्गुण पाविजे निर्धारे ||

श्रीकृष्णांनी भगवदगीतेत सांगितलेल आहे "संत माझ्या सजीव प्रतिमा".
तसेच श्री ज्ञानदेवांनीही ज्ञानेश्वरीत आम्ही भावंडे 'मूर्तीचा मेळावा' करुन अवतरलो आहोत अशी नोंद केली आहे.

२) सगुण रक्षावे, निर्गुण बोलावे...

सगुण भक्ती ते चळे | निर्गुण भक्ती ते न चळे | हे आवघे प्रांजळ कळे | सद्गुरु केलिया ||

हे सांगताना निर्गुण देवाच्या दर्शनाची सातत्यता इथे प्रगट केली गेली आहे. पण त्यासाठी 'सद्गुरु केलिया' ही गोष्ट महत्वाची, हेही स्पष्ट केले आहे.

सद्गुरुवचन हृदयी धरी | तोचि मोक्षाचा अधिकारी | श्रवण्-मनन केलेचि करी | अत्यादरे ||

इथेही 'सद्गुरुरक्षूनि'च ध्यानक्रिया करावी, हे सांगितले आहे. 'सद्वस्तू दाखवी सद्गुरु' हेच खरे असून श्री रामदासस्वामींनी सद्गुरूरुप सगुणावताराकडूनच सद्वस्तुस्वरुन निर्गुणाचा अनुभव येईल हे सांगितले आहे.

************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

सावट्,छान!!

काल टाकायला हव होत पण आज टाकतो-

राम ह्मणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥1॥
राम ह्मणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नास ही ॥ध्रु.॥
राम ह्मणे जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधीं ॥2॥
राम ह्मणतां यम शरणागत बापुडें । आढळ पद पुढें काय तेथें ॥3॥
राम ह्मणतां धर्म घडतील सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥4॥
राम ह्मणतां ह्मणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥5॥
गाथा 3019
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

चिन्या, मस्तच !
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

धन्यवाद चिन्मया,

तुमच नाव फारच छान आहे, घेतल्याघेतल्या 'उन्मनी' झाल्यासारख वाटत!
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
क्ष,
१)मूर्ती ही अतिशय महत्वाची आहे हे नक्की. परमार्थाच्या मार्गावरचे हे टप्पे पार करायलाच लागतात. त्यातलां पहिला टप्पा आहे चित्ताचे स्थैर्य.
अशा साधनाला, कि ज्यायोगे निर्गुण निराकार असलेल्या परब्रह्माचा निर्देश शक्य होतो, त्याचे ध्यान शक्य होते, ईश्वराची उपासना शक्य होते, अशा साधनाला आलंबन असे म्हणतात. म्हणजे ज्याला घट्ट धरून एखाद्या निश्चित स्थळी पोहोचायचे असते, ते आलंबन. भगवंताचे नाम, त्याचे रुप ही आलंबने आहेत

२)पूजा करा, अवश्य करा.. त्यानेच चित्तशुद्धी होणार आहे

३)परमार्थात "माझ्या", कुणा क्ष व्यक्तीच्या मताला काही अर्थ नाही. ही सर्व मतं.. किंवा हे सिद्धांत संतांच्या आणि संततुल्य अशा व्यक्तींच्या स्वानुभवावरून घेतलेले आहेत, सांगण्यावरून घेतलेले आहेत.

४)मी जेव्हा मनुष्य शरीररुपाला "येतो" असं सरळ भगवान म्हणतायत .. म्हणजे ते त्यांचं मूळ रूप नाहीये हे ही ते तिथे उद्धृत करतायत. असं असेल तर आपल्याला ते मूलस्वरूप जाणून घेणे आवश्यक ठरते..

५)अनुसंधान हे सतत नाम घेणं नाही. उदा, समजा १ महिन्याने माझी बारावीची परीक्षा आहे. अशावेळी मी बाकीची कामं करत राहीन, आणि त्या कामासाठी जितका वेळ द्यायचा तितका देईनही पण कुठेतरी मागे या परिक्षेची सतत एक सूक्ष्म जाणीव राहील. यालाच अनुसंधान म्हणतात. आणि भगवंताचं जोवर असं अनुसंधान नाही तोवर मी समर्थांच्या व्याख्येनुसार भक्त नसून "विभक्त" राहतो.

६)वर्षानुवर्ष मनावर झालेले संस्कार असे सहजी नाही सुटत! आपली स्वत:च्या वस्तू, घर, नातेवाईक, पैसालत्ता, आपले ज्ञान, आपली भक्तीसुद्धा.. यावरची "आसक्ती" इतकी असते की ते मायिक आहे हे सांगूनही पटत नाही.

व्वा! व्वा!!

आणि
शेवटी माऊली...

तो हळुहळू ढाळेढाळे । केतुलेनि एके वेळे। मार्गाचेनि बळे। निश्चित ठाकी ॥

इथ' 'जे निश्चित ठाकायच बळ' आहे, ते 'त्या मार्गाचच'(मार्गाचेनि बळे) आहे, हे लक्षात घेण्यासारख आहे. तो मार्ग मिळायचा कसा, यातच खरी 'गोम' आहे.आणि समजा पुर्वसुकृताने मार्ग मिळालाच, तर हळुहळू ढाळेढाळे , म्हणजे जे काही 'ठाकायच ' आहे, ते हळूहळू-क्रमाक्रमानेच होणार हे निश्चित!

तोच माउलींचा मार्ग, खाली आला आहे........

Happy

शतशः धन्यवाद!
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
सद्गुरुवचन हृदयी धरी | तोचि मोक्षाचा अधिकारी | श्रवण्-मनन केलेचि करी | अत्यादरे ||
एका ओवीत काय काय सांगितल आहे पहा..

वचन सद्गुरूनींच दिलेल(घेतलेल नाही) असल पाहीजे..म्हणजे पात्रतेनुसार मिळण आल! स्वत:च डोक चालवायच नाही!!

ज्याला ते वचन मिळाल आहे त्याने ..
ते हृदयी धरायला पाहीजे.
त्याच श्रवण् केल पाहीजे..
त्याचच मननही केल पाहीजे...(केलेचि करी )
ते पण कस तर ' अतिशय आदराने '

अस जो करतो, तो मोक्षाचा अधिकारी !!

व्वा!सुंदर ओवी!!

निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

५)अनुसंधान हे सतत नाम घेणं नाही. उदा, समजा १ महिन्याने माझी बारावीची परीक्षा आहे. अशावेळी मी बाकीची कामं करत राहीन, आणि त्या कामासाठी जितका वेळ द्यायचा तितका देईनही पण कुठेतरी मागे या परिक्षेची सतत एक सूक्ष्म जाणीव राहील. यालाच अनुसंधान म्हणतात. आणि भगवंताचं जोवर असं अनुसंधान नाही तोवर मी समर्थांच्या व्याख्येनुसार भक्त नसून "विभक्त" राहतो.

he patala
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

Pages