प्रवासी भाडोत्री गाडीने जवळच्या/ लांबच्या प्रवासासाठी टीपा

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 8 January, 2011 - 06:55

अनेकदा आपण मित्रमंडळी/ कुटुंबियांसोबत जवळपास बाहेरगावी पिकनिक - देवदर्शन - स्थल दर्शनासाठी किंवा अन्य कार्यक्रमासाठी ट्रीप आखतो. जसजसे प्रवासी सदस्य वाढू लागतात तसतशी मोठ्या वाहनाची गरज भासू लागते.
मग प्रवासी कंपन्यांची किंवा खाजगी (भाड्याने) गाड्या देणार्‍या व्यावसायिकांची शोधाशोध सुरु होते.
मिनी बस/ तवेरा/ ट्रॅक्स/ इनोव्हा इत्यादीसारख्या गाड्या बुक केल्या जातात.

ठिकाण परिचित असेल असेच नाही. जवळच्या (चार तासांचे आत) व लांबच्या प्रवासाच्या वेळी काय काय खबरदारी घ्यावी, कोणती पूर्वतयारी करावी, कोणती माहिती आगाऊ मिळवावी, कोणते संपर्क क्रमांक जवळ असावेत, प्रवासाचा मार्ग कसा निश्चित करावा, सुरक्षेच्या दृष्टीने तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी, वाहनाच्या बाबतीत व ड्रायव्हरच्या बाबतीत काय पथ्ये पाळावीत इत्यादी माहितीचे एकत्रित संकलन झाल्यास त्याचा सर्वांना फायदाच होईल.

अनुभवी प्रवाशांना इथे आपल्याजवळच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आमंत्रण! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही अगदी साध्या साध्या गोष्टी असतात, पण लक्षात येत नाहीत.

उदा : भाडोत्री गाडी निवडताना घ्यायची खबरदारी. तसेच भाडोत्री गाडीच्या ड्रायव्हर चे बाबतीत पाळावयाची पथ्ये.

खालील पथ्ये मी आवर्जून पाळते :

आपण जेव्हा स्थलदर्शनाला/ जेवायला जातो तेव्हा ड्रायव्हरलाही जेवून घेण्यास सांगावे. किंवा तशी त्याची व्यवस्था करावी. रात्रीच्या प्रवासात दर दोन-तीन तासांनी ब्रेक घेऊन ड्रायव्हरला चहा पाजावा. (जागे राहण्यासाठी :-)) त्याच्या सोबत बसणार्‍या माणसाने रात्री जागे असावे. आपण पेंगायला लागलो की त्याचा संसर्ग ड्रायव्हरलाही होऊ शकतो! Happy ज्या व्यक्तीला रस्ता माहित आहे/ रस्त्याचा नकाशा जवळ आहे व प्रसंगी खिडकीतून / खाली उतरून विचारायची तयारी आहे अशा व्यक्तीला ड्रायव्हर शेजारील सीटवर बसू द्यावे. इ. इ.

आपण जेव्हा स्थलदर्शनाला/ जेवायला जातो तेव्हा ड्रायव्हरलाही जेवून घेण्यास सांगावे. किंवा तशी त्याची व्यवस्था करावी. रात्रीच्या प्रवासात दर दोन-तीन तासांनी ब्रेक घेऊन ड्रायव्हरला चहा पाजावा. त्याच्या सोबत बसणार्‍या माणसाने रात्री जागे असावे<<<
अगदी अगदी! ड्रायवरच्या सोबत रात्री आळीपाळीने बसावे. तसेच इतर वेळी त्याची पुरेशी झोप होउ द्यावी. (उगीच त्याला पळव पळव करु नये). मुक्कामाच्या ठिकाणी आधी बुकींग केलेलं असेल तर बरं नाहीतर २-३ ऑप्शन्स असु द्यावेत. हो, ऐन वेळेवर तिथे गेल्यावर पळापळ नको.
ज्या गावाला जायचं त्याचा नकाशा, रोड मॅप आणि असलाच तर माहितगार माणुस जवळ ठेवावा. कधी कधी जवळचा रस्ता म्हणुन कोणी दाखवतं तर तिथेच गोल गोल फिरायची वेळ येते (आमच्यावर आली होती.. दिवे आगारला जातांना). मुख्य म्हणजे पेट्रोल/ डिजेल पुरेसे भरुन घ्यावे. नसेल तर संपायच्या आधीच पेट्रोल पंपाविषयी चौकशी करुन ठेवावी, विशेषतः कोकणात हा अनुभव येतो. दिवे आगार, श्रीवर्धन, हरीहरेश्वर या ट्रँगल मधे ४-५ वर्षापुर्वी एकच पेट्रोल पंप होता.

हो, मॅप्सच्या बाबतीत अजून एक : अनेकदा त्या रस्त्याचे काही काम चालू आहे / अन्य कारणांनी तो रस्ता बंद असेल तर आयत्यावेळी पंचाईत होते. पर्यायी रस्ता ड्रायव्हरला माहित नसेल तर अजूनच! अशा वेळी पत्ता कोणाला विचारता ह्यावरही तुम्ही व्यवस्थित पोचणार की नाही अवलंबून असते! Lol
स्थानिक लोकांपैकी कोणी तुमच्याबरोबर येऊन रस्ता दाखवायलाही तयार होते अनेकदा! पण त्याचेही अनुभव मजेशीर असतात!

पुण्यात खात्रिशीर मेरू किंवा ४३४३४३४३/२४२४२४२४२४ अशी कॉल टॅक्सी ची सोय नाही का? मला जस्ट डायल वाल्यांनी जे दोन नंबर दिले त्या दोन्ही वाहनचालकांनी आयत्यावेळी हात दिला. एका ने फोनच केला नाही तर दुसर्‍याने ९०० रु मागितले एअर पोर्ट ला सोडायला. त्याचे नाव कमलेश होते. मी आजिबात पहाटे साडेतीन वाजता असल्या कोणी कमलेश बरोबर जायला तयार नव्हते. त्याला पहाटे फोन केल्यावर तो आलाच नाही व काही रिग्रेट पण नाही. एका परी बरेच झाले. दुसर्‍याने तेव्ढे ही कष्ट घेतले नाहीत. फारच अनप्रोफेशनल लोक. मला मग मी जिथे राहिले होते त्या बाईंना रिक्वेस्ट करून त्यांची गाडी मागावी लागली. त्यांना माझ्याबरोबर यावे लागले पहाटे व थंडीत. मला तसेच कोणाचे फुकट उपकार घ्यायला आवड्त नाही. त्यामुळे अगदी कानकोंडे झाले पण मुलीच्या सेफ्टीच्या दृष्टि कोनातून बरेच झाले असे वाट्ले.

बायका जाणार असतील तर वा. चा. चेक करून घ्यावा. अपरात्री प्रवास/ रात्रीचे कार प्रवास शक्यतो करू नयेत. बाकी नंतर पोस्ट.

अमा, पुण्यात लोकल कॅबची प्रोफेशनल सर्व्हिस आजवर माझ्या तरी माहितीत नाहीए. एअरपोर्टला प्रीपेड ऑटो/ कॅब मिळते, पण तशीच एअरपोर्टला जायची माझ्या माहितीत तरी चांगली सोय नाही.

पुण्यात अजून मेरू कॅब / इझी कॅब वगैरे प्रकार आलेले नाहीत. इतर कोणताच पर्याय नसला तर मी ऑड वेळेला एअरपोर्ट ला जायला ओळखीचा रिक्षावाला पकडते. त्याला अगोदर सांगून ठेवायचे, रिक्षाचा नंबर नोट करून ठेवायचा - घरी देऊन ठेवायचा, त्याला आदल्या दिवशी सांगून ठेवायचे.
असे केले तरी काही वेळा हे रिक्षावाले उगवत नाहीतच! शिवाय रात्री बेरात्री रिक्षाने एअरपोर्टला सुनसान रस्त्याने एकटे जायचे जीवावर येते. (एक दोनदाच जावे लागले आहे!)

मुंबईला स्त्रियांसाठी स्त्रिया वाहन चालक असलेली लोकल कॅब सर्व्हिस निघाल्याचे ऐकिवात आहे. कोणाकडे नंबर असल्यास देऊन ठेवा.

अरूंधती
पुण्यात आशा की अश्याच कुठल्यातरी नावाने प्रीपेड टॅक्सी सर्व्हिस आहे, माझ्या मैत्रीणीने गेल्या भारत वारीत वापरली सगळीकडे जायला (पुणे एअरपोर्ट आणि इतर ठिकाणी), तिला नाव विचारून लिहीन इथे. फोन करून टॅक्सी बोलवता येते हवी तिथे. भाडी ठरलेली असतात त्यांची पण रिक्षापेक्षा अर्थातच खूप महाग ही सेवा. मैत्रीणीच्यामते टॅक्सी अगदी वेळेत आली दर वेळी.

मी मागे एकदा इंटरनेटवरुन शोधताना खालील लिंक मिळाली. कधीतरी उपयोगी येईल म्हणुन बुकमार्क करुन ठेवली आहे
http://www.asklaila.com/search/Pune/-/24%20hour%20taxi%20service/?search...

अरूंधती... पुण्यात 'विंग्स रेडिओ कॅब' ची सेवा आहे. माझ्या २ नातेवाइकांसाठी आम्ही ही कॅब बोलावली होती आणि एकदम प्रोफेशनल सर्व्हिस. +(91)-(20)-40100100

लांबच्या प्रवासाला गाडीने जायचे असल्यास शक्यतो रात्री बारा वाजल्यानंतर प्रवास करु नये.पहाटे दोन ते पाच ही वेळ तर टाळावी. कारण ह्या वेळेला झोप अनावर होते. अपघात जास्ती ह्याच वेळेला होतात.

'विंग्स रेडिओ कॅब' >> एकदम प्रोफेशनल सर्व्हिस. ९ ला बोलावले होते तर टॅक्सी बिल्डिंगजवळ ८.४५ ला हजर होती. ड्रायव्हरला रस्ते नीट माहिती होते. आणि सामान चढवायला खाली उतरायला मदत केली. महत्वाचे म्हणजे गाडीत ढणढण गाणी आदळत नव्हती कानांवर.

विंग्स रेडिओ कॅब अतिशय उत्तम आहे. बरोबर १५ मिनिटे आधी चालक हजर असतो. १ तास आधी, चालकाचा मोबाइल नंबर, गाडी नंबर पाठवला जातो. (http://www.wingsradiocabs.com/) . पुण्याबाहेरहि ते घेउन जातात. थोडा जास्त रेट आहे. मुख्य म्हणजे defensive driving करतात.

पुण्यात केके ट्रॅव्हलस ची चांगली सर्विस आहे मुम्बैइ एअरपोर्ट ला ने आण करण्यासाठी. >>>
केके ट्रॅव्हलसचा धक्कादायक अनुभव मला आला मागच्याच महिन्यात. मी तरि आयुष्यात पुन्हा त्यांची service घेणार नाहि. माझे दुपारि १ वाजता मुंबईहुन विमान होते लंडनला. सकाळी पाच वाजता मी गाडि बुक केली होती. ४:३० वाजता त्यानी सागितले की गाडि येउ शकत नाहि. घाटात अडकली आहे. सुदैवाने माझ्याकडे दुसरा ओळ्खिचा गाडिवाल्याचा नंबर होता तो यायला तयार झाला. नाहितर माझी फ्लाइट गेलिच असती.
त्यापेक्षा sandy बरे आहे. अजुन तरि त्यांचा वाइट अनुभव नाहि आला.

रात्री मुक्कामास रहायचे असले तर आपण ज्या ठिकाणी उतरतो तेथील व्यवस्थापकांस विनन्ती करून ड्रायव्हर ची झोपायची व सकाळच्या शौच मुखमार्जनादि व नाश्त्याची सोय मी आवर्जून करतो.त्यामुळे तो ही ताजातवाना व पर्यायी सुरक्षित पणे गाडी चालवू शकतो.
त्याला गाडीतच झोप हे सागणे कटाक्षाने टाळतो.
तसेच हॉटेलातून चेक आऊट करताना स्वतः ची बाथ रूम आपले झाल्यावर त्याला वापरायला देखील मी अलाऊ केले आहे.यास कोणिही ऑब्जेक्ट करत नाही.

मनीष, धन्यवाद लगेच फोन नंबर दिल्याबद्दल. महागुरु, उपयुक्त लिंक आहे. मिनोती, गणू.... चांगली माहिती.

डेलिया, अगं कॅब्जच्या बाबतीत त्यांची सध्याची सर्व्हिस कशी आहे हे जरा इतरांना विचारून मगच ती कॅब सर्व्हिस बुक करणे इष्ट ह्या निष्कर्षाला मी आले आहे. बंगळुरातील एक उत्तम कॅब सर्व्हिस मला २-३ वर्षांपूर्वी माहित होती. त्यांचा नंबर वगैरेही होता माझ्याकडे. पुण्याहून बंगलोरला निघाले की मी त्यांना मला एअरपोर्टला पिक - अप करायला बोलावून घ्यायचे. प्रॉम्प्ट सर्व्हिस, अतिशय रिझनेबल रेट्स वगैरे वगैरे. आणि ड्रायव्हरही ओक्के असायचे.
गेल्या दोन महिन्यात दोन जणांना मी त्या कॅब सर्व्हिसचा नंबर दिला. त्यांना अतिशय बेक्कार अनुभव आले. आयत्या वेळेस न उगवणे, काहीही सबबी सांगणे, रेट्स वरून वादावादी करणे, ड्रायव्हरची गुर्मीची भाषा इ. इ.
नंतर माझ्या काही परिचितांकडे चौकशी केल्यावर त्यांनी त्या कॅबची सर्व्हिस सध्या खूप घसरली असल्याचे सांगितले.
तेव्हापासून कानाला खडा.... त्या त्या कॅब सर्व्हिसची सध्याची सर्व्हिस कशी / कोणत्या प्रतीची आहे ह्याची विचारणा करूनच बुकिंग करायचे. अन्यथा गणू म्हणाले तसा मनस्ताप होतो.

रेव्यु, चांगली टीप दिलीत. खरं तर ह्या गोष्टी (ड्रायव्हरची सोय बघणे इ.इ.) प्रवास करताना आपण होऊन सुचायला हव्यात. पण खेदाने म्हणते की अनेकांना त्याच्याशी काहीही सोयरसुतक नसते. मी अशा वाहनातून प्रवास करताना कित्येकदा आमच्या ग्रुप लीडरला त्याबद्दल आठवण करून दिली आहे. वाहनचालकांची गैरसोय झाल्यामुळे त्यांनी केलेली चिडचीड, प्रवाशांवर काढलेला राग आणि सेवेची खालावलेली पातळीही पाहिली आहे.

जर वाहनचालक आरामात असेल, त्याचे सर्व कम्फर्ट्स सांभाळले गेले असतील तर तोही चांगली सेवा देतो. अनेकदा लोक त्याची सोय न बघता फक्त आपल्याच आनंदात मग्न राहतात. नंतर कधी तरी आठवण होते... अर्र ड्रायव्हरला जेवायचं विचारायचं विसरूनच गेलो म्हणून!! किंवा, त्याला ब्रेकच दिला नाही, म्हणून!

# जवळच्या / लांबच्या भाडोत्री गाडीच्या प्रवासातही कायम आपल्या सामानात एखादे जुने वर्तमानपत्र, जुन्या कॅरीबॅग्ज / बिन बॅग्ज, कागदी पिशव्या जवळ असू द्यात. काही वेळा रस्ता खराब असेल/ घाट - वळणाचा रस्ता असेल किंवा अन्य काही कारणाने कोणाला मोशन सिकनेस चा त्रास झाल्यास उपयोग होतो. अनेकदा त्या वेळेला गाडी थांबविणेही शक्य नसते.
'मला अजिबात गाडी लागत नाही,' म्हणणार्‍या अनेकांनाही कधी कधी असा त्रास होऊ शकतो. मोशन सिकनेस टाळण्याच्या गोळ्या, आवळा सुपारी/ लवंग/ वेलदोडा, पाण्याची बाटली जवळ ठेवणे त्यामुळे कधीही उपयुक्त ठरते. आपल्याला नाही तर आपल्या बरोबरच्या प्रवाशाला त्याचा फायदा होऊ शकतो.

# तसेच गाडीत कचरा करणार्‍यांसाठी (चॉकलेट रॅपर्स, टिश्यूज, टरफले, साले, सांडलेले अन्न, ज्यूसची रिकामी पाकिटे/ कॅन्स इ. इ.) एखाद्या प्लास्टिक पिशवीची तात्पुरती कचरा-पेटी तयार करा. त्यातच कचरा टाकण्याचे आपल्या सहप्रवाशांना सांगा. लांबच्या प्रवासासाठी हे फार महत्त्वाचे आहे. नाहीतर काही वेळाने आपल्याला गाडीतल्या कचर्‍यात बसायची वेळ येते! रस्त्यावर तो कचरा चुकूनही फेकू नका. गोळा करून एखाद्या कचरा-पेटीत टाका.

अरुंधती,
छान आणि महत्वाचा विषय !
Happy

रात्रीच्या प्रवासात दर दोन-तीन तासांनी ब्रेक घेऊन ड्रायव्हरला चहा पाजावा
ड्रायव्हरला दुसर्‍या (थंड) चहाची आवड नाही याची खात्री देखील करावी, कारण कुणी स्वतः सांगत नाही.
गाडीची कंडीशन देखील नक्की माहीत करुन घ्यावी.

अनिल, गाडीची कंडिशन बघायची असते म्हणजे नक्की त्यात काय काय चेक करायचे? (मला गेले अनेक वर्षे हा प्रश्न सतावतो.... मी ज्या गोष्टी चेक करते तेवढ्याच पुरेशा असतात की अजून काही चेक करायचे असते... इ.इ.)

थंड चहा Lol हो, तेही चेक करायला हवे. शक्यतो प्रोफेशनल वाहनचालक असल्या गोष्टी प्रवासाचे दरम्यान टाळतात हा माझा अनुभव आहे. पण खात्री केलेली कधीही चांगलीच! शेवटी प्रश्न आपल्या सुरक्षिततेचा आहे!!

गाडीची कंडिशन बद्दल थोडक्यात देतो - खरेतर एक मोठा लेख होउ शकेल. - सर्वात महत्वाचे म्हणजे टायर , ब्रेक आणी बैटरी. बैटरी जास्त जुनी असेल (४ वर्षे ) तर बदलुन घेतलेली उत्तम. टायर wear thread wear वरुन लक्षात येते. uneven thread wear असेल alligmment चेक करुन घ्यावी. शिवाय mirrors, lamps, high beam visibility, windshield wipers, washer fluid हे देखिल चेक केलेले बरे.

टुल किट, spare tyre in good condition, flashlight, personal emergency kit with First Aid kit हे बरोबर ठेवेलेले उत्तम.

ह्यातील बर्याच गोष्टी प्रवासी भाडोत्री गाडिसाठी नाहित पण उपयोगी पडाव्यात.

गणु,
अनुमोदन !
गाडी खुप जुनी असु नये एवढचं !
आमच्या कंपनीतल्या एकाच्या ओळखीने एक मिनि बस केली ह,दिवे आगार ,जाऊन येऊपर्यंत मुझिक सिस्टम काही नीट वाजली नाहीच !

संधिप्रकाशाच्या वेळेत गाडीच्या काचेवर चिलटे वगिरे येऊन मरतात. गाडी थांबवून स्वच्छ काच पुसून घ्यावी. घरातलेच कोणी लांब ड्राइवला चालवणार असेल तर त्याच्याशी गप्पा मारत राहावे. म्हणजे एकसुरी होत नाही. गाडीत आवश्यक स्पेअर पार्टस असावेत. आडगावी वेळ वाचतो. रिपेअर्सचा.
गाडीत जुनी वर्तमानपत्रे असावीत काच पुसायला उपयोगी पड्तात. चिल्लर खाणे जरूर घ्यावे. उत्तम गाणी असावीत. महत्त्वाचे म्हणजे, नवरा चालवत असल्यास बाजूला बसल्यास जुने ग्रज वाद वगैरे काढू नयेत. त्याचा त्याला गाडी चालविताना त्रास होउ शकतो व अपघात होउ शकतो. असे माझ्या एका मैत्रीणीचे झाले आहे. गाडी ही क्लोजड स्पेस असल्याने बरोबर ची कंपनी अति पीळ मारेल अशी नसावी.
तर उत्तम संवाद, गप्पा, विनोद करणारी असावी. एरवी बिजी असलेले लोक सलग भेटून बोलू शकतात
त्यामुळे तो वेळ सत्कारणी लावावा नाहीतर ड्राइव शिक्षाच होते.

पुण्यात विंग्ज रेडिओ कॅब्स आहेत की..उत्तम सेवा. बुक करतानाच कुठली गाडी हवी आहे (मोठी की छोटी), हे ही सांगता येते. फो. नं. ०२०४०१००१०० .
मी अगदी रात्री-बेरात्री ही त्यांच्या गाड्या वापरल्या आहेत. एअरपोर्ट, स्टेशन इ. साठी. ते लोक ड्रायवरचा मोबाइल नं. आणि गाडीचा नं. आधीच एसेमेस करतात. तो घरच्यांना कळवून ठेवला आणि निघताना फोन केला की बर्‍यापैकी सेफ वाटते. मी बरेचदा पुण्याच्या फ्लाइटच्या बोर्डींगच्या वेळेला कॅब बुक करते. म्हणजे पोचायच्या वेळेस ती बरोबर तयार असते.
अजून एक आहे- कोर्पोरेटकार म्हणून्..त्यांचा नं नाहीये सध्या..

गणू, चांगली माहिती. ह्यातील टायर्स, ब्रेक, लँप्स व मिरर्स विषयी मी विचारून घ्यायचे. शिवाय ए सी गाडी असेल तर ए सी नीट चालतोय ना....हेही बघायचे.

पावसाळ्यात बाहेरगावी जात असाल तर विशेष काळजी घ्यायलाच लागते. स्टेपनी आहे ना खात्री करून घ्यायची. खिडकी/ दरवाजातून पाणी आत येऊ शकते. काही वेळा खिडक्यांच्या काचा नीट बंद होत नाहीत. किंवा जाम होतात. गाडी आधी कोठे नुकतीच प्रवास करून आली असेल तर ती व्यवस्थित काम करत आहे ना, हे आपल्या समाधानासाठी चेक करून घेतले तर उत्तम! सीट्स / फ्लोअर भिजली असेल किंवा खराब झाली असेल तर पंचाईत होऊ शकते. सीट्स रिक्लायनिंग असल्या तर त्या नीट रिक्लाईन होतात ना, हेही पहावे!
व्ही सी आर/ डी व्ही डी प्लेयर यांबद्दल तर न बोललेलेच उत्तम! आतापर्यंतच्या मी बुक केलेल्या ज्या ज्या भाडोत्री गाड्यांमध्ये अशी सोय होती त्यातील ४० ते ५० % बंद पडलेले किंवा डिफेक्टिव्ह होते.

अमा, अगदी अगदी. फार मोलाच्या सूचना. गाडीत निष्कारण वाद घालणे टाळावेच! बरं, भाडोत्री गाडी असेल तेव्हा ऑफेन्सिव्ह भाषेत बोलणे टाळावे. वाहनचालक ऐकत असतो. त्याला तुमचे बोलणे, चाळे आक्षेपार्ह वाटू शकतात. एका वाहनचालकानेच सांगितलेला किस्सा : काही तरुण पोरं पोरी पिकनिकसाठी कोकणाकडे ताम्हिणी घाटातून तो चालवत असलेल्या गाडीतून चालले होते. तोंडात सारख्या शिव्या, एफ् ची भाषा, उत्तान चाळे, आरडा ओरडा इत्यादी. त्याला काही तो प्रकार सहन होईना! शिवाय येणार्‍या जाणार्‍या गाड्यांकडे बघून त्या मुलांचे किंचाळणे, त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव इत्यादी. (खखोदेजा!) ह्या वाहनचालकाने शेवटी घाटात रस्त्याच्या मध्यावर गाडी शांतपणे थांबवली. त्या लोकांनी वा.चा. ला शिव्या द्यायला सुरुवात केली. ह्याने शांतपणे गाडी लॉक केली, चावी खिशात टाकली, आपल्या मालकाला फोन लावला व काय घडले आहे ते सांगितले. मालकाने वाहनचालकाची पाठराखण केली. त्या मुलांनी पुढे जायची मागणी केली. वा.चा.ने साफ नकार दिला. तास-दोन तास तिथेच काढले. शेवटी तो बधत नाही म्हटल्यावर त्या मुलांनी त्या रस्त्याने जाणार्‍या अन्य वाहनातून लिफ्ट घेतली आणि त्याला शिव्या घालत निघून गेली. मालकाने वा. चा. चे पैसे कापले नाहीत, उलट कसल्याही झमेल्यात न पडता गाडी सुखरुप परत आणली म्हणून पाठ थोपटली.

तात्पर्य : वाहनचालक असेही वागू शकतात. त्यातून आपलीच अडचण / खोळंबा होतो. त्यामुळे आपल्या भाषेवर, तोंडावर (जरी आपापसात बोलत असलो तरी) ताबा हवा.

अगदी महत्वाचा मुद्दा अकु..तसेच आपण सगळे एकाच कुटुंबातले लोक पण जर भाड्याच्या गाडीतुन प्रवास करत असलो तर आर्थिक,अती खाजगी कौटुम्बिक विषय टाळावेत. तसेच आपल्या पुढील प्रवास प्लान्स चे डिटेल मध्ये डिस्कशन करणे टाळावे... वाहनचालक जरी गाडी चालवत असला तरी त्याचे कान योग्य ते काम करत असतात.. Happy

तसेच रात्री बेरात्री भाड्याच्या गाडिने एकटी स्त्री जर प्रवास करणार असेल तर पेहराव ही फार उत्तान किंवा वा चा चे ड्रायव्हिंग वरील लक्ष उडेल असा असु नये..

मृनिश, खाजगी गप्पा - अर्थव्यवहार गप्पा टाळण्याबद्दल अगदी अगदी.

बरं, परगावी गेल्यावर अनेकदा स्थलदर्शनासाठी आपण तेथील स्थानिक टॅक्सी बुक करतो. त्याविषयीही काही महत्त्वाच्या टीपा : स्थलदर्शनाला निघण्या अगोदर टॅक्सी मालकाचा पत्ता - फोन नं घेऊन ठेवा. (अनेकदा तुम्ही राहत असलेले हॉटेल टॅक्सी बुकिंग करून देते. पण त्यांचा रोल बर्‍याचदा liasoning चा असतो.)
तसेच महाराष्ट्राबाहेर, परप्रांतात तुमच्या ड्रायव्हरला तुमच्याशी बोलण्या इतपत हिंदी/इंग्रजी/मराठी येते ना इ. पाहून घ्या.

रात्रीच्या किंवा अंधारात प्रवासाच्या वेळी घाटातून वगैरे गाडी जाणार असल्यास शक्यतो गाडीच्या सर्व काचा लावून घ्याव्यात. एखादी चोर किंवा दरोडेखोरांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता असते. अचानक गाडीवर दगडधोंडे वगैरे मारून किंवा लांब काठ्या वगैरे फेकून गाडी थांबवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. नवशिक्या किंवा अननुभवी ड्रायव्हरला अश्या प्रकारे अचानक हल्ला झाल्यास काय करायचे याची माहिती नसल्याने गाडी आडठिकाणी पटकन थांबल्यास चोरांचे फावते.

आम्हाला हा अनुभव रात्रीच्या वेळे पुणे-मुंबई प्रवासादरम्यान अगदी एक्स्प्रेस हायवे वर आला आहे. अचानक काठी-दंडुके घेतलेले लोक समोर आले आणि आम्हाला गाडी थांबवण्यास सांगू लागले. दूर कुठेतरी बोटे दाखवून काहीतरी दाखवत होते. माझे बाबा ड्रायव्हर नजीकच्या सीटवर होते. त्यांना वाटले की कुणीतरी मदत मागत आहे. म्हणून त्यांच्या जवळची खिडकीची काच ते खाली करणार तोच ड्रायव्हर ने गाडी जोरात पुढे रेटली आणि 'कुणीच काचा उघडू नका' असे तो ओरडला! पुरेसे लांब गेल्यानंतर त्याने चोर लोक अश्या नवनव्या युक्त्या अवलंबत असल्याचे सांगितले. सुदैवाने ड्रायव्हर अनुभवी होता म्हणून वाईट प्रसंग टळला.

हल्ली हल्लीच असे ऐकले आहे गाडी अचानक थांबवण्यासाठी गाडीच्या समोरच्या काचेवर अंडे फेकून मारतात. ड्रायव्हर ने पटकन गाडीचे वायपर चालू केल्यास अंड्याचे बलक पसरून काच धुरकट होते व गाडी थांबवावीच लागते. अश्या वेळी वायपर मुळीच चालू करू नये.

निंबु, भयंकरच आहे.... मी तर अगदी पुण्यातल्या पुण्यात हिंडल्यासारखी रात्री बेरात्री पुणे मुंबई प्रवास करत असते... बरं झालं सांगितलंस!

तसेच रात्री बेरात्री भाड्याच्या गाडिने एकटी स्त्री जर प्रवास करणार असेल तर पेहराव ही फार उत्तान किंवा वा चा चे ड्रायव्हिंग वरील लक्ष उडेल असा असु नये..


>>
हे आक्षेपार्ह आहे. आपण कसेही कपडे घातले म्हणून ड्रायव्हरला काहीही करायचा परवाना मिळतो की काय? तसे कपडे घालण्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आणि स्त्रीत्वाचा हा अपमान आणि संकोच आहे. ऑर्थोडॉक्स पद्धतीचे लोकच असे विचार मान्डू शकतात...

Pages