अलंग - मंडण - कुलंग ... एक स्वप्नपूर्ती ... भाग २

Submitted by सेनापती... on 3 January, 2011 - 06:23

अलंग - मंडण - कुलंग ... एक स्वप्नपूर्ती ... भाग १

निसर्गाच्या सानिध्यात, गावाकडे मोकळ्या हवेत सकाळी लवकर जाग येते आणि उठल्या-उठल्या एकदम फ्रेश वाटते. शहरात तसे नाही. उठल्यावर पुन्हा झोपावेसे वाटते. एक कंटाळा अंगावर चढलेला असतो. आदल्या दिवशी चांगला ६-७ तास ट्रेक झाल्यानंतरही आज सकाळी लवकरच जाग आली. उठून बसलो तर समोच 'लिंगी' म्हणजे मंडण दिसत होता. पूर्वेकडून सूर्यकिरणांनी हळूहळू त्याला कवेत घ्यायला सुरवात केली होती. सूर्य त्याच्या डोक्यावर चढेपर्यंत आम्हाला त्याच्या पायथ्याशी पोचायचे होते. आम्ही तयारीला लागलो. चहा टाकला, आवरून घेतले आणि निघताना काही फोटो घेतले.

पाण्याच्या टाक्यावर थांबून मी आणि ऐश्वर्याने पाणी भरून घेतले. अभि पुढे रोप सेटअप करायला गेला. आज आम्ही रॅपलिंग करून उतरून जाणार होतो. रॅपलिंगचे तंत्र आता सर्वच जाणतात. ते सांगायची इथे गरज वाटत नाही.

सर्वात आधी मी, मग ऐश्वर्या आणि मग शेवटी अभि असे तिघे जण खाली उतरून आलो. शेवटचा माणूस खाली उतरताना रोप सुद्धा काढून आणायचा असतो तेंव्हा तशी सोय आधीच करणे गरजेचे असते. एकूण चढाईच्या दुप्पट रोप असेल तर 'U' टाकून शेवटच्या व्यक्तीला सहज उतरता येते. आमच्याकडे मात्र तितक्या लांबीचा रोप नसल्याने अभिने आधी U टाकून रॅपलिंग केले आणि मग उरलेला टप्पा एक टेप आणि स्लिंग वापरून वेगळ्या तंत्राने उतरून आला. तीघेपण खाली आल्यावर पुन्हा तो खालचा टप्पा पार केला आणि आम्ही मंडणच्या दिशेने चाल मारली.१० वाजत आले होते.

अलंगवरून मंडणला जाण्यासाठी स्पष्ट वाट आहे. पहिल्या प्रस्तर टप्प्याखाली जे मोठे झाड आहे त्याच्या बाजूने मंडणकडे वाट जाते. उतरताना डावीकडे ही वाट लागते. ह्यावातेवर लागले की वाट चुकायचा प्रशाच येत नाही. कारण आपल्या डावीकडे अलंगाचा अंगावर येणारा सरळसोट कडा असतो आणि उजवीकडे असते दरी. त्यामधून जाणारी वितभर रुंदीची वाट.

संपूर्ण उतारावर कारवीचे साम्राज्य. ७-८ फुट तर कुठे १० फुट उंच वाढलेली.वाटेवर पसरलेली कारवी दूर सारताना पुन्हा अभि आणि ऐश्वर्याला गांधीलमाश्या चावल्या. पुन्हा ते आ.. ओ.. सुरू झाले. मी अजून कसा बचावलोय तेच समजेना. माझ्या टी-शर्टवर असलेले मोठे डोळे बघून गांधीलमाश्या जवळ येत नव्हत्या की काय.. ते नाही का फुलपाखरांच्या पंखांवर मोठे डोळे असतात... तसे.. Happy

तासभर कड्याखालुन चालल्यानंतर खिंडीमध्ये पोचलो. आता मंडण समोर उभा ठाकला होता. उजव्या बाजूनी एक वाट खाली उतरत होती. तर डाव्या बाजूला अलंगच्या बेचक्याकडे जाणारी वाट लागते. आम्ही समोरची वाट घेत मंडणला जवळ केले आणि आता त्याच्या कड्याखालुन चाल सुरू ठेवली. १० मिनिटात मंडणच्या कातळकोरीव पायरया लागल्या.

७० एक पायऱ्या चढलो की वाट डावीकडे वळण घेत अजून वर चढते. पायऱ्या सुरूच. अजून ५० एक पायरया चढलो की हुश्श्श... आपण आता एक टप्पा वरती आलेलो असतो. आता पुन्हा वाट उजवीकडून. इथे आहे मंडणचा पहिला छोटासा प्रस्तर टप्पा. नवखे असाल तर रोप नक्की लावा. अनुभवी असाल तर गरज नाही. तरी रोप लावल्यास हरकत नाही. अगदीच ६-८ फुटाचा ट्रावर्स आहे पण पाय ठेवायला फार जागा नाही. सरकलात तर नक्की खाली जाणार.. Happy

आम्ही रोप लावून तो पार करायचे ठरवले. क्रम ठरलेला.. अभि - ऐश्वर्या आणि शेवटी मी. हा टप्पा पार केला की जरासा वळसा मारत अजून पायऱ्या चढत जायचे आणि मग डावीकडे वर बघायचे. इथे अलंग सारखाच पण थोडासा लहान आणि तिरपा प्रस्तर टप्पा चढून जावे लागते. खाली सोपा वाटला तरी मध्ये तो नक्कीच कठीण आहे. विशेष करून आपल्याला प्रस्तरारोहणाची सवय नसेल तर.

शिवाय ह्या ठिकाणी सुद्धा पाणी ओघळत होतेच. मागे आहे ८००-१००० फुट खोल दरी. अभिने पुन्हा लीड घेतली आणि बेस स्टेशनला सॅक टाकली आणि खालच्या बोल्टवर कॅराबिनर क्लिप करत चढाईला सुरवात केली. उजवीकडे सरकत त्याने दुसरा बोल्ट गाठला आणि रोप बोल्ट थ्रू नेला. आता सरळ चढणे होते. एका मागे एक बोल्ट क्लीप करत ७-८ मिनिटात अभि वर पोचला आणि त्याने रोप खाली टाकला. त्यावरून मग आधी ऐश्वर्या मग सर्वांच्या सॅक वर गेल्या. माझी सॅक वर पाठवताना पाण्याची बाटली फुटली आणि १ लिटर पाणी त्या कड्यावरून ओघळत माझे प्रस्तरारोहण अधिक कठीण करून टाकले. नशीब ती बाटली खाली येता-येता माझ्या हातात गावली. नाहीतर थेट खाली दरीतच गेली असती. अखेर मी वर चढून गेलो.

आता पुढची वाट सोपी आहे.कड्याखालून परत अलंगच्या दिशेने जात वाट वर चढते. इथे अतिशय सुंदर अश्या तिरप्या रेषेत पायऱ्या खोदलेल्या आहेत.

मग पुन्हा उजवीकडे वळून पायऱ्याचा शेवटचा टप्पा. इंग्रजी 'Z' आकाराच्यामार्गाने आपण चढत राहिले की गडाचा उध्वस्त दरवाजा लागतो. त्यापार पुन्हा काही पायरया पार केल्या की आपण गडाच्या माथ्यावर असतो.

ह्या भागातून मागे अलंग अतिशय सुंदर दिसतो. एकदम काजूच्या आकाराचा.. Lol काल जिथे राहिलो त्या गुहा देखील एकदम स्पष्ट दिसतात. सर्वात मागे आहे तो संपूर्ण भाग सुद्धा अलंगचाच आहे. म्हणूनच गावातले लोक त्याला 'मोठा' म्हणत असणार.

वर पोचलो की समोरच पाण्याचे टाके आहे. त्या थोडेसे वर राहायला व्यवस्थित गुहा आहे. अलंगप्रमाणेच इथे सुद्धा गुहेत खूप माती आहे. पण राहायला योग्य आहेत. अनेकांनी मला मंडणला राहायची व्यवस्था नीट नाही असे सांगितले होते. पण ते खरे नाही. मोठी प्रशस्त गुहा आहे. राहायची जागा नीट साफ करून घेतली. आम्ही आमचे जेवण बाहेरच बनवायचे ठरवले.


डाव्या कोपऱ्यात मागे रतनगड दिसतोय.

मंडणवर तसे बघायला काही नाही. गडाची लिंगी आम्ही सकाळी बघणार होतो. आत्ता अंधार पडायच्या आधी हातात तास होता मग टाक्यामधल्या गार पाण्याने मस्तपैकी शंभो केली. अंधारू लागले तसे रात्रीच्या जेवणासाठी लागणारे सामान तितके बाहेर ठेवले बाकी सर्व आत.

मी आणि ऐश्वर्या जेवण बनवतोय आणि अभि आमचे फोटो घेतोय..

जरा स्टेडी बसा रे.. हलू नका अजिबात.

शेवटी एक चांगला फोटो मिळाला तेंव्हा आमची सुटका झाली.... Lol

From Alang by Abhijit ...

ती टोपी मी डोक्याला हेडटोर्चचा पट्टा चावू नये म्हणून घातली होती. थंडी काहीच नव्हती आणि महत्वाचे म्हणजे इतक्या उंचावर असूनही अजिबात वारा देखील नव्हता. जेवायला मसालेभाताबरोबर पापड - लोणचे होते पण त्यानंतर गोड म्हणून डब्बा भरून रसगुल्ले नेले होते.. Lol

काल अलंगवरून मंडण दिसत होता तर आज मंडण वरून अलंग... रात्री पुन्हा एकदा त्या अब्ज ताऱ्यांच्या सहवासात बसलो. थोडे स्टार गेझिंग केले. थोडा गारवा जाणवू लागला होता.. अगदी हवाहवासा.. विविध विषयांवर खूप गप्पा मारल्या. नेमकी २७ नोव्हेंबर होती. अधून मधून २६-२७ नोव्हेंबर २००८ च्या आठवणी जाग्या होत होत्या..

सकाळी लवकर निघायचे होते. गड भटकून कुलंग च्या वाटेला लागायचे होते. हा दुसरा दिवशी झोपायला जायच्या आधीचा फोटो.. Happy

प्रस्तरचढाई असलेले अलंग - मंडण फत्ते.. आता फक्त कुलंग बाकी राहिला होता... सह्याद्रीमधली सर्वात मोठी चढाई असे ज्याचे वर्णन करतात तो कुलंग उद्या फत्ते करायचा होता...

क्रमश: ..... अलंग - मंडण - कुलंग ... एक स्वप्नपूर्ती ... भाग ३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी रे भटक्या तो "C" च्या आकाराचा अलंग भारी दिसतोय...अन तुम्ही मदनच्या सुळक्यावर नव्हते गेले का?तेथे वरती जायला छोट्या पायर्‍या लागतात अन तेथुन बाजुचा छोटा आडवा पलंग आणि कुलंग दिसतात्.तेथे एक छोटस नेढ सुद्धा आहे ना त्या सुळक्यात...
जल्ला आम्हाला कधी घेऊन जातोस बोल?

सह्ही रे दोस्ता ! जबरदस्त !

अन तुम्ही मदनच्या सुळक्यावर नव्हते गेले का? >> सुळका असे म्हणता नाही येणार रे.. शेंड्याकडचा भाग दुरून सुळका वाटतो.. नि तिकडे नेढे आहे ते कुलंगवर गेल्यावर समजते.. नेक्स्ट टाईम पक्क्या घेउन जाईल तेव्हा शोधूया म्हणतोय.. Lol Proud

अजुन फोटो हवे होते...मला मदनगडाचीच जास्त उत्सुकता होती पण त्यामानाने वर्णन पण कमी वाटले..अजून काही फोटो आणि वर्णन टाकता आले तर पहा ना.
बाकी प्रचि तर अफलातून...
अलंग काय सॉलीड दिसतोय इथून....जबरीच

ते शेवटचं क्रमश: कधी नाहिसं होतय त्याची वाट बघतोय, नाहीतर याला चांगलं म्हणायचं, आणि यापेक्षा चांगलं, पुढेच असायचं.

रोमहर्षक चढाईचे बहारदार वर्णन! बेहद्द आवडले.

सर्वच प्रकाशचित्रांतून सह्याद्रीच्या फत्तरी सौंदर्याचे विशालकाय रूप उत्तमरीत्या चौकटीत बसवले आहे. त्याखातर मन:पूर्वक अभिनंदन.

सह्याद्रीच्या रौद्रभीषण कड्यांतूनही दगडात पायर्‍या खोदून मार्ग तयार करणार्‍यांचे कौतुक तर उरात मावत नाही. सांगितले तर विश्वास बसणार नाही अशा जिन्याच्या अस्तित्वाचा पुरावाच तुम्ही प्रत्यक्षात इथे सादर केलात. ते पाहून डोळे निवले.

मंडणगडाच्या वाटेवरील ६०-७० पायर्‍यांचे ते चित्र मला माझ्या ब्लॉगवर लावायला द्यावे ही विनंती!

अशाच चित्तथरारक मोहिमा धाडसाने यशस्वी करा. आणि हो, मलाही "कर" द्यायला विसरू नका!

तुमच्या सारख्या साहसवीरांचे पवाडे आम्ही गायचे नाहीत तर मग कुणी?

१ नंबर................. भावा.....
लय भारि, थोडि माहिति कमि आहे, आणि राहुन राहुन एकच वाटतय... पिकासा चि लिंक मिळालि तर काय भारि.. फोटो काढणारा ग्रेट, अतिशय सुंदर अ‍ॅगल ने फोटो काढले आहेत.... खरच सह्याद्रि चे रुप पाहातांना काय वाटत हे श्ब्दात मांडता येत नाहि.

मला यायच आहे पुढच्या ट्रेक ला.... प्लिज....

वर्णन थोडे कमीच झाले असे मला पण वाटले.. पण प्रचि असल्याने ती कमी भरून निघाली ना.. Happy तसेही अजून काय वर्णन करू असा मला प्रश्न पडला होता.. Happy

नेढ्याच्या टोकावर जाऊन आलो... ते फोटो दिवस ३ म्हणजे पुढच्या आणि शेवटच्या भागात येतील... Happy