माझे इम्प्रॉव्ह खतखते

Submitted by नीधप on 16 December, 2010 - 02:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

खतखत्याच्या विविध रेसिपी आहेत. सिंधुदुर्ग आणि गोवा, भट आणि सारस्वत आणि मराठा अश्या प्रमाणे फरक होतात. मी आपला माझ्यापुरता सुवर्णमध्य इम्प्रॉव्ह केलाय.

साहित्य
सर्व प्रकारचे कंद - सुरण, रताळी, अर्वी, करांद (वेलावरची आणि जमिनीतली दोन्ही),
चिना आणि माडी (हे दोन्ही कंद मी गोव्यात आणि वाडीत पाह्यलेत. त्याला मराठी नाव आहे का माहित नाही.)
अजून आठवतील ते कंद.
मक्याचं कणीस तुकडे करून (दाणे काढायचे नाहीत), कच्ची पपई, कच्चं केळं, दुधीभोपळा, थोडा कच्चट तांबडा भोपळा, नीर / विलायती फणस (याचे अक्षरशः बटाट्यासारखे तुकडे होतात.)
भरपूर ओला नारळ.
थोडासा गुळ.
आमसुल
मसाल्याचे पदार्थ - हळद, धणे, तिरफळं, हिरवी मिरची नसल्यास. लाल सुकी मिरची.
मीठ

क्रमवार पाककृती: 

१. सर्व कंद पाण्यात घालून माती काढण्यासाठी ठेवावेत. वेलीवरची करांदं छोटी असतील तर अजिबात चिरू नयेत. तशीच राहू द्यावीत. बाकी वस्तूंचे तुकडे करावेत. आपण कुकरमधून शिजवून काढणार असल्याने अगदी बारीक चिरू नये. कच्ची पपई, कच्चं केळं आणि कच्चट भोपळ्याची साले काढून तुकडे करावे. मक्याच्या कणसाचे एक-दीड इंच जाडीच्या चकत्या करायच्या. दाणे काढत बसायचे नाही. बेबी कॉर्न वापरणार असलो तर आख्खेच.

२. तिरफळं घ्यायची आणि एका वाटीत भिजवत ठेवायची,

३. ओला नारळ, हळद, धणे आणि लाल सुकी मिरची वापरणार असल्यास ती असं सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं. हिरवी मिरची वापरणार असाल तर ती या वाटणात घालायची नाही.
कोरडं खोबरं जे वापरतात ते हे सगळं मिक्सरमधून काढून मग किंचित परतून घेतात. त्याने एक वेगळा खमंगपणा येतो. कोरडं खोबरं वापरायचं असेल तर लाल सुकी मिरचीच बरी.

४. हे वाटण प्रेशर पॅनमधे ओतायचं. थोडं पाणी, गूळ, आमसुल आणि हिरव्या मिरच्या आख्ख्या टाकून जरा उकळी येऊ द्यायची. मग सगळे चिरलेले कंद बिंद, भाज्या बिज्या सोडायच्या त्यात. पाणी घालायचं. पॅन बंद

५. एक शिट्टी-गॅस लहान-दोन शिट्ट्या-गॅस बंद- वाफ गेली की उघडून त्यावर तिरफळाचं पाणी ओतायचं. मीठ घालायचं आणि सारखं करत एक उकळी आणायची. (कुकर कंपनीप्रमाणे शिट्या बदलतील पण बेसिक डाळ-तांदूळ-बटाटा शिजायला जे सेटिंग लागतं ते वापरावे.)

ताजं असताना मस्तच लागतं पण शिळं अजून मुरलेलंही छान लागतं.

khatakhate.jpg

वाढणी/प्रमाण: 
हा प्रकार १-२ लोकांसाठी होतच नाही कधी.
अधिक टिपा: 

ताजं असताना मस्तच लागतं पण शिळं अजून मुरलेलंही छान लागतं.

भाताबरोबर किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर किंवा पावाबरोबरही मस्त लागतं.
तांदळाच्या भाकरीबरोबरही चांगलं लागत असावं असा अंदाज आहे.

माहितीचा स्रोत: 
ओळखीपाळखीचे लोक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋषीपंचमीची खास भाजी ही.
खतखतं उपवासाचे(ऋषीपंचमीचे) केलेले मिळते. कांदा आम्ही घालत नाही.

ऋषीपंचमीच्या कथेप्रमाणे मातीच्या भांड्यात तसेच बैलाच्या कष्टाचे खाऊ नये अशी कथा आहे तेव्हा कंदमूळंच वापरतात ह्या भाजीत अशी समज आहे. वर्षभर बैल शेतीत कष्ट करतो वगैरे.

ऋषीला हळद, धणे, मिरची चालते?
अळवाची पानं घातल्याचं मी तरी कधी ऐकलं नाहीये.

धणे मिरची पण नाही चालत वाटते. ह्याची ऋषीपंचमीच्या खतंखतंची ऑथेंटीक रेसीपी जरा वेगळी आहे.

विषयांतरः आईच्या गोव्याच्या मावशीला विचारावे लागेल. गोव्याची व रत्नगिरीची जरा जरा आपापले अ‍ॅडिशन करतात कारण मला आठवते गोव्याची आजी व रत्नागीरीची दुसरी एक आजी आपली भाजीच चांगली वरून मिरवत. Happy गोव्यात तिरफळं तर रत्नागिरीत कोकमं असे काहीतरी आहे.. व कंदमूळे काहितरी आवडिप्रमाणे.. असो. मला लक्षात नाही. विषयांतरबद्दल सॉरी. Happy

व्हेरिएशन्स सांगा ना. त्यात कसले विषयांतर. आपला खाण्याशी मतलब आहे. आज ही रेसिपी उद्या ती. Happy

बाकी मी सिंधुदुर्ग-गोवाच काय गेलाबाजार कोकणातलीही नाही. तिरफळांची ओळख लग्नानंतर झालेली आहे. खतखत्याची ओळख गेल्या एकदीड वर्षात. त्यात मुळात मी सुगरणही नाही. तेव्हा माझी रेसिपी ऑथेन्टीक नाहीच. म्हणून तर शीर्षकात इम्प्रॉव्ह लिहिलंय. म्हणजे काही राहून गेलं की हात वर करायला मी मोकळी. Happy

तरी याच रेसिपीने आज केलेलं खतखतं (अगदीच चारदोन कंद आणि कच्चं केळं एवढंच आहे तरी) मस्त झालंय एवढं खरं. Happy

आळवाची पानं नाही घालत. खरं तर कोणतीच पालेभाजी नाही घालत यात. फक्त कंद आणि फळभाज्या Happy कांदाही नसतो. एकदम सात्विक चव असते. ना कसला मसाला, ना आलंलसणाचा वास.

फारच मस्त रेस्पी. दक्षिणात्यांच्या 'अवियल'ची आठवण झाली.

अंजली (नॉर्थकॅरोलायनाकर) यांनी दिलेल्या तिरफळांचा सदुपयोग करता येईल. इथे एका मेक्सिकन दुकानात अगम्य कंद मिळतात. आपण न्याहळून बघितले की दुकानदार काकी स्पॅनिशमधे (बहुतेक) 'चांगले आहेत, घेऊन बघ' म्हणतात. तेव्हा आता तिथले सगळे कंद घेऊन नक्की करून बघेन.

मला तिरफळं, सुरण, करांद, चिना, माडी, दुधीभोपळा, नीर/विलायती फणस द्या कुणीतरी>>>> मंजिरी, तुला हे सगळं मिळालं की मला खायला बोलाव बरं.

नी, फोटो टाक की. हा प्रकार मी कधी पाहिला नाहीये त्यामुळे फोटोची उत्सुकता.

मृ, तिरफळांचा स्वाद मस्त असतो ना! जर मला मिळालेली माहिती चुकीची नसेल तर शेजवान सॉसमध्येही तिरफळ वापरलेले असते. कोणाला अजून माहिती आहे का याबाबत?

आता आठवले. मी गणपतीच्या पहिल्या दिवशी अशीच भाजी करते. (ख. वेगळे करते इतर दिवशी, गणपतीची भाजी स्पेशल) फक्त त्या दिवशीच बाजारात लाल माठाची ४-५ फुट लांब अशी भाजी मिळते. एरवी वर्षभरात कधीच दिसत नाही बाजारात. म्हणजे एकच रोपटे, मोठे जुन झालेले. या वर्शी १५ रुपयाला एक घेतले मी. त्याचे दंडारे काढुन(म्हणजे शेवग्याच्या शेंगेसारखे तुकडे) ते भाजीत घालते, कोवळि पाने असतील तर ती, शिवाय अळू आणि आंबाडे पण ..... आणि वर लिहिलेले मका, कंद, केळे वगैरे सगळे.....

ही भाजी माझ्या घरी इतकी फेमस आहे की माझ्या सगळ्या वैन्या गणपतीला म्हणुन येतात आणि मग 'ह्या भाजीसाठी मुद्दाम येतो' म्हणुन सांगतात.

मस्त रेसिपी. नीरजा आता पुन्हा साग्रसंगित कर (आणि मला बोलाव). वाटलं तर पार्ला मार्केटात एकत्र जाऊया कंद खरेदीला. काय हिरवगार, रसरशित दिसतय पार्ला मार्केट.

अवियल मधे हेच कंद घालतात का? त्याची रेसिपी काय?

शर्मिला... ये आज घरी. आहे अजून आणि आता मुरलं असेल. की डबा भरून पाठवू. मुलींपैकी कुणाला तरी पाठव घ्यायला किंवा तूच ये.

>>मृ, तिरफळांचा स्वाद मस्त असतो ना
काही कल्पना नाही. Happy आत्तापर्यंततरी ही तिरफळं विनय देसायांच्या पाककृतीप्रमाणे केलेल्या माश्याच्या कालवणात वापरलीत. बाकी काही प्रमाण सांगितलं नाही तरी चालेल, पण या पाककृतीत (शिजवून) ५ वाट्या भाजीला साधारण किती तिरफळं लागतील तेवढं सांगा.

सायो, आजचं मी फार सांग्रसंगीत केलेलं नाहीये त्यामुळे फोटो चांगला नाही येणार. परत करेन तेव्हा टाकेन.
बाकी माझ्यापेक्षा ऑथेन्टिक करतील त्या शैलजा, साधना, मनू, सुमेधा.... तिकडे लापि वाजवून ठेव. योग्य फोटो मिळेल. Happy

शैलजा, इथे लिही किंवा वेगळीकडे लिही.. अ‍ॅज यू विश. मला इथेच लिहिलीस तर आवडेल म्हणजे एकाच ठिकाणी सगळी व्हेरिएशन्स मिळतील. Happy

सिंडे, त्यासाठी देशात यावं लागेल. आणि माझ्या घरी पायधूळ झाडावी लागेल. आणि मला थोडा वेळ सहन करावं लागेल. बघ....
आरतीकडून धोक्याची पूर्ण कल्पना घे.. Happy

इथे किती मिळतील कंद माहित नाही.. पण भाजी आवडली.. मृण्मयी, तुझी अगम्य कंदांची कशी झाली ते लिही. तिरफळे इथे काय नावाने मिळतात?

ऋषींच्या भाजीत अळू घालतात ना देठीगाठी करून. आणि तुपाजिर्‍याची फोडणी.

ही पण करून बघायला हवी. पण माझ्याकडे तिरफळं नाहीत.

अगं लिहिते की इकडे. Happy

कोकणात किंवा गोवा/ कारवार इथेही साधारण हीच पद्धत. फक्त्,कोकणात म्हणजे वाडी आणि आसपासच्या भागात, कणसं वगैरे इतक्या सहजपणे उपलब्ध असलेली मी पाहिलेली नाहीत, वा आता असतीलही. तर, खरं तर ती नसत आज्जी जी भाजी करे त्यात. अर्थात, घालायला हरकत नाही.

साधारण अर्धी वाटी तूरडाळ ह्या मापाने सारे घेतले आहे.

लागणारे जिन्नस: अर्धी वाटी तूरडाळ.
भाज्या: पाव किलो लाल भोपळा, सुरण - थोडे कमीही चालेल, १ रताळे, २ मध्यम बटाटे, १ कच्चे केळे, उसाच्या करव्याचे ९- १० तुकडे, कच्च्या पपईचे तुकडे, नीरफणसाचे तुकडे, करांदे, कणग्या.

वाटण : पाव ते अर्धी वाटी खवलेले खोबरे व ४-५ तिरफळे.

इतरः हळद, तिखट, चिंच, गूळ, मीठ.

कृती: डाळ चांगली शिजवून घ्यावी व घोटावी .
फळभाज्यांच्या साली काढून त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत.
डाळीमध्ये सर्व भाज्या जरुरी पुरते पाणी घालून शिजवून घ्याव्या. भाज्या शिजत असतानाच त्यात तिरफळे ठेचून घालावीत.
१ चमचा तिखट व हळद प्रत्येकी आणि छोट्या सुपारीएवढा गूळ घालावा. थोडा चिंचेचा कोळ घालावा.
खोबरे वाटून घेतानाही त्यात तिरफळे घालावीत.
सर्व भाज्या शिजल्यावर वरुन खोबर्‍याचे वाटण घालावे व ही भाजी चांगली खदखदू द्यावी. चवीपुरते मीठ घालायचे.
भाजी फार पातळ वा सुकी करावयाची नाही.

अधिक टिपा:
डाळ न वापरताही ही भाजी करता येते.
तिरफळे ताजी असली तर कमी वापरावी कारण त्यांना अधिक वास असतो. मग वाटणात २-३ आणि ठेचण्यासाठी २-३ चालतील. सुकी असतील तर जास्त घ्यायची. ५-६ प्रत्येकी. त्याची बी काढून टाकायची वापरण्याआधी.

कोणीतरी मागे पोस्ट टाकली आहे की ह्यात अळू वापरतात का, तर नाही. ही ऋषीची भाजी नव्हे. ह्यात कांदा, लसूण, आले, धणे वगैरे घालत नाही आम्ही.

शैलजा, अगदी माझ्या आईचीच रेसिपी लिहीलीस. Happy
फक्त भाज्यांची लिस्ट फाऽऽऽर मोठ्ठी आहे. वर मी लिहील्याप्रमाणे २१+ भाज्या Wink
नावे लिहू का?

शैलजा, तूरडाळ वाली मी पण ऐकलीये पण कधी करून नाही बघितलेली. आता करेन.
प्राची, भाज्यांची नावे प्लीज! Happy
म्हणजे काय काय पॉसिबल आहे ते तरी कळेल.

अगं, बर्‍याच भाज्या आहेत.
भोपळा,बटाटा, रताळे, वांगे, मुळा, कच्चे केळे, दोडका, पडवळ, मक्याचे कणीस, कच्चा फणस, सुरण, मुडली, कोंब, टोमॅटो, फ्लॉवर, नवलकोल, गवार शेंगा, घेवडा शेंगा, शेवगा शेंगा, फरसबी, दुधी भोपळा, ढब्बू मिरची, काकडी, पावट्याचे दाणे, चवळीचे दाणे, शेंगदाणे, मटार दाणे, डबल बी, मटकी, मुळ्याच्या पाल्याचे देठ, भोपळ्याचे देठ, पोकळ्याचे देठ, उसाचे करवे, गाजर यातल्या मिळतील त्या भाज्या.

Pages