हेलन - The Dancing Legend!

वरचा फोटो कुणाचा ते तुम्हाला वेगळं सांगण्याची गरजंच नाही. पण तिचा असा फोटो म्हणजे दुर्मिळ छबीच... आपण सर्वांनी बहुतेक वेळेला तिला कॅब्रे किंवा नाईटक्लबमध्ये डान्स करताना पाहिलय.
आपल्याला जरी ती फक्त 'हेलन' म्हणून माहीत असली तरी तिचं संपूर्ण मूळ नाव हेलन जयराग रिचर्डसन होतं व ती जन्माने अॅम्ग्लो बर्मिस होती. म्हणजे वडील अॅंग्लो इंडियन व आई बर्मिस... बर्मा मध्ये २१ ऑक्टोबर १९३९ रोजी या सौंदर्याने जन्म घेतला आणि पुढे ती बॉलिवुड मध्ये तिच्या अनेकविध भुमिकांमुळे व विशेषकरून नृत्याविष्कारामुळे फक्त 'हेलन' या नावाने भरपूर गाजली.
हेलनचे कुटुंब हे बर्मातील अॅंग्लो इंडियन निर्वासित होते. दुसर्या महायुद्धाच्या दरम्यान तिच्या वडीलांचा मृत्यू झाल्याने १९४३ मध्ये हे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. हेलन व तिची आई या व्यतिरिक्त कुटुंबात एक भाऊ (रॉजर) आणि एक बहिण(जेनिफर) असे एकूण चार सदस्य होते. मुंबईत स्थायिक झाल्यावर हेलनची आई नर्स म्हणून काम करत असे पण मिळणार्या तुटपुंज्या पगारात कुटुंब चालवणे कठिण झाल्याने त्यांच्या व स्वत:च्या चरितार्थासाठी हेलनने शाळा सोडून देऊन नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली. हे शिक्षण घेताना तिला साक्षात्कार झाला की आपल्याला नृत्याचे अंग आहे, त्यांचीच एक कुटुंब स्नेही; अभिनेत्री कुकू ही त्यावेळी बॉलिवूड मधली एक अग्रगण्य नर्तिका म्हणून ओळखली जायची, तिच्या ओळखीने हेलनला अतिशय लहान वयातच चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम मिळाले. कुकूचा नृत्याचा वारसा तिने पुढे चालू ठेवला. कुकूप्रमाणे हेलनही मुद्राभिनयात तरबेज झाली होती.
बर्याच चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम केल्यानंतर हेलनला हुर्-ए-अरब आणि अलिफ लैला यांसारख्या चित्रपटात सोलो डान्सर च्या भुमिका मिळाल्या. उत्तम नृत्याचे अंग असल्याने, हेलनचे नशिब हे तिच्या हातात नसून तिच्या 'पायांत' आहे असे त्या काळी बोलले जायचे. १९५७ मध्ये 'बारिश' चित्रपटात 'मिस्टर जॉन या बाबा खान...' व लगेच १९५८ मध्ये 'हावडा ब्रिज' या चित्रपटातल्या सुरेख चायनिज पोषाखात 'मेरा नाम चिं चिं चू....' म्हणत हेलनने यशस्वी पदार्पण केले.
१९५०-६० आणि ७० च्या दशकातील नाईटक्लब व कॅब्रे डान्स नंबर्सनी तर हेलनला भरपूर यश मिळवून दिले. त्याकाळात तिची तुलना मेरिलिन मनरो बरोबर केली जायची. पण त्याच बरोबर तिची काही सेमी क्लासिकल डान्समधली गाणी (उदा. 'गंगा जमुना'तलं 'तोरा मन बडा पापी' किंवा 'जिंदगी' मधलं 'घुंघरवा मोरा छम छम बाजे') यांनीही तिला प्रचंड यश मिळवून दिले.
हेलनचं अॅंग्लो+बर्मिस सौंदर्य हे चित्रपटातील मुख्य अभिनेत्री बनण्याच्या मार्गातला मोठा अडथळा ठरले. तिचे सौंदर्य, शार्प लुक्स आणि चमकणारे डोळे हे मुख्यत्वे करून चित्रपटातल्या 'भारतीय नारी रोल'च्या विरूद्ध बर्याचदा 'हायलायटींग' म्हणून वापरले जायचे. त्यामुळे चंद्रशेखर ते अमिताभ बच्चन यांसारख्या 'लिडींग' हिरोंबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून काम करून सुद्धा हेलनला खरे नाव व प्रसिद्धी ही तिच्या बर्याचश्या 'व्हॅम्प' व 'निगेटिव्ह' रोल्सनीच दिली. या अशा रोल्सची मागणी म्हणजे अतिश्य कमी कपडे व पडद्यावर उत्तेजक दृश्य... पण जन्मत:च सुंदर अशी हेलन कधीही कमी कपड्यात सुद्धा 'उत्तान' दिसली नाही. असे कपडे वापरताना नेहमी ती त्वचेशी मिळत्या जुळत्या रंगाच्या स्टॉकिंग्ज वापरायची. शिवाय चित्रपटाच्या सेट्स वर तिच्या अलिप्त राहण्याच्या स्वभावामुळे सुद्धा असे रोल्स करूनही तिला कोणत्याही बदनामीला किंवा गॉसिपला सामोरे जावे लागले नाही.
हेलन तिच्या काळात जबरदस्त प्रसिद्ध होती. रस्त्यावरून जाताना तिला कधीही उघड चेहर्याने बाहेर फिरता आले नाही. कायम काहीतरी मुखवटासदृश घालून वावरावे लागे. कारण तिचा चाहतावर्ग तिच्यासाठी अमर्याद वेडा होता.. (अवांतर - मी तर हेलनसाठी अजूनही प्रचंड वेडी आहे. टिव्हीवर कधीही 'डॉन' लागला तर त्यातलं तिचं "ये मेरा दिल यार का दिवाना..." हे गाणं मी अजिबात चुकवत नाही.)
१९५८ च्या 'मेरा नाम चिं चिं चू' पासून ते १९७० च्या दशकातील 'ये मेरा दिल प्यार का दिवाना' पर्यंत हेलनने चित्रपटसृष्टीवर 'कॅब्रे क्विन' म्हणून अधिराज्य गाजवले. तिच्यानंतर या चमकदार दुनियेत प्रवेशलेल्या बिंदुने थोडक्या व्हॅम्प रोल्स वर समाधान मानले. यथावकाश, कॅब्रे व व्हॅम्प रोल करणार्या हिरॉइन्सची लाट आली. अरूणा इराणी, पद्मा खन्ना यांसारख्यांनी हेलनची लॉबी बर्यापैकी डळमळीत केली.
१९७० च्या दशकात तिच्यानंतर नविन प्रवेशत्या झालेल्या नट्यांनी शरिरप्रदर्शनाची तयारी दाखवली तेव्हा हेलनची प्रसिद्धी बरीच खालावली व ती आर्थिक अडचणीतही सापडली. त्या काळात तिला साथ लाभली ती प्रसिद्ध लेखक सलिम खान यांची. जावेद अख्तर यांच्या बरोबर लिहित असलेल्या २ चित्रपटात उदा. इमान धरम, डॉन यात त्यांनी हेलनला चांगली भूमिका देऊ केली.

माझ्या वाचनात आलं की डॉन मधलं 'ये मेरा दिल प्यार का दिवाना..." हे गाणं जेव्हा हेलनने केलं तेव्हा ती चक्क ४० वर्षांची होती... (वाटते का चाळिशीची ? :अओ:)
हेलनच्या गाजलेल्या सर्व गाण्यांच्या यशात तिच्यासाठी गाणार्या गायिकांचे ही महत्व तितकेच आहे. 'मेरा नाम चिं चिं चू' व इतर बरीच गाणी गीता दत्तने, तर ६० च्या दशकात व ७० च्या दशकाच्या सुरवातीला आशा भोसले यांनी ही हेलनसाठी पार्श्वगायन केले. 'इन्तेकाम' मध्ये 'आ जानेजाँ' साठी लता..... आणि 'इन्कार' यातल्या प्रचंड गाजलेल्या 'तु मुंगळा मुंगळा..' साठी उषा मंगेशकर.
१९७३ मध्ये 'मर्चंट आयव्हरी' ची ३० मिनिटांची डॉक्यूमेंट्री फिल्म ""Helen, Queen of the Nautch Girls" ने हेलनची ओळख देशा-विदेशात बॉलिवूड मधली एक उत्तम आणि प्रसिद्ध डान्सर म्हणून करून दिली. आपल्यापैकी बर्याच जणांना माहिती नसेल, हेलन चे टोपणनाव होते "H-Bomb."
२००६ मध्ये हेलनच्या आयुष्यावर 'जेरी पिंटो' लिखित एक पुस्तक प्रकाशित झाले, त्याचं नाव होतं. "The Life and Time Of An H-Bomb" या पुस्तकात तिच्या चित्रपटसृष्टीतल्या एकूण कारकिर्दीवर प्रकाश टाकला गेला.
पुढे १९८० च्या दरम्याने ती सलिम खान यांच्याशी विवाहबद्ध झाली. सलिम खान हे आधीपासून विवाहीत होते. आजचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा त्यांचा मुलगा. हेलनला या कुटुंबात सुरूवातीला खूप त्रास झाला. पण सलमान आणि त्याचे इतर २ भाऊ कळत्या वयाचे झाल्यावर सर्व काही सुरळित सुरू झाले. हेलन आणि सलिम खान यांनी 'अर्पिता' नावाची मुलगी दत्तक घेतली.
अलिकडच्या काळात तिने सलमान खान बरोबर खामोशी-द-म्युझिकल, हम दिल दे चुके सनम इ. चित्रपटात काम केले.
हेलनचे गाजलेले डान्सिकल आयटम नंबर्स...

'पिया तू अब तो आजा, शोला सा मन बहके....' (कारवाँ)

'तिसरी मंझिल' चित्रपटातील 'ओ हसिना जुल्फोवाली जानेजहाँ...' हे गाणं 'रॉक अॅन्ड रोल' या संगीत प्रकारावर आधारलेलं होतं आणि ते प्रचंड गाजलं. या व्यतिरिक्त 'शोले' चित्रपटातलं "मेहबूबा मेहबूबा..." 'इन्तेकाम' मधलं "आ जानेजा..."'दिल अपना और प्रीत पराई' मधलं "ऊंई$$$ इतनी बडी मेहफिल...." हे गाणं विशेष गाजलं नाही, पण माझ्या प्रचंड आवडीचं. and the last but not the least... 'डॉन' मधलं evergreen "ये मेरा दिल, प्यार का दिवाना..."
हेलनने चित्रपटात आयटम सॉन्गच्या ट्रेन्डचा झेंडा त्याकाळी फडकवला आणि आज ही तो कायम आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्र्या सुद्धा अजूनही तिची गाजलेली गाणी व त्यावरचे डान्स हे इंटरनॅशनल स्टेज शोज मध्ये सादर करतात. हेलनच्या विग पासून ते हेवा वाटावा अश्या तिच्या वॉर्डरोबपर्यंत सर्व काही अत्यंत प्रभावी होतं आणि त्याचा प्रभाव आजही चित्रपटसृष्टीवर आणि तिच्या चाहत्यांवर आहे.
एवार्डस -
१९७९ - फिल्मफेअर बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस - लहू के दो रंग
१९९८ - फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट एवॉर्ड.
२००९ - पद्मश्री सन्मान.
*********************************************
तळटिप : सर्व माहीती व फोटोग्राफ्स पुस्तक आणि आंतरजालावरून साभार.
*********************************************
छान लेख. अरे वा खूपच मनावरच
छान लेख. अरे वा खूपच मनावरच घेतलय्स लिखाणाचं. चांगलं आहे, त्या निमित्ताने आमच्यासरख्या नवख्या वाचकांच्या ज्ञानात थोडी भर पडेल.
बाकि माझ्या माहितीप्रमाणे तिची हेअर स्टाईल पण वेगळी होती त्यावेळी (अलग) म्हणून असेल कदाचीत तेव्हा हेलन हेअर कटची फॅशन होती. कोणाची तशी हेअर स्टाईल कोणा बाईची असली कि हमखास विचारयचे "काय हेलन कट" का?
निंबुडा, माझ्या व्यवसाय
निंबुडा, माझ्या व्यवसाय सोडला, तर बाकि सगळ्या क्षेत्रात गति आहे !!
हेलनच्या आधी कुक्कू आणि तिच्यानंतर बिंदू, पद्मा खन्ना, जयश्री टी, मीना टी, फरियाल अशा अनके नर्तिका आल्या, पण कुणालाच तिच्याइतकी लोकप्रियता मिळाली नाही.
हा ही लेख खूप सुंदर झालाय
हा ही लेख खूप सुंदर झालाय
पुलेशु.
खुप छान लेख आणी माहिती .
खुप छान लेख आणी माहिती .
आवडते वाटते तुला हेलन
आवडते वाटते तुला हेलन
दक्षिणा, वाह ! झक्कास माहिती,
दक्षिणा,

वाह ! झक्कास माहिती, आवडली !
अशा हेलनचा लेख तुच लिहिलास हे आणखी लै बेस वाटलं !
छान
छान
वा वा मस्त माहितीपूर्ण
वा वा मस्त माहितीपूर्ण लेख.
उकाकांचा प्रतिसाद केवळच......
दक्षिणा, आताच लेख वाचला. खूप
दक्षिणा, आताच लेख वाचला. खूप मस्त लेख!
पुढचा लेख कुणावर आणि कधी? लवकर लिही. पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत..............
आज हेलन बद्दल असणारा 'गैरसमज'
आज हेलन बद्दल असणारा 'गैरसमज' काही प्रमाणात दुर झाला...
दक्षिणा, मस्त लेख! खरंतर मी
दक्षिणा, मस्त लेख! खरंतर मी प्रथमच तुझा लेख वाचतेय. आता मात्र तुझे सगळे लेख वाचून काढणार.
छान लेख दक्षिणा.
छान लेख दक्षिणा.
दक्षिणा, मस्त आहे लेख. मला
दक्षिणा, मस्त आहे लेख. मला हेलनबद्द्ल काहीही माहिती नव्हती. तुझ्या लेखामुळे ती मिळाली.ती कधी उत्तान वाटली नाही हे अगदी बरोबर. तू आणि सूर्यकिरणने दिलेले ब्लॅक अँन्ड व्हाईट फोटो फारच सुंदर आहेत.
दिनेशदांनी पण एक चांगली आठवण सांगितली आहे.
खरंच या लोकांना किती अडचणी पार कराव्या लागल्या आहेत....
मी हेलन चा प्रचंड फॅन आहे.
मी हेलन चा प्रचंड फॅन आहे. हेलनच्या नाचाची सर आजपावेतो कुठल्याही कॅब्रे डान्सर ला आलेली नाहि.त्या सर्वानी हेलनच्या पदांचे तीर्थ रोज ३ वेळा घेतले तर पदन्यास म्हणजे काय हे कळले तरी पुरे ! नाच वगैरे पुढच्या जम्नी बघु. धन्यवाद ! सुरेख लेखन !!!
छान लेख... फोटोही अप्रतिम
छान लेख... फोटोही अप्रतिम आहेत. खरंच किती सुंदर दिसतेय हेलन.
Pages