हेलन - The Dancing Legend!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

helen.jpg

वरचा फोटो कुणाचा ते तुम्हाला वेगळं सांगण्याची गरजंच नाही. पण तिचा असा फोटो म्हणजे दुर्मिळ छबीच... आपण सर्वांनी बहुतेक वेळेला तिला कॅब्रे किंवा नाईटक्लबमध्ये डान्स करताना पाहिलय.

आपल्याला जरी ती फक्त 'हेलन' म्हणून माहीत असली तरी तिचं संपूर्ण मूळ नाव हेलन जयराग रिचर्डसन होतं व ती जन्माने अ‍ॅम्ग्लो बर्मिस होती. म्हणजे वडील अ‍ॅंग्लो इंडियन व आई बर्मिस... बर्मा मध्ये २१ ऑक्टोबर १९३९ रोजी या सौंदर्याने जन्म घेतला आणि पुढे ती बॉलिवुड मध्ये तिच्या अनेकविध भुमिकांमुळे व विशेषकरून नृत्याविष्कारामुळे फक्त 'हेलन' या नावाने भरपूर गाजली.

हेलनचे कुटुंब हे बर्मातील अ‍ॅंग्लो इंडियन निर्वासित होते. दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान तिच्या वडीलांचा मृत्यू झाल्याने १९४३ मध्ये हे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. हेलन व तिची आई या व्यतिरिक्त कुटुंबात एक भाऊ (रॉजर) आणि एक बहिण(जेनिफर) असे एकूण चार सदस्य होते. मुंबईत स्थायिक झाल्यावर हेलनची आई नर्स म्हणून काम करत असे पण मिळणार्‍या तुटपुंज्या पगारात कुटुंब चालवणे कठिण झाल्याने त्यांच्या व स्वत:च्या चरितार्थासाठी हेलनने शाळा सोडून देऊन नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली. हे शिक्षण घेताना तिला साक्षात्कार झाला की आपल्याला नृत्याचे अंग आहे, त्यांचीच एक कुटुंब स्नेही; अभिनेत्री कुकू ही त्यावेळी बॉलिवूड मधली एक अग्रगण्य नर्तिका म्हणून ओळखली जायची, तिच्या ओळखीने हेलनला अतिशय लहान वयातच चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम मिळाले. कुकूचा नृत्याचा वारसा तिने पुढे चालू ठेवला. कुकूप्रमाणे हेलनही मुद्राभिनयात तरबेज झाली होती.

बर्‍याच चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम केल्यानंतर हेलनला हुर्-ए-अरब आणि अलिफ लैला यांसारख्या चित्रपटात सोलो डान्सर च्या भुमिका मिळाल्या. उत्तम नृत्याचे अंग असल्याने, हेलनचे नशिब हे तिच्या हातात नसून तिच्या 'पायांत' आहे असे त्या काळी बोलले जायचे. १९५७ मध्ये 'बारिश' चित्रपटात 'मिस्टर जॉन या बाबा खान...' व लगेच १९५८ मध्ये 'हावडा ब्रिज' या चित्रपटातल्या सुरेख चायनिज पोषाखात 'मेरा नाम चिं चिं चू....' म्हणत हेलनने यशस्वी पदार्पण केले.

१९५०-६० आणि ७० च्या दशकातील नाईटक्लब व कॅब्रे डान्स नंबर्सनी तर हेलनला भरपूर यश मिळवून दिले. त्याकाळात तिची तुलना मेरिलिन मनरो बरोबर केली जायची. पण त्याच बरोबर तिची काही सेमी क्लासिकल डान्समधली गाणी (उदा. 'गंगा जमुना'तलं 'तोरा मन बडा पापी' किंवा 'जिंदगी' मधलं 'घुंघरवा मोरा छम छम बाजे') यांनीही तिला प्रचंड यश मिळवून दिले.

हेलनचं अ‍ॅंग्लो+बर्मिस सौंदर्य हे चित्रपटातील मुख्य अभिनेत्री बनण्याच्या मार्गातला मोठा अडथळा ठरले. तिचे सौंदर्य, शार्प लुक्स आणि चमकणारे डोळे हे मुख्यत्वे करून चित्रपटातल्या 'भारतीय नारी रोल'च्या विरूद्ध बर्‍याचदा 'हायलायटींग' म्हणून वापरले जायचे. त्यामुळे चंद्रशेखर ते अमिताभ बच्चन यांसारख्या 'लिडींग' हिरोंबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून काम करून सुद्धा हेलनला खरे नाव व प्रसिद्धी ही तिच्या बर्‍याचश्या 'व्हॅम्प' व 'निगेटिव्ह' रोल्सनीच दिली. या अशा रोल्सची मागणी म्हणजे अतिश्य कमी कपडे व पडद्यावर उत्तेजक दृश्य... पण जन्मत:च सुंदर अशी हेलन कधीही कमी कपड्यात सुद्धा 'उत्तान' दिसली नाही. असे कपडे वापरताना नेहमी ती त्वचेशी मिळत्या जुळत्या रंगाच्या स्टॉकिंग्ज वापरायची. शिवाय चित्रपटाच्या सेट्स वर तिच्या अलिप्त राहण्याच्या स्वभावामुळे सुद्धा असे रोल्स करूनही तिला कोणत्याही बदनामीला किंवा गॉसिपला सामोरे जावे लागले नाही.

हेलन तिच्या काळात जबरदस्त प्रसिद्ध होती. रस्त्यावरून जाताना तिला कधीही उघड चेहर्‍याने बाहेर फिरता आले नाही. कायम काहीतरी मुखवटासदृश घालून वावरावे लागे. कारण तिचा चाहतावर्ग तिच्यासाठी अमर्याद वेडा होता.. (अवांतर - मी तर हेलनसाठी अजूनही प्रचंड वेडी आहे. टिव्हीवर कधीही 'डॉन' लागला तर त्यातलं तिचं "ये मेरा दिल यार का दिवाना..." हे गाणं मी अजिबात चुकवत नाही.)

१९५८ च्या 'मेरा नाम चिं चिं चू' पासून ते १९७० च्या दशकातील 'ये मेरा दिल प्यार का दिवाना' पर्यंत हेलनने चित्रपटसृष्टीवर 'कॅब्रे क्विन' म्हणून अधिराज्य गाजवले. तिच्यानंतर या चमकदार दुनियेत प्रवेशलेल्या बिंदुने थोडक्या व्हॅम्प रोल्स वर समाधान मानले. यथावकाश, कॅब्रे व व्हॅम्प रोल करणार्‍या हिरॉइन्सची लाट आली. अरूणा इराणी, पद्मा खन्ना यांसारख्यांनी हेलनची लॉबी बर्‍यापैकी डळमळीत केली.

१९७० च्या दशकात तिच्यानंतर नविन प्रवेशत्या झालेल्या नट्यांनी शरिरप्रदर्शनाची तयारी दाखवली तेव्हा हेलनची प्रसिद्धी बरीच खालावली व ती आर्थिक अडचणीतही सापडली. त्या काळात तिला साथ लाभली ती प्रसिद्ध लेखक सलिम खान यांची. जावेद अख्तर यांच्या बरोबर लिहित असलेल्या २ चित्रपटात उदा. इमान धरम, डॉन यात त्यांनी हेलनला चांगली भूमिका देऊ केली.

helen in yeh mera dil.jpg
माझ्या वाचनात आलं की डॉन मधलं 'ये मेरा दिल प्यार का दिवाना..." हे गाणं जेव्हा हेलनने केलं तेव्हा ती चक्क ४० वर्षांची होती... (वाटते का चाळिशीची ? :अओ:)

हेलनच्या गाजलेल्या सर्व गाण्यांच्या यशात तिच्यासाठी गाणार्‍या गायिकांचे ही महत्व तितकेच आहे. 'मेरा नाम चिं चिं चू' व इतर बरीच गाणी गीता दत्तने, तर ६० च्या दशकात व ७० च्या दशकाच्या सुरवातीला आशा भोसले यांनी ही हेलनसाठी पार्श्वगायन केले. 'इन्तेकाम' मध्ये 'आ जानेजाँ' साठी लता..... आणि 'इन्कार' यातल्या प्रचंड गाजलेल्या 'तु मुंगळा मुंगळा..' साठी उषा मंगेशकर.

१९७३ मध्ये 'मर्चंट आयव्हरी' ची ३० मिनिटांची डॉक्यूमेंट्री फिल्म ""Helen, Queen of the Nautch Girls" ने हेलनची ओळख देशा-विदेशात बॉलिवूड मधली एक उत्तम आणि प्रसिद्ध डान्सर म्हणून करून दिली. आपल्यापैकी बर्‍याच जणांना माहिती नसेल, हेलन चे टोपणनाव होते "H-Bomb."
२००६ मध्ये हेलनच्या आयुष्यावर 'जेरी पिंटो' लिखित एक पुस्तक प्रकाशित झाले, त्याचं नाव होतं. "The Life and Time Of An H-Bomb" या पुस्तकात तिच्या चित्रपटसृष्टीतल्या एकूण कारकिर्दीवर प्रकाश टाकला गेला.

पुढे १९८० च्या दरम्याने ती सलिम खान यांच्याशी विवाहबद्ध झाली. सलिम खान हे आधीपासून विवाहीत होते. आजचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा त्यांचा मुलगा. हेलनला या कुटुंबात सुरूवातीला खूप त्रास झाला. पण सलमान आणि त्याचे इतर २ भाऊ कळत्या वयाचे झाल्यावर सर्व काही सुरळित सुरू झाले. हेलन आणि सलिम खान यांनी 'अर्पिता' नावाची मुलगी दत्तक घेतली.

अलिकडच्या काळात तिने सलमान खान बरोबर खामोशी-द-म्युझिकल, हम दिल दे चुके सनम इ. चित्रपटात काम केले.

हेलनचे गाजलेले डान्सिकल आयटम नंबर्स...

helen in piya tu.jpg
'पिया तू अब तो आजा, शोला सा मन बहके....' (कारवाँ)

Helan in 3ri manjhil.jpg
'तिसरी मंझिल' चित्रपटातील 'ओ हसिना जुल्फोवाली जानेजहाँ...' हे गाणं 'रॉक अ‍ॅन्ड रोल' या संगीत प्रकारावर आधारलेलं होतं आणि ते प्रचंड गाजलं. या व्यतिरिक्त 'शोले' चित्रपटातलं "मेहबूबा मेहबूबा..." 'इन्तेकाम' मधलं "आ जानेजा..."'दिल अपना और प्रीत पराई' मधलं "ऊंई$$$ इतनी बडी मेहफिल...." हे गाणं विशेष गाजलं नाही, पण माझ्या प्रचंड आवडीचं. and the last but not the least... 'डॉन' मधलं evergreen "ये मेरा दिल, प्यार का दिवाना..."

हेलनने चित्रपटात आयटम सॉन्गच्या ट्रेन्डचा झेंडा त्याकाळी फडकवला आणि आज ही तो कायम आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्र्या सुद्धा अजूनही तिची गाजलेली गाणी व त्यावरचे डान्स हे इंटरनॅशनल स्टेज शोज मध्ये सादर करतात. हेलनच्या विग पासून ते हेवा वाटावा अश्या तिच्या वॉर्डरोबपर्यंत सर्व काही अत्यंत प्रभावी होतं आणि त्याचा प्रभाव आजही चित्रपटसृष्टीवर आणि तिच्या चाहत्यांवर आहे.

एवार्डस -
१९७९ - फिल्मफेअर बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस - लहू के दो रंग
१९९८ - फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट एवॉर्ड.
२००९ - पद्मश्री सन्मान.

*********************************************
तळटिप : सर्व माहीती व फोटोग्राफ्स पुस्तक आणि आंतरजालावरून साभार.
*********************************************

विषय: 

नव्या डॉनमधले करिनाचे 'ये मेरा दिल' हेलनच्या ओरिजिनल कामाच्या जवळही जात नाही >> खरंच रे! Sad करिना काय धबाधबा नाचलिये त्या गाण्यात... Sad

हेलनला आजवर पडद्यावर पाहिली होती. आज वाचताही आली. तिच्याबद्दलच्या बर्‍याच गोष्टींची माहीती झाली.
दक्षे, छान लेख. Happy

पटेश.

मादक आणि उत्तान यातली सीमारेखा जाणून घ्यायची असेल तर हेलनचा कुठलाही नृत्याविष्कार पहावा.

थॅन्क्स डक्षे

मस्त हेलन, आणि तिच्यावर लेख लिहावा असं वाटून तू तसे केल्यामुळे तू पण भन्नाट Happy
ही सगळी गाणी आणि तिची तरूणपणीची कारकिर्द अद्भुत असली तरी म्हातारी झाल्यावर सुद्धा तिने जे काय हाताच्या बोटावर मोजण्यासारखे रोल केले त्यात ती इतकी म्हणजे इतकी गोड आजी बनलीये की बासच!.. असं वाटतच नाही की हीच ती 'पिया तू' वाली हेलन..
उदाहरणार्थ संजय लीला भन्साळीच्याच २ पिक्चर्स मधे तिने आईचे रोल केले आहेत...
१. खामोशी--द म्युझिकल मधे नाना पाटेकर ची आई आणि मनिषा कोईराला ची आजी
२. हम दिल दे चुके सनम मधे सलमान ची आई

helen.jpg

शांतता, खून झाला आहे, याही मराठी चित्रपटात हेलन नाचली आहे.
मुकाबला हमसे ना करो, या प्रिंस मधल्या गाण्यात (लता, आशा, रफी ) ती वैजयंतीमाला बरोबर नाचलीय. त्यात तिने पाश्चात्य पद्धतीचे अनेक नृत्यप्रकार केलेत.
डॉ विद्या सिनेमात पण दोघींची जुगलबंदी आहे. हि दोन्ही गाणी यू ट्यूबवर आहेत.

दक्स!!! लई भारी लेख!! अभ्यासपूर्ण, आणि प्रतिक्रियाही सुंदरच आल्यात!!! Happy

अरे व्वा! पुन्हा एकदा मस्त लिखाण. पहिला फोटो तर खासच. आवडता कलावंत आणि समर्पक शब्दांत माहितीची मांडणी. तु तर एकदम मेजवान्याच द्यायला सुरुवात केलीस की... लगे रहो दक्षिणाबेन! आणखी कोणकोण आहे गुलदस्त्यात? फर्माईशी घेणार असशील तर मलाही काही नावे सुचवायची आहेत..

प्रयोग, तुझी पोस्ट खूप आवडली... तु ही अनोखी माहिती दिलिस एकदम..

सई बै, तुमच्या समोर आम्ही पामरच की हो.. Happy तुम्ही पण झाडा जरा तुमची लेखणी... Happy
गुलदसत्यात कोण आहे ते मलाही नाही माहिती.... हात घातला की निघेल ते निघेल... Happy

दक्षा बाय मस्त लिवलस गो. एवढो अभ्यास करतस तरी कधी. Happy
हेलनची ईतकी माहिती आज समजली. बरं पुढं कोण??? Happy

दक्षिणा, मस्त जमलाय लेख. तो सुरुवातीचा फोटोही सह्ही आहे.

हेलनचे नाव जरी उच्चारले तरी आजच्या साठी-सत्तरीच्या घरातील तरुण तुर्कांच्या तोंडून स्स्स्स निघतो. माझे वडील, काका, त्यांचे सखे-स्नेही इत्यादी मंडळी हेलनची फॅन. तिचे नाव काढले तरी छातीवर हात ठेवून काळजातून कळ गेल्याचा आविर्भाव करणारे!! एवढेच काय, तर काकवा, मावश्या, आई व त्यांच्या समस्त मैत्रिणी वगैरेही हेलनचा डान्स म्हटला की डोळे भरून पहाणार्‍या. ''काय नाचते ना...'', ''कसलं लवलवतं अंग हिचं.....'', ''अरे त्या आजकालच्या हिरविणींना कोणी तरी हिच्याकडे नाच शिकायला पाठवा रे.... तिच्या पायाच्या धुळीचीही सर नाही त्यांना!'' अशा स्टाईलचे डायलॉग्ज हे हेलनचा कोणताही नाच पहाताना ठरलेले! मला कायम हेलनचा नाच आवडत आलाय. तिने ''हम दिले दे चुके'' आणि ''खामोशी'' त केलेला अभिनय तर उत्कृष्टच!
ज्या डेअरिंगने ती इतके तोकडे कपडे घालूनही कोठेही उच्छृंखल न भासता पडद्यावर वावरायची, नाचायची ती तिची अदाकारी केवळ लाजवाब! आणि इतर अभिनेत्रींना अजिबात शोभून न दिसणारे कपडे हेलनचे सौंदर्य अजूनच खुलवायचे.

दक्षे, मस्त लेख.
कितीतरी नवीन माहिती कळली.

दिनेशदा,
तुम्ही कुठल्या कुठल्या विषयांवत पी.एच.डी केलीयेत?? Uhoh निसर्ग (झाडं, फुलं, पक्षी इ.इ.), नट-नट्या!!!........... Wink

'आंखे खुली हो या हो बंद..." या मोहोब्बते मधल्या गाण्याच्या शेवटी शाहरुख बरोबर पण डान्स केलाय ना तिने एक??

लेख आवडला नी तिचे सगळे फोटोही खास. पहिलाच अप्रतिम.

हल्लीच्या सो कॉल्ड हिरवीणी, आयटम गर्ल्स हेलनच्या जवळ जाण्याच्या योग्यतेच्याही नाहीत.

छान लेख. (मी आधीच वाचला होता पण तेव्हा लॉग्ड इन नव्हते. म्हणून प्रतिसाद दिला नव्हता. सॉरी हां, दक्षे)

'तीसरी मंझील' जितका गाण्यांसाठी लक्षात राहतो तितकाच त्यातल्या हेलनच्या नृत्यांसाठीही.
मात्र, 'डॉन'च्या गाण्यात तिला बघवत नाही. (हे मा वै म)

दक्षिणा, लेख आवडला...

उल्हासजी, तुमचा प्रतिसाद अधिक आवडला.. Happy

मंदार, कोणी घातल्या शिव्या? आणि कोणाला?>>> मला लेखाबद्दल म्हणायचे नव्हते. पण बर्याच प्रतीसादात बाकीच्या नट्यांना नावे ठेवली होती. असो.. पण V & C नको. Happy

Pages