सुरीली सुरैय्या......

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

"धडकते दिल की तमन्ना हो, मेरा प्यार हो तुम...
मुझे क़रार नही, जबसे बेकरार हो तुम..."

Suraiya1.jpg

विविधभारतीवर सकाळच्या "भुले बिसरे गीत" या कार्यक्रमात ऐकून ऐकून ओळखीचं आणि अत्यंत आवडीचं झालेलं हे गाणं.. एके दिवशी ठरवलं आणि या गाण्याचे तपशील आंतरजालावर शोधलेच.

सुरैय्या... ही गायिका त्या गाण्याची हे कळल्यावर मात्रं आश्चर्यचकित झाले, कारण हे नाव वडिल-काकांकडून लहानपणी बर्‍याचदा ऐकलेलं. काहीही म्हणा पुर्वीची गाणि आणि त्या गाणार्‍या गायिका यांचे आवाज (अगदी लताचा सुद्धा) अगदी एकसारखे वाटतात.. (अजूनसुद्धा) त्यामुळे लता कोणती, सुरैय्या कोणती आणि उमादेवी कोणती यातला फरक मला अजून सुद्धा कधी कधी कळत नाही..

पाकिस्तान लाहोर इथे जन्मलेल्या सुरैय्याने शास्त्रिय संगिताचे धडे घेतले नव्हते तरिही तिच्या कारकिर्दित तिने गायलेल्या अनेक गाण्यांनी खळबळ माजवली होती.
लहानपणी शाळेच्या सुट्टीत सुरैय्या अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात भाग घेत असे. अशाच एका सुट्टीत ती आपले मामा (एम. हुजूर) यांच्याबरोबर सुभाष स्टुडिओ मध्ये शुटिंग पहायला गेली होती. एम. हुजूर हे चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्याचे काम करत असत. तेव्हा सुभाष स्टुडिओ मध्ये 'ताजमहल' चे शुटींग सुरू असताना एका बाल कलाकाराची आवश्यकता होती. दिग्दर्शक नानुभाई वकिल यांनी सुरैय्याचं नाव सुचवलं आणि ते पात्रं तिथे रंगून शॉट ओके सुद्धा झाला..

गायिका म्हणून वर येण्यासाठी सुरैय्याला संगितकार नौशाद यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.. अशाच एका बालगीत कार्यक्रमात गाताना त्यांनी तिचं गाणं ऑल इंडिया रेडिओवर ऐकलं आणि तिच्याकडून आपल्या 'शारदा' या चित्रपटात अभिनेत्री मेहताबसाठी "पंछी जा, पीछे रहा है बचपन मेरा उसको जा के ला.....'' हे गाणं गाऊन घेतलं ... सुरैय्या त्यावेळी अवघी १३ वर्षांची होती, पण तिचा परिपक्व आवाज तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या मेहताबला मात्रं तंतोतंत सूट झाला. असं म्हणतात की हे गाणं रेकॉर्ड करताना सुरैय्याला माईकपर्यंत पोहोचता यावं यासाठी तिच्याकडून हे गाणं खुर्चित उभं करून गाऊन घेतलं गेलं.

१९४३ ते १९४६ च्या दरम्यान सुरैय्याने अनेक चित्रपटांत सहाय्यक अभिनेती म्हणून काम केले... त्यातले विशेष उल्लेखनिय म्हणजे अनमोल घडी, फूल, दर्द इ. पण अभिनेत्री म्हणून पहीली संधी तिला मिळाली ती 'तदबिर' या सिनेमात. सुरैय्याने अनेक गाणी सुद्धा गायली, परंतू के. एल. सहगल यांच्या बरोबरच्या 'परवाना' या चित्रपटातल्या ४ सोलो गाण्यांनी तिची खरी ओळख "गायिका-अभिनेत्री" अशी नव्याने करून दिली..

dev-suraiya.jpg

देव आनंदबरोबरची सुरैय्याची जोडी त्याकाळी भरपूर गाजली. एका चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी बोट उलटण्याच्या दृश्यात देव आनंदने तिचे प्राण वाचवले, दोघं ही एकमेकांच्या प्रेमात पडले व त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला... सुरैय्या तेव्हा प्रस्थापित नायिका होती तर देव आनंद न्यू कमर... पण दोघांचे धर्म निराळे असल्याने सुरैय्याच्या घरून या विवाहाला जबरदस्त विरोध झाला, सुरैय्याच्या आजीने हे नातं जवळ जवळ तोडलंच असं बोललं जातं. एकिकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील इतर अनेक मान्यवर आणि दिग्गज मंडळी सुरैय्याशी लग्नं करण्यास उत्सुक असूनही, दुसरीकडे देव आनंद बरोबरच्या प्रेमभंगानंतर सुरैय्याने कधीही विवाह न करण्याचा निर्णय घेतला... देव आनंदला माहीत होतं की ग्रेगरी पेक हा सुरैय्याचा आदर्श होता, त्याने त्याकाळी स्वत:ला त्याच्या प्रमाणे बनवण्याचा प्रयत्न केला, आणि खूप वाट पाहून अखेर तो कल्पना कार्तिक या अभिनेत्रीशी विवाहबद्ध झाला.. देव आनंद नंतर सुरैय्यावर जीवतोड प्रेम करणार्‍या व्यक्तित 'इफ्तिकार' हे नाव ही त्याकाळी वारंवार घेतलं जायचं असं मी घरातल्या मोठ्यांकडून ऐकलं आहे, खरंखोटं कोण जाणे.. Happy

१९४९- ५० च्या दरम्यान सुरैय्याचे चित्रपट भरपूर गाजले आणि ती सर्वात जास्त मानधन घेणारी नायिका बनली.. प्यार की जीत, बडी बहन, दिल्लगी हे ते चित्रपट.. असं म्हणतात की बॉलिवूडमध्ये तरूण्-तरूणिंच्या हृदयाचा ठेका सर्वात जास्त चुकवणारा अभिनेता म्हणजे राजेश खन्ना, पण त्याच्या तोडीचंच वेड नव तरूणाईमध्ये त्याकाळी सुरैय्यानेही निर्माण केलं होतं.. तिचे चित्रपट पाहता यावेत म्हणून दुकानदार पहिल्या खेळाची तिकिटं काढून आपापली दुकानं बंद ठेऊन चित्रपट पहायला जात असत, त्याचप्रमाणे तिची एक झलक दिसावी यासाठी तिचे चाहते तिच्या मरिन ड्राईव्हच्या घराबाहेर तोबा गर्दी करत असत.

५० च्या दशकातले तिचे बरेचसे चित्रपट आपटले.... पण १९५४ साली तिने मिर्झा गालिब या चित्रपटात केलेली भूमिका खूप गाजली त्याचबरोबर तिने गायलेली गाणि पण.. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिचं कौतुक करताना म्हटलं होतं की ' तुमने मिर्झा गालिब की रूह को जिंदा कर दिया...' दुर्दैवाने ६० व्या दशकात तिचं काम इतकं काही उल्लेखनिय ठरलं नाही. त्यातल्या त्यात तिच्या 'शमा' या चित्रपटातील गाणी गाजली.. (लेखाच्या सुरवातीला लिहिलेलं गाणं, हे शमा चित्रपटातील आहे.) सुरैय्याचा शेवटचा चित्रपट म्हणजे रूस्तम सोहराब...

अशा पद्धतीने एकूण साठएक चित्रपटात काम केल्यानंतर सुरैय्या या गायक अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला. त्यानंतर ती काही माफक चित्रपट पारितोषिक वितरण समारंभाशिवाय कधी कुठे दिसली नाही. तिला दागिन्यांची प्रचंड हौस होती. चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतल्या नंतर बर्‍याचदा ती तिच्याकडील दागिने घालून रात्री झोपत सुद्धा असे. खाण्यात तिला 'बिर्याणी' अत्यंत प्रिय होती..

जानेवारी २००४ मध्ये लांबलेल्या आजारपणामुळे सुरीली सुरैय्या हे जग सोडून गेली...
पण तिची गाणी आजसुद्धा अजरामर आहेत..

Suraiya2.JPG

सुरैय्याची मला आवडलेली गाणी
* धडकते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम..... (शमा)
* जब तुम ही नहीं अपने, दुनिया ही बेगानी है ......(परवाना)
* ओ दूर जाने वाले वादा न भूल जाना.... (प्यार की जीत)
* तेरे नैनों ने चोरी किया, मोरा छोटा सा जिया, परदेसिया.... (प्यार की जीत)
---------------------------------------------------------------
तळटिप : मी वैयक्तिकरित्या सुरैय्याच्या कारकिर्दीत जन्मलेली सुद्धा नव्हते, त्यामुळे वरिल लेखातील सर्व माहीती ही वाचन व आंतरजालावरून साभार..
---------------------------------------------------------------

विषय: 

सुरेख लिहिलंयस गं! अगदी जिव्हाळ्याचा विषय आणि उत्तम मांडणीही. माझ्या कित्तीतरी आठवणी जाग्या झाल्या. रोज सकाळच्या धांदलीतही आई तेव्हा 'पुराने फिल्मों के गीत' (आताच्या 'भुले बिसरे गीत'चे तेव्हाचे शीर्षक) ऐकायसाठी नुसती धडपड करायची आणि आता त्या धडपडीमागची ओढ काय असेल ते कळतंय. जन्मल्यापासून ही कलंदर लोकं कानावर सुरेल गाणी ओततायत आणि त्यातली गोडीही जितकं ऐकू तितकी वाढती आहे. ताररी आररी आररी.., तु मेरा चांद मैं तेरी चांदनी, ये कैसी अजब वगैरे तर मिट्ट गोड गाणी आहेत. जुनी गाणी तुफ्फान आवडणा-या सगळ्या कानसेनांना तू हलवून सोडलंस एकदम. अशीच हलवत रहा!

सगळंच अगदी समर्पक झालंय. तुझी लेखणी कुरूकुरू चालायला लागली आहे, ती पळू दे आता! कासरे सैल सोड तिचे... रार, परेश आणि दिनेश तुमच्या प्रतिसादांन्ना विशेष अनुमोदन..

सुरैय्याच्या एकूण आयुष्याकडे बघता, जे काही तूझ्या लेखातून समजले आणि ती गेल्यानंतर तिच्यावर प्रसिद्ध झालेले लिखाण वाचनात आले, त्यावरून मी असं म्हणेन की ती स्वत:ची पत राखून जगली. आजीचा निर्णय मान्य नसला तरी आजकाल होतात तसले ना तमाशे केले ना आपण घेतलेला निर्णय पुन्हा आयुष्यात कधी बदलला. पुढे कुठेही कधीही याबद्दल शब्दानेही वाच्यता केली नाही. ठाम निष्ठा असल्याशिवाय असं वागणं सोपं नाही. झगमगीत दुनियेत राहूनही पूर्वीचे बरेचसे कलावंत असे इभ्रतीने जगत असत म्हणूनही आपल्याला त्यांच्याबद्दल थोडा अधिक आदर असतो. घरातल्या मोठ्या लोकांकडून त्या काळातल्या प्रेमकहाण्यांचे तपशील ऐकताना असफळ कहाण्यांबद्दल हळहळ आणि सफळ कहाण्यांच्या सुरस गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्या सांगण्यातही या कलावंतांबद्दल वाटत असलेला आपलेपणा निथळत असतो. त्यांची गाणी आवडण्यामागे थोडीशी ही पार्श्वभूमीदेखील असू शकेल असं आपलं मला वाटतं. ही आपुलकी अलिकडच्या डिग्नीटी हरवून बसलेल्या लोकांन्ना नाही मिळणार आपल्याकडून.

रार, ते है, चं लक्षातच आले नव्हते कधी.
त्या काळातल्या बहुतेक गायिकांच्या आवाजाला एक खास वेगळा पोत होता. प्रत्येकीचे गाणे हे तिचेच असायचे.

दक्षीणा खुप छान लिहीलयस.
देवानंदच्या पुस्तकात म्हणजे त्याचे चरीत्र असलेले पुस्तकात सुरैयाची बरीच माहीती आहे. त्यांचे प्रेमप्रकरणही खुप छान लिहीले आहे.

Pages