सुरीली सुरैय्या......

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

"धडकते दिल की तमन्ना हो, मेरा प्यार हो तुम...
मुझे क़रार नही, जबसे बेकरार हो तुम..."

Suraiya1.jpg

विविधभारतीवर सकाळच्या "भुले बिसरे गीत" या कार्यक्रमात ऐकून ऐकून ओळखीचं आणि अत्यंत आवडीचं झालेलं हे गाणं.. एके दिवशी ठरवलं आणि या गाण्याचे तपशील आंतरजालावर शोधलेच.

सुरैय्या... ही गायिका त्या गाण्याची हे कळल्यावर मात्रं आश्चर्यचकित झाले, कारण हे नाव वडिल-काकांकडून लहानपणी बर्‍याचदा ऐकलेलं. काहीही म्हणा पुर्वीची गाणि आणि त्या गाणार्‍या गायिका यांचे आवाज (अगदी लताचा सुद्धा) अगदी एकसारखे वाटतात.. (अजूनसुद्धा) त्यामुळे लता कोणती, सुरैय्या कोणती आणि उमादेवी कोणती यातला फरक मला अजून सुद्धा कधी कधी कळत नाही..

पाकिस्तान लाहोर इथे जन्मलेल्या सुरैय्याने शास्त्रिय संगिताचे धडे घेतले नव्हते तरिही तिच्या कारकिर्दित तिने गायलेल्या अनेक गाण्यांनी खळबळ माजवली होती.
लहानपणी शाळेच्या सुट्टीत सुरैय्या अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात भाग घेत असे. अशाच एका सुट्टीत ती आपले मामा (एम. हुजूर) यांच्याबरोबर सुभाष स्टुडिओ मध्ये शुटिंग पहायला गेली होती. एम. हुजूर हे चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्याचे काम करत असत. तेव्हा सुभाष स्टुडिओ मध्ये 'ताजमहल' चे शुटींग सुरू असताना एका बाल कलाकाराची आवश्यकता होती. दिग्दर्शक नानुभाई वकिल यांनी सुरैय्याचं नाव सुचवलं आणि ते पात्रं तिथे रंगून शॉट ओके सुद्धा झाला..

गायिका म्हणून वर येण्यासाठी सुरैय्याला संगितकार नौशाद यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.. अशाच एका बालगीत कार्यक्रमात गाताना त्यांनी तिचं गाणं ऑल इंडिया रेडिओवर ऐकलं आणि तिच्याकडून आपल्या 'शारदा' या चित्रपटात अभिनेत्री मेहताबसाठी "पंछी जा, पीछे रहा है बचपन मेरा उसको जा के ला.....'' हे गाणं गाऊन घेतलं ... सुरैय्या त्यावेळी अवघी १३ वर्षांची होती, पण तिचा परिपक्व आवाज तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या मेहताबला मात्रं तंतोतंत सूट झाला. असं म्हणतात की हे गाणं रेकॉर्ड करताना सुरैय्याला माईकपर्यंत पोहोचता यावं यासाठी तिच्याकडून हे गाणं खुर्चित उभं करून गाऊन घेतलं गेलं.

१९४३ ते १९४६ च्या दरम्यान सुरैय्याने अनेक चित्रपटांत सहाय्यक अभिनेती म्हणून काम केले... त्यातले विशेष उल्लेखनिय म्हणजे अनमोल घडी, फूल, दर्द इ. पण अभिनेत्री म्हणून पहीली संधी तिला मिळाली ती 'तदबिर' या सिनेमात. सुरैय्याने अनेक गाणी सुद्धा गायली, परंतू के. एल. सहगल यांच्या बरोबरच्या 'परवाना' या चित्रपटातल्या ४ सोलो गाण्यांनी तिची खरी ओळख "गायिका-अभिनेत्री" अशी नव्याने करून दिली..

dev-suraiya.jpg

देव आनंदबरोबरची सुरैय्याची जोडी त्याकाळी भरपूर गाजली. एका चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी बोट उलटण्याच्या दृश्यात देव आनंदने तिचे प्राण वाचवले, दोघं ही एकमेकांच्या प्रेमात पडले व त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला... सुरैय्या तेव्हा प्रस्थापित नायिका होती तर देव आनंद न्यू कमर... पण दोघांचे धर्म निराळे असल्याने सुरैय्याच्या घरून या विवाहाला जबरदस्त विरोध झाला, सुरैय्याच्या आजीने हे नातं जवळ जवळ तोडलंच असं बोललं जातं. एकिकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील इतर अनेक मान्यवर आणि दिग्गज मंडळी सुरैय्याशी लग्नं करण्यास उत्सुक असूनही, दुसरीकडे देव आनंद बरोबरच्या प्रेमभंगानंतर सुरैय्याने कधीही विवाह न करण्याचा निर्णय घेतला... देव आनंदला माहीत होतं की ग्रेगरी पेक हा सुरैय्याचा आदर्श होता, त्याने त्याकाळी स्वत:ला त्याच्या प्रमाणे बनवण्याचा प्रयत्न केला, आणि खूप वाट पाहून अखेर तो कल्पना कार्तिक या अभिनेत्रीशी विवाहबद्ध झाला.. देव आनंद नंतर सुरैय्यावर जीवतोड प्रेम करणार्‍या व्यक्तित 'इफ्तिकार' हे नाव ही त्याकाळी वारंवार घेतलं जायचं असं मी घरातल्या मोठ्यांकडून ऐकलं आहे, खरंखोटं कोण जाणे.. Happy

१९४९- ५० च्या दरम्यान सुरैय्याचे चित्रपट भरपूर गाजले आणि ती सर्वात जास्त मानधन घेणारी नायिका बनली.. प्यार की जीत, बडी बहन, दिल्लगी हे ते चित्रपट.. असं म्हणतात की बॉलिवूडमध्ये तरूण्-तरूणिंच्या हृदयाचा ठेका सर्वात जास्त चुकवणारा अभिनेता म्हणजे राजेश खन्ना, पण त्याच्या तोडीचंच वेड नव तरूणाईमध्ये त्याकाळी सुरैय्यानेही निर्माण केलं होतं.. तिचे चित्रपट पाहता यावेत म्हणून दुकानदार पहिल्या खेळाची तिकिटं काढून आपापली दुकानं बंद ठेऊन चित्रपट पहायला जात असत, त्याचप्रमाणे तिची एक झलक दिसावी यासाठी तिचे चाहते तिच्या मरिन ड्राईव्हच्या घराबाहेर तोबा गर्दी करत असत.

५० च्या दशकातले तिचे बरेचसे चित्रपट आपटले.... पण १९५४ साली तिने मिर्झा गालिब या चित्रपटात केलेली भूमिका खूप गाजली त्याचबरोबर तिने गायलेली गाणि पण.. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिचं कौतुक करताना म्हटलं होतं की ' तुमने मिर्झा गालिब की रूह को जिंदा कर दिया...' दुर्दैवाने ६० व्या दशकात तिचं काम इतकं काही उल्लेखनिय ठरलं नाही. त्यातल्या त्यात तिच्या 'शमा' या चित्रपटातील गाणी गाजली.. (लेखाच्या सुरवातीला लिहिलेलं गाणं, हे शमा चित्रपटातील आहे.) सुरैय्याचा शेवटचा चित्रपट म्हणजे रूस्तम सोहराब...

अशा पद्धतीने एकूण साठएक चित्रपटात काम केल्यानंतर सुरैय्या या गायक अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला. त्यानंतर ती काही माफक चित्रपट पारितोषिक वितरण समारंभाशिवाय कधी कुठे दिसली नाही. तिला दागिन्यांची प्रचंड हौस होती. चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतल्या नंतर बर्‍याचदा ती तिच्याकडील दागिने घालून रात्री झोपत सुद्धा असे. खाण्यात तिला 'बिर्याणी' अत्यंत प्रिय होती..

जानेवारी २००४ मध्ये लांबलेल्या आजारपणामुळे सुरीली सुरैय्या हे जग सोडून गेली...
पण तिची गाणी आजसुद्धा अजरामर आहेत..

Suraiya2.JPG

सुरैय्याची मला आवडलेली गाणी
* धडकते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम..... (शमा)
* जब तुम ही नहीं अपने, दुनिया ही बेगानी है ......(परवाना)
* ओ दूर जाने वाले वादा न भूल जाना.... (प्यार की जीत)
* तेरे नैनों ने चोरी किया, मोरा छोटा सा जिया, परदेसिया.... (प्यार की जीत)
---------------------------------------------------------------
तळटिप : मी वैयक्तिकरित्या सुरैय्याच्या कारकिर्दीत जन्मलेली सुद्धा नव्हते, त्यामुळे वरिल लेखातील सर्व माहीती ही वाचन व आंतरजालावरून साभार..
---------------------------------------------------------------

विषय: 

दक्षिणा, अगदी ताबडतोब तूला जिथे शक्य असेल तिथे जाऊन ईप्रसारण या वेबसाईटवरचा तिच्या गाण्यावरचा कार्यक्रम ऐक. (तो रविवारपर्यंतच ऐकता येईल)
तिची बरीच गाणी आहेत.
ये कैसी अजब दास्ताँ हो गयी है (रुस्तम सोहराब), नुक्तची है गमे दिल, आह को चाहिये, ये न थी हमारी किस्मत (मिर्झा गालिब) आ रा री आ रा री असे मस्त गाणे, मुकेश बरोबर (दास्तान , जूना )
अवश्य ऐक. बावरे नैन मधे तिने गीता बालीला प्लेबॅक दिला होता (खयालोंमे किसीके )
बंद ना हो किसीकी मोटर कार रस्ते मे... हे गाणे कुठे मिळाले तर किंवा फर्माईश करुनही ऐकच.

छान लिहीलंय आणि फोटो आणि गाणीही छान (सगळी माहीत नाहीत). मी स्वतः तिचा एखाददुसराच चित्रपट पाहिला असेल तोही आता आठवत नाही. गाणी लहानपणी रंगोली, चित्रहार वगैरे प्रोग्रॅम्स मधे पाहिलेली. पण मोठ्यांकडून तिचं नाव ज्या पद्धतीनं घेतलं जातं त्यावरून तिचा प्रभाव कळतो.

कालच माझ्य सर्वात फेवरेट अभिनेत्रीचा इतिहास वाचला ती म्हणजे "मुमताज उर्फ मधुबाला". आणि तिच्या त्या छोट्याश्या जीवनचरित्रात "सुरेय्या"चा उल्लेख होता. आणि आज चक्क तिच्याबद्दल लेख वाचायला मिळाला.. Happy अहोभाग्यम.. Happy
दक्षे, छान लेख आणि अगदी समर्पक फोटोज.. Happy

सुरैया : शेवटची गायिका अभिनेत्री.
बंद ना हो किसीकी मोटर भूल बिसरे गीत मध्ये लागते. पण प्रयत्न करूनही गायिकेचे नाव ऐकता आले नव्हते. आश्चर्याचा धक्का. रच्याकने बावरे नैन मधली गीताबालीची गाणी राजकुमारीच्या आवाजात आहेत ना(सुन बैरी बलम)? खयालो में गीता दत्त हे गीता बालीवर चित्रित झालेले नाही बहुधा.
तिने सादर केलेली जयमाला ऐकली होती. आणि तिच्याबद्दलचे अनेक लेखही वाचले.
ती ग्रेगरी पेकची फॅन होती. आणि तो तिला भेटायला तिच्या घरी आला होता.
तिचा शेवट/मृत्यू मात्र अत्यंत भयानक परिस्थितीत झाला.
सौंदर्य हे कायम शापितच असते का?

भरत,
बंद ना हो मोटर कार, अजून ऐकवतात ? मी ते एकदाच ऐकलय.
आणि अजून विसरु शकलो नाही. एकदम वेगळ्याच शैलीत गायलय ते.
बावरे नैन मधे बरीच गाणी होती. खयालोंमे बहुतेक सहनायिका
विजयालक्ष्मी (?) वर चित्रीत झालय.
सुरैयाची मिर्झा गालिब मधली गाणी आणि अभिनय, दोन्ही उत्तम होते.
तिचे मनमोर हुवा मतवारा, किसने जादू डारा.. माझे अत्यंत आवडीचे.
बाकी दक्षिणाच्या पिढीला पण तिची गाणी आवडतात, याचा खूप आनंद झाला.

छान झालाय लेख.:)
<<ये न थी हमारी किस्मत हमारी,के विसाल-ए-यार होता (मिर्झा गालिब)>>
ओह, हे गाणं सुरैयाने गायलंय का ! माझं आवडतं गाणं. पण बाकी आगापिछा माहीत नव्हता. धन्स दिनेशदा.

ये न थी हमारी किस्मत, के विसाले यार होता
अगर और जीते रहते, यही इंतजार होता

तेरे वादे पे जिये हम, तो ये जान झुठ जाना
के खुषी से मर न जाते, अगर ऐतिबार होता

कोई मेरे दिलसे पुछे, तेरे तीरे नीमकश को
ये खलीश कहाँसे होती, जो जिगर के पार होता

हुए हम जो मरके रुसवा, हुए क्यू न गर्के दरिया
न कभी जनाजा उठता, न कोई मजार होता

यातल्या दुसर्‍या शेराचा भावार्थ मला खुपच आवडतो. तू भेटण्याचा वायदा केला होतास, या आशेवर आजवर जगलो असे वाटतेय का ? खोटे आह ते, तूझ्या शब्दांवर जराजरी विश्वास असता, तर तू वायदा केलास, या आनंदानेच मरुन गेलो असतो.

गालिब ची रचना आहे..
मला आठवतेय हि रचना, बेगम अख्तर ने पण गायलीय.

सुरैय्याचा मी एकमेव चित्रपट डीडीवर शाळेत असताना पाहिला होता. तो म्हणजे शम्मा परवाना. त्यात तिचे व शम्मी कपूरचे काम आहे. का कोण जाणे, हा चित्रपट स्मृतीत ठसला. तिच्या आवाजातील गाणीही आवडली होती तेव्हा.'सारे महफिल जो जला' गाणे विशेष करुन! ह्या गायिका अभिनेत्रीची छान ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद दक्षिणा!

दिनेशदा, अगदी अलिकडे मी भुलेबिसरे गीत मधे "कभी ना बिगडे किसीकी मोटर रस्ते मे" हे गीत ऐकले,
फारच सुंदर आणि वेगळ्या प्रकारचे असल्याने चांगलेच लक्षात राहिले. पण ते सुरैय्याचे आहे हे कळाले नव्हते.

दक्षिणा............. सुंदर लेख ... सुरय्याबद्दल बऱ्याच दिवसांनी ऐकतोय/ वाचतोय

दक्षे छान लिहिलयसं , त्या गाण्यांची लिंकपण देता आली तर बघ ना . मी ते बंद ना हो मोटर कार शोधतोय पण सापडत नाहीये.

१.
न तड़पने की इजाज़त है न फ़रियाद की है
घुट के मर जाऊँ ये मर्ज़ी मेरे सैयाद की है

कोई दुनिया में हमारी तरह बर्बाद न हो
दिल तो रोत हो मगर होंठों पे फ़रियाद न हो
दिल तो रोत हो मगर...

दे के इक प्यार भरा दिल मेरी क़िसमत ने कहा
जा तेरे प्यार की दुनिया कभी आबाद न हो
दिल तो रोत हो मगर...

पहले छीना था तुझे अब लेली निशानी तेरी
दुनिया कहती है के दिल में भी तेरी याद न हो
दिल तो रोत हो मगर...

मला आवडलेलं गाणं..

सुरैय्या यांनी गायलेली काही गाणी इथे ऐकता अन वाचता येईल..

१. http://www.kajarekar.com/taxonomy/term/23
२. http://smriti.com/hindi-songs/name-suraiyya#singer

अमितला अनुमोदन, दक्षिणा खूप छान लेख लिहिलास. Happy !

मस्त लेख!!
तळटीपेबद्दल विशेष कौतूक, कारण असं एकदा लिहून टाकले की नंतर लेख डीलीट करुन पळून जायची वेळ येत नाही Proud

आगाऊ Lol

दक्षिणा, खूप सुरेख,सुरीला लेख्..मस्त लिहिलयस..खूप आवडला.. लगेच माझ्याजवळची सुरैय्या ची गाणी पण लावून ठेवलीयेत .. आह्हा..मज्जा येतीये..धन्स Happy

ये कैसी अजब दास्ताँ हो गयी है (रुस्तम सोहराब), नुक्तची है गमे दिल, आह को चाहिये, ये न थी हमारी किस्मत (मिर्झा गालिब) आ रा री आ रा री असे मस्त गाणे, मुकेश बरोबर (दास्तान , जूना )
>>>>>>>>>>>>>>>>
दिनेशदा...... वॉव! किती वर्षांनी आठवली ही गाणी! आमची पिढी पोसली गेलीये या गाण्यांवर! आणि ये ना थी............या गाण्याबद्दल धन्यवाद!
दक्षिणा मस्त लिहिलंस गं!

<<देव आनंदला माहीत होतं की ग्रेगरी पेक हा सुरैय्याचा आदर्श होता, त्याने त्याकाळी स्वत:ला त्याच्या प्रमाणे बनवण्याचा प्रयत्न केला >> खूप नंतर एकदा ग्रेगरी पेक भारतात आला असताना देव आनंद त्याला घेऊन अचानक सुरैयाकडे गेला व तीला अनंदाश्चर्याचा धक्का दिला, असं निश्चित वाचल्याचं आठवतं !
आवाजातील गोडव्यामुळे तिची गाणी खूप लोकप्रिय झाली तरीही तिने आपण मोठ्या गायिका आहोत अशी बढाई कधीही मारली नाही.

रुस्तम सोहराब मधली ४ ही गाणी अप्रतिम होती
मौदन दरा, मौदन दरा (तलत मेहमूद)
फिर तूम्हारी याद आयी ए सनम (मन्ना डे , रफी)
ए दिलरुबा नजरे मिला, रहने ना दे कोई गिला (लता, अत्यंत अवघड चाल)
आणि ये कैसी अजब (सुरैया )
हि चारही गाणी, कुठेही मिळाली तरी ऐकाच.
(आणि कुणाला मोटर कार चे गाणे कुठे मिळाले तर मला कळवा.)

सुरैया ने गाण्याचे रितसर प्रशिक्षण घेतले नव्हते, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

सुंदर माहिती !

पण ते , " काहीही म्हणा पुर्वीची गाणि आणि त्या गाणार्‍या गायिका यांचे आवाज (अगदी लताचा सुद्धा) अगदी एकसारखे वाटतात.. (अजूनसुद्धा) त्यामुळे लता कोणती, सुरैय्या कोणती आणि उमादेवी कोणती यातला फरक मला अजून सुद्धा कधी कधी कळत नाही.. " हे काही पटल नाही बुवा .

सुरैय्या, उमा देवी, शमशाद बेगम, काननदेवी, राजकुमारी, मुबारक बेगम , नुर जहॉं प्रत्येकीच्या आवाजाची जातकुळी वेगळी होती. काही पुरुष गायकांमधे मात्र एकसुरीपणा होता हे मान्य. सुरेन्द्र , मुकेश आणि किशोर (सुरुवातीच्या काळात) हे तर सेहगल सारखच गायचा प्रयत्न करत. लताचं नाव एव्हड्यासाठीच घेतल नाही कारण तिचा आवाज झोपेतुन उठवलं असलं तरी ओळखु शकतो. कदाचित एक गोष्ट असु शकेल की, त्या काळात वेगवेगळे ट्रॅक आणि नंतर मिक्सिंग हा प्रकार नव्हता तसच रेकॉर्डिंग टेक्निक्सच्या मर्यादांमुळे ठरावीक पद्धतिने गावं लागत असे ( एका पर्टिक्युलर रेंजच्या बाहेर आवाज गेला तर ताटली ( तबकडी Proud ) खराब होणे ई ई . असो.

लेखाचं संकलन छानच झालय. ही गाणी आपल्या पिढीने आकाशवाणीवरच ऐकली. ह्या आणि अश्या अनेक गाण्यांनी गेल्या ४-५ पिढ्यांच्या भावना व्यक्त केल्या. अनेक कातर संध्याकाळी आणि हुरहुर लावणार्‍या रात्रीला ह्याच आवाजांनी आपली सोबत केली. त्या हळुवार वयात हव्याहव्याश्या पण अनोळखी भावनांशी हितगुज साधलं ते ह्याच गाण्यांनी. उत्कट पण अव्यक्त प्रेमातली व्याकुळता , असहायता ह्या गाण्यांनी अचुक टिपली होती . तीही कुठलाही आक्रस्ताळेपणा, कर्कश्यपणा, स्वरांमधे उद्दामपणा न आणता. आणि म्हणुनच इतकी वर्ष झाली तरी त्यातला ताजेपणा टिकुन आहे.

शेवटी वय माणसाला असतं, कलेला किंवा कलावंताला नव्हे !

पर्‍या, मस्त पोस्ट टाकलीस. Happy शेवटची ओळ तर खासच. Happy बर्‍याचदा हि गाणी ऐकताना सगळं काही विसरून एका वेगळ्याच ट्रान्स मधे जातो माणूस.

परेश, उत्तम पोष्ट.
लताचा (हो आणि आशाचाही ) मी झोपेत काय स्वप्नातही ओळखू शकेन.
लताचा आवाज खूप पातळ (?) असल्याने तिला सुरवातीला उपेक्षेला तोंड द्यावे लागले होते. तिने काहि काळ नूरजहाँ ची नक्कल केली, पण मग मात्र स्वतःचा आवाजच जोपासला.

सुरैया चा अभिनय पण उल्लेखनीय होता. मिर्झा गालिब मधली तिची भुमिका बघाच. मी जी वर गाणी लिहिली आहेत, ती तिने पडद्यावर पण उत्तम साकार केली आहेत. (चित्रपटातील भारत भूषण, सुरैया आणि निगार सुलताना च्या भुमिका गुलजारच्या टिव्ही सिरियलमधे अनुक्रमे नासिरुद्दीन शहा, नीना गुप्ता आणि तन्वी आझमी ने केल्या होत्या. मला त्यातले संगीत आवडले नव्हते. )

अगदी अगदी दिनेश. आशाच नाव घ्यायला विसरल्याबद्दल सर्व आशाप्रेमींची बिनशर्त साष्टांग माफी. Proud

आपण बुवा लताभक्त. म्हणजे तिच्या आवाजाचे. बाकी तिने काय राजकारण केलं ई ई शी मला काय करायचय. हे म्हणजे, 'लवासा' प्रकल्प आवडला म्हणजे त्यातल्या गैरप्रकाराला संमती असे नव्हे ! Wink Proud

Pages