पोपटी पार्टी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 November, 2010 - 04:24

पोपटी च्या नावावरुनच पोपटी ह्या पदार्थाच आकलन होत. गावांमध्ये हिवाळ्यात जेंव्हा परीसर हिरवागर - पोपटी झालेला असतो त्या दिवसांतच पोपटी केली जाते. ही पोपटी पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करुन केली जाते. पोपटीचे आयोजन पार्टी, एखादा सण, जागरणाचे दिवस ह्या दिवशी हमखास केले जाते. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत पोपटीचा शेकत शेकत गरमा गरम आस्वाद घेतला जातो.

पोपटी करण्यासाठी लागणार्‍या साहित्या मधले लागणारे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेतात. मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतात.
Popati.jpg

पोपटी ही हिवाळ्यात तयार होणार्या शेंगा, भाज्यांची केली जाते. तसेच आवडीप्रमाणे वांगी, बटाटे, कांदे, शेवग्याच्या शेंगा, नवअलकोल, हल्ली मटण चिकन टाकुनही पोपटी केली जाते.

पोपटी करण्यासाठी लागणार्या शेंगा, कांदे, वांगी आख्खीच धुवुन हेतात बटाटे, नवालकोलला, वांग्यांना धुवुन चिरा पाडतात मग ह्या चिरा पाडलेल्या आलकोल वांग्यांना भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबर, थोड आल, लसूण घालुन केलेल वाटण आणि मिठ, ओवा चोळतात. जर वाटण राहीले असेल तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तरी वेगळी चव येते. मटण किंवा चिकन असेल तर त्यालाही आल, लसुण, मिरची कोथिंबीरीच वाटण चोळतात. जर भाज्या आणि मटण किंवा चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन ठेवतात.

Popati2.jpgPopati3.jpg

पाऊस संपुन हिवाळ्यात जेंव्हा जमीन सुकायला लागते तेंव्हा दवांच्या पाझरावर काही वनस्पती आपला जीव तग धरुन उभ्या असतात. त्याच वनस्पतीतील भांबुर्डा ही वनस्पती उगवते. ही वनस्पती शेतात, बांधावर ओसाडजागी भरपुर आढळते. ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. हया वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो.

हे दोन प्रकारचे भांबुर्डे असतात कदाचित एखाद्याच नाव दुसरही असेल.
popati14.JPGpopati12.JPG

ही छोटी रोपटी असतात ती मुळासकट काढून धुवुन घेतात. रोपटी मोठी असतील तर ह्याचा पाला घेतात. मडक्याच्या तळाला थोडा पाला टाकुन त्यावर भाज्या व केळीच्या पानात बांधलेले मटण किंवा चिकन घालतात. त्यावर पुन्हा भांबुर्ड्याचा भरपुर पाला घालून मडक्याचे तोंड बंद करतात.

Popati1.jpg

आता शिजवण्याची प्रक्रिया करण्यासाठी मोकळी जमिन किंवा रिकाम्य शेतातील भाग निवडण्यात येतो. ही पोपटी पार्टी तिथेच साजरी केली जाते. त्या मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी एक विता एवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणला जातो.

popati11.jpg

त्या खड्ड्यात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकुन त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्यात मडक्याचे तोंड असते.

Popati5.jpg

आता मड्क्याच्या भोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवर्या लावुन त्याला आग लावली जाते.
Popati6.jpg

साधारण अर्धा ते पाऊण तास ही प्रक्रिया चालते. तोपर्यंत पार्टीचे खेळ, गप्पा गोष्टी रंगात येतात. थंडीने कुडकुडणारे आजोबा, लहान मुले ह्या पोपटीच्या शेकोटीच्या जवळ शेक घेतात.

साधारण अर्धा ते पाऊण तास ही शिजण्याची प्रक्रिया चालू ठेवावी लागते.

मग मडक्या भोवतालची आग एका काठीने बाजुला सारुन जाडी काठी खड्ड्यात मडक्याच्या तोंडाजवळ टाकुन मडके सारुन जाड फडक्याने धरुन बाजुला आणतात.
popati7.jpgpopati8.jpgpopati9.jpg

आता सगळ्यांना गोलाकार जमवून एका पेपरवर हे मडके आणून त्यातील वरचा भांबुर्ड्याचा पाला काढला जातो. मग आतील शिजलेल्या भाज्या आणि जर मटण किंवा चिकन टाकले असेल ते काठीने किंवा घरातील पळीने पेपरवर काढून मग सगळ्यांना वाढण्यात येते.
popati10.jpg

ह्या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट वास व चव असते. हा पुर्णपणे भाजलेला प्रकार आहे. तेल व पाणी न वापरता. भाजल्यामुळे ही पोपटी पचायलाही हलकी असते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नमस्कार माबोकर्स. ही पोपटीची रेसिपी टाकली होती तेव्हा मायबोलीची पहिली पोपटी झाली होती. बरोबर ना? अजून सुलभ होण्यासाठी मी यु ट्युबवर तयार केलेला हा व्हिडिओ पहा. आवडल्यास जरुर कमेंट करा, शेयर करा आणि अजून चॅनेल सब्सक्राईब केला नसेल तर नक्की करा हे एक जुनी मायबोलीकर म्हणुन हक्काने सांगते.
https://youtu.be/gwi4Nm-82fA

Pages