भारतीय लोकशाही प्रगल्भ होईल काय?

Submitted by अस्मादिक on 18 November, 2010 - 12:59

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण दिवस निर्जला उपवास करून पुढील २-३ दिवस हा लेख मी लिहीत होतो...

अनेक वकूब असलेले, प्रामाणिक आणि संवेदनशील तरूण आज आपल्याकडे आहेत, जे हवे त्याप्रमाणात समाजासमोर येऊ शकत नाहीत हे समाजाचं नुकसान आहे असं मी म्हणेन! परंतु असे अनेक आपल्याकडे आहेत एवढीच जमेची बाजू आपण पाहू. ताजवर जमलेला जनसमुदाय याचीच साक्ष देतो, अगदी तिथे जमलेल्यांतही नक्कीच काही असे अपेक्षित काबिल तरूण असतील, सगळाच "मॉब" होता असं म्हणणं जरा धाडसाचं होईल! काल तिथे एक "बॅनर" झळकला - सिंहांच्या देशावर गाढवं राज्य करतात! थोडक्यात काय तर "अभी बहुत जान है इन हाथोंमे... हांऽऽ !" मग पोपट कुठे होतो? उत्तर शोधायला हवं, कृती करायला हवी! काय करायचं? खूप राग येतो, जीवाचा संताप होतो पण परिस्थिती काही बदलत नाही! कळते पण वळत नाही... कारण वळवायचे कसे हे सुचत नाही! पाय उचलला जात नाही म्हणून पांगुळगाडा चाललाय! दुसरं काय?

माझ्या मते कोणतीही "व्यक्ती" (जी काही व्यक्त करू शकते ती!) किंवा व्यक्तिंचा समूह - देश यांचा खरा उत्कर्ष होण्याचे तीन स्तर आहेत : पहिला - त्या व्यक्तिला नैसर्गिक ऊर्मीतून आलेले स्वत:च्या क्षमतेचे आणि उत्कर्षाचे भान, त्यासाठी मनाचा निर्धार व कठोर परिश्रम यातून होणारा उत्कर्ष, दुसरा - कुणा सुहृदाकडून त्याव्यक्तीत असलेल्या क्षमतेची जाणीव करून दिल्याने होणारा उत्कर्ष आणि तिसरा, अपमानांतून झालेली उत्कर्षाची जाणीव!

ब्रिटीश साम्राज्याचा उत्कर्ष असा पहिल्या स्तरात मोडणारा होता परंतु निरंकुशता सदासर्वकाळ टिकू शकत नाही! यातूनच अमेरिकनांना तेथील ब्रिटीश सत्ता ही जेव्हां अपमानकारक वाटू लागली तेंव्हा तिथे स्वातंत्र्याची ठिणगी पडली. म्हणजे अमेरिकेचा उत्कर्षही तिसऱ्या स्तराचा होता! स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अमेरिकेने पुन्हा अशी संधी कुणाला मिळू दिली नाही! अमेरिकेने म्हणजे तेथील "व्यक्त्ती-समूहाने"! त्यांनी स्वातंत्र्याची किंमत जाणली, महत्व ओळखले व शिस्त अंगात बाणविली. "व्यक्त्ती-समूह" म्हणून जी कर्तव्ये होती त्यात कसूर केली नाही, अगदी राज्यकर्त्यांपासून आम जनतेपर्य़ंत! आपलाही उत्कर्ष असाच तिसऱ्या स्तरांत मोडणारा... आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर "व्यक्त्ती-समूह" म्हणून सुरूवात तर चांगली झाली, सारेच देशप्रेमाने भारावलेले होते, कर्तव्ये, त्यागाची जाण होती तोवर काही वर्षे ठीक गेली. आधीच्या पिढीत महान व्यक्तिमत्वे होवून गेली म्हणून पुढची पिढी त्यांचा आदर्श ठेवतेच असे नाही! आणि त्याचीच फ़ळें आतां दिसू लागली आहेत! मुळांत असे आदर्श समोर ठेवून कृती करायची तर मनांतही एक आग असावी लागते, तरच असे आदर्श उपयोगी ठरतात! गेल्या काही दशकांत भ्रष्टाचाराची, सत्तालोलूपतेची जी चटक लागली तोच दहशतवाद सर्वांत घातक ठरतोय! "व्यक्त्ती-समूह" म्हणून जागलेपणांत आपण कमी पडतो आहोत याची जाणिव आपल्याला नाही. राजकारण्यांच्या या दहशतवादासाठी कुणी परका देश जबाबदार असण्याचे कारण नाही! याचा अर्थ आता जे असे हल्ले होत आहेत त्याचे समर्थन कराचये असा होत नाही! जनता आपल्या हातातोंडाची रोजची जुळवणी करण्यात त्रस्त, जे थोडे वरच्या स्तरांतले आहेत ते इमानेइतबारे कर भरतात, उरलेल्या पैशांत स्वत:चा जीव रमवितात! म्हणजे पारतंत्र्यातून आलेले बुद्धिमांद्य जाण्यासाठी अजून किती वाट पाहायची? या साऱ्याचा फ़ायदा राज्यकर्ते न घेते तरच नवल! कारण त्यांनी आपले उत्तरदायित्व नाकारून सामान्य जनतेला लाचखोरीची सवय लावली, त्या सवयीचा गुलाम केले व नंतर प्रतिष्ठाही मिळवून दिली! हमाममें सभी नंगे... कुणी कुणाला हसांयचे? कुणाला पदर घे म्हणून सांगायचे? सर्व काही मॅनेज होवू शकते हा राज्यकर्त्यांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस प्रबळ होवू लागला! आपल्या यंत्रणेतल्या या गोष्टी पाकिस्तानने पुरत्या जोखल्या आहेत. त्याचाच गैरफ़ायदा घेत आता पाकिस्तान "मी नाही त्यातला" म्हणत गम्मत बघत आहे. माझा एक मित्र म्हणत असे - दुसऱ्याच्या अनुभवाने जो शहाणा होतो तो चाणाक्ष, स्वत:च्या चूकांतून जो शिकतो तो हुशार आणि पुन्हा पुन्हा चूकां करून जो सुधारत नाही तो नालायक! आपण - जनता - चाणाक्ष नाही हे तर सिद्ध केलेच आहे, आता काय सिद्ध करायचे आहे? पाकिस्तान '९३ पासून असे हल्ले करित आहे तेंव्हा कुठे २००८ च्या शेवटाला कुठेतरी उद्वेग बाहेर पडायला लागलाय! वाऽ रे जनता! तुम्ही म्हणाल आम्हालाही हे सारे कळते पण आमच्या हातात काय आहे? आहे, सारे काही आहे आणि त्यासाठी कुठल्याही आधुनिक शस्त्रांची आवश्यकता नाही. गरज आहे ती केवळ आत्मनिर्धाराची!

आज राज्याचे किंवा देशाचे नेत्तृत्व आर्थिक गुंतवणूक कशी येईल हा एकच अजेंडा घेवून बसले आहेत! तुम्ही गुंतवणूक करा, आमची जनता आहेच कामं करायला, नफ़ा मिळवा, खूप मोठ्ठे व्हा... आमचं तेव्हढं... बघा म्हणजे झालं! पुढे प्रकल्प चालला काय अन् बारा वाजले काय कुणाला इंटरेस्ट आहे? असे नवनवे गुंतवणूकदार सापडतातच! कुठलीही जबाबदारी नको, अंगी वकूब नको शिवाय बख्खळ पैसा आणि सुस्त जनता! काय कारभार आहे! या लाचखोरीतून जो अमाप पैसा उभा राहतो त्याचं कुठलंही "ऑडीट" नाही, कुणाला उत्तर देणं लागत नाही! यांचा हा "ऑक्सिजन" आधी बंद करा मग बघा कोणकोण निवडणूकीला उभं राहण्यात रस घेतं? कसला आलाय मुस्लिम दहशतवाद अन् हिंदू दहशतवाद? आधी लाचखोरीची दहशत बंद करा! तरच भ्रष्ट शासनयंत्रणेला आळा बसेल!

जाती-व्यवस्थेचा खुळखुळा वाजवला, थोडं चुचकारलं की रडणारं बाळ थोडावेळ गप्पं होतं. थोडी सामाजिक कामे केली - त्यातही पैसा ओढायचाच - की मोठा नेता असल्याचा आव आणता येतो मग निवडणूकीपुरते वातावरण तापविले, विषय शोधले की झालं! पुन्हा नवी विटी नवा राज!

आज याच साऱ्या पोरकटपणाला जनता केवळ वीटलेलीच नाही तर ती राज्यकर्त्यांची घृणाही करू लागली आहे. मतदान कमी होते, तरूण या साऱ्याप्रकाराकडे पाठ फ़िरवितात म्हणून टीका होते. मतदानही न करता तुम्हाला हवे तसे लोकाभिमुख शासन कसे मिळणार असा सवाल केला जातो. पण लोकांची आता पक्की धारणा झाली आहे कि या साऱ्याच राजकारण्यांत उजवे-डावे करणे अवघड होवून बसले आहे. जे काही मतदान होते ते एकतर कुठल्या ना कुठल्या पक्षाचे, जातीचे "कमिटेड वोटर्स" आहेत म्हणून किंवा काही इतर स्थानिक कारणांच्या प्रभावामुळे. म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे काहीतरी कारणाने वातावरण तापवायला मिळतं कां किंवा "प्रस्थापित सरकारविरोधाचा" फ़ायदा उचलता येतो कां याभोवतीच सारं मोहोळ उठतं! काही "कन्स्ट्रक्टिव्ह" करण्याची कुवत नाही, इच्छा तर त्याहून नाही मग जातीपातीचं राजकारण नाही करणार तर काय करणार? १०० कोट जनता, हरतऱ्हेचे प्रश्न... जितके भिजतील, तितकेच कुजतील! कधी काही वर खाली झालं कि तात्पुरती मलमपट्टी करायची पुन्हा आठ दिवसात झिम्मा खेळायला तयार... खाबूगिरीचा धंदा बंद तरी किती दिवस ठेवायचा? शहर, राज्य, देश याच्या उत्कर्षाचा धोरणात्मक विचार करा, प्लानिंग करा मग त्याचे रिझल्ट्स दाखवा...(तेही पैसे न खाता?) कोण करेल हे नस्ते उद्योग? आणि एवढं करून खिशांत काय पडणार? साधी रस्ते बांधणीची सरधोपट कामं करताना यांना उजेड पाडता नाही येत, त्यातही...! आणि चालले शांघाय करायला... शेकडो-हजारो कोटींच्या योजना मंजूर करायच्या नाहीतर कर्जे माफ़ करायची त्याचं पुढे काय होतं तेव्हढं नका विचारू! सगळी "जिरायती शेती"! पिकंच पिक....! शिक्षण, बाहेरच्या जगाची ओळख यासाऱ्यामुळे तरूणांना यासाऱ्या गोष्टींत काही रस वाटत नाही. मतदान करायला जायचं म्हणजे या नाहीतर त्या धोंड्याला शेंदूर लावून यायचं! राजकीय पक्षांची आपापसातील चिखलफ़ेक आतां एकमेकांच्या "व्होटबॅंके"वर दहशतीहल्ले करण्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे! यातून मतदानासाठी काही सहानुभूती मिळते कां हे चाचपून बघायलाही यांना लाज वाटेनाशी झाली आहे. मग यांना आमचे राज्यकर्ते कां म्हणायचे आणि का द्यायचं आमचं आयुष्य यांच्या हाती?

तिसऱ्या स्तराचा उत्कर्ष ठरून जे स्वातंत्र्य मिळाले त्यालाही न्याय देता नाही आला तर पुन्हा असे काही तरी अपमानकारक घडावे लागेल ज्याचा धक्का बसून उत्कर्षाचा संघर्ष पुन्हा नव्याने उभारावा लागेल! असे धक्के आता आपल्याला वरचेचर बसत आहेत आणि बसत राहाणार जोवर आपण जागे होत नाही! जागे झालो, संघर्ष केला तर सुंदर नवे जग दिसेल नाहीतर विनाश ठरलेला आहे. मग त्याला कारण पाकिस्तानचा सशस्त्र दहशतवाद असो कि आपल्या राजकारण्यांच्या लाचखोरीचा! कोणतीही क्रांती म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून असलेल्या किंवा मिळविलेल्या उत्कर्षाच्या संधीकडे काणाडोळा करित चुकीच्या पद्धतीने सत्ता राबवून झालेल्या अन्यायाला वाचा फ़ोडणे आणि तो दूर करणे! जर हातातील सत्तेचा विवेकाने, दूरदृष्टीने सर्वंकश विकासासाठी उपयोग केला तर कोणत्याही क्रांतीची गरजच पडणार नाही! सत्तेच्या दुरूपयोगाने होणाऱ्या जाचाचा कडेलोट होतो तेंव्हाच काहीतरी बदल घडतो. असे दुष्परिणाम दिसायला काळ जावा लागतो आणि आपल्या बाबतीत तो मोठा काळ आपण पूर्ण केला आहे असे म्हणावे लागेल! स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा भारतीय जनतेकडे आवश्यक ते शहाणपण निश्चितच होते परंतु नंतरच्या काळात जनतेचा बुद्धिभेद करण्यात राजकारणी यशस्वी झाले. लायकी असो वा नसो पैसा महत्त्वाचा हे गळी उतरविले गेले आणि तेही राजकारण्यांच्या स्वत:च्या सोयीसाठी! स्वत:ला नामानिराळे राहता यावे म्हणून सर्व यंत्रणेला दाव्याला बांधण्यात आले! आधीच गरीब राष्ट्र, शिक्षणाची वानवा त्यामुळे पैशाची भुरळ घालणे सोपे झाले. एकीकडे शिक्षणात प्रगती होत होती तरी लागलेल्या लाचखोरीच्या घाणेरड्या सवयी काही जात नव्हत्या! समृद्धी म्हणजे युरोप-अमेरिका, त्यांच्याच तोंडाकडे आशाळभूतपणे पाहायचं आणि त्यांच्याकडून जे मिळेल त्याला "य़श" म्हणायचं! आजही आय्.टी.त आम्ही स्वत:ला ग्रेट समजतो - आहोतही पण शेवटी "त्यांच्याच" आऊटसोर्सिंगच्या दाव्याला बांधलेले! या क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या मानसिकतेची ही गत, तर हुशार असूनही त्यात काम करणाऱ्यांची काय वेगळी कथा? आम्हाला राष्ट्र म्हणून स्वत:चे काही अस्तित्व असू शकते, स्वत:चा कणा असू शकतो याचे अजूनही भान आलेले नाही. "ब्रेन ड्रेन" च्या नावाने गळे काढायचे पण त्यासाठी पोषक असे इथे काही करायचे नाही! डॉ. माशेलकर म्हणतात - भारत ही बुद्धीमंतांची भूमी आहे पण अमेरिका ही संधींची आणि हेच आपल्या उत्कर्षाला घातक आहे - जाणिव करून देणारी महान व्यक्तिमत्वं आहेत परंतु अंमलात आणायला राजकीय इच्छाशक्तीचं काय? पुन्हा फ़िरून तिच कथा! लाचखोरीपलिकडंचं यांना काही दिसतच नाही! घराणेशाहीच्या नावाने डरकाळ्या फ़ोडणारे स्वत:च्या पश्चात राजकीय वाटमारी करून कमावलेल्या गडगंज संपत्तीचं काय करायचं याचा प्रश्न पडतो तेंव्हा मात्र डोळे मिटून मांजरीचे रूप घेतात! वाघाच्या बछड्याचा आव आणायचा पण डोळा मात्र बोक्यासारखा लोण्याच्या गोळ्यावर! कोणा एकाला का बोल लावा... सारेच एका माळेचे मणी! कोणताही मोठा उद्योग उभारताना जशी आर्थिक गुंतवणूक होते आणि पुढे त्याची सूत्रे त्याच घराण्याकडे राहतात तसेच राजकारणाचे करून ठेवले आहे! मग तुमच्या सारासार विवेकाला विचारतो कोण? चुकीच्या मार्गाने हडप केलेला लोकांचा पैसा टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी "लोकांचे सेवक" बनून राहावेच लागणार! सत्ता आहे तोवर झाकली मूठ...

अमेरिकेत ओबामा निवडून आले म्हटल्यावर आपल्याकडेही असा बदल हवा अशी आशा आमच्या तरूणाईत निर्माण झाली. भारतात कोण ओबामाचा अवतार होईल म्हणून एसेमेस फ़िरू लागले! काय आकाशातून पडणार आहे? पण प्रश्नाच्या मुळाशी जाणार कोण? त्यासाठी कष्ट कोण करणार आणि काही त्याग करावा लागलाच अगदी सवयींचा का असेना तो कोण करणार? एका करांगुलीवर गोवर्धन उचलणारा श्रीकृष्ण अवतार घेईल म्हणून युगानुयुगे वाट पाहण्याची आमची तयारी असते पण एकत्र येऊन आपापला हातभार लावला तर तो गोवर्धन आजच उचलता येईल त्यासाठी युगानुयुगे वाट पाहावी नाही लागणार हे कधी ध्यानात घेणार? ज्यांचे स्वार्थ सत्तेत अडकले आहेत त्यांनी डोळ्यावर कातडे ओढून घेणे स्वाभाविक आहे पण ज्यांच्या नावाने राज्यकारभार केला जातो त्यांच्यातील अनेकांचे हात खरे तर अडकलेले नाहीत हे कळायला कोणता "मंगळवार" उगवायला हवा आहे? म्हणजेच ज्या लाचखोरीच्या खांबांवर यांच्या सत्तेचा डोलारा उभा आहे ते रसद पुरविणारे खांब आपलेच आहेत "त्यांचे" नाहीत! स्वार्थाच्या सोयीचे घोडे रथाला जोडून सफ़रीचा आनंद ते घेत आहेत, हे घोडे उधळले तर घोड्यांना काही काळ वाटेल आपल्याला "मालक" नाही म्हणून, पण खरंच गरज आहे अशा मालकांची?

जातीपातींच्या पलिकडे झेप घेणारी, कोणत्याही नेत्तृत्वाला त्याच्या वारसाकडे उत्तरदायित्व न सोपविता येणारी अशा एक ना अनेक आपल्या घटनेतील रिकाम्या जागा सर्वंकश उत्कर्षासाठी भरून काढण्याची जबाबदारी आपल्यावर असेल! व्यापक दृष्टीकोन घेऊन एक नवी समाजव्यवस्था जन्माला घालताना भविष्यात कोणाला क्रांतीची गरजच भासणार नाही असा मानवतेला सलाम करणारा राजमार्ग आपण आता बांधणे ही काळाची गरज आहे! फ़ारच आशावादी चित्र रंगवलं आहे असं वाटलं तरी तिच खरी गरज आहे. नाहीतर जन्माला येऊ घातलेली क्रांती आपल्या सर्वांना "वेताळा" सारखं म्हणेल - तू झोपलास... मी निघाले...

आपल्या अनेकांसारखाच मलाही या साऱ्याचा त्रास झाला, होतोय! मी माझ्यापुरता ठाम निर्धार केला. आपलं आत्मबळ वाढविण्यासाठी, संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी आणि जे या दहशतवादी हल्ल्यात नाहक बळी गेले त्यांच्या प्रति संवेदना जागविण्यासाठी मी सोमवारी एक दिवस निर्जला उपवास केला. कुणालाही लाच देण्यात सहभागी होणार नाही हा निर्धार केला. त्रास होईल, होणारच! अंधारात थोडावेळ चालायला त्रास होणारच! मी आपणांसर्वांना कळकळीचे आवाहन करित आहे आपणही या कारणांसाठी उपवास करा, स्वत:ला क्लेष झाला कि आपोआपच जाणिव अधिक तीव्र होईल! आपापसांत या निर्धारावर चर्चा करा, निर्धार आणखी पक्का होत जाईल. तो कृतीत आणा. कुणी लाच मागितली तर मुस्कटात भडकावून द्या! तुम्ही म्हणाल हा काय उपाय झाला काय? मग त्यांच्यात आणि आपल्यात फ़रक तो काय? फ़रक असा की त्यांनी या मार्गाचा उपयोग लोकांकडून त्यांचे हक्काचे नसलेले पैसे उकळण्यासाठी केला, आपण तो स्वत:च्या बचावाकरिता वापरू! कै. विजय तेंडुलकरांनीदेखील उद्वेगातून गोळ्या घालण्याचे विधान केले होते हे विसरू नका! असाही वाद होवू शकतो कि हा असा दहशतवादी हल्ला झाला नसता तर तिच भ्रष्टव्यवस्था सुरू राहणार होती ना? रोजच ढेकूण चावल्याने त्याची सवय करून घ्यायला हवी या म्हणण्याला काही अर्थ आहे कां? आणि अशी सवय करून घेतलेलीच पिढी आपण अनुभवली आहे! नवी पिढी नवी दिशा शोधणारच आणि आई-बापालाही ढेकणांचे घर सोडायला लावणार! या रक्तपिपासूंमुळे समाज किती पोखरला जातोय याचा आणखी कोणता विदारक अनुभव येण्याची आपण वाट पाहणार आहोत? आज हेही सहन केले तर उद्या रक्तरंजित क्रांतीला तोंड द्यावे लागेल! त्यापेक्षा वेळीच थोबाड फ़ोडलेले बरे! आम्हाला वरपर्यंत द्यावे लागतात म्हणून निलाजरेपणाने भिक मागणाऱ्यांच्या वाडग्यात थुंकण्याची वेळ आली आहे! "वरखात" मिळण्याऐवजी थोबाड रंगेल का याची भीती त्यांना वाटू द्या! आता ही वेळ निघून गेली तर हे रक्तपिपासू किती निर्ढावतील याचा विचार करा! आज बोचतंय तोवर मलम लावलं पण काटा काढण्याची तयारी दाखविली नाही तर उद्या पाय कापण्याची बला ओढावेल! आपले नेतेही म्हणत असतील संवेदनशील आहेत, हुशार आहेत पण षंढ आहेत लेकाचे, दोन दिवस गलका करतील मग आपलेच राज्य! ये ऐसे हादसे होते रहते है ही "अंजनीसुता"ची मात्रा गिळायला केव्हढा त्रास झाला आपल्याला! या सुतासारख्या सरळ नेत्यानेही ढेकणांच्या संगतीची सवय करून घेतल्याने हा धडा गिरवला असण्याची शक्यता नाकारता येत नाही! ज्यांना "वरखात" मिळते ते गालात हसून दुर्लक्ष करतात आणि ज्यांना ती द्यावी लागते ते ठणाणा बोंबलत फ़िरतात, झालं! कसलं आलंय शासन अन् कसली ही लोकशाही? नव्या पिढीला यातील कोणाही हलकट माणसासोबत जाण्यात रस नाही! हे आपण ओढवून घेतलेले पारतंत्र्य आहे, इतर कोणीही जागं करायला नाही येणार, हे ध्यानात ठेवा! अगदी आताचे सर्व राजकीय पक्ष विसर्जित झाले - नाही ते व्हायलाच पाहिजेत - त्याशिवाय नवी सुधारित व्यवस्था येणार नाही! दारूडा, व्यभिचारी नवरा मेला अन् वैधव्य आलं त्यासाठी कोणी सती जात नाही कि सुतक पाळायची गरज नसते! होय, आताच्या राजकीय व्यवस्थेत जर जनतेच्या हिताचे आणि हक्काचे राज्य जनतेला मिळत नाही तर लोकशाही राजवटीचाच दुसरा पर्यायी मार्ग शोधणे ही आपल्या सर्वांची गरज आहे! नाहीतर लोकशाहीच्या नावाखाली हे नवे सरंजाम, नवाब जनतेचं काय करतील याचा भरवसा नाही! वर म्हटल्याप्रमाणे जे असे अनेक प्रामाणिक, लायक तरूण आपल्याकडे आहेत त्यांनीच आता पुढाकार घेऊन अशा पर्यायी राजकीय व्यवस्थेकरिता मंथन सुरू केलेच पाहिजे! मीही काही पर्यायांचा विचार करून ठेवला आहे, आपला प्रतिसाद मिळाल्यास निश्चितच त्यात हिरीरीने सहभागी होईन! मी आपणांसर्वांसोबत पुन्हा एकदा निर्जला उपवास करण्यास तयार आहे; दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्याचे, खऱ्या लोकशाही राज्याचे बिगुल फ़ुंकले असे मी समजू काय? ब्रिटीशांची शिस्तबद्ध, धूर्त, चाणाक्ष पण अन्यायकारी राजवट निरंकुश चालू शकली नाही तिथे या बाजारबुणग्यांची काय कथा? भय बाळगावे असे काही नाही, फ़क्त जागे व्हा! या लांडग्यांची ज्या क्षणी खात्री पटेल की असा जनक्षोभ आपल्याविरूद्ध खरंच उभा राहत आहे त्याक्षणी यांचा खरा राक्षसी चेहरा समोर येईल, तो जाळा! पाकिस्तानच्या दहशतवादाविरूद्ध या लफ़ंग्यांनी आमचे रक्षण करावे अशी आमची अपेक्षा नाही! नवी समाजव्यवस्था उभारून आम्ही यांना यांची जागा तर दाखवूच, शिवाय पाकिस्तानी दहशतवाद कसा ठेचायचा हेसुद्धा आम्ही लोकशाहीचे खरे पाईक पाहून घेऊ! कारण ते खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य असेल, जनतेला दहशतवाद्यांचे भक्ष बनवून सत्तेचे राजकारण खेळणारी ती लोकशाही नक्कीच नसेल!

माझा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ यात नाही. दोन आण्याच्या सत्तापदापेक्षा रूपया मोलाचा सजग समाज मला जास्त महत्वाचा वाटतो. मी कोण, कसा दिसतो याच्या फ़ंदात पडू नका, तुमच्यातिलच एक आहे, आरशात बघा मीच दिसेन! ही विचारांची आणि कृतीची लढाई आहे स्वत:पासून सुरूवात करा, कोणी नेत्तृत्व करेल याची वाट पाहू नका. आपल्याला हवं असलेलं नेत्तृत्व आपल्या कृतीतूनच पुढे येईल! अजून खरी लोकशाही आपण पाहिलीच नाही. भारत एक "व्यक्त्ती-समूह" म्हणून आपली जबाबदारी अंगावर घेऊ, भारत हे ताठ कण्याच्या "व्यक्तींचे" राष्ट्र म्हणून जगा समोर आणू, आम्ही पैशानं विकले जात नाही हे दाखवून देऊ मग नाही होणार कुणाची हिम्मत आमच्याकडे वाकडी नजर करण्याची... नाही होणार असे दहशती हल्ले! जगू आपण निर्धास्त! हेच हवे आहे ना आपल्या सर्वांना? नवा भारत घडवायला सज्ज व्हा. जय हिंद!

गुलमोहर: 

पहिला अर्धा भाग चांगला आहे. पण शेवटी शेवटी घटनाबाह्य मार्ग स्वीकारायाला सांगितला आहे असे वाटले, ते पटले नाही. मग मनसे काय वेगळे करते आहे असे कोणी विचारील. ते तरी महाराष्ट्रात आपल्यासमोर होते आहे म्हणून नीट माहीत आहे. उद्या तमिळनाडु मधे असे कोणी केले तर तो खरच लोकांचा विरोध आहे की एखाद्या संघटनेची झुंडशाही हे कसे ठरवायचे?

२६/११ ला एवढे झाल्यावर सुद्धा महाराष्ट्रात पुन्हा तीच पार्टी, तेच नेते कसे निवडून येउ शकतात? म्हणजे लाखो लोक असे आहेत की १. ज्यांना मुंबईवरच्या हल्ल्यापेक्षा आपल्या प्राथमिक गरजा भागवण्याशी जास्त मतलब आहे आणि कोणत्यातरी कारणाने त्यांना हेच लोक ते देउ शकतात असा त्यांचा वर्षानुवर्षे फसल्यावरही अजूनही ठाम समज आहे, २. काहीही झाले तरी मत द्यायची वेळ आली की असलेल्या उमेदवारांपैकी आपल्या जातीच्या, समाजाच्या उमेदवारालाच ते मत देतात ३. बाकी पर्याय त्या लोकांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.

आणि या लोकांची संख्या एवढी प्रचंड आहे की ती व्होट बँक जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत सुशिक्षित मध्यमवर्गीयांना काय वाटते याचा विचार करायची कोणत्याही राजकीय पक्षाला गरज नाही. बहुसंख्य लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या गरजा भागल्या तर ह्या इतर गोष्टी त्यांच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाच्या होतील. हे एका पिढीत होणारे काम वाटत नाही. पण लोकशाही व्यवस्थेत यापेक्षा दुसरा उपाय असेल असे वाटत नाही. आणि लोकशाही सोडून इतर पर्याय त्याहूनही वाईट आहेत.

भारत ही बुद्धीमंतांची भूमी आहे पण अमेरिका ही संधींची

खरे आहे. बर्‍याच भारतीयांनी इथे येऊन फार चांगले काम केले, वैयक्तिक उत्कर्ष करून घेतला. शिकले एक, करीअर केले दुसर्‍याच व्यवसायात, असे. कारण संधि होती. कुणाला त्यात काहि वैषम्य वाटले नाही, कुणि हसले नाहीत!

एक मार्ग आहे. ऑर्कुट, फेसबूक, मायबोली, मिसळपाव इ. ठिकाणी जाउन तुमच्यासारख्या विचारांच्या तरुणांना आवाहन करा. भेटा, चर्चा करा. सध्याच्या व्यवस्थेचा व्यवस्थित अभ्यास करा, कशा प्रकारे लाचलुचपत होते, पडद्यामागील सूत्रधार कोण, त्यांना त्यांच्याच खेळात हरवण्याइतकी अक्कल नक्कीच असणार आजकालच्या तरुणांत. मग निवडणूका लढवा!

तुम्हाला शुभेच्छा!

मा. सतिश पाठकजी,

खुप चांगला लेख लिहला आहे. काय करावे यासाठी माझे दोन सल्ले आहेत.

किमान एक शहर मॉडेल म्हणुन भारतापेक्षा वेगळे बदलता येईल का ? जसा अण्णा हजारेंनी एका ग्रामापासुन सुरवात केली.

आपण कल्याणला रहाता. एक आयुक्त होते ज्यांनी ठाण्याला सर्व लोकांना एकत्र करुन स्वच्छ्ता, रस्ता रुंदी यावर अभियान केले.

सुरवात करा तेच मॉडेल आता कल्याणसाठी घ्या.

फार सुंदर
मी डोंबिवलीला रहायचो पुर्वी. आपण कल्याणचे, वाचुन बरे वाटले. आपली तळमळ फार आवडली.
www.bolghevda.blogspot.com हा ब्लॉग मराठी वाचिकांसाठी मराठी मधुन आहे.
www.rashtravrat.blogspot.com हे दोन्ही ब्लॉग्स इंग्रजि मधुन आहेत.
www.rashtrarpan.blogspot.com