एका हरण्याची गोष्ट

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

अडमाच्या लिस्टीत टाकण्यासाठी ही कथा परत टाकतेय इथे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
तसा प्रसंग तर छोटासाच पण आठवला की आदिती सटपटून जायची. मग झाल्या प्रकाराची कारणं चाचपडणं, इकडे तिकडे जबाबदारी वाटून स्वत:ची बोच कमी करणं हे मागाहून यायचंच. पण राघवशी काही बोलणं जमायचं नाही. त्याला अजून दुखवायचं धाडस नव्हतंच ना तिच्यात.

तोच छोटासा प्रसंग आठवला की देवीही सटपटून जायची. कारणं चाचपडणं इत्यादी मागाहून यायचंच पण फोन उचलून आदितीचा नंबर फिरवणं जमायचं नाही. स्वतःला अजून दुखवून घेणं परवडण्यासारखं नव्हतं तिला.

तोच छोटासा प्रसंग आठवला की मणी अस्वस्थ व्हायची. कारणं तिही चाचपडायची. तिला अपराधी वाटण्यासारखं काही नव्हतं पण आदिती आणि राघव तिला आवडायचे आणि त्यांच्या बाबतीत असं काही घडणं तिला झेपत नव्हतं. ते बाकी कुणाशी बोलता पण येत नव्हतं. आदिती, राघव दुखावतील अशी भिती वाटायची तिला आणि बाकिच्यांनी आदितीला दोषी ठरवून तेव्हाच निर्णय दिला होता.

’तू काय शंभर पुरूषांबरोबर झोपली असशील!’ इतकं घाण, इतकं गलिच्छ कसं बाहेर पडलं आपल्या तोंडातून? आणि का? असेल नाहीतर नसेल तिचं आयुष्य असं मला काय करायचं होतं? आदितीला अजून कळत नव्हतं. ती जास्त सावध असायची. तोंड उघडायची तिला धास्ती वाटत रहायची.

असलं घाणेरडं माझ्याबद्दल कसं काय बोलू शकते ही? मी एकटी फिरते म्हणजे मी अशीच असं समजण्याइतकी मूर्ख आणि झापडवाली नाही आदिती. आणि काय माहितीये तिला माझ्याबद्दल? आणि समजा डिव्होर्स नंतर मी झोपले असेन दहापाच काय अगदी शंभर पुरूषांबरोबर पण त्यात हिचा काय संबंध? मी काही राघवबरोबर झोपणार नव्हते. तिला असं का वाटतं पण माझं आयुष्य अश्या पद्धतीचं असेल म्हणून? पंचेचाळीस वर्षांच्या आयुष्यात पहिल्यांदाच देवी आपल्या वागण्याबद्दल साशंक असायला लागली होती.

आदिती दिवसभर चिडचिडलेली होती देवीवर पण त्याचा शेवट आदितीनी असं काहीतरी बोलण्यात होईल असं नव्हतं वाटलं मणीला. मणीला आदिती आपली वाटली होती आणि देवी नुसती एक ओळख पण त्याच आदितीनी असं करावं हे काही उलगडलं नव्हतं. आपण माणसं ओळखण्यात चुकतोय की काय? नवीन माणसाला भेटल्यावर त्याच्याबद्दल काही मत बनवण्याचं सोडून द्यायच्या प्रयत्नात मणी असायची.

देवी पहिल्यांदा भेटली ती पातुरकरांची एक मैत्रिण म्हणून. तेव्हा एकदम बिनधास्त वाटली होती आदितीला. आदितीला न आवडणार्‍या प्रकारचे लोक देवीला पण आवडायचे नाहीत. ठरलेलं चौकोनी आयुष्य जगण्याची शिक्षा आपल्याला होऊ नये म्हणून आदिती झटायची आणि देवी स्वच्छंद आयुष्य जगत होती. पंधरा सोळा वर्षांनी मोठी असलेली देवी अर्ध्या तासासाठी का होईना आदितीची रोल मॉडेल बनली होती फक्त फरक इतकाच होता की राघवला सोडून एकटीचं आयुष्य जगणं आदितीला मंजूर नव्हतं.

आदिती देवीला आवडली होती. राघवही. पाच सहा वर्ष नवराबायको असून दोघांचं एकाच सुरावर असणं तरी दोघांची ओळख वेगळी टिकणं हेही देवीला खूप आवडलं होतं. देवी आणि राघवनी सिगरेट शेअर करण्याने आदितीला काहीच फरक पडला नव्हता हेही देवीला मस्त वाटलं होतं. पंधरा सोळा वर्षांनी लहान असलेली आदिती आणि पंधरा सोळा वर्षांपूर्वीची देवी अशी नकळत तुलना देवीच्या डोक्यात झालीच होती. पण त्याचं फार काही होण्याइतकं नंतर आदिती भेटलीच नाही. भेटली ती एकदम सहा सात महिन्यांनी गोव्यात, फिल्म फेस्टीवलला.

राघवशी जुजबी ओळख होती. त्याची बायको कशी असेल याची उत्सुकता मणीला होतीच. फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी मणी आणि आदिती भेटल्या आणि वर्षोनुवर्षाच्या जुन्या मैत्रिणी भेटल्यासारख्या गप्पा रंगल्या. प्रसिद्ध नवर्‍याची कमी प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध बायको अशी एक गैरसोयीची ओळख दोघींच्यात समान होतीच. ’मला काय वाटतं ते आदितीला नीट कळलं!’ असं मणीनी त्याच रात्री आपल्या नवर्याला फोन करून सांगितलं होतं.

आदिती राघवमधे पार बुडालेली असली तरी तिला तिचं तिचं आयुष्य होतंच. मधल्या काळात ती देवीला विसरली नव्हती पण तिचा काही संदर्भ नव्हता एवढंच. फेस्टिवलमधे एका फिल्मच्यासाठी रांगेत उभी राह्यलेली देवी बघून आदितीला छान वाटलं.

’देवी, देवी’ कुणीतरी हाक मारलेली ऐकली म्हणून देवी वळली आणि आदिती नी राघव ला पाहून तिलाही छान वाटलं. रांग सोडून ती आदितीकडे आली. राघवने तिला पटकन ओळखलं नव्हतं. देवी त्यांच्यापर्यंत पोचेतो आदितीने तिची आठवण करून दिली राधवला हे देवीच्या नजरेतून सुटलं नाही. "चला ही फिल्म पाहूया. रांग पण फार मोठी नाहीये." राघव नी आदिती चे पासेस, आयकार्ड तासाभराने मिळणार होते त्यामुळे त्यांना शक्य नव्हतं. देवीला काही ते पटलं नाही. आदिती, राघव ला घेऊन ती धावत धावत फेस्टिवल च्या ऑफिसमधे गेली. या दोघांचे पासेस, आयकार्ड का मिळालं नाही अजून अशी चौकशी सुरू केली.

आपल्या शेजारी उभी असलेले आदिती आणि राघव अचानक कुणाच्या मागे निघून गेले ते मणीला कळलंच नाही. आत्तातर तासभर पास मिळणार नसल्याने छानपैकी गप्पा मारत बसू असं आदिती म्हणाली होती. आणि आता दोघं गायब!!

देवीने हाताला धरून ओढून नेलं म्हणून आदिती आली खरी नाहीतर इकडे तिकडे वजन टाकूनच काम करून घ्यायचं असतं तर देवी कशाला हवी होती. राघवचं नावच पुरेसं होतं की. तसंही देवीला कुणी ओळखत नव्हतं त्या ऑफिसमधे. सगळेच टोलवत होते. राघव नी आदितीला आजूबाजूला रेंगाळण्याचा कंटाळा आला. ’अरे राघवजी कब आये आप? नमस्ते भाभीजी! यहा क्या कर रहे है आप दोनो’ असं गर्जत त्रिवेदी आला. त्रिवेदी हा फेस्टिवलच्या संयोजन समितीचा सर्वेसर्वा. नवीन छापलेले पासेस आत्ताच आलेत आणि दहा मिनिटात मिळतील असं सांगून परत गडगडाट करत त्रिवेदी निघून गेला. ’नो.. बट.. हाउ कॅन यू...’ असं म्हणत देवीही त्याच्या मागोमाग गेली. राघव कंटाळून तिथून निघाला.

त्रिवेदी देवीशी बोललाही नाही. देवी थोडी चिडलीच. ’हे सरकारी लोक म्हणजे...’ आदितीपाशी येऊन सांगायला लागली. कंटाळून मणी एकटीच बसली होती. तोच तिला राघव नी पाठोपाठ आदिती नी मग देवी येताना दिसले. ’कुठे होतात तुम्ही?’ मणीच्या या प्रश्नावर ’यू नो हे सरकारी लोक म्हणजे..’ असं देवीने सुरू केलं. ही कोण आणि हे आपल्याला का सांगतेय असा मणीच्या चेहर्‍यावरचा प्रश्न बघून पातुरकरांनी देवीची मणीशी ओळख करून दिली. मणी आणि देवीच्या गप्पा पण रंगल्या. देवी बिंधास्त असणं बघून आदितीसारखीच मणी पण इंप्रेस झाली. पण आदितीइतकी नाही.

आता फेस्टिवलसाठी ग्रुप चांगला जमला होता. फिल्म्सचा चालताबोलता विश्वकोश म्हणजे पातुरकर होते. मणी तिच्या पेपरसाठी फेस्टिवल कव्हर करत होती. राघव आणि आदितीला चांगल्या फिल्म्स बघायच्या होत्याच पण बरोबरच फिल्म मार्केट ही बघायचं होतं. समीरच्या फिल्मचा त्याच दिवशी प्रिमियर होता. समीर हा राघव आणि आदितीचा अगदी खास मित्र, आदितीचा आवडता नटही. त्यामुळे स्वतःच्या फिल्मच्या ग्रुपला सोडून तोही या ग्रुपमधे होता. आणि आता देवी. ती नुसतीच फिल्म्स बघायला आली होती. देवीशिवाय सगळे जवळच्याच एका लॉजवर रहात होते.

सगळा ग्रुप चांगल्या लोकांचा होता. भरपूर गप्पा, खाणे पिणे आणि मस्त मस्त फिल्म्स बघणे असं दिवसभर चालू होतं. देवीला इच्छा नव्हती पण तरी सगळ्यांनी समीरच्या प्रिमियरला जायचं ठरवलं. देवीला वेगळी फिल्म बघायची होती. पण तिच्याबरोबर कुणी गेलं नाही. हे देवीला फारसं आवडलं नाही. पण तीही त्यांच्याबरोबर प्रिमियरलाच गेली.

अपेक्षेप्रमाणे नवीन फिल्म कोणालाच आवडली नव्हती. मणीने या फिल्मचा उल्लेखच करायचा नाही असं ठरवलं. दिवसभरात बर्‍याच फिल्म्स बघून झाल्या होत्या. मणीच्या डोक्यात आता गोव्यातले मासे फक्त फिरत होते. तसेच समीरच्याही.

समीरच्या फिल्मला भरपूर शिव्या घालून झाल्यावर आदितीला प्रचंड भूक लागली. उशीरही झाला होता आणि उद्या सकाळी लवकरच्या फिल्मसाठी खूप मोठी रांग असणार होती त्यामुळे फेस्टिव्हलच्या आवारातच काहीतरी पटकन खाउ आणि लवकर जाउन झोपू असं आदिती आणि राघवने ठरवलं. मणी आणि समीर मात्र माश्याचं हॉटेल शोधायच्या विचारात होते. पातुरकरांनी संध्याकाळीच खाउन घेतलं होतं त्यामुळे ते लॉजवर निघाले. राघव कुणाशी तरी बोलत होता तोवर आदितीने एका स्टॉलवर दोघांच्या जेवणाची ऑर्डर दिली आणि एका टेबलाशी जाउन बसली. पातुरकर त्या दोघांचं जेवण होईपर्यंत थांबणार होते. तेवढ्यात कुठून तरी राघव आणि समीर आले. ’एक माश्याचं हॉटेल सापडलंय देवीला. आम्ही तिकडे जातोय जेवायला. तू पण येतेस?’ राघव आदितीला म्हणाला. ’मला तिथे शाकाहारी जेवण मिळणार नाहीचे. मी येऊन करू काय?’ ’बर ठिके मी जातो. पटकन येतो मी जेऊन. तुझं होईपर्यंत येईनच मी.’ ’पण मी तुझीही ऑर्डर दिलीये राघवा!’

’त्यात काय! ती आत्ता कॅन्सल करता येईल.’ असं म्हणत देवी पटकन त्या स्टॉलशी गेली. आधी स्टॉलवाला नाहीच म्हणत होता. पण देवीकडे बघून शेवटी त्याने मानले. ’चला’ म्हणत देवी ताडताड निघाली. समीर आणि राघव आपल्याबरोबर येतायत ना एवढं मात्र तिनं बघून घेतलं.

आदितीचा उतरलेला चेहरा पाहून मणी निघालेली थांबली. पण पाच मिनिटांनी तिला फोन आला. देवी, समीर आणि राघव कोपर्यावर मणीची वाट बघत थांबले होते. आदितीला सॉरी म्हणून मणी निघून गेली. थोडीशीच ओळख असलेल्या काका टाइप पातुरकरांसमोर शोभा नको म्हणून आदिती मान खाली घालून भरभर जेवत राह्यली. डोळ्यात जमा होणारं पाणी मागे सारत. ’या देवीला सगळ्यांच्या सोयीने काही करता येत नाही. तिच्या मनात आलं की इतरांनी पण तसंच केलं पाहिजे. सगळीकडे एकटीने फिरते ना त्यामुळे स्वतःचं तेच खरं करायची सवय लागलीये तिला.’ असं पातुरकर म्हणाले तेव्हा मात्र आदितीचा घसा कोंडला. समोरचे चार घास कसेतरी संपवून आदिती नी पातुरकर राघवची वाट बघत बसले. राघवचा नंबर डायल करताना त्याच्यावर चिडावं की रडणं लपवावं की नुसतंच किती वेळ लागेल विचारावं ह्याबद्दल तिचा निर्णय होईना. शेवटी आदिती आणि पातुरकर लॉजच्या दिशेने चालू लागले. रूममधे आल्यावर आदितीने तातडीने राघवला फोन लावला. तो फोन उचलेना. नेहमीप्रमाणे फिल्मच्या वेळेला सायलेंटवर टाकलेला फोन नॉर्मलवर आणायला राघव विसरला असणार हे तिला रागाच्या भरात लक्षातच आलं नाही. वेळ जात होता तशी तशी आदिती अजून अजून धुमसत होती. देवी सगळ्यांना आपल्या बोटाभोवती गुंडाळून घ्यायला बघतेय. एरवी डोकं जाग्यावर असलेला आपला नवरा आणि आपला सगळ्यात जवळचा मित्र दोघंही मूर्खासारखे तिच्या मागे निघाले ह्याचा संताप तिच्या डोक्यात मावत नव्हता.

मासे म्हणल्यावर झळाळलेले चेहरे बघून देवीने रात्री साडेनऊ वाजता पाटकर ला फोन केला. देवी ज्या ओळखीच्यांच्या घरात रहात होती गोव्यात तिथे व्यवस्था बघायला तो यायचा. पाटकर ’सोरॉं पिओन टायट’ होता. इतक्या रात्री देवीचा फोन म्हणल्यावर तो खुश होणार हे देवीला अपेक्षितच होतं. त्या अवस्थेतच त्याने फेस्टिव्हलच्या जागेजवळचं एक खोपटीवजा हॉटेल सांगितलं. देवी तिथे पोचली. हॉटेल बंदच झालं होतं जवळजवळ. आर्जवं करून तिने चार मच्छी ताटांची ऑर्डर देऊन टाकली. आणि तयार करा तोवर लोकांना घेउन येतेच असं सांगितलं. हॉटेलवाला कंटाळला असला तरी तो आपल्याला नाही म्हणू शकणार नाही हे देवीला पुरतं माहित होतं. हॉटेल सापडल्याची बातमी दिल्यावर समीर, मणी आणि राघव खुश होणार हेही तिला माहित होतं. आणि आता तिने एवढं केल्यावर ते सगळे तिच्याबरोबर आलेच पाहिजेत असा तिचा आग्रह जरी नसला तरी प्रयत्न मात्र होता. अश्यावेळेला आदिती एकटी पडतेय हे तिला लक्षात येण्याचं कारण नव्हतंच कारण तिला असला काही विचार करण्याची सवय कधी नव्हतीच.

मणीला जेवताना थोडसं अपराधी वाटलं होतं. तिने ते बोलूनही दाखवलं. ’यायचं होतं ना तिने इथे!’ आदितीचं शाकाहारी असणं अजिबात न आवडणारा समीर फटकन म्हणाला.

जेवताना सगळे गप्पा मारत होते. राघव मधेच थबकत होता हे देवीच्या लक्षात आलं. जेवण झाल्यावर फार वेळ गप्पाटप्पा करण्यात त्याला इंटरेस्ट नव्हता हे देवीने पाह्यलं आणि ती थोडी इरिटेट झाली. जेवण होउन गेलं तरी मणी आणि समीर माश्याची स्तुती करण्यात थकत नव्हते. हॉटेलच्या कोपर्यावर आल्यावर मणी आणि समीरच्या गप्पांच्यात देवी पण सामील झाली. विषयातून नवीन विषय काढणं चालू झालं. ’हा नेहमीच असा गप्प असतो की आजच बोलत नाहीये.’ देवीने विचारले अर्थातच राघवबद्दल. ’नाही तो शांतच असतो. गप्पामधे सगळ्यात पुढे आदिती. कधी थकत नाही. दरवेळेला काहीतरी नवीन असतं तिच्याकडे सांगण्यासारखं किंवा भांडण्यासारखं.’ समीरने जास्तीची माहिती पुरवली. ’ए बिचारी एकटी बसली असेल रे. जाउ या थिएटरच्या इथे?’ मणी म्हणाली. ’वेडी आहेस का? आत्ता तिच्यापुढे मी तर जाणार नाही. राघवचं काय ते तो बघून घेईल.’ समीर हसत हसत म्हणाला. त्या वाक्याचं राघवलाही हसू आलं. आदिती बरोबर नसली तरी आदिती तिघांच्या डोक्यात होतीच. हे देवीला लक्षात आल्यावाचून राह्यलं नाही. गप्पांमधे भरपूर वेळ काढायला तिने सुरूवात केली. बराच वेळानंतर आदितीसाठी म्हणून मणी थिएटरच्या दिशेने जायला लागली. राघवने खिशातून फोन काढला आणि पातुरकरांचा फोन आला. ते आणि आदिती लॉजकडे निघालेत म्हणून. ’चला आता आदिती एकटी असण्याचं टेन्शन नाही रे राघव तुला. म्हणजे गप्पा मारायला तू मोकळा.’ देवीचा उत्साह लपत नव्हता. राधवने खांदे उडवले. थोड्यावेळाने मणीनं सहज म्हणून घड्याळ पाह्यलं तर एक वाजला होता. ’देवी आम्हाला पुढच्या गल्लीत जायचंय. तू घरी कशी जाणारेस?’ मणी पटकन म्हणाली. देवीनं कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी तिच्या चेहर्‍यावर एक नाराजीची रेषा उठलीच. गोव्यात इतक्या रात्री एकटीने जाणं योग्य नाही त्यामुळे आम्ही तुला सोडायला येतो असा समीरने आग्रह धरला. राघवचा फोन वाजला. पलिकडून आदिती इतक्या मोठ्याने बोलत होती की काय बोलली हे जरी कुणाला कळले नाही तरी ती चिडलीये हे कळायला काही अवघड नव्हतं. देवीला हे आवडत नव्हतं. देवीच्या घरापर्यंत चालत जाउन मग कॉफी बिफि असा वेळाकाढू प्लॅन देवीनं मांडला. समीर निघाला. राघवला जायचं नव्हतं पण ग्रुपमधल्या मुलीला सुखरूप पोचवल्याशिवाय निघणं त्याला जमत नव्हतं. ’आता तूही चल लॉजवर. आदिती वैतागेल.’ मणी आणि राघव लॉजच्या दिशेने निघाले. देवी मणीवरच वैतागली होती.

देवी सुंदर आहे, ऍट्रॅक्टीव्ह आहे यात वादच नाही. तिला २५ वर्षाचा मुलगा आहे पण ती तेवढी मोठी अजिबात दिसत नाही. ह्या सगळ्याबद्दल आदितीला देवीचं सुरवातीला कौतुकच वाटलं होतं. आणि आता आपल्यात असं काही नाहीये हे आदितीला प्रकर्षानं जाणवलं. आजवर कधी असा प्रश्नच आला नव्हता पण आता आपलं तसं नसणं हे राघवच्या मनात जास्तच ठसेल की काय अशी भितीही आदितीला वाटायला लागली. संतापाबरोबरच तिला एकदम बिचारं बिचारं वाटायला लागलं. एखाद्या मूर्ख अडाणी बाईसारखी ती ’दुसर्‍या’ बाईच्या शंकेने चरफडायला लागली इतकी की तिचा राघववर असलेला विश्वासही डळमळला. परत राघवला फोन केला तिने. यावेळेला राघवने फोन उचलला. संतापाच्या भरात वाट्टेल ते बोलून आदितीने फोन ठेवला. देवीला घरी सोडण्याबद्दल राघव काहीतरी म्हणत होता हे तिनं अर्धवट ऐकलं आणि राघव आज येणारच नाही रूमवर अश्या कल्पनेने तिला रडायला यायला लागलं. ती रडूनरडून दमली तेव्हा तिने रूमच्या बाहेर राघवची चाहूल ऐकली.

राघवला माहित होतं की त्याला यायला उशीर झालाय. पण आदिती इतकी का चिडलीये हे त्याच्या लक्षात आलं नव्हतंच. रूममधे तो पोचला तेव्हा आदिती रडतारडता पेंगलेली त्याला दिसली. आत्ता हिला उठवायलाच नको, सकाळी बघू असा विचार करून राघव हळूच कपडे बदलणे इत्यादी करत होता. "पहाटेचे दोन वाजलेत. पटकन जेवून येतो असं म्हणून तू गेला होतास सव्वाअकरा वाजता." कानाखाली वाजवावी अश्या पद्धतीने आदितीचे शब्द आले. त्या वरकरणी साध्या दिसणार्‍या वाक्यामधे बरेच अर्थ दडलेले होते हे राघवला अर्थातच लक्षात आलं. काहीच उत्तर न देता राघव शांतपणे आवरत राह्यला. या दुर्लक्ष करण्यामुळे आदिती अजून डिवचली गेली. "माझा फोनसुद्धा घेतला नाहीस. इतका बिझी होतास का? की देवीने मनाई केली होती? हॉटेलमधून देवीला सोडायला गेला होतात. मग तिने जाउ बरं दिलं तुम्हाला." "मूर्खासारखं काहितरी बोलू नकोस." "दोन दिवस ओळख झालेल्या बयेनी सांगितलं म्हणून आपलं ठरलेलं असताना एका सेकंदात मला टाकून निघून गेलास." "तुला पण ये म्हणालो होतो." "मला तिथे काही जेवायला मिळणार नाही हे माहित होतं तुला." "मी एकटा नव्हतो गेलो. तू माझा नवरा आहेस. बाकीचे नाही." शब्दाला शब्द वाढत गेला. राघवला मनात माहित होतं की आपलं थोडसं चुकलंच आहे. पण पटकन कबूल करणार्‍यातला राघव नव्हताच.

आदितीला नक्की माहित होतं की राघव दुसर्‍या बाईच्या मागे बिगे जाणार नाही. ग्रुपबिप म्हणलं की त्याला नको इतका उदारपणा सुचतो आणि बायकोचा विचार करण्यापेक्षा ग्रुपमधल्या इतरांचा विचार तो जास्त करतो. हे आदितीला एरवी अंगवळणी पडलं होतं. पण भांडण सुरू झालं की राघव आदितीकडे पूर्ण दुर्लक्ष करायचा. उत्तर देणं तर दूरच तिच्याकडे बघायचाही नाही. आत्ताही त्याने तसंच केलं आणि आदितीच्या संतापाचा कडेलोट झाला. "दिसली सुंदर बाई मग तिचं मन कशाला मोडा. चालले मागे मागे. बायकोला काय वाटेल याची कशाला कदर करा. नाहीतरी कुरूप घाणेरडी बायको जाउन जाउन जाईल कुठे!" आदिती तडतडत होती आणि रडतही होती.

हे आरोप ऐकून मात्र राघवही चिडलाच. "उद्या सकाळी परत जायचं. मी तरी जाणारे. तुला यायचं तर ये नाहीतर ठरल्याप्रमाणे थांब आणि मग ये. मी चाललो. लोकांसमोर शोभा करायला आलो नाही आहोत." "मी परत यायला हवंय का तरी हे आधी ठरव." आता राघवचाही संयम सुटला. "एकटी तूच बिचारी आहेस का जगात? सगळे तुझ्याविरूद्ध वागतात? कोण समजतेस तू स्वतःला?" "मी कुणीच नाहीये रे. तोच तर घोळ आहे ना. त्यामुळेच तर तुला बिचारा म्हणतात लोक. दिली लोकांनी सहानुभूती की पाघळलास!" "तुला असं वाटतं ना ठिक आहे मग." कसातरी राघवने आवाजावर कंट्रोल ठेवला. "ठिके काय? सुंदर दिसत असली तरी महाहलकट बाई आहे ती. सगळं जग आपल्याभोवती फिरवत ठेवायचं मग कोण दुखावला गेला याची फिकीर नाही. पण तुम्हाला ते दिसणार नाही. थोबडा बरा असला की काय काहीही लपवता येतं." "असं काही नाहीये." "वा आता तिची बाजू घेऊन तू मला ती कशी चांगली आहे हे समजवणार!! कोण लागते ती तुझी? मी घालीन तिला शिव्या तुला का त्रास होतोय? मला तिने त्रास दिला तर माझ्याबाजूला रहाशील का उभा?" "राह्यलो नाहीये पूर्वी?" "कधीच नाही." "असंच जर म्हणत जायचंय तुला तर मग बोलण्यात काही अर्थ नाही." "मग आता?" "म्हणजे?" "बोलण्यात अर्थ नाही तर मग काय? संपलं सगळं? पाचसहा वर्ष मातीत?" "काहीतरी काय बोलतेयस?" आता राघवचाच घसा कोंडला. आदितीपासून दूर होण्याची कल्पनाही राघवला सहन होण्यासारखी नव्हती. आदितीला आपल्याबद्दल विश्वास नाही हे ही राघव पेलू शकत नव्हता. आदितीनं स्वतःला कुरूप का समजावं हे त्याला कधीच कळलं नव्हतं पण ती तसं समजून त्रास करून घेते याचा त्याला नेहमीच त्रास व्हायचा. तिनं स्वतःला इतकं कमी समजावं हेही राघवला सहन होत नव्हतं. आपल्या बारीकश्या चुकीमुळे हे घडलं की काय यामुळे तो अस्वस्थ झाला होता.

राघवचा आवाज बदललेला पाहून आदितीलाही अपराधी वाटलं. आपण नको ते बोललोय, राघवला दुखावतोय हे लक्षात आल्यावर तिला सुचेचना की तळमळणार्‍या राघवला कसं आवरावं. इतक्या दूर लोटलेल्या त्याच्याकडे कसं पोचावं हे ही तिला कळेना. राघवा! त्याच्या पाठिवर हात ठेवत आदितीने हाक मारली आणि तिला हुंदकाच फूटला. उरलेली रात्र त्याच्या कुशीत, आसवांमधे वाहून गेली.

सकाळी सकाळी तयार होउन आली असली तरी डोळे सुजलेले, चेहरा जाग्रणाने सुजलेला अश्या आदितीला पाहून मणी थोडी चरकलीच. "सॉरी गं. पण गोव्यात येउन दिवस झाले तरी मासे मिळाले नव्हते." "ठिके" आदिती सहजपणे म्हणाली. आपल्यावर हिचा राग नाही हे बघून मणीला हुश्श झालं. दोघी पहिल्या स्क्रिनिंगसाठी रांग लावायला पटकन पुढे निघाल्या. रांगेत तरी देवी दिसली नव्हती ते बघून आदितीला बरं वाटलं. फिल्म सुरू व्हायला काही मिनिटंच असताना देवी तिथे आली. स्पॅगेटी स्ट्रॅप टॉप आणि स्कर्ट. वय वर्ष पंचेचाळीस. कालच्यापेक्षा सुंदर दिसत होती. कालच्या कॅज्युअल लूकचा आज मागमूसही नव्हता. बाकी कोणाच्या नाही तरी आदितीच्या लक्षात आलंच. चरफडली आदिती. समीर, राघव, आदिती, मणी आणि मग पातुरकर असे सगळे बसले होते. पातुरकरांच्या पलिकडे जागा रिकामी होती. "एकेक सीट पुढे सरकाना पटकन!" देवी राघवला म्हणाली. राघव उठणार तेवढ्यात आदितीने राघवचा हात धरून खेचला. राघव तसाच बसून राह्यला. आता मी इथून उठणार नाहीये. मणी आणि आदिती दोघींनी सांगून टाकले. शेवटी देवी पुढच्या ओळीत आदितीच्या पुढ्यात जाउन बसली. "मी त्यांना नव्हतं सांगितलं माझ्याबरोबर चला म्हणून. त्यांना यायचं होतं ते आले." आदितीकडे वळून देवीने स्पष्टीकरण द्यायला सुरूवात केली. "मला तुझ्याशी बोलायचं नाहीये." थंडपणे आदितीचे शब्द आले. "आत्ता बोलायचं नाहीये की बोलायचच नाहीये?" असं देवीने विचारल्यावर आदितीच्या डोक्यात तिडिक गेली. "कधीच बोलायचं नाहीये." खाडकन उत्तर बाहेर पडले. झालेल्या अपमानाला उत्तर न देता देवी वळून परत आपल्या जागी बसली. तिचा थोडासा का होईना उतरलेला चेहरा बघून आदितीला बरं वाटलं आणि बरं वाटल्याचं वाईट वाटलं.

सुंदर इराणी फिल्म देवीने समोर असून अनुभवलीच नाही. झाला तो अपमान तिला टोचत होता. आदितीला चांगलं झोंबेल असं काहीतरी उत्तर द्यायचं होतं तिला. फिल्म सगळ्यांनाच आवडली होती आणि त्यावरच भरभरून गप्पा चालल्या होत्या. इतकी मस्त आणि उत्साहात चर्चा चालली होती की देवी चर्चेत नाहीये हे ती सोडून कुणाच्याच लक्षात आलं नाही. तिने फिल्म नीट पाह्यलीच नव्हती त्यामुळे ती काही बोलूही शकणार नव्हती. ती हळूच टेबलापासून उठली आणि शेजारच्या टेबलावर जाउन बसली. आणि दिवसभर ग्रुपपासून दूर नाही नी ग्रुपमधेही नाही असं असायचं तिने ठरवलं.

सकाळच्या इराणी फिल्मपासून सुरूवात होऊन संध्याकाळपर्यंत चांगल्या फिल्म्स पदरात पडल्याने मणी खुश होती. संध्याकाळच्या सेशनमधे कुठली खास फिल्म नव्हती. दिवसभरात देवी ग्रुपमधे आली नाही. बाजूबाजूला राह्यली हे मणीच्या लक्षात आलं होतं. आत्ताही कला अकादमीच्या लॉनवर खुर्च्या टाकून सगळे बसले होते आज संध्याकाळचा/ रात्रीचा काय प्लॅन करूया असं ठरवत आणि थोडं पलिकडे लॉनवर देवी कुणाच्या तरी कुत्र्याशी खेळत होती, मधेच मोबाइल वर बोलत होती, मग एका टेबलाशी कॉफी पित बसली. मणीला थोडसं वाईट वाटलंच.

"आता अजून फिल्म बघायचा मूड नाही बा माझा. मला तर समुद्रावर फिरायला जायला आवडेल आत्ता सूर्यास्ताच्या वेळी. जाउया?" आदिती म्हणाली. "आत्ता लगेच अंधार पडेल. उद्या जाउ समुद्रावर. आधी आज कुठे जायचं काय करायचं ते ठरवा." पातुरकरांनी वास्तवात आणलं. इथे जमून तीन चार दिवस झाले आणि अजून सगळ्यांनी मिळून धमाल पार्टी केली नाही गोव्यात येऊन, समीर तर उद्या सकाळी परत जाणार तर आज काहीतरी ठरवूयाच असा सगळ्यांचाच विचार दिसला. समीर आणि राघवचा गोव्यातला मित्र अविनाश सारखा फोन करून संध्याकाळी घरी बोलावत होताच. सगळ्यांनी त्याच्याकडे जायचं ठरलं. आदितीला देवीची सिंपथी टूर चांगलीच लक्षात आली होती. राघवच्या मित्राकडे जाण्याने देवी पाठ सोडेल असं वाटून आदितीलाही बरं वाटलं. आदिती - राघव, पातुरकर, मणी आणि समीर हे सगळे मुंबईहूनच एकत्र फेस्टिव्हल बघायचं ठरवून आले होते. देवी तिथे अचानक भेटली होती. भेटलो नसतो आपण तर केलंच असतं ना एकटीने मॅनेज तसं आताही करेल असा आदितीने विचार केला.

सगळा ग्रुप आपल्या नजरेआड न होऊ देता देवी ग्रुपच्या बाहेर रहात होती दिवसभर. दिवसभरात तिने आगंतुक मित्र बरेच जमवले होते. पण मी दिवसभर तुमच्या पासून दूर रहातेय आदितीमुळे हे सगळ्यांना जाणवून देणं, त्याबद्दल गिल्टी वाटायला लावणं हा तिचा प्रयत्न होताच. लांबूनच आता हे काय करतायत यावर लक्ष ठेवून होती. तिला आदितीला दाखवून द्यायचं होतं की तू मला टाळलंस तरी माझं काही बिघडणार नाही. सगळे ग्रुपमधले माझ्याशी चांगलंच वागतील. अगदी राघवसकट सगळे. तिला खात्री होती की कोणीना कोणी तिला ग्रुपमधे ये म्हणून म्हणतीलच. सगळ्यांबरोबर नाही आणि फारसं दूरही नाही असं दिवसभर वावरून तिने आपलं नसणं बरोबर ठसवलं होतं.

"एक सूचवू का आदिती? देवीला पण विचारूया. नाहीतरी काल दिवसभर आपण सगळे एकत्र होतो. आजतर पाह्यलंस ना बिचारी आपल्यात येत पण नाहीये. अजून तोडून वागायला नको." मणी खरंच विरघळली होती.

"आपण राघवच्या मित्राकडे जातोय आणि राधवच्या ग्रुपलाच बोलावलंय अविनाशनी. देवीचा काय संबंध?" आदितीनी नाराजी व्यक्त केली. समीर तिला समजवायला लागला नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळाच नी चुकीचा मुद्दा घेऊन आणि आदिती वैतागलीच. "तुम्हाला ती यायला हवी असेल तर जाउदे मग. मी येत नाही. ठरवा तुम्ही. मला तिथे सीन नकोय. शेवटी राघवचा मित्र आहे अविनाश. देवी थिल्लरपणे वागली तर राघवच्या ग्रुपमधली असं म्हणत राघवबद्दल मत वाईट होईल. जे मला नकोय." "असं ती काही करणार नाही तू उगीचच तिच्यावर राग धरून आहेस." समीरनी आदितीचा मुद्दा निकालात काढला. "बर ठिके तिला घेउन जा. मी येत नाही माझं डोकं दुखतंय. आणि दुसर्‍यांची कदर न करता स्वतःच्या बोटाभोवती जग गुंडाळायला बघणारी माणसं बाजूला असली की ते अजून दुखेल." आदिती किंचित भडकली. "असं ती काही करत नाही. हे तू उगीचच मनात घेऊन बसली आहेस. आणि तू कशाला लक्ष देतेस? तू तुझं एंजॉय कर ना." समीरचं म्हणणं सगळ्यांनाच पटलं. "तू सांग राघव तुला काय वाटतं. आली ती तर काय बिघडेल?" राघव काहीच बोलत नव्हता हे बघून मणीने विचारलं. "मी माझा ग्लास घेउन बसणारे. कुणी या जा मला काही फरक पडत नाही." राघव शांतपणे पण तिरसटला. "ती नुसतं म्हणाली आणि माझा नवरा नि माझा सगळ्यात चांगला मित्र मला एकटीला सोडून निघून गेले. ह्याचा मला त्रास झालाय. ती आजही तसं काही करायला बघत असेल तर मी ते ऐकून घेणार नाही." आदिती निर्वाणीचं म्हणाली. "गाढव आहेस का? आम्ही काय तिच्यासाठी गेलो असं वाटतंय तुला? माश्यासाठी मी किती तडफडतो एरवीही हे माहित नाहीये तुला?" समीर चिडलाच. आदितीने दुसरीकडे मान वळवली. बराच वेळ सगळेच गप्प होते. आदितीला आपणच खलनायिका आहोत आणि बिचार्‍या हिरवीणीला त्रास देतोय असं वाटायला लागलं. "ठिक आहे. विचारा तिला. पण मी तिच्याशी एक शब्दही बोलणार नाही. ती बोलायला आली तर मी उडवून लावीन. हे लक्षात ठेवा." आदितीने विषय संपवला. राधवला बाजूला घेउन तू तिच्याशी बोलायचं नाहीस असं मात्र सांगायला आदिती विसरली नाही.

मणीने विचारलं बरोबर येण्याबद्दल तेव्हा देवी स्वतःवर खुशच झाली. लगेच सगळ्यांबरोबर टेबलाशी येऊन बसली. आदिती हळूच उठून गेली हे तिने पाह्यलं. राघव टेबलाशी नव्हता तो कुणाशी फोनवर बोलत होता थोडा लांब उभा राहून हेही तिनं पाहून घेतलं.

अविनाश सगळ्यांना घ्यायला आला. पातुरकर आणि राघव कुणाला तरी भेटायला म्हणून थिएटरच्या इथे गेले होते त्यामुळे बाकिच्यांना आधी घरी सोडून मग त्यांच्यासाठी तो परत येणार होता. अचानक देवीला काहीतरी काम आठवलं आणि तिने तुम्ही पुढे जा मी नंतर येते असं सांगितल्यावर मात्र मणीला पण तिचा राग आला. आदितीची भिती खरी ठरेल की काय असं तिला वाटायला लागलं. तिने आदिती कडे बघितलं आदितीने मान फिरवली आणि ती गाडीत बसली. पाठोपाठ मणी आणि समीरही बसले. अविनाशच्या घरी येऊन पोचले.

राघव आणि पातुरकरांच्या बरोबर देवीही अविनाशच्या घरी पोचली. अविनाशच्या बायकोशी वसुधाशी तिनी ओळख करून घेतली. अचानक एवढे लोक आले म्हणल्यावर ’तिला मदत करायला हवी’ असं म्हणत वसुधा बरोबर देवी किचनमधे गेली. एका डिशमधे बिस्किटस घेऊन बाहेर घेऊन आली.

एकदम अनोळखी माणसाकडे आल्यावर कुणालाही ’ऍट होम’ वाटायला जो थोडा वेळ लागतो तो मणीलाही लागला पण आल्याआल्या वसुधाची जन्मोजन्मीची मैत्रिण असल्यासारखी देवी किचनमधे शिरली हे पाहून मणी उडालीच. दारूबरोबरचं माकडखाणं देवीनं सर्व्ह करायला सुरूवात केल्यावर आपल्याला जरा गृहकृत्यदक्षपणा कमीच आहे हे मणीला परत एकदा जाणवलं.

देवीच्या कुठल्याही गोष्टीकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचं. आपण आपली मजा करायची असं आदितीनं पक्कं ठरवलं होतं. हळूहळू पार्टीला रंग चढत होता. आदिती देवीकडे दुर्लक्ष करून मजा करत होती. हातातली वाईन मस्त होती. आवाजही छान लागला होता. राघवच्या बरोबर अविनाश आणि समीरही एकामागून एक गाणी फर्माइश करत होते आणि आदिती मनमोकळी गात होती. आदितीचा सूर ऐकून मणी थक्क झाली होती. गायला मिळणं आणि ऐकणारे मिळणं.. अजून काय हवं. आदिती खुश होती. देवीकडे खरोखरीचं दुर्लक्ष करू शकत होती.

देवीला एकदा ड्रिंक्स बद्दल विचारून झालं. ती घेत नाही म्हणल्यावर अविनाशने लक्ष दिलं नाही. आदिती गात होती. कसली सुंदर दिसत होती. एकुणात मजा चालली होती. आपलं इथे असणं हे कुणालाच मह्त्वाचं नाहीये की काय अशी देवीला शंका आली. पटकन ती वसुधाबरोबर किचनमधे आली. खाऊ घेऊन जायला. खाउ घेऊन बाहेर आली आणि हातातली डिश सगळ्यांच्यापुढे फिरवू लागली. आदितीच्यापुढेही आली. आदितीने आपल्याकडे लक्षही दिलं नाही आणि ती समीरला हाक मारत पुढून निघून गेली ह्यावर देवी एक क्षण थबकली. अजून तत्परतेनं प्रत्येकाकडे डिश घेऊन जात गप्पा मारत रेंगाळू लागली. अगदी राघवकडे सुद्धा.

आदितीला आवडत नाहीये देवी राघवशी बोलतेय हे मणीला चांगलंच लक्षात आलं पण मणी काय करू शकणार होती. राघव बाल्कनीत उभा असेल तर तिथे जाउन त्याच्याशी बोलणं. ड्रिंक्स बनवायला अविनाश आणि राघव किचनमधे गेले की देवीनं तिथे मागोमाग जाणं किंवा किचनच्या खेपा करणं हे सगळं आता जरा जास्त ऑब्व्हियस होतंय असं मणीला वाटलं. पण ती काय करू शकणार होती. आदितीचा चेहरा अधूनमधून बदलताना ती पहात होती पण तरी ती काहीच करू शकत नव्हती.

"ती तुझ्याशी बोलायला आली तर तू दुर्लक्ष कर किंवा तिचा अपमान कर. मी नाही का केला! तुला काय प्रॉब्लेम आहे?" आदिती राघवला सांगत होती. "असं ग्रुपमधे बरं दिसत नाही. आणि ती तुला लोंबायचा प्रयत्न करतेय ते बरं दिसतंय का? काहीतरी बोलू नकोस!" असं म्हणून राघव बाल्कनीतून आत आला आणि वाटेतच देवीनं नमकीनचं ताट त्याच्यापुढं धरलं आणि काहीतरी बोलणं काढलं. आदितीनी बाल्कनीत मान वळवली.

आदितीने चिडून मान वळवलेली देवीनी पाह्यली आणि तिला सकाळपासून थोडं बरं वाटलं. ड्रिंक्सचं सेशन संपवून सगळे जेवायला गेले. एव्हाना समीर, पातुरकर आणि मणी बर्‍यापैकी हाय होते. आदिती इतकी संतापली होती की त्या भरात तिने रिचवलेल्या वाईनच्या तीन ग्लासांना काहीही न्याय मिळाला नव्हता. राघवही व्यवस्थित होता. "मी तुला सांगितलं होतं ना तिच्याशी बोलू नकोस म्हणून! असं ग्रुपमधे करता येत नाही." नेहमी कुठेही बरोबरच्या ग्रुपची जबाबदारी कायम आपल्या खांद्यावर असल्याप्रमाणे वागणार्‍या राघवचा तिला नेहमीप्रमाणेच खूप राग आला त्यात आता देवी नामक ज्वालाग्राही विषय होताच. "पण मग आता तरी बस इथे जेवायला नीट. बसतील सगळे जेवायला. तू कशाला उगाच उभा रहातोयस?" आदितीचं न ऐकता पातुरकर काहीतरी सांगत होते तिथे राघव गेला. तिथेच देवीही उभी होती. अविनाशही होता आणि वसुधाही. पातुरकरांचं सांगून होतंय तोच देवी वळून राघवशी बोलायला लागली. राघवने तिला टाळलं नाही, तिचा अपमान केला नाही आणि तिच्याकडे दुर्लक्षही केलं नाही हे बघून शेवटी मगाचपासून धुमसत असलेल्या आदितीचा स्फोट झाला. "तुला सकाळी एकदा मी सांगितलं होतं माझ्याशी बोलू नकोस. वागण्यातून क्लीअर केलं होतं की मला तू नकोयस म्हणून आणि तरी तू मुद्दामून का बोलायला येतेस आमच्या दोघांशी?" देवीचा हात खसकन ओढून तिला आपल्याकडे वळवत आदिती कडाडली. "कोण समजतेस तू स्वत:ला? एवढं वय वाढलं तरी रंग उधळत फिरतेस!" आदितीचा संताप अनावर झाला होता. अविनाश आणी राघवनी तिला तिथून बाजूला केलं. आणि गप्प करू लागले. राघव आपल्याला गप्प करायला बघतोय हे बघून आदिती अजूनच चिडत होती. आपण नक्की काय बोलतोय याचं तिला भान नव्हतं.

आदितीचं चिडणं देवीला अपेक्षितच होतं. "माझ्या वयाबद्दल तू काही बोलू नकोस. आणि माझ्याशी नीट बोलायचं." देवीनं आदितीला उडवून लावलं. राघव आदितीला बाजूला घेऊन गेला आणि पातुरकर देवीला समजवायला लागले. त्यावर मला काहीच फरक पडत नाही कोण काही म्हणालं तरी. असं देवी बेफिकीरपणे म्हणाली. नेमकं ते वाक्य ऐकलं आणि आदिती अजून खवळली. "कशाला फरक पडेल तुला? निर्लज्ज बाई आहेस तू. शंभर पुरूषांच्याबरोबर झोपली असशील तू" आदिती पार घसरली. "शट अप. माझ्या मैत्रिणीचा असला अपमान करायचा तुला काही अधिकार नाही." पातुरकरांचा आवाज टिपेला गेला. आदिती काही बोलायला जाणार एवढ्यात "एक शब्द बोललीस अजून तर कानाखाली वाजवीन." पातुरकर परत ओरडले. देवी फिसकन हसली की काय असा आदितीला भास झाला आणि तिला अशक्य रडू कोसळले. बाकी सगळे देवीचं सांत्वन करतायत आणि आपण एकट्या पडलोयत. राधव कुठेच दिसत नाहीये हे बघून आदितीला अजूनच रडायला यायला लागलं. त्यात समीर तिरीमिरीत येऊन तिला बोल बोल बोलायला लागला. आदितीचं रडू थांबणं शक्यच नव्हतं. अविनाशला काय वाटलं कुणास ठाउक त्याने समीरला थांबवलं. आदितीला समजवायच्या प्रयत्नाला तो लागला. "आय ऍम सॉरी. मला असं सगळं बिघडवायचं नव्हतं. सॉरी!" ढळाढळा रडण्यापलिकडे आदिती काही करू शकत नव्हती. राघव त्या सगळ्यात कुठेच दिसत नव्हता. तो तिच्याविरूद्ध नव्हता पण तिच्याबरोबरही नव्हता हे आदितीनी लख्खं ओळखलं. ती परत एकदा तुटली. आपण जे काही केलंय ते चुकीचंच आहे पण त्यामुळे राघवला मान खाली घालायला लागतेय यामुळे तिला अजूनच अपराधी वाटायला लागलं. आदितीला आता रडताही येत नव्हतं इतकी ती दमली होती. "मणी धिस इज नॉट मी. मला कळत नाही व्हॉट केम ओव्हर मी आणि मी असं बोलले. पण धिस इज नॉट मी. मला सहनच होईना गं तिचं वागणं. सॉरी." मणीनी तिला जवळ घेऊन थोपटलं पण अजूनही राधव तिला दिसत नव्हता. आदिती शांतच होऊ शकत नव्हती. शेवटी कसेतरी चार घास पोटात ढकलून अविनाश बाकी सगळ्यांना लॉजवर सोडून आला आणि उरले फक्त राघव, आदिती नि समीर आणि अर्थातच वसुधा.

राघव आदितीकडे बघायलाही तयार नव्हता आणि आदितीची राघवच्या नजरेला नजर देण्याची हिंमत नव्हती. आदिती आणि राधवला असंच लॉजवर सोडणं चांगलं नाही हे अविनाशला व्यवस्थित कळलं होतं. समीर अजूनही आदितीला बोल बोल बोलत होता. त्याला थांबवणं, राघवला समजावणं आणि आदितीला शांत करणं ह्या तिन्ही गोष्टी हळू हळू अविनाश आणि वसुधानी प्रत्यक्षात आणल्या नि त्यांना लॉजवर सोडलं.

दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्टच्या इथे आदिती आल्यावर पातुरकर उठून गेले. जाताना मणीलाही चल म्हणाले. राघवशीही फारसे बोलले नाहीत. मणीला आदितीशी बोलायचं होतं पण तिकडच्या टेबलवर देवीही होती एकटीच बसलेली. "जा तू मणी. राघव आहे माझ्याबरोबर. ती एकटीच बसलीये ना." आदितीने हरलेल्या स्वरात सांगितलं.

गोव्यातले उरलेले तीन दिवस राघवनी आदितीला माफ केलं नाही. कामाच्यापलिकडे तिच्याशी बोलला नाही. एकाच बेडवर असूनही दोन वेगळ्या देशात असल्यासारखे दोघे झोपत होते.

परत मुंबईला आल्यावर हळूहळू राघव आदितीमधे सगळं नॉर्मलवर आलं. किंवा दोघांनी त्या प्रसंगाबद्दल तोंडाला, मनाला कुलूप लावून घेतलं. आजही दोघांचं एकमेकांवर तितकंच प्रेम आहे. आणि आता त्यांच्या छकुलीवरही. छान हसतंखेळतं घर आहे त्यांचं. आदिती आपलं आपलं यश मिळवतेय गाण्यामधे. पण मधूनच कधीतरी आदितीला स्वतःचं घाणेरडं बोलणं, राघवचं तात्पुरतं का होईना गायब होणं, आठ्या पडलेला चेहरा, डोळ्यातली चीड हे सगळं आठवतं आणि तिचं अवसान गळतं. मग काही बोलायची तिला भिती वाटायला लागते. ऐनवेळेला राघव आपल्याला एकटीला सोडेल की काय अशी भिती तिचं सगळं असणं खाउन टाकते. पण हा विषय त्याच्याकडे काढायची तिची हिंमत नाही.

राघवनी त्यानंतर आदितीला गोव्याला घेउन जाणं टाळलं. त्या प्रकारानंतर कितीतरी दिवस वसुधा आणि अविनाशच्या समोर जाणं त्याला जड होत होतं.

देवी कधी नव्हे ते स्वत:च्या वागण्याबद्दल विचार करते. समीर आजही आदितीला या गोष्टीवरून टोमणा मारायची संधी सोडत नाही. मणी आजही सगळा दोष आदितीला देऊ शकत नाही. पातुरकर आजही आदितीशी बोलत नाहीत.

------------------------------------------------- समाप्त -------------------------------------------------

- नी

प्रकार: 
शब्दखुणा: 

ह्यातल्या देवी टाईप एका कॅरॅक्टरने मला खूप त्रास देउन झालेला आहे. नशीब तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं.

त्यात असणार्‍यांची हरण्याची गोष्ट! >> ह्यात हरणे का? अदितीला राघव बायको म्हणून वागवतोय. आणि गोव्यालाही तो जातोय. मग हरले कोण ह्यात? फक्त एक अनपेक्षित अप्रिय, प्रसंग बाकी आयुष्य मागील पानावरून पुढे चालू... वूडी अलेन च्या गोष्टींसारखे Happy

ह्यातल्या देवी टाईप एका कॅरॅक्टरने मला खूप त्रास देउन झालेला आहे. नशीब तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं>>>>>>>>>>. मला पण ... Sad अशा प्रकारच्या मुली सिंपथी गेन करण्यात एक्स्पर्ट असतात.. Angry

पण नक्की हरलयं कोण?? पझेसिव्ह आदिती की बेफिकीर बिनधास्त देवी??? की आपल्या बायकोला विश्वासात घेउ न शकणारा राघव??? गोष्टीत एका ठिकाणी लिहिलय की ... देवी आणि राघव च्या एक सिगरेट शेअर करण्यावर आदितीला प्रॉब्लेम झाला नाही तर ती ओवर पझेसिव्ह कशी आणि का झाली??? मी दोनदा वाचली गोष्ट पण काही गोष्टींचे आकलन झाले नाही... बाकी नीधप तुमची लिहिण्याची शैली ओघवती आहे....टिपीकल गोष्ट न लिहीता रोजच्या लाइफ मधे एखादा माणुस ज्या पद्धतीने जगतो ते तुम्ही कागदावर (स्क्रीन वर ) उतरवता...
मला जे वाटलं ते मी लिहिलं.. चु भु द्या घ्या.....

सिमन्तिनी, छोट्या मोठ्या प्रसंगात एक माणूस म्हणून हारजीत असते ना. स्वतःशी वा परिस्थितीशी जिंकणे/ हरणे असते ना. या प्रसंगात सगळेच हरले. म्हणून तर टायटल तसं आहे.

नी, खूप आवडली कथा.. तुला मनुष्यस्वभावाचे असंख्य कंगोरे, नेमक्या शब्दांत रंगवण्याची विलक्षण हातोटी जमली आहे..
मस्त!!! Happy

खुप आवडली कथा आणि कुठेतरी relate हि झाली, अगदी स्वतः ला जे जे म्हणुन वाटत होत जे अदितिलाहि वाट्ल, ते ते तुम्ही इथे समर्थपणे मान्डल, अस वाट्तय, त्यातुन थोड्या फार प्रमाणात का होईना, गेल असल्यामुळे कदाचित.
पण एक third partyम्हणुन अदिति जशी वागली तशी न वागता कशा प्रकारे वागायला हव होत, त्याच उत्तर अजुनहि सापड्लेल नाहि, आणि maximum पुरुश असेच react होत असल्यामुळे ह्यातुन हरणे कसे थाम्बवता येइल नाहि माहित.

पण एक third partyम्हणुन अदिति जशी वागली तशी न वागता कशा प्रकारे वागायला हव होत, त्याच उत्तर अजुनहि सापड्लेल नाहि, >> मुळात समाजात असलेल सिंगल=अव्हेलेबल समीकरण बदलत नाही तोवर ह्या असल्या अदिती विविध रुपात सापडत राहणार. ते इतके मनात खोलवर रुजलेले असते कि परिस्थितीचे खतपाणी मिळताच त्या बीजाला असली मुक्ताफळे येतात. स्त्री बद्दल विवाहित आहे म्हणजे १०० पुरुषांबरोबर झोपत नसेल आणि विवाहित नाही म्हणजे १०० पुरुषांबरोबर (आणि काही स्त्रियांबरोबरही कदाचित) झोपत असणार हे समीकरण जोवर समाजात आहे तोवर हे उत्तर सापडणे कठीण आहे.

सॉरी सिमंतिनी पण ही सिंगल व्हर्सेस विवाहित अश्या नोटवर नाहीये. सिंगल म्हणजे बिचारी चांगली बाई, विवाहित म्हणजे कजाग कुजकट बाई असली समीकरणं या कथेतून मांडलीयेत असा ग्रह होत असेल, असल्या कुठल्याही समीकरणांवर माझा विश्वास नसताना तेच प्रोजेक्ट होत असेलतर मी कथा नष्ट केलेली बरी.

आईग, अगदी नष्ट वर का गेलीस??!!! कथा खूप चांगली आहे. सिंगल व्हर्सेस विवाहित अशा अर्थाने मला वाटली नाही. पण स्त्रीच्या चारित्र्याचे स्त्रियाच कसा मापदंड लावतात ह्याचा उत्तम नमुना आहे. तू कथेत अदिती अविवाहित दाखवली असतीस तरी ही कथा तितकीच पटली असती. कुणाला विवाहित अदिती बिचारी वाटेल कुणाला देवी बिचारी वाटेल. बिचारी असण्यावरून ती कथेची नायिका ठरवणारे वाचकही असतील. कथेतून वाचक काय घेतो ह्यावर लेखकाचा कितीसा कंट्रोल असतो? उत्तम कथा आहे, माझी प्रतिक्रिया आवडली नसेल तर ती मी काढून टाकते.

अगं कसलं धोकादायक आणि चुकीचं समीकरण आहे ते.

प्रतिक्रिया न आवडण्याचा प्रश्न नाही सिमंतिनी. चुकीचे समीकरण माझ्या लिखाणातून प्रोजेक्ट होण्याचा प्रश्न आहे. तसे होणे हे मला माझ्यासाठी चुकीचे वाटते.

वेल, अदिती असे बोलली त्यामागे कदाचित तिच्या मनातील (तुझ्या नाही Happy ) हे समीकरण असावे हे माझे इंटरप्रेटेशन झाले. इतर वाचक काही वेगळे मांडतील...

Pages