तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी

Submitted by बेफ़िकीर on 17 November, 2010 - 02:32

आईसमोरी थांबुनी मी शेवटी अभ्यासली
मी पोरका होणार ही जाणीव हृदयापासली

तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी
आम्हा तिघांना स्पर्शुनी आई कशीशी हासली

याच्यापुढे पाठीवरी फिरणार नाही हात तो
मी काल त्या हातावरी ही पाठ माझी घासली

मी वेगळा माणूस हे मानून मी मिरवायचो
ही निर्मिती आई तुझी जी आजवर जोपासली

जी घ्यायची अंगावरी, हातास जेव्हा लागली
आश्चर्य की ती शालही आईप्रमाणे भासली

त्यांच्या कुशीमध्येच मी आक्रंदलो बिलगूनसा
ज्या माणसांना मी कधी समजायचो मागासली

वाटायचे की खूप काही साधले आहे इथे
चाळीस वर्षे राहिलो, चाळीस वर्षे नासली

अक्षर तुझ्याशी बोलण्यासाठी सदा जी धडपडे
का 'बेफिकिर' झाली, तुझी आई कशाने त्रासली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफीकीर,
तुमची परिस्थीतीच अशी आहे की काय बोलू कळत नाही.
पण एवढे मात्र नक्की, की पॉसिटिव्ह विचार करा, बघा आई बरी होते की नाही..
आयुष्यात नेगेटिव्ह ऑरात राहीले की मन तसाच विचार करत राहत. आणी कदाचीत त्यामुळेच आपल्याला रिझ्ल्टही तसेच येउ लागतात. म्हणूनच एकच विनन्ती करु इच्छीतो की नेहमी आपल्याबाबत काहीतरी चान्गल घडतय असा विचार करा... चान्गले रिझ्ल्टही मिळतीलही कदाचीत... बघा अनुभवून.......
क.लो.अ

बेफिकीरजी आईला जे जे आवडत, ते करण्याचा प्रयत्न करा. तिला आवडत असतिल तर पोथ्या / ग्रन्थ
वाचून दाखवा. तूमच्या लहानपणीच्या त्याना आवडणार्‍या आठवणि त्याना सान्गा. आयुष्याची दोरी
परमेश्वराच्या हाती असते. त्याची प्रार्थना करा. जास्तित् जास्त वेळ आईच्या सहवासात घालवा. ति पूर्ण बरी
होईल अशी आशा बाळगा. नक्कीच चान्गले घडेल. काळजी घ्या.

तुम्ही सगळे लोक फार छान लिहिता... आयुष्यातील इतका प्रचंड त्रासदायक क्षण... पण तो सकारात्मक पद्धतीने कसा जगावा, यावर सर्वांनी किती सुंदर लिहिलेय. मी मायबोलीकर झाले, याचा मला खुप अभिमान वाटतोय...
बेफिकीरजींनी जे मनोगत लिहिले, ते वाचून खुप बरे वाटले. आपण सगळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत, याचा त्यांच्यावर झालेला पॉझिटिव्ह इम्पॅक्टच त्यांच्या त्या मनोगतातून जाणवला. आपल्या सर्वांचे हेच पॉझिटिव्ह व्हाईब्ज बेफिकीरजींच्या आईंपर्यंत त्यांच्यामार्फत पोहोचो आणि त्यांचे आयुष्य वाढो हिच प्रार्थना मनोमन सतत करत राहिन.
नंद्या यांचे वाक्य फार आवडले. बेफिकीरजी, काळजी घ्या. काळजी करु नका...

Sad
जो काही वेळ मिळतोय त्याचं चीज करा.. नीरजा म्हणतेय त्याप्रमाणे अचानक धक्का बसला असता तर जास्त वाइट.माझे वडीले गेले तेव्हा त्यांचं अंत्यदर्शनही माझ्या आणि माझ्या भावाच्या नशिबी नव्हतं.. मुलगा असुनही त्याच्या हातुन अग्नि नाही दिला गेला..इलाज नाही, ईश्वरी इच्छा असं म्हणायचं बस्स.
काळजी घ्या.

आईच्यापुढे काळजी करत बसु नका.तुमच्या चेहर्यावरची चिंता त्या पाहू शकणार नाहीत.अर्थात कुठ्लीच आई पाहू शकत नाही.त्यांना जास्तीत जास्त आनंद द्या.जास्तीत जास्त वेळ द्या.

बेफिकीर,
मी तूमच्या एखाद्या गझलेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देतोय.
अगदी स्पष्टपणे लिहितोय, हि गझल लिहायला नको होती. डॉक्टर म्हणजे कुणी विधाता वा सर्वज्ञ नाही. जिथे जन्माची तारीख नीट सांगता येत नाही, तिथे हि का सांगावी ?
जीवन आहे तोपर्यंत त्याचा सोहळा करायचा असतो.
तूमच्या मातोश्रींना उदंड आयूष्य लाभो. याला प्रार्थना म्हणा, सदिच्छा म्हणा, विश्वास म्हणा की आशावाद म्हणा.
प्रत्येक क्षण तूम्ही सर्वानी आनंदात घालवावा, अशी विनंती करतो.
लाईफ इज ब्यूटीफूल ...

मी माबोवर नवीन आहे. मला तुमच्या आईंविषयी काहीच माहीत नाही.
......पण जी काही परिस्थिती असेल त्यातून पार पडण्यासाठी तुम्हाला बळ यावं, अशी सदिच्छा.

दिनेश दाच्या आशावादाशी सहमत..

<< जीवन आहे तोपर्यंत त्याचा सोहळा करायचा असतो. >> काळजी घेता घेता प्रत्येक क्षण सोहळा होऊ दे माऊलि सोबत..

.

भूषणजी,
कालायः तस्मे नमः आणि वेळ कॉणावर सान्गुन येत नाहि म्हणे.आपाली ही कविता आपला वयिक्तिक अनुभव असेल तर वेळ सान्गुन आलेली आहे; तरीही आपल्या मनातील गोष्टी आपण पुर्ण करुच असे होत नाहि; जसे की आईला जगभर फिरवून आणणे, तिला हवे ते खाऊ घालणे, तिच्या मनासारखे वागणे, इ. इ. तारीख पुढे ढकलली तरीही हे शक्य होईलच असे नाही, वस्तुस्थिती स्विकारणे, एवढेच आपल्या हाती. मनामध्ये कोणताआअपाराधी पणा असेल तर तो काढून कसा टाकता येईल किंवा कोठूनही मागूनही न मिळनार्या मायेच्या छायेत कसे राहून कृतद्नता व्यक्त करता येईल, एवढे पाहणे हेच आपल्या हाती. आईच्या पदराला कोणतीच सीमा नसते, फक्त गहराई असते.
आपली ही रचना सुन्न करून गेली.
-सविनय.

सर्व आधार देणार्‍यांचे मनापासून आभार!

दिनेश - खरे आहे. आम्ही सगळेच जास्तीत जास्त आनंदात तिच्यासमोर वावरतो आहोत. खरे तर, आनंदात म्हणण्यापेक्षा अ‍ॅज यूज्वल! मात्र परिस्थिती अशी आहे की माझे सख्खे काकाच ऑन्कॉलॉजिस्ट आहेत. ते अ‍ॅरिझोनाला असतात. ते काल आणि परवा दोन दिवस मुद्दाम येऊन गेले आईला भेटण्यासाठी! त्यांचीच ट्रीटमेंट चालू आहे. त्यांनी काही नवीन व्हॅक्सीन्स व क्रीम्स बनवूनही घेतली पुण्यातील एका फार्मसीकडून! मात्र रोग पसरला आहे. त्यांच्या चाळीस वर्षाच्या अनुभवानुसार ती अजून एक महिना किंवा फार तर आणखीन काही दिवस असेल! त्यातच त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हॉस्पीटलमध्ये जो एक प्रयोग अनेकदा यशस्वीरीत्या केलेला आहे तो तिच्यावरही केला. एक विशिष्ट लस त्यांनी काल तिला दिली. तिचा उपयोग झाला तर कदाचित आणखीन दोन महिने! दॅट्स इट!

'तारीख' या शब्दाचा शब्दशः अर्थ नाही. गझलेत शब्दशः अर्थ अनेकदा नसतातच! तसेच, गझल काय किंवा कोणतीही कविता काय, भावना व्यक्त करण्याचे व तेही उत्स्फुर्तपणे, माध्यम आहे. मी मायबोलीवर लिहीत आहे म्हणून येथे प्रकाशित केली. एकदा कविता रचून पूर्ण झाली की त्रास बराच कमी होतो.

झाले असे की, आमच्याबरोबरच तिलाही ती जाणीव त्या दिवशी अचानक झाली जेव्हा सी टी स्कॅनचा रिपोर्ट आला. १५ नोव्हेंबरला हे घडले. बाबांना धीर देऊन मी एकटाच बाहेर जाऊन रडलो. कारण आईच्या नजरेत काहीतरी दिसले होते आम्हाला सगळ्यांना! भरपूर नातेवाईक आहेत, मित्र आहेत! सगळे सतत असतातही घरात! पण शेवटी आपले कुटुंब ते आपले कुटुंब! दिड दोन दिवस सावरण्यात गेल्यानंतर त्या भावनेला अशी वाट करून दिली.

सर्वांचे पुन्हा आभार!

-'बेफिकीर'!

बेफिकीर,
तुमच्या भावना मी समजू शकतो. कारण, मीही याच प्रकारच्या भावनेतून गेलो आहे. तुमच्या आईस झालेला आजार माझ्याही आईला होता. त्यामुळे नेमके काय असते ते मला माहीत आहे. आईचा वियोग ही फार चटका देणारी गोष्ट असते. त्या भावनेतून तुम्हाला ही रचना सुचली असे मी मानतो.

तरीही माझ्यामते या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही 'गझल' हा फॉर्म निवडण्यापेक्षा छंद कविता केली असतीत तर अधिक उचित झाले असते असे वाटते.

तुमच्या भावनेत सहभागी..!

तुमची तगमग समजतेय....... काळजी घ्या. आईसोबत जास्तीत जास्त काळ घालवा. तुमची आई लवकरात लवकर बरी होवो अशी देवाजवळ मनापासून प्रार्थना !!

अजय, जयश्री, जागू आणि आकाशकंदील,

मनापासून आभारी आहे.

अजय , खरे आहे! अनेकदा तुम्हाला भेटताना मला आश्चर्य वाटते ते याचे की तुमच्यावरून तर दोन्ही छत्रे निघून गेली आहेत. तरीही तुम्ही शांत असता.

-'बेफिकीर'!

Pages