जुन्नरच्या आठवणी

Submitted by झकासराव on 23 May, 2008 - 01:22

सुट्ट्यामधली गमती जमती.--
पोहणे
मी एका दिवसात ६-६ वेळा अंघोळ केली असेल ह्या पोहण्याच्या नादात.
म्हशी चरायला नेणे. (इथे म्हशी ४ असायच्या आणि चारायला नेणारे ६ जण )
त्यावेळी सगळ्या म्हशीना चरायला सोडून तल्लीन होउन पत्त्यांचा डाव मांडणे (वक्कय, पाच तीन दोन, मेंढीकोट ई. ई.)
पत्ते नसतील तर (घरातले एक काका आमचे पत्ते चुलीत टाकुन देत सापडले तर म्हणून ते लपवण्याची खास जागा असे. पण तरिदेखील सापडले आणि त्याची राख झाली तरच अशी स्थिती) क्वचित क्रिकेटचा खेळ मांडायचा.
नाहितर मग आंबे, करवंद, जांभळ असा रानमेवा लुटायला जायच. प्रत्येक झाडावर पहारा नसायचाच. त्यामुळे मजा असायची. हे झाड कोणाच ह्याचा फार विचार आम्ही करत नसु.
ते नसेल तर मग तांबड्या मातीच्या जमिनीत मोठी मोठी ढेकळ असत. त्यात बर्‍यापैकी सपाट दगडांची गाडी करुन रस्ता बनवणे व गाडी गाडी खेळणे. हे करताना आम्हे रस्ता फारच सिस्टीमॅटिक पद्धतीत करत असु. आम्हाला जेवढ ज्ञान होत गावांच आणि रस्त्यांच्या दिशेच ते सगळ पणाला लावत होतो. आजुबाजुच्या सगळ्या गावची नाव आणि गाव असायचीत रस्त्यावर
अधे मधे लावलेल्या कांद्याच्या वरच्या पाती काढुन त्याचा पाइप लाइन हा खेळ असायचा. त्यात त्या पाती अलगद कांद्याला धक्का न लावता तोडून घेवुन त्या एकमेकात घुसवुन त्याची पाइपलाइन. आणि आमच्या डोहाच्या जवळच एक छोटा "पाट" (शेताला पाणी वाहुन नेण्यासाठी असलेला रस्ता) होता. त्याला दोन ठिकाणी उमाळे होते, त्यामुळे त्यात नेहमी थोड थोड पाणी असायचच. ते आमच धरण. मग त्याच नाव राधानगरी धरण असायच आणि नदीच नाव वारणा
काय मजा होती राव.
एकदा पत्त्यांच्या नादात म्हशींच्या धाराची वेळ होउन गेली तरी आम्ही लक्षच दिल नव्हतं. आणि तशी सगळी गुर शहाणी होती फार लांब जायची नाहीत. पण त्यावेळी ती सगळी नजरेच्या टप्प्याच्याच काय तर हाकेच्या देखील बाहेर होती. आणि आमची एक मावशी वरुन आम्हाला शिव्या देत येत होती धारची येळ झाली तरी कुठ बसलायसा अस म्हणत. आणि मग काय म्हशी शोधण्यात अजुन अर्धा तास गेला होता. धारेची वेळ टळुन गेली. त्यामुळे त्या दिवशी दुध डेअरीला गेले नाही. आम्ही मग सगळ्या मोठ्यांची नजर चुकवत गुपचुप शांतपणे घरी गेलो. इमानदारीत हातपाय धुवुन चहा पिउन हळुच घराबाहेर सटकलो आणि समोरच्या घराच्या बाजुच्या आमच्या अड्ड्यावर जावुन बसलो होतो.
काय आयुष्य होत राव मस्त.
त्यावेळी टीव्ही खेडोपाडी पोचले नव्हतेच. एखादाच असायचा. पण आम्हाला त्याची कधीच गरज वाटली नाही.
क्वचित आईसक्रीम वाला यायचा. कोन मधुन किंवा मग लाल रंगाच बर्फाच
ते घ्यायला गेल कि पैसे किंवा एक वाटी भात त्याला घालायचे.
मग आरामात आइसक्रीम खात बसायच. त्या आइसक्रीमवाल्याच मात्र आम्हाला फार आकर्षण होत. तो आला की न चुकता खायच म्हणजे खायचच/ काय करणार तो यायचा १५-२० दिवसातुन एकदाच.
अजुन काही धमाल होत ते म्हणजे काजु.
काजु छोटा असतानाच त्यावर हा माझा हा तुझा असा मालकी हक्क सांगुन ठेवायचा. थोडा मोठा झाला अस वाटल की लग्गेच त्याची बी गायब करायची.
मग यथावकाश काजु पिकला की खायचा.
काजुच्या बियांचा कधी कधी प्रोग्राम होत असे. आम्ही चुलीसमोर बसुन त्या भाजुन फोडून खात असे. हे भाजण्याच काम मात्र फार सावधानतेन कराव लागे नायतर तो गरम चिक उडाला की फार त्रास व्हायचा.
तिकडे गोट्या (कंची) चा खेळ फारसा नव्हता. आमचा काजुच्या बियांचा खेळ असायचा त्याऐवजी. ज्या दिवशी जास्त बिया जिंकणार त्या दिवशी तर काजुच्या बिया भाजण्याचा कार्यक्रम १००%
रात्रीच्या वेळी अजुन एक हमखास असणार काम म्हणजे यष्टी आली (त्या गावात एकच यष्टी रात्रीची मुक्कामाची) कि त्यातन गावात कोण कोण आल हे बघणे. मग ते झाल की जेवण करुन बाहेर हवेला झोपणे. (अर्थात हे बिबटे रावांवर अवलंबुन असायच. तो फिरतोय अशी वंदता असली कि गुपचुप घरात नायतर बाहेर पिंजर टाकुन त्यावर "वाकळ" अंथरुन झोपणे. अर्थात झोपताना दिवसभरात काय काय धमाल केली त्याच्या गप्पा किंवा उद्या कुठे डल्ला मारायचा आहे का किंवा उद्याच खेळ काय हे चर्चा. )
अजुन एक खेळ होता तो म्हणजे रिंगण. एक लोखंडी रिंगण घ्यायच. त्याला फिरवायला एक "सळा" असायचा ज्याच्या पुढच्या टोकाला "U" शेप असायचा. आणि ते रिंगण त्या सळ्याने फिरवायच न पाडता. खुप मजा येत होती. आता ते रिंगण गावी देखील पहायला नाही मिळत.
बरच काही होत यार. लिहित गेलो तस एक एक आठवत राहिल बघ.

कीरखाती हा शब्द प्रथमच ऐकला.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वच हो म्हणत आहेत, गर्दीबिर्दी व्हायची,म्हनून नाही म्हणू का?
श्रावणा, काही महिन्यापुर्वी अगदी प्रकर्षाने जानवले कि गावचा सर्वसाधारण मानुस दैनन्दिन जिवनात कसा फसविला
जात आहे व्यापार्याकडून. वजन आणी भेसळ्.सरकारी यन्त्रणा तर फक्त नावालाच असावी.याबद्दल काही अशा उपक्रमातर्फे
करता येइल का? निदान गावकर्‍यानी पुढाकार घेवुन निदान स्थानिक दुकानावर तरी लक्ष ठेवता येइल असे मला वाटते.

........................................................................................................................................
....................................................आनंदवनाची आठवण.............................................................
........................................................................................................................................

जुन्नरकर लोकहो, मी आनंदवनाला भेट दिली होती. तिथला अनुभव मी मागेही शब्दबध्द केला होता पण वाहत्या पानावरुन तो वाहून गेला. हा अनुभव पुन्हा तुमच्या बरोबर वाटतो आहे. असे फार कमी क्षण असतात की ज्यांच्याबद्दल परत परत बोलताना आपण थकत नाहीत. ते घट्ट आपल्या आत रुतून बसलेले असतात. पुन्हा पुन्हा ओठावर येतात आणी मात्र तरीही त्यांचा गोडवा कणभरही कमी होत नाही. ही माझी अशीच एक मोरपिशी आठवण आहे.

मी स्वतःला भाग्यवंत समजतो कारण बाबा आमटेंना मी प्रत्यक्ष भेटू शकलो आहे. साधनाताईंबरोबर मनसोक्त गप्प मारल्या आहेत.
तो अनुभव खरोखरच अविस्मरणीय आहे. शुन्यातून विश्व उभे करणे म्हणजे काय असते हे जर अनुभवायचे असेल तर तिथे एकदा भेट देऊन याच मित्रहो!

मोठ्या प्रवेशद्वारातून आनंदवनात प्रवेश केला. आत आश्रमापर्यंत पोहचण्यासाठी बरेच चालावे लागले. कमालीची स्वच्छता होती सगळीकडे. केवळ आदल्या दिवश फोन करुन खोल्या बुक केल्या होत्या तिथे. मुख्य चौकात टी.व्ही. चालू होता. सगळे लोक एकत्रीत बघण्याचा आनंद लुटत होते. सगळीकडे एक आत्मीयता भरुन राहीली आहे असे जाणवत होते. रात्रीच्या जेवणासाठी लोक आमची वाटच बघत होते. जेवण संपवून आरक्षीत कौलारु खोलीमध्ये प्रवेश केला तेव्हा तिथल्या सुविधा, स्वच्छता, निटनेटकेपणा पाहून अचंबा वाटला. चांगल्या हॉटेल्स मध्ये पण इतकी सोय नसते येवढी उत्तम सोय होती. पांढर्‍या शुभ्र स्वच्छ बेडसीट्स, उशीची अभ्रे, पडदे, अगदी पाण्यावर चालणारे आनंदवनातच तयार केलेले एअर कुलरसुध्दा!

दुसर्‍या दिवशी अनाथाश्रमातील एक मुलगा आमच्यासोबतीला होता, आनंदवन दाखविण्यासाठी. हो, तिथे केवळ कुष्ठरोग्याचा आश्रम नाहीये. तिथे अनाथालय, वृध्दाश्रम पण आहेत. काय नाहीये तिथे? हॉस्पिटल, पोस्ट, शाळा, तंत्रशिक्षण देणारी कार्यशाळा, प्लॅस्टीक रिसायकल करणारे युनिट (आनंदवनात प्लॅस्टीकचा कचरा होत नाही, पुर्णपणे रिसायकल केले जाते), अबला महिलांना सबला बनविणारे गृहोद्योग आणी त्याबाबतच्या कार्यशाळा, हातमाग,यंत्रमाग. यावर कुष्ठरोगी सुंदर कपडे तयार करतात. या सगळ्या गोष्टी पुर्णपणे आनंदवनामार्फतच चालविल्या जातात. तिथून हाताने तयार केलेली शुभेच्छापत्रे विकत घेतली. इतकी सुंदर कार्डस मी आर्चीजमध्ये पण नाही पाहीलीत अद्याप. आणी ती पण एकदम वाजवी दरात!

आनंदवनाची शेती आहे. मोठे तळे तिथल्या लोकांनी स्वतः खोदून, विहिरी बांधून पाण्याची सोय केली आहे. इथले लोक केवळ स्वतःपुरते नव्हे तर इतर भागात विक्रीसाठी पाठवता येईल इतके उत्पादन घेतात. मी वर उल्लेख केलेल्या कार्यशाळेत आश्रमाबाहेरील गरीब विद्यार्थ्यांना पुर्ण मोफत प्रशिक्षण दिले जाते. म्हणजे हे हात केवळ घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी पण उठतात ही चेतना बाबांनी तिथल्या लोकांत जागविली आहे. सगळे तिथले लोक किती सुंदर दिसतात खरे तर ही भावना घेऊन जगताना!

दिवसभर आनंदवन फिरुन झाल्यावर संध्याकाळी बाबांनी स्वतःहून भेटण्यासाठीची वेळ कळविली. हे एतके अनपेक्षीत होते की एवढा पसारा संभाळूनपण हा माणूस इथे येणार्‍या प्रत्येक आगंतुकाची जातीने दखल घेत होता. घरात प्रथम साधनाताईंनी स्वागत केले. बाबा एवहे मोठे काम उभे करु शकले कारण त्यांच्याबरोबर साधनाताईअपण तितक्याच ठामपणे उभ्या होत्या. तदनंतर लगेच बाबांच्या खोलीत गेलो. बाबा शेवटचे बरेच वर्ष बिछान्यावर पडून होते. रोज संध्याकाळी त्यांचे सहकारी त्यांना फिरायला बाहेर घेऊन जात असत. दहा मिनिटे बाबांबरोबर होतो. ते क्षण माझ्या जीवनातले अत्युच्य आनंदाचे क्षण आहेत. त्या आठवणी विसरता येणार नाहीत. वयाच्या नव्वदीनंतरही एवढ्या ढोर कष्टानंतर हा माणूस थकल्याचे जाणवत नव्हते. बुध्दी आणी स्मरणशक्ती अगदी उत्तम काम करत होते. त्या तेवढ्याशा वेळात पण त्यांनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. खरोखरीच अविस्मरणीय आहेत त्या आठवणी!

तिसर्‍या दिवशी या सगळ्या रम्य आठवणी उरात साठवून परतीच्या प्रवासाची तयारी करुन बिल देण्यासाठी कार्यालयात गेलो. आधीच जेवनावळीच्या हॉलमध्ये खोलीभाडे, जेवन, चहा, नाश्ता यांचे दर दर्शविणारा फलक लावला आहे तो वाचला होता. त्याप्रमाणे मनातल्या मनात हिशोब करुन ठेवला होता. पण इथे कार्यालयातील कर्मचार्‍याने धक्का दिला. त्यांनी बिलाची रक्कम म्हणून काही सांगीतलेच नाही. 'तुम्हाला वाटतील तेवढेच पैसे द्या' असा निरोप आल्यावर खरोखरच थक्क होण्याची पाळी आमची होती.

असा सेवाभावी प्रकल्प राबवूनही तिथे येणार्‍या पाहुण्यांकडून मोबदला हे लोक मागत नव्हते. हे आदरातिथ्य शब्दातीत होते. जे लोक बाहेरच्य जगात भीक मागण्याच्या पण लायक समजले जात नाहीत (दुर्दैवाने हे खरे आहे, शब्द जरी तिव्र असले तरी) त्या लोकांचे हे औदार्य कल्पनेपलीकडचे होते. आम्ही केवळ निशब्द होतो. आम्ही अर्थातच हिशोबापेक्षा जास्त रक्कम दिली. पण त्या सगळ्या अनुभवाचे मोल मी अद्याप करु शकलो नाहीये. बाबांनी किती स्फुल्लींगे चेतवलीत हे पदोपदी जाणवत होते. हे खरे पुर्नवसन आहे. केवळ शारिरीक नव्हे तर मानसिक पुर्नवसन!
आनंदवन डोळ्यात पुन्हा पुन्हा साठवून आणी प्रत्येक वर्षी इथे भेट द्यायचीच असे ठरवून मार्गस्थ झालो. नोकरी, घर, गाव असे चक्र पुन्हा सुरु झाले. अद्याप पुन्हा तिथे जाणे झाले नाही. पण मित्रहो आयुष्यातील दोन-तिन वर्ष तिथे घालवायचीच हे मात्र मी निश्चीत केलेय.
......................................................................................................................................

व्व श्रावन व्वा,एक प्रकरच हेवा वाट्तो तुमचा अन खंतही की ह्या अशा गोष्टिंचा
संपर्क अगोदर आला असता तर रुटीन चाकोरीतुन प्रवास स्विकारण्याचा पुर्णविचार
नक्कीच केला असता.शिवाय इटस नेव्हर लेट यावरही ठाम विश्वास्.त्यामुळे
कडा जवळ आहे असे वाट्ते.तो हेमलकसाचाही लेख अतिशय आवडला होता.
झुलेलाल ने आपल्या त्या जाधवांच्या समतोल साठी संगनकाची गरज भासु लागली
आहे हे आव्हान वाचले.अन हो,बंगलोरला चांगलेच हादरविलेले वाचले अन त्यापाठोपाठ आता अहमदाबादही!

वर्षा, छान आठवण सांगितलीस. पण थोडिशी दुरुस्ती. लग्नानंतर पहिल्यांदा मुलगी सासरहुन माहेरी जाते तेव्हा सासरचेहि मुलीला भजे, पाटवड्या इ. बांधुन नविन सुनेबरोबर देतात, तेहि तिच्या माहेरी भाऊबंदांना वाटले जातात, तसेच माहेराहुनही तिला अशाच प्रकारचे खाद्यपदार्थ बांधुन दिले जातात सासरच्या भाऊबंदांना वाटण्यासाठि. ह्या खाद्यपदार्थांना "बुत" म्हणतात. ती बहुतेकदा पांढर्‍या धोतरात किंवा एखाद्या स्वच्छ कापडात बांधुन देत. हा बुत उघडण्याचा मान घरातिल कर्त्या / वयस्कर बाईचा असे.

आता श्रावणपाटिबद्दल. नविन नवरीला लग्नानंतर येणार्‍या पहिल्या आषाढ महिन्यात रीतिप्रमाणे तिच्या माहेराहुन तिला न्यायला येत. (का तर म्हणे त्या आषाढ महिन्यात नवर्‍याचे तोंड बघायचे नसते. ) Happy महिनाभर माहेरी मजा केल्यावर श्रावणात तिच्या सासरवरुन तिला न्यायला येत. बहुतेकदा सासरे, दिर असे कोणीतरी असे. (नवरा नाहि) माहेराहुन नव्या कोर्‍या पाटित पोळ्या, भजे, पाटवड्या इ. भरुन ती पाटि आणी मुलगी सासरच्या मंडळिंच्या सुपुर्त केली जात असे. पण त्याबदल्यात सासरकडुन मुलीला श्रावणपाटिची साडि द्यावी लागे. बर्‍याचदा तिच्या माहेरच्याहि एक दोन मानाच्या बायकांना साडी दिलि जाई.
मुलीने सासरी जाताना नवी सासरहुन आलेली साडी नेसुन जायचा रीवाज आहे.

तर मंडळिंनो, हे सगळ मला इंत्यंभुत माहिती असण्याच कारण अस की काहि वर्षांपुर्वी मीही ह्यातुन गेले आहे. आता लिहिताना आठवुनहि खुप मजा येतेय. मला न्यायला सासरे आले होते. Happy

प्रतिभाच्या सासूबाई महान आहेत. सुनेला आयत्या पुरणपोळ्या उपलब्ध आहेत म्हणजे कित्ती कित्ती ग्रेट !!!

प्रतिभा कोल्हापूरला जाऊन तिथल्या म्हशी पाहिल्या की नाही? नसशील तर काही अर्थ नाही त्या ट्रीपला.

कोरठणच्या खंडोबाची यात्रा झाली जोरात. लहानपणानन्तर गेलोच नाही कधी. दर वेळेस काही ना काही अडचण. यन्दा ठरवले होते काही झाले तरी जायचेच्.पूर्वी आम्ही पौर्णिमेच्या चांदण्या रात्री पायी यात्रेला यायचो. खिशात मुश्किलीने पाचेक रुपये असत्.रात्री थन्डीत जत्रेतल्या शेकोट्यांच्या पुढे उभे रहात फिरत रहायचे. या शेकोट्यांचीही गम्मतच असते. पुढून चांगले भाजत असते अन मागे पाठीला झोम्बरे वारे लागत असते .मग तेलात तळलेल्या जिलेब्या खा, भजी खा. अन रेवड्या !! रेवड्या आणि गोडीशेव हा तर खन्डोबाच्या जत्रेचा ब्रॅन्डच आहे. आणि पिवळट पांढर्‍या रेवड्या अन लालभडक गोडीशेवेचे कॉम्बिनेशन अफलातून. बासरी वाजवता येत नसता विकत घे. मध्ये काच असलेला व दोन्ही बाजूनी घडी घालून ते चित्र उलट बाजूने आणायचा एक खेळ होता. त्याला आम्ही सिनेमा('शिलिमा खरे तर.) म्हणत असू.विमान , रेल्वे, बोट, ट्राम अशी चित्रे असत. कोणाला माहीत आहे का हा खेळ. अंग ठंडीने फुटलेले. सिगरेट ओढायचा मोह होई पन एवढ्या लाम्ब आणि अंधारातही कुणी गाववाल्याने पाहिले तर? या अनाम भीतीनेच हा उत्साह मावळत असे. उधळलेले खोबरे घेण्यासाठी ती धावाधाव. तळ्या भरण्यासाठी माणूस कमी असेल तर कोणीही अनोळखी माणसाला बोलावले जाई. देवळाकडे एवढी प्रचन्ड गर्दी असे की तिकडे जायची हिम्मतच होत नसे.त्या 'काठ्या ' ओढण्याची शर्यत हा एक भयंकरच प्रकार असे. मग बहुधा बेल्ह्याची काठी लागल्याची चर्चा सुरू राही. बेल्हेकर मारामार्‍याही करत. (जुन्नरचे लोकच मुळी.....)
येताना जाताना अक्कलवाडीची दरी दिसे. ती तिथे दरोडी आहे अशी चर्चा चाले.
Angry
नन्तर आठवण आहे लग्नानन्तर जोडीने दर्शनाला जायची. त्यात काय विशेष नाही. माझा नोस्टाल्जिया असला तरी बायकोला काही त्याचे अन त्या परिसराचे सोयरसुतक नव्हते. (नसतेच ते.)परिसर मोकळाच होता .मला माझी लहानपनची जत्रेत फिरणारी बिन चपलेची पावले ओसाड माळावर दिसत होती. कानात जत्रेतले आवाज येत होते.किती वर्षे मागे .. किती वर्षे?

ये क्या जगह है दोस्तों, कौनसा दयार है..
हद ए निगाह तक जहां गुबार ही गुबार है...

सोबत नवी बायको , छोट्या छोट्या मुली- मुले करवल्या , अन हरवलेला मी!
नन्तर गेलो तो व्ही आय पी म्हणून . देवस्थानने कुठल्या पूजेला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलेले.मी तोपर्यन्त पूर्ण नास्तिकतेच्या स्टेजला. पण आयुष्यात अनेक नाटके करावी लागतात तसे हे. पुजारी माझा वर्गमित्रच. कुलकर्णी. पूजा झाली . सत्कार झाले. मन्दीराने केलेल्या 'प्रगतीची' माहीती. फिरून सगळे दाखवणे. मी पुन्हा टाईममशीनमध्ये बसून मागे. रात्री ओसाड माळरानावर शापित गंधर्वाची नगरी प्रकट व्हावी तशी मनात जत्रा पेटलेली. तेलातली जिलेबी. बासरी. पिपाणी, शेकोट्या , खोबरे. फुटलेले ओठ.
जत्रेतला मी ला मी पहातोय. म्हातार्‍या नटाने स्वताचाच नायक असलेला तरुणपनीचा सिनेमा पहावा तसा.
पदाधिकारी देवस्थानच्या जमिनीच्या माझ्याकडेच असलेल्या वादाच्या केसबद्दल मला पुन्हा पुन्हा आठवण करून देत आहेत. कडवट तोंडाने परत फिरलो. अक्कलवाडीची दरी आणि धूसर दरोडी मात्र आहे तिथेच होती.
त्यानन्तरही वर्षामागून वर्षे गेली दर वर्शी यन्दा जायचेच ठरवले. बर्याचदा तर जत्रा झाल्यावर आठवण यायची अन कळायचे यात्रा तर मागच्याच आठवड्यात झाली !! मग पुन्हा पुढच्या वर्षी नक्कीच. आत सगळे उपलब्ध होते. पैसा.अधिकार. गाडी. सेवा. आमन्त्रण्.पण देवाची ओढ मात्र नव्हती. ती वयाच्या निबरट्पणाने की सिनिकपणाने कोण जाणे.
गूगल अर्थ वर जसजसे हाय रिझॉल्यूशन येत गेले तसतसे आपला परिसर घरे 'वरून' न्याहाळण्याचा छन्द लागला. त्यात कोरठण होतेच.(प्रतिभाचे माहेरचे घरदेखील मी गूगल अर्थवरच पाहिले आहे.आणि सासरचे प्रत्यक्ष )असो.
ये किस मकामपे हयात मुझको लेके आ गयी...
ना बस खुशिपे है जहां ,ना गमपे इख्तियार है...

या वेळी चक्क चार दिवसाची सुट्टी लागून आली. त्यात शेवटच्या दोन दिवसात जत्रा खंडोबाची. ऑफिसचा जाच नाही. कार्यक्षेत्रातच खंडोबा. ठरवले. अनाम माणूस म्हणून ओळख न देता जत्रेत घुसायचे. फिरायचे . रात्री अपरात्री. कालचक्र उलटे फिरवू या. उत्कटपणे जाऊ या.
पण.........
पाच तारखेपासून वाहतूकदारांचा सम्प सुरू झाला. त्यात पेट्रोल कम्पन्यांच्या अधिकार्‍यांचा सम्प सुरू झाला..अन सुटीत ऑफिसमध्ये अडकलो. इमर्जन्सी निर्माण झाली. (प्रतिभाला भाजी खाण्यासाठी)ट्रका मुम्बैला पोचवा. पोलीस बदोबस्त द्या. पेट्रोल अधिकार्‍याना दम द्या. एक ना अनेक्..तासातासाला सरकारला माहिती द्या...
सर्व सुट्ट्या ऑफिसमध्ये काढल्या . सुट्या समपल्या. जत्रा सम्पली अन रविवारी रात्री सम्पही मिटले....
अन सोमवारी नॉर्मल ऑफिस सुरू झाले.
याला काय म्हणणार? कुछ पानेके लिये कुछ खोना पडता है?

...पुन्हा पुढच्या वर्षाची वाट..
कदाचित त्याच्या पुढच्या ..
त्याच्या पुढच्याही !!!!

वर्षे तरी किती राहिलीत हाताशी?...

बुला रहा है कौन मुझको, चिलमनोंके उस तरफ..
मेरे लिये भी क्या कोइ , उदास बेकरार है?....

किती छान लिहिताय सगळे.. खूप भावलं मनाला..

प्रतिभा, हूड हे ललितमध्ये टाका ना.. छान लिहिलय.

रॉबीनहूड, धन्यवाद हे इकडे (प्रतिभाच्या कमेंट्ससह) टाकल्याबद्दल..! Happy

धन्यवाद,आय टि गर्ल आणि चिनु.
श्रावण Angry अरे पण रॉबिन नंतर तुझहि इकडे पोस्ट कर कि.

रॉबीनहुड,
कोरठण, थापलींग...हे आमचे सगळ्यांचेच हळवे कोपरे आहेत. आणि तुम्ही सांगीतलेला खेळ माझ्या कडे मी बरेच वर्ष मुद्दाम जपुन ठेवला होता. आगबोट, विमान, घोडा अशी आठ चित्रे असलेला काचेच्या तुकड्याच्या दोन्ही बाजूने चिटकवलेला कागद. किती साधा खेळ.. पण त्यात किती मन रमायचे? .. सध्या जागतीक संवाद वाढलाय. सगळ्या गोष्टी हाताशी आल्यात पण असल्या साध्या गोष्टींमध्ये तास नं तास रमण्याचे दिवस आणी ते मन नाही राहीले याची खंत आहे.

आपण सगळेच इथे जुन्नरच्या विभागात येऊन गप्पा मारतो. काय भावबंध आहेत हे? ही तीच मातीची ओढ जी तुम्ही वर मनातून रिती केली आहेत. माझ्या गावात एखादे जरी जुने घर पाडले किंवा एखादी नवी इमारत उभी राहीली की मी मनातून खट्टू होतो. ते दु:ख उमगत नाही मात्र खुप काही हातातून निसटत चाललेय आणी आपण हतबल आहोत अशी काहीशी असहाय्यतेची भावना असते ती.... आमच्या गावातील दगडी काम असलेली आणी जीर्ण झालेली चावडीची इमारत पाडून तिथे ग्रामसचिवालय होणार आहे. मी प्रचंड खंतावलोय. चावडीचे फोटो काढून घेतलेत. काही वयस्क माणसे गावामध्ये ती इमारत न पाडण्याची विनंती करुन गेल्याचे कळले. त्या इमारतीसाठीचे दगडी त्यांनी स्वतः डोंगराकडुन आणलेत. गावचे काम म्हणून.. 'आमची माती झाल्यावर ती पाडा' म्हणत होते. माझे डोळे पाणावले हे ऐकून...

या सिमेंटच्या जंगलात आपण गावचे कौलारुपण घालवतोय त्याचे वाईट वाटतेय. माती, कौलाच्या घरांघरांमधले अडसरही कमकुवत असतात. हेच दुबळे अडसर लोकांना एकत्र बांधत असतात. आजकाल नव्याने निर्माण होणारे पक्के सिमेंटचे जंगल माणसामाणसामधले अंतरही नकळतपणे वाढवते आहे. चालत चालत, सायकलवरुन गावामध्ये फेरफटका मारायला येणारे रस्त्याने येता जाता नकळतपणे एकमेकांना रामराम करुन सुख, दुख वाटायचे. आजकाल हिरोहोंडा, पल्सारवर स्वार होऊन एकमेकांच्या समोरुन भुरकन उडून जाऊ लागलेत...

काही तरी मी धरु पाहतोय...पण ते हळुहळू निसटत चाललंय हे जाणवतेय.. गावपण हरवत चाललंय!!!!

शाब्बास श्रावण.:स्मित:

परिक्षांच पर्व संपुन एक तप उलटलय. पण तरिहि उन्हाळा म्हटल कि परिक्षा आणि सुट्ट्यांचे दिवस आठवतात. लहानपणी वाटायच कधी एकदाच्या परिक्षा संपुन सुट्टि पडतेय. रीझल्टची चिंता कोण करतय. वेध लागायचे ते गावाला पळण्याचे.
शेवटचा पेपर देऊन आल कि वाटायच सुट्टि सुरु झाली. त्याच दिवशी सगळि आखणी करुन व्हायची.चांदोबा, किशोर,सापशिडि, टेनिस, गिरगावातल्या आयडियल मधुन आणखी काहि पुस्तक इ. सर्व खरेदि दरवर्षी अगदि ठरलेली असायची. सात,आठ दिवसात गावाला प्रस्थान करण्याचा दिवस उगवायचा.
त्याच्या कितितरी अगोदर एस्.टि.च मुंबई सेंट्रलला जाऊन रीझर्वेशन केलेल असायच.

रामनवमीच्या आधी परीक्षा झालेल्या असल्या तर प्रथम मामाच्या गावाला जाण्याचा बेत व्हायचा. रामनवमीला त्यांची जत्रा असते ना. भल्या पहाटे उठुन आवरायच आणी सेंट्रलला सकाळि सहाची एस्.टि. पकडायची. मार्गहि अगदि ठरलेला असायचा माळशेज-ओतुर. पहिला थांबा अर्थातच भायखळा, लेंगा, टोप्या घातलेले गावकरी (बहुतेक सगळे फळ आणी भाजी मार्केटवाले)आणि नऊवारी पातळ नेसलेल्या नाकात नथ घातलेल्या बायका, त्यांची चिल्ली पिल्ली गाडित चढली कि भायखळ्यातच जुन्नरचा बाजार भरल्यासारख वाटायच. गाडित चढताना होणारा आरडाओरडा, मुलांना संभाळताना होणारी दमछाक, सामान ठेवण, शिवाय लग्नाचा सिझन जोरात असल्यामुळे घेतलेल्या आहेराची बोचकि, कंडक्टरला सांगुन जड आणी मोठ्या सामानाची टपावर चढवायची घाई. सगळ अगदि साग्रसंगित पार पडायच.
कंडक्टरने एस टि चालु करण्यासाठि बेल मारली कि, गाडित बसवुन द्यायला येणार्‍यांची उतरायची एकच घाई व्हायची. अगदि गाडि हालेपर्यंत नीट जा, पोचल्याच टपाल धाडा, ज्यांची फक्त बायका मुलेच जाणार असतिल त्यांच गाडितील शेजार्‍यांना / कंडक्टरला अगदि परत परत लक्ष ठेवायला सांगण.
तेवढ्यात कोणीतरी आपल उगाच विचारायच काय मग सुट्टिला का. सगळि मजाच असायची. (अपुर्ण)

गेल्या कित्येक वर्षात एस्.टि चा प्रवास नाहि केला. माझ्या लेकिने तर अजुन एस टि पाहिलीच नाहिये. ग्लोबलायझेशनच्या नावाखाली काळाच्या ओघात एस टि गडप होण्याआधी मला तिला मुंबई ते गाव हा प्रवास एकदातरी घडवुन आणायचाय. माझ्या ओंजळितिल काहि हळवे आनंदाचे क्षण अलगद तिच्या ओंजळित सोडायचेत. जपुन ठेवण्यासाठि. मला खात्री आहे ती नक्किच जपेल.

किशोर, ओरडत होतास ना. बस आता वाचत. Happy

प्रतिभा, छान आठवण...! चांगले केलेस इकडे टाकलेस ते..!!!
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे एक मोठ्ठा विषय आहे.. कितीही लिहीले तरी काहीतरी राहीलेच असे वाटत राहील..!

प्रतिभा, छान आठवण...! चांगले केलेस इकडे टाकलेस ते..!!!
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे एक मोठ्ठा विषय आहे.. कितीही लिहीले तरी काहीतरी राहीलेच असे वाटत राहील..!

मस्त तुम्हा सर्वांचे लेख आवडले आणि विक्रांतने काढलेला गाड्याच्या जत्रेचा फोटो तर एकदुम सोने पे सुहगाच गाडा वरुन आठवले आमच्या महर्षी दयानंद महाविद्यालयाने एक एकांकिका सादर केली होती
तिच नाव होत गाडा विषय सुधा माझ्या जिव्हाळ्याचा गाड्याची जत्रा युट्युब वर टाकेण मी आणि ईथे लिन्क पण देइल बहुतेक शनिवार पर्यत देइल मी लिन्क आपल्या जुन्नर मधला डायरेक्टर आहे अमोल भोर त्याने दिगदर्शीत केलि होती आय. एन्.टी मधे द्वीतीय पारितोषिक विजेती एकांकिका ठरली होती
गाडा

शैलेश मस्तच माहिती. तु एम्.डि. ला होतास का ? कोणत्या साली ?

मी २००३ ला एम डी ला अ‍ॅडमिशन घेतली

झंकार ,मला शेवया खाण्यापेक्षा गावी बायका एकत्र जमुन ऊन्हाळ्यात शेवया करतात ते जास्त मजेशीर वाटत. शेवया वळायला लागणारी लाकडाची फळी, डबा यांची मांडणी तर एकदम बघण्यासारखी असते. ते बघुन घरातील लहान मुलांनीही शेवया करण्याचा हट्ट केलाच पाहीजे. घरातील सुप,घमेली , पाटी आणि तेहि संपल्यावर मिळेल त्या पसरट भांड्यावर शेवया वाळवायला ठेवल्या जात. शेवया वाळवायला ठेवणे आणि कावळ्यांपासुन त्यांचे रक्षण करणे हे काम अर्थातच आमच्या सारख्या लहाण चिल्ल्यापिल्ल्यावंर सोपवले जाई.
आशा आहे की मॅगी, नुडल्सच्या जमान्यात अजुनही लोक गावी अशा शेवया करत असतील.

घरातील सुप,घमेली , पाटी आणि तेहि संपल्यावर मिळेल त्या पसरट भांड्यावर शेवया वाळवायला ठेवल्या जात.>>>>
आणि वळलेल्या शेवयाचा ढीग होऊ नये म्हणून शेवया समतल पसरण्यासाठी खालचे ताट वगैरे सारखे ओवाळल्यासारखे हलवावे लागे. त्याला शेवया 'चाळणे' म्हनत. ते काम बहुधा लहान मुले अथवा शिकाऊ मुली याना मिळे.

आणि ज्या भांड्यावर, सूप, घमेले ई वर या शेवया घातल्या जात , त्या वाळल्यावर त्या त्या वस्तूचा आकार धारण करीत. विशेषतः थाळे पाट्या वगैरे. व अलगद सुटून येत. ते आकार पहाताना मजा वाटे.भरताना हे आकार बर्याचदा मोडत तेव्हा थोडे वाईटच वाटे. या शेवया करताना किमान ५-६ बाया तरी असत. मग गावभरच्या कुचाळक्या करणे आलेच. त्यात चावटपणाही भरपूर असे. आमचे कान तिकडेही असत.

मग ताज्या शेवयाचा भात आणि गावठी आम्ब्याचा आम्बरस. आम्बरस आणि शेवयाचा भात हे पदार्थ केवळ एक दुसर्‍यासाठीच जन्माला आले आहेत असे माझे अजूनही मत आहे. (त्यावर तेव्हा तूप कुठले मिळायला . असलाच तर 'दाल्डा' ! )
अख्ख्या पारनेर तालुक्यात मिळून तेव्हा एखादा किलो गावराण तूप असावे!

त्यावर तेव्हा तूप कुठले मिळायला . असलाच तर 'दाल्डा' ! )

आता हेही मलाच सांगितले पाहिजे. दालडा म्हणजे डालडा . ते उलटेही तसेच वाचता येते. हे डालडा तूप म्हणून खेड्यात ओळखले जाते. ते पिवळ्या पत्र्याच्या डब्यातून मिळे. विशेश्तः १८ लिटरच्या. ते थिजलेलेच असे. सामान्यपणे लोक करडीचे तेल वापरत. सणाचे बहुतेक तळ्ण या डालडा 'तुपात ' केले जाई. अर्थात गावराण नावाचे अतिप्रतिष्ठित तूपही होते पण ते आणि मोठ्या तळणाला. ? बापरे. कल्पनेतही नाही कारण कल्पनाशक्तीच मर्यादित होती. गावराण तूप औषधालाच फक्त! तेही गल्ली त कोणाकडे तरी असे.मग आम्ही आम्बरसात अथवा वरणात हे तूप घेत असू. मला स्वतःला त्याची चव खूप आवडे.पण हे देखील क्वचितच मिळायचे बरं का!आणि चैनीत गणले जायचे.नेहमीच्या तेलापेक्षा त्याची चव वेगळी आणि स्मूथ लागे,
हे खरे तर हायड्रोजनेटेड तेलच. नन्तर कॉलेजमध्ये त्याच्या रासायनिक क्रिया वगैरे तांत्रिक बाबी शिकलो ते वेगळे. त्याचा पिवळा डबा असे. लहानपणि ज्या थोड्या ब्रॅन्डेड वस्तू गावात दिसत त्यात हा डालडा , सनलाईट साबण, रेक्सोना साबण (त्याला आम्ही वासाचा साबण म्हणत असू) विजडमच्या वह्या असत्.डालडा सुटेच विकले जाई कारण अक्खा डबा घ्यायची परचेसिन्ग पॉवर कोणाचीच नसायची आणि वापरही क्वचितच असल्याने गरजही नसायचे. हा सुटा डालडा पिवळट पांढरा आईसक्रीमसारखा सुन्दर दिसे.डालड्याचे मोठे डबे लग्नात मात्र आणित . एवढा खूप डालडा एकदम पहाताना आमचे डोळे विस्फारून जात्.खालच्या चित्रात दिसणारा लोगो नन्तर आला. आधीचा थोडा वेगळा पण पिवळाच होता.
डालडाचे छोटे १-२ लिटरचे डबे घरात डाळी, धणे वगैरे ठेवायला वापरत्.परन्तु या मोकळ्या डब्यांचा मुख्य उपयोग म्हनजे त्याला तारेची कडी बसवून 'सकाळच्या पारी' , 'त्या तिथे पलिकडे' जाण्यासाठी प्रामुख्याने होई.

पुढे कालांतराने चवचाल जिभेला रिफाईन्ड तेले, गावराण तुपे यांची चटक लागल्याने डालडाचा संबंध दुरावत गेला. डालडाचे नन्तर अनेक भाऊबन्द आले.सन्फ्लॉवर वगैरे त्यामुळे तर बिचारा डालडा आणखीच विस्मरणात गेला.आमच्यापोराना तर ही वस्तूही माहीत आहे की नाही कोणास ठाऊक. आणि अशा फडतूस गोष्टीत आमचे भावविश्व रमलेले आहे बाबही त्याना हास्यास्पद वाटेल म्हणून तुम्हाला सांगतोय.

तर आमच्या खेड्यतल्या बाया त्याला दाल्डा असे म्हणत.

माझा जिवाभावाचा 'डालडा'..................

रॉबिनहुड , बारा-तेरा वर्षापुर्वी, दिवाळीचे बरेचसे पदार्थ डालड्यातच तळले जात. दिवाळी आली की, आईच्या सामान खरेदी यादीत हमखास डालड्याचा क्रंमांक पहिला असे. आंबरस आणि शेवया कधी एकत्र खाण्याचा योग आला नाही . मात्र आंबरस आणि पुरणपोळी मला खुप आवडते. घरी पहिल्यांदा आंबरस आणि पुरणपोळी केली तेव्हा, माझ्या नवर्‍याला दोन्ही गोड गोष्टी एकत्र कशा काय खायच्या म्हणुन भंयकर आश्चर्य वाटले होते. पण आता आंबरस म्हटले की त्याच्याकडुनच पुरणपोळीची फर्माइश येते.

रॉबिन, डालड्याची आठवण मस्त! मलाही त्याचा लोगो दुसरा एक सुद्धा पाहिल्यासारखे वाटते. हे म्हणजे वनस्पती तूप ना? मग साजुक तुपापेक्षा 'हेल्दी' वगैरे असायला पाहिजे. नीट माहीत नाही.

या डब्याचा उपयोग झाडांची कुंडी म्हणून जमिनीवर किंवा छोटे रोप असेल तर वर टांगुन केला जायचा. त्याचा तो लोगो त्यातूनच आला की काय कोणास ठाउक

ते उलटेही तसेच वाचता येते. >>> हो "तो कवी डालडा विकतो" हे लहानपणापासून ऐकलेले आहे.

साबणांत डबलबी राहिला

बापरे पुरणपोळी आणि आमरस खाउन नाही बघितला एकत्र कधी!

varshac | 6 मे, 2009 - 17:01
रॉबिनहुड, तुम्हालाही तेच म्हणते मी....
लुत्फ ए मय तुम्हे क्या कहूं जाहिद
हाय कंबख्त तूने आम्बरस के साथ पुरणपोळी खायी ही नही....

प्रतिभा . .

अमोल, एकदा ट्राय करच. हापुस आंब्याचा तो केसरी रस,त्यावर साजुक तुप आणि बरोबर पुरणपोळी ! अहाहा! स्वर्गसुख!

robeenhood | 6 मे, 2009 - 20:47
वर्षा बरं बरं , प्रयत्न करून पाहू
मौसम भी है मौका भी है

संपादन KishoreMundhe | 7 मे, 2009 - 10:43
छान छान रॉबिन, अमोल, अवली, झंकार, वर्षा आणि प्रतिभा. सुंदर आठवणी. मधल्या काळात गावी असल्यामुळे येथे येणे जमले नाही. नारायणगावला अवलीची भेट होईल असे वाटले होते परंतु योगायोग नव्हता. रॉबिन फोटुगिरी भारीच आहे तुमची.
आंबरस-पुरणपोळी आणि त्यासोबत सार (आमटी) व गरमागरम कांदेभजी. जेवणानंतर पानपट्टी. भन्नाट मजा. सतिशचा शुभविवाह आज पार पडला. श्रावण, झकास कुठे आहात?

Zpratibha | 7 मे, 2009 - 23:48

नमस्कार,
मी पण एक जुन्नरकर. खुप छान वाटल जुन्नरबद्दल वाचुन.

नागपंचमी...

हा सण आला की मन मुद्दामहून भुतकाळात गिरकी घेऊन येते. चिंतामण काळेंच्या सपराजवळच्या मोठ्या कडुनिंबाला बांधलेला उंच झोका आणी झोक्यावर चढाओढ खेळणारी मुलं मुली यांच्याबरोबर कुठेतरी उंच झोके घेतल्याचे भास व्हायला लागतात. काळ्यांची चंद्रकला तर या झोका चढाओढीमध्ये प्रचंड निष्णात आणी प्रसिध्द असायची! Happy तिथून निघून थोडे पुढे गेले की कुंभारआळीचा भिंगरीच्या भेंडीच्या झाडाला लागलेला झोका असायचा. पुढचा झोका राजवाड्यातल्या कडूनिंबाचा आणी सुतारआळीच्या मारुतीमंदीरासमोरच्या कडूनिंबाचा एक मोठा झोका! इतरही चिल्यापिल्यांचे झोके असायचे पण दरवर्षीचे हे विशेष गाजलेले झोके! Happy

बाबूराव काळे-पाटील यांच्या सोप्यातला चोपाळा या दिवशी मुलांना खेळायला मोकळा असायचा. आम्हीही अगदी नंबर लावून चोपाळ्याची नवलाई अनुभवली आहे. पोळ्या खाल्लेल्या असायच्या तरीही झोक्यावर बसण्याचा मोह सुटायचा नाही. घरातल्या आढ्याच्या झोक्यावर खेळून भागायचे नाही. गावातले इतर छोटे झोके हा विषेश आनंदाचा मेवा असायचा. मोठ्या झोक्यांवरची चढाओढ बघतानाही भान विसरायला व्हायचे!

संध्याकाळी तर गावामध्ये विषेश गडबड असायची. मोढा पाळला जाण्याची पध्दत असल्याने शेतकामे सगळी बंद असायची आणी पुरुष रिकामेच असायचे. मग संध्याकाळी कबड्डीचे रिंगण चावडी चौकात आखले जायचे. गावातले पिळदार मिशा असलेले, शाळेतून नुकतेच सुटलेले पोरसवदे तरुण सगळे एकत्र येऊन कबड्डीचा डाव सुरु व्हायचा.. ठेवणीतले पटके, टोप्या घालून आलेले गावकरी मोठमोठ्याने हाळ्या देत खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला सुरुवात व्हायची. टाळ्या, शिट्यांनी चेतवले गेलेले खेळाडूही त्वेषाने चढाओढ करायचे.. उत्साह टिपेला पोहचायचा... नेहमी प्रौढपणे वागणारे, सभ्य पोषाखात बघीतलेले गावकरी त्या दिवशी बनीयन, आर्धी चड्डी यावर लहान मुलांसारखेच त्वेषाने खेळताना बघीतले की तो माणूस नक्की हाच का असा संभ्रम पडायचा! कबड्डीचे डाव इतर दिवशीही चालायचे पण पंचमीच्या डावाची सर त्याला कधीच नसायची!

इकडे असा रांगडा उत्साह उधाणलेला असतानाच तिकडे खाली शाळेजवळच्या मारुतीमंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत नटून-सजून वारुळ पुजून आलेल्या बायका, मुली फेर धरायच्या! फेराची गाणी, झिम्मा, फुगड्या, काठवटी काना.. किती प्रकारचे खेळ सांगू? खेळ खेळताना म्हणल्या जाणार्‍या लोकगीतांनी भरलेला चिवचिवाट, बांगड्यांचा किनकिनाट, झिम्मा खेळतानाच्या टाळ्यांचा आवाज अशा कितीतरी आवाजांनी मारुती मंदीर सजायचे. हा खेळ अंधार पडेपर्यंत चालू असायचा. नंतर सगळ्या बायका एकत्रीत मुख्य चावडी चौकात यायच्या आणी मग हेच खेळ पुरुषांची कबड्डी बंद होऊन तिथे घुमायला लागायचे. असा हा उत्सव संपायला रात्र व्हायची.

पण आजकाल असे काही होत नाही! चिंतामण काळेंच्या सपराजवळचे झाड (आणी ते सपरही), कुंभारआळीचे भेंड्यांचे झाड कधीच पाडले गेले आहे. बाकीची उरलेली झाडे पंचमीला कदाचीत पोरासोरांना अंगाखांद्यावर खेळविण्यासाठी झोक्यांची प्रतीक्षा करत असावीत पण ते भाग्य त्यांच्या वाट्याला आताशा येत नाही. नाही म्हणायला बायका वारुळाला जमतात आणी खेळ खेळतात पण ते नावापुरते असते. सगळ्या बायका एकत्र असतात असे नाही. पुरुषांची कबड्डीही रंगत नाही. माझा मित्र न्हाव्याच्या जालूच्या भाषेत सांगायचे तर पुर्वी पंचमीला गाव गोकुळासारखे वाटायचे. मला त्याची ही उपमा फार भावते. आताशा सगळा उत्साह लोपला आहे. करमणूकीची मुबलक साधने हाताशी आलेली आताच्या मुलांच्या पिढीला झोक्याचे, कबड्डीचे अप्रुप वाटत नाही.

आपली ही प्रगती गावची संस्कृती तर नष्ट करत नाहीये ना? मन खंतावते विचार करुन.. काही गोष्टी हातात नसल्याची असहाय्यतेची जाणीव तीव्र करतात. पण काळ पकडून ठेवता येत नाही हे सत्य आहे. आपण कुणीही त्याला अपवाद ठरणार नाही आहोत.

कालाय तस्मै नम: !!!

(वरच्या लेखनात जातीचे उल्लेख जास्त आढळतील पण गावाकडे हे उल्लेख सर्रास केले जातात. त्यामध्ये हेटाळणीचा सूर कधीही नसतो. अगदी नावाने हाक मारावी तसे हे जातीचे उल्लेख सहज लोकांच्या जीभेवर असतात. कुणी गैरसमज करुन घेऊ नये यासाठी हे स्पष्टीकरण! Happy )

हितगुज मधे जुन्नरचे नाव वाचले आणि प्रतिसाद दिल्या शिवाय रहावेना. माझे माहेरचे मूळ गाव जुन्नर. माझे दोन काका तिथे रहायचे. त्यातले एक डॉक्टर होते त्यांच्याकडे आम्ही दर सुट्टीत जात होतो सर्व चुलत भावंडे एकत्र जमत असल्यामुळे खूप धमाल करायचो. संध्याकाळी खडकावर जाणे हा एक महत्वाचा कर्यक्रम असायचा. पहाटे उठून शिवनेरी चढून जाणे व तेथिल गंगा जमुना टाक्यातील गार व मधुर चवीचे पाणी पिणे यातली मजा काही वेगळीच ! ज्यांनी ती अनुभवली त्यांनाच ती समजणार.
दुपारच्या वेळी सर्वांचा रंगणारा पत्याचा डाव व रात्री काकांबरोबर खेळला जाणारा पटाचा डाव म्हणजे आनंदाची परमावधीच!
जुन्नरच्या नुसत्या नामोल्लेखामुळे आठवणींचे पेव फुटले मन एकदम वेगाने
बालपणात शिरले

नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.

स्वत:च प्लान करा केरळची सहल कुटुंबाबरोबर किंवा मित्र मैत्रिणिंबरोबर
अगदी कमी खर्चात आणि घरगुती वातावरणात आपल्या माणसांबरोबर.

तसेच या लिंक पण तपासुन बघा
http://jahirati.maayboli.com/detail.php?id=1015
अथवा
http://nkelkar.spaces.live.com/

कळावे आपला विश्वासु
नंदकुमार केळकर

कलमी व्हरायटी येण्यापूर्वी (म्हणजे तसे अजूनही आहे.) ,गावातल्या प्रत्येक आम्ब्याच्या झाडाच्या फलांची विशेषतः कैर्‍यांची चव वेगवेगळी असे. व या चवी झाडानिशी अख्ख्या गावात प्रसिद्ध असत. उदा. आमट्या(खरे तर आम्बट्या , प्रचन्ड आम्बट, ), खोबर्‍या .खोबर्यासारखा, शेन्दर्‍या (हे रंगावरून) इत्यादी. तसे आमच्या शेजार्‍याच्या झाडाला 'शेप्या' आम्बा म्हणत का तर त्याची चव 'शेपट' (गावातला शब्द) लागे. म्हणजे चक्क शेपूसारखी ! एक वेगळी चव म्हणून कधीमधी फार आम्बट नसल्याने आम्ही खात असू. त्यावेळी एखादी कैरी खाल्ली म्हणून ग्रामपंचायतीच्या इलेक्शनचे उट्टे काढण्यासाठी टाळकी फोडण्याची सुन्दर पद्धत नव्हती....
images[2]_12.jpg

कोरड्यास हे निव्वळ सर्वनाम नसून पंचमीचा प्रत्यय असलेला शब्द आहे. भाकरी, चपाती (ब्रेड, नान्,पराठा कुलचा, रोटी ई ) या कोरड्याबरोबर खाण्यास केलेला पदार्थ असा त्याचा उगम आहे.
'कोरड्यास जोडीला ओले काय?' असा तो छुपा प्रश्न आहे. मग ती पातळ भाजी असेल , चटनी ,मिर्ची खर्डा, दूध, दही वगैरे असेल. मात्र कालवण म्हणजे मिश्रण. मुख्य पदार्थ, मसाला आणि पाणी यांचं. हा शब्द कोकणातही वापरतात असे दिसते. पण हाही शिष्ट भाषेतला शब्द आहे. ग्राम्य मध्ये कोरड्यास हाच. माझ्या लहानपणी आम्ही हाच वापरीत असू. खरे तर 'कोरड्यास' हाही शुद्ध शब्द म्हणावा लागेल. आम्ही तर चक्क घरात 'काय कोड्यास केलय?' असा शब्द विचारत असू. आणि 'कोड्याशाला' काय करावं या चिन्तेत बाया बापड्या अथवा बापड्या बाया असत.

Pages