जुन्नरच्या आठवणी

Submitted by झकासराव on 23 May, 2008 - 01:22

सुट्ट्यामधली गमती जमती.--
पोहणे
मी एका दिवसात ६-६ वेळा अंघोळ केली असेल ह्या पोहण्याच्या नादात.
म्हशी चरायला नेणे. (इथे म्हशी ४ असायच्या आणि चारायला नेणारे ६ जण )
त्यावेळी सगळ्या म्हशीना चरायला सोडून तल्लीन होउन पत्त्यांचा डाव मांडणे (वक्कय, पाच तीन दोन, मेंढीकोट ई. ई.)
पत्ते नसतील तर (घरातले एक काका आमचे पत्ते चुलीत टाकुन देत सापडले तर म्हणून ते लपवण्याची खास जागा असे. पण तरिदेखील सापडले आणि त्याची राख झाली तरच अशी स्थिती) क्वचित क्रिकेटचा खेळ मांडायचा.
नाहितर मग आंबे, करवंद, जांभळ असा रानमेवा लुटायला जायच. प्रत्येक झाडावर पहारा नसायचाच. त्यामुळे मजा असायची. हे झाड कोणाच ह्याचा फार विचार आम्ही करत नसु.
ते नसेल तर मग तांबड्या मातीच्या जमिनीत मोठी मोठी ढेकळ असत. त्यात बर्‍यापैकी सपाट दगडांची गाडी करुन रस्ता बनवणे व गाडी गाडी खेळणे. हे करताना आम्हे रस्ता फारच सिस्टीमॅटिक पद्धतीत करत असु. आम्हाला जेवढ ज्ञान होत गावांच आणि रस्त्यांच्या दिशेच ते सगळ पणाला लावत होतो. आजुबाजुच्या सगळ्या गावची नाव आणि गाव असायचीत रस्त्यावर
अधे मधे लावलेल्या कांद्याच्या वरच्या पाती काढुन त्याचा पाइप लाइन हा खेळ असायचा. त्यात त्या पाती अलगद कांद्याला धक्का न लावता तोडून घेवुन त्या एकमेकात घुसवुन त्याची पाइपलाइन. आणि आमच्या डोहाच्या जवळच एक छोटा "पाट" (शेताला पाणी वाहुन नेण्यासाठी असलेला रस्ता) होता. त्याला दोन ठिकाणी उमाळे होते, त्यामुळे त्यात नेहमी थोड थोड पाणी असायचच. ते आमच धरण. मग त्याच नाव राधानगरी धरण असायच आणि नदीच नाव वारणा
काय मजा होती राव.
एकदा पत्त्यांच्या नादात म्हशींच्या धाराची वेळ होउन गेली तरी आम्ही लक्षच दिल नव्हतं. आणि तशी सगळी गुर शहाणी होती फार लांब जायची नाहीत. पण त्यावेळी ती सगळी नजरेच्या टप्प्याच्याच काय तर हाकेच्या देखील बाहेर होती. आणि आमची एक मावशी वरुन आम्हाला शिव्या देत येत होती धारची येळ झाली तरी कुठ बसलायसा अस म्हणत. आणि मग काय म्हशी शोधण्यात अजुन अर्धा तास गेला होता. धारेची वेळ टळुन गेली. त्यामुळे त्या दिवशी दुध डेअरीला गेले नाही. आम्ही मग सगळ्या मोठ्यांची नजर चुकवत गुपचुप शांतपणे घरी गेलो. इमानदारीत हातपाय धुवुन चहा पिउन हळुच घराबाहेर सटकलो आणि समोरच्या घराच्या बाजुच्या आमच्या अड्ड्यावर जावुन बसलो होतो.
काय आयुष्य होत राव मस्त.
त्यावेळी टीव्ही खेडोपाडी पोचले नव्हतेच. एखादाच असायचा. पण आम्हाला त्याची कधीच गरज वाटली नाही.
क्वचित आईसक्रीम वाला यायचा. कोन मधुन किंवा मग लाल रंगाच बर्फाच
ते घ्यायला गेल कि पैसे किंवा एक वाटी भात त्याला घालायचे.
मग आरामात आइसक्रीम खात बसायच. त्या आइसक्रीमवाल्याच मात्र आम्हाला फार आकर्षण होत. तो आला की न चुकता खायच म्हणजे खायचच/ काय करणार तो यायचा १५-२० दिवसातुन एकदाच.
अजुन काही धमाल होत ते म्हणजे काजु.
काजु छोटा असतानाच त्यावर हा माझा हा तुझा असा मालकी हक्क सांगुन ठेवायचा. थोडा मोठा झाला अस वाटल की लग्गेच त्याची बी गायब करायची.
मग यथावकाश काजु पिकला की खायचा.
काजुच्या बियांचा कधी कधी प्रोग्राम होत असे. आम्ही चुलीसमोर बसुन त्या भाजुन फोडून खात असे. हे भाजण्याच काम मात्र फार सावधानतेन कराव लागे नायतर तो गरम चिक उडाला की फार त्रास व्हायचा.
तिकडे गोट्या (कंची) चा खेळ फारसा नव्हता. आमचा काजुच्या बियांचा खेळ असायचा त्याऐवजी. ज्या दिवशी जास्त बिया जिंकणार त्या दिवशी तर काजुच्या बिया भाजण्याचा कार्यक्रम १००%
रात्रीच्या वेळी अजुन एक हमखास असणार काम म्हणजे यष्टी आली (त्या गावात एकच यष्टी रात्रीची मुक्कामाची) कि त्यातन गावात कोण कोण आल हे बघणे. मग ते झाल की जेवण करुन बाहेर हवेला झोपणे. (अर्थात हे बिबटे रावांवर अवलंबुन असायच. तो फिरतोय अशी वंदता असली कि गुपचुप घरात नायतर बाहेर पिंजर टाकुन त्यावर "वाकळ" अंथरुन झोपणे. अर्थात झोपताना दिवसभरात काय काय धमाल केली त्याच्या गप्पा किंवा उद्या कुठे डल्ला मारायचा आहे का किंवा उद्याच खेळ काय हे चर्चा. )
अजुन एक खेळ होता तो म्हणजे रिंगण. एक लोखंडी रिंगण घ्यायच. त्याला फिरवायला एक "सळा" असायचा ज्याच्या पुढच्या टोकाला "U" शेप असायचा. आणि ते रिंगण त्या सळ्याने फिरवायच न पाडता. खुप मजा येत होती. आता ते रिंगण गावी देखील पहायला नाही मिळत.
बरच काही होत यार. लिहित गेलो तस एक एक आठवत राहिल बघ.

कीरखाती हा शब्द प्रथमच ऐकला.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार जुन्नरकर.
झंकार माझ्या आठवणी आधिच लिहुन झाल्या होत्या रे. परत तेच ते लिहल तर आपली मंडळि कंटाळतिल ना.
बाकि श्रावण, खुडि,किरापत, आंबे पिकत घालणे व पुन्हा न सापडणे अगदि सेम. काय मजा यायची आंबा उतरवताना. "आला" असा आवाज आला कि मान उंच करुन आवाजाच्या दिशेने पोत घेऊन धावायच. त्यात झेल सुटला कि टाकणार्‍याच्या शिव्या हमखास. काय करणार मुंबईकर असल्यामुळे अंदाज चुकायचा कधी कधी.
उन्हाळ्यात बहुतेकदा कांदे सपरात वहायचे, संध्याकाळि घास कापायला जाणे आणि डोक्यावरुन वाहुन गुरांना खाउ घालणे. कित्येक वर्ष विहिरीवरुन डोक्यावर पाणी वहाणे. आणि हो न सुटणारी चुंभळ करण हि देखिल एक कलाच बर का. थोड्याफार सरावानेच जमु लागली. आता विचार करुनच आश्चर्य वाटतय तेव्हा हंडा कळशी दोन्हि आणन कस काय जमत असे कोण जाणे. नदिवर कपडे,गोधड्या धुवायला जाण आणि नदिच्या काठावर वाळत टाकण. तिकडे थोडफार भांडण करण (हे ओघानेच आल). चुलित कच्चि कैरी भाजुन गुळ घालुन गुळांबा करण. गुळाचा काला, भाकर,पिठल्,लोणच्,कांदा घेऊन आंबराइत जेवायला जाण. बाजुने झुळुझुळ वाहणार्‍या नदित डुबक्या मारण. काय करणार पोहता येत नव्हत ना. जमलच तर लेण्याद्रि, शिवनेरी चा बेत करण. खाली जुन्नरमधे वडा, उसळ पाव वर ताव मारण. दुपारी तिन पर्यंत जुन्नरमधे परत येवुन शेवंताला पिक्चर पहाण. त्या पत्र्याचा शेड असलेल्या थिएटरमधे भर ऊन्हाळयात घामाच्या धारा वहात असताना, डोक्यावर ऊंच असलेल्या बंद पडलेल्या पंख्याकडे आशाळभुतासारख पहात मनातुन त्या थेटर मालकाला शिव्यांची लाखोली वहात घाम पुसताना पिक्चर पहाताना काय मजा यायची सांगु. उंब्रजवरुन नदितुन बोटिने येडगावमार्गे ओझरला पायी पायी जाण्. आत्याला सुट्टित माहेरी बोलवणासाठी तिच्या सासरी तिच्या भावाचा निरोप घेऊन मुळ लावायला ऊन्हातान्हातुन मधल्या रस्त्याने धोलवडला पायी जाण. तसच जरा अर्धा तास अधिक चालुन मोठया आत्याच्या घरी ठिकेकरवाडिला जाण. येताना त्यांच्या मुलांना सुट्टिसाठी मामाच्या घरी आणण.
बघ झंकार आता ब्रेकच लागत नाहिये आठवणींना. तु आपल दिलस पिल्लु सोडुन

अग प्रतिभा ,गेल्या वर्षी ईथे छान हापुस आंबे मिळाले होते. ह्या वर्षी काय झाल काय माहित. ह्या वर्षी बहुतेक बुश साहेबांच्या घरी चांगल्या हापुसच्या पेट्या पोहचल्या नसाव्यात .

अर्धवट खारुताईने खाल्लेल्या पाडाला खादड असेहि म्हणतात. आम्हि बच्चे कंपनी कैर्‍या धाण्ण्याच्या कणगित, घराच्या कोनाड्यात लपवुन ठेवायचो. पण त्या पिकल्या कि आपोआप गायब व्हायच्या. आणि कुणाला विचारले तर कोणत्याहि मुलाने,अगदि शपथेवर,तिथे हात लावलेला नसायचा. आता जो कोणि आंबे खायचा (आम्हि प्रत्येकाने कधि ना कधि असे आंबे फस्त केलेले असत:)) तो काही कुणाच्या समोर खात नसे. शेवटी नेहमीचे यावरुन होणारे भांडण मिटवण्यासाठी आंम्हि सर्व कैर्‍या एकत्रच पिकत ठेवायला लागलो. मग त्या पिकलेल्या कैर्‍याची अगदि सर्वासमक्ष मोजदाद,वाटप. मग ओसरिवर बसुन आंबे आणि अगदी हाताच्या कोपरापर्यत गळणारा आंब्याचा रस फस्त करण्याचा कार्यक्रम!
ऊन्हाळ्याच्या सुट्टितले खेळ म्हणजे आठचल्लस आणि मग हरलेल्यावर पाणि भरण्याचे राज्य, एक गोल रिंगण आखुन त्यात तुटलेल्या बांगड्याचे रंगीबेरंगी तुकडे टाकणे,आणि ईतर तुकड्याना न हलवता हळुच एक एक तु़कडा बोटाने बाहेर ऊडवुन जिंकणे.एक चपट्या दगडांच्या टिपर्‍यांचा खेळ. आंब्याचा झाडावर चढुन पकडा पकडिचा डाव मांडणे. अर्थातच मोठ्या माणसांचा डोळा चुकवुन!

प्रतिभा, आमच्या गावीहि काहि वर्ष विहिरीवरुन पाणि आणावे लागत असे. पण ती चुंबळ बनवायला मजा यायची. घरात काही रेडिमेड चुंबळिहि असत ,खास आम्हा मुंबईच्या लोकांसाठि कारण स्वतः हाताने केलेली चुंबळ हमखास पाणि वाहुन आणताना मधेच सुटत असे. शेतात जावुन काम करायला मदत करणे ,संध्याकाळी चुलिसाठि गोवर्‍या व सरपन वेचुन देणे.मस्त मजा असायचि एकदम. आपल्याला आजकाल जी मुलांसाठी खास ऊन्हाळ्यात शिबिर भरतात त्यांची काही गरजच नव्हती नाहि का?

अरे बापरे!
मला अगदि अवघडल्यासरख झाल की.
माझ लिखाण इथे सगळ्यात वर.
हे म्हणजे वर्गातल्या कधीच तोंड न उघडण्यार्‍या पोराच कौतुक केल्यासारख आहे.
खुप खुप धन्यवाद ऍडमिन. Happy
हि खुपच छान सुविधा सुरु केलीत.
आता श्रावणला सगळ्यानी "दे धक्का" केल तरच त्याचा "इरादा पक्का" होइल लिहिण्याचा. आणि ते वाहुन देखील जाणार नाही. Happy
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

झकोबा..... Happy
बरे इथे जुन्नरच्या आठवणी लिहायच्यात की जुन्नरकरांच्या? म्हणजे जुन्नरव्यतिरिक्तच्या आठवणी पण जुन्नरकर मला वाटते जुन्नरच्याच फलकावर लिहायचे. त्या पण टाकता येतील मला वाटते,. (उदा. मी आनंदवन बद्दल लिहिले होते).

वर्षा, तुम्हि मातिच्या नवरा नवरी बनवुन खेळायच्या का ग? आम्हि तेहि भरपुर खेळलोय. ओल्या मातिचे मुंडके करुन त्याला दोन हात असल्या सारखी काडि लावली कि झाली नवरा नवरी तयार. मग त्यांना कपडे घालायचे (जुन्या/नविन चिंध्या शोधुन).नवरीला साडिची चिंधी गुंडाळायची. आता लिहिताना खरच खुप लाज वाटतेय व हसुहि येतय पण ह्या चिंध्यांसाठी जवळपासचे सगळे उकिरडे आम्हि पालथे घालायचो.(हे देवा! कमीतकमी हा भाग तरी माझी लेक कधिही न वाचो.)उकिरडे फुंकणे हि म्हण आम्हि अगदि सार्थ करत असु. त्यावरुन मोठ्यांच्या शिव्याहि भरपुर खाल्ल्यात. मग मांडव घालण आलच. एखाद्या आंब्याच्या झाडाखाली किंवा शेतातल्या एखाद्या सावलीला हा खेळ रंगायचा. चारी बाजुला मोठ्या काठ्या रोऊन वरती आंब्याच्या डहाळ्या टाकायच्या. रुईच्या फुलांच्या, कागदाच्या, शेळिच्या लेंड्या, अष्टरची / झेंडुची फुले वापरुन मुंडावळ्याहि करायच्या. वरात काढुन अगदि साग्रसंगित जेवणावळिसहित लग्न पार पडायच. जाम धमाल यायची.
दुसरी धमाल म्हणजे आजुबाजुची सगळी लग्न (खरी हं) अटेंड करायची. सगळेच एकमेकांचे भाऊबंद / नातेवाईक लागत असल्यामुळे अगदि घरचच कार्य असायच. त्यात आम्हा मुलांच काम म्हणजे आदल्या दिवशी नवरा किंवा नवरी बरोबर देवांच्या पाया पडायला जाण. अगदि आनंदान उड्या मारत आम्हि त्यांच्याबरोबर फुशारकिने फिरत असु. मग देवाचे ठिकाण लांब असले तर पाच पावली करणे. पाच पावली म्हणजे त्या लांबच्या देवाच्या दिशेने पाच पावले चालुन पानसुपारी साखर ठेवणे.बर गावाला देवहि बरेच गावच्या वेशीचे रक्षण करणार्‍या देवापासुन, ग्रामदेवता, कुलदेवता, खंडोबा, गावाबाहेरचा मारुती, मावलया, अगदि मुसलमानांचा सात पिर बाबाही त्यातुन सुटत नसे. बरोबरची नवरी चुडा भरलेली, हाता-पायावर मेंदि काढलेली, थोडिशी लाजत, डोक्यावर पदर घेतलेली अशी सुंदर दिसायची कि इंद्राच्या अप्सराहि तिच्यापुढे फिक्या वाटाव्यात्.(अपुर्ण)

समोर एखादा ढोल ताशेवाला चालायचा आणि त्याच्यापाठुन आमची लग्नाअगोदरची वरात. हातातल्या ताटात हळदि कुंकु, पान सुपार्‍या, साखर, काडिपेटि इ. कलवर्‍या म्हणुन संभाळायची चुरस असायची. तशीच चुरस "झोळणा" संभाळण्यासाठि देखिल असायची. "झोळणा" म्हणजे छानसा रंगीत दोर्‍यांनी विणलेला बटवा, पण थोडा मोठ्या आकाराचा. थोडाफार काचेच्या आरशांनी, घुंगरांनी,कवड्यांनी सजवलेला असायचा. प्रत्येकाच्या घरी तो असायचाच अस नाही, पण एक झोळणा बरीच लग्न पार पाडायचा. ज्यांच्या कडुन लग्नापुरता मागुन आणला त्यांना तो परत देताना रिकामा परत देत नसे, तर त्यात खोबर्‍याची वाटि घालुन द्यायची पध्दत होती. तर हा झोळणा घ्यायचा मान खास असलेल्या कलवरीचा. बहुतेकदा ती घरातिलच चुलत बहिण, भाची असे कोणीतरी असायची. काय तिचा भाव आणि रुबाब असायचा तो घेवुन फिरताना. त्यात नवरीला घरोघरी शेवया खायला बोलवणार्‍यांनी दिलेल्या खोबर्‍याच्या वाट्या असायच्या. जितक्या वाट्या जास्त तितका त्या नवरीचा गोतावळा जास्त्.आजुबाजुचे शेजारी, भाऊबंद, गावातिल जवळचे नातेवाइक नवरा नवरीला शेवया खायला बोलवायचे. आईशप्पत! तेव्हाच्या त्या शेवयांची चव परत काही अनुभवायला मिळाली नाही. शेवया, दुध, साखर किंवा गुळ घालुन शक्यतो छोट्या पितळ्यांमधुन किंवा ताटल्यांमधुन खायला देत असत. कमीत कमी अशी १५/२० घरे आम्हि फिरत असु. जवळपास १०/१२ जणांचा आम्हा मुलांचा ग्रुप अगदी तुटुन पडत असे. दोन मिनिटात सगळ फस्त. शिवाय हा जोश सगळि घरे पुर्ण होइपर्यंत टिकुन रहात असे. एकाच वेळि सगळ्यांनी हात घालुन शेवया ओरपताना, मनगटापर्यंत दुधाचा ओघळ गळताना सगळ आठवल तरी डोळे पाण्याने आजही भरुन येतात. कारण घरातिल कार्य समजुन अगदि चुलत चुलत.. असलेल्या भावडांची लग्न पार पाडल्यामुळे जी आपुलकिची प्रेमाची भावना होती ती आता कुठेतरि काळाच्या ओघात हरवल्या सारखी वाटतेय.(अपुर्ण)

प्रतिभा, अगदी मस्त वर्णन लग्नाचे. आणी ते चमकी भरायचे ते आठवते का? कपाळावर कुंकवाचा गंध मळवटासारखा लावून त्यात चमकी टाकली जायची. गंध सुकला की त्यात चमकी चिटकून रहायची. नवरा, नवरी आणी करवल्या भरायच्याच हमखास.
मी खोडदच्या दुर्बिनीवर लिहून सुरुवात करावी म्हणतोय इथे! लवकरच लिहीन. जुन्नर परिसरातील उल्लेखनीय गोष्टी सुध्दा सामाविष्ट करता येतील या फलकावर.

श्रावण येथे लिही. दुर्बिणीवर नको Happy just kidding

जुन्नर परिसरातील बघण्यासारख्या गोष्टी येथे वाचायला (आणि नंतर जाऊन पाहायला) मजा येइल. काय असंख्य गोष्टी असतात! प्रत्येक गावचे बाजार, जत्रा, तेथील देवळे, त्या देवांबद्दल च्या कथा, परंपरागत चालीरीती, इतिहास. 'मल्हारवारी' गाण्यात जसे डीटेल्स दाखवलेत तसे पाहायला, वाचायला नक्कीच आवडेल.

प्रतिभा, कलवरी शब्द बरोबर आहे का? मी करवली ऐकला आहे.

अमोल,करवलि हा शब्द आहे पण कलवरि असच बहुतेकदा बोललेल एकलय मी पण.

प्रतिभा, लग्नाच्या आठवणि मस्तच लिहिल्या आहेस. आम्हि बाहुला बाहुलिचे लग्न नाहि खेळायचो. बहुतेक खेळ हे ऊन्हातानात हिंडणे, पकडापकडि खेळणे असे असत. ते उकिरडा फुंकणे एकदम सहिच! Happy त्या वरुन आठवले,आम्हा मुलांना उद्देशुन घरची मोठि माणसे म्हणत, ऊन्हातान्हात कार्टी कुत्र्या मारत हिंडत असतिल, येऊन घटकाभर घरात झोपायच तर ते न्हाहि, भटकायला सांगा नुसत.
मला गावच्या लग्नांमधे आवडणारि गोष्ट म्हणजे ते डाळभात ,चण्याचे बटाटा घालुन केलेले शाख! व्वा! काय चव लागते त्या जेवणाची. त्या पत्रावळि आणि ती जेवणाचि पंगत.

अमोल करवली हा जरासा शुध्द शब्द. गावाकडच्या बोलीभाषेत कलवरीच म्हणतात.
वर्षा, कुत्र्या मारत हिंडत असतिल. अगदि जबरी. ह.ह.पु.वा. Rofl

..... यात्रा .....

चैत्राच्या आगमनाबरोबरच महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रांची चाहुल लागते. ग्रामीण संस्कृतीची ओळख सांगणार्‍या या यात्रा म्हणजे एक उत्सवच असतो. मी इथे अशाच एका यात्रेची गोष्ट सांगणार आहे.

खोडद.. जुन्नरच्या शिवनेरीच्या कुशीत वसलेले माझे गाव. चैत्रात येणार्‍या रामनवमीच्या दिवशी खोडदची यात्रा भरते आणी दोन दिवस चालते. यात्रेचा प्रत्येक कार्यक्रम ग्रामीण संस्कृतीची ओळख सांगणारा असतो. मुळातच ग्रामदैवत मुक्ताई देवीवर सगळ्या गावची प्रचंड श्रद्धा असल्याने ही यात्रा भरगच्च भरते.

पहिल्या दिवशी सकाळी मांडव डहाळे असतात. म्हणजे गावातील प्रत्येक बैलगाडी, ट्रक, ट्रक्टर, इतर वाहने सजवून त्यामध्ये आंब्याच्या व कडूनिंबाच्या डहाळ्या देवापुढे मंडप करण्यासाठी एकत्र मिरवणूकीने वाजत गाजत नेले जातात. अगदी गावातील एकूण एक वाहन, बैलगाडी या मिरवणूकीत सहभागी असते. उद्देश हा की देवीचा मंडप टाकताना गावातील प्रत्येक घराचा त्यात सहभाग असावा. मिरवणूकीच्या पुढे ढोल, ताशे, लेझीम अगदी ग्रामीण ढंगाने खेळले जातात. मांडव डहाळ्यांनी देवीचा मंडप सजल्यावर रामजन्माचा सोहळा साजरा होतो. किर्तनातून रामकथा ऐकल्यावर मध्यान्हीच्या सुमारास फुले उधळून रामजन्माचा आनंद व्यक्त केला जातो आणी नंतर घरोघरचे पुरणपोळीचे नैवद्य देवीसाठी नेले जातात.

संध्याकाळी चार पाचच्या सुमारास शेरणी चा कार्यक्रम असतो. म्हणजे देवीसाठी गुळ, पेढे यांचा प्रसाद मंदिराकडे एकत्र मिरवणूकीने नेऊन मंदिराजवळ वाटला जातो. पुन्हा ढोल, ताशे, झांज, लेझीम. सगळ्या गावातील लहान, मोठे, बायका, मुली, जेष्ठ, तरुण या शेरण्यांमध्ये सहभागी होतात. हा कार्यक्रम खुपच मोठा असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक वर्षातून एकदाच फक्त एकत्र येतात. अगदी देशाच्या कानाकोपर्‍यातून गावातील माणूस यात्रेसाठी खात्रीने येतोच. मग आपसूकच देवीच्या प्रसादाबरोबरच जमलेल्या माहेरवाशीणी, सुना, पोटापाण्यासाठी गावापासून दूर गेलेले चाकरमाने आणी त्यांचे जुने सवंगडी यांची आपापसातील ख्याली खुशालीचीही देवघेव होते.

रात्री देवीची पालखी निघते. पालखी तर धमाल असते. भजनी मंडळ, वारकरी संप्रदायातील विविध करमणूकीचे खेळ, भारुडे, लेझीम, झांज पथके, ढोल, ताशे, मुख्य चौकात टाळकर्‍यांचे रिंगण करुन नाचणे, महिलांच्या फुगड्या, तरुणांचे बेहोश होऊन नाचणे.. सगळे जबराच. पालखीलाही प्रचंड गर्दी असते. मग रात्र जागवली जाते ती गावातील तरुणांनी सादर केलेल्या नाटकाने..
दुसर्‍या दिवशी कलगी तुर्‍याचा कार्यक्रम असतो. ग्रामीण भागात कलगी तुरे हा शाहिरीचा प्रकार आहे. काही जुने लोक या प्रकारात कवने रचतात. त्यामध्ये सवाल जवाब पण असतात. अशा गावोगावच्या शाहिरांना एकत्र आणून, खास जुन्या लोकांसाठी त्यांचा कलगी तुर्‍याचा कार्यक्रम असतो.

दुपार नंतर ग्रामीण भागाचे वैशिट्ये असलेल्या बैलगाड्याच्या शर्यती असतात. तुफान वेगात धावणार्‍या बैलगाड्यामागे फेटे उडवत धावणारा बेभान शेतकरी अनुभवणेही रोमांचकारी असते. शर्यतीचा धुराळा खाली बसतो नाही तोच तमाशाची हलगी तडतडू लागते, ढोलकी घुमू लागते. दुसरी संपुर्ण रात्र मग तमाशाने जागविली जाते.

मी बर्‍याच इतर गावातील यात्रा पाहिल्या पण लोकांचे एवढे एकत्र येऊन कार्यक्रम साजरे करणे मात्र दुसरीकडे अनुभवले नाही.
आमच्यासाठी यात्रा म्हणजे नोकरीनिमीत्त बाहेर स्थायीक असणार्‍या आणी गावामध्येच असणार्‍या सगळ्या जुन्या मित्रांना एकत्र येण्याची संधी असते. मस्त ओली भेळ, मिसळ, दादाभाऊच्या व बबूच्या हॉटेल मधील जिलेबी, भजी, बर्फाची गारिगार, उसाचा रस असा सगळा मेवा मनसोक्त हादडायचा असतो. एकत्र येऊन जुन्या आठवणींमध्ये रमायचे असते. कुणाचीही भीड न बाळगता पालखीपुढे घाम गळेपर्यंत नाचायचे असते. बाकी जग, नोकरी, शहर सगळे दोन दिवस विसरून ज्या मातीत आमची लहान पावले खेळली, उमटली त्या मातीच्या वासात धुंद होऊन जायचे असते. आणी आम्ही ते सगळे करतो. अगदी स्वत:ला विसरुन ते दोन दिवस जगतो.
आणी नंतर पुन्हा पुढच्या यात्रेची वाट पाहण्याचा प्रवास सुरु होतो.

Mandav_Dahale.jpg

मांडव डहाळ्याच्या मिरवणूकीपुढे रंगलेला लेझीमचा डाव...

paalakhi.jpg
पालखी समोरचे टाळकर्‍यांचे रिंगण.....

bailgada.jpg
बैलगाड्याच्या शर्यतीमधला एक चित्तथरारक क्षण...!!!

ही यात्रा माझ्यासाठी कॅमेर्‍याने टिपलीय ती माझा गावाकडचा छायाचित्रकार मित्र विक्रांत गायकवाड याने...
मी गेल्या वर्षी इंग्लडला असताना माझ्यासाठी त्याची ही मोठी अनमोल भेट होती...

श्रावण,
तुझ्या मित्राने एकदम बैलगाड्याच्या शर्यतीचा "जबरी" फोटो काढला आहे ! Happy अन यात्रेचा तुझा लेखही...

खूप दिवस गावच्या यात्रेला जाण्याचा योग आला नव्ह्ता अगदी इक्षा असुन देखिल.श्रवण्,तुमच्या लेखाने अन छायाचित्रआनि फार आनन्द झाला. खुपच आभार.

लाजवाब जुन्नरकरांनो. प्रतिभा,वर्षाताई लग्नाअगोदरची वरात विसरणे अश्यकच फार मजा यायची लहानपणी. श्रावण अक्षररुपी यात्रा घडवल्याबद्दल आभार तसेच वर्णनाला छायाचित्रांची जोड देण्यास हातभार लावणार्‍या विक्रम गायकवाडचेही आभार.

प्रतिभा लग्नाच वर्णन जबराच केल आहेस की. Happy
श्रावण जत्रा परत लिहिलस ते बर केलस रे.
फोटो सगळेच छान आहेत.
विक्रांत फोटो छान काढतो की. त्याने आपले काढलेले पुरंदरचे फोटो टाकले का??
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

जबरी फोटो आहेत. आम्ही चर्‍होलीला बघितलेली अशी शर्यत आठवली. काही लोक बैलांना दारू पाजतात का? कारण नंतर काही बैल असे सुटायचे की कोठे जातील काही सांगता येत नाही. आम्ही एका जवळच्या टेकडीवर बसून पाहात होतो त्यामुळे लांबवर गेलेले बैल दिसायचे, एक तर लांब रस्त्याने दिसेनासा होईपर्यंत पळत सुटला होता. आपल्याला ही भीती वाटते की आपल्याच अंगावर येतात की काय? Happy पण शर्यत बघायला मजा येते.

श्रावण, यात्रेचे वर्णन छान केले आहेस.डोळ्यापुढे यात्रेचे चित्र ऊभे राहिले. फोटो पण एकदम भारीच.आमच्या गावची काळभैरव नाथाची यात्राही सेम ,तु लिहिलेल्या क्रमानेच पार पडते.
यात्रेच्या दिवशी प्रत्येक घरातुन पुरण पोळिचा नैवद्य देवाला दाखवला जातो. आणि मग ऊरलेल्या नैवद्या मधे देवळात बाळ गोपाळ जेऊ घालण्याचा कार्यक्रम होतो. हेतु हा कि यात्रेच्या दिवशी गावात कोणी लहान,मोठे,गरिब लोक ऊपाशी राहु नयेत.
आम्हि गावातिल यात्रेची अगदि आतुरतेने वाट पहायचो. गावोगावचे पै पाहुणे घरी येत. आणि घर अगदि उत्साहाने भरुन जात असे.

श्रावण, मस्तच लिहलय. वडजची यात्रा आठवली बैलगाड्यांची शर्यत पाहुन्.उंब्रजची यात्रा दसर्‍याच्या आदल्या दिवशी असते. खुप मजा यायची.

श्रवणच्या सुचनेमुळे इकडे टाकतो आहे ही आठवण. हो, कोड्यातील गाव ओळ्खल्याबद्दल अभिनन्दन. अ ब क पै कि क.

किशोर तुझे ते नदीचे क्षायाचित्र बघुन एक गमतीचा( आता वाटते) प्रसन्ग अगदी फास्ट्फावॉर्ड्न ने डोळ्यासमोर
उतरला. उन्हाळयाचे दिवस असतिल बहुतेक. थोड्याच डिवसात गावची यात्रा होती.मळ्यातले बैल नदीवर
घेवुन गेली होती लोक. आंम्ही " कार्टी " काय सोडणार ही सन्धि? मनात स्वतःबद्दल शन्का होतीच कारण
तोपर्यन्त पोहायची प्रगती म्हणजे दोन एक वेळा कम्ब्रेला भोपळा बान्धुन माझ्या रड गाण्याकडे न लक्ष् देता
विहिरीत फेकुन दिले होते इतरानी. नतर तो भोपळाही फुट्ला( माझा हात नव्हता त्यात बरेका) त्यामुळे
सर्‍वानी खाली उड्या टाकल्या कि हळूच थारोळ्यात येवुन गम्मत बघायची ,असाच कार्यक्रम असायचा.

नदीची धार फार कमी, एका बाजुला. पण पोहण्यासाटि दोन डोह मात्र होते. थोडे दुरवर गुढघ्याइतक्या
पाण्या अगदी मस्त मजा पाटीमागुन पड्लेल्या मिटीने केन्ह्वा सम्पली ते कळ्ले दे़खील नाही.थोड्याच वेळात
एका गरीब ( जो मारीत नाही तो) बैलाच्या शेपटाला धरुन डोहात पाचारण झाले. बराचवेळ घट्ट धरुन होतो.
शेवटी "धण्याचे" तोन्ड घासुन झाले अन घासणार्‍या दोघान्नी त्याला बाहेर काढ्ले.दर्म्यान माझ्या हातातील
शेपटी सुटुन गटान्गळ्या घेण्यास सुरुवात झाली होती. तोन्डातुन काही आवाजही निघत नव्हता.घाबरुन
हातापायान्ची हालचालहि जवळजवळ थाम्बली होती.तेवध्यात आरडाओरडा झाला.
कुकडीच्या कुसेतले माझ गाव तस नारायणगावाजवळच फक्त नारायणगड मध्ये आहे.
( पुर्ष़कळ वर्‍शे मराटी लिहिण्याची सवय नाही म्हणुन वरच्या चुका बरेका!)

कित्येक वर्षापुर्वी टॉईम्स औफ इन्डियाच्या सप्ताहिक पुरवणित एक लेख वाचल्याचे आठवते.तो जपण्याचा प्रयत्न केला
होता.

नेमस्तक अनेक आभार !!!
प्रथम तुम्ही आम्हाला आठवणींसाठी वेगळे न वाहते पान उपलब्ध करुन दिलेत आणी आता पहिल्या पानावर ही कडी उपलब्ध करुन दिलीत. आशा आहे की यामुळे या प्रकल्पाची माहिती अभिक मायबोलीकरांपर्यंत पोहचेल!
धन्यवाद!

********************************************************************
.................................................खोडदचे ग्रामीण विज्ञान केंद्र.........................................................
********************************************************************

खोडद येथे ग्रामीण विज्ञान केंद्र आकार घेत आहे. त्यानिमित्ताने....
........................................................................................................................................

आशुतोष गोवारीकरच्या 'स्वदेस' मध्ये मोहन भार्गव अमेरिकेतील नोकरी सोडून भारताच्या एका खेड्यातील वीजसमस्या सोडविण्याचा यशस्वी प्रयोग कसा करतो हे आपण पडद्यावर पाहिले. हा चित्रपट भारतातील ब्रेनड्रेनवर अप्रत्यक्षरित्या भाष्य करणारा होता. ब्रेनड्रेनचा जास्त फटका भारतातील ग्रामीण भागाला बसला आहे. ग्रामीण भागातील अनेकांनी तंत्रज्ञ, डॉक्टर, अभियंता अशा अनेक क्षेत्रामंध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मात्र त्यांच्या या ज्ञानाचा त्यांच्या स्वतःच्या गावासाठी मात्र वापर होऊ शकला नाही. ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित होणारे हे ज्ञान आपण पुन्हा ग्रामीण भागाशी जोडू शकतो का?

हेच उद्दीष्ट्य ठेऊन जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.गोविंद स्वरुप व त्यांचे सहकारी डॉ.अनंथकृष्णन त्यांच्या पुणेस्थित अंकुर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून 'ग्रामीण विज्ञान केंद्र' उभारत आहेत. या विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातून स्थलांतरीत होणारे ज्ञान व ग्रामीण भाग यामध्ये सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आजही ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची कमतरता आहे. लोकशिक्षणाचा अभाव, शासकीय योजनांची व प्रशासकीय बाबींची नसणारी माहिती, शैक्षणीक संस्थांच्या कार्यपध्दतीबद्दलचे अज्ञान व त्यामुळे शाळांची झालेली दुरावस्था व दर्जात्मक शिक्षणाच्या अभावाने आत्मविश्वास गमावलेला ग्रामीण विद्यार्थी असे एक चक्रच निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातून हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच गुणवंत विद्यार्थी बाहेर पडतात व त्यांचे नंतर गावाशी नाते केवळ गावची यात्रा वा एखादा सण एवढेच राहते व वरचे दुष्टचक्र अव्याहत सुरुच राहते. खोडद येथे उभारल्या जाणार्‍या विज्ञान केंद्राचा उद्देश हेच चक्र भेदण्याचा आहे, तेही ग्रामीण ज्ञानाच्या आधारे. म्हणजे असे की, शहरात स्थायीक झालेल्या बुध्दिवंत, तंत्रज्ञ यांच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती त्यांनी या विज्ञान केंद्रामध्ये संकलीत करायची व या माहिती व तंत्रज्ञानाच्या आधारे शालेय विद्यार्थी, ग्रामीण युवक, महिला यांच्या सहभागाने ग्रामीण समस्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायचा.

या केंद्राच्या माध्यमातून दैनंदिन जीवनाशी निगडीत असणार्‍या काही गोष्टींबाबत उपक्रम राबवीण्याचे उद्दीष्ट्य आहे.
उदा. पाण्याची शुध्दता तपासण्याच्या तंत्राची माहिती शालेय विद्यार्थ्यांना करुन दिली जाईल. त्यांच्या मदतीने मग ग्रामपंचायत गावात पुरवत असलेल्या पाण्याचे नमुने वेगवेगळ्या ॠतुमानात तपासायचे. अशा वर्षभराच्या माहितीच्या आधारे ग्रामपंचायतीलाही पाण्याची काळजी कशी घ्यावी याचा ठोस आराखडा ठरवता येईल.

शेतकर्‍यांच्या शेतीविषयक समस्यांना थेट शेतीतज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल अशी सोय इंटरनेटच्या माध्यामातून वेगवेगळ्या शेती संस्थांना संलग्न जोडून करण्याचा मानस आहे. हवामान विभागही येथे स्वतंत्र असेल. साधे तंत्रज्ञान वापरुन स्थानीक तापमान, पर्जन्यमान, वारा यांच्या नोंदी ठेवण्याचे प्रशिक्षण मुलांना, ग्रामीण युवकांना देऊन तशा नोंदी ठेवल्या जातील. माती परिक्षणाचा विभागही असेल. यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीबाबतच्या समस्या तज्ञांपुढे मांडताना अचूक उत्तरे मिळण्याची शक्यता जास्त असेल.

या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्याला सहभागी करुन घेण्याचे कारण म्हणजे त्यांना तंत्रज्ञानाचा वापर (पर्यायाने ते तंत्र) तर समजेलच पण आपणच आपल्या समस्यांची उत्तरे शोधू शकतो ही गोष्ट त्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी महत्वाची ठरेल. ग्रामीण विद्यार्थी बाहेरच्या स्पर्धेत बराच मागे पडत आहे. उच्चशिक्षण व्यवस्थेविषयकचे अज्ञान हे त्यामागचे एक मुख्य कारण आहे. या केंद्रामध्ये माध्यमातून दहावीनंतरच्या शिक्षणच्या वाटा, नोकर्‍यांच्या उपलब्ध असणार्‍या संधी, बायो-डेटा, नोकरीच्या मुलाखतीची तयारी अशा वेगवेगळ्या विषयांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल अशी व्यवस्था असेल. तसेच येथे विद्यार्थ्यांना संगणक, हवी ती उपकरणे, शास्रीय प्रयोग मुक्तपणे पडताळून पाहता येतील. ग्रामीण युवकांना त्यांच्या व्यवसायासंदर्भातले तंत्रज्ञान येथे तपासता येणार आहे.

सध्या केंद्रासाठी जी जागा निश्चीत केली आहे त्या जागेच्या कायदेशीर बाबींची पुर्तता करण्याचे काम चालू आहे. त्यानंतर इमारतीचे काम सुरु होईल. मात्र सध्या उपलब्ध असणार्‍या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शिबिरे असे उपक्रम सुरु आहेत. ग्रामीण समस्यांवर उपाय शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणी अशा प्रयत्नात साथ हवी आहे ती आपल्या प्रत्येकाच्या सहभागाची. प्रत्यक्ष सहभागी होणे प्रत्येकालाच शक्य असते असे नाही. मात्र स्वतःजवळचे ज्ञान अशा विज्ञान केंद्रामध्ये संकलीत करण्याइतपत वेळ तर नक्कीच सगळ्यांकडे असेल. वरील योजना, उपक्रम कागदावर आहेत व त्याबातच्या तंत्रज्ञानासंदर्भातली चाचपणी सुरु आहे. तुम्हाला याबाबत काही माहिती असेल तर तुम्ही तुमच्या या ज्ञानाच्या, माहितीच्या आधारे अशा उपक्रमाला जोडून घेऊ शकता. जेवढे शिक्षण जास्त तेवढीच ज्ञान वितरीत करण्याची नैतीक जबाबदारीही जास्त असे मला वाटते. ग्रामीण भागातील अनेक हातांना अशा स्त्रोताची आवश्यकता आहे. तुम्ही तयार आहात?

श्रावण खरोखरच फार चांगला आहे हा उपक्रम. मला शक्य होईल ती मदत मी करीनच.

श्रावण, आवडला हा उपक्रम. मला जशी मदत करता येइल तशी नक्किच करेन.

Pages