अटलांटा १३.१
बर्याच दिवसांपासून ज्यासाठी तयारी (आणि चर्चा) चालू होती ती अटलांटा १३.१ हाफ मॅरेथॉन आज पार पडली.
दोन ५ के आणि दोन १० के रेसेसमध्ये भाग घेऊन झाल्यावर पुढची पायरी म्हणून हाफ मॅरेथॉन पळायची होती.
जुलै महिन्यातच रजिस्ट्रेशन केलं होतं. अटलांटा कंपूतले राहूल जोग आणि विनायक ह्यांनीपण पळायची तयारी दाखवली. राहूल पण १३.१ रेसमध्ये तर विनायक ५ के मध्ये सहभागी झाला होता. शिवाय आम्हांला चिअर करायला कंपूतले बाकीचे लोक, प्रमुख पाहूणी म्हणून नानबा आणि माझा मित्र रोहित हे पण उपस्थित होते.
१३.१ मैलांचं अंतर मी २ तास ३७ मिनीटांत तर राहूलने २ तास ३८ मिनीटांत पूर्ण केलं. विनायकने त्याची पहिली वहिली ५ के ५० मिनीटांत पूर्ण केली. हवामान एकदम मस्त असल्याने ऊन, प्रचंड घाम, डिहायड्रेशन ह्यांचा त्रास अजिबातच झाला नाही. मी आधी नकाशा पाहून कुठल्या पाणपोईवर थांबायचं हे ठरवून ठेवलं होतं. त्याप्रमाणे पहिला स्टॉप ६.५ मैलांवर तर दुसरा १०.५ मैलांवर घेतला. हे ही पूर्ण स्टॉप नव्हतेच फक्त पाणी पिता पिता थोडावेळ चाललो.
पहिला ६.५ मैलांचा रन एकदम मस्त झाला, पण सातवा, आठवा आणि नववा मैल फारच जाचक होते. नेबरहूड मधून असलेला हा रस्ता खूप चढउतारांचा होता आणि प्रत्येक चढावर बरीच दमछाक झाली. दहाव्या मैलला अचाकन रस्त्याच्या बाजूने शिल्पा, रोहित आणि नानबा हाका मारत आले. ते त्या वेळी रेसच्या ठिकाणी पोचले होते आणि मला पळताना बघून गाडी पार्क करून चिअर करायला आले.
नंतर त्यांची आर्जेशी पण भेट झाली.
शेवटचा पाव मैल पण अपहिल होता आणि तिथे फारच वाट लागली. फिनीश लाईन समोर दिसत असून तिथपर्यंत पोचता येत नव्हतं. तो अपहिल नसता तर अडीच तासांचं उद्दिष्ट पूर्ण झालं असतं. असा रूट ठेवल्याबद्दल संयोजकांचा थोडासा निषेध..
रेस पूर्ण झाल्यावर मेडल मिळालं. मला कुठल्याही क्रिडा प्रकारात मिळालेलं हे पहिलच मेडल. 
हे बघा.

रेस दरम्यान झालेल्या दोन गंमती. फिनीश लाईनपाशी विनायक दिसल्यावर शिल्पा एकदम उत्साहात त्याला "All the best !!!!!!!" म्हणाली. तो एकदम confusion होऊन म्हणे "आता झाली की रेस !" त्यावर शिल्पाचं उत्तर "सॉरी सॉरी मला congrats म्हणायचं होतं." 
मी रेस दरम्यान आयपॉड ऐवजी फोनवर गाणी ऐकायचं ठरवलं. काल रात्री ऐनवेळी फोनमध्ये गाणी भरली. त्यात काहीतरी गडबड होऊन हिंदी मराठी सगळी गाणी एकत्र झाली. पाचव्या मैलच्या सुरुवातीला एकदम "नीज माझ्या नंदलाला" सुरु झालं.... !!!! त्यामुळे तो मैल पूर्ण करायला मला ११ मिनीटे लागली.
हे गाणं मॅरेथॉन धावताना कोणी ऐकतय हे कळलं तर लताबाई धन्य होतील !!!
नंतर मग झुबीडूबी आणि ऑल इज वेल लागल्यावर पुढचा मैल परत ८.५ मिनीटांत झाला. 
रेस नंतर सुनीत भावनच्या घरी चहा आणि बाहेर लंच असं आमचं "नानबा गटग" पार पडलं..
रेस पूर्ण झाल्यावर जे समाधान मिळालं त्याचं शब्दांत वर्णन करणं फारच कठीण.. 
पराग, राहूल आणि विनायक लै
पराग, राहूल आणि विनायक लै भारी!
पराग, राहुल आणि विनायक,
पराग, राहुल आणि विनायक, तिघांचही अभिनंदन!
"नीज माझ्या नंदलाला" सुरु झालं.... !!!! त्यामुळे तो मैल पूर्ण करायला मला ११ मिनीटे लागली. >>> नशीब झोपला नाहीस .
सर्वांना माझ्याकडूनही
सर्वांना माझ्याकडूनही धन्यवाद.....खरंतर माझं ५ कि मी राहुल आणि पराग च्या तुलनेत काहीच नाहीये...तरीसुद्धा तुम्हा सर्वांच्या कौतुकाने उत्साह तर नक्कीच वाढला आहे....
एका गोष्टीचा उल्लेख करावा वाटतोय..तो म्हणजे माझ्या बरोबरच ५ कि मी मधे एक आजोबा पण होते जे डोळ्याने अधु होते आणि त्यांना ऐकुही येत नव्हतं, त्यांच्या बरोबर ची मुलगी त्यांना सर्व हाताच्या भाषेत सांगत होती....ते आजोबा खरोखरच सर्वांसाठी प्रेरणा ठरावेत...अटलांटा १३.१ च्या फेसबुक पेज वर त्यांचा फोटो पण टाकलाय त्यांनी....ही लिंक...
http://www.facebook.com/#!/album.php?aid=557326&id=148500895234
Pages