अंतरातली व्यथा अंतरी जपायची

Submitted by मिल्या on 24 September, 2010 - 05:07

भेट आपली अशी वादळी असायची
आत आत खोलवर... वीज लखलखायची

स्पर्श केवडा तुझा ... श्वास चंदनी तुझे
देह सळसळायचा अन मिठी डसायची

सांत्वनास तू मला... मी तुला असायचो
रात्रभर दवांमधे आसवे भिजायची

ह्या तिच्या जुन्या स्मृती... मौनराग छेडती
श्वास रोख! अन्यथा... शांतता ढळायची

दाखवू नकोस तू दु:ख सारखे तुझे
प्रेरणा मिळायची... वेदना सुचायची

दिवस पाहिले असे... रोज अवस व्हायची
आणि भास्करासही सावली गिळायची

एक नीळकंठ तर सर्व माणसांमधे
अंतरातली व्यथा अंतरी जपायची

मी अखेर जाणले मर्म जीवना तुझे
सत्य ओघळायचे... स्वप्नं साकळायची

एक हेच साकडे घातले मनाकडे
सोड शेवटी तरी लालसा जगायची

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अरे वा.. सुरेख शेर आहेत स्वतंत्र सुद्धा. एकत्र बघितले असता पहिले पाच शेर आणि नंतरचे पाच शेर ह्या मला सुट्यासुट्या दोन कविता वाटल्या.

मिल्या मस्तच.

दाखवू नकोस तू दु:ख सारखे तुझे
प्रेरणा मिळायची... वेदना सुचायची

हा सर्वात जास्ती आवडला.

अरे वा.. सुरेख शेर आहेत स्वतंत्र सुद्धा. >>> टण्या गझलेचा प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविताच असते... म्हणजे कुठलाही एक शेर वेगळा काढून वाचला तरी इतर शेरांवर अवलंबून न रहाता त्याचा असा स्वतंत्र अर्थ वाचकास लागला पाहिजे... त्यामुळे येथे सुट्या अश्या ९ कविता आहेत असे म्हणावे लागेल Happy

वा मिल्या...सुरेख गझल..मला सगळेच शेर खुप आवडले..तरीही,
एक नीळकंठ तर सर्व माणसांमधे
अंतरातली व्यथा अंतरी जपायची>>> मस्तच!

मी अखेर जाणले मर्म जीवना तुझे
सत्य ओघळायचे... स्वप्नं साकळायची>>>>क्लास आहे!!! क्या बात है!!

अरे वा.. सुरेख शेर आहेत स्वतंत्र सुद्धा. >>> टण्या गझलेचा प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविताच असते... म्हणजे कुठलाही एक शेर वेगळा काढून वाचला तरी इतर शेरांवर अवलंबून न रहाता त्याचा असा स्वतंत्र अर्थ वाचकास लागला पाहिजे... त्यामुळे येथे सुट्या अश्या ९ कविता आहेत असे म्हणावे लागेल >>>

१०० % सहमत! तो एक प्रमुख गुण गझलेचा! मिलिंद, गझल पुन्हा वाचली, पुन्हा वेगळ्या कारणास्तव आवडली.

मस्त आहे गझल....
नेहमीप्रमाणेच जबरदस्त Happy

परत एकदा धन्यवाद दोस्तहो...

तुमच्या प्रतिसादांमुळे नविन लिहायला हुरूप येतो

Pages