मोमोज्

Submitted by प्राची on 23 September, 2010 - 00:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

मोमोजच्या आवरणासाठी-
१ १/२ वाटी मैदा,
१/२ टीस्पून बेकिंग पावडर
तेल
चिमूट्भर मीठ

मोमोजमधल्या सारणासाठी -
१ वाटी एकदम बारीक चिरलेला कोबी,
२ वाट्या बारीक चिरलेले गाजर, बीन्स,फ्लॉवर,
१/४ वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची,
१/४ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात,
बारीक चिरलेली कोथिंबीर,
७-८ पाकळ्या लसूण बारीक चिरून,
२ मिरच्या बारीक चिरून,
१ टीस्पून गोडा मसाला,
तेल, मीठ

चटणीसाठी -
१ छोटा कांदा,
१ वाटी लसूण,
४-५ सुक्या मिरच्या,
मीठ, तेल

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम मैदा बे.पा आणि तेल,मीठ,पाणी घालून मळून घ्यावा. भरपूर तेल लावून चांगली मळावी. हा गोळा ओल्या कापडाने झाकून साधारण २-३ तास झाकून ठेवावा.
२. चटणीसाठी - लसूण आणि मिरच्या पाण्यात भिजवून ठेवाव्या.
३. कढईत थोडे तेल घेऊन त्यात लसूण, मिरच्या आणि सगळ्या भाज्या परतून घ्याव्या आणि झाकून शिजवाव्या. अर्धवट शिजल्यावर त्यात मीठ आणि गोडा मसाला घालावा. परत भाज्या नीट परतून १-२ वाफा काढाव्या.
४. भाजी थंड करायला ठेवावी.
५. मोमोज् करायच्या वेळी मैदा परत तेलाचा हात लावून नीट मळावा. मग त्याचे गोटीएवढ्या आकाराचे गोळे करावेत.
६.एक गोळी घेऊन पातळ लाटावी. त्यात १ ते १ १/२ चमचा सारण भरून त्याचा मोदक करावा. मुरडून करंजी किंवा नुसती वळकटी केली तरी चालेल. याप्रमाणेच बाकीचे मोमोज् करावेत.
७. इडलीचा स्टॅड वापरून हे मोमोज् २०-२५ मिनिटे उकडून घ्यावेत.
८. भिजवलेला लसूण-मिरच्या आणि कांदा मीठ घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. खूपसे तेल कडक गरम करून चटणीवर घालावे.
९. गरम गरम मोमोज् चटणीबरोबर खायला द्यावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १८-२० मोमोज् होतील.
अधिक टिपा: 

१. मोमोज् हे चवीला सपक असतात. त्याच्याबरोबर दिल्या जाणार्‍या सॉसमुळे चव येते त्याला. पण हे सॉस खूप तिखट असल्याने लहान मुले खाऊ शकत नाहीत. यावर उपाय म्हणून मी आणि माझ्या एका तमिळी मैत्राणीने त्यात गोडा मसाला घालायचा प्रयोग करून पाहिला. आणि सगळ्यांना ते मोमोज् आवडले. Happy
२. स्टार्टर म्हणून छान लागतात. त्याचप्रमाणे, थुपका आणि मोमोज् हे पोटभरीचे जेवण होते.
थुपकाची कृती इथे आहे.
http://www.maayboli.com/node/19605
३.सारणाची भाजी शिजवताना पाणी घालू नये, भाजीत टोमॅटो घालू नये.

माहितीचा स्रोत: 
माझी तमिळी मैत्रीण :)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिबेट मध्ये गेलो असताना खिमा घालुन केलेले मोमोज पण खाल्ले होते.
मने,मोमोज केलेस की सांग, येतोच हादडायला Happy

धन्यवाद प्राची..

मी गेल्या आठवड्यात करुन पाहिले मोमोज. सारणात चायनीज सॉस घालुन केले. पण बाहेरचे आवरण एकदम पातळ झाले होते. त्यामुळे नुसती भाजी खात असल्याचा फिल येत होता आणि चायनीज सॉसमुळे जरा वेगळे लागत होते. आमच्याइथे एक चपट्या नाकाचा घेऊन बसतो रोज मोमोज. त्याचे मोमोज म्हणजे मैद्याचे गोळे आणि त्यात मधुन्मधुन भाज्यांचे कण असे असते. आता तुझ्या रेसिपीने करुन पाहिन. थुपका उद्या करायचा बेत आहे

माहिती स्रोत - तामिळी मैत्रिण-- टॉप नॉर्थ इंडिअन पदार्थाच्या माहितीचा सोर्स बॉटम इंडिअन... Happy

पाकृ वाचून खावेसे वाटले लगेच Happy

तिबेट मध्ये गेलो असताना खिमा घालुन केलेले मोमोज पण खाल्ले होते. >>> तिबेटमध्ये पण तेल उत्खनन करतात? ए.भा.प्र. Proud
बाकी, खिमा घातलेले भारीच लागत असतील चवीला Happy

मलाही रोचिन सारखाच प्रश्न आहे.

माझ्या लेकीच्या मते मैदा खाल्ल्यावर तो ४८ तास पोटात राहतो, त्यामुळे ती मैद्याचे पदार्थ खायला नाखुश असते. Happy तांदळाच्या पिठाचे पदार्थ तिच्या अग्दी आवडीचे. खरेतर गेल्या आठवड्यात मी तांदळाच्याच पिठाने करायचा प्रयत्न केला होता, पण ते पिठ खुप रवाळ असल्याने त्याचे मोदक वळेनात म्हणुन मग नाईलाजाने मैदा वापरला.

मला तरी वाटते जमेल तांदळाने. जपानी डिम्सम असेच असतात, तांदळाचे पिठ असते त्यात.

मी मोमोज नेहमी मैद्याच्या ऐवजी गव्हाचे पीठ वापरुन करते. त्यात पाहिजे असेल तर अगदि २ चमचा मैदा टाकुन पीठ मळायचे. मी मैदा टाकतच नाहि. त्याचे पण मोमोज खुप छान होतात. फक्त मग रंग पांढरा येत नाही,