भाषांतरकारांची व्हर्च्युअल कॉन्फरन्स

Submitted by वर्षा on 19 September, 2010 - 15:15

३० सप्टेंबर हा जागतिक भाषांतर दिन म्हणून ओळखला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर्स (FIT) ह्या संस्थेने बायबलचे लॅटीनमध्ये भाषांतर करणाऱ्या St. Jerome या भाषांतरकाराच्या स्मरणार्थ १९९१ सालापासून हा दिन साजरा करण्यास आरंभ केला. तुलनेने दुर्लक्षित असलेल्या भाषांतर व्यवसायाचा विविध देशांमध्ये जास्तीत जास्त प्रसार करणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे. तसेच, सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगातील भाषांतर व्यवसायाची वाढती मागणी व महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार या व्यवसायास सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देणे हादेखील यामागील एक विचार आहे.

यानिमित्ताने प्रोझ डॉट कॉम (www.proz.com) या इंटरनेटवरील भाषांतरकारांच्या सर्वात मोठ्या समुदायाने व्हर्च्युअल स्वरुपाची Translation³ ही कॉन्फरन्स आयोजित केली आहे. केवळ भाषांतरकारच नव्हे तर भाषा विषयांचे विद्यार्थी तसेच भाषा क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या इतर सर्व व्यक्तींसाठी प्रोझच्या माध्यमातून एक उत्तम मंच उपलब्ध झाला आहे. या मंचाद्वारे जगभरातील भाषांतरकारांमध्ये संवाद साधला जातो तसेच सेवादाता व ग्राहक यांची प्रत्यक्ष गाठभेट घडवून आणून भाषांतर व तत्सम कामे उपलब्ध केली जातात. आपली भाषांतराची कामे करुन घेण्यासाठी The World Bank, IBM, Honda, eBay, Bloomberg अशासारख्या दिग्गज कंपन्या जिथे येतात त्या प्रोझ डॉट कॉमवर ३००हून अधिक भाषांमध्ये काम करणारे सुमारे ३५०,००० नोंदणीकृत भाषांतरकार व दुभाषी आहेत आणि १५,००० नोंदणीकृत कंपन्या आहेत!

प्रोझ डॉट कॉमला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मागील वर्षी म्हणजे २००९ साली प्रोझने जगातील प्रथम व्हर्च्युअल स्वरुपाची भाषांतरव्यवसायाला वाहून घेतलेली कॉन्फरन्स ३० सप्टेंबर रोजी आयोजित केली होती. सुमारे बारा तास चाललेल्या या कॉन्फरन्समध्ये १७ बूथ्स होते आणि भाषांतराशी संबंधित निरनिराळ्या विषयांवरील ८ सेशन्स आयोजित केली होती. या कॉन्फरन्समध्ये जगभरातील विविध देशांमधील सुमारे ६८०० भाषांतरकार सहभागी झाले होते तसेच प्रत्यक्ष ग्राहक असणाऱ्या कंपन्या व भाषांतरव्यवसायातील प्रसिद्ध कंपन्यांनीही भरभरुन प्रतिसाद दिला होता.

व्हर्च्युअल कॉन्फरन्स म्हणजे काय?
व्हर्च्युअल कॉन्फरन्स ही एका ठराविक दिवशी, ठराविक वेळी इंटरनेटच्या माध्यमात आयोजित केली जाते व जगभरातील भाषांतरकार त्या कॉन्फरन्सच्या पेजवर लॉग इन करुन तेथील मार्गदर्शनपर व्याख्याने, प्रेझेंटेशन्स, प्रश्नोत्तरे, नेटवर्कींग इत्यादींमध्ये प्रत्यक्ष सहभागी होतात. याचा मुख्य फायदा म्हणजे ह्या कॉन्फरन्समध्ये घरुन किंवा ऑफिसमधूनच सहभागी होता येत असल्याने एरव्ही कॉन्फरन्ससाठी करावे लागणारे प्रवास किंवा इतर तत्सम बाबींवरील खर्च टाळला जाऊन वेळेचीही बचत होते.

कॉन्फरन्सच्या इंटरफेसमध्ये प्रदर्शनाचा हॉल, कॉन्फरन्सचा मुख्य हॉल, नेटवर्कींग लाऊंज, रीसोर्स सेंटर, प्रोझ डॉट कॉम व इतर कंपन्यांचे बूथ्स इत्यादी सर्व व्हर्च्युअल स्वरुपातच आपल्या समोर येते व केवळ काही क्लीक्सच्या सहाय्याने आपण या सर्वांमधून लीलया संचार करु शकतो. SC-1.jpgदिवसभरातील सेशन्सचे वेळापत्रक ठरवलेले असते व बहुतेक सेशन्समध्ये पॉवरपॉईंट स्लाईड्सच्या मदतीने ऑडीओ किंवा व्हीडीओ वेबकास्टद्वारे त्या त्या विषयावरील व्याख्यान लाईव्ह प्रक्षेपित केले जाते. शेवटी प्रश्नोत्तरांचाही तास असतो आणि त्यात आपण आपले प्रश्न थेट व्याख्यात्याला विचारु शकतो. आपल्या सोयीनुसार, हव्या त्याच सेशन्सना हजेरी लावण्याची किंवा एका सेशनमधून दुसऱ्या सेशनकडे जाण्याची पूर्ण मोकळीक दिली जाते. एखादे सेशन ऐकायचे राहून गेल्यास ती सर्व सेशन्स कॉन्फरन्सनंतरही ऐकण्यासाठी उपलब्ध असतात. इतकंच काय, कॉन्फरन्समध्ये गोळा केलेली माहिती, कॉन्टॅक्ट्स जतन करुन ठेवण्यासाठी प्रत्येकाला एक व्हर्च्युअल ब्रीफकेसही दिली जाते!

प्रदर्शनाच्या हॉलमध्ये प्रोझ डॉट कॉमचा बूथ असतो जिथे त्यांचे रिप्रेझेंटेटीव्ह प्रत्यक्ष हजर असतात आणि प्रोझबद्दल माहिती पुरवतात. प्रोझप्रमाणेच Wordfast, SDL Trados, Lionbridge या व अशांसारख्या भाषांतर उद्योगाशी संबंधित नामवंत कंपन्यांचेदेखील बूथ्स असतात जिथे त्यांच्या उत्पादनांविषयी माहिती व डेमोही दाखवले जातात. याखेरीज दोन सेशन्सच्यामध्ये ब्रेक्सही असतात आणि त्या वेळात आपण लाऊंजमध्ये इतर भाषांतरकारांची गाठभेट घेऊ शकतो. त्यादृष्टीने आपल्या आयडीवर आपला स्वत:चा असा ’अवतार’ किंवा छायाचित्र लावण्याचीही सोय करुन दिली आहे.

या कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हायचे असल्यास प्रोझ डॉट कॉमवर नोंदणी करुन स्वत:चे प्रोफाईल तयार करणे आवश्यक असून नोंदणी केल्यानंतर कॉन्फरन्सच्या पानावर जाऊन तिथे नोंदणी करणे आवश्यक आहे.SC-3.jpg प्रोझ डॉट कॉमवर नोंदणी करण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. Unisfair systemवर चालवल्या जाणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी संगणक, इंटरनेट कनेक्शन, हेडफोन-स्पीकर्स (ऐकण्यासाठी) व माईक (प्रश्नोत्तरांसारख्या सेशन्समध्ये बोलायचे असल्यास) इत्यादी गोष्टींची फक्त आवश्यकता आहे आणि तत्पूर्वी तुमची स्वत:ची संगणक सिस्टीम या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने परिपूर्ण आहे ना याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमची सिस्टीम चेक करण्याची सोयही प्रोझने दिलेली आहे.

यंदाची कॉन्फरन्स तीन प्रकारात विभागली असून ती तीन स्वतंत्र दिवशी आयोजित करण्यात आली आहे. सर्व कॉन्फरन्सेस पूर्णपणे विनामूल्य आहेत.
पहिली कॉन्फरन्स: फ्रीलान्स ट्रान्सलेटर्स (मुक्त भाषांतरकारांसाठी)
दिवस: ३० सप्टेंबर २०१० (जागतिक भाषांतर दिन)
वेळ: 10:00GMT to 22:00GMT (भारतीय वेळेनुसार, ३० सप्टें दुपारी ३:३० ते १ ऑक्टो. पहाटे ३:३०)

दुसरी कॉन्फरन्स: ट्रान्सलेशन एजन्सीज (भाषांतरसेवा पुरविणाऱ्या एजन्सीजसाठी)
दिनांक: १३ ऑक्टोबर २०१०
वेळ: 10:00GMT to 20:00GMT (भारतीय वेळेनुसार, १३ ऑक्टो दुपारी ३:३० ते १४ ऑक्टो. मध्यरात्री १:३०)

तिसरी कॉन्फरन्स: ग्लोबलायझेशन अ‍ॅन्ड ट्रान्सलेशन कन्झ्युमर्स (जागतिकीकरण व भाषांतराचे ग्राहक)
दिनांक: १० नोव्हेंबर २०१०
वेळ: 10:00GMT to 20:00GMT (भारतीय वेळेनुसार, १० नोव्हें दुपारी ३:३० ते ११ नोव्हें. मध्यरात्री १:३०)

यंदाच्या मुक्त भाषांतरकारांच्या कॉन्फरन्समध्ये इंडस्ट्रीतील अनुभवी व्यक्तींची व्याखाने आयोजित करण्यात आली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने खालील विषय चर्चिले जातील:
• मुक्त भाषांतरकारांनी मार्केटींग कसे करावे? (पॅनेल चर्चा)
• भाषांतराचे दर
• दुभाषी होताना...
• भाषांतरकाराचे प्रकल्प व्यवस्थापन
• भाषांतरासंबंधी ग्राहकाच्या काय अपेक्षा असतात?
• भाषांतरकारांच्या गर्दीत तुम्ही उठून कसे दिसाल?
• टेक्निकल मजकूर भाषांतरीत करण्यासाठी टेक्निकल ज्ञान असणे जरुरी आहे का?
• टेक्निकल भाषांतर व मुद्रितशोधनामधील अडचणी
• भाषांतरउद्योगाचे भविष्य
• प्रोझवरील तुमचे प्रोफाईल परिपूर्ण कसे कराल?

एकंदरीत पाहता, भाषांतरक्षेत्रातील घडामोडी, नवनवीन टेक्नॉलॉजी यापासून ते एक भाषांतरकार म्हणून तुमचा व्यक्तिगत विकास इत्यादी सर्व बाबींवर इथे सखोल चर्चा केली जाते. हल्ली आपल्याकडे परदेशी भाषा शिकणाऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे ही आनंदाचीच गोष्ट आहे. परंतु बऱ्याच जणांना त्यानंतर पुढे नक्की काय करायचे याची निश्चित दिशा सापडत नाही त्यादृष्टीने आपल्याकडील विद्यार्थ्यांना या कॉन्फरन्समधून चांगले मार्गदर्शन मिळेल यात शंका नाही. भारतासारख्या बहुभाषिक देशामध्ये भाषांतर व्यवसाय म्हणावा तितका विस्तारलेला नाही. या पार्श्वभूमीवर एक करीयर म्हणून भाषांतर व्यवसायाकडे गंभीरतेने बघण्याची दृष्टी यातून नक्कीच मिळेल.

म्हणूनच या कॉन्फरन्सची वेळ भारतीयांच्या दृष्टीने जरा गैरसोयीची असली तरी त्यातून मिळणाऱ्या ज्ञानासाठी आणि त्याचबरोबर जगभरातील अनेक अनुभवी भाषांतरकार आणि प्रत्यक्ष ग्राहक यांच्याशी थेट संवाद साधण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाल्याबद्दल आपल्याकडील सद्य भाषांतरकार आणि होऊ इच्छिणारे भाषांतरकार या कॉन्फरन्सला नक्कीच हजेरी लावतील अशी मला आशा आहे.

प्रोझ डॉट कॉम Translation³ कॉन्फरन्ससाठी नोंदणी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी पहा: http://www.proz.com/translation3

प्रोझ डॉट कॉम Translation³ कॉन्फरन्स इंटरफेस फोटो सौजन्य: www.proz.com

- वर्षा पेंडसे जोशी,
Email: varsha0714@yahoo.com

(लोकसत्ता, लोकरंग (१२ सप्टें २०१०) मधील ’जाणिवा’ सदरामध्ये पूर्वप्रकाशित.)

गुलमोहर: