चिमणराव ते गांधी : दिलीप प्रभावळकर (टोक्यो मराठी मंडळ गणेशोत्सव : २०१०)

Submitted by ऋयाम on 19 September, 2010 - 05:15

"ते आले, त्यांना पाहिलं, त्यांनी हसवलं! " .....
टोक्यो मराठी मंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या दिलीप प्रभावळकरांचं असं वर्णन नक्कीच करता येईल. साधारण २-२.५ तासाचा असा हा कार्यक्रम, सुरुवातीपासुन शेवटपर्यंत त्यांनी हसताखेळता ठेवला!

"दिलीप प्रभावळकर 'बायोफिजीक्स' अर्थात 'जैविक-भौतिकशास्त्रात' 'फर्स्टक्लास एमएस्सी' आहेत" असं त्यांच्याच तोंडून ऐकलं आणि पहिला धक्का बसला. "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" प्रमाणे लहानपणी, 'आपण मोठे झाल्यावर नाटक-सिनेमात काम करू' असं तुमच्या घरच्यांना वाटलं होतं का हो?' ह्या प्रश्नाच्या उत्तरात हे आलं. त्यामुळे कित्येक कलाकारांप्रमाणे दिलीप प्रभावळकरही 'अपघाताने' ह्या व्यवसायात आले असं म्हणता येईल..

एकुण प्रेक्षकवर्ग साधारण १५० लोकांचा होता. कार्यक्रमासाठी सामुग्री म्हणुन एक छोटंसं पोडियम मिळालं होतं. बाजूला एक टेबल, आणि एक पडदा ज्यावर काही चित्रफिती दाखवल्या जाणार होत्या.. "हा कार्यक्रम म्हणजे एक अनौपचारिक कार्यक्रम किंवा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम समजा" असं दिलीप प्रभावळकरांनी सुरुवातीलाच सांगुन टाकलं..

"मी केलेल्या भूमिकांपैकी काही गाजल्या, काही चांगल्याच गाजल्या. त्या सगळ्यांबद्दल बोलायचं झालं तर मी बोलू शकेन, पण मग आज ऐन गणपतीमध्ये कोजागिरी होऊन जाईल.. त्यामुळे काही निवडक भूमिकांबद्दल मी बोलेन आणि त्यांची चित्रफितही बघता येईल..."

पहिला नंबर अर्थातच चिं. वि. जोशी यांच्या 'चिमणराव-गुंड्याभाऊ' चा लागला. "दूरदर्शनवर तेव्हा आम्ही सुपरस्टार झालो होतो.", प्रभावळकर म्हणाले, "अगदी अमराठी लोकांमध्येसुद्धा!" ..." कारण तेव्हा त्यांना पर्यायच नव्हता, एकच दूरदर्शन होतं, आम्हाला कसलीच स्पर्धा नव्हती..." माझ्या मते तरी, इतकी प्रांजळ कबुली फार लोक देत नसावेत. आणि खरंच ते इतकं साधंसोपं नसावं.. तसं असतं तर 'पर्याय नाही' म्हणून तेव्हाचे सगळेच कार्यक्रम 'फेमस' झालं असतं.

"ह्या चिमणरावाने मला फार प्रसिद्धी दिली. उदाहरण द्यायचं झालं, तर सरकारी कामं! माझी सरकारी कामं फार सोपी झाली. नोकरी सोडून नाटकात कायमस्वरूपी उडी घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा भविष्यनिर्वाह निधी घेण्याची वेळ आली.... सरकारी कामाचा अनुभव असलेल्यांना विचारा, किती त्रास असतो!
......'एका तासात काम झालं.' कारण, चिमणराव! "माझ्याबरोबर नुसतं असं हात वर करून सगळ्यांना 'नमस्कार नमस्कार' म्हणा.." म्हणून त्या कार्यालयातुन फिरवलं गेलं, पण तासाभरात! तासाभरात काम झालं. कारण, चिमणराव! "

"पण ह्या चिमणरावानं मला खुप मनस्तापदेखील दिला. म्हणजे, ही भूमिका एवढी गाजली, की त्यापुढे कित्येकदा 'ही भूमिका थोडी चिमणरावासारखी आहे. बोलवा प्रभावळकरांना!' असं होऊ लागलं, ज्यानं मला प्रचंड मनस्ताप झाला. राग येऊ लागला. पण नंतर इतर काही भूमिका मिळाल्या ज्यांचं कौतुक केलं गेलं आणि हळूहळू हा शिक्का हलका होत गेला. "

"चिमणरावांबद्दल थोडंसं सांगतो.., 'चिमणराव. ह्यांचं घरी कोणीच ऐकत नाही. मुलं तर अजिबातच! मुलं म्हणजे मोरू, मैना... पत्नी काऊ. म्हणजे नाव कावेरी, पण प्रेमाने 'काऊ.' गुंड्याभाऊ म्हणजे चुलतभाऊ." चला तर मग ही छोटीशी चित्रफीत पाहुया: -
'चिमणराव ज्ञानेश्वरी वाचतात'..

ह्या प्रसंगात चिमणराव आपल्या मुलाबाळांसमोर ज्ञानेश्वरी पठण करतात. पण त्यांच्या वाह्यात मुलांनी, चिमणरावांनी नवी आणलेली ज्ञानेश्वरी 'मी आधी बघणार, मी आधी' करत त्यातली काही पानं फाटून गेल्यावर तिथं रहस्यकथेच्या पुस्तकातील काही पानं चिकटवली आहेत' हे त्यांना माहीत नसतं. अशी ही ज्ञानेश्वरी मुलाबाळांसमोर, आई, गुंड्याभाऊ, आणि काऊ अशा सर्वांसमोर वाचताना झालेली चिमणरावांची त्रेधा प्रत्यक्ष पाहण्यासारखीच आहे...

'चिमणराव गुंड्याभाऊ' 'न बघितलेल्या' आमच्यासारख्यांना ही झलक चांगलीच 'नाविन्यपूर्ण' ठरली. कृष्ण-धवल चित्रफीत. गोटा केलेले प्रभावळकर. "पण हा गोटा खरा गोटा नव्हता, गांधींच्या भूमिकेच्या वेळेसारखा. हा विग होता, ज्यावर 'घेरा' शिवला जात असे... आणि मग चालु व्हायचे चिमणराव... सकाळी साडेआठला चालु झालेलं हे काम, संध्याकाळी साडेपाचला संपुन जाई, पण मग माझी विचित्र अवस्था होत असे. म्हणजे 'खरा मी कोण?' दिवसभर इथे वावरत होता तो 'चिमणराव?' जो आता दिलीप प्रभावळकरांचा मुखवटा घालून जगात फिरणार आहे?' इतका त्याचा प्रभाव पडत होता... "

चिमणरावांपासून सुरु झालेली ही मैफल, 'अलबत्या गलबत्या मधली चेटकीण', 'चौकट राजा मधला नंदू' पासून थेट 'मुन्नाभाई मधल्या गांधींपर्यंत' अनेक टप्पे उलगडत गेली. पण 'केवळ चित्रफिती' आणि 'आठवणी' हे ह्या कार्यक्रमाचं स्वरूप नव्हतंच! मुख्य आकर्षण होतं, दिलीप प्रभावळकरांनी तिथे प्रत्यक्ष करून दाखवलेल्या भूमिका! सर्वसाधारण माणसासारखा बोलणारा हा माणुस, अचानक 'कृष्णराव' बनतो. मधेच मग 'हसवा-फसवी' मधला "कॉलेज-कुमार, 'बॉबी मॉड' " बनतो. सगळंच अचंबित करणारं... आणि सामग्री म्हणजे एखादा गॉगल, चष्मा, शाल, काठी. बास!

इतके नानाविध अभिनय करताना वेगवेगळे आवाज वापरावे लागले.. " भूमिकेसाठी एखादा आवाज वापरताना, तो तसं का बोलेल याचा अभ्यास करून, मग तसं बोलायची तयारी केली. पण कधी कधी अशा तयारीला वेळ मिळत नसे. किंवा कधी कधी ते प्रॅक्टिकली शक्य नव्हतं..."
'अलबत्या गलबत्या' नाताकामाधाल्या चेटकिणीच्या भूमिकेबद्दल ते सांगत होते,
"आता ही चेटकीण! हिच्या एन्ट्रीला स्टेजवर काळोख पसरतो. 'अलबत्या गलबत्या', नाटकाचा नायक जंगलात झोपलेला असतो. तिथे ही प्रकटते.. अंधारात तुमच्या उजवीकडून ती अचानक आपलं विद्रूप, भयाण तोंड दाखवते! त्यावर निळा प्रकाश पडतो.तिला कमी दिसत असतं.. ती चालत येते आणि 'अलबत्या गलबत्या'ला ठेचकाळते आणि किंकाळी फोडते! दोनतीन मुलं तिथंच गार.. "आई, घरी.... " "आता या भूमिकेसाठी मी कुठे आवाज लावणार प्रॅक्टिस करणार??" "बॅकस्टेजला?" Happy

"मी केवळ विनोदी भूमिकाच केल्या असंही म्हणता येणार नाही." प्रभावळकर म्हणाले. "मी केलेल्या 'नंदू', 'तात्या विंचू', रात्राआरंभ' इ. भूमिकाही चांगल्या गाजल्या. " प्रत्यक्ष आयुष्यात त्यांना अनुभवास आलेला एक फॅन, जो दुर्दैवाने खरोखरीच मतिमंद होता, त्याच्याबरोबरच्या मैत्रीबद्दलही त्यांनी थोडक्यात सांगितलं. कलाकारामधला हा माणूस ह्या गोष्टीमुळे आमच्यासमोर आला.

आजवरच्या एकंदर कामाबद्दल केवळ तृप्ती दाखवणारा हा एवढा मोठा कलाकार इतका 'जमिनीवर' कसा राहू शकतो, ह्याचं फार आश्चर्य वाटलं. नासिरुद्दीन शाह, बोमन इराणी, संजय दत्त अशा कलाकारांबरोबरचे किस्से अप्रतिम होते, त्यांच्या तोंडूनच ऐकावेत असे. कार्यक्रम संपल्यावर, आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेकडून, फॅन्सकडून मिळालेल्या प्रशंसेला उत्तर म्हणून तेच पेटंट 'स्मितहास्य'!
ते स्मितहास्य म्हणजे 'चिमणराव' ही होते, 'बापू' ही होते, काही मिनिटांपूर्वी तेच 'श्री. गंगाधर टिपरे', 'मा. कृष्णराव' होते. पण सगळ्याचं मूळ, आत्ता समोर असणारे 'दिलीप प्रभावळकर' आहेत, हीच त्यांच्या अभिनयाची खरी कमाल आहे असं वाटुन गेलं...

--------------------------------------

* इतका सुंदर कार्यक्रम आयोजित करणार्‍या टोक्यो मराठी मंडळाच्या सदस्यांचे आभार!!!
* प्रसिद्ध सतारवादक 'डॉ. चंद्रकांत सरदेशमुख' यांनी दिलीप प्रभावळाकरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
* कार्यक्रम झाल्यावर, प्रेक्षकांबरोबर गप्पा मारताना, 'जरा पाय दुखतो आहे' म्हणत दिलीप प्रभावळकरांनी आधाराला एक खुर्ची पायाखाली घेतली.
"मागच्या आठवड्यात पडलो.. पायाला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. पण फारसं दुखत नाहीये.... "
एकदा 'हो' म्हटलं म्हणुन फ्रॅक्चर होऊनही दिलेला शब्द पाळणारा माणुस, जमिनीवर पाय ठेवुनच असतो. त्याशिवाय शक्यच नाही हे... मग दुखलं तरी हरकत नाही...
* सुरुवातीला म्हटलेलं, "ते आले, त्यांना पाहिलं, त्यांनी हसवलं! " हे थोडंसं वाढवुन "आणि थोडं अंतर्मुख बनवलं" असं म्हटलं, तर अतिशयोक्ति ठरणार नाही!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायुर, चांगला झालाय व्रूत्तांत (कसं लिहायच?) दिलीप प्रभावळकर एक अफलातुन व्यक्तिमत्व आहे! त्यांचं 'हसवाफसवी' बघितलं आहेस कां? (त्यायल्याच काही भुमिका त्यांनी करुन दाखवल्याचे तू वर लिहीले आहेसच.)

ते माझ्या लहानपणी मुंबई आकाशवाणीवर 'बालदरबार' नामक कार्यक्रमात एका नाटकात यायचे. कुणाला त्या भुमिकेचं नाव आठवतं आहे का?

मस्त वृत्तांत ऋयाम Happy
अगदी परत कार्यक्रम बघितल्या सारखा वाटला.
अतिशय सुंदर कार्यक्रम.
लेकीची उपमा : मधे मधे दुसरेच काका आल्यासारख वाटत होतं ना मम्मा?
आणी टी.व्ही वरची चेटकीण खरी नव्हती काई. ते काकाच होते. ;० हि बहुतेक स्वताची घातलेली समजुत होती Wink

चिमणराव ते गांधी, मधेच चौकट राजा किंवा चॅनल [V] असा प्रवास करणारा माणूस अजून जमिनीवरच आहे याचा प्रत्यय दिलीप प्रभावळकर यांच्या बाबतीत नेहमी येतो......छान वृत्तांत, आवडला.

थोडा संक्षिप्त वाटला वृत्तांत! थोडा विस्तार चालला असता आणि सहज करता आला असता.. त्यांनीच सांगीतलेले किस्से घालून.

छान लिहिलं आहेस ऋयाम Happy त्यांच्या सगळ्याच भुमिका त्यांनी पूर्ण न्याय देऊन साकार केल्या आहेत. त्यात माझ्या सगळ्यात आवडत्या चिमणराव आणि टिपरे.

त्यांचा चिमणराव बघितलेल्यांपैकी मी एक आहे. त्यापुर्वी पण चिमणराव पडद्यावर आला होता, पण त्या सर्व कलाकारांनी त्यांना विसरायला लावले होते. (त्यात सुषमा विजय तेंडूलकर, मनोरमा वागळे, मंदाकिनी भडभडे (रिमाची आई) यांनी पण भुमिका केल्या होत्या.) ती मुले मोठी झाल्यावर पण एकदा परत कार्यक्रम सादर झाला होता.
ते आधी टि आय एफ आर मधे होते, असे वाचल्याचे आठवयेय. अनुदिनी या त्यांच्या दैंनंदिनी वरुनच, श्रीयुत गंगाधर टिपरे, हि अप्रतिम मालिका आली होती. चुक भूल द्यावी घ्यावी, हे नाटक पण त्यांनीच लिहिले होते. त्यात ते सुहास जोशी, हेमु अधिकारी आणि निर्मिती सावंत असायचे,

मस्तच झालेला दिसतोय कार्यक्रम!
दिलीप प्रभावळकर हे एक कमाल व्यक्तीमत्व आहे. त्यांच्याबद्दल आणि त्याच्या भूमिकांबद्दल जाणून घ्यायची इच्छा
असणार-या प्रत्येकाने त्याचे 'एका खेळियाने' हे आत्मचरित्रात्मक पुस्तक नक्की वाचावे.

होहो 'एका खेळियाने" मधील त्यांचे चिंतन/ विविध भूमिकांच्या दृष्टीने केलेली पूर्वतयारी, पात्रांची मनोभूमिका समजण्यासाठी केलेले प्रयास सर्वच फार भारी आहे.

१५० ????>>> फक्त? गेले कित्येक वर्ष ही संख्या का वाढत नाही ते समजत नाय.

धन्यवाद ऋयाम. Happy

छान लिहिलं आहेस ऋयाम. आवडलं. पुण्यात कधी होणार आहे हा कार्यक्रम ते बघायला सुरुवात केली पाहिजे आता................ Happy

दिलीप प्रभावळकर खरच ग्रेट आहेत.. आणि त्यांनी केलेल्या अजरामर भूमिका कधीच न विसरण्यासारख्या आहेत..

मस्तच!
स्वतः केलेल्या अनेक भूमिकांचे रसग्रहण करणारे त्यांचे पुस्तक मी वाचले आहे. स्वतःच्या कलेचा इतका सखोल विचार करणारे अनेक कलाकार असतीलही पण तो विचार तितक्याच ताकदीने लोकांसमोर मांडू शकणारे फारच विरळा.

दिलीप प्रभावळकर आणि लेख दोन्हीही मस्त.

"ह्या प्रसंगात चिमणराव आपल्या मुलाबाळांसमोर ज्ञानेश्वरी पठण करतात. पण त्यांच्या वाह्यात मुलांनी, चिमणरावांनी नवी आणलेली ज्ञानेश्वरी 'मी आधी बघणार, मी आधी' करत त्यातली काही पानं फाटून गेल्यावर तिथं रहस्यकथेच्या पुस्तकातील काही पानं चिकटवली आहेत' हे त्यांना माहीत नसतं. अशी ही ज्ञानेश्वरी मुलाबाळांसमोर, आई, गुंड्याभाऊ, आणि काऊ अशा सर्वांसमोर वाचताना झालेली चिमणरावांची त्रेधा प्रत्यक्ष पाहण्यासारखीच आहे... "

हा प्रसंग दादा कोंडकेसारख्या दिग्ग्जाने एका सिनेमासाठी रिमेक केला आहे. दादा कोंडके गीतासार वाचत असतात. अर्जुन म्हणाला ......पुढे पान दुसरेच आल्यावर " कितने आदमी थे" असा काहिसा सिन आहे.

दिलीप प्रभावळकरांनी शांतपणे पण शिस्तबद्धपणे चालु ठेवलेल्या या वाटचालीचा खरंच अभिमान वाटतो Happy

लेख वाचलेल्या आणि प्रतिसाद लिहीलेल्या सर्वांचे आभार्स!!! Happy

मयुर, सुंदर लिहिलं आहेस. Happy

अनेक वर्षांपूर्वी एक 'साळसूद' म्हणून मालिका येऊन गेली त्यात प्रभावळकरांनी खलनायकाची भूमिका अत्यंत ताकदीने वठवली होती.
तेव्हा ते बघताना इतकी चीड यायची की या हरामखोराला चपलेने सडकवावंसं वाटत असे.
माझ्या मते अभिनयाबाबत प्रे़क्षकांना असं वाटणे हेच कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठं बक्षीस आणि सर्वोत्कृष्ट दाद Happy

अरे लेखकाचा गंभीर असा आयडी का दिसत आहे ?
नासिरूद्दीन शाह बरोबरच्या हिंदी चित्रपटाचा उल्लेख नाही केलास ?
काय बर नाव त्या चित्रपटाच ? त्यामधे दि.प्र. नी पुनाप्पा नामक भुमिका केली आहे.

मलाही "साळसूद" ची आठवण झाली.
"एका खेळियाने" मस्तच.

ऋयाम, वृत्तांत अतिशय सुंदर.

Pages