थुपका/थुकपा

Submitted by प्राची on 9 September, 2010 - 23:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी भाज्या बारीक चिरलेल्या. (गाजर, बीन्स,सिमला मिरची, फ्लॉवरचे तुरे),
१/४ वाटी कोबी उभा चिरलेला,
१ मिरची उभी चिरलेली,
२-३ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून,
१/४ इंच आले ज्युलिअन,
१ वाटी शिजवलेले नुडल्स ,
३-४ मॅगी मसाला मॅजिक क्युब्ज,
१/२ टेस्पून कॉर्नफ्लोअर,
३ १/२ वाट्या पाणी,
चवीप्रमाणे मीठ.

क्रमवार पाककृती: 

१. कढईत थोड्याशा तेलावर भाज्या परतून घ्याव्या. सतत परतत अर्धवट शिजवाव्या.
२. मसाला क्युब्ज फोडून भाज्यांवर मसाला आणि मीठ घालून परतावे.
३. भाज्यांवर पाणी (हलके गरम करून) घालावे आणि ढवळावे.
४. हे सूप चांगले उकळावे.
५. कॉर्नफ्लोअर १ १/२ टेस्पून पाण्यात मिसळून सूपमध्ये घालावे. चांगली उकळी आणावी.
६. बाऊलमध्ये नुडल्स घ्यावेत. त्यावर हे गरम सूप घालून खायला द्यावे.

वाढणी/प्रमाण: 
2 जण
अधिक टिपा: 

१. यात कोथिंबीर घालू नये.
२. ऑथेंटिक पाककृतीमध्ये ताजा मसाला (धणे, जिरे, लवंग, जायफळ, वेलदोडा, मिरे यांची पावडर) घालून बनवतात. ऑथेंटिक पाककृती इथल्या पार्लरमधल्या लद्दाखी मुलीने सांगितली होती.
घरी उरलेल्या मॅगी मसाला क्युब्जचे काय करावे, याबाबत सर्च केले असता Nestleच्यासाइटवर ही रेसिपी मिळाली. मॅगी मसाला मॅजिक क्युब्ज वापरूनही चवीत फरक पडत नाही. साइटवरील रेसिपीपेक्षा मी कॉर्नफ्लोअर कमी घालते. पण आवश्यक दाटपणा मिळतोच.
३. आले-लसूण नाही घातले तरी चालेल.
४. नूडल्सऐवजी स्पॅगेटी घातल्यास त्याला 'थान्थुक' म्हणतात. Happy
५. हा तिबेटियन पदार्थ आहे.
६. मांसाहारी असाल तर चिकन/मटण घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
१ http://niyasworld.blogspot.com २. Nestleची साइट.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पदार्थ.

प्राची तिथे मोमो पण मिळतात ना?? त्यांची पण रेसिपी टाक ना. इथे बाहेर मिळतात आणि मुलांमध्ये एकदम हिट्ट आहेत. सोबतच्या सॉसची पण रेसिपी दे (अगदी हक्काने मागतेय, पण इंटरनेटवर शोधण्यापेक्षा तुझ्याकडे एकदम ऑथेंटिक असणार म्हणुन मागतेय Happy )

हे मी हायवे ऑन द प्लेट मध्ये पण पाहिले होते. मस्त वन पॉट मील आता थंडीत तर रॉक्स. पण याची अजूनच खरी लज्जत हवी असेल तर दुल्ला बारीतून आणलेले ड्रॅगनचे चित्र असलेले बोल हवेत. Happy चिकन घालून पण मस्त लागेल. बेटी साठी Happy

कोथिंबिरिच्या पानाशिवाय आमचे पान हलत नाही मग काय करावे? एकदा तिबेटी मग एकदा अपुन के स्टाईलसे.

अरे वा प्राची, मस्त रेसिपी. मोमो-थुकपा हे मनालीत असताना ऐकले होते. खूप वर्षांपूर्वी मनालीत असताना तिथली एक लोकल मैत्रिण मला तिबेटियन रेस्टॉ. मध्ये घेऊन गेली होती मोमो खायला. आत्ता ३-४ वर्षांपूर्वी मनालीतच व्हेज मोमो खाऊन बघितले, पण अजिबातच आवडले नाहीत.

मस्तच. घरी कधी बनवलं नाही, पण हिवाळ्यात खायला मस्त लागतो थुकपा.गेल्या डिसेंबरमध्ये दिल्ली हाटमध्ये कोणत्यातरी नॉर्थइस्टच्या स्टॉलवर खाल्ला होता चिकन थुकपा.
प्राची खरच मोमोची रेसेपी दे ना. आमच्या हिमाचली ड्रायव्हरची मुलगी बनवते मोमो, पण बाहेरच्या इतके नाही आवडले तिच्या हातचे.

प्राची, मस्त. थंडीत बेस्ट सूप.

ते मोमोज तर नेपाळी लोकं सुद्धा करतात. माझ्या नेपाळी फ्रेंडला मी मोदक दिला तर त्याला मोमो वाटलेला. व तोंड वाकडं करत म्हणाला , मीठा क्यु डाला है? तेव्हा मला कळले.
चायनीज पण बनवतात मीट डंपलींग्ज.

अर्रे, सह्ही आहे हा पदार्थ थंडी/ पावसाळी संध्येसाठी! धन्स प्राची! अजून काही लदाखी/ तिबेटी रेसिपीज असल्यास दे ना इथे! Happy

मोमोज>>>> कमिंग सून Happy
मोमोजचा प्रॉब्लेम असा आहे की मला नीट प्रमाण नाही सांगता येणार. म्हणजे किती प्रमाणात जिन्नस वापरले तर किती बनतील वगैरे. एकदा करून बघते, मग लिहीते. नक्की.
मोमोजबरोबरची चटणीही लिहीन नक्की.

अजून काही लदाखी/ तिबेटी रेसिपीज असल्यास दे ना इथे! >>> प्रयत्न करेन.

थंडीत रात्री गरमागरम खायला यम्मी लागतं हे.

ताजा मसाल्याचे प्रमाण मिळू शकेल का??>>> हम्म्म्म्म, त्या मुलीने मला फक्त पदार्थ काय वापरतात ते सांगितलं होतं. मी अंदाजपंचेच करते. तरी प्रयत्न करेन. Happy

मामी, अगदी अगदी, आमच्याकडेपण सगळ्यात कोथिंबीर लागतेच. तुम्ही घालून सांगा, काय फरक पडतो का स्वादमध्ये ते. Happy

यातच पालक घातला तरी चालतो. इकडे मिळणार्‍या अगम्य पालेभाज्या घालतात हे लोक.

आजच वाचली आणि लग्गेच करून पाहिली. फारच मस्त! गरम गरम खायला मज्जा आली.

परिपूर्ण वन डिश मील व्हायला काय घालता येईल असा विचार करते आहे.

एकदम ऑथेंटिक चवीकरता लाल रंगाचे सिसमी ऑईल मिळते ते घाला. यम्म!!!! आमच्याकडे नेहमी थुकपा बनवते मी. त्यात लाल भोपळा, दुधी, पालकाची पानं, पातीचा कांदा, फ्लॉवर, गाजर, कोबी, फरसबी वगैरे अगदी बारीक कापून घालते. आलं किसून आणि हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घालते.

तेलावर हिंग घालून त्यावर भाज्या जरा परतून मग पाणी आणि मॅगी मसाला. मग मीठ. थुकपा उकळल्यावर सिसमी ऑईल घालून सर्व्ह करते.

मामी, टिप्ससाठी धन्यवाद. फ्रिजमधे तिळाचे तेल असतेच. आज नवरा रोडवर, एकटीचेच लंच. थुपकाच करेन.

ते थूकपा असेच आहे ना? खरतर थूक्पा असा हवा. Happy

वेगवेगळ्या भागात वेगवेगळा उच्चार आहे का तिथे प्राची?

McLeodGanj ला तिबेटियन रेस्टॉ हा पदार्थ खाल्लेला थंडीत खुप छान लागला होता घरी करुन बघेन.

६. बाऊलमध्ये नुडल्स घ्यावेत. त्यावर हे गरम सूप घालून खायला द्यावे.
<<
नूडल्स कच्चे/तळलेले/की उकडून घेतलेले?

छान आहे. मॅगी विकत घेत नसल्याने काय करावे हा विचार पडलाय. त्यात त्या मसाल्यात ते अजिनोमोटो असते हे अजुन एक.
प्राची मसाला प्रमाण करुन पाहिलेस का?

सुनिधी,
मी गुगल केले तर एक नेपाळी कुकिंग ब्लॉग मिळाला त्यात मसाले/मॅरिनेड दिलेत . त्यातला ऑल-परपझ मसाला चालावा. ट्राय केल्यास इथे लिही. http://nepalicooking.tripod.com/masala.htm

मस्त .पण फोटो असता तर जास्त आयडिया येते पदार्थाची. मी पण नाव वाचुन आधी पाहीला नव्हता धागा.

मांसाहारी असाल तर चिकन/मटण घालू शकता.>> मॅगी चे चिकनचे क्युब पण मिळतात.
आलं समजलं पण १/४ इंच आले ज्युलिअन काय आहे?

>>आलं समजलं पण १/४ इंच आले ज्युलिअन काय आहे?>>
१/४ इंच आले मॅच स्टिक टाइप

लंच साठी बनवले. मॅगी क्युब्ज दोनच वापरले -सॉल्ट कंट्रोल. जोडीला वर दिलेली लिंक वाचून चिमुट -दोन चिमुट धणे, जीरे, दालचिनी, वेलची पावडर टाकली. हिंग आणि मोहरी पूड घातली. फ्रेश मिरे पावडर घातली. आले फ्रोजन असल्याने किसून घातले. लसूणही किसून घातला . मिरच्या घातल्या नाहीत. त्या ऐवजी स्रिराचा सॉस घातले. भाज्या- फ्लॉवर, सेलरी, रेड बेल पेपर, गाजर, फ्रोजन फरसबी आणि एक टोमॅटो. कॉर्न स्टार्च घातला नाही. नुडल्स वेगळे शिजवून घेण्या ऐवजीभाज्या स्लॉटेड स्पून ने बोलमधे काढून घेतल्या आणि १/२ कप जास्तीचे पाणी घालून त्यातच नुडल्स शिजवले. त्यामुळे एकच भांडे घासावे लागले. मामींच्या सुचनेनुसार तीळाचे तेल घातले.
तुक्पा आधी कधी खाला नसल्याने मूळ चवीच्या कितपत जवळचा झाला माहित नाही. पण मला आवडला.

Pages