कळसूबाई ते हरिश्चंद्रगड - भाग २ - जंगलातली रात्र

Submitted by सेनापती... on 3 September, 2010 - 01:37

पहाटे ६ च्या आसपास जाग आली. एक-एक करून सर्व उठले आणि मग निघायची तयारी सुरू झाली. सकाळी करायची सर्व महत्वाची कामे उरकून झाली. आज नाश्त्याला नुडल्स बनवायचे होते. त्याची तयारी सुरू झाली. आम्ही शाळेच्या मागच्या बाजुला 'चुल x २' बनवली. म्हणजे २ चुली बनवल्या हो. Lol एकावर चहा आणि दुसऱ्यावर नुडल्स बनवायला सुरू केले. जसे-जसे नुडल्स बनत गेले तसे-तसे ते अधिक अधिक घट्ट होत गेले. इतके की त्यातून चमचा फिरेना. नंतर समजले की मॅगी ऐवजी कोणीतरी हाक्का नुडल्स विकत आणले होते. काय एक-एक उद्योगी लोक असतात ना. चहा मात्र फक्कड़ बनला होता. सोबत खायला 'पार्ले-जी'ची बिस्किटे होतीच. ५००-५०० ग्रामचे किमान १० पाकेट्स तरी नक्कीच होते आमच्याकडे. म्हणजे ५ किलो फ़क्त पार्ले-जी. त्यातली ५ पाकेट्स माझ्याच सॅकमध्ये होती. चहा सोबत बिस्किट्स फ़टाफ़ट उडाली पण त्या नूडल सदृश्य पदार्थाला मात्र कोणी हात लावायला तयार नव्हते. मोजके ३-४ लढवय्ये होते ते पण लवकरच माघार घेउन परत आले. शेवटी निघताना ते टोप वरुन झाकण घालून तसेच्या तसे बांधून घेतले. ते उचलायचे कोणी ह्यावर अनेक वाद-संवाद-चर्चा घडल्या. अखेर सत्याने सॅक अभिषेककडे सोपवली आणि ते टोप उचलले.

आता आमचा लवाजमा निघाला 'मुरशेत'च्या दिशेने. रतनगडसाठी शेंडीवरुन जसे रस्त्याने रतनवाडीला पोचता येते तसे बोटीमधून पाण्याच्या मार्गाने सुद्धा जाता येते. तेथे जायला बोटी मुरशेत या जागेवरुन सूटतात. येथे पोचायला तासभर लागला. आधीच त्या 'नुडल्स' प्रकरणात वेळ वाया गेल्याने पहिली बोट निघून गेली होती. पुढची बोट पकडली आणि भंडारदरा धरणाच्या त्या विशाल आणि अथांग जलाशयामधून आम्ही रतनवाडीकडे निघालो. असे काही आम्ही सर्वच पहिल्यांदा अनुभवत होतो. लहानपणी तसा गावाला समुद्रात बरेचदा गेलो होतो पण हा अनुभव मस्तच होता. चहूकडे पाणीच पाणी.. कडेकडेला पाण्यात पूर्णपणे बुडालेली पण अजून सुद्धा कशीबशी तग धरून राहिलेल्या झाडांची शेंडे दिसत होती. काकाने आणलेल्या बायनोक्युलर्स मधून सर्व अधिक जवळ दिसत होते. बोटीमध्ये संतोष मात्र त्याची फाटलेली सॅक शिवत बसला होता. तासाभराच्या त्या हटके प्रवासानंतर आम्ही रतनवाडीला पोचलो. १० वाजून गेले होते तेंव्हा प्रत्येकाला थोड्या-थोड्या भूका लागायला लागल्या होत्या. सत्याने लगेच 'नुडल्स' पुढे केले. सर्वांनी अतिशय (अ)प्रामाणिकपणे ते संपवायचा प्रयत्न केला. बनवलेले अन्न वाया जाते आहे ही बघून काका आधीच भडकला होता. त्यात त्याने आणलेल्या २ बायनोक्युलर्स सापडत नाही आहेत असे लक्ष्यात आले. मग काय... जो पर्यंत बायनोक्युलर्स सापडत नाहित तोपर्यंत पुढे जायचे नाही असे त्याने स्पष्ट सांगितले. आता शोधा सर्वांनी सर्व सामान. "लास्ट कधी काढली होती रे? अरे कालच नाही का काढलेली कळसुबाई टॉपला. कोणाकडे होती रे? अरे काल काय.. आत्ता बोटीत नाही का वापरली आपण? कुठे गेली? बोटीत तर नाही राहिली ना?" असे करत करत शेवटी आमचे उत्तर होते... माहीत नाही. शेवटी काकाने कवीशला बायनोक्युलर्स त्याच्या सॅकमधून काढायला सांगितली. आमच्यापैकी कोणीतरी बोटीत विसरून आला होता ती शेवटून येणाऱ्या काकानेच उचलली होती आणि मग कवीशकडे दिली होती. मग एक छोटे लेक्चर ऐकावे लागले. डोंगरात गोष्टी कश्या सांभाळाव्यात यावर. तिकडे प्रवीण पाण्यात उतरून पोहायला लागला होता. ते बघताच काकाने अधिकच रौद्र रूप धारण केले. मग लेक्चर झाले 'डोंगरात वागावे कसे' यावर... कालपासून अनुभवांची काही वानवा नव्हती. काका चांगलीच 'शाळा' घेत होता आमची. त्याशिवाय असे 'पक्के ट्रेकर्स' कसे तयार होणार नाही का??? इतके सर्व नाटक झाल्यावर रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिरापर्यंत पोहचेस्तोवर १२ वाजत आले होते.

डाव्याबाजूला डोंगराच्या कुशीत रतनवाडी वसलेली आहे. काही घरे नदी पात्राच्या बाजूला सुद्धा आहेत. उजव्या बाजूला थोडेच पुढे आहे रतनवाडीचे हेमाडपंथी 'अम्रुतेश्वर मंदिर'. त्या रस्त्याला प्रवेश करताच डाव्याबाजूला एक सुंदर पुष्करणी आपले लक्ष्य वेधून घेते. मंदिराचे मुख्यद्वार मागील बाजूने आहे. प्रवेश करताच एक देवडी आहे आणि अजून पुढे आत गेले की आहे मुख्य गाभारा. जास्त पाउस पडला की हा गाभाऱ्यामधली पिंड पाण्याखाली जाते. मंदिराचे खांब कोरीव आहेत आणि त्यावर विविध प्रकारच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. गळक्या छपराची आता डागडूजी झाली आहे पण त्यावर मारलेला पांधरा रंग मात्र विचित्र वाटतो. मंदिराच्या परिसरात बरीच शिल्पे विखुरलेली आहेत. त्यात काही वीरगळ सुद्धा आहेत. पुष्कर्णीच्या समोर गणेश, विष्णु यांच्या मुर्त्या आणि शंकरपिंड आहे. शिवाय काही युद्धप्रसंग देखील कोरलेले आहेत. मंदिर पाहून होते न होते तोच काकाने त्या ट्रेकचा अजून एक ऐतिहसिक निर्णय जाहीर केला. "आपण रतनगड़ला जाणार नाही आहोत. इतका उशीर झाला आहे की गेलो तर आपले सर्व वेळापत्रक कोलमडेल." अरे रतनगडला जायचे नाही म्हणजे काय चायला??? काका आता डोक्यात जायला लागला होता. त्या वेळेला असला वैताग आला होता म्हणुन सांगू. त्या वेळेला सुटलेला 'रतनगड' अखेर सर झाला तो तब्बल ८ वर्षांनी... थेट २००८ मधल्या ऑगस्टमध्ये.

आता आम्ही थेट कात्राबाईच्या दिशेने निघालो. भंडारदरा जलाशयाचा मुळ स्त्रोत असलेल्या प्रवरा नदीच्या काठाकाठाने आम्ही पुढे जात होतो. पात्र हळू-हळू निमुळते होत जात होते. थोड़े पुढे गेल्यावर उजव्या हाताला रतनगडकडे जायची वाट दिसली. पण आम्ही मात्र मनातल्या मनात काकाला शिव्या देत डाव्या बाजुच्या वाटेने धिम्या गतीने कात्राबाईच्या खिंडीकडे वाटचाल सुरू केली होती. दुपार होउन गेली होती आणि अजून जेवणाचा पत्ता नव्हता. पोटात भूक पडली होती आणि जंगलात थांबणे तर शक्य नव्हते. काल दुपारनंतर पायाच्या ब्लिस्टर्समुळे हिमांशुचा स्पिड अगदीच कमी झाला होता आणि शेफालीच्या पाठीला खुपच त्रास होऊ लागला होता. तिकडे दुसरीकडे विवेकचे खांदे नम झाले होते. असे एक-एक भिडू कच खाऊ लागले होते. जंगलातल्या तासाभराच्या वाटचालीनंतर दुपारी ३ च्या सुमारास अखेर मध्येच एके ठिकाणी आम्ही थांबलो आणि सोबत असलेले थोडे खाऊन घेतले. ह्या वेगाने आपण पुढच्या ३-४ तासात कुठल्या ही परिस्थितिमध्ये 'पाचनई'ला पोचत नाही ही वैश्विक सत्य होते. अजून कात्राबाईचे संपूर्ण जंगल पार करून खिंड ओलांडून मंगळगंगेच्या काठानी पाचनई म्हणजे किमान ८-९ तासांचा प्रवास होता. वेळेचा पुरता बोजवारा वाजला होता. अखेर काकाने कात्राबाईच्या जंगलामध्ये एक योग्य जागा बघून रहायचा निर्णय घेतला. पुन्हा मागे रतनवाडीला जाणे म्हणजे वेळेचा अजून अपव्यय होता शिवाय उद्याचे चालायचे अंतर वाढले असते ते वेगळेच. फ़टाफ़ट २ टीम बनवल्या गेल्या. एक राजेश बरोबर गेली तर दुसरी विल्याबरोबर. रहायची योग्य जागा शोधणे आणि जवळच वाहते पाणी शोधणे अशी कामे त्यांना दिली होती. २० एक मिं. मध्ये ते सर्व परत आले. पुढे आमच्या जायच्या वाटेवरतीच अशी एक जागा त्यांनी शोधली होती. २० एक जणांचे जेवण बनू शकेल आणि शेजारी झोपायची जागा आहे असे. शिवाय वाहते पाणी सुद्धा बाजुलाच होते. आम्ही ४:३० च्या आसपास त्या जागेवर येउन पोचलो. पूर्ण अंधार पडायला अजून किमान दिड तास होता. आत्ताचा चहा, रात्रीचे जेवण आणि उदया सकाळचा चहा - नाश्ता, या सर्वांसाठी लागणारे सर्व सामान हाताशी सापडेल असे आम्ही काढून घेतले. आज जेवण आमच्या ग्रुपला बनवायचे होते. मेनू होता.. जिरा राईस आणि टोमाटो सूप.

बाकी काहीजण चुलीसाठी आणि रात्रीच्या शेकोटीसाठी लाकडे जमा करत होते. काही झोपायची आणि सामान टाकायची जागा साफ़ करत होते. अखेर अंधार पड़ेपर्यंत आम्ही सर्वांनी आमची 'ओव्हर नाईट स्टे'ची जागा फिट करून घेतली होती. सूर्य पश्चिमेला कलला आणि आम्ही आमच्या आयुष्यातली एक भन्नाट रात्र अनुभवायला तयार झालो होतो. मी, मनाली, आशीष आणि प्रशांत जेवणाच्या तयारीला लागलो. राहुल आणि शेफाली आम्हाला मदत करत होते. पुन्हा एकदा 'चुल' प्रकरण सुरू झाले. ह्यावेळी मात्र ते थोड़े सहजपणे हाताळले गेले. अर्थात पुन्हा राहुल कडूनच. मला त्यावेळी जेवण बनवण्याचा काडीचाही अनुभव नव्हता. तेंव्हा ती काडी टाकुन चुल पेटवायची कशी ह्याचा सुद्धा नव्हता हे ओघाने आलेच. मी आपला हवे ते सामान काढून देणे आणि इतर बारीक सारीक कामे करत होतो. राजेश मध्येच देवासारखा येत होता. काही अडले-नडले बघायचा आणि पुन्हा अंधारात गायब व्हायचा. चुली जवळ गरजेपुरते सोडले तर कुठेही टोर्च वापरायचा नाही असे फर्मान काकाकडून आधीच निघाले होते. ते न पाळणाऱ्या १-२ जणांच्या टोर्चेस जप्त देखील झाल्या होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने ते बरोबरच होते ते म्हणा. चुलीजवळ आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. कोणी ऐकले-पाहिले असते तर विश्वास नसता ठेवला की हे सर्वजण २ दिवसांपूर्वीच एकमेकान्ना ओळखत देखील नव्हते. खरच डोंगरात, निसर्गाच्या सानिध्यात मैत्री पटकन होते. फुलून जाते.

गप्पा होता होता एकीकडे भात शिजत होता तर दुसरीकडे सूप बनवायचे होते. मी टोमाटो नाइफ वापरून सर्व सूपची पाकेट्स कापून एका टोपात काढत बसलो होतो. इतक्यात राजेश पुन्हा आला आणि "अरे, ते तुझ्या अंगावर लाल लाल काय आहे रे?" असे बोलला. बाजूला असणाऱ्या सर्वांचेच लक्ष्य माझ्याकडे गेले. मी टोर्च घेतला आणि बघीतले. बघतो तर काय... टोमाटो नाइफमुळे माझ्या उजव्या हाताच्या मधल्या बोट कापले होते आणि त्यातून रक्ताची धार लागली होती. माझ्या हातावर, टी-शर्टवर, टोमाटो सूपच्या पाकेट्सवर आणि त्या भांड्यात सुद्धा २-३ थेंब रक्त. गंमत म्हणजे मला कापलेले न कळले न दुखले होते. राजेशने मग त्यावर मलमपट्टी केली आणि मी पुन्हा कामाला लागलो. पण भांड्यात पडलेले ते रक्त टोमाटो प्यूरीमध्ये मिसळले गेले होते. माझ्या हातावर, टी-शर्टवर पडलेले रक्त सर्वांनी पाहिलेले असले तरी भांड्यात पडलेले ते रक्त सर्वानी पाहिलेले नव्हते. फ़क्त राजेशला कळले होते ते. तेंव्हा ते 'स्पेशिअल टोमाटो सूप' चुलीवर चढवले गेले. ह्या दरम्यान गुलाबजाम बनवण्यासाठी कढईमध्ये तेल काढून थोड़े तापवून ठेवले होते त्यात एका बेडकाने उडी मारून आत्महत्या केल्याचे लक्ष्यात आले. तेंव्हा गुलाबजामचा प्लान कैन्सल करावा लागला. ८ वाजत आले तसा डिनर सेट झाला. थोड्याच वेळात सर्वजण ते सूप प्राशन करून पवित्र होणार होते. दुपारी जेवण झाले नसल्याने सर्वांना भूका लागल्याच होत्या. जिराराईस आणि मग त्यावर ते 'स्पेशिअल टोमाटो सूप' आवडीने आणि चवीने सर्वांनी ग्रहण केले.

जेवणानंतर काका, विल्या गुडुप झाले होते. तब्येत बरी नसल्याने शेफाली सुद्धा झोपून गेली होती. आमची रहायची जागा त्रिकोणी आकाराची होती. शिवाय जागेला पुढच्या बाजूला उतार होता. एका बाजूने खळखळाट करत ओहोळ वाहत होता. आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने तिन्ही टोकाला एक-एक 'फायर प्लेस' बनवली होती. डाव्या हाताला चुल होतीच. समोर एक मोठी शेकोटी केली होती. तर उजव्या हाताला सुद्धा एक छोटी शेकोटी बनवली होती. तिकडे हिमांशु आणि सत्या झोपले होते. काका, विल्या वरच्या बाजूला मध्ये होते तर आम्ही बाकी सर्व खालच्या शेकोटी जवळ गप्पा टाकत बसलो होतो. आज झोपायचे नाही असे ठरले होते. आणि मग खऱ्या अर्थाने सुरू झाली 'ती जंगलातली रात्र'.

रात्र चढू लागली तशी थंडी सुद्धा वाढू लागली. संध्याकाळीच ह्याचा अंदाज आला होता तेंव्हा तशी तयारी सुद्धा करून ठेवली होती. टी-शर्ट वर स्वेटर चढवले आणि आम्ही शेकोटीच्या अजून जवळ जाउन बसलो. अजून थंडी वाजलीच तर अंगावर घ्यायला बाजूला चादर सुद्धा आणून ठेवल्या. इकडच्या तिकडच्या गप्पा ऐन रंगात आल्या होत्या. १२ च्या आसपास झोपेतून उठून अचानक हिमांशू आला. "अभि..अभि.. त्या तिकडे कसलासा आवाज येतो आहे." त्याला कुठल्याश्या प्राण्याचा आवाज येत होता बाजुच्या झाड़ीमधून. अभि त्याच्या बरोबर गेला. खरच की.. कुठल्या तरी प्राण्याचा आवाज येत होता. घर्रर्र.....घर्रर्र..... काही सेकंद अभि सुद्धा ऐकतच होता. मग त्याला कळले की हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून 'सत्या' नामक आपल्यातलाच एक प्राणी आहे. "अरे हा बघ.. हा मेला सत्या घोरतोय." अभि हिमांशूला म्हणाला. सत्याला शांत करून आणि हिमांशूला झोपवून अभि परत आला.

सकाळी-दुपारी दुरून सुंदर दिसणारे जंगल आता उगाचच भयाण वाटायला लागले होते. अंधारात झाडाच्या आकारांनी लहान मोठ्या प्राण्यांचे आकार घेतले होते तर त्यामधून फिरणारे काजवे प्राण्यांचे डोळे बनवत होते. जंगलात असे उघडयावर रहायचा आमचा सर्वांचाच पहिला प्रसंग होता. जंगलात रहायचा नाही तर आमचा अश्या ट्रेकचाच हा पहिलाच प्रसंग होता. बाहेरून सर्व धीट दिसत असले तरी आतून प्रत्येकजण कमी-अधिक घाबरलेला होताच. किमान धाकधुक तरी होतीच. तेंव्हाच तर झोपायचे सोडून सर्वजण एकत्र शेकोटी जवळ बसले होते. इतक्यात सुमेधा बोलली,"तुम्हाला कोणाला कुत्रे भुन्कायचे आवाज येत आहेत का?? आम्ही म्हटले आता हे काय नवीन? तिच्या मागोमाग अजून कोणाला तरी तसेच आवाज ऐकू यायला लागले. तर कोणाला थोड़े दूर पाण्यावर त्यांचे डोळे दिसायला लागले. "रात्री इकडे ते पाणी प्यायला येत असतील रे. आपण त्यांच्या जागेवर येउन तर नाही ना राहिलो?" असे एक ना अनेक प्रश्न. पहाटेचे किती वाजले होते कोणास ठावूक. मधोमध झोपलेली कविता आता अंगात थंडी भरल्यासारखी करू लागली होती. तिला काहीतरी गरम द्यावे प्यायला द्यावे म्हणुन राहुलने पुन्हा चुल पेटवली. गरम चहा देऊन सुद्धा तिच्यात फारसा फरक पडला नाही. नंतर तर तिला इतकी थंडी भरली की जागचे हलवेना. संतोषने तिला उब मिळावी म्हणुन उचलून शेकोटी जवळ आणून ठेवले. पण तिला काही फरक पडेना. जमिनीवर झोपल्यामुळे थंडी तिच्या अंगात पुरती शिरली होती. संतोष तर काय एक-सो-एक प्रकार करत होता. शेकोटीमधले निखारे काढून तिच्या एकदम जवळ ठेवत होता. पण तिला थंडी बाहेरून वाजत नव्हती तर तिच्या अंगात आतून शिरली होती. शेवटी आमची गड़बड़ गोंधळ ऐकून काका उठलाच. "अरे एक ग्लास गरम पाण्यात एलेक्ट्रोल दे तिला. १० मिं. मध्ये ठीक होइल ती." इतकेच बोलून तो झोपला. राहुलने मग पाणी गरम करून आणले आणि एलेक्ट्रोल घालून कविताला दिले. खरोखर १०-१५ मिं.मध्ये तीची थंडी उतरली आणि ती ठीक झाली. ह्या सर्व प्रकारामध्ये बराच वेळ निघून गेला होता. रात्र जशी-जशी उतरत गेली तशी झोप अजून-अजून डोळ्यावर चढत गेली. कधी ते लक्ष्यात नाही पण पहाटे बऱ्याच उशिराने आम्ही जिथे जसे होतो त्या तिथेच झोपलो. भल्या पहाटे ४ च्या आसपास सर्वांना उठायला हाकाटी दिली गेली. कोण उठले होते काय माहिती इतक्या लवकर. उठलो, अंग झटकले (आंघोळी करायच्या नव्हत्याच ना मग अंग झटकले फ़क्त) आणि आवरा-आवरी केली. जागा ठिक-ठाक केली आणि कुठे काही कचरा राहिलेला नाही ना ते पाहिले. पहाटेचा चहा झाला, सर्व ठिकाणच्या आगी पूर्णपणे विझवलेल्या असल्याची खात्री केली आणि आम्ही पाचनईसाठी पुढे निघालो. आज कात्राबाई पार करत मंगळगंगेच्या काठाने हरिश्चंद्रगड़ गाठायचा होता.

दोन पावले पुढे चालून वळून मागे पाहिले. आठवत होती ती कालची रात्र. कायमची आठवणीत बसलेली...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान... Happy पक्क्या

गुलाबजाम बनवण्यासाठी कढईमध्ये तेल काढून थोड़े तापवून ठेवले होते त्यात एका बेडकाने उडी मारून आत्महत्या केल्याचे लक्ष्यात आले. Rofl