उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १५ - 'बियास'च्या सोबतीने ... !

Submitted by सेनापती... on 25 August, 2010 - 18:59

विचार करता करता रात्री झोप कधी लागली समजलेच नाही. सकाळी बियास नदीच्या खळाळत्या पाण्याच्या आवाजाने जाग आली. नाश्ता झाल्यावर सर्वजण फिरत फिरत खरेदीला लागले तर मी, अभी आणि अमेय आमच्या ओळखीच्या एका मित्राला 'गोकुळ'ला भेटायला गेलो. गोकुळ आम्हाला दिल्लीपर्यंत दुसरी गाडी करून देणार होता. त्याच्याबरोबर चहा पिता-पिता गप्पा मारत बसलो होतो. काल रात्रीपासून फोन सुरू झाले होते तेंव्हा अधूनमधून फोन सुद्धा येत होते. ह्या तासाभरात फोनवर बऱ्याच गोष्टी कळल्या. दिघेफळला विट्ठलचे वडील वारले होते. तिकडे दुसरीकडे शमिकाच्या दिल्लीच्या आजीचे दोन दिवसांपूर्वी देहावसान झाले अशीही बातमी कळली. एक बातमी चांगली येत नव्हती. आत्ता आम्हा दोघांना दिल्ली लवकरात लवकर गाठणे आवश्यक होते. पण त्याला किमान २ दिवस तरी लागणार होतेच. आम्ही सरळ कुल्लू - भूंतरच्या मार्गाला लागलो. इतके दिवस आम्ही कमी रहदारीच्या भागातून बाईक्स चालवत होतो. आज मात्र रहदारी जास्त जाणवत होती. तेंव्हा जास्त वेगाबरोबर जास्त काळजी घेणे आवश्यक होतेच.

मनालीहून निघाल्या पासून बियास नदी आपल्याला सोबत करते. डाव्या हाताला नदी आणि उजव्या हाताला डोंगर आणि मध्ये 'S' आकाराच्या वळणा-वळणाचा रस्ता पतलीकूहल, कुल्लू करत भुन्तरपर्यंत जातो. आत्ता कुल्लूजवळ बियासनदीवर ब्रिज बांधल्यामुळे कुल्लू मार्केटमध्ये घुसावे लागत नाही. त्याने बराच वेळ वाचतो. भुन्तरला पोचलो तेंव्हा २ वाजत आले होते. जेवायचा अजुन काही पत्ता नव्हता तेंव्हा किमान एक चहा घ्यावा म्हणून थांबलो. खरे तर ऐश्वर्याला सफरचंद घ्यायची होती म्हणून तिने सर्वांना थांबवले होते. सफरचंद घेतली पण चहा घेतलाच नाही. भलताच राडा झाला एकडे. रस्त्याच्या कडेला उभे असताना एका स्थानिक मुलाचा मनाली, साधनाला धक्का लागला (की त्याने जाणून बुजून मारला) ह्यावरून त्याची आणि अभीची बाचाबाची झाली. आणि मग ती बा - चा - बा - ची इथपर्यंत गेली आणि हाणामारीला सुरवात झाली. हे सर्व इतक्या पटकन घडले की विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. २ एक मिनिटात सर्व शांत झाले पण मग गर्दी जमली आणि आता हे प्रकरण काहीही चुक नसताना आपल्यालाच महाग पडणार अशी चिन्हे दिसू लागली. 'उसने अपूनको १० मारा, अपूनने दोहि मारा लेकिन क्या सॉलिड मारा' ह्या स्टाइलने आम्ही मारामारी करू शकत होतो पण ५ मुली आणि ५ बाइक्स सोबत असताना असे करणे अविवेकीपणा ठरला असता. तेंव्हा तिकडून शिस्तीत निघालो आणि मंडी - बिलासपुरच्या रस्त्याला लागलो.

आता रस्त्याच्या कडेला छान-छान सफरचंदाची झाडे, गुलाबाच्या बागा अशी दृश्‍ये होती. पुढे लगेच मंडी बोगदा लागला. हा बोगदा जवळ-जवळ ३ किमी लांब आहे. आणि हो आतमध्ये लाइटस नाहीत बरं का. फक्त तोंडावर लाईट्स आहेत. तेंव्हा सावधान. तो पार केला आणि मंडीला पोचलो. ४ वाजून गेले होते. भुका लागल्या होत्या. तेंव्हा आता जेवाय करायला थांबणे गरजेचे होते. जेवण उरकतो तोपर्यंत मागून गाडीमधून बाकीचे मेम्बर्स सुद्धा येऊन पोचले. ५ वाजता तिकडून निघालो तेंव्हा गाडी पुढे निघून गेली. आम्ही मागाहून निघालो. अभी - अमेय पुढे तर अमेय म्हात्रे आणि आदित्य मागे. मी मध्ये राहून समान अंतर ठेवायचा प्रयत्न करत होतो. अचानक माझ्या म्हणजे बाइक्सच्या हा.. Proud मागच्या चाकात हवा कमी होत आहे असे जाणवल्याने मी बाइक स्लो केली. आदित्य, अमेय सुद्धा पुढे निघून गेले. हळू-हळू बाइक चालवत एके ठिकाणी हवा भरली आणि पुढे निघालो. अंधार पडत यायला लागला होता. आता मी थोडा वेग वाढवून पुढे गेलेल्या इतर बायकर्सना गाठण्याचा प्रयत्न करत होतो. इतक्यात एका हॉटेल मध्ये चहा घ्यायला सर्वजण थांबलेले दिसले. म्हणजे थांबले होते माझ्यासाठी पण मग नुसते थांबून काय करायचे? मग लगेच चहा हवा ना... तिकडून १५ मिन. मध्ये निघालो आणि पुढे निघालो. चंदिगढसाठी अजुन १०० किमी. अंतर जायचे होते. कितीही बाइक चालवली तरी रस्ता काही संपत नव्हता. तिकडे चंदिगढमध्ये माझा मित्र कुणाल आमची वाट बघत होता. पुन्हा सर्वांना भुका लागल्याने 'कीरतपूर साहेब'च्या अलीकडे अखेर १०:३० च्या सुमारास जेवायला थांबलोच. अजुन ८० किमी अंतर जायचे होते. त्यात पुन्हा एकदा ह्या पुढचा रस्ता म्हणजे आनंदीआनंद होता. आम्ही बाइक ट्रिपसाठी येणार म्हणून सर्व ठिकाणच्या रस्त्यांची कामे सरकारने काढली होती की काय असा प्रश्न पडला होता मला. धुळीने भरलेल्या त्या कच्च्या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी समोरून येणार्‍या गाड्यांच्या प्रखर हेडलाइटस मध्ये बाइक चालवणे हे खरोखरच दिव्य होते.

रात्रीचे १२ वाजत आले होते आणि सतत १२ तास रायडिंग करून सर्वच थकले होते. गाडी बरीच पुढे निघून गेल्याने आता रायडर्स किंवा पीलियन बदलणे सुद्धा शक्य नव्हते. गेल्या ११ दिवसांच्या रायडिंग मध्ये कधी न आलेली 'कधी संपणार हा रस्ता' अशी भावना मनात येत होती. तिकडे अभी सॉलिड झोपेत बाइक चालवत होता. त्याच्या मागून येणार्‍या अमेयला हा आता बाइक वरतीच झोपेल की काय अशी शंका येत होती. मनाली अभीला जागे ठेवण्याचे यशस्वी प्रयत्न करत होती. मागे अमेय आणि दीपालीची अखंड बडबड सुरुच होती. अश्या निर्जन रस्त्यावर कुत्रा सोडा पण एक चिटपाखरू सुद्धा नव्हते. दूरदूर वर लाइटस नव्हते. त्यामुळे ह्या अनोळखी भागात थांबणे ही शक्य नव्हते. मध्येच एके ठिकाणी ट्रॅफिक लागले रस्त्यावर. बघतो तर रेल-वे फाटक. मी, आदित्य आणि अमेय फाटक पार करून पुढे असलेल्या पेट्रोल पंपावर थांबलो. अभी आज भलताच स्लो झाला होता. तो मागाहून आल्यावर आम्ही परत पुढे निघालो. एव्हाना गाडी हॉटेल 'पार्क व्यू'ला पोचली होती आणि आशिष व उमेश कुणालला जाउन भेटले होते. तो त्याची गाडी घेऊन आम्हाला शोधत मागे यायला निघाला. अखेर एक-एक करून आम्ही हॉटेलला पोचलो तेंव्हा पहाटेचे ३:३० झाले होते. १५ तास बाइक चालवुन आमचे काय झाले होते ते वेगणे सांगायला नकोच... संपतोय की नाही असे वाटणार्‍या त्या दिवसाचा अखेर अंत झाला होता.

'तुम सब नहाके फ्रेश हो जाओ. मे खाना लेके आता हु' असे बोलून कुणाल गेला. खरे तर कोणालाच काही खाण्याची इच्छा नव्हती पण मी त्याला बोललो. 'सब थक गये है यार. सोने दे उन्हे. कल सुबह देखेंगे.' तो मात्र मानला नाही. मानला तर पंजाबी कसला. 'तू पंजाब आया और मैने खातीर ना की तो मेरी तो नाक कट गाई यार.' असे बोलून तो खायला आणायला गेला. मी सुद्धा आवरून घेतले. आंघोळ केल्यावर मात्र मलापण भूक लागली. अभी-मनाली आणि साधना मात्र आडवे झाले होते कुणालने आणलेले बटर चिकन, रोटी आणि राइस खाउन बाकी सर्वांच्या 'जान मे जान आ गयी'. पहाटे ४ वाजता अखेर सर्वजण आपआपल्या खोल्यात जाउन गुडूप झाले. पण अजुन काहीतरी घडणे बाकी होते. आमच्या खोलीमध्ये तासाभरात पहाटे ५ वाजता कसल्याश्या वासाने मला श्वास गुदमरून जाग आली. बघतो तर काय........... माझ्या अवघ्या मीटरभर बाजूला एसीच्या पॉवरसप्लायमधून प्रचंड धूर निघत होता. संपूर्ण खोली धुराने भरली होती. काही क्षणात तो आता पेट घेईल अशी वेळ आली होती. मी पटकन शमिकाला उठवले आणि सर्व सामानघेउन खोली बाहेर पडलो. सकाळी लगेच निघायचे असल्याने सर्व सामान बॅगेतच होते. बाजूच्या खोली मधून अमेय आणि कुलदीपला उठवून शमिकाबरोबर थांबायला सांगितले आणि मी पुन्हा खिडक्या उघडायला खोलीत शिरलो. त्या २-३ मिन. मध्ये धूर इतक्या प्रमाणात वाढला होता की आतसुद्धा जाता येत नव्हते. मी तसाच मागे आलो आणि वॉचमनला बोलवायला गेलो. ते दोघेतिघे आले आणि मग खालून मेन पॉवरसप्लाय कट केला तेंव्हा कुठे धूर यायचा थांबला. नशीब एक मोठा अनर्थ टळला होता. आम्ही मग दुसर्‍या खोलीत झोपायला गेलो. तास-दोनतास झोपून लगेच उठलो आणि आवरायला लागलो. ९ वाजता आम्हाला दिल्लीसाठी निघायचे होते ना.

ये दिल्ली है मेरे यार ...

कालचा थकवा आज सकाळी जास्त जाणवत होता. मी आज गाडीमध्ये बसायचा निर्णय घेतला आणि बाइक आशिषने घ्यायचे ठरले. निघायच्या आधी कुणाल आम्हाला भेटायला आला होता. त्याला खरंतर आम्हाला चंदिगढ फिरवायचे होते पण आम्हाला ते काही जमले नाही. त्याला टाटा करून हॉटेल वरुन निघालो आणि सर्वांनी गरजेपुरते पेट्रोल भरून घेतले. आणि मग सुरू झाला शेवटच्या २०० किमी.चा प्रवास. अंबाला येथे हायवेलाच 'सागररत्न' म्हणून एक मस्त साउथ इंडियन हॉटेल आहे. तिकडे तासभर फूरसत मध्ये जेवलो. काहीच घाई नव्हती कारण दुपारी ४ पर्यंत दिल्लीगाठून 'इंडियागेट'ला पोचणे सहज शक्य होते.

आम्ही कुरुक्षेत्र - पानिपत - सोनिपत पार करत वेगाने दिल्लीकडे सरकत होतो. खरं तर ह्या ठिकाणी सुद्धा जायचे होते मला. पण वेळेअभावी ते शक्य नव्हते. ४ वाजता आम्ही बरोबर आय.एस.बी.टी. (ISBT) पार करत दिलीमध्ये प्रवेश केला आणि आमचे स्वागत करायला वारा आणि प्रचंड पावसाने तिकडे हजेरी लावली. पाउस अस्सा लागला की काही मिन.मध्ये सगळीकडे प्रचंड ट्रॅफिक जमले आणि पुन्हा एकदा आमच्या वेळेचा बोजवारा उडाला. बायकर्स कुठे आहेत? आपण कुठे आहोत याचा काही-काही पत्ता लागत नव्हता. ट्रॅफिक मध्ये २-३ तास असेच वाया गेले. अंधार सुद्धा पडला आणि 'इंडिया गेट'ला पोचायची शक्यता धूसर झाली. ८ वाजायच्या आधी आम्हाला बाइक्स स्टेशनला नेउन लोड करणे सुद्धा गरजेचे होते तेंव्हा आता सर्व बायकर्सनी थेट दिल्ली स्टेशन गाठायचे आणि गाडीने चाणक्यपुरी मधले व्हाय.एच.ए.आई. (YHAI) गाठायचे असे फोनवर ठरले.

मध्ये एकेठिकाणी राजपुताना रायफल्सचे मुख्यालय दिसले. देशाचा झेंडा हातात घेउन कारगिल युद्धात विजयश्री खेचून आणणार्‍या जवानांचे स्मारक पाहून गेल्या १२ दिवसांची आठवण आल्यावाचून राहिली नाही. तिकडून मी गाडी घेऊन चाणक्यपुरीला पोचलो आणि जागा ताब्यात घेऊन सामान सेट केले. एव्हाना अभी, अमेय, आशिष, कुलदीप आणि आदित्य दिल्ली स्टेशनला बाइक्स लोड करायला पोचले होते. आमच्या बाइक्सचे पेपर्स नेमके माझ्याकडे असल्याने मला पुन्हा ते घेउन स्टेशनला जाणे भाग होते. शिवाय मला आणि शमिकाला तिच्या मामाकडे सुद्धा जायचे होतेच. मग आम्ही पुन्हा निघालो त्या ट्राफिक मधून रस्ता काढत. ह्यावेळी गाडी नव्हती, निघालो होतो रिक्शामधून. कसेबसे ते स्टेशनला पोचलो. पेपर्स दिले आणि मामाकडे जाउन येतो म्हणुन तिकडून निघालो. विकासपुरीला मामाकडे पोचलो. त्यांना भेटलो. शमिकाला तिकडेच रहा आज. उदया सकाळी मी परत घ्यायला येइन, असे सांगून मी निघालो पुन्हा चाणक्यपुरीला यायला निघालो. ११ वाजता पोचलो तेंव्हा सर्वजण बाईक्स लोड करून पोचले होते. आता अखेरच्या सामानाची बांधाबंध सुरू झाली. 'अरे हे तुझे इतके दिवस माझ्याकडे पडले आहे. हे घे.' 'माझे नहीं आहे रे ते, कोणाचे काय-काय उचलतोस तू. तुलाच लक्ष्यात नसते' असे करत करत प्रत्येकाने आपापले आणि बहुदा काही दुसऱ्याचे सुद्धा सामान बांधले. मोजुन १-२ असलेल्या चार्जिंग पॉइंट्सवर बरेच मोबाएल वेटिंग वर होते. 'बास झाल रे इतका घरी जाईपर्यंत. आता हा लाव चल.' असे करता करता १ वाजून गेले. अर्धे झोपले म्हणुन मी आणि अभी लैपटॉप घेउन खोली बाहेर बसलो होतो. मी माझी आणि शमिची टिकिट्स बदलून संध्याकाळची करून घेतली.

पहाटे ३:३० वाजता सर्वांचा पुन्हा एकदा गलका सुरू झाला. पहाटे-पहाटे फ्लाइट्स असल्याने ४:३० पर्यंत निघणे आवश्यक होते. त्या सर्वांना सोडून मी, साधना आणि उमेश परत खोलीत येउन पडलो. साधना आणि उमेश ज़रा उशिराने दुसऱ्या फ्लाइटने जाणार होते. ते सुद्धा पहाटे ६:३० नंतर निघाले. मी माझे सामान बांधले, चेकआउटच्या फ़ोर्मालिटीज पूर्ण केल्या आणि विकासपुरीला पोचलो. तिकडून दुपारच्या फ्लाइटने मी आणि शमि सुद्धा संध्याकाळपर्यंत १४ दिवसाच्या प्रवासानंतर 'जिवाची मुंबई' करत मुंबईला पोचलो.

१४ दिवसांच्या एका अविस्मरणीय अश्या प्रवासानंतर मनात खुप विचार सुरू होते... आजही आहेत... आणि पुढेही राहतील... ते विचार अजून तुमच्या समोर लिहायचे आहेत. तेंव्हा भेटूया शेवटच्या भागात मोहिमेचा सारांश घेउन.....

अंतिम भाग : सारांश - अर्थात माझ्या मनातला ... !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भटक्या प्रवासवर्णन वाचेन सावकाशीने. पण मनाली माझं आवडतं ठिकाण आहे. एक वेगळीच अटॅचमेंट आहे.

छान Happy

रोहन.. तुझ्या भटकंतीच्या कथा जोरदार आहेत.. लक्कीश तुला इतके मस्त्,बिन्दास भटकायला मिळतं आणी त्यामुळे आम्ही पण लक्कीश!! फोटो पाहायला मिळतात ना म्हणून !!
अजून फोटो टाक पाहू.. Happy

हे आमचे राहिलेच मित्रा... बियास च्या सोबतीने प्रवास करतानाचे फोटोज् नाही काढता आले.. तु नशिबवान आहेस.