स्मशानात जागा हवी तेवढी

Submitted by अभय आर्वीकर on 18 August, 2010 - 00:59

स्मशानात जागा हवी तेवढी

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?

पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती?
हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे?

तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे?

जरी सत्य तू बोलशी मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?

कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?

कसा व्यर्थ नाराज झालास आंब्या, वृथा खेद व्हावा असे काय ते
फ़ळे चाखण्याचेच कौशल्य ज्याला, तया ओलणे ते जमावे कसे?

शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?

अभय काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन्‌ वसावे कसे..!
.
.
गंगाधर मुटे
……………………………………………………….......
शेती संबधीत काही शब्दांचे ढोबळमानाने अर्थ.

खुरटणे = वाढ खुंटणे,
तण = पिकांत वाढणारे अनावश्यक गवत
ओलणे = ओलीत करणे,पाणी देणे
///////////////////////////////////////////////////////////////////////////////

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे? - सुंदरच!

पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती?
हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे? - छान!

तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे? - पिसे कुस्करणे समजले नाही

जरी सत्य तू बोलतो मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता? - 'बोलशी' केल्यास बोलतो'स' सारखे व्हावे.
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे? - पुराव्याविना केल्यास 'व्हावेत'सारखे व्हावे.

(शेर छान आहे.)

कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?

(मला या शेरात डागडुजी आवश्यक वाटली. क्षमस्व!)

कसा व्यर्थ नाराज झालास आंब्या, वृथा खेद व्हावा असे काय ते (व्यर्थ, वृथा साधारण समानार्थी!)
फ़ळे चाखण्याचेच कौशल्य ज्याला, तया ओलणे ते जमावे कसे? - (ओल देणे ही मस्त वाटावे.)

(शेर सुंदर!)

शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन जाते, तिथे त्या पिकांनी लपावे कसे? - 'जाते' ऐवजी 'गेली' केल्यास 'कुंपणे' या अनेकवचनाला 'सूट' (मॅच) व्हावे

या शेरात दोन ओळींचे कनेक्शन लक्षात आले नाही. उत्क्रान्तलेली माकडे मस्तच! चित्त यांचा 'आधी तो माणूसच होता, त्याचे माकड नंतर झाले' हा शेर आठवला.

अभय काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन्‌ वसावे कसे..! - फार सुरेख!

श्री. गंगाधर मुटे,

- वृत्त हाताळणी सुरेख
- अनेक शेरांचा आशय सुरेख
- लांबलचक प्रतिसादासाठी क्षमस्व!
- काही शेरांमधील काही भाग अनावश्यक वाटला. (जसे मतल्यातील पहिल्या ओळीत काहीच सांगीतले जात नाही आहे व दुसर्‍या ओळीत पहिल्या ओळीचा संपूर्ण आशय प्लस समारोपीय आशय दोन्ही आहेत.)
- आता 'अभय' याचा अर्थ 'भय नसणे' अशाही अर्थाने तखल्लुसचा वापर होणे मनावर घ्यावेत अशी विनंती!

मनापासून शुभेच्छा!

उणे अधिक लिहिले गेल्यास क्षमस्व!

-'बेफिकीर'!

.

बेफिकीरजी, आभारी आहे.
बदल आवडलेत. करून घेतो.

खूप धन्यवाद. Happy

तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे? - पिसे कुस्करणे समजले नाही

मनाचे पिसे = मनाचे वेड ( मनाच्या वेडाची मुस्कटदाबी कशी करावी?असे काहीसे.)
.................

- काही शेरांमधील काही भाग अनावश्यक वाटला. (जसे मतल्यातील पहिल्या ओळीत काहीच सांगीतले जात नाही आहे व दुसर्‍या ओळीत पहिल्या ओळीचा संपूर्ण आशय प्लस समारोपीय आशय दोन्ही आहेत.)

तसे नाही. पहिल्या ओळीत प्रश्न आणि दुसर्‍या ओळीत समारोपीय उत्तर आहे.

अभय काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन्‌ वसावे कसे..!

जळजळीत..........दाहक...!