उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १ - पूर्वतयारी ... !

Submitted by सेनापती... on 17 August, 2010 - 20:00

चंदन यांच्या 'अतुल्य भारत' मधील लेह-लडाख वाचत असताना लेह मधल्या ढगफुटीची बातमी आली आणि गेल्यावर्षी आम्ही काही जणांनी बाईकवरून जम्मू - श्रीनगर - द्रास - कारगिल - लेह आणि मग - सरचू - मनाली मार्गे दिल्ली असा १३ दिवसांचा प्रवास केला होता ते सर्व क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. आम्हाला वाटेमध्ये मदत करणारे ते लोक, लष्कराचे जवान, आम्ही लेहमध्ये जिथे राहिलो ते 'नबी'चे घर, त्याचे कुटुंब, आमचा ड्रायव्हर तेनसिंग हे सर्व सुखरूप असतील अशी मनाला खात्री आहे. लडाखवरील आलेली आपत्ती दूर होवो आणि तिकडे गेलेले सर्वजण सुखरूप असोत हीच प्रार्थना... मृत्युमुखी पडलेल्या सदैव मदतीस तत्पर आणि मनमिळावू अश्या तिथल्या स्थानिक लोकांना मनापासून श्रद्धांजली. का कोण जाणे माझे मन पुन्हा एकदा लवकरच लडाखकडे जावे असे म्हणते आहे. त्या १३ दिवसांचा सफरनामा येथे मांडतोय. अपेक्षा आहे आपल्याला आवडेल.
*********************************************************************************************************************

लडाखला जाण्याचे २००३ पासून मनात होते. दरवर्षी एप्रिल महिना आला की लडाखचा विषय उचल खायचा आणि जून सुरू होता-होता ह्या-ना-त्याकारणाने 'ह्या वर्षी नाही रे शक्य. पुढच्या वर्षी बघू.' अश्या एका वाक्याने तो गुंडाळला जायचा. ह्यावर्षी मात्र जानेवारी महिन्यातच मी हा विषय उचलला आणि अभिजितला म्हटले,"काहीही झाले तरी ह्यावर्षी लडाख सर करायचेचं." अभिसुद्धा वाट बघत होताच. मग सुरू झाली तयारी एका अविस्मरणीय प्रवासाची. एक असा प्रवास जो आम्हाला आयुषभरासाठी अनेक आठवणी देउन जाणार होता. काही गोड तर काही कटु. आमच्यात नवे बंध निर्माण करणार होता तर मनाचे काही बंध तोडणार सुद्धा होता. पूर्व तयारीची संपूर्ण अघोषित जबाबदारी प्रामुख्याने अभिने उचलली होती. त्याला हवी तिथे आणि जमेल तशी मदत मी करणार होतो. ह्या बाइक ट्रिपमध्ये भारत-चायना सीमेवर असणारे १५००० फुटांवरील 'पेंगोंग-त्सो' व 'त्सो-मोरीरी' आणि '१८३८० फुटांवरील जगातील सर्वोच्च उंचीचा रस्ता खरदूंग-ला' ही मुख्य उदिष्ट्ते होती. तसेच झोजी-ला, द्रास - कारगिल ह्या 'ऑपरेशन विजय' च्या रणभूमीला भेट देणे हे सुद्धा आम्हाला अनुभवायचे होते. १९९९च्या कारगिल युद्धाला बरोबर १० वर्षे पूर्ण होत होती आणि १५ ऑगस्टचे निम्मित साधून आमच्या लडाखच्या सफरीचा योग जूळून आला होता.

एक मेल टाकली आणि बघता बघता १५ जण तयार झाले. अभि आणि माझ्या बरोबर मनाली, ऐश्वर्या, पूनम, कविता, दिपाली, अमेय साळवी, अमेय म्हात्रे, आदित्य आणि शोभित असे पटापट तयार झाले. आशिष, कुलदीप, शमिका, साधना आणि उमेश हे जायच्या आधी काही दिवसात टीममध्ये आले तर कविताचे ऐन वेळेला काही कारणाने यायचे रद्द झाले. जेंव्हा लडाखला जायचे ठरले तेंव्हा बाइकने जायचेचं असे काही पक्के नव्हते पण मला स्वतःला आणि इतर अनेकांना लडाख बाइकवरुन करायची उत्कट इच्छा होती. खर्चाचे गणित जूळवणे, बाइकवरुन जाण्याचा रूट ठरवणे, त्यासाठी लागणारी तयारी, जमेल तिकडचे रहायचे बुकिंग करणे, ११ हजार आणि अधिक फुटांवर स्वतःच्या आणि बाइकच्या तब्येतीची काळजी घेणे ह्या अश्या अनेक बाबींवर अभिने मेल्स टाकायला सुरवात केली होती. बाइक रायडर्समध्ये म्हणजेच मी, अभिजित, अमेय साळवी, अमेय म्हात्रे, आदित्य यांच्यात ताळमेळ जमून येण्यासाठी १-२ बाइक ट्रिप्स कराव्यात असे आमचे ठरले आणि त्यासाठी आम्ही ६-७ जूनला 'राजमाची बाइक ट्रिप'ला गेलो. ह्या ट्रिपचा आम्हाला लडाखला बराच फायदा झाला.

जून संपता-संपता नाही म्हटले तर बरीच तयारी झाली होती आणि म्हटले तर बरीच राहिली सुद्धा होती. सगळ्याची तयारी शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच होती. निघायच्या आधी म्हणजेच २ ऑगस्टला अभिने शेवटची ग्रुप मीटिंग घेतली. त्यात असे ठरले की अभिजित हे ट्रिप 'लिड' करेल. सर्वानुमते निर्णय घेतले तरी अंतिम निर्णय त्याचा असेल. त्याच्या अनूपस्थितीत मला 'डेप्युटी लीडर'ची जबाबदारी दिली. आमच्या दोघांशिवाय प्रत्येकाला अनुभव मिळावा म्हणुन 'दररोज वेगवेगळा लीडर' ठेवायचा असे ठरले होते. लडाखची सर्व पूर्वतयारी झाली होती. ग्रुप मीटिंग झाल्यावर सर्व बायकर्स् तिकडून निघाले ते थेट वांद्रे (बांद्रा) स्टेशनला बाइकस लोड करायला .....

२ ऑगस्टच्या रात्री उशिराने 'जम्मू-तवी'साठी सर्व बाइकस वांद्रे (बांद्रा) स्टेशनवर चढवल्या. त्यावेळेला पुढच्या १४ दिवसात नेमके किती कि.मी. होतात ते मोजण्यासाठी आशीषने गाडीच्या स्पीडोमिटरचा एक फोटो घेतला. ७ ऑगस्टला सकाळी अभि- मनाली आणि उमेश, साधना, आदित्य, ऐश्वर्या असे ६ जण जम्मूकडे रवाना झाले. अमेय म्हात्रे, कुलदिप आणि पूनम हे तिघे १ दिवस आधीच जम्मूला रवाना झाले होते. वेगवेगळ्या वाटेने सर्वजण जम्मूला पोचायच्या आधी त्यांना 'वैष्णवदेवी'ला जाउन यायचे होते. तर आशीष, दिपाली, अमेय साळवी आणि शोभीत हे विमानाने जम्मूला शनिवारी दुपारी लैंड झाले. मला कामावरून निघायला काही कारणाने १ दिवस उशीर झाल्याने मी जम्मूला उशिराने पोचणार होतो.

तिकडे जम्मूला दुपारी ३ च्या आत अमेय आणि आदित्यने रेलवे पार्सल ऑफिसमधून त्यांच्या गाडया उचलल्या. पण माझी, अमेय आणि अभीची अश्या अजून ३ गाडया उचलायच्या होत्या. त्यांचे पेपर अभिकडे होते आणि नेमकी (खरं तरं रेलवेच्या शिरस्त्याप्रमाणे असे म्हणायला काहीच हरकत नाही) जम्मू-तवी लेट झाली. ३ च्या आसपास स्टेशनच्या आसपास पोचूनदेखील गाडीला असा काही सिग्नल लागला की काही सुटायचे नाव नाही. संध्याकाळचे ५ वाजत आले तशी दोन्हीकडून फोन फोनी सुरू झाली. आशिष - अमेय स्टेशनवर तर अभी गाडीमध्ये. शेवटी अभी पेपर घेउन गाडी मधून उतरला आणि रेलवे ट्रैकमधून जवळ-जवळ २ कि. मी. पळत-पळत स्टेशनला येउन पोचला. चायला... कमालच केली पठ्याने... अखेर सर्व गाडया उचलल्या. गाडीला कुठे काय डॅमेज झाले आहे ते पाहिले आणि बघतोय तर काय सर्वांच्या गाडीला कुठे ना कुठे डॅमेज झालेलेच होते. ते सर्व नीट करून घेतले. आल्या-आल्या छोटे छोटे प्रॉब्लम सुरू झाले होते. त्यात आम्ही जी सपोर्ट वेहिकल सांगितली होती तो ड्रायवर आलाच नाही. मग सर्व सामान बाइक्सवर लोड फेऱ्या करत जम्मू-काश्मिर टूरिझमच्या हॉटेलवर पोचवले.

त्यावेळेला मी तिकडे मुंबईला पोचलो होतो आणि निघायच्या आधीची आमची शेवटची तयारी करत होतो. इकडे जम्मू-काश्मिर टूरिझमच्या हॉटेलकडे सर्वांचा टिम डिनर रंगला होता. एक वेगळाच उत्साह होता प्रत्येकाच्या चेह्ऱ्यावर. अनेक वर्षांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे ह्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. जेवणानंतर ठरल्याप्रमाणे एक मीटिंग झाली. उदया खऱ्या अर्थाने मोहिमेचा पहिला दिवस होता. सकाळी-सकाळी जम्मूवरुन निघुन संध्याकाळपर्यंत श्रीनगर गाठायचे होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. एकदम रोमांचकारी वाटतेय तयारी वाचूनच. खरी ट्रीप सुरू झाल्यावर अजून मजा येणार.
प्रत्येक भागात मागील आणि पुढील भागाची लिंक देणार का.

अश्विनी के |... लिंक द्यायला अजून नीट जमत नाही आहे...:( बघतो...

तोपर्यंत कृपया माझ्या 'पाउलखुणा' मधून लिखाण बघा....