आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. या वर्षी गुरुपौर्णिमेला नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख...
पौर्णिमेची रात्र. चंद्रप्रकाश असूनसुद्धा पावसाळी ढगांमुळे फारसे काही दिसत नव्हते. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला त्याचा पत्ता लागला. पालखी पकडली गेली.
'शिवाजी आपल्या ताब्यात आला आहे' अश्या खुशीत असलेल्या जोहरच्या भ्रमाचा भोपळा लगेच फुटला. त्याला कळून चुकले की हे राजे नसून 'शिवा काशिद' नावाचा दुसराच कोणी तरी आहे. राजे आपल्या हातून निसटले आहेत. त्याने सिद्दी मसूद आणि फाझलखानाला शिवरायांच्या मागावर पाठवले. पाठलाग सुरु झाला ... शिवाजी राजे पालखीचा गोंडा पकडून बसले होते. बाजींचा आवाज त्यांच्या कानावर येत होता. 'चला गनीम पाठीवर आहे.'
दर काही मिनिटांना पालखीचे भोई बदलत, वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत ते ६०० वीर विजेच्या वेगाने पळत सुटले होते. उदिष्ट एकच होत - विशाळगड़. हातात नंग्या तलवारी घेउन बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते. मागचे आणि पुढचे हेर बित्तंबातमी राजांकड़े पोचवत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती. क्षण अन क्षण आता महत्त्वाचा होता.
सिद्दीमसूदचे सैन्य घोड्यावरुन राजांचा पाठलाग करत होते. त्यांनी थोडा वेगळा मार्ग घेतला होता. अर्थात घोड़खिंडीच्या अलिकड़े राजांना गाठायचे असे त्यांनी पक्के केले असेल. त्यांच्या थोड़े मागून आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ येत होते. राजांचे पहिले लक्ष्य होते पांढरपाणी. एकदा तिकडे पोचले की खिंड गाठणे अवघड जाणार नव्हते. आदल्या दिवशी रात्री १० वाजता पन्हाळगड सोडल्यापासून १२ तासात कोणी थोडया विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते. एका ध्येयाने भारावल्यागत ते ६०० वीर विशाळगडाकड़े पळत सुटले होते.
पन्हाळगड ते पावनखिंड एकुण अंतर आहे ६१ किलोमीटर. तर पन्हाळगड पासून ५५ किलोमीटर अंतरावर आणि पावनखिंडिच्या ६ किलोमीटर अलिकड़े पांढरपाणी आहे. पांढरपाणीच ऐतिहासिक महत्व अनन्य साधारण आहे. महाराज पांढरपाणीला येउन पोचलो होते त्यावेळेला घोड्यावरुन राजांचा पाठलाग करणारे सिद्दीमसूदचे सैन्य अगदी जवळ येउन ठेपले होते. धोका वाढत जात होता. कुठल्याही क्षणी त्यांची धाड पडेल असे वाटू लागले. शत्रुला गुंतवायला राजांनी २५ मावळे पांढरपाणीला ठेवले आणि ते घोड़खिंडीकड़े निघाले. अवघे २५ जण आता त्या २००० घोडेस्वारांशी लढायला तयार झाले होते. जास्तीत जास्त वेळ शत्रुला रोखून धरायचे काम त्यांना बजावावे लागणार होते. तितका बहुमूल्य वेळ राजांना खिंडीकड़े सरकायला मिळणार होता. आलेल्या घोडदळाला त्या २५ मावळ्यांनी शर्थीने रोखून धरले. त्यात त्या सगळ्या २५ जणांना मृत्यू आला. पण आपले काम त्यांनी चोख बजावले होते. पांढरपाण्याची नदी रक्ताने लाल झाली होती. राजे घोडखिंडीकड़े जाउन पोचले होते.
राजांनी रायाजी बांदलाला ३०० मावळे सोबत घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोखायचे काम दिले. पण आपल्या मालकाऐवजी म्हणजेच रायाजीऐवजी मी ह्या ठिकाणी थांबतो, तुम्ही रायाजीला सोबत घेऊन विशाळगड गाठा, असे बाजींनी राजांना सुचवले. बाजींची स्वामीभक्ती येथे दिसून येते. आता राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशाळगडाकड़े निघाले. बाजींनी खिंडीमध्ये आपली व्युव्हरचना केली. चढणीवरच्या आणि आसपासच्या झाडीमध्ये गटागटाने मावळे तैनात केले. प्रत्येकाकडे गोफणीतून भिरकवायचे दगड आणि ढकलायचे शिलाखंड जमा केले गेले. शत्रु टप्यात येण्याची वाट बघत सगळे दडून बसले होते. १२-१३ तासांच्या अथक वाटचाली नंतर सुद्धा निवांतपणा नव्हता. निर्णायक लढाईसाठी आता ते ३०० वीर सज्ज झाले होते. पूर्वेच्या दिशेने घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येऊ लागले. थोड्यावेळात शत्रु नजरेत येऊ लागला पण शत्रुच्या नजरेत लपलेले मावळे काही येत नव्हते. त्या अवघड निसरड्या वाटेने एक रांग धरून सिद्दीमसूदचे घोडेस्वार उतरु लागले. गोफणीच्या टप्यात शत्रू आल्यावर बाजींनी एकच हाकाटी दिली आणि अचानक शत्रूच्या अंगावर दगड बरसू लागले. घोड्यांनी कच खाल्ली. काही उधळले. काही सरकून पडले. एकच गोंधळ उडाला. कित्येकांची डोकी फुटली, बाकी जिवाच्या भीतीने मागे पळाले. मावळ्यांनी हर हर महादेवचा नारा दिला. पण शत्रू इतक्यात मागे सरकणार नव्हता. घोडेस्वार पुन्हा उतरु लागले. मावळ्यांनी पुन्हा दगड भिरकवायला सुरवात केली. ते शत्रूला काही केल्या पुढे सरकू देईनात. साधारण ४ वाजत आले होते. थोड़े मागून येणाऱ्या आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ आता खिंडीकड़े येउन पोचले. ते अधिक वेगाने ओढ़यापलिकडे सरकू लागले. आता मावळ्यांनी त्यांच्यावर शिलाखंड ढकलायला सुरवात केली. त्यामुळे पायदळाची पांगापांग होऊ लागली. अखेर तासाभरानी शत्रूला वर पोहोचण्यात यश मिळाले.
आता आजूबाजुच्या झाडीमधून बाजीप्रभू आणि इतर मावळे बाहेर पडले आणि प्रत्यक्ष रणमैदानात शस्त्राची लढाई सुरु झाली. एक-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजींच्या तलवारीच्या टप्यात येणारा प्रत्येकजण यमसदनी जात होता. स्वतःच्या देहाची जणू काही त्यांनी तटबंदी करून घेतली होती. बाजींचे थोरले बंधू फुलाजीप्रभू सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते. इतक्यात शत्रूने फुलाजीप्रभुंवर डाव साधला. ते खाली कोसळले. त्यांच्या हातून खड्ग गळाले. बाजींनी एक नजर त्यांच्याकड़े पाहिले. ते म्हणाले, "दादा, तुम्ही थोरले. पहिला मान तुम्ही घेतला." फुलाजीप्रभुंची तलवार त्यांनी उचलली. आधी एक ढाल - एक तलवार घेउन लढणाऱ्या बाजींनी आता दोन्ही हातात तलवारी घेतल्या होत्या. त्यांचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दणाणले होते. बाजी आता अधिक त्वेषाने लढत होते. त्यांच्या देहाची आता चाळण उडाली होती. रक्ताचे अर्ह्य ओसंडत होते. हे काही आपली वाट सोडत नाहीत असे पाहून पिडनायकाने आपल्या एका पायदळ सैनिकाला ठासणीच्या बंदूकीतून बाजींवर गोळी झाडायला सांगितली. ती गोळी बाजींच्या खांद्यात घुसली. बाजींचा शस्त्राचा एक हात थांबला. लढता-लढता ते खाली कोसळले. पण त्यांचे प्राण काही जात नव्हते. त्यांचे कान विशाळगडाकड़े लागले होते. राजे जोपर्यंत गडावर पोचून तोफांचे बार देत नाहीत तोपर्यंत त्यांनी मृत्युला ठणकावून सांगितले "तोफे आधी न मरे बाजी." बाजींच्या मनाची घालमेल होत होती. त्यांच्या मनात अखेरचे विचार सुरु होते.
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... ! धृ
दिसू लागले अभ्र सभोवती ... विदिर्ण झाली जरीही छाती ... !
अजून जळते आंतरज्योती ... अजून जळते आंतरज्योती ... कसा सावरू देह परी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! १
होय तनूची केवळ चाळण ... प्राण उडाया बघती त्यातून ... !
मिटण्या झाले अधीर लोचन ... मिटण्या झाले अधीर लोचन ... खड्ग गळाले भूमिवरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! २
पावनखिंडित पाउल रोवून ... शरीर पिंजे तो केले रण ... !
शरणागतीचा अखेर येई क्षण ... शरणागतीचा अखेर येई क्षण ... बोलवशील का आता घरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! ३
तिकडे विशाळगडाच्या वाटेवर राजांच्या मनाची घालमेल होत होती. रणगर्जनेचे आवाज त्यांच्या कानावर पडले होते. पण त्यांना पुढे सरकणे भाग होते. विशाळगडाला वेढा घालून बसलेल्या सुर्वे आणि दळवी या आदिलशहाच्या वतनदारांच्या सैन्याला कापत सतत २१ तासांच्या वाटचालीनंतर राजांनी विशाळगड गाठला आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांचे बार देण्याची आज्ञा केली. ते बार घोड़खिंडीमध्ये ऐकू गेले. त्यानंतरच समाधानाने बाजींनी आपला देह सोडला.
"पावनखिंड - बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली. जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओशाळवले. "
"इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो."
पावनखिंडितला हा अविस्मरणीय असा एक अनुभव... आयुष्यावर कायमचा कोरला गेलेला...
अंगावर काटा आला वाचताना ! ते
अंगावर काटा आला वाचताना ! ते गाणं तर नेहमीच अस्वस्थ करतं.
खूप छान लिहिलंयस.डोळ्यांसमोर चित्र उभं केलंस.
अप्रतिम यार! मस्त!
अप्रतिम यार! मस्त!
मस्त लिहिलयं!
मस्त लिहिलयं!
अरे भटक्या नुकताच एक ब्लॉग
अरे भटक्या नुकताच एक ब्लॉग वाचण्यात आला. त्यात त्यांनी असे लिहीलेय की बाजींचा मृत्यू पावनखिंडीत झाला नाही. राजे सुखरूप विशाळगडावर पोहोचले आणि त्यावेळी मसूदचे सैन्य विशाळगडावर चालून येऊ लागले आणि त्याला अटकाव करण्यासाठी राजांनी जे सैन्य पाठवले त्यात बाजी होते. आणि त्यांनी ज्या जागेवर मसूदच्या सैन्याला रोखून धरले ती विशाळगडाच्या वाटेवरची एक चिंचोळी जागा आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, तोफेचे पाच आवाज वगैरे हे शाहीरांनी रचलेले काव्य आहे. प्रत्यक्ष काही वेगळेच घडले.
त्यासाठी त्यांनी काय संदर्भ
त्यासाठी त्यांनी काय संदर्भ दिले आहेत??
मला लिंक दे... 'बांदलां'ची कागदपत्रे मी जे लिहिले आहे ते सांगतात..
मसूदच्या सैन्याला रोखून धरले ती विशाळगडाच्या वाटेवरची एक चिंचोळी जागा आहे.
>>>> ह्या जागेचा उल्लेख असेल...
ह्या ठिकाणी सुर्वे यांचे सैन्य होते जे विशाळगडाला जाणारा रस्ता रोखून होते ते राजांनी कापले आणि गडावर पोचले.
http://raigad.wordpress.com/
http://raigad.wordpress.com/
मला माहित आहे हा ब्लॉग कोणाचा
मला माहित आहे हा ब्लॉग कोणाचा आहे ते.. मी बोलतो त्याच्याशी...
त्याच्याकडे काही नवीन माहिती असेल आणि माझ्या लिखाणात काही उणीव असेल तर दुरुस्त करीन....
पावनखिंडीत मृत्युमुखी
पावनखिंडीत मृत्युमुखी पडलेल्या बाजी - फुलाजी आणि सर्व अज्ञात वीरांना मनाचा मुजरा...
मला खुप दिवसापासून एक प्रश्न
मला खुप दिवसापासून एक प्रश्न पडला आहे. शिवाजी महाराजानी घोड्याचा वापर का नाही केला ते लक्षात आले पण स्वतःसाठी पालखी चा वापर का केला असावा? जोपरीयन्त शक्य होते तो परियन्त घोडा वापरून नन्तर पायी गेले असते तर कमी वेळ लागला नसता का?
@ रान्चो मला खुप दिवसापासून
@ रान्चो
मला खुप दिवसापासून एक प्रश्न पडला आहे. शिवाजी महाराजानी घोड्याचा वापर का नाही केला ते लक्षात आले पण स्वतःसाठी पालखी चा वापर का केला असावा? जोपरीयन्त शक्य होते तो परियन्त घोडा वापरून नन्तर पायी गेले असते तर कमी वेळ लागला नसता का?<<<<
पन्हाळा ते विशाळगड या वाटेवर पावसाळ्यात ढोपरढोपर भर चिखल होतो. घोडा सोडा पण सडया माणसालाही ह्या चिखलांतून मार्ग काढताना नाकीनऊ येतात. मग महाराज गडातून आषाढातील भर पावसात बाहेर पडले. आणि त्यावेळी गडाला वेढाही पडलेला. या वेढ्यातून गुपचूपणे घोड्यांसहीत बाहेर पडणे केवळ अशक्यच.
राजांनी २५ मावळे पांढरपाणीला
राजांनी २५ मावळे पांढरपाणीला ठेवले >>>>>> ही नविन माहीती मिळाली.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
फारच सुंदर लिहले...डोळे
फारच सुंदर लिहले...डोळे पाणावले
रणाविण स्वातंत्र्य कोणा
रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले !!!
यावर मि शिवा कशिद च्या
यावर मि शिवा कशिद च्या जिवनावर एक कथा लिहिलि आहे. लवकरच पोस्त करतो.
सैन्य बान्दलांच असल तरि बहुदा
सैन्य बान्दलांच असल तरि बहुदा कर्ता बांदल म्रुत्यु मुखि पडल्यामुळे (पुर्विच) बाजि प्रभु च बान्दलान्चे कारभारि होते.या लढाइ नन्तर महाराजानि मानाचे पहिले पान जेध्याकदुन काढुन बान्दाला ना दिले.
यापुर्वि प्रतापगडाच्या लढाइत
यापुर्वि प्रतापगडाच्या लढाइत शौर्य गाज्वल्या बद्दल मानाचे पहिले पान जेध्या कडे होते.
(No subject)
पावनखिंडीत मृत्युमुखी
पावनखिंडीत मृत्युमुखी पडलेल्या बाजी - फुलाजी आणि सर्व अज्ञात वीरांना मनाचा मुजरा... >> +१०००००
वा सेनापती - काय शब्दबद्ध केलेत तुम्ही - सगळं सगळं अगदी डोळ्यासमोर उभं केलंत..... कशी समृद्ध शब्दकळा आणि आवेशपूर्ण वर्णन -
या अशा कथा वाचून वाटतं - धन्य आहोत आपण सारे - या अशा महाराष्ट्रभूमीत जन्म मिळाला - केवढे थोर भाग्य.....
पावनखिंडीत मृत्युमुखी
पावनखिंडीत मृत्युमुखी पडलेल्या बाजी - फुलाजी आणि सर्व अज्ञात वीरांना मनाचा मुजरा... >> +१००००००
पावनखिंडीत मृत्युमुखी
पावनखिंडीत मृत्युमुखी पडलेल्या बाजी - फुलाजी आणि सर्व अज्ञात वीरांना मनाचा मुजरा.<<< +१
याच लढाईवर आधारीत एक मराठी सिनेमा लवकरच येणार आहे.

कधी येणार आहे? अनेक दिवस
कधी येणार आहे? अनेक दिवस ऐकतोय. उत्सुकता आहे हा सिनेमा बघायची.
खूप छान रोहन
खूप छान रोहन
पावनखिंडीत मृत्युमुखी
पावनखिंडीत मृत्युमुखी पडलेल्या बाजीप्रभु आणि सर्व अज्ञात वीरांना मनाचा मुजरा.
सेना हा धागा आठवणीने वर काढ्ल्या बद्द्ल धन्यवाद
आयुष्यावर कायमचा कोरला
आयुष्यावर कायमचा कोरला गेलेला...>>
पावनखिंडीत मृत्युमुखी
पावनखिंडीत मृत्युमुखी पडलेल्या बाजी - फुलाजी आणि सर्व अज्ञात वीरांना मनाचा मुजरा..
सरणार कधी रण हे काव्य त्यांना
सरणार कधी रण
हे काव्य त्यांना समर्पित आहे ज्यांनी असंख्य यातना सहन करून आणखीन थोडे जगण्यासाठी आपल्या मरणाला थोपवून धरलेल्यांच्या साठी आहे
आपल्या जीवनात शेवटपर्यंत असंख्य संघर्ष केले व क्लेशदायक मरण ज्यांनी पत्करले त्यांना समर्पित आहे
शिनेमा आला काय ?
शिनेमा आला काय ?
पावनखिंड चित्रपट येतोय म्हणून
पावनखिंड चित्रपट येतोय म्हणून
जंग जोहर नाम होते
जंग जोहर नाम होते
ते बदलून पावनखिंड केले
अच्छा, बरे झाले पावनखिंड हेच
अच्छा, बरे झाले पावनखिंड हेच नाव योग्य होते. एक बरे आहे आताच्या मुलांना निदान टिव्हीवर तरी छात्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड, युद्धनिती, न्याय निवाडा , इतिहासात अजून काय काय घडले ते सगळे अमोल कोल्हे यांच्या दोन्ही सिरीयल मधून पाहता येतेय. तसे आधी काही मालिका येऊन गेल्यात पण यातल्या कलाकारांचे काम फार छान आहे.
सध्या स्वराज्य जननी जिजामाता बघतोय आम्ही. त्यात उद्यापासुन पावनखिंडी ची लढाई दाखवतील. कारण कालच सिद्धी जौहर अदिलशाह ला मिळालेला दाखवलाय. आणी बहिर्जी नाईक महाराजांना येऊन सुचना देतात त्या विषयी.
तान्हाजीच्या यशामुळे तसे फर्जंद व फतेशिकस्त लोकांनी आवडीने बघीतले. यावेळी लोक सिंहगडावर भारलेल्या मनाने गेले. नाहीतर पूर्वी चला कुठेतरी जाऊ सहलीला असे म्हणायचे. हा बदल चांगलाय. आता हंबीरराव मोहीते पण येणार आहे. दोन्ही चित्रपट बघणार.
Pages