पावनखिंडीचा रणसंग्राम... ३५० वर्षे पूर्ण ...

Submitted by सेनापती... on 17 August, 2010 - 00:15

आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. या वर्षी गुरुपौर्णिमेला नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख...

पौर्णिमेची रात्र. चंद्रप्रकाश असूनसुद्धा पावसाळी ढगांमुळे फारसे काही दिसत नव्हते. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला त्याचा पत्ता लागला. पालखी पकडली गेली.

'शिवाजी आपल्या ताब्यात आला आहे' अश्या खुशीत असलेल्या जोहरच्या भ्रमाचा भोपळा लगेच फुटला. त्याला कळून चुकले की हे राजे नसून 'शिवा काशिद' नावाचा दुसराच कोणी तरी आहे. राजे आपल्या हातून निसटले आहेत. त्याने सिद्दी मसूद आणि फाझलखानाला शिवरायांच्या मागावर पाठवले. पाठलाग सुरु झाला ... शिवाजी राजे पालखीचा गोंडा पकडून बसले होते. बाजींचा आवाज त्यांच्या कानावर येत होता. 'चला गनीम पाठीवर आहे.'

र काही मिनिटांना पालखीचे भोई बदलत, वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत ते ६०० वीर विजेच्या वेगाने पळत सुटले होते. उदिष्ट एकच होत - विशाळगड़. हातात नंग्या तलवारी घेउन बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते. मागचे आणि पुढचे हेर बित्तंबातमी राजांकड़े पोचवत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती. क्षण अन क्षण आता महत्त्वाचा होता.

सिद्दीमसूदचे सैन्य घोड्यावरुन राजांचा पाठलाग करत होते. त्यांनी थोडा वेगळा मार्ग घेतला होता. अर्थात घोड़खिंडीच्या अलिकड़े राजांना गाठायचे असे त्यांनी पक्के केले असेल. त्यांच्या थोड़े मागून आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ येत होते. राजांचे पहिले लक्ष्य होते पांढरपाणी. एकदा तिकडे पोचले की खिंड गाठणे अवघड जाणार नव्हते. आदल्या दिवशी रात्री १० वाजता पन्हाळगड सोडल्यापासून १२ तासात कोणी थोडया विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते. एका ध्येयाने भारावल्यागत ते ६०० वीर विशाळगडाकड़े पळत सुटले होते.

पन्हाळगड ते पावनखिंड एकुण अंतर आहे ६१ किलोमीटर. तर पन्हाळगड पासून ५५ किलोमीटर अंतरावर आणि पावनखिंडिच्या ६ किलोमीटर अलिकड़े पांढरपाणी आहे. पांढरपाणीच ऐतिहासिक महत्व अनन्य साधारण आहे. महाराज पांढरपाणीला येउन पोचलो होते त्यावेळेला घोड्यावरुन राजांचा पाठलाग करणारे सिद्दीमसूदचे सैन्य अगदी जवळ येउन ठेपले होते. धोका वाढत जात होता. कुठल्याही क्षणी त्यांची धाड पडेल असे वाटू लागले. शत्रुला गुंतवायला राजांनी २५ मावळे पांढरपाणीला ठेवले आणि ते घोड़खिंडीकड़े निघाले. अवघे २५ जण आता त्या २००० घोडेस्वारांशी लढायला तयार झाले होते. जास्तीत जास्त वेळ शत्रुला रोखून धरायचे काम त्यांना बजावावे लागणार होते. तितका बहुमूल्य वेळ राजांना खिंडीकड़े सरकायला मिळणार होता. आलेल्या घोडदळाला त्या २५ मावळ्यांनी शर्थीने रोखून धरले. त्यात त्या सगळ्या २५ जणांना मृत्यू आला. पण आपले काम त्यांनी चोख बजावले होते. पांढरपाण्याची नदी रक्ताने लाल झाली होती. राजे घोडखिंडीकड़े जाउन पोचले होते.

राजांनी रायाजी बांदलाला ३०० मावळे सोबत घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोखायचे काम दिले. पण आपल्या मालकाऐवजी म्हणजेच रायाजीऐवजी मी ह्या ठिकाणी थांबतो, तुम्ही रायाजीला सोबत घेऊन विशाळगड गाठा, असे बाजींनी राजांना सुचवले. बाजींची स्वामीभक्ती येथे दिसून येते. आता राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशाळगडाकड़े निघाले. बाजींनी खिंडीमध्ये आपली व्युव्हरचना केली. चढणीवरच्या आणि आसपासच्या झाडीमध्ये गटागटाने मावळे तैनात केले. प्रत्येकाकडे गोफणीतून भिरकवायचे दगड आणि ढकलायचे शिलाखंड जमा केले गेले. शत्रु टप्यात येण्याची वाट बघत सगळे दडून बसले होते. १२-१३ तासांच्या अथक वाटचाली नंतर सुद्धा निवांतपणा नव्हता. निर्णायक लढाईसाठी आता ते ३०० वीर सज्ज झाले होते. पूर्वेच्या दिशेने घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येऊ लागले. थोड्यावेळात शत्रु नजरेत येऊ लागला पण शत्रुच्या नजरेत लपलेले मावळे काही येत नव्हते. त्या अवघड निसरड्या वाटेने एक रांग धरून सिद्दीमसूदचे घोडेस्वार उतरु लागले. गोफणीच्या टप्यात शत्रू आल्यावर बाजींनी एकच हाकाटी दिली आणि अचानक शत्रूच्या अंगावर दगड बरसू लागले. घोड्यांनी कच खाल्ली. काही उधळले. काही सरकून पडले. एकच गोंधळ उडाला. कित्येकांची डोकी फुटली, बाकी जिवाच्या भीतीने मागे पळाले. मावळ्यांनी हर हर महादेवचा नारा दिला. पण शत्रू इतक्यात मागे सरकणार नव्हता. घोडेस्वार पुन्हा उतरु लागले. मावळ्यांनी पुन्हा दगड भिरकवायला सुरवात केली. ते शत्रूला काही केल्या पुढे सरकू देईनात. साधारण ४ वाजत आले होते. थोड़े मागून येणाऱ्या आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ आता खिंडीकड़े येउन पोचले. ते अधिक वेगाने ओढ़यापलिकडे सरकू लागले. आता मावळ्यांनी त्यांच्यावर शिलाखंड ढकलायला सुरवात केली. त्यामुळे पायदळाची पांगापांग होऊ लागली. अखेर तासाभरानी शत्रूला वर पोहोचण्यात यश मिळाले.

आता आजूबाजुच्या झाडीमधून बाजीप्रभू आणि इतर मावळे बाहेर पडले आणि प्रत्यक्ष रणमैदानात शस्त्राची लढाई सुरु झाली. एक-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजींच्या तलवारीच्या टप्यात येणारा प्रत्येकजण यमसदनी जात होता. स्वतःच्या देहाची जणू काही त्यांनी तटबंदी करून घेतली होती. बाजींचे थोरले बंधू फुलाजीप्रभू सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते. इतक्यात शत्रूने फुलाजीप्रभुंवर डाव साधला. ते खाली कोसळले. त्यांच्या हातून खड्ग गळाले. बाजींनी एक नजर त्यांच्याकड़े पाहिले. ते म्हणाले, "दादा, तुम्ही थोरले. पहिला मान तुम्ही घेतला." फुलाजीप्रभुंची तलवार त्यांनी उचलली. आधी एक ढाल - एक तलवार घेउन लढणाऱ्या बाजींनी आता दोन्ही हातात तलवारी घेतल्या होत्या. त्यांचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दणाणले होते. बाजी आता अधिक त्वेषाने लढत होते. त्यांच्या देहाची आता चाळण उडाली होती. रक्ताचे अर्ह्य ओसंडत होते. हे काही आपली वाट सोडत नाहीत असे पाहून पिडनायकाने आपल्या एका पायदळ सैनिकाला ठासणीच्या बंदूकीतून बाजींवर गोळी झाडायला सांगितली. ती गोळी बाजींच्या खांद्यात घुसली. बाजींचा शस्त्राचा एक हात थांबला. लढता-लढता ते खाली कोसळले. पण त्यांचे प्राण काही जात नव्हते. त्यांचे कान विशाळगडाकड़े लागले होते. राजे जोपर्यंत गडावर पोचून तोफांचे बार देत नाहीत तोपर्यंत त्यांनी मृत्युला ठणकावून सांगितले "तोफे आधी न मरे बाजी." बाजींच्या मनाची घालमेल होत होती. त्यांच्या मनात अखेरचे विचार सुरु होते.

सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... ! धृ

दिसू लागले अभ्र सभोवती ... विदिर्ण झाली जरीही छाती ... !
अजून जळते आंतरज्योती ... अजून जळते आंतरज्योती ... कसा सावरू देह परी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! १
होय तनूची केवळ चाळण ... प्राण उडाया बघती त्यातून ... !
मिटण्या झाले अधीर लोचन ... मिटण्या झाले अधीर लोचन ... खड्ग गळाले भूमिवरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! २

पावनखिंडित पाउल रोवून ... शरीर पिंजे तो केले रण ... !
शरणागतीचा अखेर येई क्षण ... शरणागतीचा अखेर येई क्षण ... बोलवशील का आता घरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! ३

तिकडे विशाळगडाच्या वाटेवर राजांच्या मनाची घालमेल होत होती. रणगर्जनेचे आवाज त्यांच्या कानावर पडले होते. पण त्यांना पुढे सरकणे भाग होते. विशाळगडाला वेढा घालून बसलेल्या सुर्वे आणि दळवी या आदिलशहाच्या वतनदारांच्या सैन्याला कापत सतत २१ तासांच्या वाटचालीनंतर राजांनी विशाळगड गाठला आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांचे बार देण्याची आज्ञा केली. ते बार घोड़खिंडीमध्ये ऐकू गेले. त्यानंतरच समाधानाने बाजींनी आपला देह सोडला.

"पावनखिंड - बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली. जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओशाळवले. "

"इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो."
पावनखिंडितला हा अविस्मरणीय असा एक अनुभव... आयुष्यावर कायमचा कोरला गेलेला...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय लिहीता राव. पुर्वी इतिहासकारांचे भाषण ऐकुन कान तृप्त व्हायचे. आता तुमच लेखन वाचुन तेच घडतय. फरक इतकाच पुर्वी भाषण ऐकताना इतिहास डोळ्यापुढे दिसायचा आता वाचताना दिसतोय.

"इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो."
अगदी खरं आहे !

पक्क्या.. तुमची हि मागोवा मालिका, खरच खूप जबरदस्त आहे.

tutari1.jpg

सुंदर वर्णन आहे... आवडले. पुढील लेखनांस शुभेच्छा.

२५ मावळे पांढरपाणीला
--- हे मला आजच कळाले. पहिला अडथळा पावनखिंडेला बाजींच्या रुपात होता असाच माझा आजवर समज होता, तो दुर झाला.

खुपच सुंदर वर्णन.
फरक इतकाच पुर्वी भाषण ऐकताना इतिहास डोळ्यापुढे दिसायचा आता वाचताना दिसतोय.>>>>नितीनदांना अनुमोदन

थोडक्यात पण अतिशय ओघवत्या ओजस्वी भाषेत महत्वपूर्ण ऐतिहासिक कथा सान्गितली आहे Happy छापुन सन्ग्रहि ठेवावी, पोराबाळान्ना वाचायला द्यावी अशीच ही आहे!
हा आहे "आम्हा मराठ्यान्चा" खराखुरा व अजुनही जिताजागता वाटावा असा इतिहास!
(आयुष्यात काशीविश्वेश्वराला कधी जाणे होईल की नाही माहित नाही, पण एकदातरी या पावनखिन्डीत जायचेच जायचे आहे - जायला मिळूदे अशी इश्वरचरणी प्रार्थना)

सर्वांचे आभार... प्रतिक्रियामुळे लिखाणाचा उत्साह वाढतो... Happy पुढचे लिखाण लवकरच करतो.... Happy

फारच सुंदर.... अप्रतिम...
बाबासाहेबांच्या 'राजा शिवछत्रपती' पुस्तकात त्या प्रसंगाचे वर्णन वाचले होते. त्याच तोडीचे हे लिखाण आहे.
मला एक शंका आहे...असे म्हणतात की, ज्या वाटेने राजांनी पावनखिंड पार केली तो आता पाण्याखाली गेलाय आणि पावनखिंड म्हणून जी खिंड दाखवतात ती वेगळीच आहे. याबाबत जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
उदय - अनुमोदन.. मलाही आत्तापर्यंत असेच वाटत होते.

बाबासाहेबांच्या 'राजा शिवछत्रपती' >>> असे उगाच काही बोलू नका हो...

माझ्यामते तो भाग पाण्याखाली गेलेला नाही आहे... आजपर्यंत जी जागा खिंड म्हणून दाखवली जाते तो खरेतर एक धबधबा आहे. तिकडून पुढे जाणे निव्वळ अशक्य आहे. त्याच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी जो मार्ग आहे (तो खिंडी इतका चिंचोळा नाही) तिथे लढाई झाली असे आप्पा परब यांचे म्हणणे आहे. बंदलांच्या कागदपत्रांमध्ये ह्या संदर्भात काही उल्लेख आढळतात.

पावनखिंड कुठली आहे ह्यावर एकमत नाही. काही ती पाण्याखाली गेली असे म्हणतात, काही नाही.

( आता ह्यावरुन बघा, पावनखिंड नव्हतीच, शिवाजी पळालाच नाही, सिद्दीने त्याला सोडले असे काही थोर म्हणाले तरी नवल वाटन्यासारखे काही नाही.)

२१ तासांच्या वाटचालीनंतर राजांनी विशाळगड गाठला आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांचे बार देण्याची >>>

भटक्या अरे विशाळगडाला सुर्व्याने वेढा दिला होता. हे महाराजांना महित नव्हते. हे कसे विसरलास? ते ही टाकायचे की. मराठा माणूस पण शत्रू. महाराजांनी तो वेढा लढून फोडला व गडावर गेले. एका वेढ्यातून दुसर्‍यात, पण दुसरा वेढा लवकर उठवला.

सुरेख लिखाण! ही लेख मालिका लवकरात लवकर पुर्ण करावि हि विनंति.

<<<भटक्या अरे विशाळगडाला सुर्व्याने वेढा दिला होता. हे महाराजांना महित नव्हते.>>

नाहि केदार, ते महाराजांना माहिति होते. म्हणुन महाराजांनि जवळ असलेल्या मावळ्यांचि ६०-४० अशि विभागणि केलि. बाजीप्रभुंजवळ ४०% ह्यासाठि की पावनखिंडिचा भाग दुर्गम होता. बाजीप्रभुंना देखिल ते माहिति होते म्हणुनच इछ्छाशक्तिच्या जोरावर त्यांनि मृत्युला अक्षरशः रोखुन धरले नाहितर मधलि घोडखिंड अडवुन धरल्यावर बाजींना महाराजांच्या तोफेसाठि थांबण्याचे कारण नव्हते, सहा सात तासांचा लॅग देखिल पुरेसा ठरला असता महाराजांना सुखरुप गडावर पोचण्यासाठि.

ashuchamp --- त्याच तोडीचे हे लिखाण आहे.
>>> हे चुकीचे आहे हो... त्यावर मी म्हणतोय... Happy

केदार ... विशाळगडाला सुद्धा वेढा आहे हे राजांना माहित होते. वेढ्यातून निसटून राजे जाणार तर फक्त 'पश्चिम' दिशेला हे सिद्दीला ठावूक होते आणि म्हणूनच विशाळगडाला वेढा होता.

ऋयाम ... त्या काव्याची ताकदच आहे तशी...खुद्द पावनखिंडीत हे गाताना अंगावर काटा आला होता. धन्य ते बाजी आणि धन्य तो काळ...

छान लिहिले आहे. कितीही वेळा वाचल्या ह्या गोष्टी तरी कंटाळा येत नाही. प्रत्येकवेळी महाराजांबद्दल तितकाच अभिमान आणि आदर वाटतो. Happy

इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो."
पावनखिंडितला हा अविस्मरणीय असा एक अनुभव... आयुष्यावर कायमचा कोरला गेलेला...

हे वाचुन कुणाच्याही अंगावर शहारे उभे राहतील असं वर्णन केलयं तुम्ही !
Happy
...त्या भयाण रात्री पावसात जात असताना राजांच्या कडे घोडे नव्हतेच की त्यांनी त्यांचा वापर केला नाही या बद्दल कुणाला काही सांगता येईल का ?

अर्थात गडावर घोडे होते... मात्र ते घेऊन विशाळगड गाठणे अशक्य होते. ज्यावाटेने राजे गेले तिकडून आजसुद्धा भर पावसात चिखलराडा तुडवत, रान मारत जावे लागते. ३५० वर्षांपूर्वी तर काय भयानक परिस्थिती असेल...

छानच लिहीलयं..

आता ते पाचसहाशे मावळे काय राजांनी जात-पात बघुन घेतले असतील काय? आज काही लोकांना ही साधी गोष्ट पण कळत नाही. बघेल व जमेल तिथे जातपात घेऊन बसतात.:(

Pages