शेंगूळ (शेवग्याच्या शेंगांची आमटी)

Submitted by दिनेश. on 29 July, 2010 - 15:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चार शेवग्याच्या शेंगा, अर्ध्या लिंबाएवढा गूळ, चार पाच कोकमे, अर्धा कप तांदळाचे पिठ, दोन कांदे, लाल तिखट, हळद, हिंग, जिरे,मीठ, तेल

क्रमवार पाककृती: 

शेंगांचे बोटभर लांबीचे तूकडे करून घ्या. कांदा उभा पातळ चिरुन घ्या.
तेलाची हिंग हळद जिर्‍याची फोडणी करुन घ्या.
त्यावर कांदा टाकून लालसर करुन घ्या. त्यावर शेंगाचे तूकडे टाकून जरा परता,
मग त्यावर तीन चार कप पाणी टाका. उकळी आली, कि गॅस मंद करुन, अर्धवट
झाकण ठेवून, शेंगा शिजवून घ्या.
मग त्यात आमसूले व लाल तिखट टाका. (तिखट हवे तर कांद्याबरोबर परतूनही घेऊ
शकता, पण ते करपणार नाही, याची काळजी घ्या.)
जरा उकळले कि गूळ घाला, तांदळाचे पिठ थोड्या पाण्यात मिसळून टाका व रस
दाट झाला, कि उतरा.
भातावर घेता येते, किंवा नूसतेही पिता येते.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

याला आंबट, गोड, तिखट अशी छान चव येते, तांदळाचे पिठ नसल्यास थोडी भाजलेली कणीक घ्या. बेसनाने तितकी चांगली चव येत नाही. लसूण, कोथिंबीर घालू शकता, पण गरज नाही.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेही करून पहायला हवं.
[ कोकणात जिर्‍याऐवजी मोहरी वापरतात. धणे व किसलेल्या नारळाचा रस घालतात. मी तर रस काढताना मिक्सरमध्येच थोडा कांदा व तांदळाचे पिठ टाकतो. मग ग्रेव्ही छान जमून येते.<<मला दहिभाताबरोबर खायला आवडते.>> अगदी खरंय ! दह्याबरोबर याचा पोत व रंग पण उभारून येतो !! ]