वेदकालीन संस्कृती भाग ४

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
2’

राम कोण आणि कुठला होता, ह्यावर अनेक तर्क आणि वाद आहेत. राम नव्हताच इथपासून राम अयोध्येचा की भारतभू बाहेरचा अश्या अनेक थेअरी सध्या सापडतात. राम हा आर्यांच्या पूर्वेकडील (व भारतातील दक्षिणेकडील) आक्रमणाचे प्रतिनिधीत्व करतो व त्याने वैदिक संस्कृती लंकेपर्यंत नेली असे काही लोक मानतात.

राम प्रकरण मी थोडे सविस्तर मांडणार आहे. कारणे दोन. एक म्हणजे ऋग्वेदात ह्या सर्वांचा उल्लेख पहिल्या काही ऋचांमध्ये आहे, म्हणून ऋग्वेदकालाशी निगडित आहे. दुसरे म्हणजे रामायणातून बराच भूगोल लक्षात येतो. पुढे महाभारत युद्धात हा विस्तृतरितीने आहे, पण रामायणाला आधार मानून आपण रामाचे अस्तित्व दिसते का हे पाहू.

हल्लीच लंकेला जोडणारा रामसेतू पाडण्यास काँग्रेस सरकारने परवानगी दिली आहे. केंद्रसरकारने दाव्यात असे मांडले होते की राम अस्तित्वात असल्याच्या कुठलाही पुरावा नाही, तसेच हाच तो रामसेतू आहे ह्याला कुठलाही पुरावा नाही, पुराव्याअभावी हे पाडण्यात यावे. कारण त्यामुळे लंका व भारत ह्या दोन देशात नौकानयन सुखकर होईल. व्यावहारिकदृष्ट्या हे जरी बरोबर असले तरी भारतातील हिंदू जनतेच्या भावना ह्यामुळे निश्चितच दुखावल्या गेल्या.

वाल्मिकी रामायण हे एकुण २४,००० श्लोकांचे आहे. सात कांडात, एकुण ५०० प्रकरणांचा विस्तार एवढे साहित्य एका रामायणात आहे. विविध राजे, तत्कालिन संस्कृती, एकमेकांसोबतचे राजकारण, समाज, आचार विचार ह्यांचा समग्र समूह म्हणजे रामायण. राम खरा आहे की नाही, पुरावा आहे की नाही ह्यात मला रस नाही तर ह्या काव्यात रस आहे कारण त्यात तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब उमटल्याशिवाय राहत नाही. भारतीय संस्कृती त्यातून पुरेपूर दिसते त्यामुळे रामायण हे वेदकालीन संस्कृती वा इ स पूर्व संस्कृती मधील फार मोठा मैलाचा दगड ठरते. बाल, अयोध्या, आरण्य, किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि उत्तरकांड हे ते सात कांड आहेत. पैकी बाल व उत्तर हे मुळ लेखनाचा भाग नाहीत असे आता तज्ज्ञ मानतात.
रामायण हे वाल्मिकी ऋषींनी लिहीले व ते ह्यासर्वाचे साक्षीदार होते असे आपण मानतो. पण त्याच बरोबर वाल्याचा वाल्मिकी हे राम नाम उलटे जपल्यामुळे (मरा मरा) ऋषी झाले अशी कथाही आपल्याला सांगितली गेली. ते प्रस्तावनेत म्हणतात, " मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो, पण किराताकडे* वाढलो, क्षुद्र कामे केल्यामुळे क्षुद्र झालो, क्षुद्र स्त्री सोबत विवाह केला, तिने माझे पाप नाकारले व त्यामुळे राम नामाच्या जपामुळे मी परत ब्राह्मण झालो." ह्यावरुन प्रश्न येतो की वाल्मिकी हे खरच समकालिन होते? का त्यांनी ही कथा होऊन गेलेल्या राजाबद्दल आपली कल्पनाशक्ती लढवून मांडली आहे? मुळात हा वाल्मिकी एक होता की अनेक? तैत्तरिय ब्राह्मण ज्याने लिहले त्याने वाल्मिकी हा व्याकरणकार होता असा उल्लेख केला आहे, तर महाभारतातील उद्योग पर्वात वाल्मिकीचा उल्लेख गरुडाचा वंशज म्हणून आलेला आहे, व त्याला सुपर्ण वाल्मिकी असे उल्लेखलेले आहे.

पूर्ण रामायण मी इथे उद्धॄत करणार नाही तर त्यातील काही भाग, त्या त्या विद्वानांचे मत खोडण्यासाठी मी लिहणार आहे.

दशरथाला पुत्र होत नव्हता म्हणून त्याने एक यज्ञ केला. त्यावेळी शॄंग ऋषी तिथे उपस्थीत होते. अश्वमेधानंतर (वधानंतर, अश्वमेध म्हणजे घोड्याचा राणीशी संग नव्हे तर मेलेल्या अश्वासोबत राणीने एक रात्र घालवायची असते, अश्वाच्या तोंडावर कपडा असतो व त्याच खोलीत राणीला थांबायचे असते.) मुख्य राणी कौसल्या हिने एक रात्र घालवली. मग दुसरे दिवशी पायसदान मिळाले यथावकाश चार पुत्र प्राप्त झाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर रिडल्स इन हिंदूइझिम ह्या पुस्तकात लिहतात, राम हा पायसदानाने नाही तर शृंग ऋषि पासून झालेला पुत्र आहे कारण कौसल्या एक रात्र घोड्यासोबत राहिली, तिथे हे ॠषी होते, त्यामुळे राम हा शृंगाचा मुलगा आहे असे ते माणतात. ह्यात तथ्य मानले तर बाकी तीन पुत्रांचे काय ह्यावर मात्र आंबेडकर मौन बाळगतात. नियोग पद्धत ती महाभारतात होती, तर त्यापूर्वीच्या रामायणकालात असेल असे गृहित धरुन चालले ह्यातून लगेच असे सिद्ध होते की तो कदाचित नियोग पद्धतीने झाला. म्हणजे स्त्री पुरूषातील संबंध पुत्रप्राप्ती ह्या विषयात प्रगत होते असे मानावयास जागा उरतेच! थोडक्यात एक खोडायला गेले तर त्यातून दुसरे दुर्लक्षीलेले पण तत्कालिन समाजास मागे न नेता पुढे नेणारे सत्य समोर येतेच. इतर हजारो प्रवाद लक्षात घेऊन इथे खोडण्यापेक्षा रिडल्स पुस्तकाप्रमाणे राम हा आर्य राजा, सिता त्याची बहिण आणि रावण हा बुद्ध राजा होता. बुद्ध रावणाला पराभूत करुन रावणाला ब्राह्मण म्हणून घोषित केले गेले वगैर वगैरे, थोडक्यात रामाचा काल हा बुद्धानंतरचा आहे असे लेखकाचे म्हणणे आहे. तसेच हे युद्ध राम रावण न होता त्याला वैदिक बुद्ध धर्म युद्ध अशी झालर लेखकाने दिली आहे. रामाची सिता बहिण असे ते म्हणतात पण ती बहिण कशी झाली ह्यावर मात्र कुठलाही प्रकाश टाकलेला नाही. हे मांडण्यासाठी त्यांनी दशरथ जातक कथा (नं ४६१, ५४० ) ह्याचा आधार घेतला आहे. मात्र वरील जातक कथांचा उल्लेख त्यांनी केलेला नाही पण त्यातील कथा भाग घेऊन ते हे पुस्तक लिहतात. वेगवेगळ्या जातक कथांमध्ये रामाचा उल्लेख आहे. पण ह्या सर्व कथांमध्ये रावणाने सीतेचे हरण केल्याचा व राम रावण युध्दाचा उल्लेख नाही. तो का नसावा हे उघड आहे कारण रावणाला बुद्ध राजा मानले गेले आहे. जातक कथा ह्या इसाप निती सारख्या कथा आहेत. त्या सर्वच खर्‍या नाहीत. तसेच सीतेशिवाय रामाच्या अनेक बायका होत्या असे आंबेडकर म्हणतात. पण त्या कोण व कशा ह्यावर काहीही प्रकाश त्यांनी टाकला नाही. .

रामाचा जन्म पायसदानाने झाला हे आपण मानतो. पायस ही पद्धत नियोग पकडली तरी तिला तत्कालिन समाजात मान्यता होती व तसे प्रकार रुढ होते. केवळ ह्यावरुन हिंदू देव चुकीचे व धर्मच कसा गंडलेला आहे हे रिडल्स ह्या पुस्तकात मांडले आहे. कृष्णाबद्दल तर त्याहून हिणकस भाषा वापरली आहे. इथे रामजन्म प्रकरण देणे भाग होते म्हणून ह्या थेअरीचा उल्लेख केला इतकेच. हे मत खोडण्यासाठी हा लेख नाही, तर असेही मत आहे व त्याचा इथे उल्लेख करणे आवश्यक होते इतकेच महत्व आंबेडकरांच्या त्या पुस्तकाला. आंबेडकरांच्या पुस्तकाला दुर्गाबाई भागवतांनी उत्तर दिले होते असे वाचण्यात आहे. त्यामुळे ह्या प्रकरणाला इथेच सोडून पुढे वळू.

ऋग्वेदात रामाचा, दशरथाचा व सीतेचा उल्लेख आहे, पण सीतेचा उल्लेख हा पत्नी म्हणून नाही, खरेतर सीतेचा उल्लेख व्यक्तीवाचक नाही, ती जमीनीला दिलेली उपमा पण आहे. पेरणी केलेल्या जमिनीसंबंधी हा उल्लेख आला आहे. ह्यावरुन काही लोकं राम आणि सीता एकमेकांशी संबंधित नव्हते असाही शोध लावतात. पण ऋग्वेदातील सीता व्यक्तीवाचक नसली तरी रामाची पत्नी नाही हे कसे सिद्ध होणार ह्याचा विसर मात्र पडलेला दिसतो. ऋग्वेदातील पहिल्या मंडलात अनेकदा रामाचा उल्लेख आढळतो.
रामायणात राम अनेक असुरांशी, राक्षसांशी लढतो व त्यांना पराजीत करतो. त्यांचे वर्णन करताना त्यांना असुर, दैत्य, दानव, राक्षस, यक्ष अशी नावं नेहमी आढळतात.

असुर नावाची फोड केली असता असे दिसते.
सुराचा एक अर्थ देव म्हणजे जे देव नाहीत ते असुर.
सुराचा दुसरा अर्थ मद्य म्हणजे जे मद्य पीत नाहीत ते असुर. हा अर्थ काढताना मी थोडे वैचारिक स्वातंत्र्य घेत आहे, कारण अनेक यज्ञात सुरा अर्पण करताना सुरा कशी तयार करायची ह्याचे वर्णन आलेले आहे.
ऋग्वेदातील एका ऋचेत (१०|९३|१४) रामाचे वर्णन करताना रामाला असुर ही सज्ञा पण दिली आहे. इथे कदाचित मी जो अर्थ काढत आहे (मद्य न पिणारा) असे म्हणून त्याची सुस्ती केली असावी वा पहिल्या अर्था प्रमाणे जो देव नाही तो असुर राम.

हे असुर मोठे रंजक प्रकरण आहे असे दिसते. आता थोडे लक्ष दिले तर महाभारतात कृष्णाचा मामा, कंस तो असूर आहे. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपु हा देखील असूर म्हणवला गेला आहे. म्हणजे असूर आणि देव ह्यात नातेसंबंध आहे असा सरळ अर्थ निघतो बरेचदा तर पिता पुत्र, मामा-भाचा असेही हे नाते आहे. म्हणजे वैदिक विचारांना विरोध करणारी काही राजे असूर असा तिसरा भाषाशास्त्राशी संबंध न असणारा अर्थ मला जास्त बरोबर वाटतो.

हे असुर मानव होते का नाही ह्यात देखील विद्वानात मतभिन्नता आहे. डॉ स्टेन कोनो हे ते मानव नव्हते असे म्हणतात, F E Pargiter ह्यांना त्यांना कोण मानावे हे कळत नाही, तर भांडारकर म्हणतात असीरियन संस्कृतीमधील लोक म्हणजे असूर. वैदिक लोकांशी त्यांचे भांडणे होत होते आणि असुर हे पण मानवच होते, पण हे असूर अतिशय रानटी असल्याकारणाने वैदिक लोकांनी साहित्यात अजून थोडे भडक लिहले असण्याचा संभव मुळीच नाकरता येणार नाही.

मागील लेखाच्या एका प्रतिक्रियेत मी देव आणि असुर हे भाऊ होते असेही मांडले आहे. तांड्य ब्राह्मण आणि शतपथ ब्राह्मणाप्रमाणे देव आणि असूर हे प्रजापती पासून निर्माण झाले, देव लहान, असुर मोठे. ऋग्वेद, रामायण, महाभारत इ अनेक पुस्तकात देवासुरांचे युद्ध व त्यांचे वर्णन येतात, त्यावरुन काही तज्ञ असुर म्हणजेच हडप्पा, मोहंजदाडो, लोथल इ ठिकाणी राहणारे होते व त्यांचे ऋग्वेदिक लोकांशी लढे झाले असेही मानतात. पण ह्या सर्व थेअर्‍या आर्यन इन्वेजन झाले हे मानून आहे, व नविन इतिहास आता आर्यन इन्वेजन झाले नाही असे मांडू पाहत आहे.

आणखी एक महत्वाचा दाखला आर्य आणि असूर ह्यांचा संदर्भात आहे तो म्हणजे वैवस्वत मनुच्या ( इ स पूर्व ३२०० ) समकालिन असणारा असुर राजा वृषपर्व होता. त्याला शर्मिष्ठा नावाची मुलगी होती. तिने आर्य राजा ययातिशी लग्न केल्याची कथा सर्वांना माहित असावी. हा ययाति हा पुरुरव्याचा पणतू होता. त्याने देवयानी ह्या शुक्राचार्यांच्या मुलीशी पण लग्न केले आहे. शुक्राचार्य हे दानवांचे गुरु म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्या ययातिला पाच मुलं झाली, पुरू, यदू, द्रह्यु, अनु आणि तुर्वसू. हे पाचही मुलं पुढे पाच नद्यांकाठी राहायला गेले. ह्या पाच नद्या म्हणजेच सिंधू संस्कृतीमधील पंचनद. म्हणजे ही मुल आर्य + असूर अश्या संगंमातून आलेली आहेत.

शतपथ ब्राह्मणातील एका ऋचेमुळे ज्यात म्लेंच्छ असा उल्लेख आहे. डॉ मिश्रा असे मांडतात अकिडियन साम्राज्यातील लोक सिंधूसंस्कॄतीला मेलूहा म्हणत. हे मेलूहा आणि म्लेंच्छ जवळ जाणारे आहे व मेलूहा म्हणजे हडप्पा असे ते मांडतात, त्यावरुन म्लेंच्छ म्हणजे हडप्पावासी असे ते मांडतात. त्यांचे व्यवहार मेलूहा, मेगन आणि दिलमान साम्राज्यांशी होते. मेगन म्हणजे आजचे ओमान, दिलमान म्हणजे बहारिन तर मेलूहा हे कुठेही सापडत नाही, म्हणून मेलूहा म्हणजेच हडप्पा असा त्यांचा कयास आहे. त्यांचा मताला अनुमोदन मालती शेंडगे ह्या "सिव्हिलाईज्ड डेमन्स" ह्या पुस्तकात देतात.

राक्षस हा शब्द रक्ष पासून तयार झाला असे काहींचे म्हणने आहे. रक्ष म्हणजे रक्षा करणे. समुद्र मंथनातून जे काही निर्माण झाले त्यांना असूर आणि देव ह्यांचात वाटण्या होण्याआधी ज्या लोकांना त्याची रक्षा करण्यास सांगीतले ते म्हणजे पण राक्षस असाही एक प्रवाह आहे.

रावणाला नेहमीच ब्राह्मण म्हणून पाहिले जाते. तो ब्रह्म कुळ उत्पन्न आहे असेही म्हणलेले आहे. ब्रह्म रक्ष कुळाचा रावण, त्याचा पुढे राक्षस झाला असण्याची शक्यता जास्त आहे. ह्याला पुष्टी म्हणून हा प्रसंग पाहा. हनुमान जेंव्हा लंकेत प्रवेश करतो तेंव्हा त्याला ब्रह्मघोष ऐकू येतो असा उल्लेख सुंदर कांडाच्या १८ व्या सर्गात आहे. ब्रह्मघोषाच्या उल्लेखामुळे ब्रह्म रक्ष म्हणजे कदाचित स्मृतींद्वारे (पठण) ब्रह्मसुत्रांचे रक्षण तो समुदाय करत असावा.

लंकेचे जे वर्णन रामायणात केले आहे, ओळीने घर, मोठ मोठ्या बागा, हमरस्ते, मोठी घर, वाडे वगैरे ह्यावरुन लक्षात येते की रावण हा एक प्रतिभाशाली, विचारवंत व श्रीमंत राजा होता. युद्धतंत्र त्या नगरीत विकसीत झाले होते, एक राजा व त्याचे राज्य म्हणून लंका निश्चीतच प्रगत होती, हे कुणाही अभ्यासकाला सहज लक्षात येते. ह्या नगरीचे वर्णन हडप्पा संस्कृतीशी मिळते जुळते आहे.

राजा राम, देव राम आणि भुगोल.

अ‍ॅलेक्झॅडंरच्या भारताच्या स्वारीचे वर्णन एरियन ह्या इतिकासकाराने लिहून ठेवले आहे. तो प्रत्यक्ष अ‍ॅलेक्झॅडंर बरोबर होता. पूर्ण रात्र वाळवटांतून प्रवास करुन आल्यावर अचानक त्याला नदिकाठी एक मोठे गाव दिसले. त्या गावाचे नाव होते रामबाकिया. एरियन लिहतो की अ‍ॅलेक्झॅडंरला वाटले की एकेकाळी हे खूप मोठे शहर असावे, त्या गावातून एक नदी वाहते, तिचे नाव अघोर नदी. त्या आजूबाजूचे लोक हे ओरिटेय नावाच्या टोळीचे होते असा उल्लेख आहे. गावात एक विहिर आहे, त्याचे नाव ""रामचन्द्र की कुप" असे आहे. बाजुलाच एक जुनी गुहा आहे. त्यातील एकात हिंगुला देवीचे तर दुसर्‍यात कालीचे मंदिर आहे. येथूनच रामाने वनवासाला जायला सुरुवात केली असे तिथे मानले जाते. राम आधी गोरख टॅन्कला गेला, तिथून पुढे टोंगाभेरा व तिथून पुढे हिंगुलजला गेला. आजही ह्या भागात रामाची जत्रा भरते. हिंगुलजला शक्ती पिठ आहे असे हिंदू लोक मानतात. हिंगुलज कराचीपासून उत्तरेस २०० किमी आहे. इ स पूर्व ३२६ मधिल राम वा राम कथा अस्तित्वात असल्याचा हा एक मोठा पुरावा आहे

प्रख्यात वैय्याकरणी पाणिनीचा काल हा इस पूर्व ३५० मानला गेला आहे. काहीजन इस पूर्व ५०० आहे असेही गृहित धरतात. पाणिनीने सिंधू, वर्णू, मधुमत, किष्किंधा, कंबोज, काश्मिर, सलवा, गांधार, उरसा, दरद आणी गंधिका ह्या स्थानांचा उल्लेख वेळोवेळी केला आहे. पैकी आपल्यासाठी महत्वाचे आहे ते किष्किंधा कारण रामायणात ह्या राज्याचा उल्लेख आहे. ह्या राज्याचा राजा वाली व नंतर सुग्रिव हे होते. काही इतिहासकार ह्या किष्किंधेचा शोध घेताना आजच्या बलुचीस्थानातील कलत हे गावं आहे असे मानतात. बलुचिस्थान हे आजच्या पाकीस्तानचे एक राज्य आहे. ह्यात गंमत एकच दिसते की जर कलत ते कराची असे अंतर घेतले तर ३०० किमी भरते म्हणजे रामबाग ते कलत हे अजून कमी भरणार. रामबाग जर रामाची जागा मानले तर कलत किष्किंधा म्हणजे केवळ १०० एक किलोमिटर मध्ये रामाला हनुमान भेटतो असे गणित येते. ह्या जागेलाच किष्किंधा का म्हणतात तर तिथे आजही हिंगोल नॅशनल पार्क आहे. किष्किंधेचे रामायणातील वर्णन ह्या जागेशी मिळते जुळते आहे. इच्छुकांनी कराची ते कलत गुगल मॅप्स वर बघावे. माझ्यामते हे अंतर फारच कमी भरते त्यामुळे राम येथील नाही असे अनुमान निघते. रामबाग कुठेही असू शकते, सिंकदराला जरी रामबाग हे गाव लागले तरी सिंकदर भारत पूर्ण उतरुन मध्ये आला नाही तो आजच्या अफगाण, पाक सीमेवरुनच परत गेला. पण त्या उल्लेखावरुन असेही अनुमान काढता येते की कदाचित राम त्या अघोर नदिच्या काठचा असावा.

रामाचे नाव घ्यायचे तर एक मजेशीर उल्लेख बघा. रामल्लाह नावाचे नाव आजच्या पॅलेस्टाईन मध्ये पण आहे.* ह्यावरुन राम पॅलेस्टाईन मध्ये होता असेही उद्या कोणी म्हणाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. ह्यावरुन मी असा अंदाज बांधेन की राम हा राजा अन त्याची कथा तत्कालिन लोकात फार प्रसिद्ध होती व रामाला देव मानून त्याचे नाव भरपूर जागांना दिले गेल. थोडक्यात महाराष्टात प्रत्येक शहरात शिवाजी नगर व महात्मा गांधी रोड असे भाग दिसतात तेवढेच महत्व.

आणखी एक उल्लेख म्हणजे राम सिन नावाचा मेसोपोटेमियन राजा. वयाच्या तेराव्या वर्षी तो राज्यावर आला व त्याने बबिल म्हणजे बाबिलायन राजे ह्यांना हारवले. बबिल लोकांकडून दहा राजे लढत होते. एका थेअरी प्रमाणे राम सिन ह्याने त्या दहा राजांना हारवले. पर्यायाने दशानन रावण अशी जोड ते लावतात.

प्रख्यात भाषातज्ज्ञ डेव्हिड मॅकअल्पिन असे मांडतात की मेडिटरेनीयन समुद्राच्या आजूबाजूला असलेल्या झग्रोस येथील शेती आणि आजच्या पाकिस्तान येथील शेतीचा प्रकार सारखाच आहे, तत्कालिन इलाम राज्यातिल भाषा इलेमाईट ही द्रविडीयन डायलेक्टशी मिळती जुळती आहे. आणि कदाचित हेच इलेमाईट भारताच्या दक्षिण भागात पसरले. हा मला थोडा ओढून ताणून आणलेला संबंध वाटला कारण रामाला इतर थेअरीज आर्य म्हणतात, पण इथे द्रविड म्हणले जाईल. कलत (वर पाहा) येथील भाषा पण द्रविडीयन होती व नंतर देवनागरी झाले असे म्हणले गेले म्हणजे हा राम मध्यपूर्वेतून सरकून आजच्या हिंगोल नॅशलल पार्कात वनवास कालावधी घालवतो असा कयास मांडला तर थोडे अशक्यप्राय वाटते कारण मध्ये खूप मोठे वाळवंट आहे. रामायणात कुठेही इतके मोठे वाळवंट आलेले नाही. अफगाणिस्तानला आजचे नाव इ स १७४७ नंतर मिळाले आहे. त्या आधी त्याला भारतीय नावाने संबोधले जात होते कारण अफगाण, पाक हा भारतभू चा भाग होता. त्या आधी त्याचे गांधार, मद्र, बाल्हिक, अरट्ट असे भूभाग (विविध राज्य) होते. अ‍ॅलेक्झॅडंरच्या वरच्या उल्लेखात पण त्याने मोठे वाळवंट पार केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे ही थेअरी पण परत एकदा थोडी कच्चीच ठरते असा निष्कर्ष मी काढत आहे.

राम हा धनुर्धारी राजा होता. त्याचे मुख्य शस्त्र हे धनुष्यबाण हे होते. वैदिक देव इंद्र, वरुण इ हे धनुष्य बाण चालवणारे देव नाहीत तर त्यांचे वेगवेगळे शस्त्र आहे. मेसोपोटेमिया व इजिप्त येथे सापडलेल्या खुणांवरून व चित्रांमध्ये बाणाचे चिन्ह पण आहे, तो पण अर्धचंद्राकृती असेलेला बाण. असे बाण सिथियन, बाबिलोन आणि मेडस ह्यांनी असिरियन्सच्या विरुद्ध केलेल्या युद्धात वापरले आहेत. त्यामुळे तो इराणी वा सुमेरियन संस्कृतीचा भाग आहे असे आणखी काही लोकं मानतात. रामानन अशी सज्ञा त्याला दिली आहे. हित्ताईत लोकांचा एक योद्धा म्हणून पण रामानन पुढे आला आहे. त्याने आर्यांना पंजाब पर्यंत नेले असा एक उल्लेख आहे. मित्तनी लोकांच्या मध्ये पण वैदिक कालीन नावे आहेत जसे सुबंधू, तुषरता, अर्तसुमरा इ ह्यातील तुषरता म्हणजेच दशरथ असे काहींचे म्हणने आहे.

वैदिक नद्या व भूगोल

रामायणात शरयू नदीचा उल्लेख वारंवार आढळतो व वैदिक साहित्यामध्ये सरस्वती ही नदी प्रामुख्याने आढळते. रामायणासंबंधी ह्या दोन नद्या बघूयात.

राम हा इश्वाकु वंशातील राजा आहे. कालिदासाने रघूवंश लिहला आहे, त्यात तो इश्वाकु वंश हा उत्तर कोसलामधील आहे असे लिहीतो. हे उत्तर कोसला म्हणजेच इराण असे काही लोक म्हणतात, तर काही उत्तर कोसला म्हणजे आजचा अफगाण असेही मानतात. अफगानिस्तानातील होरायू नदी म्हणजे शरयू नदी असा त्यांचा कयास आहे. उत्तर कोसला हे इराण होऊ शकत नाही हे मी खाली दिलेल्या नकाशावरुन लक्षात येईल. कोसलाच्यावरचा भाग घेतला तर फार तर अफगाण वा अगदी उत्तरेकडचे अफगाण. इराण कसे होते हे अजूनही कळले नाही. अफगाण हा भारताचा भूभाग असल्यामुळे राम आजच्या पाकिस्थानातील हिंगोल नॅशनल पार्क मध्ये गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण इराण पकडले तर मध्ये पूर्ण वाळवंट आहे, मग त्याचा नी रामायणाचा संबंध कसा लावणार?
तसेच लंका हे द्विप आहे. राम जर उत्तर कोसलाचा असेल तर मग तो लंकेपर्यंत कसा गेला? की आपण जी लंका मानतो ती लंका नसून दुसरेच कुठले तरी द्विप हे लंका होय हा प्रश्न पडणे साहजीक आहे. ह्यावर काही विद्वान उत्तर देतात ते मोंहजंदाडो म्हणजे लंका असण्याचे. हेच का? तर मोंहजंदाडो मधील एका सिलावर कृत्तिकेचे चित्र आहे. कृत्तिका हे आपण नक्षत्र माणतो. इ स पूर्व ३१०२ मध्ये एका बुधवारी जेंव्हा सूर्य कृत्तिका नक्षत्रात होता तेंव्हा कलियुग सुरु झाले असे ते सील सांगते. त्यावरुन लंका, जिथे रावण हा बुद्धीमान, शक्तीशाली राजा राहत होता, तिथेच असे खगोलशास्त्र निर्माण होऊ शकते असे त्यांचे म्हणने आहे.

आर्यभट्ट, ब्रह्मसुक्त, सूर्य सिद्धांत हे सर्व असे मानतात की ब्रह्मकुल हे खगोलशास्त्र शिकण्याचे अतिप्राचिन ठिकाण आहे. हे सर्व विद्वान त्या बुधवारी कलियुग सुरु झाले हे ही मानतात. मग एकतर आर्यभट्ट बरोबर असावा (युगाचा कल्पनेत) किंवा मॅक्समुलर तरी. माझे वैयक्तीक मत आर्यभट्ट बरोबर असावा असे आहे. इथे मला जरा गंमत वाटते कलियुग हे जर आधी चार व नंतर त्यात बदल करुन ५ वर्षांचे ठरवले गेले तर ह्या सीलाला काय अर्थ उरतो? सत्य, द्वापार, त्रेता आणि कली हे चार युग एकानंतर एक येतात तर त्या बुधवारी केवळ कलीयुग सुरु झाले व चार वर्षांनी संपले इतकेच काय तो अर्थ होऊ शकतो. मग मॅक्स मुलर आर्यांचा काळ इ स पूर्व १५०० च्या आधीचा नाही असे लिहतो त्याचा मेळ ह्या पूर्ण थेअरीशी लागत नाही. तसेच ऋग्वेद व रामायण हे एकाच काळात होते हा कयास ह्यांची पण जोड अजिबात लागत नाही.

बरं ह्या सर्व विद्वानांत राम कोण हे युद्ध लागलेले असताना ते सीतेला काही अंशी दुर्लक्षित ठेवतात. जनकाचा उल्लेख अनेकदा वाजसनेयी साहित्यात आला आहे. याज्ञवल्काला उपदेश जनक राजा देतो व जनकाचा दरबारात याज्ञवल्क उपनिषदांवर अनेकदा बोलतो, चर्चा करतो असे कित्येक उल्लेख आहेत. जनक हा विदेह ह्या जनपदाचा राजा. विदेह हे जनपद आजच्या उत्तर भारतात येते. हा भूगोल लक्षात घेता ह्या विद्वानांनी एकतर राम सीता लग्न झाले नाही असे तरी म्हणावे वा सीता हा भाग प्रक्षिप्त ( व पर्यायाने संपूर्ण रामायणच प्रक्षिप्त आहे) असे तरी मांडावे. पण त्यात थोडी मेख अशी आहे की रामायणात वर्णन केलेली मिथीला नगरी कुठे आहे ते लक्षात येत नाही. शतपथ ब्राह्मणात गंडकी नदी ही कोसला आणि विदेह ह्यांची सीमारेषा असे आले आहे. कोसला मध्ये जर राम होता असे मानून चालले तर तीन रात्री प्रवास केल्यावर मिथिलानगरी यायला पाहिजे, पण तसे होत नाही. तसेच जनकनगरही सापडत नाही, पण महाभारतातही मिथिलेचा उल्लेख आहे. म्हणजेच एकतर एखादे मोठे शहर तिथे निर्माण झाले वा तेथील लोक दुसरीकडे गेले. असे होण्याची शक्यता माझ्यामते जास्त आहे कारण बुद्धकालात पण वैशाली राज्यातील लोकांना विदेही म्हणत. उदाहरणार्थ अजातशत्रूला वैदेही असे म्हणले गेले आहे तसेच सीतेला वैदेही म्हणले गेले. विदेह इथे जनकाने राज्य केले, हा भाग जुळून येतो. म्हणजेच वैशालीतच कुठेतरी मिथिलानगर असावे.

रामायणातील अयोध्येचे वर्णन असे आहे. - अयोध्या नगरी ही शरयू नदीच्या तिरी असून सात योजने लांब व तीन योजने रुंद आहे. विशाल असे रस्ते ह्या नगरीतून जातात. नगरीतील वसाहती वेगवेगळ्या प्रकारच्या असून सात मजले असणारी घरं पण ह्या नगरीत आहे. पण नेमके आजच्या अयोध्येला ही मापं लागू होत नाही. ती केवळ अर्धीच भरतात. म्हणजे एकतर नगरीचे मोठेपण सांगण्यासाठी आकड्यांचा विपर्यास केला असावा किंवा ही नगरी मोठी होती व नंतर कालौघात ती लहान झाली असे म्हणावे. कुषान सम्राट कणिष्काने ह्या नगरीवर राज्य केले. त्याने इ स पूर्व मध्ये अयोध्या नगरीचे नाव बदलून साकेत हे ठेवल्याचे व परत नंतर ते अयोध्या झाल्याचे अनेक संदर्भ बौद्ध व हिंदू साहित्यात आढळतात.
महाभारताचा भूगोल म्हणजेच आजच्या भारताचा भूगोल. पुरातत्वखात्याने बी बी लाल ह्यांचावर उत्खननाची जबाबदारी सोपवली. महाभारतातील शहरे म्हणजे हस्तिनापूर इथे त्यांचा टीमने उत्खनन केले असता त्यांना इ स पूर्व ११०० ते ८०० असणारी अनेक भांडी सापडली, जर महाभारताच्या शहरात काही सापडू शकते तर रामायणाच्या का नाही? म्हणून १९७५ च्या आसपास अयोध्येचा आजूबाजूच्या १५ ठिकाणी उत्खनन सुरु झाले तिथे ह्यापेक्षा जुने काही सापडले नाही. जी काही भांडी सापडली ती महाभारतकालीनच होती. लाल एके ठिकाणी म्हणतात पृथ्वीने आम्हाला रामायणकालीन एकही वस्तू सापडू दिली नाही, कदाचित तिची ती इच्छाच नाही. रामायणात शिवधनुष्याचे व एका रथाचे वर्णन आहे. त्यानुसार त्या रथावर ते धनुष्य ठेवले होते. प्रत्येक बाजूला आठ चाक असणारा तो लोखंडी रथ होता. तो वजनाला खूप जड असल्याकारणाने ओढण्यास अत्यंत जड होता. उत्खनना दरम्यान त्यांना अशा रथाचा एखादा अवयव मिळेल असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही. ते म्हणतात "कदाचित खरी कथा छोटी असेल, पण प्रत्येक शतकानंतर ही कथा वाढतच गेली व त्यात अनेक गोष्टी घुसडल्या गेल्या असाव्यात." ह्याच लाल ह्यांनी सरस्वती आहे ह्याचे उत्खनन केले आहे व सरस्वती नव्हती हे खोडून काढले आहे.

बरेच जण राम ही केवळ कल्पना वा वाल्मिकीच्या डोक्यातील एक पात्र आहे असे लिहतात पण त्यास काही अर्थ नाही हे वालीवधावरुन दिसून येते, रामाला फक्त चांगला पुरुष असे दाखवायचे असते तर वालीवध झाला नसता, वाली किष्किंधापर्वात रामाला म्हणतो, तू क्षत्रिय आहे तरी असे का केलेस? मग जर रामाला सगळे चांगलेच दाखवायचे असले असते तर वाल्मिकींनी हा प्रसंगच आणला नसता. इतर ठिकाणी महान दाखवून इथे कमी दाखवणे ह्याचे प्रयोजन काय? म्हणून राम खरा असावा. तसेच दुसरे उदाहरण म्हणजे राम जेंव्हा सीतेला शोधत किंष्किंधेत येतो तेंव्हा सुग्रीव त्याला सांगतो की वाली हा इंद्रपुत्र आहे. पुढे जैमिनीय ब्राह्मणात इंद्र, इंद्राणी (पत्नी) व तिचे मुल वॄषाकपि असा उल्लेख आहे. मी माझ्या दुसर्‍या लेखात वॄषाकपिचा उल्लेख हनुमानाबद्दल केला होता. पण जैमिनीय ब्राह्मण वालीला पण वॄषाकपि म्हणते. मोठा, महाकाय शक्तीशाली वानर असा अर्थ अभिप्रेत असावा. कदाचित अनार्य देवांना आर्यांनी तेंव्हा आपले मानायला सुरुवात केली होती. दुसर्‍या लेखातील माझी शबर नावाच्या पुत्राची कथा, तश्याच पद्धतीचा एक पुत्र म्हणून वॄषाकपि असण्याशी शक्यता आहे. तसे दुसर्‍या लेखात मी हनुमानाला पण वृषाकपि मानले गेले आहे असेही लिहीले. ह्या तिन्हीचा संदर्भ लावला तर राम होता ह्याच निष्कर्षाप्रत मी येतो. पुरावे नाहीत. उत्खनन चालू आहे, काहीतरी निश्चितच मिळेल.

अशातच हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ह्या पुस्तकाचे लेखक श्री नेमाडे ह्यांची मुलाखत वाचली, ते म्हणतात हिंदूंना कृष्ण कोण आहे हेच माहीत नाही, कारण एकूण तीन कृष्णांचा उल्लेख आहे. पहिला उल्लेख छांदोग्य उपनिषदात कॄष्णाला अंगीरसाचा शिष्य म्हणून आहे, दुसरा, विश्विकाचा मुलगा ऋषी कृष्ण, तर तिसरा यमुनेच्या किनार्‍यावरील कृष्ण. केवळ छांदोग्यात कृष्णाचा उल्लेख झाला म्हणून नेमाडे कृष्णाबद्दल भरपूर बोलतात. तो फक्त एक सारथी होता असे त्यांचे म्हणने आहे. वस्तूस्थितीत जर तो खरच सारथी असेल तर नेमाडे विसरतात तो एक मुद्दा मी मांडू इच्छितो. हा सारथी कृष्ण, महाभारतातील गीता सांगून, महाभारत घडवून आणू शकतो म्हणजे तत्कालिन वैदिक संस्कृतीत जातीला महत्व नव्हते हे लगेच लक्षात येते. कृष्णाचा मुद्दा मी इथे आणला कारण रामाच्या बाबतीत देखील परिटाची अशीच एक कथा. एक धोबी एका राज्याचा व त्याचा पत्नीच्या शीलावर संशय घेऊ शकत होता म्हणजे परत एकदा जात समान होत्या, तर परिट हे त्याचे कर्म होते असा निष्कर्ष निघतो, तसेच तत्कालिन समाजात काही राज्यात लोकशाहीला महत्व होते असा एक उपनिष्कर्षही त्यातून पैदा होतो.

कृष्णाची कथा इथे आणण्याचे दुसरे कारण म्हणजे याज्ञवल्काचा जनकासोबत संवाद चालताना (बृहदारण्यक उपनिषद) जनक, याज्ञवल्काला विचारतो, "परिक्षित कुठे गेला?" गमंत अशी ही आपण रामायण हे महाभारतापेक्षा जुने असे मानतो, तर मग जनकाला हा प्रश्नच का पडावा? कारण परिक्षित हा अभिमन्यूचा मुलगा, अर्जूनाचा नातू. इथे थोडी कालगणनेमध्ये गफलत दिसते. मग बी बी लाल ह्यांना आणखी जुने पुरावे कसे सापडतील? कारण परिक्षित ते राजा जनक असे ४ पिढ्यांचे साधारण १०० ते १२० वर्ष अंतर मानले तर अयोध्येत सापडलेली महाभारतकालीन भांडी बरोबर ठरतील व रामायण हे महाभारतानंतरचे आहे असा निष्कर्ष निघेल. बुद्धकालीन विदेही म्हणणे मग बरोबर लागू पडते. कारण तो काल ६७५ बि सी होईल व बुद्ध लगेच त्या नंतरचा म्हणून ती संबोधने लागू होतील. पण मग असे झाले तर ऋग्वेदात महाभारताचे उल्लेख का नाहीत? कारण महाभारत आधी झाले असले तर उल्लेख, कथा यायला हव्या, ह्याचे उत्तर सापडत नाही.

एक गमतीशीर पुरावा किंवा पुराव्याकडे नेणारे साधन म्हणजे हनुमान जी अंगठी सीतेला दाखवतो ती. त्यावर राम हे नाम कोरले आहे. त्या काळात सर्व अंगठ्या ह्या केवळ गोल असायच्या, उत्खननात ज्या ज्या गोष्टी अंगठ्यासदृष्य म्हणून सापडल्या आहेत त्या सर्व गोल वेढ आहेत, फक्त हडप्पाला सापडलेली अंगठी ही आजकाल खडा घालायला जी जागा असते तशी सापडली आहे. त्यावर नाव लिहता येते.
सीता वनवासात जाते तेंव्हा राम, लक्ष्मण वल्कलं नेसतात पण सीता तिचे रेशमी वस्त्र तसेच ठेवते असा उल्लेख आहे. रावण सीतेला पळवून नेताना देखील तिने पिवळे रेशमी वस्त्र घातल्याचा उल्लेख आहे. रावण दहनाच्या वेळी रावणाला रेशमी वस्त्र घातल्याचा उल्लेख आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ह्या रेशमी वस्त्राचा उल्लेख चिनापट्ट असा आहे, म्हणजे चिन मधून आयात केलेले वस्त्र. म्हणजे एकतर रामायणकाळी चीनशी व्यवहार होता असे तरी मानावे लागेल (महाभारतकाळी होताच) वा ह्या वस्त्राच्या कथा (रेशमी कारण राजाचे म्हणून) ह्या प्रक्षिप्त आहेत असे तरी मानावे लागेल. माझा कल ही वस्त्र कथा प्रक्षिप्त असावी असा आहे.

वाल्मिकीने ह्या कथा ऐकून मग लिहीले असा विचार केला किंवा कोणी विद्वान मांडतात तसे एकापेक्षा जास्त लोकांनी रामायण लिहीले असे मानले तर मात्र ह्या विविध कथा, हे वस्त्र, अंगठी इ. गोष्टी प्रक्षिप्त असण्याचा संभव व थोडा काल्पनिक असण्याचा संभव नाकारता येत नाही. तसेच बाल कांड व उत्तर कांड हे नंतरचे लेखन आहे हे आता मानले गेले आहे त्यामुळे मूळ रामायण कथेतही अश्या अनेक गोष्टी येऊ शकतात. शिवाजी केवळ ३०० वर्षांपूर्वी होऊन गेला, पण त्याचा बाबतीतही दंतकथा आहेत, येशूच्या बाबतीतही अनेक दंतकथा आहे त्या रामाचा बाबतीतही होऊ शकतात.

वरील मते माझी आहेत असे नाही तर ते विविध मतप्रवाह आहेत. वर दिलेल्या मतप्रवाहांपेक्षा आणखी किती तरी मतप्रवाह आहेत. जिथे खोडण्याजोगे वाटले तिथे मी माझी टिप्पणी पण केली आहे. लेखाचा कॅनव्हॉस खूपच मोठा आहे. अजूनही मी ह्यावर मिळेल ते साहित्य वाचत असतो, इथे ते सर्वच देणे शक्य नाही. हा लेख आधीच खूप मोठा होत चालला आहे त्यामुळे इथे थांबतो.

राम आहे का नाही, होता का नव्हता, इ स पूर्व का नंतर ह्यामुळे फरक पडू नये. तत्वज्ञानात इश्वराचे रुप सांगितले आहे. सर्वच माणसं इश्वर असल्यावर राम कुठलाका असो, तो राम आहे इतकेच माझ्यासाठी पुरे आहे.

महाभारतकालिन भारत नकाशा.

Mahajanapadas.jpg

* किरात ह्यांचा उल्लेख वेदात अनेकदा एक जमात म्हणून आला आहे. किरात म्हणजे नेपाळी.
*http://en.wikipedia.org/wiki/Ramallah

वेदकालीन संस्कृती भाग १
वेदकालीन संस्कृती भाग २
वेदकालीन संस्कृती भाग ३
वेदकालीन संस्कृती भाग 5

प्रकार: 

कुलकर्णी राजाराम ह्यांचा "इंडूस स्क्रिप्ट डिकोड केली" हा दावा खोटा आहे हे जगमान्य आहे. राजाराम ह्यांच्या दाव्याबद्दल मी अजून काही मांडले नाही. ही स्क्रिप्ट अजूनही डिकोड झाली नाही हे सत्य आहे.
लेखाच्या अनुषंगाने

मुदा १. घोड्याची हाडे जी सापडली आहेत ती सुरकोटडा मधलीच आहेत. त्यांचा काल इ स पूर्व २००० च्या आसपास येतो, पण मी अजून घोडा "भारताचाच" असे मांडले नाही, तसेच मागच्या लेखात किंवा प्रतिक्रियेत मीच घोडे बाहेरुन आले आहेत हे ही मांडले आहे.

मुद्दा २ - मोहंजदाडो वा हडप्पा येथे संस्कृतच भाषा होती, असा माझा अजिबात दावा नाही.

मुद्दा ३ - कालावधी लक्षात घेताना सगळ्यात महत्वाचे ठरते वैदिक साहित्य. त्यातून जो भुगोल, खास करुन नद्यांच्या नावावरुन, एका ठिकाणाहून, दुसर्‍या ठिकाणी जायला लागणार्‍या वेळावरुन (जो वेदातही आहे, एक उदाहरण म्हणून मी ह्याच लेखात मिथीलेला जायला ३ दिवस लागतात हे लिहले आहे), नदिच्या वर्णनावरुन व मुख्य म्हणजे तिच्या उपनद्यांवरुन ही ठिकाणं मांडता आली पाहिजेत.

मुद्दा ४ कालावधी मध्ये प्रि हडप्पन , मॅच्युअर हडप्पन, आणि पोस्ट अशी ठिकाण आली पाहिजेत. ती मांडता येत नसतील तर दावे खोटे ठरतात असे मला वाटते.

सुरकोटडा येथील हाडं इ स पूर्व २००० च्या आसपासची आहेत. मॅक्समुलरची थेअरी वेद १२०० ते १५०० चे आहेत व आर्य १२००-१५०० च्या आधी आले नाही हे खोटे नाही का पडत मग?

तसेच .
अवेस्ताशी सगळे विद्वान जोड लावतात, अवेस्ताचा कालावधी वरच्या माझ्या प्रतिक्रियेत आहे. मग केवळ ह्या घोड्याच्या हाडाशी संबंध लावला तर इराणी अवेस्ता कशी काय मध्ये आली? तेंव्हा तर झोराष्ट्रीयन धर्माचा जन्मच झाला नाही.

मग ह्या दोन्ही थेअरी चुक ठरु शकतात की नाही?

असो मी हे त्या माझ्या लेखात मांडणार होतोच, पण तुम्ही लिंक दिल्यामुळे इथे मांडले, अजूनही काही मुद्दे आहेत. लेख होत आला आहे.

आर्य दुसर्‍या देशातून आले नाहीत हेही तुमचेच मत

घोडे मात्र दुसर्‍या देशातून आले हेही मत तुमचेच.

मग घोड्यावर बसून नेमकं आलं तरी कोण? Proud का घोडे तसेच आले फिरत फिरत? Happy

घोड्याच्या नुसत्या हाडावरुन घोडा तिथलाच का बाहेरचा हे नेमकं कसं ठरवतात?

तो मुळात घोडा आहे की गाढव हे ही ठरवणे अवघड आहे. शिवाय घोडा असला तरीही केवळ तेवढ्यावरून सिंधु संस्कृतीत घोडे होते असा अर्थ काढणे घाईचे आहे.

http://www.hinduonnet.com/thehindu/op/2002/03/05/stories/200203050013010...

Rorschach test नावाची एक टेस्ट मानस शास्त्रात वापरतात. थोडक्यात, एका कागदावर काही असंबद्ध आकृती काढून एखाद्या माणसा समोर ठेवतात. त्यात तुला कुठला आकार दिसला या प्रश्नाच्या उत्तरावरून काही निष्कर्ष काढतात. ती आकृती निरर्थक असली तरीही प्रत्येकाला आपल्याला हवे ते आकार दिसतात. हडप्पा संस्कृतीतील प्रतिके एका अर्थाने Rorschach test आहेत. हिंदुत्ववाद्यांना तिथला कोणताही प्राणी घोडाच वाटतो. काही जण तर कॉम्प्युटर च्या सहायाने खाडाखोड करून 'जितं मया' च्या चालीवर 'घोडा सापडला' असे म्हणतात. तिथल्या लिपीत त्यांना संस्कृत चा भास होतो. याउलट द्राविडी वादी लोकांना ती लिपी द्रविडी वाटते. त्या लिपीत ते तामिळ च्या खुणा ओळखायचा प्रयत्न करतात.

मला वाटतं हिंदुत्ववाद इथे बाजूला ठेवावा. एकाने तसा प्रयत्न केला म्हणून सर्वच हिंदुत्ववादी तसेच प्रयत्न करत आहेत हे म्हणने जरा चुकीचे नाही का? ( आठवा मुस्लीम धर्मावरील चर्चा!!)

दुसरे काही सायंटिस्ट घोडा होता हे ही म्हणत आहेत, हे पण लक्षात घ्यायला हवं. तो घोडा जंगली नव्हता, पाळीव होता असे त्यांचे म्हणने आहे. (भाग ५)

घोड्यावर बसून आलेले आर्य वैदिक झाले असे काही आहे का? Happy अनेक फोटो मी इथे दिले नाहीत, त्यातील काही फोटोंमध्ये शिवलिंग, योगमुद्रा, नमस्कार करतानाच्या अवस्थेतील मानव मूर्ती हे सर्व आहेत व वैदिक संस्कृतीचा (व आजच्या हिंदू संस्कृतीचा) ते सर्व आजही अविभाज्य भाग आहेत्.

घोडा हा वादाचा भाग ऋग्वेद कालात फारसा नाही, ऋचाही फार कमी आहेत. नंतरच्या वेदांमध्ये घोड्याच्या यज्ञांच्या ऋचा आहेत, ॠग्वेद ते यजुर्वेद, सामवेद ह्यामध्ये खूप अंतर होत.

घोडा हा प्राणी इतर देशातून आयात केला किंवा हा प्राणी भारतात नव्हता असे गृहित धरले तरी फारसा फरक पडू नये. वैदिक संस्कृती ही सरस्वतीकाठी निर्माण झाली, सरस्वती भारतात आहे इराण मध्ये नाही, ह्याची नोंद घ्यावी.

तसेच समजा घोडा आयात झाला तरी एखादी आयात केलेली गोष्ट अचानक संस्कृतीचा अविभाज्य भाग बनू शकते, उदा. साबुदाना. किंवा एखादी नंतरची गोष्ट पण अचानक महत्वाचे स्थान घेऊ शकते उदा. सुखकर्ता दुखहर्ता ही आरती किंवा ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ही मंत्रपुष्पांजली ह्या दोन्ही शिवाय आज आरती पूर्ण होऊ शकत नाही.

फक्त घोडा होता का नाही ह्यावर वाद आहे म्हणून ही संस्कृतीच नव्हती असे अनुमान मात्र नका काढू. सरस्वती व अन्य नद्या महत्वाच्या. त्या सर्व तत्कालिन भारतात ( भारत, पाक, अफगाण) इथेच सापडतात.

>>वैदिक संस्कृती ही सरस्वतीकाठी निर्माण झाली, सरस्वती भारतात आहे इराण मध्ये नाही, ह्याची नोंद घ्यावी.
असेलही, पण ती संस्कृती निर्माण करणारे इराण मधून आले होते असेही होऊ शकते. . शिवाय haraxwati नावाची एक नदी तिकडेही आहे. इंग्लंड मधून अमेरिकेल आलेल्या लोकांनी जुन्या गावाची नावे इकडेही ठेवली तसेच आर्यांनी इथल्या एका नदीचे नाव सरस्वती ठेवले अशी शक्यता जास्त आहे.

अर्थात आजच्या संदर्भात ही सारी चर्चा केवळ academic आहे. आर्य बाहेरून आले असे निर्विवाद पणे सिद्ध झाले तरीही त्यात वाईट वाटायचे कारण नाही. किंवा आर्य इथलेच होते असे सिद्ध झाले तरीही त्यात अभिमानाने ऊर भरून जावा असे काही नाही. तसे बघायचे तर आपण सारेच अफ्रिकेतून आलेलो आहोत. पण आर्य इथलेच आहेत हे सिद्ध करणे हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने फार महत्वाचे असल्याने ते काहीही करून तसे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

>>> पण आर्य इथलेच आहेत हे सिद्ध करणे हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने फार महत्वाचे असल्याने ते काहीही करून तसे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

बरोबर. त्याचप्रमाणे आर्य बाहेरून आलेत व त्यांनी आपली संस्कृती इथल्या स्थानिक लोकांवर लादली हे सिद्ध करण्यासाठी सेक्युलर लोकांचा आटापिटा चाललेला असतो.

कुलकर्णी ५ वा भाग तुम्ही वाचला नाही का? haraxwati ( हेलमंड ) ही सरस्वती का होऊ शकत नाही तेच त्यात मांडले आहे. शिवाय त्यात ह्युमन बायालॉजी, डिनए, अवेस्ता इ इत्यादी पण दिले आहे. तो वाचूनही नाहीच म्हणायचे असेल तर माझी काही हरकत नाही. Happy

बरोबर. त्याचप्रमाणे आर्य बाहेरून आलेत व त्यांनी आपली संस्कृती इथल्या स्थानिक लोकांवर लादली हे सिद्ध करण्यासाठी सेक्युलर लोकांचा आटापिटा चाललेला असतो >>> अगदी योग्य.

घोडा वेदात आहे आणि अहिंदुत्ववाद्यानी त्याचा घोळ घातला आहे....

वेदात ३८ बरगड्या असलेल्या घोड्याचा उल्लेख आहे... आता हा घोडा प्रतिकात्मक आहे, असे मानून ३८ ची फोड ग्रह, नक्षत्रे वगैरे काही लोक देतात. काही लोक मात्र भारतातील आजचे घोडे ३६ बरगड्यांचे होते याच्याशी संबंध जोडून हा घोडा इथला नव्हताच असे म्हणतात... ( कदाचित ३६-३८ उलटही असू शकेल..... ३६ आणि ३८ हे आकडे नेहमीच वादाचे कारण होतात ! Proud )

आर्य भारतात आले याचा ठोस पुरावा पुरातन खात्याकडे आहे. पण आपण पिढीजात शब्द प्रामाण्य मानतो , बुद्धी प्रामाण्य मानत नाही त्यामुळे व भावनेपोटी मनासारखा स्वताला आवडेल त्या प्रमाणे आर्थ लावून पुढच्या पिढीला अंधारात ठेवतो .....ऋग्वेदामध्ये लोखंडी हत्यारे वापरल्याचे वारंवार वर्णन आले आहे, परंतु मोहंजोदडो उत्खानात एकहि लोखंडी वस्तू सापडली नाही...शिवाय लतापुजा,शिवपूजा सोडून कुठल्याही देवतांचा उल्लेख नाही.....शिव शक्ती पूजा आर्य पूर्व आहे.

आर्य भारतात आले याचा ठोस पुरावा पुरातन खात्याकडे आहे. >> मी जसे इथे अनेक पुरावे / थेअरी देऊन काहीबाही लिहले तसे आपण आर्य भारतात आले ह्याचे ठोस पुरावे दिलेत तर मी मलाही त्याचा उपयोग होईल.
मोंहजदाडो, हडप्पा, कुनाल, भिरन्ना इथे ब्रॉन्झ एज होते हे आपल्याला माहीत असावेच. शिवपुजा आर्यपूर्व असली तरी त्याने काय फरक पडतो. उदा राम व कृष्णाची वा शिवाची पुजा ही भगवान महाविर वा गौतम बुद्ध ह्यांचा आधीपासून होती, पण त्यामुळे महाविर वा गौतम बुद्धाचे महत्व कमी होईल का?

शिवपुजा आर्यपूर्व असली तरी त्याने काय फरक पडतो. उदा राम व कृष्णाची वा शिवाची पुजा ही भगवान महाविर वा गौतम बुद्ध ह्यांचा आधीपासून होती, पण त्यामुळे महाविर वा गौतम बुद्धाचे महत्व कमी होईल का?

अमर यांना असे म्हणायचे असावे की शिवपूजा ज्या अर्थी आर्यपूर्व आहे त्या अर्थी मोहेंजोदडो आर्य पूर्व आहे. पर्यायाने आर्य मोहेंजोदडो नंतर आले.

आपण आर्य भारतात आले ह्याचे ठोस पुरावे दिलेत तर मी मलाही त्याचा उपयोग होईल

रोमिला थापर किंवा michael witzel अशा सिरियस संशोधकांचे लेखन. ( पुना ओक किंवा एन एस राजाराम नव्हे Happy ) Light 1

>>रोमिला थापर किंवा michael witzel अशा सिरियस संशोधकांचे लेखन.
तुम्ही लिहा की मग विकु?
का नुसतेच १०८ खांद्यांवरून बंदुका ? Proud

विकू रोमिला थापर ह्यांचे अनेक पुस्तकं मी वाचले नाहीत असे तुम्हाला वाटत का? त्यांचेही संदर्भ आहेत हो. N S राजाराम ह्यांचा कुठला संदर्भ दिला असेल तर दाखवा. Happy एका प्रतिक्रियेत लिहले तर तुम्ही तेच लक्षात ठेवले पण बाकी लेख मात्र सोडून दिला. ऐसा नही चोलबे.

आणि रोमिला थापरला सिरियस म्हणता ह्यातच सर्व यावं. आपण घालू तोच चश्मा बरोबर नाही का? Light 1

कृपा करून एका अंगाने विचर करू नका , तर्कतीर्थ लक्षुमण शास्त्रींचे लेख वाचा. तसेच इतिहास संशोधक मंदार लवाटे,पुणे . यांच्याशी चर्चा करा.मी पुन्हा म्हणतो ऋग्वेदामध्ये लोखंडी हत्यारे वापरल्याचा उल्लेख वारंवार येतो मग ती मोहोन्जोदाडो येथे सापडत नाही.
मी फरक दाखवण्यासाठी शिव शक्ती पूजा आर्य पूर्व आहे म्हटलो नाही तर रामायणामध्ये रामानेही रामेश्वर येथे शिवपूजा केली होती.......पुरातन खात्याचे उत्खनन व त्यात सापडलेले मातीच्या वस्तू , खेळणी हा आर्य पूर्वीचा पुरावाच आहे.दस्युपुरे लुटताना इंद्र,अश्विनीकुमार,आर्यांनी लोखंडाचे गोळे फेकून, दगडांच्या व मातीच्या भिंतीं फोडल्या याचा ढोस पुरावा ऋग्वेदच देतो.शिवाय यज्ञामध्ये घोडे वैगरे प्राणी कापताना वापरलेले हत्यारही धारधार लोखंडी पत्याचे होते अशा ऋचा आहेत.त्या सुरीची पूजाही होत असे. महत्व राम,कृष्ण, बुद्ध , महावीरांचे कमी होत नाही ,परंतु त्यांचा आधार घेवून आजवर जगणार्यांचे कमी होतो,कारण अलौकाला धक्का बसतो.
तुम्हाला ठोस पुरावा आता जेनेटिक सायन्सच देईल.
राक्षस.नाग.कुर्मी,दानव ह्या नावांच्या जमाती भारतात होत्या ते काही पुराणातील दानव नाहीत...दस्यू मधील दस याचा अर्थ दूर राहणे,पुढे तेच दास संबोधले गेले ........... आर्य या उंच डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या जमातीनला दस्यू म्हणत,[ऋग्वेद] अजूनही प्राचीनतम शिव , शक्ती मंदिरे हि उंच डोंगरावरती अधिक आहेत.....तशी राम कृष्ण यांची सपाट प्रदेशातच आहेत .
आत्ता मी तुम्हाला अभ्यासासाठी विचारतो प्रभू रामचंद्रांचा ठोस पुरावा द्या तर देवू शकाल का ? बाबरी मस्जिद प्रकरणी न्यायालयाने पुरातान् खात्याकडून मंदिराचे पुरावे मिळविले परंतु राम असल्याचा पुरावा नाही.
मी काही नास्तिक नाही माजीही श्रद्धा आहे .परंतु ती काल्पनिक नाही.
आपण दिलेली माहिती स्तुती योग्य आहे,मी माझे विचार मांडले आपणास दुखावण्यासाठी नाही तर चर्चा होऊन अधिक भर पडण्यासाठी ........

मला या व्यासपीठावरून विचार मांडण्याची संधी मिळत आहे याचा आनंद होत आहे.
माझ्याकडे इतिहास व धर्मावर आधारित ५००० हून अधिक दुर्मिळ पुस्तके आहेत कोणाला पाहिजे आसेल तर[वाचायला] संपर्क करा .

हडप्पा मोहोनजोदाडो येथील नॉर्डिक वंशाच्या निश्चित खुणा असलेले देहाचे सापळे पुरावाच आहे ते आर्य नसावेत.
दस दस्यू यांचा संघर्ष होऊन त्यांच्यावर आर्यांची अधिसत्ता स्थापन झाल्यावर दास शब्दाला गुलाम असा अर्थ आला.शंबर,शुष्ण,चीमुरी,धुनी,यांला इंद्राणी जिंकले असे ऋग्वेदात वर्णन आहे.त्यांला दस्यू विशेषण लाविले.भारताबाहेर पश्चिमकडील इराण पासून युरोपापर्यंत आर्य मूळ भाषेत , ट ,ठ,ड ढ , ण ळ, हे वर्ण नाहीत. वेदात हे वर्ण आहेत. मूळ ऑस्ट्रीक भाषेच्या संस्काराने द्रविडच्या म्हणजे भूमध्यसामुद्रीयांच्या भाषेत हे वर्ण आले नंतर द्रविड व आर्य एकत्र निवास करू लागल्यावर आर्य् भाषेत हे वर्ण शिरले.ऋग्वेदाची रचना संस्कृत भाषेवर संस्कार झाल्यानंतरची आहे.आर्यांची संस्कृती हि द्रविड संस्कृतीपेक्षा उच्च होती हि कल्पना आता सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून निघालेल्या निष्कर्षावरून मागे पडू लागली आहे. आर्य अर्धवट भटके व ग्रामीण संस्कृतीचे होते . बौधायन धर्मसूत्रात नगरात वस्ती करणे अपवित्र मानले कारण तेथे धूळ फार असते ग्रामीण वस्तीच ब्राह्मणांनी पसंत करावी.
शिव उमा पूजा संप्रदाय भारतात आर्य् पूर्व काळापासून प्रचलित होता. तो द्रविडांनी प्रस्थापित केला.चारही वेदांमध्ये पूजा व पूजाकर्म नाही. सुत्राकालीन वैदिकांनी पूजाकर्म व पूजा शब्द घेतला.वैदिकांची [ आर्यांची ] देवाताराधना स्त्रोत्र व यज्ञ या स्वरुपाची होती. याज्ञसंस्था हि मागासलेल्या समाजाची संस्था होय. पशुयज्ञ हा या संस्थेचा भाग. बलिदान देण्याची परंपरा अप्रगत समाजाची आहे.ज्यांनी पूजा स्वीकारली त्या बरोबर शिव उमा,विष्णू व लक्षुमी,, विष्णूंचे अवतार ,राम व कृष्ण या प्रमुख देवता आणि त्यांच्या उपदेवता गणेश,स्कंध,नाग,नांदी,भैरव,हनुमान,गरुड,सितालादेवी इ.स्वीकारील्या. त्यामुळे मूळ आर्यांच्या इंद्र,अग्नी,सोम,वरून,मित्र,साविती,सूर्य,पूषा,मातारीक्,,वायू,पर्जन्य,ब्रह्मणस्पती,ब्रह्मा,प्रजापती,विश्वकर्मा,अश्विदेव,अदिती इ देवदेवता मागे पडल्या. राम,कृष्ण,विष्णू यांचे रंग आकाशसमान निळे आहेत .त्यांचा वर्ण गोऱ्या मूळ आर्यांचा नाही.या वरून अनुमान काय काढाल? वेदामध्ये उमा हि रुद्र पत्नि म्हनुन तिचा उल्लेख मध्यसमुद्रि लोकांची देवता असा आहे. शिव ह शब्द संस्कृतवरून व्युत्पन होत नाहि.

शाब्दिक चुकांना महत्व देवू नका, त्या प्रिंटिंग मिष्टीकने होतात. धन्यवाद
आणखी पुरावा उद्या बघू
उद्या ... हनुमान व राम यांचा संबंध

तर्कतीर्थ लक्षुमण शास्त्रींचे लेख वाचा >>> हो वाचली आहेत.

शिव, हनुमान ह्या शब्दांबद्दल इतर लेखात मी इथे त्यांची व इतरांची अनेकांची पुस्तके वाचूनच लिहले आहे. वरिल वर्णमालांचा उल्लेख, इतर देवतांचा उल्लेख पण वैदिक संस्कृतीचा इतिहास ह्या तर्कतिर्थांच्या पुस्तकात आहे. आपण लिहलेले सर्व उल्लेख मी इथे लेखात मांडलेले आहेत. उदा दस्यु, हनुमान शब्दाची उत्पत्ती, वॄषाकपि, इतर देवता जसे गणपती वगैरे.

आपण प्रतिसादात मांडलेले सर्व मुद्दे, मी ही मांडले आहेत. पूर्ण लेखमालिका वाचलीत तर आपल्या लक्षात येईल.

आपल्याकडे भरपुर ग्रंथसंपदा दिसत आहे. चर्चेस मजा येईल. आपण जे पुरावे आहेत असे म्हणाला आहात त्या बद्दल काही पुस्तके (लेख, चर्चा, इतर लिखान) ह्याबद्दल माहिती द्याल का? कदाचित ती पुस्तके मी आधी वाचली असतील, नसल्यास वाचता येतील.

तर्कतिर्थांच्या वेळी उपलब्ध नसलेले व आता उत्खनन झालेले पुरावे व साईटस ह्या पाचही लेखात दिलेल्या आहेत. तर्कतिर्थांना मी गुरुच माणतो, पण प्रत्येकाचे लिखान हे त्या त्या काळातील उपलब्ध पुराव्यांवर लिहलेले असते. (कारण इतिहासात कल्पनारंजन नसते, अपवाद काही लेखकांचा) म्हणून लेख ५ मध्ये लिहल्याप्रमाणे आपण १९९० नंतर साईट्स, पुरावे हे विचारात घ्यावेत.

त्या त्या काळातील उपलब्ध पुराव्यावर लिहिलेले आसते............
पहिले वरील मांडलेले मुद्दे आपण सोडन देऊन दुसरे नवीन घ्यायचे?
मी तेच सांगत आहे १९९० नंतर सापडलेले अवशेष आपण रामायणाशी महाभारताशी कसे लावाल? कारण रामायण महाभारत हेही १९९० नंतरचे नाही.. ते आणखी काही आसू शकते १९९० नंतरचे पुरावे सदर केले तरी अनुवांशिक बदल करतायेत नाही..शिवाय १९९० नंतरचे पुरावे २०११ नंतर मागेच पडणार . या साठी पुराणातील देव देवतांचा संदर्भ लावण्यापेक्षा इतिहासातील महान व्यक्ती म्हणून लावावा . परंतु धर्मवेडा समाज अलौकीकाला बळी पडतो व इतिहासाकडे दुर्लक्ष करतो.... आणि इतिहासापेक्षा पुरातणविभाग व आधुनिक सायन्स यावर भर दिला पाहिजे......... आजही दक्षिन कडील लोकांमध्ये बी + रक्त गट ९०% आहे. तर युरोप देशात ओ+ जास्त आहे . ब्राह्मण समाजात ओ + का जास्त?

केदारजी
आपला लेखही शास्त्रींच्या ' वैदिक संस्कृतीचा इतिहास ' याच पुस्तकावर आधारित आहे. कारण आपण ज्या क्रमाने विषय मांडता तो क्रम व विषय याच पुस्तकातील आहे . आपली विषयांची क्रमवारी स्व संशोधात्मक नाही . आसेल तर आपण स्वत केलेले संशोधन सिद्ध करा..आपण आपले मत शास्त्रींच्या पुस्तकाच्या अनुषंगाने मांडले व वर आपण 'असा एक मत प्रवाह आहे' म्हणून आपलेच मत मांडत आहात ........... १९९० नंतरचे नवीन पुरावे द्यावेत . केवळ शब्द नको ...
अधिक सुसंवाद झाल्यास मजा येईल

आपला लेखही शास्त्रींच्या ' वैदिक संस्कृतीचा इतिहास ' याच पुस्तकावर आधारित आहे. कारण आपण ज्या क्रमाने विषय मांडता तो क्रम व विषय याच पुस्तकातील आहे >>

हा लेख अजिबात नाही. माझा एकुण लेखातील काही भाग निसंशय त्या पुस्तकावर आधारीत आहे, उदा पहिला वा इतर लेखातील काही भाग ई ई. माझा पाचवा लेख तर बी बी लाल च्या दोन पुस्तकावर व एका लिंकवर आधारीत आहे. व वेळोवेळी मी तसे मी नमुद केले आहे. रामावर इतके संशोधन तर्कतिर्थांनी केलेले नाही. (असेल तर अजून मी वाचले नाही) तसेच लेखात मी ह्या सर्व पुस्तकांची नावे दिली आहेत, ज्यातून मी काही काही भाग माझ्या पद्धतीने घेतली आहेत.

तर आपण स्वत केलेले संशोधन सिद्ध करा >> मी संशोधक नाही. असलो असतो तर मजा आली असती .. Happy आपण दिसत आहात. आपले संशोधन कळवाल तर नक्कीच वाचेन. तसे नसेल तर आपणही माझ्याच बोटीतले ठराल. इतरांचे पुस्तक वाचून चर्चा करणारे. Happy

१९९० नंतरचे नवीन पुरावे द्यावेत . केवळ शब्द नको ... >> तेच मी आपणाला म्हणत आहे. आपण लेख वाचावेत. मी २००५ मधिल भिरन्नाचा पण उल्लेख केला आहे.

आपण लेख कृपया वाचावेत. मी आधी म्हणाल्याप्रमाणे मी इतिहास संशोधक अजिबात नाही, हवे असल्यास मी इतिहासाचे ४ पुस्तक वाचून त्यातील मला आकळलेले मी इथे मांडणारा कॉपी पेस्ट कर्ता आहे असे म्हणालात तरी मला वाईट वाटणार नाही, कारण मी तोच आहे. संशोधक खूप खोलात जाउन विचार मांडतात. तो मी नाही. मी ही पुस्तके वाचून मला आकळलेले मांडतो. जीथे अडले तिथे संदर्भासाठी अजून कोणी काहे लिहले, त्याला पुष्टी आहे का? हे पाहतो व मुद्दा आवडला तर मांडतो.

तसं पाहू जाता लोकमान टिळक, बाबासाहेब आंबेडकर वा सावरकर हे पण संशोधक नव्हते तरी त्यांनी आपआपले बरे वाईट भाष्य वेदांवर, संस्कृतीवर लिहून ठेवले आहे कारण ते अभ्यासक मात्र होते, मी पण तसा (तितक्या तोलामोलाचा अजिबात नाही) अभ्यासक आहे. संशोधक नाही.

मग इथे विषय मांडण्याचे प्रयोजन काय? तर इतरांचे संशोधन (त्यात नविन पण उदा सरस्वती प्रवाह, लुप्त सरस्वती इ इ येथील जनतेसमोर मांडावे.) जेणे करुन इतर लोकं पण वाचतील व त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल.

आपल्याशीही सुंसवाद करायला मजा येईल. पण मी ठरलो साधा वाचक / अभ्यासक पण आपण संशोधक असाल तर ती पात्रता माझ्या अंगी नाही, हे मात्र आधीच मान्य करतो. Happy

>> आजही दक्षिन कडील लोकांमध्ये बी + रक्त गट ९०% आहे. तर युरोप देशात ओ+ जास्त आहे . ब्राह्मण समाजात ओ + का जास्त?

अमर, याबद्दल कुठे सविस्तर वाचायला मिळेल? संदर्भ सांगू शकाल काय?

शिव उमा पूजा संप्रदाय भारतात आर्य् पूर्व काळापासून प्रचलित होता. तो द्रविडांनी प्रस्थापित केला.चारही वेदांमध्ये पूजा व पूजाकर्म नाही. सुत्राकालीन वैदिकांनी पूजाकर्म व पूजा शब्द घेतला.वैदिकांची [ आर्यांची ] देवाताराधना स्त्रोत्र व यज्ञ या स्वरुपाची होती. याज्ञसंस्था हि मागासलेल्या समाजाची संस्था होय. पशुयज्ञ हा या संस्थेचा भाग. बलिदान देण्याची परंपरा अप्रगत समाजाची आहे.ज्यांनी पूजा स्वीकारली त्या बरोबर शिव उमा,विष्णू व लक्षुमी,, विष्णूंचे अवतार ,राम व कृष्ण या प्रमुख देवता आणि त्यांच्या उपदेवता गणेश,स्कंध,नाग,नांदी,भैरव,हनुमान,गरुड,सितालादेवी इ.स्वीकारील्या. त्यामुळे मूळ आर्यांच्या इंद्र,अग्नी,सोम,वरून,मित्र,साविती,सूर्य,पूषा,मातारीक्,,वायू,पर्जन्य,ब्रह्मणस्पती,ब्रह्मा,प्रजापती,विश्वकर्मा,अश्विदेव,अदिती इ देवदेवता मागे पडल्या. राम,कृष्ण,विष्णू यांचे रंग आकाशसमान निळे आहेत .त्यांचा वर्ण गोऱ्या मूळ आर्यांचा नाही.या वरून अनुमान काय काढाल? वेदामध्ये उमा हि रुद्र पत्नि म्हनुन तिचा उल्लेख मध्यसमुद्रि लोकांची देवता असा आहे. शिव ह शब्द संस्कृतवरून व्युत्पन होत नाहि.

अगदी मान्य.. फक्त, याज्ञसंस्था ही मागासलेल्या समाजाची संस्था होय... हे मात्र पटले नाही... ( बाय द वे, तसे ते खरे असले तरी चालण्यासारखे आहे,, राखीव जागावर क्लेम करता येईल ब्राह्मणाना Proud )

बळी देण्याची प्रथा, शाक्त पंथियांमध्येही आहे, आणि ही शैवांची उपशाखा आहे, वैदिकांची नाही.. इतरही अनेक अवैदिकांमध्ये पशूबळी प्रथा होती/ आहे...

आजही दक्षिन कडील लोकांमध्ये बी + रक्त गट ९०% आहे. तर युरोप देशात ओ+ जास्त आहे .>>> हे पटत नाही कारण संघमित्रा साहू ह्यांनी २००६ मध्ये हा पेपर सादर केला. त्या म्हणतात " The sharing of some Y-chromosomal haplogroups between Indian and central Asian population is most parsimoniously explained by a deep common ancestry between the two regions, with the diffusion of some Indian specific lineages northword. The Y-chromosomasal data consistantly suggest a largely South Asian origin for Indian cast communities and threfore argue against any major influx, from regions north and west of India, of people associated either with the development of agriculture or the spread of the Indo-Aryan language family

हे एका संशोधकाने मांडलेले मत पण खोटे का? असेलही DNA वर काय भरवसा? (जाता जाता हे २००६ मधील संशोधन आहे.)

केद-रा, छान लिहिले आहेस.
नंतर जसे रेफरंसेस दिले आहेस तसे लिखाणातच in-line देता आले (शक्य तितके आणि शक्य तेवढे) तर जास्त उपयोगी होतील लेख.
नकाश्यांप्रमाणेच काही flowcharts, tables बनवता आले तर त्याचीही timeline आणि मतप्रवाह समजायला मदत होईल.

केद-रा >> Lol आवडले.

नंतर जसे रेफरंसेस दिले आहेस तसे लिखाणातच in-line देता आले >> हो आश्चिग तसेच करायला हवे होते. पुढच्या वेळी नक्की करेन. धन्यवाद.

Pages