अवघी विठाई माझी (१४) - झुकीनी, कुर्जे

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

Zuccini.jpg

आपल्याकडे काकडीचे अनेक प्रकार आहेत. मुंबईची पांढरी, मावळ प्रांतातली मावळ काकडी, कोल्हापूरकडची वाळूक, कोकणातली तवसे, शिवाय दाक्षिणात्यांची सांबार काकडी.
पण वरच्या फोटोत दिसतेय ती झुकिनी किंवा कुर्जे वेगळी. हिचे वेगळेपण देठात कळते. देठ भोपळ्यासारखा, काकडीसारखा नाही.

yellow zucinni.jpg

पिवळी आणि हिरवी असे हिचे दोन मुख्य प्रकार. वरच्या फोटोत दिसतोय तसा वेलही, काकडीपेक्षा भोपळ्याच्या वेलाशी नाते सांगणारा.
तवसे सोडल्यास, आपण बहुतेक काकड्या कच्च्या खातो, खाऊ शकतो. (हो तसे काकडीचे घारगे, थालीपिठ, झुणका, आमटी, भाजी करता येते. तवसे वापरुन धोंडस करतात.) पण झुकिनी कच्ची खाण्यापेक्षा थोडी शिजवली तर जास्त चांगले.
झुकिनी आणि कुर्जे हि एकाच भाजीची नावे आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इतालिया आदी देशात झुकिनी म्हणतात तर ब्रिटन, फ्रान्स, न्यू झीलंड, पोर्तूगाल, नेदरलँड आणि आफ्रिकन देशात, कुर्जे हा शब्द प्रचलित आहे.
हे दोन्ही प्रकार म्हणजे अगदी कोवळी असताना खुडलेली भाजी. यावेळी बिया अत्यंत कोवळ्या असतात. हिच भाजी जून झाली कि बिया मोठ्या होतात. त्यावेळी त्या भाजीला मॅरो, असा पण शब्द वापरतात.
या भाजीची पिवळी फूले (ती पण नूकतीच उमलायला लागलेली ) खातात. नर आणि मादी दोन्ही फूले खातात. मादी फूलाच्या मागे, कोवळी झुकिनी असते, ती पण खातात. फूलाचा मधला भाग काढावा लागतो. बाकिच्या भागाची भजी (फ्रिटर्स / टेम्पूरा ) जास्त लोकप्रिय आहेत.
फ्रेंच रतातुइ मधे ही वापरतात. तसा या भाजीला स्वतःचा खास स्वाद नसतो. पण इतर भाज्या, आणि मसाल्याचा स्वाद या भाजीला लागतो.

stir fry zuccini.jpg

वरच्या पाककृतिमधे मी त्याच्या चकत्या करुन स्टर फ्राय केलेय. सोबत लाल व पिवळे टोमॅटो, तीळ आणि गूजबेरीज वापरल्या आहेत. (गूजबेरीज आपल्याकडे मिळतात. पिवळ्या रंगाची छोटी फळे, त्यावर त्रिकोनी पातळ आवरण असते. त्याला फळवाले काय म्हणतात ते आठवत नाही. या भाजीत मी त्याचाच एक आंबटगोड प्रकार वापरला आहे.)

100_0915.JPG

पण झुकीनी जास्त करुन स्ट्फ करुन वापरतात. आपल्या आवडीची कुठलीहि कोरडी भाजी, खिमा वगैरे भरता येतो. सारण जास्त मसालेदार केले तर झुकिनीला पण छान स्वाद येतो.
वरच्या प्रकारासाठी मी चीज वापरले आहे. (कुठलेही आवडते चीज वापरु शकता. गोट चीज किंवा फेटा छान लागते. फेटा वापरले तर मीठ वापरायचे नाही, मी चेडार वापरले आहे.)
चीज मधे पाप्रिका, टोमॅटो पावडर, मिरपुड आणि सेज मिसळले. (तूमच्या आवडीप्रमाणे मसाले वापरू शकता.) झुकिनी ला एक उभा काप देऊन, त्याला ऑलीव्ह ऑईल चोळले, मग त्यात सारण भरुन, मंद गॅसवर शिजवले. हाच प्रकार तूम्ही बेक वा ग्रील करु शकता. किंवा फॉईलमधे गुंडाळून बार्बेक्यू करु शकता.

हिचे मूळस्थान इतालिया मधे आहे असे मानतात. हिचे शास्त्रीय नाव Cucurbita pepo.
या आकाराशिवाय, गोल आकाराच्या, भोवर्‍यासारख्या आकाराच्या झुकिनी असू शकतात. पिवळ्या आणि हिरव्या रंगाबरोबरच, त्या पोपटी रंगात पण मिळतात. (पण चव तशीच असते.)
थाई प्रकारच्या भाज्यात हि वापरतात. हि किसून पावाच्या पिठात मिसळून, तिचा ब्रेड पण करतात.
आपल्या पद्धतीचा मसालेदार रसभाज्या, परतून केलेल्या भाज्या (उदा पावभाजी) मधे ही वापरता येईल.
यात फोलेट, अ जीवनस्त्व, पोटॅशियम आणि मँगनीज असते. हिची लागवड करणे सोपे असते, आणि याला फळेही भरपूर लागतात. (त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठीच तर कळ्या तोडाव्या लागतात.)

विषय: 
प्रकार: 

चांगली माहिती परत एकदा. मी झुकिनीची चक्क गोडा मसाला आणी दाण्याचं कूट घालून भाजी करते.कधी गोडा मसाला न घालता धणे जिरे पूड घालते. छान चव येते भाजीला. कधी किसून भातात घालते. ह्याचे फ्रिटर्स पण छान लागतात.

झुकिनिची भजी थेट आपल्या घोसावळ्या/गिलक्याच्या भजिसारखी लागतात.
किसुन पिठ,मसाले घालुन पराठेही करता येतात.
पहिला रंगिबेरंगी फोटो स्टरफ्रायच्या आधिचा आहे का?

झुकिनी काकडीपेक्षा चवीने घोसाळ्याच्या जास्त जवळची वाटते. मसाला भरुन भरली घोसाळी करतो तशी मी स्टफ्ड झुकिनी करत असते. मस्त लागते. घोसाळ्यासारखीच ह्याची पण भजी मस्त लागतात.

स्टफ्ड झुकिनीची रेसिपी आवडली. ग्रिलवर करून बघते.

झुकिनीचे पातळ उभे काप करून त्यावर मिरपूड, चाट मसाला शिंपडायचा. टोफू किंवा पनीरचे झुकिनीच्या रुंदिएवढे लांबट काप करून मिरचीच्या चटणीत बुडवून ठेवायचे. तासाभराने या तुकड्यांना झुकिनीकापांनी गुंडाळून वळाकट्या करायच्या. वरून जरासं तेल चोपडायचं. वळकट्या स्क्युअर्सना लावून ग्रिल्/बेक करायच्या. ग्रिल्ड झुकिनीची चव छान लागते आणि आतला टोफू किंवा पनीरचा तुकडा ग्रिलिंगनंतरही मऊ असतो.

घोसाळे म्हणजे झुकीनीच ना. इथे नेहमी झुकीनी दिसते त्यापेक्षा जात वेगळी . बरोबर ना?
मृण्मयीने लिहिलेल्या रेसीपीप्रमाणे मी पण करते. नारळाच्या दुधात उभे काप भिजवुन ते ग्रील केलेले पण खुप छान लागते.
आणि प्रज्ञा सारखच मी पण भरल्या वांग्याप्रमाणे किंवा दोडक्या प्रमाणे शेंगदाण्याचा कुट वगैरे भरुन भरली झुकिनी करते.
दिनेश छान माहिती.

मस्त लिहिलंय. बरं झालं झुकिनीबद्दल कळलं ते.

सिंडे-सायो काय म्हणता, झुकिनीची भजी???? सायो मी तू सांगितल्याप्रमाणे ती फक्त स्पॅगेटीमध्येच वापरते. आता भजी पण करून बघेन एकदा.

अरे वा! काय एकेक रेसिपीज आहेत. करून बघितल्या पाहिजेत. मी दाण्याचा कूट घालून रायता करते किसून मायक्रोवेव्हमध्ये किंचीत शिजवून. नाहितर नुसतच ऑऑ आणि रॉक सॉल्ट लावून ग्रील करते.

किसून कणकेमधे मिसळून पराठे छान होतात्.आणि विश्वास बसणार नाही, पण ह्याचे मफिन्स सुंदर होतात्.मफिन्स साठी एक छान लिन्क :
http://www.muffinrecipes.net/zucchini-muffins.html

वा वा छान माहिति आणी रेसिपी. इथे मिळते पण त्याच काय करायच माहित नसल्याने फारशी आणत नव्हते मी. एकदोनदा स्पॅघेटिमधे घातली तेवेढीच.
आता भरली झुक्कीनि, भजि दोन्हि करुन बघणार. Happy

दिनेशदा,
उत्तम लेखमाला.. बर्‍याच नवीन पाककृती कळल्या. धन्यवाद. Happy

बाकी, तो उच्चार 'कुर्जेत' / 'कुर्जे' असा आहे.

अरे वा, सगळ्यांकडून छान रेसिपिजची भर पडली. सिंडरेला, घोसाळ्याचा / गिलक्याचा वेल लहानपणापासून बघतोय, पण मुंबईत भाजीवाल्याकडे ती गेल्या १० / १२ वर्षातच मिळायला लागली.त्यामूळे फ़ारशी खाल्लीच नाहीत कधी.
या भाजीचे तसे बरेच वेगवेगळे पदार्थ करता येतात, पण कच्ची मला नाही आवडली. (साधारण कच्च्या तोंडल्यासारखी लागते.)
चिनूक्स, आभार, सुधारतो आता. पण आफ़्रिकेत असा थेट स्पेलिंगवरुनच उच्चार करतात. इथल्या लोकांनी
भाषेची पार मोडतोड करुन टाकलीय.
प्राजक्ता, तो फ़ोटो भाजी शिजण्यापूर्वीचा. शिजताना बाकी भाज्या नीट राहिल्या, पण गुजबेरीज विरघळून
गेल्या. पण त्याची चव छान लागली.

मस्त मस्त फोटोज, माहिती व पाकृ. मला कायम ह्या भाजीचा उच्चार नक्की काय करायचा असा प्रश्न पडायचा!:)

गूजबेरीज आपल्याकडे मिळतात. पिवळ्या रंगाची छोटी फळे, त्यावर त्रिकोनी पातळ आवरण असते. त्याला फळवाले काय म्हणतात ते आठवत नाही.

फोटोत दिसताहेत त्यापेक्षा जरा मोठी साईज आपल्याकडे थंडीत मिळते फळवाल्यांकडे. मला रसभरी/खट्टीमिठी असे काहीसे नाव सांगितले होते आमच्याइकडच्या भैय्याने. आमच्या गावी शेताच्या कडेने उगवतात. तिथले लोकल नाव आठवत नाही आता.

अशिच दिसणारी हिरवट फळे असलेले दिडेक फुट जंगली रोपटे दिसते सगळीकडे वाढलेले. ती फळे वापरायचे धाडस मी केले नाही कधी.

मी आणलेली एकदा झुक्कीनी. तिचा उच्चार काय करायचा हा मलाही प्रश्न पडलेला.. Happy