मासे १०) मोदकं (भिळजे)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 July, 2010 - 06:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हे मासे १ इंचाच्या आसपास असतात. दिसायला अगदी मोत्यासारखे चकचकीत असतात. पण ह्यांना खवल असतात. ही खवले काठायची व डोके आणि शेपुट काढायचे. निवडायचा थोडा त्रास असतो.

१ वाटा भिळजे
८-१० लसूण पाकळ्या
हिंग, हळद,
१ चमचा मसाला
थोडा चिंचेचा कोळ
थोडि चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम तेलावर लसणाची फोडणी द्यायची. मग त्यावर हिंग, हळद, मसाला, घालून परतुन भिळजे घालावे. लगेच हलक्या हाताने परतायचे मग चिंचेचा कोळ टाकायचा, मिठ टाकायचे, कोथिंबीर टाकायची. ह्याला गॅस मंद ठेवायचा नाहीतर भिळजे मासे भांड्याला चिकटून तुटतात. उकळी येउन २-३ मिनिटे झाली की गॅस बंद करायचा.

हेच मासे मिठ, मसाला, हिंग, हळद, लाउन तळताही येतात.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

हे मासे छोटे असतात पण खुप चविष्ट असतात. ह्याच्या मध्ये मधला काटाही असतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

का? का ? का असा छळ परदेशातल्या लोकांचा Happy

मस्त माहिती देत आहात. जमल्यास या माशांचे सायंटिफिक नाव पण टाकाल का ?

मस्त आहे हां तुमची ही लेखमाला! मी तर कुठलीच नावं सुद्धा ऐकलेली नाहीत (पक्का घाटी) Proud
शेवटी तयार होणारा पदार्थ मात्र दर वेळी एकदम मस्त दिसला आहे! कधी योग येइल आम्हाला असं काही खायचा ते आता न बोललेलच बर! Happy

मोदकांची मोटली पण करतात.
त्यासाठी सागाच्या पानाची पत्रावळ करायची. त्यात हळदीची पाने ठेवायची. त्यावर मसाला लावलेली मोदकं ठेवायची. मग हे सगळे बांधून खोलगट तव्यात ठेवायचे. वर दुसरा तवा झाकायचा. आणि सगळे मंद आचेवर भाजायचे.

ही मोदके बाजारात पाहिली अनेकदा. पण इंचभर माशात साफ करणार काय आणि खाणार काय असा विचार करुन कधी घेतलीच नाहीत Sad

परदेशस्थ मित्र मैत्रिणींनो, जेव्हा देशात याल तेव्हा एक उरण ट्रीप करा. किनार्‍यावर जाऊन फ्लेमिंगो पहा आणि मग जागूच्या घरी जाऊन पोटभर खा आणि चटई पसरुन ताणून द्या Proud

मेघा धन्यवाद, सायंटीफिक नावांबद्दल मी अनाडी आहे.
शैलजा मोदकं मला बाजारात मिळालि.
बैद्यबुवा तुम्हाला लवकरच योग येवो.
दिनेशदा बरोबर ह्याच नाव मोदकं असच आहे. तुमची रेसिपीही आवडली. आम्ही अस पानात बांधुन निखार्‍याव ठेवतो.
दिपांजली हे मासे मलाही बघायला खुप आवडतात.
साधना, ही साफ करायचा कंटाळा येतो पण अग एकदा आणून बघ. एकदा चव कळली की परत परत आणशिल.

अश्विनी आता फ्लेमिंगो गेले ग.खाडीत आता भराव पडून तिथे पोर्ट तयार होणार आहे. पण मासे नक्की मिळतील समुद्रातले.
निकीताला अनुमोदन.

हो.. आता आणते आणि करते.. Happy

दिनेशनी लिहिलीय ती रेसिपी आमच्या गावी नदीतल्या माशांवर वापरतात. नदीत मोदकांसारखेच बारीक आणि इंच-दिड इंच आकाराचे मासे मिळतात.

नदीवर कपडे धुवायला जाताना सोबत एक मोठा टोप, टोपाच्या तोंडाला बांधता येईल एवढ्या आकाराचा एक फडका, आणि गव्हाची मळलेली लिंबाएवढी कणिक/शिजवलेला थोडासा भात एवढे सामान घेऊन जायचे. तिकडे गेल्यावर ती कणिक/भात टोपात ठेवायची (गव्हाची कणीक पाण्यात लगेच विरघळत् नाही) टोपावर फडका बांधायचा आणि फडक्याला मध्यभागी एक भोक करायचे. मग ठेऊन द्यायचा तो टोप पाण्यातल्या एखाद्या दगडाजवळ. कपडे धुवायला साधारण तासभर लागायचा. ते धुवुन झाले की टोप काढायचा पाण्यातुन. आत २५-३० मासे तरी गोळा झालेले असायचे. बिचारे टोपात खाण्यसाठी उतरायचे पण परतीचा रस्ता मात्र सापडायचा नाही त्यांना.... मग घरी नेऊन त्यांना साफ करायचे, दिनेशनी लिहिलीय तशी मोटली (अर्थात केळीच्या पानात) बांधुन निखा-यात टाकायचे. भाक-या भाजुन होईपर्यंत मोटली तय्यार. मग गरम्गरम तांदळाच्या भाकरीबरोबर ताव मारायचा मस्त... Happy

नदीत कपडे धुताना पायांना मासे गोड चावा घेतात. असे बरेच मासे चावायला लागले की दुस-या दिवशी मी आणि मावशी टोप घेऊन जायचो आणि त्या चावणा-या माशांना घरी आणायचो.

कुणाच्या पायाला चावण्याबद्दल केवढी हि शिक्षा, माश्यांना !!
मी मागे इथे लिहिले होते वाटते. घाना देशात, अख्ख्या शहाळे फोडून त्यात असे मासे आणि मसाले घालतात, मग परत झाकण ठेवून थोडी माती लावून, अख्खे शहाळे विस्तवात भाजतात. आतले मासे त्या कोवळ्या खोबर्‍याबरोबर शिजतात.

घाना देशातच कशाला, आपणही हे करुन बघु शकतो की. माशांच्या जागी चिकन्/मटण पण ट्राय करता येईल.... गावी गेली की करेन हा उद्योग.. फक्त शहाळी वाडीतुन मागवावी लागतील Happy

अरे वा म्हणजे एक प्रकारची पोपटीच झाली. आम्ही पोपटी करतो अशी मातीच्या मडक्यात चिकन, शेंगा वगैरे घालुन.

जागु, मग रेसिपी टाक ना...

इथे एक्-दोन वर्षांपुर्वी कोणीतरी पोपटीची कृती टाकली होती. ती वेज होती बहुतेक..

जागू तुझ्या सचित्र पाकृ मुळे आणि साधना तुझ्या प्रत्येक प्रतिसादामुळे वाचुनही नव्या खाद्यजगाची आणि संस्कृतीची ओळख झाल्यासारखं वाटतं. धन्यवाद. Happy
मी वाचत असते नेहमी. शाकाहारी असल्यामुळे खायचा योग येणार नाही कदाचीत.

रैना खुप खुप धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल. तु आणि अश्विनी खात नसतानाही मास्यांच्या पाककृती वाचुन त्याला प्रतिसाद देता. मला तुमचही कौतुक वाटत.

मोदक नाही मोदकं म्हणा!
छोटुल्या पेडव्यांची पण मोटली मस्त लागते.

दिनेशदांनीही हे सांगितल होत आधी मोदकं नाव मिच विसरले होते बदलायला.
भ्रमर नावात बदल केला आहे. धन्स.

Pages