मटणाचा रस्सा

Submitted by लालू on 8 July, 2010 - 23:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१ किलो मटण (२ ते ३ पाऊंड, थोडी हाडे- नळ्या असाव्यात.)
तिखट
मीठ
हळद

पहिले वाटण-
१ वाटी कोथिंबीर
१ इन्च आले
१ मिरची
१ छोटा लसणाचा गड्डा
१ चमचा बडीशेप
१ छोटा कांदा (कच्चाच)
थोडी पुदिन्याची पाने (आवडत असल्यास)
२ चमचे लिंबाचा रस किंवा दही.

दुसरे वाटण-
१ नारळ खवणून खोबरे तव्यावर भाजून घ्यावे
२ कांदे उभे पातळ चिरुन तव्यावर तेल टाकून तळून
३-४ लसूण पाकळ्या
२ चमचे खसखस भाजून
दालचिनी
४-५ लवंगा
४-५ वेलदोडे

फोडणी-
१ मध्यम कांदा चिरुन
खडा गरम मसाला (२-३ लवंगा, दालचिनीचा तुकडा, १ छोटा चमचा काळे मिरे, एक मसाला वेलची)
तमालपत्र
हिंग

तेल/तूप

क्रमवार पाककृती: 

-मटणाला हळद आणि मीठ लावून थोडावेळ ठेवून मग धुवून घ्यावे.

-पहिल्या वाटणासाठी दिलेले जिन्नस बारीक वाटून घ्यावेत. मटणाला मीठ, हळद, चमचाभर तिखट आणि पहिले वाटण लावून अर्धा तास मुरत ठेवावे.

mutton1.jpg

- जाड बुडाच्या पातेल्यात तेल किंवा तूप घालून तापल्यावर हिंग, खडा मसाला, तमालपत्र टाकून मग चिरलेला कांदा टाकून परतावे. मटणाचा रंग बदलू लागला की २ वाट्या पाणी घालून झाकण ठेवावे.

- मटण थोडे शिजल्यानंतर दुसरे वाटण घालावे, आवडीनुसार अजून तिखट, प्रमाणात मीठ घालावे. वाटीभर पाणी घालून आणि उकळी आणावी, नंतर मटण पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर शिजवावे. मटण पूर्ण शिजवून घेऊन दुसरे वाटण घातले तरी चालते पण घातल्यावर पुन्हा नीट उकळी आणावी. रस्सा अति दाट किंवा पातळ नको. त्याप्रमाणे पाणी वापरावे.

mutton2.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

- ही आमची नेहमीची मटण रश्श्याची रेसिपी आहे.

- फोडणी स्टीलच्या कुकरमध्ये केली आणि दुसरे वाटण घातल्यावर कुकरचे झाकण लावून प्रेशरसह मटण शिजवता येते. मटण चांगल्या प्रतीचे, जून नसेल तर पातेल्यात ३०-४५ मिनिटे लागतील. कुकरमध्ये मोठ्या आचेवर १ शिटी झाल्यावर आच कमी करुन पूर्ण प्रेशर येऊ द्यावे. मग शिटी होऊ न देता गॅस बंद करावा आणि पूर्ण वाफ गेल्यावरच कुकर उघडावा. मटण शिजले की नाही ते एखादा हाडासहित असलेल्या तुकड्यावरुन समजेल. मांस हाडापासून सहज वेगळे झाले, तुकडा मोडता आला की ते शिजले असे समजावे. मटण रुम टेम्प. ला असेल, किमान अर्धा तास तरी मॅरिनेट केले असेल तर लवकर शिजते.

- वाढताना बरोबर कांदा टोंमॅटोची दही घातलेली कोशिंबीर द्यावी.

- यासाठी भात करताना तेलावर खडा गरम मसाला घालून तांदूळ परतून आणि मटण शिजताना काढलेले थोडे पाणी घालून शिजवला तर छान लागतो.

-एका नारळाऐवजी, अर्धा नारळ आणि २ टोमॅटो ब्लांच करुन किंवा नुसते चिरुन फोडणीत घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालू !!!

काय रेसीपी दिली आहेस अगं तू.. काल ही रेसीपी वापरून चिकन रस्सा केला होता.
अ...श...क्य.. भारी लागतोय !!

थँक्स मिलिअन्स!

हा फोटो..
chicken rassa.jpgchicken rassa 2.jpg

Pages