मार्सेलीसच्या ऐतिहासिक उडीची आज शताब्दीपुर्ती - विशेष लेख - तेजोनिधी सावरकर

Submitted by अर्धवट on 8 July, 2010 - 06:08

तात्यारावांना पॅरीसाहून परत येताना लंडनच्या स्टेशनात शिरताच अटक झाली. काही दिवस त्यांना कच्चे कैदी म्हणून ठेवले गेले. न्यायालयाकडे त्यांचे वकील रेजिनाल्ड व्होगन यांनी केलेल्या सर्व अर्ज-विनंत्या फेटाळून लावत, सावरकरांना हिंदुस्थानात परत पाठवण्यात यावे आणि त्यांच्यावरील सुनावणी तिकडेच व्हावी असा निकाल लंडनच्या न्यायालयाने दिला.

सावरकरांना लंडनच्या कारागृहातून पळवून नेण्याचे १-२ प्रयत्न झाले पण ते फार यशस्वी झाले नाहीत. कदाचित ह्या प्रयत्नांची कुणकुण लागल्यामुळेच, त्यांच्या हिंदुस्थानात प्रयाणाचा मार्ग व वेळ अत्यंत गुप्त ठेवली होती. इंग्रज सरकारला सावरकरांना बोटीवरून पळवण्याचा प्रयत्न होऊ शकेल ह्याची पूर्ण कल्पना होती. वास्तविक नेहेमीचा हिदुस्थानात यायचा मार्ग होता इंग्लिश खाडीतून फ्रान्समार्गे, पण इतका स्फोटक दारुगोळा जहाजावर असताना, कुठल्याही परदेशी किनार्‍याला न लागता हिंदुस्थान गाठायचे ठरले आणि जहाज बिस्केच्या आखातातून हाकण्यात आले.

हिंदुस्थानच्या किनार्‍याला लागण्यापूर्वी एक अंतीम प्रयत्न करण्याचे तात्यारावांच्याही मनात घाटात होतेच. मोठ्या मोठ्या नावाजलेल्या इंग्रज पोलीस अधिकार्‍यांसमवेत आणि कडेकोट बंदोबस्तात प्रवास सुरु झाला, दिनांक १ मार्च १९१० रोजी.
कुणा क्रांतीकारकाच्या अंतस्थ प्रयत्नामुळे की इतर काही कारणामुळे माहीत नाही पण बोट फ्रेंच बंदर मार्सेलिसच्या किनार्‍याकडे वळवण्यात आली. मोठ्या आगबोटी किनार्‍यापासून लांब उभ्या करून किनार्यावर ये-जा लहान बोटीतून केली जाते. मार्सेलीसच्या बंदराजवळ बोट उभी असताना, बोटीवरचा बंदोबस्त अजूनच कडक करण्यात आला. दिनांक ८ जुलै १९१०.

काय असेल त्यावेळची तात्यारावांची मनस्थिती, आताच शेवटची संधी, आता कोणी सहकारी पुढच्या साहसाचा इशारा करील तर अगदी वेडे धाडसही करता येईल. पण आजचा क्षण गमावता कामा नये. तो क्षण समीप येत चालला, आला आला.. गेला.. गेला.. तो क्षण गेला. जहाज हलवण्याची लगबग सुरु झाली. जहाजावर रात्रीपासून प्रस्थानाचे वेध लागले होते, बोट तयारीत होती, कर्मचारी लगबग करत होते. इंग्रज अधिकारी मग्रुरीत होते, सावरकर चिंतेत होते, देश संकटात होता.

रात्र उलटून चालली, सावरकर जागेच होते, सावध होते. विचार करत होते, अंदमानात जाऊन कष्ट करणे हे जर कर्तव्य, तर आमच्या हिंदुस्थानसाठी अवध्य धाडस करून जगाचे लक्ष वेधणे हे पण कर्तव्यच, पुन्हा घडी येईल न येईल. झाला..., निश्चय झाला.., क्षणभर डोळे मिटले. साथीदाराला साद घातली, त्यानही सच्च्या साथीदारासारखी लगेच ओ दिली. मी आहेच तू हो तयार, साथीदार पण अव्वल होता, अशा साथीदाराबरोबर कट करायला तात्यारावांचच काळीज हवं. साथीदार होता साक्षात मृत्यू. त्याला ते सगळ्या आयुश्याच्या प्रवासातच बरोबर घेऊन निघाले होते. आपला रिपू त्यांचा मात्र सखा. मृत्यू आणि मृत्युंजय अनोखी जोडी दाहक, तितकीच शाश्वत.

पहाट होत होती, पहार्‍यावरचे दोन इंग्रज अधिकारी निजले होते, एक जागत होता, संधी साधून सावरकर त्याला म्हणाले. “पहाट झाली आहे शौचास चलावे” तो अधिकारी इतर दोघांना जागे करू लागला. इतर दोघेही उठले, . तिघेही जण तात्यारावांना शौचास घेऊन निघाले. अडचणी वाढत होत्या, धैर्य आणि निश्च्ययही. योजना तयार होत होती.

बोटीवरच्या कैद्यांसाठीच खास बांधवलेल्या संडासाची ती रचना, अरुंद जागा, विलायती शौचकूप, अर्धे दार काचेचे, हो, हो, पारदर्शक काचेचे. आणि त्या दाराबाहेर तीन अधिकारी पहारा देत उभे. तात्यारावांनी दार लावले. क्षण दोन क्षण गेले असतील, विचार झाला. Now or never असे अस्पष्ट शब्द उच्चारले. लंडनहून निघताना विलायती पध्दतीचा पोशाखच अंगावर होता. त्यातला ओव्हरकोट त्या दारावर टाकला, आता थोडा अवधी मिळणार होता. जहाजावर प्रत्येक मजल्यावर दोन्ही बाजूला गोल आकाराच्या हवेसाठी केलेल्या खिडक्या – पोर्टहोल असतात, व्यास अवघा दीड-दोन फुट, कमरेला नेसूचे वस्त्र ठेऊन तात्याराव एका झेपेत पोर्टहोल ला लोंबकळू लागले. अर्धे बाहेरही गेले.... पण तेवढ्यात बाहेरच्या एका अधिकाऱ्याला चाहुल लागली.

त्याने बोंबा ठोकली, तिघांनी मिळून क्षणात काचेचे दार लाथ मारून तोडले, पण सावज निसटले होते. उडी आधीच मारली होती, समोर फ्रांसचा किनारा होता, वारा खारा होता पण न्यारा होता, स्वतंत्र होता, इकडे जहाजावर एकाच गोंधळ, त्या पोर्टहोल मधून इतर कुणाला घुसता येईना. धिप्पाड अधिकारी एकेक. मग गोळ्या सुटू लागल्या, आरडाओरडा, शिव्या यांचा कल्लोळ उडाला. सावरकर मात्र या सगळ्याच्या अपेक्षेतच होते, गोळीबाराने न डगमगता ते वेगाने सरसर अंतर कापू लागले, गोळ्या चुकावण्यासाठी, पाण्याखालून पोहत झपाट्याने किनार्‍याकडे जाऊ लागले.

बोटीवरच्या छोट्या होड्या पाण्यातच होत्या पटापटा उद्या पडल्या, बंदुका रोखल्या, तात्याराव तटापर्यंत आले, ती उंच भींत चढू लागले. किनार्‍यावर काहीजण एव्हाना सावध झाले होते. बावरून इकडेतिकडे पाहू लागले होते तात्याराव ती भिंत चढून धक्क्यावरच्या वाहतुकीच्या रस्त्यावर आले. एक मोकळा श्वास, एक तिक्ष्ण कटाक्ष, स्वतंत्र वारा, नवीन देश,
काय होते त्यांच्याकडे यावेळेला, अंगावर फक्त एक अर्धी विजार आणि पूर्ण दुर्दम्य आत्मशक्ती. एखादा आणा जरी जवळ असता तरी एखाद्या वाहनात उडी मारून मॅजिस्ट्रेट कडे जाता आले असते.

आतापर्यंत तटावरही रान उठले होते, इंग्रज येऊन पोचले होते, स्वातंत्र्यसिंह घेरला जात होता, पारध्यांच्या पिंजर्‍यात. पुढे काय, प्रश्नच नव्हता, सावरकर जाणते होते, तज्ञ होते, बॅरिस्टर होते, आंतरराष्ट्रीय कायाद्यातले जाणकार होते. शोधक नजर फिरू लागली. एखादा तरी फ्रेंच पोलीस शोधू लागली. दिसलाच एक निवांत शिपाइ, त्याच्याकडेच धाव घेतली. मागून ५०-६० जणांचा घोळका मारे बंदुका घेऊन, अधिकारी पोशाखात चालून येत होता. चोर चोर ओरडत, हा आवाज ऐकून काही फ्रेंच लोकही आडवे येत होते, पण सावरकर जीवाच्या आकांताने, सगळ्यांना चकवत त्या शिपायाकडे पळत होते. पोचले, त्याला इंग्रजीत आणि मोडक्या तोडक्या फ्रेंच भाषेत सांगू लागले, मला तुझ्या साहेबाकडे घेऊन चल, कोर्टात घेऊन चल, खटला भर, मी अनधीकृतपणे तुमच्या किनार्‍यावर उतरलो आहे.
पण हाय!, तो शिपाई शेंदाडच निघावा ना. तोच घाबरून गेला. मोठ्या मोठ्या जरीच्या फिती खांद्यावर लावलेले बंदुका घेतलेले अधिकारी सांगतायत हा चोर आहे, आणि एका उघडा-वागडा, धुळीने माखलेला, काळ्या हमालासारखा दिसणारा तरुण म्हणतोय की मला कोर्टात घेऊन चल... कशाला ही नसती ब्याद अंगावर घ्या, म्हणून त्या फ्रेंच शिपायाने तात्यारावांच्या मुसक्या बांधून त्या हरामखोरांच्या ताब्यात दिले हो. आणि कडक इंग्रज पहार्‍यात फ्रेंच किनार्यावरून तात्यारावांना पुन्हा एकदा बळजबरीने ओढत बोटीवर चढवले गेले.

ती रात्र भयाण होती, काळरात्र होती. एका समुद्रातल्या उडीचा अंत पुन्हा नरकातच, एका साहसी प्रयत्नाचा असा अंत, इतकी घोर निराशा, हातातोंडाशी आलेला घास गिळता येऊ नये... खूप कठोर कराव लागतं हृदय अशावेळी. पुन्हा त्या छोट्याश्या केबीनीत, आता पहारा जास्तच कडक,.. कुणाशी बोलायची बंदी. समोर ५-७ अधिकारी समोर नजरेतून आगपाखड करत बसलेले. चवताळलेले, सुडाने, अपमानान पेटलेले... आपापसात देशी शिपायांची चर्चा चाललेली “आज रातको बतलायेगे सालेको”... रात्री जेवणापुर्वीच जहाजाचा तो भाग रिकामा केला गेला, बाकी प्रवाशांना दुसरीकडे हलवले गेले. सावरकरांना कल्पना आली, आजही आपला अमानुष छळ होणार, अत्याचार होणार. पण आज हा धैर्याचा महामेरू प्रक्षुब्ध होता, धगधगता होता. निखार्‍यालाच कुणी जाळू शकेल काय...

तात्याराव झोपेचे सोंग घेऊन वाट बघत होते मारहाणीस केव्हा सुरुवात होते त्याची. शेवटी त्यांच्या मुख्य अधिकारी, त्यांच्याकडे रोखून पाहात त्या खोलीच्या दारात येऊन उभा राहिला. म्हणाला “काय अवलाद आहे” सावरकरांनी डोळे उघडले, त्याच्याकडे रोखून पाहू लागले, अधिकारी म्हणाला “तुला लाज वाटत नाही” काहीच उत्तर नाही तेव्हा आणखी चिडून, जोरात हातवारे करून अंगावर येऊ लागला दोन तीन अश्लील शिव्या देऊन म्हणाला ”मघाशी मी जर तिथे असतो तर तुझ्या .........” हे अपशब्द ऐकताच सावरकर ताडकन उठून बसले, त्याकडे पाहात आपला साखळदंडातला हात हलवत म्हणाले “ अरे मारहाणीची भीती कोणास घालतोस, मेलेल्यास कशाची रे भीती, जेव्हा या कार्यात उडी घेतली तेव्हाच माझ्या सर्वस्वाला आधी आग लावली आणि मग दुसर्‍यांच्या चिता पेटवायला निघालो, तसा मी आत्ताही जीवंतपणी मेलेलाच आहे... तू मात्र नीट विचार कर.., माझ्यासारख्या जीवावर उदार झालेल्याच्या अंगाला हात लावशील तर नाहक प्राणास मुकशील.., बायकामुले आहेत ना तुला.. “

या क्षणिक उद्रेकाने व ह्या दृढनिश्चयी बोलांनी आपले काम केले चोख. हे बोल ऐकल्यावर तो अधिकारी एकदम कळवळून म्हणतो “ मी शिवीबिवी काहीएक देणार नाही तुम्हीही असा काही अविचार करू नये, आतापर्यंत मी तुम्हाला किती सभ्यपणाने वागवले, पण तुम्ही सुटकेचा प्रयत्न करून माझी नोकरीच धोक्यात आणली म्हणून काही अपशब्द माझ्या तोंडून निघाले”

यानंतर मारहाण मावळली, तलवार अदृश्य झाली, शिवीगाळ ऐकू येइना झाली. मात्र पहारा अजूनच कडक झाला, त्या छोट्या केबीन मध्ये सतत २-३ अधिकाऱ्यांच्या सोबतच बसायचे, तिथेच जेवायचे. जेवतानाही हातकडी अर्धीच निघणार, लघवी तिथेच, शौचाला जायचे तरी हातकडीने अधिकार्‍याबरोबर हात बांधूनच.

अशा वातावरणात बोट हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर २२ जुलैच्या सकाळी लागली, पुन्हा मातृभू दिसली पण ती तलवारी बंदुकांच्या नंग्या पहार्‍यात

स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!

गुलमोहर: 

ते म्हणले "स्वराज्य हा माझा जन्मसिध्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"
---- असे लोकमान्य टिळक म्हणाले होते नां?

लोकसत्तामधे प्रकाशित झालेले आणखी एक पत्र.

साळगावकरांचे अजब तर्कट
जयराज साळगावकर यांनी शुक्रवार, २३ जुलैच्या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्सेलिस येथील उडीला सत्यघटनेऐवजी चमत्काराची दंतकथा ठरविताना आपले केवळ ऐतिहासिक अज्ञानच प्रकट केले नसून भूमितीविषयक अज्ञानाचेही प्रदर्शन केले आहे. ‘सा. विवेक’मधील लेखाचा हवाला देत १२ इंच व्यासाच्या खिडकीतून ३२ ते ३४ इंचाचा छातीचा घेर असलेले सावरकर कसे पार होऊ शकतील असा बिनतोड (?) प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हा हिशेब करीत असताना व्यास आणि परीघ यांची आपण गल्लत करीत आहोत याची त्यांना कल्पनाही नसावी. नाहीतर १२ इंचाचा व्यास असलेल्या वर्तुळाचा परीघ सुमारे ३८ इंच होतो व यातून ३२ ते ३६ इंच छातीचा घेर असलेले सावरकर (खांद्याचे वाढलेले माप लक्षात घेऊनही) पार होऊ शकतात. एखाद्या डोंबारी नऊ इंचाच्या कडय़ातून आपले शरीर कसे पार करतो हे ज्यांनी पाहिले आहे त्यांना याच आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सावरकरांच्या समुद्रातील ऐतिहासिक उडीची बातमी त्यावेळच्या ‘इंग्लिशमन’, ‘अ‍ॅडव्होकेट ऑफ इंडिया’, ‘पायोनियर’, ‘डेली न्यूज’ आणि विविध फ्रेंच वृत्तपत्रे यातून प्रकाशित झाली होती. या प्रत्येक वर्तमानपत्रातील हकिकतीत थोडेफार वेगळेपणा होता, म्हणून २६ जुलै १९१० च्या ‘पायोनियर’ वृत्तपत्रात विश्वसनीय मार्गाने मिळालेली माहिती म्हणून जी माहिती प्रकाशित झाली त्यातील पुढील उतारा महत्त्वाचा आहे.
..दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सावरकरांनी प्रातर्विधीला जाण्याची इच्छा व्यक्त केली; पण त्यांना, तासभर थांबा, असे सांगण्यात आले व त्यांनी ते मान्य केले. सकाळी हेरखात्याच्या अधिकाऱ्याने त्यांना शौचकुपाकडे नेले आणि सावरकरांवर नजर ठेवण्याचे काम एका हिंदी शिपायावर सोपविले. इकडे सावरकरांनी दरवाजा लावून घेतला आणि तो आतून पक्का बंदही करून टाकला. दरवाजा बंद झाल्याचे दिसताच दरवाजाच्या वरच्या बाजूला असलेल्या फटीतून पहारेकरी पाहू लागला. पोर्टहोलमधून बाहेर पडण्याचा सावरकरांचा प्रयत्न चालला आहे, असे त्याच्या ध्यानात आले. एकदम हाकाटी न करता, या शिपायाने दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न तर साधला नाहीच; पण तेवढय़ातच दरवाजाची काचेची दोन तावदाने मात्र छिन्नभिन्न झाली. सावरकरांच्या छातीचा परीघ तीन फूट तर पोर्टहोलची गोलाकार खिडकी एक फुटाची. या खिडकीतून बाहेर पडताना त्यांचे शरीर चांगलेच सोलून निघाले. पाण्याशी गाठ पडताच सावरकर झपाटय़ाने पोहू लागले आणि त्यांनी धक्का गाठला. (शिवराम लक्ष्मण करंदीकर लिखित सावरकर चरित्र; पान नं. ३७५, ३७६) आधुनिक बुद्धिवाद्यांना पटो वा ना पटो या सर्व पुराव्यावरून सावरकरांच्या मार्सेलिसच्या उडीचा पराक्रम म्हणजे एक चमत्कार घडला आहे हे स्पष्ट दिसते.
किरण शेलार, कार्यकारी संपादक (सा. विवेक)

या पत्रांमधे महापुरुषांच्या विचारांपेक्षा त्यांच्या संबंधित घटनांना चमत्काराचे स्वरूप देण्यालाच फक्त आक्षेप नोंदवलेला दिसतो. यात काही वावगे नसावे.
संत तुकारामांच्या/संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमुळे/कार्यामुळे ते वंदनीय की वह्या तरणे/सदेह वैकुठगमन, भिंत चालवणे, रेड्याकडून वेद वदविणे अशा चमत्कारिक कथांमुळे ते वंदनीय? या कथा प्रतीकात्मक व काही संदेश देणार्‍या असल्या तरी त्यांशिवायही हे महापुरुष महानच ठरतात की.
सावरकरांनी जहाजातून मारलेली उडी कल्पित असे कुणीच म्हणत नाही, त्यातल्या तपशीलास मसालेदार करण्याची गरज नाही, एवढेच. त्याशिवायही ती उडी ऐतिहासिक महत्त्वाची घटना ठरतेच.

खरं आहे... सावरकर अशा अनेक ऊड्या मारून पुढे गेले आणि त्यांच्या कुठल्याही ऊडीचा परीघ हा कुठल्याही मोजमापांच्या पलिकडला आहे.
तात्पर्यः पुढे चला.

>>ते म्हणले "स्वराज्य हा माझा जन्मसिध्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"
---- असे लोकमान्य टिळक म्हणाले होते नां?
अर्थातच काय विचारणं झालं. Happy मी "ते" हे सर्व देशभक्तांना/स्वातंत्र्यसंग्रामींन्ना उद्देशून वापरलं होतं.

Pages