मार्सेलीसच्या ऐतिहासिक उडीची आज शताब्दीपुर्ती - विशेष लेख - तेजोनिधी सावरकर

Submitted by अर्धवट on 8 July, 2010 - 06:08

तात्यारावांना पॅरीसाहून परत येताना लंडनच्या स्टेशनात शिरताच अटक झाली. काही दिवस त्यांना कच्चे कैदी म्हणून ठेवले गेले. न्यायालयाकडे त्यांचे वकील रेजिनाल्ड व्होगन यांनी केलेल्या सर्व अर्ज-विनंत्या फेटाळून लावत, सावरकरांना हिंदुस्थानात परत पाठवण्यात यावे आणि त्यांच्यावरील सुनावणी तिकडेच व्हावी असा निकाल लंडनच्या न्यायालयाने दिला.

सावरकरांना लंडनच्या कारागृहातून पळवून नेण्याचे १-२ प्रयत्न झाले पण ते फार यशस्वी झाले नाहीत. कदाचित ह्या प्रयत्नांची कुणकुण लागल्यामुळेच, त्यांच्या हिंदुस्थानात प्रयाणाचा मार्ग व वेळ अत्यंत गुप्त ठेवली होती. इंग्रज सरकारला सावरकरांना बोटीवरून पळवण्याचा प्रयत्न होऊ शकेल ह्याची पूर्ण कल्पना होती. वास्तविक नेहेमीचा हिदुस्थानात यायचा मार्ग होता इंग्लिश खाडीतून फ्रान्समार्गे, पण इतका स्फोटक दारुगोळा जहाजावर असताना, कुठल्याही परदेशी किनार्‍याला न लागता हिंदुस्थान गाठायचे ठरले आणि जहाज बिस्केच्या आखातातून हाकण्यात आले.

हिंदुस्थानच्या किनार्‍याला लागण्यापूर्वी एक अंतीम प्रयत्न करण्याचे तात्यारावांच्याही मनात घाटात होतेच. मोठ्या मोठ्या नावाजलेल्या इंग्रज पोलीस अधिकार्‍यांसमवेत आणि कडेकोट बंदोबस्तात प्रवास सुरु झाला, दिनांक १ मार्च १९१० रोजी.
कुणा क्रांतीकारकाच्या अंतस्थ प्रयत्नामुळे की इतर काही कारणामुळे माहीत नाही पण बोट फ्रेंच बंदर मार्सेलिसच्या किनार्‍याकडे वळवण्यात आली. मोठ्या आगबोटी किनार्‍यापासून लांब उभ्या करून किनार्यावर ये-जा लहान बोटीतून केली जाते. मार्सेलीसच्या बंदराजवळ बोट उभी असताना, बोटीवरचा बंदोबस्त अजूनच कडक करण्यात आला. दिनांक ८ जुलै १९१०.

काय असेल त्यावेळची तात्यारावांची मनस्थिती, आताच शेवटची संधी, आता कोणी सहकारी पुढच्या साहसाचा इशारा करील तर अगदी वेडे धाडसही करता येईल. पण आजचा क्षण गमावता कामा नये. तो क्षण समीप येत चालला, आला आला.. गेला.. गेला.. तो क्षण गेला. जहाज हलवण्याची लगबग सुरु झाली. जहाजावर रात्रीपासून प्रस्थानाचे वेध लागले होते, बोट तयारीत होती, कर्मचारी लगबग करत होते. इंग्रज अधिकारी मग्रुरीत होते, सावरकर चिंतेत होते, देश संकटात होता.

रात्र उलटून चालली, सावरकर जागेच होते, सावध होते. विचार करत होते, अंदमानात जाऊन कष्ट करणे हे जर कर्तव्य, तर आमच्या हिंदुस्थानसाठी अवध्य धाडस करून जगाचे लक्ष वेधणे हे पण कर्तव्यच, पुन्हा घडी येईल न येईल. झाला..., निश्चय झाला.., क्षणभर डोळे मिटले. साथीदाराला साद घातली, त्यानही सच्च्या साथीदारासारखी लगेच ओ दिली. मी आहेच तू हो तयार, साथीदार पण अव्वल होता, अशा साथीदाराबरोबर कट करायला तात्यारावांचच काळीज हवं. साथीदार होता साक्षात मृत्यू. त्याला ते सगळ्या आयुश्याच्या प्रवासातच बरोबर घेऊन निघाले होते. आपला रिपू त्यांचा मात्र सखा. मृत्यू आणि मृत्युंजय अनोखी जोडी दाहक, तितकीच शाश्वत.

पहाट होत होती, पहार्‍यावरचे दोन इंग्रज अधिकारी निजले होते, एक जागत होता, संधी साधून सावरकर त्याला म्हणाले. “पहाट झाली आहे शौचास चलावे” तो अधिकारी इतर दोघांना जागे करू लागला. इतर दोघेही उठले, . तिघेही जण तात्यारावांना शौचास घेऊन निघाले. अडचणी वाढत होत्या, धैर्य आणि निश्च्ययही. योजना तयार होत होती.

बोटीवरच्या कैद्यांसाठीच खास बांधवलेल्या संडासाची ती रचना, अरुंद जागा, विलायती शौचकूप, अर्धे दार काचेचे, हो, हो, पारदर्शक काचेचे. आणि त्या दाराबाहेर तीन अधिकारी पहारा देत उभे. तात्यारावांनी दार लावले. क्षण दोन क्षण गेले असतील, विचार झाला. Now or never असे अस्पष्ट शब्द उच्चारले. लंडनहून निघताना विलायती पध्दतीचा पोशाखच अंगावर होता. त्यातला ओव्हरकोट त्या दारावर टाकला, आता थोडा अवधी मिळणार होता. जहाजावर प्रत्येक मजल्यावर दोन्ही बाजूला गोल आकाराच्या हवेसाठी केलेल्या खिडक्या – पोर्टहोल असतात, व्यास अवघा दीड-दोन फुट, कमरेला नेसूचे वस्त्र ठेऊन तात्याराव एका झेपेत पोर्टहोल ला लोंबकळू लागले. अर्धे बाहेरही गेले.... पण तेवढ्यात बाहेरच्या एका अधिकाऱ्याला चाहुल लागली.

त्याने बोंबा ठोकली, तिघांनी मिळून क्षणात काचेचे दार लाथ मारून तोडले, पण सावज निसटले होते. उडी आधीच मारली होती, समोर फ्रांसचा किनारा होता, वारा खारा होता पण न्यारा होता, स्वतंत्र होता, इकडे जहाजावर एकाच गोंधळ, त्या पोर्टहोल मधून इतर कुणाला घुसता येईना. धिप्पाड अधिकारी एकेक. मग गोळ्या सुटू लागल्या, आरडाओरडा, शिव्या यांचा कल्लोळ उडाला. सावरकर मात्र या सगळ्याच्या अपेक्षेतच होते, गोळीबाराने न डगमगता ते वेगाने सरसर अंतर कापू लागले, गोळ्या चुकावण्यासाठी, पाण्याखालून पोहत झपाट्याने किनार्‍याकडे जाऊ लागले.

बोटीवरच्या छोट्या होड्या पाण्यातच होत्या पटापटा उद्या पडल्या, बंदुका रोखल्या, तात्याराव तटापर्यंत आले, ती उंच भींत चढू लागले. किनार्‍यावर काहीजण एव्हाना सावध झाले होते. बावरून इकडेतिकडे पाहू लागले होते तात्याराव ती भिंत चढून धक्क्यावरच्या वाहतुकीच्या रस्त्यावर आले. एक मोकळा श्वास, एक तिक्ष्ण कटाक्ष, स्वतंत्र वारा, नवीन देश,
काय होते त्यांच्याकडे यावेळेला, अंगावर फक्त एक अर्धी विजार आणि पूर्ण दुर्दम्य आत्मशक्ती. एखादा आणा जरी जवळ असता तरी एखाद्या वाहनात उडी मारून मॅजिस्ट्रेट कडे जाता आले असते.

आतापर्यंत तटावरही रान उठले होते, इंग्रज येऊन पोचले होते, स्वातंत्र्यसिंह घेरला जात होता, पारध्यांच्या पिंजर्‍यात. पुढे काय, प्रश्नच नव्हता, सावरकर जाणते होते, तज्ञ होते, बॅरिस्टर होते, आंतरराष्ट्रीय कायाद्यातले जाणकार होते. शोधक नजर फिरू लागली. एखादा तरी फ्रेंच पोलीस शोधू लागली. दिसलाच एक निवांत शिपाइ, त्याच्याकडेच धाव घेतली. मागून ५०-६० जणांचा घोळका मारे बंदुका घेऊन, अधिकारी पोशाखात चालून येत होता. चोर चोर ओरडत, हा आवाज ऐकून काही फ्रेंच लोकही आडवे येत होते, पण सावरकर जीवाच्या आकांताने, सगळ्यांना चकवत त्या शिपायाकडे पळत होते. पोचले, त्याला इंग्रजीत आणि मोडक्या तोडक्या फ्रेंच भाषेत सांगू लागले, मला तुझ्या साहेबाकडे घेऊन चल, कोर्टात घेऊन चल, खटला भर, मी अनधीकृतपणे तुमच्या किनार्‍यावर उतरलो आहे.
पण हाय!, तो शिपाई शेंदाडच निघावा ना. तोच घाबरून गेला. मोठ्या मोठ्या जरीच्या फिती खांद्यावर लावलेले बंदुका घेतलेले अधिकारी सांगतायत हा चोर आहे, आणि एका उघडा-वागडा, धुळीने माखलेला, काळ्या हमालासारखा दिसणारा तरुण म्हणतोय की मला कोर्टात घेऊन चल... कशाला ही नसती ब्याद अंगावर घ्या, म्हणून त्या फ्रेंच शिपायाने तात्यारावांच्या मुसक्या बांधून त्या हरामखोरांच्या ताब्यात दिले हो. आणि कडक इंग्रज पहार्‍यात फ्रेंच किनार्यावरून तात्यारावांना पुन्हा एकदा बळजबरीने ओढत बोटीवर चढवले गेले.

ती रात्र भयाण होती, काळरात्र होती. एका समुद्रातल्या उडीचा अंत पुन्हा नरकातच, एका साहसी प्रयत्नाचा असा अंत, इतकी घोर निराशा, हातातोंडाशी आलेला घास गिळता येऊ नये... खूप कठोर कराव लागतं हृदय अशावेळी. पुन्हा त्या छोट्याश्या केबीनीत, आता पहारा जास्तच कडक,.. कुणाशी बोलायची बंदी. समोर ५-७ अधिकारी समोर नजरेतून आगपाखड करत बसलेले. चवताळलेले, सुडाने, अपमानान पेटलेले... आपापसात देशी शिपायांची चर्चा चाललेली “आज रातको बतलायेगे सालेको”... रात्री जेवणापुर्वीच जहाजाचा तो भाग रिकामा केला गेला, बाकी प्रवाशांना दुसरीकडे हलवले गेले. सावरकरांना कल्पना आली, आजही आपला अमानुष छळ होणार, अत्याचार होणार. पण आज हा धैर्याचा महामेरू प्रक्षुब्ध होता, धगधगता होता. निखार्‍यालाच कुणी जाळू शकेल काय...

तात्याराव झोपेचे सोंग घेऊन वाट बघत होते मारहाणीस केव्हा सुरुवात होते त्याची. शेवटी त्यांच्या मुख्य अधिकारी, त्यांच्याकडे रोखून पाहात त्या खोलीच्या दारात येऊन उभा राहिला. म्हणाला “काय अवलाद आहे” सावरकरांनी डोळे उघडले, त्याच्याकडे रोखून पाहू लागले, अधिकारी म्हणाला “तुला लाज वाटत नाही” काहीच उत्तर नाही तेव्हा आणखी चिडून, जोरात हातवारे करून अंगावर येऊ लागला दोन तीन अश्लील शिव्या देऊन म्हणाला ”मघाशी मी जर तिथे असतो तर तुझ्या .........” हे अपशब्द ऐकताच सावरकर ताडकन उठून बसले, त्याकडे पाहात आपला साखळदंडातला हात हलवत म्हणाले “ अरे मारहाणीची भीती कोणास घालतोस, मेलेल्यास कशाची रे भीती, जेव्हा या कार्यात उडी घेतली तेव्हाच माझ्या सर्वस्वाला आधी आग लावली आणि मग दुसर्‍यांच्या चिता पेटवायला निघालो, तसा मी आत्ताही जीवंतपणी मेलेलाच आहे... तू मात्र नीट विचार कर.., माझ्यासारख्या जीवावर उदार झालेल्याच्या अंगाला हात लावशील तर नाहक प्राणास मुकशील.., बायकामुले आहेत ना तुला.. “

या क्षणिक उद्रेकाने व ह्या दृढनिश्चयी बोलांनी आपले काम केले चोख. हे बोल ऐकल्यावर तो अधिकारी एकदम कळवळून म्हणतो “ मी शिवीबिवी काहीएक देणार नाही तुम्हीही असा काही अविचार करू नये, आतापर्यंत मी तुम्हाला किती सभ्यपणाने वागवले, पण तुम्ही सुटकेचा प्रयत्न करून माझी नोकरीच धोक्यात आणली म्हणून काही अपशब्द माझ्या तोंडून निघाले”

यानंतर मारहाण मावळली, तलवार अदृश्य झाली, शिवीगाळ ऐकू येइना झाली. मात्र पहारा अजूनच कडक झाला, त्या छोट्या केबीन मध्ये सतत २-३ अधिकाऱ्यांच्या सोबतच बसायचे, तिथेच जेवायचे. जेवतानाही हातकडी अर्धीच निघणार, लघवी तिथेच, शौचाला जायचे तरी हातकडीने अधिकार्‍याबरोबर हात बांधूनच.

अशा वातावरणात बोट हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर २२ जुलैच्या सकाळी लागली, पुन्हा मातृभू दिसली पण ती तलवारी बंदुकांच्या नंग्या पहार्‍यात

स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!

गुलमोहर: 

छान लिहिले आहे. समुद्रात उडी मारुन पोहणे वगैरे खरोखर धैर्याचे काम आहे.
एकंदरित किती अंतर ते समुद्रात पोहले?

<<ह्म.. हॅटस ऑफ टू हिज करेज!>>
अहो, ह्याच सावरकरांनी नंतर परभाषेतले शब्द काढून आपल्या भाषेतले शब्द रोजच्या जीवनात रूढ करण्यासाठी प्रयत्न केले, आणि मायबोली हे मराठी संकेतस्थळ असताना आणि वरील सर्व शब्दांना पर्यायी मराठी शब्द सहज उपलब्ध असताना ही अशी प्रतिक्रिया लिहीणे म्हणजे कमाल आहे खरंच!

>>एखाद्या देशाच्या स्वाभिमानी राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्य मिळताच जाब विचारला असता ह्या घटनेचा फ्रांस सरकारला. पण जिथे सुभाष बाबूंना मिळताक्षणी ब्रिटीश सरकारच्या हवाली करण्याची वचने आमच्या नतद्रष्ट राज्यकर्त्यांनी दिली तिथे असल्या "भानगडी" कोण करणार?

स्वातंत्र्यसूर्य तात्यारावांना त्रिवार अभिवादन!
स्वातंत्र्यलक्ष्मी कि जय! भारत माता कि जय!

१००% सहमत. अगदी मनातले बोललात.

सावरकर, सुभाषचंद्र बोस, वगैरेंचा अनुयय न करता....आगाखान पॅलेस मध्ये आरामात लोडाला टेकून 'नजरकैदेत' सुतकताई करणार्‍यांच्या मागे देश गेला हे आपलं दुर्दैव.

"सावरकर, सुभाषचंद्र बोस, वगैरेंचा अनुयय न करता....आगाखान पॅलेस मध्ये आरामात लोडाला टेकून 'नजरकैदेत' सुतकताई करणार्‍यांच्या मागे देश गेला हे आपलं दुर्दैव."
ज्यांना हे दुर्दैव वाटते अशांसाठी अभिनव भारत अजूनही कार्यरत आहे.
या विधानाशी स्वतः सावरकर आणि सुभाषचंद्र बोस सहमत असतील का याची शंका आहे. सावरकरांचे मोठेपण सांगताना गांधी का खुपावेत हे अगम्य आहे.
गांधींनी बहुसंख्य भारतीय जनतेला स्वातंत्र्यसंग्रामात येण्यास उद्युक्त केले ते सावरकर, सुभाषचंद्र बोस यांच्या मार्गाने होणे शक्य नव्हते. गांधींनी नजरकैदेत लोडाला टेकून नुसतीच सुतकताई केली असती तर सगळा देश त्यांच्या मागे आला असता का? कोणत्याही सत्याग्रहात ते स्वतः सामील झाले नाहीत, असा याच अर्थ होतो. शस्त्राच्या सामर्थ्यापेक्षा मनाचे सामर्थ्य मोठे हेच गांधींनी दाखवून दिले.
"आगाखान पॅलेस मध्ये आरामात लोडाला टेकून 'नजरकैदेत' सुतकताई करणार्‍यांच्या मागे देश गेला हे आपलं दुर्दैव." : हेच विधान आजच्या एका नेत्याला , की ज्याने आतापर्यंत रस्त्यावर उतरून कोणत्याही आंदोलनात भाग घेतल्याचे ऐकण्यात आलेले नाही, पण त्यांचे अनुयायी मात्र त्यांच्या शब्दाखातर मार द्यायला व खायला सज्ज असतात, जास्त लागू होते असे म्हटले तर चालेल का?

सावरकरांच्या आयुष्याचा उत्तरार्ध हिंदू धर्मातील सुधारणांवर विचार आणि कृती करण्यात गेला. सावरकरप्रेमी म्हणवणार्‍यातले किती जण त्या सुधारणा स्वीकारतात? सावरकरांचे नाव घेतले की अखंड भारताच्या स्वप्नाबद्दल हळहळत राहण्यापलीकडे काय केले जाते? सावरकरांचे विचार किती विज्ञाननिष्ठ आणि व्यवहारी (प्रॅक्टिकल) होते याचा हा दाखला :
http://www.savarkar.org/en/rationalism/cow-protection-and-cow-worship
"सावरकरांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध सशस्त्र लढा दिला परंतु ते ब्रिटिश लोकांचा द्वेष करीत नसत. इंग्रजांची शिस्त, इतिहास जपून ठेवण्याची वृत्ती इत्यादी अनेक गुणांचे ते चाहते होते. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त करताना त्यांनी राजकीय प्रतिस्पर्धी म्हणजे वैरी नव्हे हे स्पष्टपणे नोंदवले आहे. पाकिस्तान निर्मितीला त्यांनी प्राणपणाने विरोध केला, इस्लामच्या विचारसरणीवरही कठोर टीका केली पण प्रेषित मोहंमदांचे नातू हुसेन यांचा करबलातील युद्धात झालेला मृत्यू वर्णन करताना त्यांची लेखणी अत्यंत हळवी व मृदू झालेली दिसते. मुसलमानांचा अनुनय, विज्ञानयुग व यंत्राला विरोध, आत्यंतिक अहिंसा इत्यादीसंदर्भात त्यांनी गांधीजींवर टीकेचे प्रहार केले. पण देशासाठी गांधीजींनी केलेल्या कार्याचे श्रेयही त्यांना मुक्तकंठाने दिले. हिंदु महासभेचे नेते असतानाही ते आपल्या कार्यकर्त्यांना सर्व राजकीय पक्षांचे धोरण समजावून घेण्याचा आणि त्यानंतरच आपले मत बनवण्याचा आग्रह करत असत." हे http://www.savarkar.org/mr/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AA... इथून घेतले आहे.

भरतसेठ.. सहमत.. अगदी हेच म्हणणार होतो..
तात्याराव, सुभाषबाबु हे मोठे होतेच.. त्याला बाकीच्या फुट्पट्ट्या कशाला..

वानगीदाखल एक उदाहरण लिहीतो.

"संकटातुन सोडवल्याबद्दल जर सत्यनारायण घालत असु तर त्याच सत्यानारायणाने आधी संकटात पाडलेच का याबद्दल त्याची जोड्याने पुजा करायला नको का?"

हे वाक्य तात्यारावांच आहे. आत्ताच्या किती तथाकथीत हिन्दुत्ववादी लोकांना हे झेपेल.?

>>ज्यांना हे दुर्दैव वाटते अशांसाठी अभिनव भारत अजूनही कार्यरत आहे.
फक्त ह्या वाक्यावर तीव्र आक्षेप नोंदवतो. तात्यारावांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांच्या अभिनव भारतचा जाहीर विसर्जन सोहळा स्वहस्ते केला होता.
तुम्ही उल्लेखलेल्या संघटनेचे नाव तेच असेल कदाचीत, पण..

ह्याला एक दुसरी बाजु पण आहे.. स्वातंत्र्यानंतर कॉग्रेससरकार ने त्यांच्या केलेल्या छळाची... १५ ऑगस्ट १९५० साली सावरकर सदन वर तिरंगा फडकवण्याची परवानगी काढावी लागली होती तात्यारावांना सरकारकडुन. हा एक उल्लेख पुरे झाला इथे.

"स्वातंत्र्यवीर" सावरकरांनी अभिनव भारताचे विसर्जन केले होते. त्या नावाने आज कार्यरत असणार्‍यांचा मुळच्या विसर्जीत केलेल्या संघटनेशी काही संबंध नाही आहे.

"ज्यांना हे दुर्दैव वाटते अशांसाठी अभिनव भारत अजूनही कार्यरत आहे.
फक्त ह्या वाक्यावर तीव्र आक्षेप नोंदवतो. तात्यारावांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांच्या अभिनव भारतचा जाहीर विसर्जन सोहळा स्वहस्ते केला होता.
तुम्ही उल्लेखलेल्या संघटनेचे नाव तेच असेल कदाचीत, पण..

"स्वातंत्र्यवीर" सावरकरांनी अभिनव भारताचे विसर्जन केले होते. त्या नावाने आज कार्यरत असणार्‍यांचा मुळच्या विसर्जीत केलेल्या संघटनेशी काही संबंध नाही आहे."

बरे. नव्या युगातील नव्या मनुच्या नव्या सावरकरांनी काढलेली अभिनव भारत.

हा दुवा डकवावासा वाटला इथे..

थेट फ्रान्सच्या त्याच किनार्‍यावर १०० वर्षानंतर या ऐतिहासिक प्रसंगाचा गौरवसमारंभ रंगला..

http://72.78.249.107/esakal/20100710/5625339008938543091.htm

अर्धवट, छान लिहिलय.

सावरकर हे नुसते हिंदुत्ववादी नव्हते, तर ते डोळस हिंदुत्ववादी होते. रत्नागिरीमधे त्यानी पतितपावन मंदिराची उभारणी केली, या मंदिरात सर्व जातीधर्माच्या लोकाना मुक्त प्रवेश आहे. हिंदू धर्मातील चुकीच्या रूढी काढून टाकण्यासाठी त्यानी खूप कार्य केलेले आहे.

नंदिनी, अनुमोदन

>>बरे. नव्या युगातील नव्या मनुच्या नव्या सावरकरांनी काढलेली अभिनव भारत smiley_laughing_01.gif

भरत, इथे मनूचा काय संबंध Uhoh

बरे. नव्या युगातील नव्या मनुच्या नव्या सावरकरांनी काढलेली अभिनव भारत.

>>> भरत. तुमच्या या वाक्यावर देखील आक्षेप. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट लिहा!!! मुळात तुम्ही "मनू" आणि सावरकर हा संबंध कसा जोडला आहे ते नीट लिहा. अन्यथा वाक्य चुकीचे आहे म्हणून डीलीट करा.

उगाच कुणीही उठावे, आणि सावरकर म्हटले की हिंदू धर्माविषयी(च) बोलणे सुरू करावे!!!!!

मी कालच योगी यांनी दिलेल्या लिंक वर स्वातंत्र्यवीरांचे ने मजसी ने पुन्हा एकले... आजही अंगावर शहारे येणारे महाकाव्य.

नव्या युगातील नव्या मनुच्या नव्या सावरकरांनी काढलेली अभिनव भारत.

मंडळींनी केशवसुतांच्या नवा शिपाई या कवितेबद्दल ऐकलेले दिसत नाही.
त्या ओळी स्मरणातून लिहिल्या होत्या, आता मूळ कविता शोधून देत आहे.
नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे
कोण मला वठणीला आणु शकतो ते मी पाहे.

इथे मनू=The proper period or season; the time, the day, the hour

च च च च च

सावरकरांना हिंदू धर्मात ज्या सुधारणा अपेक्षित होत्या त्या पुढे नेण्यासाठी कोणी नसावे, उलट उलट दिशेने पावले टाकणार्‍यांच्या मागे हिंदू समाजाने जावे हे आपले आणि सावरकरांचेही दुर्दैव.

च च च च च

सावरकरांना हिंदू धर्मात ज्या सुधारणा अपेक्षित होत्या त्या पुढे नेण्यासाठी कोणी नसावे, उलट उलट दिशेने पावले टाकणार्‍यांच्या मागे हिंदू समाजाने जावे हे आपले आणि सावरकरांचेही दुर्दैव.
---- हे कटू सत्य आहे.... Sad

क्रांतिकारक सावरकरांना विसरलात तर चालेल पण समाज सुधारक सावरकरांना विसरु नका असे त्यांनीच लिहून ठेवले आहे.

अप्रतीम !

आज १०० वर्शान्नी देखील सावरकर ह्या तेजाची झळ जाणवते.
त्यान्च्याविशयी आदर असणारे इतके सारे एकेठिकाणी सापडले. बरे वाटले.

सन्जीव

ही इमेल एका मित्राने पाठवली आहे. हे असेच घडले असे खात्रीने सांगाणार्‍याची ही इमेल नाही. अनेक ठिकाणाहुन पुढे पुढे येत ही इमेल माझ्यापर्यत पोहोचली आहे.

__________________________________

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो!’ छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’! ‘वंदे मातरम् ’ अशा दीड-दोनशे कंठातून उठलेल्या सावरकर भक्तांच्या आरोळ्यांनी ‘पॅले डि फॅरो चा परीसर ८ जुलै २०१० च्या प्रसन्न सकाळी दुमदुमून गेला! जुन्या ‘मार्से’ बंदराच्या दिपगृहासमोर (ह्या दिपगृहामुळे मार्सेच्या ह्या भागात फॅरो अस नाव पडलं) ‘पॅले डि फॅरो’ च्या उंच टेकडीवरील हिरव्या मखमली सारख्या पसरलेल्या हिरवळीवर ‘सावरकर अभिवादन यात्रेतील ‘भारत, फ्रान्स, इंग्लंड व कॅनडा येथील दोन-अडीचशे यात्रेकरू, वारकरी शुचिर्भूत होऊन क्रांती-भास्कर सावरकरांना मानाचा मुजरा अर्पण करण्यास, आपला पराकोटीचा आदर व्यक्त करण्यास सोनेरी सकाळी जमले होते. आपल्या खास ठेवणीतील भारतीय पोशाखात! दोन पुणेरी पगड्या आणि काही करवत काठी रेशमी अविरत झळाळत होती. मार्सेला कदाचित इतक्या दिमाखदार, रूबाबदार भारतीय पोशाखांच, साड्यांच प्रथमच ईतक्या घाऊक प्रमाणावर दर्शन होत असेल! सहाजिकच जाणारी येणारी फ्रेंच मंडळी मोठ्या औत्सुक्याने आमच्याकडे बघत होती!
जगतात आहेत बहादुर दोन
जे गेले सागरास ओलांडून
हनुमानानंतर आहे या विनायकाचा मान!

प्रत्येकाच्या मनांत ह्या उक्तिंच्या लाटांवर लाटा उसळत होत्या. स्वातंत्र्यवीरांच्या अतुलनीय धैर्याविषयी अमोघ धाडसाविषयी प्रत्येक यात्रेकरुची छाती अगदी गर्वाने फुलली होती. प्रत्येक जण अत्यंत उत्कंठतेने समोरच्या बंदराकडे, बंदराच्या धक्याकडे बघत होता. विचार करत होता. आज बरोबर १०० वर्षांपूर्वी ह्याच वेळेस तात्यारावांनी SS Morea ह्या बोटीच्या ‘पोर्ट होल’ मधून पराकाष्ठेच्या हिमतीने सूर मारून रक्ताळलेल्या अंगाने झपाझप पाणी कापत, इंग्रज शिपायांच्या गोळ्या चुकवत किनारा गाठला. धक्यावरच्या साखळीस धरून फ्रेंच शिपायाकडे जीवाच्या आकांताने धाव घेतली! जगातील महान धाडसांपैकी एक असलेल्या ह्या धाडसाचा आज शताब्दी वर्धापनदिन होता. ज्या उडीने त्रिखंड हादरवून सोडले. ज्या उडीमुळे तत्कालीन फ्रेंच पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. ज्या उडीने इंग्रंजांची कपटनिती जगापुढे आणली आणि ज्या उडीने ‘द हेग’ येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फ्रेंच भूमीवर इंग्रज शिपायांनी फ्रेच शिपायास लाच देऊन क्रांतीसूर्यास अटक केली त्याचा धिक्कार केला. त्या घटनेचा उदो उदो करण्यासाठी आम्ही मोठ्या उत्साहाने, सावरकर भक्तिने, राष्ट्रप्रेमाने ओथंबत जमलो होतो.

अत्यंत रेखीवपणे कापलेल्या हिरव्यागार हिरवळीवर, भविष्यात मार्से मध्ये 'सावरकर-स्तंभ' उभारला जाईल ह्या दुर्दम्य आशेतून साकार झालेल्या स्तंभाचा नमूना मॉडेल - ठेवला होता. त्यावर सर्वश्रेष्ठ क्रांतीकारक सावरकरांची प्रतिमा विराजमान झाली होती. सावरकर अभिवादन यात्रेचे अध्वर्यु विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर ह्यांनी सावरकरांच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन केले आणि सावरकरांच्या न भूतो न भविष्यती अशा उडीचं, चरित्राचं, राष्ट्रभक्तीचं, हिंदुत्वाचं आपल्या ओघवत्या वाणीने ज्ञानामृत सर्व यात्रेकरुंना पाजलं. अगदी तृप्त होईपर्यंत. पार्ल्याच्या सावरकर सेवा संघाचे रमेश प्रभु व सुरेश बर्वे ह्यांनीही आपलं स्वातंत्र्यविरांच्या धगधगत्या चरित्राविषयीचं यथोचित मनोगत व्यक्त केलं.

१९९८ साली मार्सेच्या महापौरांनी, जे आजही महापौर आहेत, सुरेशराव बर्व्यांच्या तिर्थरुपांना, त्यांच्या अथक प्रयत्नांना प्रतिसाद देऊन मार्सेमध्ये सावरकर स्मारक उभारण्यास परवानगी दिली. त्यासाठी जागाही देण्याची तयारी दाखवली. परंतु तात्यारावांचा एकूण राष्ट्रव्यापी जबरदस्त आवाका पाहून भारतीय शासन व फ्रेंच शासन ह्यांचा स्मारक उभारणीत वाटा असावा ही अट घातली!

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात, अगदी आजपर्यंत दिल्लीतील शासनाने व मुंबईतील शासनाने जणु काही प्रतिज्ञापूर्वक सावरकरांची फक्त अवहेलना केली आहे. आकसाने सावरकरांना फक्त छळलं आहे. वास्तविकता पहाता स्वातंत्र्यलढ्यातील कॉंग्रेसचा त्याग तराजुच्या एका पारड्यात आणि स्वातंत्र्यवीरांचा सावरकर कुटूंबाचा त्याग एका पारड्यात घातला तर सावरकरांचे पारडे सदैव जड आहे, राहील हे माहीत असूनसुद्धा दिल्लीश्वार कॉंग्रेस श्रेष्ठी आणि त्यांची मुंबईतील प्यादी ह्यांनी जाणीवपूर्वक सावरकरांना धिक्कारलं आहे. ह्याच सावरकरांना ना सोयर होतं ना सुतक.

पण दिल्ली आणि मुंबई शासनाच्या ह्या मानसिकतेचे परत एकदा प्रत्यंतर आले. दोन गोष्टींतून! पहिली गोष्ट म्हणजे सावरकर स्मारकात भारतीय आणि मुंबई शासनाने जरासुद्धा रस घेतला नाही, किंबहुना हे स्मारक ऊभं राहू नये असंच त्यांचं वागणं अगदी आजपर्यंत आहे! दुसरी गोष्ट म्हणजे फ्रान्समधील भारताच्या राजदुतांना, दुतावासास आमंत्रण देऊनही त्यांनी समारंभांत सहभागी होण्यास पूर्णपणे नकार दिला! बिचारे भारतीय राजदूत तरी काय करणार? त्यांच्या बोलविल्या धन्याविरुद्ध वागले तर नोकरी जाईल हि भिती त्यांनाही आहेना! अहो पोटाची काळजी. भिती सगळ्यांनाच असते, मग फ्रान्समधील भारतीय राजदूत कसे अपवाद असतील? आशा आहे एक दिवस मार्सेच्या समुद्रकिनार्यासवर धक्यावर स्वातंत्र्यवीरांचं यथोचित, भव्य, दिव्य स्मारक उभं राहील!

प्रातः अंतःकरणास हलवणार्यार समारंभाच्या शेवटी सौ. अपर्णा अभ्यंकर ह्यांनी सर्व वारकर्यांिना प्रतिज्ञा घ्यावयास लावली. सर्व सावरकर भक्त ही खड्या आवाजात म्हणाले,
‘‘मी, सावरकर अभिवादन यात्रेत सहभागी झालेला स्वतंत्र भारताचा सुजाण नागरीक प्रतिज्ञा करतो की मी, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सदैव आदर करेन. त्यांचे धैर्य, धाडस, तळमळ, उत्साह, हिंदु धर्माचा अभिमान, मराठी भाषेचे प्रेम, आत्मसन्मान, कवित्व, वक्तृत्व या त्यांच्या सद्गुणांचे मी सदैव स्मरण करेन. आज दि. ८ जुलै २०१० ह्या पावन दिनी स्वातंत्र्यवीरांनी मार्सेच्या किनार्या वर ‘मोरीया’ जलयानातून सुटकेसाठी सागरात जी त्रिखंडांत गाजलेली उडी मारली त्याला १०० वर्षे होत आहेत. या ऐतिहासिक क्षणी फ्रान्समध्ये येऊन मार्सेच्या किनार्या वर स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करताना माझे मन राष्ट्रप्रेमाने भरून गेले आहे. मी हा ऐतिहासिक क्षण मनामध्ये सदैव जपेन आणि पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित करेन. देव, देश आणि धर्म यांचे पावित्र्य जपण्याचा मी नित्य प्रयत्न करेन.’

हि प्रतिज्ञा प्रत्येक जण घेत असताना, प्रतिज्ञा ऐकण्यासाठी जणू काही काळ सुद्धा थांबला होता! प्रतिज्ञेनंतर ‘पॅले डि फॅरो’ वर अंतर्मूख करणारी चिरशांतता काही क्षण पसरली आणि नंतर

'स्वातंत्र्यवीर सावरकर की जय'
'भारतमाता की जय, वंदेमातरम'
ह्या मुक्तकंठातून निघालेल्या आरोळ्यांनी मार्से बंदराचा आसमंत दुमदूमून गेला! समारंभाची सांगता संपूर्ण वंदेमातरम ह्या प्रार्थनेने, राष्ट्रगीताने झाली! ‘सावरकर अभिवादन यात्रेची’ संकल्पना आणि संयोजन गुरुदेव अभ्यंकरांच्या आदित्य प्रतिष्ठान, पार्ल्याची सावरकर सेवा समिती आणि अभिजित पाटिलच्या, मुंबईच्या ‘राजा राणी ट्रॅव्हल्स, ह्यांचं होतं. ह्या तिनही संस्थांनी अथक परिश्रमाने अभिनव ‘सावरकर अभिवादन यात्रा’ अत्यंत देखणेपणाने, मनोरंजकतेने सार्थपणे संपन्न केली.

‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला! हे राष्ट्रभक्तिने, करुणेने ओथंबलेल अजरामर गीत सावरकरांना स्फुरलं इंग्लडमधील विख्यात ‘ब्रायटन’ च्या समुद्रकिनार्याेवर. त्यामुळे अभिवादन यात्रेची सुरुवात ब्रायटन पासून सुरु झाली ह्यात नवल ते काय?
गुरुदेव अभ्यंकर त्यांच्या पत्नी अपर्णा वहिनी, चिरंजीव आदित्य व मी ब्रायटनला २ जुलैच्या सकाळी गेलो. किनार्याालर सावरकर नक्की कोठे उभे होते. कुठे त्यांना मातृभुमीची तीव्र आठवण झाली ते सांगता येत नसल तरी सावरकरांच्या पवित्र पदस्पर्शाने अख्खा ब्रायटन समुद्रकिनारा धन्य झाला असेल, ह्यात शंका नाही. गुरुदेवांनी सावरकरांना आर्त हाक घातली. त्यांच्या अपरीमित, अपौरुषेय त्यागाबद्दल दंडवत घातले आणि मुक्त कंठाने ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे अमर गीत आळवलं.

२ व ३ जुलै रोजी संध्याकाळी महाराष्ट्र मंडळ लंडनच्या भवनांत गुरुदेवांची स्वातंत्र्यवीरांवर प्रवचने झाली. खास करून लंडन मधील वास्तव्यात सावरकरांनी जे अभूत कार्य केल त्याचा परामर्ष गुरुदेवांनी आपल्या रसाळ वाणीने घेतला. अनेक महत्त्वाचे प्रसंग सार्थपणे जिवंत केले. आणि इंडिया हाऊस, ब्रिक्स्टन जेल, पेंटनव्हिल जेल, कॅक्स्टन हॉल, ग्रेज ईन सारख्या ठिकाणी घडलेल्या घटना परत एकदा श्रोतृवृंदापुढे उभ्या केल्या.

एक दिवस सावरकर भक्त व संशोधन बेडफर्डचे वासुदेवराव गोडबोले ह्यांनी सावरकर अभिवादन यात्रेस लंडनमधील भारतीय क्रांतीकारकांशी संबंध असलेल्या अनेक वास्तूंची यात्रा घडवली. स्थान महात्म्याच यथार्थ वर्णन केलं. वासूदेवराव गोडबोले गेली अनेक वर्षे हा उपक्रम निरपेक्षतेने करत आहेत. अमृताशीही पैज जिंकणारी रसाळ अक्षरातली ज्ञानेश्वषरी, त्यातील तत्त्वज्ञान, भगवद्गीतेचे सार ज्ञानेश्वारांच आयुष्य ‘अमृताच्या धनु’ मध्ये शंकरराव अभ्यंकरांनी आपल्या ओघवत्या भाषेत तुडूंब भरलेल्या सभागृहापुढे ४ जुलैच्या संध्याकाळी सादर केल. तर हृदयनाथ मंगेशकरांनी आपल्या कसदार, दाणेदार आवाजात ज्ञानेश्वजरीच्या ओव्या अगदी ह्रदयापासून आळवल्या आणि ६०० श्रोत्यांना हेलावून टाकलं. अशी मूळातच ज्ञानेश्व री ज्ञानदेवांचं आयुष्य मराठी मनाला गेली ७०० वर्षे भूरळ घालत आहे. ती गोडी अभ्यंकर, मंगेशकर ह्या द्वयाने व त्यांच्या साक्षीदारांनी अनेक परींनी वाढवून एक अप्रतिम, कायम लक्षात रहाणारा असा ‘अमृताचा धनु’ लंडनवाल्या मराठी मनास अर्पण केला. पसायदानाने प्रत्येक मराठी मन हेलावून गेलं.

‘सावरकर अभिवादन यात्रे’ च्या लंडन ते मार्से पर्यंतच्या प्रवासातील एक घटना मी कधीही विसरणार नाही! पॅरीस जवळ, व्हर्साय येथे फ्रान्सचा राजा १४ व्या लुईचा अत्यंत अलिशान, भव्य, सुंदर आणि देखणा राजवाडा आहे. आम्ही राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी प्रतिक्षा करत उभे होते. सभोवताली अनेक देशातील मंडळीही आमच्या बरोबर उभी होती. त्यातील काही स्पॅनिश मंडळीनी एक जोरदार समूहगीत म्हटलं. उभ्या असलेल्या दोन, चारशे लोकांनी त्यांच टाळ्या वाजवून अभिनंदन केलं.

हे पाहून हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी जयोस्तुते श्री महनमंगले, शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वां अहं यशो युतां वंदे’ हे सावरकरांच गाजलेलं गीत सुरेलपणे, चढ्या आवाजात गायलं. आम्ही सर्वांनी त्यांना साथ दिली आणि व्हर्सायचा राजवाडा धन्य झाला! व्हर्सायच्या राजवाड्याने ह्यापूर्वी एकही भारतीय गीत ऐकलं नसेल. सावरकरांचं तर खचितच नाही आणि पुढेही ऐकण्याची शक्यता जवळ जवळ नाहीच! दिग्गज हृदयनाथ व उषाताई मंगेशकरांनी आपल्या श्रेष्ठ गायकीने सावरकरांचे चिरंजीव शब्द व्हर्सायला ऐकवले आणि उपस्थित शेकडो लोकांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केलं.

मार्सेमधील अविस्मरणीय ऐतिहासिक समारंभाची सांगता सावरकरांच्या आसेतू हिमालयासारख्या व्यक्तिमत्त्वास शोभणारीच होती. दिमाखदार ‘पुलमन’ सभागृहात ८ जुलैला संध्याकाळी श्रोते उत्साहात जमले. ऐयाशीच्या चहापानाच्या वेळी ही प्रत्येकाच्या मनांत सकाळचा भव्य समारंभ घोळत होता. ऊषाताई मंगेशकरांनी ‘स्वस्तिश्री गणनायको....’ हे गणेश वंदन केलं व दीप प्रज्वलन झालं. रमेश प्रभुंच्या स्वागतानंतर आदित्य अभ्यंकरांनी 'सावरकर अभिवादन यात्रा' कशी निघाली ह्याची रोमांचकारी माहिती दिली. हृदयनाथ भारती व उषाताई मंगेशकर आणि शंकरराव अभ्यंकर ह्यांचा यथोचित सत्कार झाला. त्याचबरोबर ऑटवाचे विजय ढवळे, पॅरीसचे चंद्रशेखर राजगुरु व लंडनचे अनिल नेने (अस्मादिक! माझा सत्कार का केला हे अजूनही गूढच आहे! ) ह्यांचाही सत्कार समारंभ साजरा झाला. ‘चित्रमय सावरकर’, ‘किर्तन पुष्पांजली’, ‘‘अनादी अनंत सावरकर’ - १० वी आवृत्ती, ‘पर्यटन सम्राट’ आणि 'Savarkar in London and Marseilies' ह्या ५ पुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळाही संपन्न झाला. एकूणच वातावरण सावरकर विचारांनी, आचारांनी आणि आठवणींनी भारलं होतं.

मध्यांतरानंतर ह्याच सावरकर विचारांचं, आचारांचं, कृतींचं निरूपण शंकरराव अभ्यंकरांनी समर्थपणे प्रस्तुत केलं. त्यावर आधारीत सावरकर रचनांचं सादरीकरण केलं उषाताई, हृदयनाथ व त्यांची कन्या राधा ह्यांनी आणि श्रोत्यांचं अंतःकरण हलवून टाकलं. मंगेशकरांची अभिजात, सुरेल, सुस्वर गायकी, त्यातील भाव, आर्तता ह्यांनी वातावरण भिजवून टाकलं होतं. त्यांना अप्रतिम साथ दिली तबलजी अशोक कदम व सिंथसायझर पटू विवेक परांजपे ह्यांनी. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे सावरकरांचं चिरंजीव गीत तीनही मंगेशकरांनी असं काही गायलं की श्रोत्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. कान बधीर झाले!

आयुष्यात एक अजोड, अविस्मरणाने अनुभवाने धन्य होत, कृतार्थ होत जड अंतःकरणांनी, जड पावलांनी श्रोते सावरकरमय होऊन मार्सेचा निरोप घेताना स्वातंत्र्यवीराचा, भारत मातेचा जयजयकार करत होते!

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=bl...
लोकसत्तामधे प्रकाशित झालेले वाचकचे पत्र :
सोमवार, १९ जुलै २०१०
सावरकरांवरचे बेगडी प्रेम
डिसेंबर १९९८ मध्ये एक अचानक इ-मेल मला आली. मुंबईचे एक गृहस्थ (नांव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक अजून गुप्तच आहेत.) मार्सेला गेले होते. तिथल्या महापौरांना भेटले. १९१० मध्ये सावरकरांनी ब्रिटिशांनी तावडीतून सुटण्याचा धाडसी प्रयत्न मार्सेला कसा केला- हा इतिहास सांगितला. सावरकरांचे स्मारक मार्सेला व्हावे असे सुचवले. त्या फ्रेंच महापौराने ते मान्य केले व काही भूभाग त्या स्मारकासाठी राखून ठेवला. (कुठे व केवढा हे कोणालाच माहीत नाही) ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या २३ सप्टेंबर १९९८ च्या अंकात ही माहिती आहे. (पण त्याचे कात्रण कोणाकडे नव्हते) फ्रेंच महापौराने- ‘या कार्यात भारत सरकारने पुढाकार घ्यावा’ असे सुचवले. ते महापौर आणि मुंबईचे गृहस्थ यांच्यातला झालेला पत्रव्यवहार कोणीच बघितला नाही. वास्तविक आपल्या देशाबाहेर असे व्यवहार कोणाच्याही सल्लामसलतीशिवाय करणे अयोग्य. या कार्यात पुढे अडीअडचणी काय येतील याचा कोणी विचारच केला नाही. सगळे सावरकरप्रेमी केवळ कल्पनेनेच भारावून गेले. या योजनेला ‘भाई, साथी’ मंडळींनी विरोध केला. त्या वेळच्या इतर पत्रव्यवहारावरून हिंदुत्ववादी मंडळींनाही सावरकर चरित्र माहीत नाही, असे दिसले.
जे मुंबईचे गृहस्थ मार्सेला गेले होते, त्यांनी पुढे काय केले? पंतप्रधान वाजपेयी यांच्याशी पत्रव्यवहार केला का? असल्यास तो कोठे आहे? काहीजण म्हणतात- वाजपेयींनी गृहमंत्री अडवाणी यांना ‘पुढे काम करा’ म्हणून सांगितले. प्रत्यक्षात या दोघांनी सावरकर स्मारकाविषयी काहीही केले नाही. ‘ठंडा करके खाना’ हे काँग्रेसचेच धोरण त्यांनी चालू ठेवले. लोकसभेत भाजपचे १८३ सभासद होते. त्यांनीही कधी आवाज उठवला नाही. भाजप १९९८ ते २००४ पर्यंत सत्तेवर होता.
३० मे २००९ पासून एकदम इ-मेल येऊ लागल्या. ‘११ वर्षे भारत सरकार सावरकरांच्या मार्सेमधल्या स्मारकाविषयी काहीही हालचाल करत नाहीये. लालफितीत काम अडकून ठेवले आहे- याचा सार्वजनिक निषेध झालाच पाहिजे.’ त्यावर मी लिहिले- ‘पण मनमोहनसिंग काही ११ वर्षे पंतप्रधान नव्हते. १९९८ ते २००४ या पाच वर्षांत सत्तेवर असताना वाजपेयी आणि अडवाणी यांनी काय केले?’ भाजपवाल्यांना मान्य करावे लागले की त्या दोघांनी काहीच केले नाही. त्या दोघांचे स्पष्टीकरण भाजपचे लोक अजून मागत नाहीत आणि ते दोघेही स्वस्थ बसले आहेत. सलिम चिस्तीच्या दग्र्यावर चादर पाठवायला मात्र वाजपेयींना वेळ आहे. (१४ जून २०१०)
‘गोडबोले, तुम्ही तिकडे काहीतरी करा,’ अशी भोळेपणाची पत्रे मला आली. ‘मी नेमके काय करू ते सांगा,’ असे विचारल्यावर मात्र त्या मंडळींना काहीही सांगता येईना. पुन्हा सगळेच हवेत.
नोव्हेंबर २००७ मध्ये माझ्या मित्रांना मी आवाहन केले होते की, स्मारकाचा घोळ सोडा. निदान ८ जुलै २०१० या दिवशी मार्सेला समुद्रकिनारी जमण्याचे ठरवूया. सावरकरांना श्रद्धांजली वाहूया. अर्थात मला स्वत:ला काही संशोधन करणे प्राप्त होते; मार्सेला नेमके काय झाले? हा प्रश्न होता. ब्रिटिश लायब्ररीमध्ये त्यासंबंधीचे संदर्भ आहेत. पण नेमका संदर्भ नसल्याने ते प्रतिवृत्त बघता आले नाही. तथापि त्या प्रतिवृत्ताप्रमाणे मोरीया ही बोट धक्क्यावर लागली होती. त्या बोटीचा नकाशा पोलिसांनी दिला आहे. त्यावरून सावरकरांनी कोठून उडी मारली ते कळले. आता मार्से हे बंदर १९१० मध्ये कसे होते? आणि आज कसे आहे? ब्रिटिश लायब्ररी (लंडन)मध्ये १९०९ चा नकाशा आहे. त्यावरून हव्या असलेल्या भागाची छायाप्रत मी मिळवली. पर्यटकांसाठी म्हणून जी पुस्तके आहेत त्यात मार्से शहराचे नकाशे आहेत. परंतु बंदराचा फारच थोडा भाग आहे. पुन्हा ब्रिटिश लायब्ररीत गेलो. २००९ मध्ये मार्से बंदर कसे होते ते नकाशा मिळाला. परंतु कॉपीराईटप्रमाणे हव्या त्या भागाची छायाप्रत करून देईनात. शेवटी तो नकाशा २५ पौंड देऊन विकत घेतला. परंतु त्याचा आकार खूप मोठ्ठा आहे.
१७९० मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली. तेव्हा त्यांचे राष्ट्रगीत रचले गेले- ते मार्से या गावी. राष्ट्रगीताचे नाव ‘मार्से’ असेच आहे. आपले जसे ‘वंदेमातरम्’ तसेच त्यांचे ‘मार्से’. त्या काळी हे बंदर खूपच महत्त्वाचे होते. प्रवासी आणि मालवाहतूक जहाजांनी व्हायची. मुंबई-एडन-पोर्ट सैद-सुवेझ-मार्से असा प्रवास असे. नंतर काही प्रवासी लंडनपर्यंत जात. ज्यांना बोटीचा कंटाळा येई ते रेल्वेने मार्से पॅरिस-कॅले असा प्रवास करत. इंग्लिश खाडी ओलांडून डोव्हरला येत. पुन्हा रेल्वेने लंडन. (सावरकर असेच आले होते.)
माझा ४० वर्षांपासून असलेला मित्र मनोहर राखे मला म्हणाला, ‘आपण प्रत्यक्ष मार्सेला जाऊ. तिथली परिस्थिती बघू. महापौराला भेटू आणि निदान सावरकरांना श्रद्धांजली तरी कोठे वाहता येईल ते ठरवू.’ मार्से हे शहर पॅरिसमधून दक्षिणेला ५०० मैलावर आहे.
शिवाय प्रश्न असा की, प्रत्यक्षात इंग्लंडहून किती लोक मार्सेला येतील? अगदी मूठभर असले तर मार्सेच्या महापौराला बोलावणे हास्यास्पद ठरेल. तसा प्रश्न इ-मेलवर विचारल्यावर कळले की फक्त १० जणांची येण्याची तयारी आहे. आयत्या वेळी निम्मे गळतात असा नेहमीचा अनुभव. सगळाच अंधार. शेवटी आपण तिघे (गोडबोले पती-पत्नी +राखे) का होईना मार्सेला जाऊच असा निश्चय केला.
जानेवारी २०१० मध्ये इंग्लंडच्या एका मित्राने ‘सावरकर स्मारकासाठी पैसे द्या’ म्हणून आवाहन केले. मी म्हटले, ‘अरे गृहस्था, तू मार्सेला जाऊन तरी आलास का? स्मारक कोठे करता येईल हे तू सांगू शकतोस? आणि स्मारक म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? एक स्मृतिफलक? एक स्तंभ? दगडावरचा शिलालेख की एखादी कमान? पैसे किती लागतील- याचा अंदाज तरी आहे का? पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेव. बंदरात खाऱ्या पाण्यावरून वारे वाहतात. त्यामुळे धातूंच्या वस्तूंना गंज चढतो.’ आमच्या मित्राच्या सगळ्या कल्पना हवेत.
मंगेशकर कुटुंबियांचे आणि सावरकरांचे घनिष्ठ संबंध होते, असे म्हटले जाते. परंतु १० वर्षे लताताईंना झोप लागली असावी. एकदम १० डिसेंबर २००९ मध्ये त्यांनी जाहीर केले- ‘सावरकरांचा योग्य तो सन्मान भारत सरकारने केला नाही’- अशा सत्यकथनाचा आता काय उपयोग? सावरकर जिवंत असताना हे सांगायला पाहिजे होते! पण लताताईंना नेहरूंचे प्रेम जास्ती. त्यांच्या मृत्यूनंतर ताईंनी लंडनला येऊन नेहरू स्मारकाच्या मदतीसाठी गाण्याचे कार्यक्रम केले- जणू काही सरकार उधळत असलेले कोटय़वधी रुपये कमी पडत होते! सावरकर चित्रपटासाठी मात्र लताताईंनी एकही गाण्याचा कार्यक्रम केला नाही- असे समजले.
लंडनच्या महाराष्ट्र मंडळाचे ७०० आजीव सभासद आहेत. तसेच संगणक क्षेत्रातले मराठी ठिकठिकाणी आहेत- मिल्टन कीन्सला १००, इलफोर्डला १०० संघपरिवारातली (हिंदु स्वयंसेवक संघ, वि. हिं. प., भाजप) शेकडो मंडळी इंग्लंडमध्ये आहेत. या सर्वानी सावरकर जन्मशताब्दीचे वेळी (१९८३-८४) काय केले?
काहीही नाही.
आजही भाजपचे १५९ सभासद दिल्लीच्या लोकसभेत आहेत. त्यापैकी मार्सेला कोणीही आले नाही. आमच्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरसुद्धा आल्या नाहीत.
डॉ. वा. शं. गोडबोले, लंडन

आणखी एक पत्र : लोकसत्ता २३.०७.२०१० http://loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=bl...

शुक्रवार, २३ जुलै २०१०
येथे चमत्कारांनाच ‘मार्केट’ आहे
डॉ. वा. शं. गोडबोले यांचे ‘सावरकरांवरचे बेगडी प्रेम’ (१९ जुलै) हे पत्र बरेच काही सांगून जाते. एक-दीड महिन्यात मार्से बंदरातील स्वा. सावरकरांच्या समुद्र उडीविषयी भरपूर मजकूर प्रसिद्ध झाला आहे. साप्ताहिक ‘विवेक’मधील एका लेखात बोटीवरील गोल खिडकीतून त्यांनी जी उडी घेतली, त्याचा व्यास १२ इंच असल्याचे म्हटले आहे. तसेच सावरकरांच्या मानेचा व्यास १४ इंच तर छातीचा आकार ३२ ते ३४ इंच अशी मापे आहेत. माझ्या समजुतीप्रमाणे, बोटीला असलेल्या समुद्रपातळीजवळच्या अशा खिडक्यांना असलेली तावदाने ही जाड काचेची असून बोटीच्या बाहेरच्या आणि आतील अंगास अशा दोन वेगळ्या काचा बसविल्या जातात. (विमानातही अशा प्रकारची वजनाने हलकी, परंतु अत्यंत मजबूत अशी एबीएससारख्या मटेरिअलची दुहेरी पारदर्शक तावदाने असतात.) तेव्हा अल्पकाळात जाड काच फोडण्याच्या साधनसामग्रीशिवाय जाड काचेची तावदाने (मोठा आवाज झाल्याशिवाय) संपूर्णपणे फोडणे अशक्यप्राय आहे. ३४-३६ इंचाची छाती १२ इंचाच्या होलमधून पार होणे जितके अशक्यप्राय आहे तितकेच फोडताना कडेवर राहिलेले जाड काचेचे काटेरी तुकडे, काच अतिशय मजबुतीने चिकटवलेली असल्याने पूर्णपणे निघणेही कठीण. तेव्हा बाहेर पडायचे झालेच, तर अंगावर खोल ओरखडेच नव्हे तर जीवघेण्या जखमाही होऊ शकतात. ही तावदाने इतकी मजबूत असण्याचे कारण त्यांना वादळवारा आणि उधाणलेल्या वादळी समुद्राच्या हल्ल्यातून तावूनसुलाखून निघून बोटीची सुरक्षितता सांभाळावी लागते. तेव्हा तावदाने फोडून केलेले पलायन कठीण वाटते. मोरिया ही बोट धक्क्यावर लागली होती. धक्क्यावर उतरण्यासाठी पायपूलही जोडण्यात आला होता. सावरकरांनी त्या पायपुलाचा वापर करून सुटकेचा प्रयत्न केला असावा.
अशी शंका येण्याचे कारण म्हणजे शाळेच्या पाठय़पुस्तकात या विषयावरील धडा बालपणी वाचनात आला होता. त्यात अथांग समुद्रात सावरकर पोहत असल्याचे रेखाचित्र आणि रात्रभर पोहून त्यांनी मार्से बंदर गाठल्याचे रसभरीत वर्णन वाचले होते. ते सारे कपोलकल्पित होते, हे आता कळते. वास्तवाला अतिशयोक्तीची प्रमाणाबाहेर फोडणी दिली की त्याची दंतकथा होते. कथेच्या नायकाला तो कितीही महान मानव आणि प्रगाढ विचारवंत असला तरी देवपण चिकटवल्याखेरीज त्याला रूढ (?) अर्थाने अलौकित्व प्राप्त होत नाही अशी समजूत असावी. पण खरे तर अशा अद्भुत आणि चमत्कारिक कथांमधील सत्य बाहेर आल्यावर त्या असामान्य मानवाचे अवमूल्यनच होते. ही नाण्याची दुसरी बाजू धोकादायक आहे. सावरकरांचे खरे विचार विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान, गोरगरीब, दलित यांच्याविषयी त्यांनी माणुसकीचे केलेले कार्य, त्याचा अभ्यास करण्याऐवजी त्यांना देवळात बसवून त्यांच्यावर शेंदूर लावल्याखेरीज समाजाला त्यांचे मोठेपण पचवता येत नाही. ‘गाय एक उपयुक्त पशू’ हा क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ लेख लिहिल्याबद्दल स्वा. सावरकरांना त्यांच्या जिवंतपणीच अवहेलनेला आणि मानहानीला सामोरे जावे लागले होते. तसेच ‘दोन शब्द, दोन संस्कृती’ या लेखात आधुनिकतेला महत्त्व देणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीसमोर बदल मान्य नसलेल्या आणि आधुनिकतेला लाथाडणाऱ्या पौर्वात्य संस्कृतीची झालेली पिछेहाट सिद्ध करणाऱ्या स्वा. सावरकरांचे विचार हे जादूगार हुदिनीसारख्या अचाट करामत करून दाखवणाऱ्या ‘रोप-ट्रिक’पेक्षा खरोखरच शतपटीने महत्त्वाचे आहेत. पण विचार हवेत कुणाला? येथे चमत्कारांनाच ‘मार्केट’ आहे.
‘फॅक्टस् अबाउट सावरकर’ अशी एक मोठी इ-मेल मला आली आहे. त्यात अशा गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. ज्या जिज्ञासूंना ही इ-मेल फॉरवर्ड करून हवी असेल त्यांनी माझ्या इ-मेलवर संपर्क साधावा.
जयराज साळगावकर, दादर, मुंबई

एकूनचं हा धागा वाचण्यासारखा आहे. सर्व लिंक सर्व माहिती छान आहे.

जयोस्तुते ही कविता खरे तर प्रसिद्ध गेली त्याचे श्रेय मंगेशकर भावंडाना जायला हवे. इतक्या गोड, श्रवणीय, तरल भावनिक आवाजात त्यांनी जसं गायलं ते अजूनही ऐकावसं वाटतं रहातं. तसेचं आणखी एक गाणे - ने मजसी ने.

सावरकरांचा उपयोग काँग्रेस आणि गांधींना शिव्या देताना तोंडी लावायला करण्यापलीकडे सावरकर भक्त काय करतात >>
मी सावरकर भक्त आहे, स्वतः मी काय पालन करतो ह्याची टिमकी वाजवायला मला दुसरा बाफ घ्यावा लागेल कारण ह्या मंचावर परत परत तोच विषय काढने अप्रस्तुत आहे. शिवाय प्रत्येक महापुरुषाचे सर्वच भक्त कसे वागतात तसेच आजचे सावरकर भक्तही वागतात. हे साम्य राहणारच, गांधी भक्त, आंबेडकर भक्त जे करतात तेच हे लोक पण करतात. फरक कसा करणार?

फाळणी नंतर सावरकर पूर्ण बदलून भारत ऐवजी "हिंदू राष्ट्र" ही भुमिका घेतात. मग काय सावरकर भक्तांनी भारताला हिंदू राष्ट्र करावे काय?

सावरकरांनी स्वतः कधीही मी कशी ग्रेट उडी मारली ह्याचे विस्तृत वर्णन केलेले नाही. पण काही इंग्रजांनी स्वतःची नौकरी वाचविन्यसाठी केलेल्या कथेला वर्णनला त्यांना खोडून काढायची गरज वाटली नाही, कारण भारत पारतंत्र्यात होता. ह्या उडीमुळे अनेक लोक "हे असे घडू शकते" आपणही ट्राय करावा काय अश्या मनस्थितीत गेले, माझ्यासाठी उडीचे तेच महत्व आहे. उडी कशी मारली, गोळ्या झाडल्या गेल्या का हे नाही.

सावकरांनी स्वतः सत्यकथन केले आहे. ते म्हणाले आहेत की माझी उडी फार महान वगैरे नाही. त्याची सुरस कथा आधी इंग्रज अधिकार्‍यांनी केलेली आहे, कारण त्यांच्या बोटीतून मी उडी मारली. व जास्त श्रम न घेता मला किनार्‍यावर पोचता आले. बोट थांबलेली होती हे सत्य आहे, पण त्यांनी ही उडीच मारली नाही म्हणने धारिष्ट्याचे ठरेल. व्यवस्थित पुस्तके वाचलित तर असे प्रश्न पडणार नाहीत.

ह्या उडीचा त्यांनी राजकारणासाठी व्यवस्थित वापर केला आणि ते होणे त्या काळी जरुरी होते. कारण तेच, भारत पारतंत्र्यात होता. आज त्यावरुन बघा सावरकर कसे ग्रेट नाहीत, ती उडी गेट नाही, गोळीबार झाला नाही हा सुर लावता येईलही कदाचित पण तो काळ, त्याचे राजकारणातील महत्व हे पाहिले तर साध्याश्या घटनेला किती व्यवस्थित वापरले ह्यात त्यांची बुद्धिमत्ता दिसून येते. इंग्रजांनी आधी खेळलेल्या राजकारणाला नंतर स्वतः इंग्रज बळी पडले.

शिवाजी महाराजांच्या आग्राहुन सुटकेचे प्रकरण जसे आहे तसे सावकरांच्या उडीचे. काही लोक मग उत्साहाने लिहताना थोडा कल्पनाविलासही करतात.

>>> साप्ताहिक ‘विवेक’मधील एका लेखात बोटीवरील गोल खिडकीतून त्यांनी जी उडी घेतली, त्याचा व्यास १२ इंच असल्याचे म्हटले आहे. तसेच सावरकरांच्या मानेचा व्यास १४ इंच तर छातीचा आकार ३२ ते ३४ इंच अशी मापे आहेत. माझ्या समजुतीप्रमाणे, बोटीला असलेल्या समुद्रपातळीजवळच्या अशा खिडक्यांना असलेली तावदाने ही जाड काचेची असून बोटीच्या बाहेरच्या आणि आतील अंगास अशा दोन वेगळ्या काचा बसविल्या जातात. (विमानातही अशा प्रकारची वजनाने हलकी, परंतु अत्यंत मजबूत अशी एबीएससारख्या मटेरिअलची दुहेरी पारदर्शक तावदाने असतात.) तेव्हा अल्पकाळात जाड काच फोडण्याच्या साधनसामग्रीशिवाय जाड काचेची तावदाने (मोठा आवाज झाल्याशिवाय) संपूर्णपणे फोडणे अशक्यप्राय आहे. ३४-३६ इंचाची छाती १२ इंचाच्या होलमधून पार होणे जितके अशक्यप्राय आहे तितकेच फोडताना कडेवर राहिलेले जाड काचेचे काटेरी तुकडे, काच अतिशय मजबुतीने चिकटवलेली असल्याने पूर्णपणे निघणेही कठीण.

"विवेक"ला इतकी अचूक माहिती कुठून मिळाली? जर "विवेक्"ने दिलेली मापे खरी असतील तर त्यांनी त्या खिडकीतून उडी मारली हे पण खरे माना. छाती, पाठ व दोन्ही बाजूच्या बरगड्या मोजून छातीचे माप मोजले जाते. त्यांची छाती एखाद्या सरळसोट पट्टीप्रमाणे ३२ इंच लांब होती का? जहाजातून उडी मारण्याची योजना त्यांनी काही काळापूर्वीच बनविली असणार व त्यानुसार त्यांनी आपले वजनही कमी केले असणार. स्वच्छतागृहात पूर्वी गेलेले असतानाच आपल्या जानव्याच्या सहाय्याने त्यांनी खिडकीचे माप घेतले होते. मानवी शरीर हे काही लोखंडाप्रमाणे कडक नसते. त्यामुळे खिडकीचे माप मोठे नसूनसुद्धा त्यांना आपले शरीर बाहेर काढता आले असणार. १०० वर्षांपूर्वीच्या जहाजात साळगावकरांनी वर्णन केलेल्या अशा खिडक्या असतील का?

आता सावरकरांच्या उडीवरही शंका घ्यायला सुरवात झाली आहे. काही दिवसांनी ते खरोखरच अंदमानात तुरूंगात होते की नाही याविषयी शंका घ्यायला सुरूवात होईल. अंदमान ऐवजी ते युरोपमध्ये ११ वर्षे मौजमजा करीत होते अशाही कंड्या पिकवायला सुरूवात होईल. यथावकाश त्यांचे नाव देशद्रोह्यांच्या यादीत जमा होईल.

स्वातंत्र्यवीर सावरकर चुकीच्या देशात जन्माला आले असं वाटायला लागलंय. कृतघ्न लोकांसाठी त्यांनी आपल्या आयष्याचा होम केला.

>>स्वातंत्र्यवीर सावरकर चुकीच्या देशात जन्माला आले असं वाटायला लागलंय. कृतघ्न लोकांसाठी त्यांनी आपल्या आयष्याचा होम केला.
देशाची सद्य स्थिती बघता हे वाक्य बर्‍याच प्रभृतींबद्दल लिहीता येईल.

ते म्हणले "स्वराज्य हा माझा जन्मसिध्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"
आज लोकं म्हणतात "स्वराज्य मला वारसाहक्काने प्राप्त झालेले आहेच तेव्हा ते मी उधळणारच"

Pages