वेदकालीन संस्कृती भाग २

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
2’

वेदकालीन संस्कृती भाग १

प्रस्तुत लेखात हडप्पा-मोहंजदाडो संस्कृती थोडी विस्तृत स्वरुपात पण आर्य-अनार्य संकरासहित त्याचे मूल्य काय, त्यांचे देव व ह्या देवांची आर्यदेवांशी तुलना, इंग्रजी विद्वानांचे ह्यावर मत असे सर्व मांडण्याचा प्रयत्न आहे. लेख कालावधी व त्याची व्याप्ती खूप मोठा असल्याने काही भाग त्रोटक वाटू शकतो. तो दोष माझा आहे कारण मग ती ओळख न ठरता भाष्य ठरले असते, व भाष्य लिहिण्याइतका माझा अभ्यास अजिबात नाही. माझ्या मर्यादा ओळखूनच ही त्रोटक ओळख सादर करत आहे.

मागील लेखात आपण आर्यपूर्व असलेल्या हडप्पा - मोहंजदाडो ह्या संस्कृतीकडे लक्ष वेधले होते. त्या संस्कृती मध्ये मूर्तीपूजेला देखील महत्व होते हे उत्खननात सापडलेल्या मूर्तींवरुन लक्षात येते. उत्खनन करताना जे सील सापडले आहेत, त्यावर कोरीवकाम आहे व ती त्या संस्कृतीची भाषा आहे, त्याला अजूनपर्यंत डिकोड करता आलेले नाही, त्यामुळे त्यांच्या भाषेबद्दल काही सांगता येत नाही, पण हे सील सापडल्यामुळे आणखी एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांच्याकडे भाषा होती व ती लिहीता देखील येत होती. म्हणून लिखाण ह्या कलेचा सुमेरियन संस्कृतीने (मेसोपोटेमिया) शोध लावला हे गृहितक देखील फोल ठरते. (हा माझा निष्कर्ष आहे, चुकीचा असू शकतो.) मेसोपोटेमियामध्ये ख्रिस्तपूर्व ३५०० वर्षांपूर्वी सुमेरियन संस्कृती नांदत होती. हा भाग आजच्या इराणमधील होय. आपण दस्यु हा शब्द पाहिला, जो इराणी भाषेशी मिळता जुळता आहे, शिवाय इराणातून देखील भारतात लोक स्थलांतरीत झाले आहेत. (लंबकपाली वगैरे) हा शब्द जर आर्यांनी (इराण मार्गे) बरोबर आणला, तर असे सहज सिद्ध होते की आर्यपूर्व संस्कृतीमध्ये लिखाणकला बहरास आली होती.

१९३३ ते १९६४ मधील संशोधनानुसार आर्यांची संस्कृती (उदा. धर्म, तत्वज्ञान, कला, साहित्य) ही आर्येतर वा अनार्यांपेक्षा उच्च होती, हा समज दूर होत आहे कारण, सिंधूसंस्कृतीमधील हडप्पा-मोहंजदाडोमध्ये सापडलेल्या वस्तू. हडप्पा नामशेष झाल्यावर नगररचनेची कला (पाहा http://www.harappa.com/har/har0.html ) त्यांच्यासोबत एकतर नाहीशी झाली, वा आर्यांना ती कळली नाही. नगररचनेचे तंत्र हे सिंधूसंस्कृतीपेक्षा जुने होते. आर्यांच्या नगरातील रस्ते हे कायम धुळीने माखलेले असत त्यामुळे सूत्रकाळापर्यंत आर्य ब्राह्मणांना नगरवास पसंत नव्हता. बौधायन धर्मसूत्रात नगरात वस्ती करणे हे अपावित्र्यकारक आहे असा उल्लेख आहे, कारण नगरात धूळ असते. (आजची भारतातील अवस्था बघता, नगररचना आपण समजूनच घेतली नाही हा कयास खरा ठरतो. Happy ) हड्डप्पा-मोहंजदाडो उत्खननापूर्वी पश्चिमी विद्वान सुसंस्कृत भारताचा इतिहास नॉर्डिक टोळ्यांच्या आक्रमणापर्यंत, म्हणजे इ.स.पूर्व १५०० च्या आसपास नेत. हा कालावधी मॅक्समुलर याने निश्चित केला. त्यावरुन आर्य हे प्रगत होते हे गृहितक त्याने बांघले होते, जे नंतर चुकीचे निघाले. पण अजूनही, अनेक भारतीय आर्य आक्रमण व त्यांची प्रगत संस्कृती गृ्हीत धरुन चालतात. व्हिलर व मार्शल हे सिंधूसंस्कृतीचे अभ्यासक असे मानतात की आर्यांच्या आक्रमणामुळे व लुटारु टोळ्यांमुळे सिंधूसंस्कृती लयाला गेली. ॠग्वेदातील आर्य हल्ले करुन दस्यु, व पणी यांचे धन लुटत. त्यांची नगरे फोडत. शबर* ह्या दस्यू राजाची नव्याण्ण्व भक्कम पुरे फोडली व त्याचे एक लाख लोक मारले असा एक उल्लेख आहे. ( ७|९९|५)

सिंधूसाम्राज्य हे तत्कालीन मेसोपोटेयीन सुमेरियन राजांपेक्षा फार मोठे असावे हे केवळ दोन नगरींमधील अंतरावरुन दिसते. हडप्पा ते मोहंजदाडो मध्ये ४०० मैलाचे अंतर आहे, ह्यावरुन तो अंदाज सहज यावा. कार्बन डेटिंगनुसार सिंधूसंस्कृतीचा नाशसमय इ. स. पूर्व २३५० असा ठरवला आहे. तर आर्य भारतात इ. स. पूर्व १५०० च्या आधी आले नाहीत असेही हे विद्वान धरुन चालतात. मग हा ८०० ते ९०० वर्षाचा कालावधी कसा भरुन काढायचा हाही प्रश्न उरला आहेच. काही अभ्यासकांच्या मते हाच काल, ज्यात महाभारत झाले. वैवस्वत मनूचा कालावधी इ स पूर्व ३१०० आहे. त्याने प्रलयंकारी महापुरातून वाचवून परत मानवसमाजाची स्थापना केली असे मानले जाते. (शतपथ ब्राह्मण्य १|८|४ काठक संहिता ११|२ ). बायबल वाचले तर हीच कथा बायबल मध्येही आहे. Happy

नॉर्डीक लोकांचा मूळ प्रदेश कोणता हे सांगता येत नसला तरी सध्याचे नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी ह्यापैकी भाग ह्यांचे मूलस्थान आहे असे मानले गेले आहे. मध्य जर्मनीत इ स पूर्व ३००० च्या आसपासची भूमितीय तंत्राने घडवलेली अवजारे सापडली आहेत. ती ह्या नॉर्डीक वंशाने निर्मिली आहेत असे मानतात. पण ह्याबद्दल दुमत आहे, कारण रशियाच्या भागात, ह्यापेक्षा पुराणी पण तशीच अवजारे मिळाली आहेत. येथून इंडोयुरोपीय जमाती फुटून निरनिराळ्या भागात गेल्या. त्यांचे दोन भाग झाले इत्ताइत आणि इंडोइराणी. हित्ताइत ही जमात आशियातून मेसोपोटोमियात शिरली. इथे एक तह नमूद करावासा वाटतो तो म्हणजे हित्ताइत जमातीचा राजा व मितन्नी जमातीचा राजा ह्यांमध्ये इस पूर्व १४०० च्या सुमारास झालेल्या तहनाम्यात इंद्र, मित्र, वरुण व नासत्य (अश्विदेव) हया देवांचा निर्देश आहे. ते तहनामे बोधझ्-कोई येथे सापडले आहेत.

देवांचा विषय आहेच तर थोडे पुढे येऊन आर्य व अनार्य देव व वर्णव्यवस्थेकडे वळू.

मध्यसमुद्रीय प्राचीन युरोपियनांमध्ये ( म्हणज पेगन्स, अगदी आजही हे काही देशात आहेत) देवीमातेची पूजा प्रचलित होती. इजिप्तसंस्कृतीमधील उत्खननात क्रीट बेटावर देवीमूर्ती सापडल्या आहेत, त्यांच्यातही देवी पूजा होती व त्या खालोखाल पृथ्वीला माता समजण्याची प्रथा होती. ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी भारतात आणल्या. द्यौष्पिता व पृथ्वीमाता स्तवने ऋग्वेदात आढळतात. ( ह्याचा अर्थ असा नाही की ऋग्वेद तिथे तयार झाले. ह्याचा अर्थ असा की संकर निर्माण होत गेला व तत्वज्ञान बदलत गेले). पृथ्वीला आपण अदितीमाता/ आदिमाय म्हणतो, व देवांची निर्मिती तिने केली अशा काही कथा पुराणात आहेत. शिव उमा पूजा संप्रदाय भारतात आहे. क्रीटमधील जन हेच तामिळ (वा दक्षिण भारतीय द्रविड) होत असेही एक अभ्यासू संप्रदाय मानतो.

देवांबद्दल पूजेबद्दल बोलतच आहोत तर आपण पूजेबद्दलही पाहू. आर्यांची आणखी एक देणगी म्हणजे पशुयज्ञ व होम. प्राण्यांचे किंवा पशूचे बलिदान करण्याची प्रथा त्यांचात होती. देवतेपुढे बलिदान करण्याची प्रथा ही अप्रगत समाजाचे लक्षण होय. संकरानंतर आर्यांनी होम, हवन व यज्ञ बर्‍याच अंशी बंद करुन पूजेस प्राधान्य दिले असा कयास एक अभ्यासू वर्ग मांडतो. पूजा हा शब्द चारही वेदांच्या संहिता व त्यास पूरक असणारे ब्राह्मण ग्रंथात* आढळत नाही. पूजा हा शब्द द्राविड शब्दांवरुन अधिक चांगल्या रीतीने भाषाशास्त्रज्ञांनी व्युत्पन्न करुन दाखविला आहे. म्हणून असे अनुमान काढता येईल की ह्या दोन्हींचा संकर झाल्यावर हिंदू धर्मात होम व हवन हे कमी होऊन पूजेला प्राधान्य मिळाले. पूजेबाबत, गीतेत ( ९,२६) श्रीकृष्णाने सांगितले आहे, की पत्र, पुष्प, फळ व जल भक्तिपूर्वक अर्पण केल्यावर पूजा पूर्ण होऊ शकते.
मग ज्यांची पूजा स्वीकारली, त्यांचे देव स्वीकारण्यास काय हरकत? तर देवही स्वीकारले. शिव-पार्वती, विष्णू-लक्ष्मी , राम, कृष्ण व उपदेवता जसे नाग, हनुमान, गरुड, भैरव, स्कंध गणेश इत्यादी. ह्या सर्व उपदेवतांवर एकेक पुराण आहेत, उदा गरुडपुराण, स्कंधपुराण, गणेशपुराण इत्यादी. जर आपण वर्णन पाहिले, तर राम, कॄष्ण हे दोन्ही अवतार आर्यांसारखे गोरे नाहीत. मेघासमान काळे, वा मेघासमान निळे आहेत, बालाजी काळा आहे, यावरुन ते देव आर्यांचे नाहीत व द्रविडांचे आहेत हे सहज अनुमान निघते. वेदांमधील देव रुद्र, ज्याला शिव पण म्हणतात, त्याची पत्नी उमा हिचा वेदात उल्लेख नाही! लिंगपूजा (शिवलिंग) ही मूळची वेदपूर्वकालीन जनांची आहे. तसेच शिव ह्या शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतमधून होत नाही. तामिळ 'शिवन्' (लाल) या शब्दावरुन त्याची व्युत्पत्ती सिद्ध होते. वेदात 'नीललोहित' (निळा लाल) हे शिवाला विशेषण आहे. निळा कंठ व लाल देह असलेला. तामिळमधील 'विण्' (आकाश) हा शब्द देखील विष्णूचे प्राकृत रुप दाखवतो. विष्णूचा वर्ण देखील निळसर आहे असे हिंदू मानतात. तसेच वर दिलेले राम व कृष्ण, हिंदूलोक विष्णूचा अवतार मानतात. हे देव आर्येतर आहेत. कृष्णाचे आणि इंद्राचे युद्ध आपणा सर्वांना (गोवर्धन) माहित आहेच. आपला अजून एक आवडता देव म्हणजे गणपती. स्कंद व गणेश हे मूळचे द्रविडी देव. हा गणपती आधी विघ्नकर्ता होता. त्याला विघ्नहर्त्याचे स्वरुप नंतर प्राप्त झाले. त्याने वैदिकांना त्रास देण्यास (संकरकालात) सुरु केले त्यामुळेच स्मॄतींमध्ये विनायकशांतीकर्म हे पण सांगीतले आहे.

सिंधू संस्कृतीच्या उत्खननात मारुतीचे चित्र किंवा मूर्ती सापडली आहे. हनुमानास पुजणारा संप्रदाय भरपूर प्रमाणात आहे. हनुमानकवच इत्यादी स्त्रोत्रांवरुन तो भूत, प्रेत, पिशाच्च, राक्षस इ. कडून सुटका करतो, त्याचे वास्तव्य पिंपळ, वड इत्यादी वृक्षांच्या पारावर किंवा वेशीबाहेर आढळते. यावरुन अदिवासी समाजाचा देव सिंधू संस्कृतीने व नंतर आर्यांनी स्वीकारला असे मानावयास हरकत नसावी. तामिळ मध्ये 'अणूमन्ति" म्हणजे नर वानर. त्याचे सूक्तात भाषांतर होताना वॄषाकपि असे झाले. इंद्र, वरुण, मित्र इ आर्यांचे देव. त्याकाळात हा संकर होताना हनुमानाला वायुचा पुत्र म्हणून गौरविले गेल. पुत्र ह्या विषयावर आहोत तर पुत्र म्हणजे काय हे पण पाहू.

पुत्र म्हणजे ज्याची आपल्यापासून उत्पत्ती होतो तोच असा अर्थ वेदकालात नव्हता. वसिष्ठ व विश्वामित्राला १०० पुत्र होते असा वेदांमध्ये उल्लेख आहे. प्रजापती ह्या देवापासून प्रजा उत्पन्न झाली असे आपण आज मानतो, थोडे खोलवर विचार केला असता त्याचा अर्थ नीट उलगडतो. प्रजापती स्वतःच्या बीजापासून किंवा मनाच्या योगाने (इथे अर्थ वेगळा) प्रजेची प्राप्ती करुन घेत असे. स्वतःपासून न जन्मलेली प्रजा मानसिक संकल्पाने स्वतःची होते, ह्यास पुत्रविधी म्हणत. पुत्रांचे खालील प्रकार आढळत. औरस, क्षेत्रज, दत्तक, क्रीत, कानीन, सहोढ, अपविद्ध, पुत्रिकाप्त्र, स्वयंदत्त, पौनर्भव, गूढज, कृत्रिम, व पारशव असे हे तेरा प्रकार. पैकी औरस, दत्तक हे आजही रुढ आहेतच.

विश्वामित्राच्या १०० पुत्रांत त्याने शुनःशेपाला पुत्र म्हणून स्वीकारल्याची कथा ऐतरेय ब्राह्मणात आहे. त्याचा ज्येष्ठपुत्र म्हणून विश्वामित्राने शुनःशेपाची घोषणा केली तेंव्हा ह्या मानसपुत्राला विश्वामित्राच्याच आन्ध्र, पुण्ड्र, शबर, पुलिंद, मूतिब ह्या तेंव्हा असलेल्या पुत्रांनी मान्य केले नाही. त्याची निंदा केली, त्यामुळे विश्वामित्राने ते पुत्र असूनही नीच मानले, असे ऐतरेय ब्राह्मण सांगते. निरनिराळ्या मानवगणांस पुत्र म्हणून कर्तबगार वैदिक पुरुष स्वीकारीत. वरील पुत्रांपैकी काही पुत्र हे दास कुलाचे होते. आधी लिहिल्याप्रमाणे दास ह्या शब्दाचा अर्थ दास हा नाही तर अनार्य. म्हणजे आर्यांपूर्वीचे रहिवासी. वैदिककालात मानसिक संकल्पाने बहुतांचा समावेश होऊन स्वतःच्या कुलाचा विस्तार करत. मग ह्यातील काही पुत्र ब्राह्मण तर काही क्षत्रिय असत.

ऋग्वेदात दस्यु वा दास हा शब्द अनेकदा आहे. त्याचा अर्थ मी वर सांगीतला आहे. ह्या कल्पनेला फार महत्व आहे कारण ह्यावरुन वर्णभेद दिसत नाही. वर्ण ही संज्ञा वेदात कुठेही नाही. पुढे आलेल्या पुरुषसूक्तात जरुर आहे. म्हणून जेंव्हा वर्णौ असा शब्द ऋचांमध्ये येतो तो आजच्या चातुर्वण्याशी संबंधित नाही तर दस्यु व आर्य ह्यांच्या त्वचावाचक आहे. दस्युलोक काळे, सावळे तर नॉर्डिक आर्य हे गोरे होते.

विश्वामित्राचे आंध्र व शबर इ पुत्र गण वाचक आहेत. त्यांनी कल्याणमार्ग (म्हणजे वरील शुनःशेपाची कथा) मानला नाही म्हणून ते दस्युच राहिले असे ऐतरेय ब्राह्मण म्हणते. ही कथा हे स्पष्ट करते की दासांना आर्यगटात सहजपणे मुक्त प्रवेश होता. तो कालच वर्णसंकराचा होता कारण आर्यांकडे जे होते ते दस्यु वा मूळ प्रजेकडे नव्हते, व मूळ प्रजेकडे असलेला प्रगतपणा / भौतिक सुख आर्यांकडे नव्हते.

आजची आपली गोत्रे म्हणजे गणसंस्थेचीच रुपे आहेत. ह्या गणसंस्था होताना क्षत्रियांचे ब्राह्मण व ब्राह्मणांचे क्षत्रिय बनले असे मानावयास जागा आहे. विश्वामित्र आधी क्षत्रिय होता, मग ब्राह्मण झाला हे सर्वांस माहिती आहेच पण महाभारतकाली असे परिवर्तन चालू होते. कर्णपर्वात कर्ण शल्यास त्याच्या देशाची निंदा करताना म्हणतो, " वाहीक देशात (आजचा पंजाब) ब्राह्मणाचे क्षत्रिय, वैश्य व नापित होतात व पुन्हा त्याचे ब्राह्मण होतात. तुझ्या देशात जारज* स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. तुझ्या देशातील स्त्रिया कोणत्याही पुरुषाशी समागम करतात, गाणी गातात, मद्य पितात. मद्रदेशाच्या शेजारामुळे गांधारही बिघडत चालला आहे. शूद्रांपासून अन्य स्त्रियांचे ठायी झालेले ब्राह्मण तुझ्या देशात आहेत. आरट्ट देशात पोटच्या पोरांना तुम्ही वारसा हक्क डावलता. (भारत - कर्णपर्व ८/४५/६-८) हे फक्त कर्णच असे म्हणतो असे नाही तर नारदही शांतीपर्वाच्या ३२८ व्या अध्यायाचे व्यासांना हेच सर्व सांगून वाहीक देशात गोंधळ माजू शकतो असे प्रतिपादन करतो. कर्णाच्या मते सुराष्ट्रातील व्यक्ती संकरवृत्ती आहेत. सूत प्रजा देखील ही आर्य-शुद्रसंकोरोत्पन्न होती हे भारत व स्मृतिवांडःमया वरुन निश्चित होते. संकरप्रजेतील काही लोक हे नेते बनले. (उदा कृष्णद्वैपायन व्यास, वाल्मिकी, विदूर इ ) वर्णभेद नेमका कधी का कसा घडला हे सांगता येणे कठिण आहे पण वरील ऋचा, सूक्ते हेच दर्शवितात की तत्कालिन संस्कृतीत मनुष्यजन्मावर काहीही आधारित नव्हते. मनुस्मॄती मध्ये एक श्लोक आहे,

'तपोबीजप्रभावैस्तु तें गच्छन्ति युगे युगे |
उत्कर्ष चापकर्ष च मनुष्येष्विह जन्मतः || (मनु १०|४३ )
अर्थ - ते सर्व युगात येथे मनुष्यामध्ये जन्म घेउन तप किंवा बीज यांच्या प्रभावाने उत्कर्षाला व अपकर्षाला प्राप्त होतात. शूद्रांचे ब्राह्मण होतात, ब्राह्मणांचे शूद्र होतात. हीच गोष्ट क्षत्रिय व वैश्य यांच्या संबंधी समजावी. (मनु १०|६५ )

यज्ञ किंवा मन्त्र यांच्या योगाने प्रजापतीने चार वर्ण निर्माण केले, असे वेदात काही ठिकाणी सांगितले आहे. (वाजसनेयी संहिता १५|२८-३०, शतपथ ब्राह्मण २|१|४|१३, तैत्तरिय ब्राह्मण ३|१२|९|२ इ इ ) पण आधी लिहिल्याप्रमाणे त्यांच्या जाती निर्माण झाल्या नव्हत्या, आणि त्या वर्णात कॊणीही कधीही प्रवेश करु शकत असे. उदा. अंगिरस, अंबरीष व यौवनाश्व हे मूळ क्षत्रिय होते पण ते कर्माने ब्राह्मण झाले. गोत्र पाहिले तर त्यांची गणना त्यात आहे. क्षत्रवृद्ध या क्षत्रियापासून सुहोत्र, गृत्समद हे ब्राह्मणवंश निर्माण झाले. गृत्समदापासून शुनक (शौनक) हा चार वर्णांचा गण बनला. अंगिरस व भार्गव यांच्या वंशांचा गण बनला. ऋषभदेवांच्या शंभर पुत्रांपैकी (पुत्राची व्याख्या पाहा) ९० क्षत्रिय तर १० ब्राह्मण झाले. भटक्या लढाउ जमातींना व्रात्यस्तोमाने पावन करुन घेऊन त्रैवर्णिकात समावेशन करण्याचा विधी तांड्य ब्राह्मणात (१७|२ ते ४) सांगीतलेला आहे. पुढे व्रात्याचा अर्थ वेगळा झाला.

अशा गणसंस्थाचे वर्णव्यवस्थेत रुपांतर पुढे होत गेले असावे. वर्णभेद कदाचित वेदा्च्या शेवटच्या यजुर्वेदांच्या कालात वा ब्राह्मण ग्रंथ निर्मितीच्या काळात सुरु झाला असावा. कारण ब्राह्मण व क्षत्रिय या वर्णांचा झगडा ह्याच काळात दिसतो. ( उदा परशूराम - क्षत्रिय युद्ध). वर्णपरिवर्तनाची क्रिया केंव्हा तरी कमी झाली असावी व पुढे ती बंदच झाली. तसेच भौतिक उन्नती व्हायला सुरुवात झाल्यावर अर्थव्यवस्था निर्माण होते व कुठल्याही प्रकारच्या अर्थव्यवस्थेत शोषक व शोषित समाज तयार होतात. ह्यावर भाष्य करावयाचे म्हटले तर ज्ञात इतिहासातील सर्व अर्थव्यवस्थेंचा तौलनिक अभ्यास करावा लागेल. तो एक स्वतंत्र लेख होऊ शकेल.

एक मला जाणवलेला मुद्दा असा की आजच्या भारतात कुठेही इंद्र हा मुख्य देव नाही. राम, हनुमान, गणपती, शिव, कृष्ण हेच आपले आजचे मुख्य देव आहेत. इंद्रांची व सुर्याचीउपासना खूप कमी लोक करतात, अपवाद केवळ अग्निदेवाचा. त्याची उपासना अनेक होमांतून आपण आजही करतो. हे मुळ अदिवासी संस्कृतीने आर्यांनी आणलेल्या बदलाला पचवून घेऊन त्यावर विजयही मिळवला असेच वाटते.

आता आपण थोडे काही पूर्वग्रहदुषित इंग्रजी लोकं ह्या संस्कृती बद्दल काय म्हणतात ते पाहू.

सन १७४८ मध्ये विल्यम जोन्स हे इंग्रजी विद्वान असे मांडतात की भारतात रानटी लोक राहत व आर्य आल्यावर भारतात संस्कृतीचा उदयास सुरुवात झाली. त्यांनी ग्रीस, इटली, पूर्व युरोप इ देशांचा अभ्यास करुन भारताशी तुलना केली व हे मत मांडले. हिंदू देवता लक्ष्मी, पार्वती आणि दुर्गा देवी ह्या अनुक्रमे Ceres, Juno आणि Minerva ह्या देवी होत असे संशोधन त्याने मांडले. पुढे जाऊन ते रामा बद्दल लिहतात.

“RAMA and CRISHNA, must now be introduced, and their several attributes distinctly explained. The first of them, I believe, was the DIONYSOS of the Greeks.”

“The first poet of the Hindus was the great VALMIC, and his Ramayan is an Epick Poem… comparison of the two poems (the Dionysus and the Ramayan) would prove DIONYSUS and RAMA to have been the same person; and I incline to think, that he was RAMA, the son of CUSH, who might have established the first regular government in this part of Asia.”

इतकेच नाही तर मोझेसचा उल्लेख करुन ते वर म्हणतात की

"This epitome of the first Indian History… though whimsically dressed up in the form of an allegory, seem to prove a primeval tradition in this country of the universal deluge described by MOSES, and fixes consequently the time when the genuine Hindu Chronology actually begins.”

“We may suspect that all the fourteen MENUS are reducible to one, who was called NUH by the Arabs, and probably by the Hebrews; though we have disguised his name by an improper pronunciation of it. Some near relation between the seventh MENU and the Grecian MINOS may be inferred.

वरील संशोधन हडप्पा-मोहंजदाडो संस्कृती सापडण्याआधीचे आहे व त्यामुळेच धांदात खोटे आहे हे लगेच लक्षात येते. आर्य आक्रमण झाले की नाही ह्यावर अजूनही वाद आहेत. पण जे लोक आर्य आक्रमण झाले असे म्हणतात वा म्हणत असत, ते श्री. जोन्स ह्यांचा नेहमी संदर्भ देत असतात पण त्याचवेळी सिंधूसंस्कृती विसरतात. नॉर्डिक लोक आले हे निर्विवाद सत्य आहे पण त्यांची संस्कृती मूळ लोकांपेक्षा प्रगत होती हे मात्र असत्य आहे. काही करुन संस्कृतीचे मूळ मोझेस, अन् पर्यायाने येशूकडे वळवायचे होते. हा केविलवाणा प्रयत्न सिंधूसंस्कृती उत्खननामुळे बर्‍याच प्रमाणात उघडकीस आला. ह्या विषयावर अजून संशोधन व्हायला पाहिजे. पण सिंधूसंस्कृती जिथे विकसित झाली, तो भूभाग आजच्या पाकीस्तानात आहे, व ते किती सहकार्य करतील हे सर्वांना ज्ञात आहे, त्यामुळे जो पर्यंत आणखी काही जुने मिळत नाही तो पर्यंत आपण सिंधूसंस्कृतीपर्यंतच मागे जाऊ शकतो. पण विचार करण्याचा भाग असा, की जर सिंधूसंस्कृतीत पूर्णत्वाला गेलेली नगरे असतील, भाषा असेल तर, मुद्रणकला, शिल्पकला इ. विकसित झाली असेल, तर त्या आधी कित्येक हजारो वर्षे भारतवर्षात माणूस राहिला असेल?

ह्याच विल्यम जोन्स ह्यांचे आणखी एक संशोधन पाहा.

“I cannot help mentioning a discovery which accident threw in my way, (I) thought my proofs must be reserved for an essay which I have destined for the fourth volume of your Transactions. To fix the situation of that Palibothra which was visited and described by Megasthenes, had always appeared a very difficult problem.”

“…but this only difficulty was removed, when I found in a classical Sanscrit book, near 2000 years old, that Hiranyabahu, or golden-armed, which the Greeks changed into Erannoboas, or the river with a lovely murmur was in fact another name for the Son itself, though Megasthenes, from ignorance or inattention, has named them separately. This discovery led to another of greater moment; for Chandragupta, who, from a military adventurer, became, like Sandracottus, the sovereign of Upper Hindostan, actually fixed the seat of his empire at Patliputra, where he received ambassadors from foreign princes; and was no other than that very Sandracottus who concluded a treaty with Seleucus Nicator; so that we have solved another problem, to which we before alluded, and may in round numbers consider the twelve and three hundredth years before Christ

म्हणजे जोन्स साहेब आपला पूर्ण इतिहास गुंडाळू पाहत होते. आणि अश्या इंग्रजी विद्वानांच्या शून्य मूल्य असलेल्या संशोधनाला आपल्या देशातील अनेक विद्वान कवटाळून बसतात ही ह्या देशाची शोकांतिकाच म्हणावी.

पुढील लेखात वेद, वेदांगे व त्यावर आधारीत साहित्य ह्यांची ओळख करुन देण्याचा प्रयत्न करेन.

* शबर ह्या राजाचा उल्लेख ह्या लेखात दोनदा आला आहे. एकदा दस्यु राजा म्हणून तर एकदा विश्वामित्राच्या १०० पुत्रापैकी एक म्हणून. मानसपुत्र असल्यामुळे हे सहज शक्य आहे.
** जारज प्रजा म्हणजे उभयतात लग्न न होताच निर्माण झालेली प्रजा. राजवाड्यांनी भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास ह्या पुस्तकात कर्णपर्वाचे संवाद दिले आहेत.
*** लेखातील त्रुटी माझे अज्ञान मानावे. संदर्भासहित दुरुस्ती दाखवली तर मी लेखात दुरुस्ती करेन.

प्रकार: 

डो गुहांचे ते वर्गिकरण खुप वाद्ग्रस्त आहे असे वाटते (गुगल सर्च). कारण त्यात जनुकांचा अभ्यास नव्हता. वंश, रेस ह्या अर्थी केवळ लोकांच्या जैविक खुणा वापरून केलेले ते वर्गिकरण होते / आहे.

जनुकांच्या अभ्यासावरून मिळालेली माहीती इथे बघता येइल. अजुन संदर्भ मिळले कि टाकेन. रेस ही जैविक वर्गिकरण आहे.

भाषिक संकर झालच त्याला प्रतिवाद नाही. आर्य भारतात आले ह्याला पुरावा नाही. जर वेदिक समाज व संस्क्रुती जाणुन घ्यायची असेल तर ती जशी वेदात दिसते तशिच जाणावी त्याला भुगोलाचे पुरातत्वाचे अधिष्टान अजुन तरि मिळालेले नाही Happy असे वाटते.

भारतीय इतिहास टाइम्लाइन

आर्य भारी होते हे गृहितक आता मोडले गेले आहेच पण आर्य आले म्हणवून घेण्याने फारसा फडक पडू नये कारण आर्य आले ते टोळ्यांमध्ये. तत्कालिन लोकसंख्येच्या कितीतरी कमी प्रमाणात!

एकदम पटेश
खूप छान लेख. आर्यन इन्वेजन थेअरी ऐवजी आर्यन मायग्रेशन थेअरी म्हणायला हरकत नाही.

पेशव्याला अनुमोदन..
मी अ‍ॅक्च्युअली केदारला हेच विचारायला आलेले की माझ्या वाचनानुसार असे पुरावे कुठेच मिळाले नाहियेत. आहेत ते फक्त हायपोथिसिस आहेत (निदान मी जितकं वाचलं त्यावरून तरी).
मी केदारनं मांडलेल्या थेअरीच्या पुराव्यांसंदर्भात कुठे वाचायला मिळेल का ते विचारायला आलेले (खरच तसं असेल तर दुसर्‍या बाजूचही वाचता यावं म्हणून)

बरोबर आहे. डॉ गुहचे संशोधन हे फक्त हायपोथिसिस आहे. जनुकांचा अभ्यास त्यांनी केला नाही. पेशवा वा तू म्हणतेस त्यात तथ्य असेलही पण असे तुम्ही कुठे वाचले, त्याचा आधार इ ची माहिती देणार का? कदाचित मग मी हे जे वर मांडतोय ते व आर्य आलेच नव्हते असे दोन्ही मिळून एक वेगळे रसायन निर्माण होऊ शकते. Happy

ही माझी थेअरी अजिबात नाही, फक्त माहिती. भाष्य करण्याइतका अभ्यास अजून केला नाही. Happy

स्वातीच्या प्रश्नावर विचार केला की महाभारतात आर्य स्त्रि वगैरे का आले असावे. तर संकर कालात दस्यु राजे पण पुत्रासमान गणले गेले, बोटावर मोजन्याइतके राजे आर्य व बाकी अनार्य जे एकमेकांसोबत रोटीबेटी व्यवहार करत. त्यांचे पुत्र होऊन राहत वा त्यांचासोबत इतर राजांवर हल्ले करत. काहींनी आर्य हे संबोधन स्विकारले असावे. जसे इंग्रज आल्यावर बर्‍याच ठिकाणी लगेच आई बाबाचे मम्मी डॅडी किंवा मम्मी पप्पा झाले. संबोंधन जरी वेगळे असले तरी आई वडिल देशीच तसेच ते मुळ दस्यु राजे असण्याची शक्यता अजिबात नाकाराता येत नाही.

थोडे पुढे जाउन विचार केला तर असे लक्षात आले की बर्‍याच युद्धात देव हारत व देवांना मदत करायला दुसरे कोणी राजे पुढे येते. उदा. दशरथ, कैकयी. हे उदाहरण अगदी शिवाजी महारांजाविरुद्ध मराठेच मोगलांकडून लढत तसे आहे. म्हणजे देव एखाद्या पणी किंवा दस्यु (मुळ लोक) राजावर आक्रमण करत, तिथे हारले की दुसर्‍या एखाद्या मोठ्या अनार्य राजाची मदत घेत.

(हे दोन्ही मत माझे आहेत, चुकीचे असू शकतात. पण कधिकधि उत्तर फार सोपे असू शकते. Happy )

रुढार्थाने हिंदू ज्यांची आपण पुजा करतो ते सर्व.
देव आहेतच का? देव आणि धर्माचा संबंध का? देव ही कल्पना की सत्य ह्या सर्व गोष्टी ह्या अनेक वेगवेगळ्या चर्चेचा भाग व्हाव्यात. त्यांची व्याप्ती खूप जास्त आहे. त्या कल्पणांना वा भागांना मी शिवणार नाही कारण "आहे हे असं होतं किंवा असावं " अश्या प्रकारचे लेखच फक्त लिहायचा माणस आहे.

अर्थातच वेगळी चर्चा करायची असेल तर माझी काहीच हरकत नाही. Happy

मी फक्त शेवटच्या पोस्टबद्दल विचारत होतो - देव व राजे एकमेकांची मदत करत. तर हे देव कोणते? या गोष्टी कधीच्या आहेत?

केदार,

अर्य आले होते ही थेअरई आहे. त्याला पुरावा नाही. आर्य आले नव्हते ह्यालाही पुरावा नाही. आर्य कोण होते? हा प्रष्ण अनुत्तरीत आहे. वेदांतर्गत संदर्भाने वेदांचा काल्खंड १५०० बीसी समजला जातो. जो मानव समुह स्वत:ला आर्य म्हणवून घेतो त्याची रेस कोणती हे माहीत नाही. ते वंशाने आशिया खंडातले होते का बाहेर्चे हे अजुन निर्विवाद सिद्ध झालेले नाही. आर्य आणि द्रविड हे समुह रेस म्हणुन समजु नये तर भाशीक समुह असे धरावे असे वाचल्याचे स्मरते (संदर्भ शोधतो आहे).

जे पेंटेड ग्रे वेअर आर्यांशी जोडण्यात येते तीच संस्कृती आता हरप्पा नंतर ज्या संस्कृत्या निर्माण्झाल्या (लोकलाइझेशन फेज) त्यातली एक समजलई जाते. (चु.भु.ध्या.घ्या.)

त्यामुळे जेंव्हा तु वेदकालीन भारत मांडत आहे तेंव्हा ह्या मुद्द्यचा विचार व्हावा इतकेच. बाकी तु ह्या विषयावर लिहिणे थंबौ नयेस अशि इच्छा.
सिंधु संस्कृतीचा खुप तगडा प्रभाव पुढे निर्माण झालेल्या संस्क्रुतिवर आहे... ह्या संदर्भात कही लेख वाचले होते. संदर्भ मिळले कि टाकतोच

ही माझी थेअरी अजिबात नाही, फक्त माहिती. भाष्य करण्याइतका अभ्यास अजून केला नाही.
>> अरे, तुझी थेअरी म्हणजे तू उद्धृत केलेली थेअरी अशा अर्थानं म्हटलेलं ते..

आत्ता फक्त एकाच पुस्तकाच नाव आठवतय.. (पण ह्यापेक्षा इतरही पुस्तकं होती ज्यात असे रेफरन्सेस होते.. आठवली की (आणि तर) त्यांचीही नावं टाकेन):
Hinduism - a short history
Author: Klaus K. Klostermaier

पुस्तकात त्यानी आर्य आले ह्याच्या पुष्ट्यर्थ जे कुठले मुद्दे तत्कालीन इतिहासकारांनी मांडलेले - ते का बरोबर नाहीत ह्यावर स्वत:चे मुद्दे मांडले आहेत.

पुरातत्ववेत्या वरदाला मध्यंतरी एकदा विचारलेलं की ती काही माहिती देऊ शकते का..
अशा विषयावरची सर्वसामान्य माणसांची (मी ) मतं ही फक्त वाचलेल्या पुस्तकातून घडलेली असतात - पण फिल्डमधे काम करणाराच जास्त सांगू शकेल की खरच काही पुरावे सापडलेत का नाही... का खरच सगळी थेअरी पूर्णतः हवेत आहे..

अर्थात कुठल्याही शक्यतेविरुद्ध पुरावा असल्याशिवाय ती नाकारता येणार नाही..

अग्नीपूजा पर्शिया/पारशी यांच्यापासून आली नाही...

आर्य हे प्रामुख्याने दोन देवताम्ची पूजा करत. इंद्र आणि वरुण. पूर्वीच्या काळी असुर हा शब्द चांगल्या अर्थाने वापरला जात होता.. या देवाना त्या काळी असुर म्हणत. सुर हा शब्द कालांतरने निर्माण झाला अणि शब्दांचे अर्थ बदलले.

असुर वरुणाची भक्ती प्रामुख्याने करणारा एक वर्ग निर्माण झाला, जो स्थलांतराच्या काळात पर्शियात स्थिरावला.. हाच पारशी धर्म.. असुर हा शब्द अवेस्तात जाताना अहुर असा झाला.. पारशी लोक त्यांच्या देवाला अहुरा म्हणतात.

<<सिंधू संस्कृतीच्या उत्खननात मारुतीचे चित्र किंवा मूर्ती सापडली आहे>>
यासाठीचा संदर्भ कृपया सांगाल का?मला थोडं आश्चर्य वाटलं या माहितीचं.

इंद्र ही देवता नसून राजा होता असे मत मी नेहमी ऐकते. पण इथे चर्चेत कुणीच मांडलेले दिसत नाही..या दृष्टीनेही विचार व्हावा..

लेख खूप छान आहेत केदारसाहेब..वाचून आणि चर्चा वाचूनही छान वाटलं. Happy

बापरे ! 3 वर्षांनंतर हा बाफ पुन्हा वर आणला ! धन्यवाद! अतिशय उत्तम माहिती................... आणखी लेख आहेत का असे? असल्यास वाचायला आवडेल

इंद्र ही देवता नसून राजा होता असे मत मी नेहमी ऐकते.>>> इंद्र हा राजा आहे हे खरे आहे. पण तो राजा कोणाचा? हा प्रश्न पडायला कि मग उत्तर मिळतो तो देवांचा राजा आहे. त्यातल्या त्यात खोलात गेलात तर असे दिसेल की इंद्र देवांचा राजा आहे पण तो अमर्त्य नाही. इंद्राला मृत्यू आहे. फक्त तो इतरांच्या तुलनेत दिर्घायू आहे. आजून खोलात जाऊन रुग्वेद वाचल्यास असे दिसेल की हे देव, देवाचे राजे अन इंद्र यांची हयात(रुग्वेदाप्रमाणे) युद्ध करण्यात गेली अन अनेक वेळा देवांचा व इंद्राचा पराजय झाला. म्हणजे इंद्रापेक्षा कोणीतर बलाढ्यही आहे. कोणे आहे तो? त्याची उत्तरंही रुग्वेदात सापडतात. इंद्रांचा व देवांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे शिश्नदेव (म्हणजेच शंकर)
रुग्वेदात शंकराचा संदर्भ शत्रू म्हणूनच येतो. रुग्वेदात दहा मंडलं आहेत. प्रत्येक मंडलाचा जनक किंवा लेखक हा वेगळा रुषी (रुषी कसं लिहतात रे भाऊ?) असून त्या रुषिंनी सरस्वती नदिच्याकाठी बसून वेदांची निर्मिती केली असे दिसते.
वेदांचे लेखक जरी वेगवेगळे रुषी असले तर वेदा तयार करून घेणारा मात्र एक क्षत्रिय राजा आहे. त्या राजाचे नाव सुदास असून वेद लिहणारे रुषी त्याच्याकडे वेगवेगळे वेळेस एम्पॉय्ड होते.

संपुर्व रुग्वेद वाचून झाल्यावर असे लक्षात येईल की रुग्वेदाती ९ मंडलांचा एकंदरी तत्वज्ञान हा निरिश्वरवादी आहे. रुग्वेदाला आत्मा मान्य नाही, पुनर्जन्मही मान्य नाही. ते निसर्गपुजक असून होम हवनातून निसर्गाला प्रसन्न करण्याचं तत्वज्ञान रुग्वेदात आहे. थोडक्यात रुग्वेदाची थेअरी म्हणचे 'द सिक्रेटच्या' लेखिका रोंडा बाइच्या 'द लॉ ऑफ अट्राक्शन' शी मिळती जुळती आहे. पण पुरुषसुत्त मात्र प्रचंळ घोळ घालतो. तो अगदी रुग्वेदाच्या विरुद्ध जाणारा सिंद्धांत मांडतो. (म्हणून तज्ञांच्या मते हे नंतरून घुसडल्याचे म्हटले जाते) कारण इतर नऊ मंडलं म्हणजे निसर्गपुजक व अग्नी पुजक अशीच आहे.

वैदिक देवांची यादी येणेप्रमाणे, इंद्र, वायू, जल, अग्नी, वगैरे वगैरे....
संपुर्ण रुग्वेदात विषूचा एकदाच उल्लेख येतो. तेही पुर्ण रुचाभर न येता फक्त साडेतीन रुचातच येतो. तो इंद्राचा मित्र असल्याचा संदर्भ येतो.

वैदिक देवांचा कट्टर शत्रू म्हणजे शिश्नदेव. म्हणजे शंकर हा अवैदिक देव आहे. शंकरा हा होम हवनात अडथळा आणायचा. म्हणजे जेंव्हा वेदांच्या निर्मिती होत होती तेंव्हा शैव धर्म/पंथ अस्तित्वात होता. गाव तिथे शिव-पींड असण्याचा इतिहास हेच सांगून जाते की ही माती शैवांचीच होती. वैदिक नंतर आलेत हे वेदांवरून सिद्ध होते.

बृस फूट नावाचा इंग्रज अधिकारी सैन्य घेऊन मद्रासवरून निघाला तेंव्हा एका ठिकाणी त्याचा तळ पडला व तिथे त्याला २५,०००/- वर्ष जूने मानवी सापळे सापडले ज्याना उत्तरेच्या दिशेनी डोकं करून पुरलं होतं. उत्तर म्हणजे कैलाश पर्वत. म्हणजे २५,०००/- वर्षा पुर्वी शैव धर्मीय व शिवाची पुजा व्हायची. बुश फूटचं हे संशोधन १८६३ चं आहे. नेटवर थोडीशी माहिती मिळते त्यांच्या बद्दल.

शंकराचे भक्त व लिंग पुजक समाज मात्र वैदिकांच्या अगदी उलटा आहे. वैदिक हे निसर्गपुजक तर शैव हे उपासना धर्मी. उपवास करणे, देवाला प्रसन्न करणे, व पुनर्जन्म वगैरे गोष्टी शैवांच्या.

शैव-वैष्णवांचा झगडा इतका वाढत गेला की आदिशंकराचार्याना अद्वैत सिद्धांत मांडात या दोघाना एकत्र करावं लागलं. आजही दक्षिणेत असे काही शैव आहेत जे वैष्णव दर्शन करत नाहीत.

रुग्वेदाच्या अग्दी उलट मात्र अथर्ववेद आहे. त्याला मात्र, इश्वरा पासून ते आत्मा पुनर्मन्म सगळच मान्य आहे. म्हणून मला नेहमी शंका येते की हा वेद शैवांचा तर नाही ना????

तो वेद अवैदिकांचाच आहे.. जैन, बौद्ध यांचा उदय झाल्यावर वैदिकांची यज्ञमय दुकाने बंद पडू लागली. मग त्यानी मोठ्या खूबीने अवैदिक देवता गणपती, लक्ष्मी, विष्णू, कार्तिकेय, शंकर, शक्ती, ब्रह्मदेव वगैरे आपल्याश्या केल्या आणि यज्ञ विझवून मूर्त्यांची दुकाने मांडली... त्यावेळेव्ला त्यानी अथर्ववेदाला आपला मानला. त्यापूर्वी वेदत्रयी अशी कल्पना होती व अथर्वाला स्थान नव्हते.

. रुग्वेदाला आत्मा मान्य नाही, पुनर्जन्मही मान्य नाही.

आणि वेदाला मूर्तीपूजाही मान्य नव्हती.. गंमत म्हणजे आजचा इस्लामही पुनर्जन्म व मूर्तीपूजा अमान्य करतो !! आणि आजचा हिंदु मात्र पुनर्जन्म व मूर्तीपूजा मानतो.. काळाचा महिमा!

आज हे वाचनात आले. सरस्वती पुन्हा वहू लागेल अशी शक्यता आहे. हे असे काही काम चालू आहे याची अजिबात कल्पना नव्हती. वाचून खूप मस्त वाटले.

पुत्र म्हणजे ज्याची आपल्यापासून उत्पत्ती होतो तोच असा अर्थ वेदकालात नव्हता. > > > >

पुत नामक नर्कातुन आपल्या कर्मांनी जो आपल्या पित्याचा उद्धार करतो तो म्हणुन पुत्र.

माधवा,
आज हे वाचनात आले. सरस्वती पुन्हा वाहू लागेल अशी शक्यता आहे. > > > >

वाहणारी सरस्वती, वळवून दुसरीकडेच चालली आहे,

धर्मसंकर सतत होत असतो ह्याचे हे उदाहरण . . . . भगवान शंकराला वैदिक धर्माचा शत्रु ? छे, छे, सत्य संदर्भ कसे आणी कुठे लावायचे आणी . . . . काय सांगावे,

नमस्कार मंडळी, चुकुन आलो, क्षमा असावी.

केदार,

लेख आणि लेखमाला उत्तम आहे. बरीच माहीती मिळतेय.

एक छोटीशी नजरचूक :

'तपोबीजप्रभावैस्तु तें गच्छन्ति युगे युगे |
उत्कर्ष चापकर्ष च मनुष्येष्विह जन्मतः || (मनु १०|४३ )

वरील श्लोक मनुस्मृतीच्या १० व्या अध्यायातील ४२ वा श्लोक आहे.

धन्यवाद! Happy

आ.न.,
-गा.पै.

Pages