वेदकालीन संस्कृती भाग १

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

संस्कृती म्हणजे काय?

भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असे म्हणतात. अगदी शाब्दिक अर्थ न घेता रुपकात पाहिले तर इतर देशांपेक्षा भारत हा देश प्रगत होता असा त्याचा अर्थ सहज निघावा. कुठलाही देश प्रगत होण्यासाठी तेथे राहणारा समाज इतर चांगले विचार अंगिकारणारा असावा लागतो. आपली भारतीय वैदिक संस्कृती प्राचीन संस्कृतींपैकी एक प्रगत संस्कृती मानली गेली आहे. कुठल्याही संस्कॄतीची वाढ ही परिवर्तन झाल्याशिवाय होत नाही, तसेच ही संस्कृतीही त्याला अपवाद नसावी.
रानटी समाज जाऊन प्रगत समजाव्यवस्था तयार व्हायला काही हजार शतके लागली असण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही, पण आपला इतिहास जेवढा जुना आहे तेवढा आज तरी माहित असलेल्या जगात तेवढा जुना इतिहास आपल्या संस्कृतीशिवाय आणखी एक दोन संकृतींचाच आहे. मुळात संस्कृती म्हणजे काय?

संस्कृती : माणूस व्यक्तिशः व समुदायशः जी जीवनपद्धती निर्माण करुन अंगिकारतो, आणि स्वतःवर व बाह्य विश्वावर (जनसमुदाय, निसर्ग ) संस्कार करुन जे अविष्कार निर्माण करतो ते करण्याची पद्धत व तो अविष्कार म्हणजेच त्या समुदायाची संस्कृती होय. थोडक्यात निसर्गावर विजय मिळविन्याचा क्रम म्हणजे संस्कृती. आधिभौतिक व आध्यात्मिक असे संस्कृतीचे दोन भाग आहेत. साधारण आपण असे म्हणू शकतो की ज्या क्रियेने बाह्य विश्वावर बदल घडून येतो ती भौतिक संस्कृती व ज्याने माणसात, त्याचा अंतर्मनावर संस्कार / बदल घडून येतो ती आध्यात्मिक संस्कृती.

माणूस शहाणा झाल्यापासून तो निसर्गाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, निसर्गावर विजय मिळविण्यास तो प्रगतिशील आहे. निसर्गाच्या जडणघडणीला कोण जबाबदार आहे? देव नावाची गोष्ट असावी काय? असल्या्स तिचे ऊद्दीष्ट काय? हे प्रश्न माणसाला तो शहाणा झाल्यापासून पडत आहेत. माणसाचा भौतिक गरजा भागल्या की त्याला वेध लागतात, ह्या विश्वाचे रहस्य जाणून घेण्याचे, तो मग ह्या विश्वकर्त्याच्या शोधास निघतो व त्यातून त्याला कळेल ते तत्वज्ञान निर्माण व्हायला सुरू होते आणी हिच आध्यात्मिक प्रगती होण्याची नांदी होय. संस्कृतीच्या आध्यात्मिक भागात धर्म, निती, कायदा, कला, साहित्य, मानवी सदगुण आणि शिष्टाचार ह्यांचा अतंर्भाव होतो.

ह्या जडणघडणीत मानवाने विवाहसंस्था, आर्थिक संस्था, सामाजिक जीवन इ. नियम निर्माण केले. माणसामाणसामधील संबंध, एका समुहाचे दुसर्‍या समुहाशी संबंध हे प्रस्थापित झाले. प्रत्येक संस्कृतीत परिवर्तन निर्माण होत असते, त्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात, जसे युद्धकाल, शांतीकाल,जेते व जीत ह्यांची एकमेकांशी वागणूक इ इ. शिवाय कोणत्याही संस्कृतीच्या प्रगतीच्या कालखंडात जे काही असते त्याचे मूल्य त्या कालखंडापुरते मर्यादित असते. असायला पाहिजे. युग बदलले की मुल्ये बदलतात. म्हणजे संस्कृतीची जडणघडण ही कायम होत असते. एकदा चांगली असलेली संस्कृती एखाद्या रानटी समुहा बरोबरीच्या युद्धात जर हारली तर त्यात होणारे बदल हे त्या संस्कृतीला त्याकाळाच्या मागे नेणारे ठरतात तर प्रगत समुहाबरोबर युद्धात हारली तर पुढे नेणारे ठरतात.

भारताची संस्कृती म्हणजे काय? ती ह्या जडणघडणीतून मुक्त असेल काय? उत्तर साहजिकच नाही असे येते. ज्ञात कालापासून ते आजपर्यंत आपली संस्कृती बदलत गेली आहे, कारण मुल्ये ही त्या युगापुरती असतात हे आपण आधीच मांडले आहे, तसाच परकीय आक्रमणाचा देखील आपल्या संस्कृतीवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
वैदिक कालखंड जर शून्य असे पकडले तर त्यानंतर जैन धर्म स्थापना, बौद्ध धर्म स्थापना हे वैचारिक बदल तर शक, हुण, यवन आणि म्लेच्छ ही आक्रमणे आपल्या संस्कृतीने पचविली आहेत. त्यातिल पहिले दोन बद्ल हे वैचारिक होत, मानसिक उन्नती साठी झालेले हे बदल आहेत, ही प्रगती आध्यात्मिक तत्वज्ञान मांडणारी व संस्कृतीच्या आध्यात्मिक बाजूला उन्नत करणारी होती तर शक, हुण, यवन आणि म्लेच्छ ही आक्रमने तत्कालिन भारतीय संस्कृतीपेक्षा हीन दर्जाच्या संस्कृती होत्या, रानटी अवस्थेतून त्या बाहेर पडून त्यांनी भौतिक प्रगतीची द्वारे खुली केली होती. भौतिक प्रगती पूर्ण झाल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती सुरु होणे ही गरजेच्या तत्वात तेवढे चपखल बसत नाही, त्यामुळे ह्या हीन संस्कृतीचा संकर इ स पूर्व कालात व्हायला सुरु झाला होता.

कार्ल मार्क्स म्हणतो की आर्थिक प्रगती हा कोणत्याही संस्कृतीचा प्राण आहे. आर्थिक प्रगती झाली असेल तर इतर गोष्टी जसे कला, धर्म, आध्यात्मिक प्रगती, ह्या संस्कृतीच्या दुसर्‍या भागाची प्रगती व्हायला सुरु होते.

थोडक्यात संस्कृती म्हणजे काय व तिची जडणघडण कश्याप्रकारे होऊ शकते ते आपण पाहिले.

इतिहासाची आपली ओळख होतेच मुळी हडप्पा व मोहजंदारो ह्या गावांच्या नाववरुन.

लहानपणी कधीतरी आपण हे दोन नावं ऐकतो व त्यावरुन ठरवतो भारत फार प्रगत होता. हे खरे असावे काय? त्यास प्रमाण काय? येथील लोकं खरेच प्रगत होते की इतर विद्वजन आरोप करतात तसे भारत कधीच प्रगत नव्हता हे आपण येत्या काही लेखात पाहू.

मोहजंदारो ह्या शब्दाचे दोन तीन अर्थ विद्वान लावतात. मोहन जं दारो म्हणजे हे गाव कृष्ण संबंधित असावे, मोहन हे कृष्णाचे नाव आहे. व माउंड ऑफ डेड म्हणजे जिथे अनेक लोकं एकाच वेळी गाडले गेले.
हडप्पा व मोहजंदारो येथील उत्खननात अनेक गोष्टी सापडल्या, जसे लोखंड धातू, पाण्याचे नियोजन, घरांचे नियोजन, रस्ते, विविध मुर्ती, आयुर्वेदाच्या दॄष्टिने निंब, शिंग, काही वनस्पती, इ इ त्यात सध्यापुरते जास्त खोलात न शिरता आणखी एक महत्वाची गोष्ट सापडली ते म्हणजे मृत शरीर. कार्बन डेटिंग करुन ती ४५०० ते ५००० वर्षांपूर्वीची असावित असे गृहित धरन्यात येत आहे तसेच मृतांचे कारण अतिपूर व युद्ध हे देखील कळत आहे. ह्या सापडलेल्या प्रेतांवरुन मानववंशासंबंधी काही अनुमान बांधता येतात, म्हणून ती जास्त महत्वाची. त्यातील काही प्रेते ही मंगोलाईड व काही द्रविड मानववंशाची होती असे निश्चित झाले आहे.

आता थोडक्यात आपण आर्य आक्रमणाकडे पाहू. म्हणजे आर्य आक्रमण झाले वा झाले नाही ह्यात अनेक मतभेद आठळून येतात. आपण तुर्तास झाले व नाही झाले ह्या दोन्ही बाजू पाहू.

सिंधुसंकृती हडप्पा, मोहजंदाडो ह्या तत्कालिन प्रगत संस्कॄती अचानक नाहीश्या का झाल्या असाव्यात ह्याचे कारणं स्टॅनली वोलपार्ट सारखे अमेरिकन इतिहासकार आर्य-अनार्य ह्या युद्धामुळे झाल्या असे म्हणतात. हडप्पा वगैरे प्रगत असल्या वर धातूंचे त्यांनी संशोधन केले असले तरी त्यांना घोडा हा प्राणी माहीत नव्हता व आर्यांकडे घोडा हा धावणारा प्राणी असल्याकारणाने युद्धात ते वरचढ ठरले. तत्कालिन आर्य समाज हा हडप्पा संस्कृतीपेक्षा अतिशय मागास पण युद्धात प्रविण होता. हडप्पा हे शहर पाण्याखाली आले, त्याचे कारण स्टॅनली असे देतात की आर्यांनी हडप्पावाल्यांच्या पाणी साठवून ठेवायच्या साधनांना फोडले व त्यामुळे पूर येऊन हडप्पा बुडाले व अनेक मृतदेह विचित्रावस्थेत त्यामूळेच सापडतात. आर्यदेव इंद्र ह्याने एक युद्ध केले होते, सतत २१ दिवस हे युद्ध चालले व पाण्यामुळे इंद्र जिंकला ह्याचे वर्णन पुराणात आहे, स्टॅनली ह्यांचामते हे युद्ध म्हणजेच आर्य व हडप्पा ह्यांचे युद्ध जे इंद्राने पाण्याचा वापर करुन जिंकले. ह्या युद्धवर्णनात इंद्र सोमयाग करतो असे वर्णन ही आहे. म्हणजे आर्यानी एकजात अनार्यांची कत्तल केली त्यामुळे माउंड ऑफ डेड निर्माण झाले. ही झाली एक बाजू, पण तर्क असा की सर्व जुन्या संस्कृती ह्या पाण्याच्या शेजारी वसत. नदिला अचानक पुर आल्यामुळे ह्या संस्कृती नष्ट झाल्या असाव्यात. त्यामुळे ही गावं नष्ट का झाली ह्याचे निश्चित कारण नाही. पण सिंधूसंस्कृती मधील ह्या दोन महत्वाचा संस्कृती, ज्या प्रगत होत्या. आर्य आले असले तरी त्यांनी त्यांचा वाहना (घोड्या) बरोबरच ह्या संस्कॄतीतील काही भौतीक बाबी आत्मसात केल्या असे वादासाठी गृहित धरायला हरकत नसावी.

१९३३ मध्ये डॉ गुह ह्यांचा संशोधनाखाली भारतातील मानववंशाची अधिकृत माहिती -
भारतात मुख्यतः सहा मुख्य भारतवासी वंश आहेत / होते ते म्हणजे.
१. नेग्निटो
२ प्रोटो ऑस्ट्र्लॉईड
३ मोंगोंलॉईड
४ भुमध्यसमुद्रीय
५ पश्चिमी पृथकपाली
६. नॉर्डिक

सध्या नेग्निटो हा वंश केवळ अंदमान निकोबार मध्ये आहे. मोंगोंलॉईड हे भारताचा पूर्व भागात (मेघालय, आसाम, मनिपुर,नागालँड इ ) आजही आहेत. भुमध्यसमुद्रीय वंशाचे लोक प्रामुख्याने दक्षिण भारतीय किंवा द्रविडी म्हणून प्रसिद्ध आहेत. तर नॉर्डिक हे लोक युरोपमधून टोळ्यांनी आले व त्यांनी आपली संस्कृत भाषा सोबत आणली व इ स पूर्व २००० ते १२०० ह्या दरम्यान ते कधीतरी किंवा समुहाने येत राहिले पंजाब, राजस्थान, गंगेचा दुआब, महाराष्ट्रातील चित्पावन ब्राह्मण ह्या लोकांमध्ये नॉर्डिक अंश विशेष प्रमाणात दिसतो. असा एक मतप्रवाह आहे.
ऑस्ट्रलॉईड वंशाने कृषिपद्धती शोधली असे माणले जाते, पण त्याचवेळेस मोहजंदारो व हडप्पा येथेही कृषीपद्धत विकसीत झाली होती ह्याकडे कधी कधी दुर्लक्ष होते. विद्वजनांमध्ये अनेक मुख्य व उपमुख्य मतप्रवाह आढळून येतात. हळद कुंकू, नौकानयन, अवजारे, बूमरॅंग, सुपारी, उसाची साखर काढने, कापसाचे कापड तयार करने, मानवास उपयुक्त प्राणी पाळणे, नारळ,सुपारी ह्यांचा पुजेची साधने म्हणून वापर करने, मरणोत्तर जीवनावर भाष्य, पुनर्जन्माची कल्पना इ इ गोष्टी ह्या ऑस्ट्रलॊईड लोकांच्या देणग्या होत असे माणले जाते.

हडप्पा व मोहजंदारो येथील नमरचनाकार लोकांची भाषा द्रविडी होती का? ह्याचा निश्चित पुरावा नसला तरी तेथे नॉर्डिक प्रेत अजूनही सापडले गेले नाहीत (शेवटचे उत्खनन १९६४) त्यामूळे हडप्पा संस्कृती आर्य नव्हती हे मात्र निश्चित आहे.

भाषा संस्कृती : ह्यावर खूप मोठे संशोधन केले जात आहे. संस्कृत, पाली, अर्धमागधी, अपभ्रंश, पैशाची, महाराष्ट्री इ भाषा बोलल्या जात असत. ऋग्वेदात दास व दस्यु या नावांचे अनार्य पण आर्यांशी स्पर्धा करणारे मानवगण आढळतात, तसेच दास व दस्यु इराणातही होते. त्या भाषेत दास चे दहए व दस्यु चे दंह्यु वा द्क्यु असे रुपांतर आढळते. दंह्यु म्हणजे शत्रुदेश. देशनामे व जननामे (म्हणजे पांचाल, कुरु, काशी, कोशल, विदेह, मत्स इ इ) ही एकच असल्यामुळे त्या त्या मानवसमुहाला ती ती नावे प्राप्त झाली. आर्यसत्ता सगळीकडे स्थापन झाल्यावर दह्यु ला दास हे नाम प्राप्त झाले. दास म्हणजे गुलाम. शमर, शुष्ण, चिमुरि, धुनि इत्यादिंना इंद्राने जिंकले असे ऋग्वेदात म्हणलेले आहे. व त्यांना ऋग्वेदात दस्यु हे विशेषन देखील लावले आहे. पराभूत जनता आर्यावर हल्ले करत म्हणून नंतर दस्युंना चोर ही सज्ञाही प्राप्त झाली. वरिल पराभूत जमाती ह्या रानात पळून गेल्या.

ऋग्वेद कोणाची देन?
- संस्कृत भाषा व संकर भारताबाहेरील पश्चिमेकडील (म्हणजे युरोप ) भाषात ट, ठ, ड, ढ, ण, ळ हे वर्ण नाहीत पण वेदात हे वर्ण आहेत. ह्याचे कारण निट समजू शकले नाही पण हे द्राविडांच्या संकरामुळे हे वर्ण आले असावेत व आधीच्या लढायांनंतर हे दोन्ही समाज एकत्र निवास करु लागले असावेत असा तर्क आहे. ऋग्वेदाची भाषा हा संकर निर्माण झाल्यावरची आहे. ऋग्वेद ऋचा संस्कृत भाषेवर अनेक संस्कार निर्माण झाल्यावर तयार करण्यात आल्या आहेत. म्हणूनच वेद हे फक्त आर्यांची देण आहेत हा समज खोटा ठरतो.

टीप :
१.हा लेख मुख्यतः स्वअभ्यासाने मांडला आहे. वॉलपार्टचे तसेच अनेकांची ह्या विषयावरील अनेक पुस्तकं वाचली आहेत पण हा लेख लिहीताना ती पुस्तकं समोर नाहीत, तर जमा केलेली माहिती परिक्षेत पेपर लिहताना आपण जशी लिहतो तशी सहज लिहली आहे, जो प्लो आहे तो परत संदर्भासाठी डिस्टर्ब न करता मनात जसे आले ते उतरवले आहे, पण ह्यातील प्रत्येक वाक्याला माझ्याकडे आधार आहे.
२.भाषा, मानववंश व संस्कृती म्हणजे काय हे लिखाण तर्कतिर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ह्यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास ह्या पुस्तकातून मला आकलन झाले त्याप्रमाणे घेतला आहे.

वरील दोन्ही कारणांमूळे काही त्रुटी राहण्याची शक्यता जास्त आहे पण ह्या लेखमालेचा उद्देश अभ्यास ग्रंथ म्हणून माहिती मांडणे हा नसून ह्या विषयाची तोंडओळख व्हावी हा आहे. हा विषय खोलात जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी ह्यावर स्वतःचा असा अभ्यास करणे आवश्यक आहे. चूक निदर्शनास आणून दिली तर मी जरुर ते बदल अवश्य करेन.
विचार मांडणे हा उद्देश असल्यामुळे व जात्याच शुद्धलेखनाचा अभाव असल्याने शुद्धलेखनाच्या य चुका आहेत ह्याची मला खात्री आहे, त्या सांगितल्या तर ते शुद्धरुपात प्रसिद्ध करता येईल.

वेदकालीन संस्कृती भाग २

प्रकार: 

Harrapa ani monanjodaro hya gadlya gelelya sanskruti ahet yha var pan ekmat nahi. Srav lok marle gelet ( pura mule / yudha) hyla kafi thos purava nahi. Kadhachit srava lok bikhurle gele asavet asa ek andaz ahey.

केदार एक बेसिक प्रश्न.
वेद चार आहेत. १)रुग्वेद २)सामवेद ३) यजुर्वेद आणि ४) अर्थर्ववेद.

१) सामवेद हा रुग्वेदाचाच भाग असून स्त्रोत्रांचे लयबद्धतेत ते कसे म्हणावे असे त्यात सांगितले आहे.
२) यजुर्वेदात विधी कसे करावे याच्या प्रक्रिया दिल्या आहेत.

आता माझा प्रश्न असा आहे की, जर सामवेद व यजुर्वेद हे रुग्वेदातील काही भागाची सखोल आवृत्ती असेल तर मग ते स्वतंत्र वेद नाहित. ते रुग्वेदाचे उपवेद आहेत.

याचाच अर्थ वेद चार नसून दोनच आहेत.
१)रुग्वेद २)अर्थर्ववेद.

स्टॅनली व तत्सम लोकांना भारतात कधी काय झाले ह्याचे ज्ञान कसे मिळाले?

M,

फार पूर्वी मी नाशिकला एका ९० वर्षांच्या एका विरक्त साधूकडून ऐकले आहे कि वेद ४ नसून एकच वेद होता. कलीयुगाच्या आरंभी महर्षी व्यासांनी जाणले कि कलियुगातील लोकांची बुद्धी वेदांना ग्रहण करू शकत नाही. म्हणून त्यांनी (परमेश्वराच्या आज्ञेनुसार व नारदांच्या प्रेरणेमुळे) उपासकांच्या कल्याणासाठी वेदातील अतिशय छोटा असा सारभूत भाग घेऊन त्याचे ४ भाग केलेत. मुळात वेद एकच आहे, व तो ह्या चारी वेदांपेक्षा फार प्रचंड आहे. ह्याच सुमारास अनेक ऋषींनी बर्याच वेदमंत्रांना शाप देऊन ठेवले आहेत.

एम
ऋग्वेदातीलच भाग अन्य वेदांमध्ये आढळतो म्हणजेच त्यातील संहितेचा भाग आढळतो. प्रत्येक वेदाचा प्रतिपाद्य विषय वेगळा आहे. जसे तुम्ही म्हटलेच आहे की सामवेदामधे गायन इ.
ऋग्वेद हाच सर्वात जुना वेद मानला जातो.इतर नंतरचेच आहेत.
अथर्ववेदाला अधी अन्य वेदांच्या बरोबरीचं स्थान नव्हतं. बर्‍याच ठिकाणी पाहिलत तर 'त्रयी' असाच उल्लेख सापडेल.अथर्वात 'काळी जादू' संदर्भात उपचार अस्ल्याने हे असावं.

भाषेसंदर्भात थोडंसं
भाषा ही सतत बदलणारी गोष्ट आहे. भाषाबदलात अनेक गोष्टींचं योगदान असतं. त्यामुळे त्यावरून ठोस निश्कर्ष काढणं खूप धोक्याचं असतं.
ळ्,ड असे वर्ण द्रविड भाषांमधून आले असं सर्रास म्हटलं जातं. सर्वात मान्य करता येण्याजोगा हाच पक्ष आहे. पण तोच एकमेवच खरा आहे असंही नाही. हा भाषेचा अंतर्गत विकासही असू शकतो. कारण सगळ्या मानवजातीकडे speech apparatus सारखंच आहे.
तात्पर्य,भाषेचा आधार घेऊन तज्ञ मतं मांडत असले तरी ती १००% खरी असतील असे प्रत्यक्ष ते तज्ञही मानणार नाहीत असं मला वाटतं. केवळ वस्तुस्थितीच्या जास्तीत जास्त जवळ जातील असे अंदाज भाषेच्या अभ्यासाने मांडता येतील.

बापरे ! 3 वर्षांनंतर हा बाफ पुन्हा वर आणला ! धन्यवाद! अतिशय उत्तम माहिती................... आणखी लेख आहेत का असे? असल्यास वाचायला आवडेल

<वेद हे भारतातच निर्माण झाले. आणि ते पण इ.स.पूर्व १५०० च्या बर्‍याच आधी. म्हणजे मॅक्स्मुल्लरचे म्हणणे चूकीचे ठरते.>>>

लोकमतचे पत्रकार सूर्यकांत पळसकर यांचा एक लेख वाचनात आला. त्यात ब-याच गोष्टी तथ्यवार सांगितल्या आहेत. आज भारतात बोलल्या जाणा-या भाषांबाबत त्यांनी मॅक्समूल्लरचे म्हणणे लेखात दिले आहे. श्री. पळसकर लिहितात :

मॅक्समुल्लरने भारतातील सध्या अस्तित्वात असलेल्या भाषांमध्ये एक पॅटर्न शोधून काढला. या भाषांनी दोन वर्तुळे केली आहेत. मधल्या भागात हिंदी आणि तिच्या बोली भाषांचे वर्तुळ असून, बाहेरच्या बाजूने पंजाबी, सिंधी, काश्मिरी, गुजराथी, मराठी, उडिया, बंगाली, आसामी, नेपाळी या प्रादेशिक भाषांचे वर्तुळ आहे. या सर्व भाषा एकमेकांच्या बहिणी आहेत! या पॅटर्नमधून मॅक्समुल्लरने अंतर्वर्तुळ-बहिर्वर्तुळ सिद्धांत मांडला. आर्यांनी भारतात टोळ्या टोळ्यांनी असंख्य आक्रमणे केली. आधी आलेल्या टोळ्या सप्तसिंधूंच्या प्रदेशात स्थिर झाल्या होत्या; मात्र नंतर आलेल्या टोळ्यांनी त्यांना गंगेच्या खो-यापर्यंत खाली ढकलले. मागाहून आलेल्या टोळ्यांनी आधी आलेल्या टोळ्यांच्या भोवती कडे केले. मधल्या भागातील आर्यांच्या भाषेतून हिंदी आणि तिच्या बोली भाषा तयार झाल्या, तर बाहेर कडे करून राहिलेल्या आर्यांच्या भाषांतून प्रादेशिक भाषा तयार झाल्या, असे मॅक्समुल्लर म्हणतो. आर्य इथलेच आहेत, असा दावा करायचा असेल, तर मॅक्समुल्लरचा हा सिद्धांत खोडून काढावा लागेल.

या लेखातील खालील परिच्छेदही वाचा :

सिंधू संस्कृतीत घोड्याचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. या उलट ऋग्वेदातील आर्यांच्या संस्कृतीला घोड्याशिवाय अस्तित्वच नाही. सिंधू संस्कृती शहरांची संस्कृती आहे. या उलट भटक्या आर्यांचा मुख्य देव इंद्र हा ‘पुरंदर' म्हणजे शहरे उद्ध्वस्त करणारा आहे. सिंधू संस्कृतीत शेती होत होती; त्यामुळे कालवे आणि धरणे होती. इंद्र मात्र बांधलेले कालवे उद्ध्वस्त करणारा आहे. वृत्रासुराला मारून इंद्राने सप्तसिंधूंचे पाणी मुक्त केले, अशी वर्णने ऋग्वेदात आहेत. अशा प्रकारे या दोन्ही संस्कृतींचे मूळ रंगरूप कुठल्याच बाबतीत जुळत नाही.

यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत काय म्हणाल?
हा लेख अवश्य वाचा. लिन्क देत आहे - http://suryakant-palaskar.blogspot.in/2014/10/blog-post_22.html

Pages