२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग ११

Submitted by बेफ़िकीर on 14 June, 2010 - 03:10

२०३ डिस्को ही कादंबरी आता शेवटच्या काही टप्प्यांमधे पोचलेली आहे. कदाचित चार किंवा पाच भाग व्हावेत असे वाटते. सर्व वाचक व प्रतिसादकांच्या प्रतिसादांचे व सपोर्टचे अनेक आभार!

-'बेफिकीर'!

==============================================

आपले रत्न काय दिवे लावून आले आहे हे ललिताला माहीत नसल्यामुळे रेखाला डिस्कोवर आणण्याचा प्रस्ताव वगैरे तिने फारसा विचारात घेतलाच नाही. ते माहीत असते तर तर मुळीच घेतला नसता आणि उलट गजूला रात का राजावर पाठवून दमबाजी करण्याचा प्रयत्न केला असता.

बजबजलेल्या आणि बरबटलेल्या त्या वस्तीत एकाचवेळेस दोन प्रेमकहाण्या फुलत होत्या. त्या प्रेमकहाण्यांमधे प्रत्यक्ष सहभागी असलेल्या प्रेमी जीवांशिवाय कुणालाच ते माहीत नव्हते.

साहू आणि रेखा.. एक पैसाही न देता केवळ मने जुळल्यामुळे साहूने आपल्याशी तसे करणे हे रेखाच्या पाच वर्षांमधील अनुभवात नव्हते. त्यामुळेच तिच्या चेहर्‍यावर त्यावेळेस तृप्तीचे भाव होते. वखवख किंवा तिटकारा नव्हता.

आणि.. दुसरी प्रेमकहाणी होती.. फारच परिपक्व प्रेमकहाणी... ललिता आणि गजू..

गजूच्या चांगल्या स्वभावाचा परिणाम होता तो. तिथे राहूनही गजू वखवखल्यासारखा वागत नव्हता. ललिता सांगेल ते काम करत होता. डिस्कोतीलच काय तर इतरही कुठल्या मुलीबद्दल तसली नजर बाळगत नव्हता. त्याचे धडधाकट कमावलेले शरीर, चेहर्‍यावरचे शांत अन हसरे भाव आणि गेल्या अनेक वर्षात ललिताची मानसिक प्रेमाची न भागलेली गरज हे घटक या मनजुळणीस कारणीभूत ठरणारे होते.

साहूची प्रेमकहाणी गोपीलाही माहीत नव्हती. पण एकदा अचानक साहू वर आला तेव्हा...

आपली आई स्वतःच गजूला कंपार्टमेंटमधे हसत हसत घेऊन जात आहे अन तिच्या चेहर्‍यावरचे भाव गिर्‍हाईकाला आत नेताना असतात तसे नाही आहेत हे साहूने पाहिले होते. नशीब साहू तिथे आल्याचे त्या दोघांच्या लक्षात आले नव्हते.

साहूच्या बाबतीत ललिता आणि ललिताच्या बाबतीत साहू बेदरकार होण्याची सुरुवात नेमकी इथे झाली.

इथे लक्षात घेणे आवश्यक आहे की ललिता फक्त तीस बत्तीस वर्षांची होती. तिचा नवरा गेल्याला आता अनेक वर्षे झालेली होती. भानूसारख्या राक्षसाने तिच्या आयुष्यात आणलेले वादळ इतक्या वयातच काय याच्या जवळपास अर्ध्या वयात पेलण्याची वेळ तिच्यावर आली होती. या सर्व परिस्थितीत कुठेतरी मन रमणे, कुणीतरी आवडू शकणे हे शक्य होते. कुणाचातरी मानसिक आधार वाटणे, त्या माणसावर जीव जडणे हे शक्य होते. त्यात ललिताला दोष देता येणार नाही. तसेच ते पाहून साहूला आईबद्दल राग येणेही तितकेच स्वाभाविक होते. आपल्या आईला लाजलज्जाच उरलेली नाही असे त्याला वाटत होते. आईच अशी वागत असेल तर माझ्यावर काय म्हणून बंधने हा विचार प्रकर्षाने आणि सातत्याने येत होता मनात! साहू स्वभावाने शांत असला तरी एकेक घटनाच अशा घडत होत्या की मनावर त्यांचे ज्वलनशील थर बसत होते आणि वाट पाहात होते ठिणगीची! किरकोळ नाही.... एखाद्या मोठ्या ठिणगीची!

रात्री आठ वाजल्यापासून साहू गीताविहारमधे जाऊन बसलेला होता. साहूने फक्त गोपीला सांगीतले होते की मी गीताविहारमधे बसणार आहे. बाकी गल्ली केव्हाच साहूला विसरून आपल्या देशाच्या महान संस्कृतीवर चिखलफेक करायला सरसावलेलीही होती.

चहा किती पिणार? सोडा? किती वेळा सोडा पिणार? पाव शॅम्पल झाले, एक प्लेट भजी झाली आणि.. त्यानंतरचा चहा अर्धाच झालेला असतानाच...म्हणजे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास...

रेखा आणि मंदी या दोघीजणी .. नेहाला घेऊन रस्त्यावर आल्या...

सरसावलेला साहू बिल भरून बाहेर येऊन उभा राहिला. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या मंदीचे अर्थातच साहूकडे लक्ष नव्हते. नेहा तर मंदी आणि रेखाच्या सतत पाया पडून गळ्यात गळे घालायचा प्रयत्न करत होती. तिच्यामते आज तिची सुटका होणार होती. शेवटी तिच्या त्या आविर्भावांनी बघ्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून मंदीने तिला गप्प उभे राहायला सांगीतले.

मात्र रेखा.. आल्याक्षणीच तिने साहूला पाहिलेले होते... नेत्रपल्लवी करणे शक्य नव्हते. मंदीला संशय आला तर सत्यानाश अटळ होता.

अण्णाची गाडी लांब केदारी चौकाच्या पलीकडे उभी राहिलेली साहूला दिसत होती.

पहिल्याच प्रयत्नात नेहा मरेल असे काही नव्हते. पण दुसरा प्रयत्न करण्याअगोदर नक्कीच ती पळून जायचा प्रयत्न करणार होती. कारण मगाशी एक गाडी भरधाव वेगात आलेली असताना त्या गाडीच्या दिशेने या दोघींनी आपल्याला ढकलले हे तिला नक्कीच त्याच क्षणी समजणार होते आणि त्या धक्क्यातून सावरताच ती तिथून पळायचा प्रयत्न करणार होती. हे त्या दोघींना माहीत असल्यामुळे त्या तिला पळू देणार नव्हत्या.

आणि एका क्षणार्धात अचानक काय झाले ते लक्ष्मी रोडला समजणे शक्यच नव्हते.

प्लॅन तरी भारी होता..

......नेहा..

नेहाच्या शरीरावर जखमी असल्याची खूण नव्हती. एकही! भडक प्रसाधनांमुळे अन उत्तान कपड्यांमुळे तिच्या जखमा केव्हाच झाकल्या गेलेल्या होत्या किंवा निदान तिच्या अंगावर जखमा आहेत हे फिरणार्‍यांच्या लक्षात तरी येत नव्हते.

साहू पाहताक्षणीच द्रवला होता. का या बिचारीला मारायचे? तिची चूक काय? तिने धाडस केले इतकीच? दहशत पसरावी म्हणून असे वागायचे? नेहाबद्दल साहूला त्या क्षणी अतीव कणव वाटली. आपण हिला वाचवायला गेल्याचे समजले तर आपले काय होईल हा विचारच त्याच्या मनात येत नव्हता. फक्त नेहा.... आणि नेहा...

तिचा तो आक्रोश अजून कानात साठलेला होता.. मुझे बाहर निकालो भैय्या.. बाहर निकालो मुझे...

कायमचे बाहेर जाणार होती ती काही क्षणांनी! पण तितक्यात विचित्र प्रकार घडला. एक म्हातारा फिरत फिरत त्या तिघींपाशी आला. त्याचे नाव होते कनक! उधारीवर जमेल त्या मुलीकडे जाण्याचा त्याला छंद होता. त्यामुळे तो अप्रिय होता. पण दोन चार दिवसात मागचे पैसे देऊन टाकायचाच तो! त्यामुळे गिर्‍हाईक अजिबात येत नाही अशी स्त्री कनकला स्वीकारायची. कनक तिथे आला अन नेहाकडे बघत बसला. मंदी आणि रेखाने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. नेहा मात्र त्याची आपल्या शरीरावरून फिरणारी नजर पाहून शहारली होती. हा कोण मधेच उपटला हे तिला समजत नव्हते. ती आळीपाळीने त्याच्याकडे अन त्या दोघींकडे पाहात होती.

कनक - नयी है??
मंदी - जा रे ए ***** .. चल्ल.. चल चल..

मंदीने सरळ कनकचा हात धरून त्याला बाजूला केले. तरी तो लाळघोट्या कुत्र्यासारखा पुन्हा तिथे आला.

कनक - आज रोकड है.. उधार नही.. ये देख पचास के दो नोट..

नेहा आपली किंमत ऐकून संतापलेलीही होती अन मायूसही झालेली होती. पण अजून त्या दोघी त्याच्याकडे दुर्लक्षच करत होत्या. नेहाचे नशीब बहुधा जोरावर असावे. कारण कनकने सरळ तिचा हात धरला अन मंदीने फाडकन कनकच्या थोबाडात आवाज काढला. कनक कच्चा नव्हता. त्याने यापुर्वी मंदीला कैकवेळा अनुभवलेले होते. एका साध्या धंदेवालीने आपल्याला मारावे? कनकने भान आल्यावर मंदीच्या गालांवर जोरदार मुष्टीप्रहार केल्यामुळे ती जखमी होऊन खाली कोसळली आणि रेखा तिच्याकडे धावली. मंदी शिव्या देत ओरडत असतानाच रेखाने कनकला धरून मारायला सुरुवात केलेली होती. नेहा प्रचंड घाबरून या प्रकाराकडे पाहात असतानाच...

साहू... रेश्मा.. थापा.. यांना ती सर्वोत्कृष्ट संधी समजली..

साहू सरळ धावत धावत तिथे गेला आणि नेहाला काहीही कळायच्या आत किंवा कुणालाही नीटसे जाणवणार नाही अशा पद्धतीने तिच्या कानात हळुवरपणे पण तीक्ष्ण आवाजात म्हणाला..

साहू - रेखा और मंदी तुझे गाडीके नीचे ढकेलके मारनेवाले है.. तुझे भगानेवाले नही है.. कहीभी देख मत.. लेकिन दूरपे एक गाडी खडी है.. उसीके नीचे तेरी मौत है.. अगर भागना चाहती है.. तो अभ्भी भाग.. इस चौकसे सीधी निकल और ऑटोमे बैठ.. ये ले चालीस रुपये.. मै भाई हूं ना तेरा.. विश्वास कर मेरा.. भाग... अभी भाग.. तुझे मारनेका प्लॅन है इसीलिये लालनबाई और रामन दूसरे गांवको गये है.. जा .. जा भाग..

एवढा मोठा संवाद बोलूनही तिकडे कुणाचेच लक्ष नव्हते. कारण कनक अन रेखा एकमेकांना हीन शिवीगाळ करत मारायचा प्रयत्न करत होते अन जवळपासच्या बर्‍याचशा मुली अन बायका ते सोडवायचा प्रयत्न करत होत्या. .... मात्र! ... मात्र नेहा अन साहूकडे दोन डोळे मात्र लागलेले होते कधीचे...

अण्णा! केदारी चौकाच्या बराच पलीकडे असलेला अण्णा लांबून त्या मारामारीकडे दुर्लक्ष करून आपले संपूर्ण लक्ष नेहावर केंद्रीत करत होता. कारण त्याच्याही दृष्टीने ही फारच चांगली संधी होती. या भांडणाच्या गडबडीत अपघात होताना कुणाचे आधी लक्षच जाणार नव्हते. पण प्रॉब्लेम असा होता की तिथे आता इतकी गर्दी झालेली होती की गाडीखाली नेहाच येईल असे सांगता येत नव्हते. आणि नेमके त्याच्यातच... साहू इकडे तिकडे बघत नेहाच्या अगदी निकट उभा राहून काहीतरी बोलत होता अन तिच्या हातात काहीतरी सरकवत होता हे दिसले.. नेहा अननुभवी होती.. अशा वेळेस आपली देहबोली कशी असावी याचा विचार करण्याची तिची पात्रताही नव्हती अन मनस्थितीही! ती खिळून आणि थिजून साहूकडे थेट पाहात त्याचा एक एक शब्द कानात अन मनात साठवत होती..

"जा.. जा भाग जा... "

हे ऐकले अन नेहाने कसलाही विचार न करता केदारी चौकाच्या उलट्या बाजूला धाव घेतली. गाडीत बसलेल्या अण्णाने दात ओठ खाल्ले. पण आता गाडी चालू करून उपयोग नव्हता. कारण नेहा फूटपाथवरून पळत सुटली होती. आणि नेहा उजवीकडे वळून दिसेनाशी झाल्यावर अण्णाने गाडी सुरू केली अन रिव्हर्स घेतली. भर सिटि पोस्टासमोर अपघात झाला तरच मी मदत करू शकेन हे उरवणेचे वाक्य त्याला आठवले.

प्लॅन फिसकटलेला होता. नेहाच्या मागे कुणीच धावत नव्हते. सगळ्या बायका कनकला बुकलत होत्या. तो खाली पडून आवाज न करता मार खात होता. बघे जमलेले होते. आणि अचानक रेखा अन मंदीला जाणवले..

नेहा इज गॉन.. नेहा.. पळून गेलेली आहे..

नेहापेक्षा आपले काय होणार याच चिंतेत दोघींनी केदारी चौकाकडे खाडकन पाहिले. अण्णाची गाडीही नव्हती. जड पावलांनी इकडे तिकडे बघत रेखा गल्लीत वळताना साहू अचानक समोर आला.

साहू - कहा था नं मैने? बचगयी नेहा..

अख्खी बुधवार पेठ आपल्या डोळ्यांसमोर गरगरा फिरत असल्याचा भास झाला रेखाला.. साहूकडे भूत पाहावे तशी पाहात ती विद्युत वेगाने 'रात का राजा' मधे गायब झाली.

साहूला काहीही क्लृप्ती न करताच एक विजय मिळाला होता. नेहाला वाचव अशी रेखाची मागणीच नव्हती. रेखाला यायचे होते डिस्कोला! अन साहूने ते न करता नेहालाच पळायला मदत केली होती.

दोन तासानी उरवणेला अपेक्षित असलेल्या तक्रारी ऐवजी वेगळीच तक्रार दाखल करून घ्यावी लागली.

'रेखा व मंदी या दोन वेश्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे कनक या नावाचा इसम गंभीर जखमी'

हाफ मर्डर!

चला! फुल्ल मर्डरचे हाफ मर्डरवर निभावले तर!

अण्णाने आकाशपाताळ एक करून दोघींना तिसर्‍या दिवशी सोडवून आणले अन.. तो दिवस मात्र भयानक होता त्या दोघींसाठी!

रामन, अण्णा आणि खुद्द लालनबाई या तिघांनी त्या दोघींचे अपरिमित हालहाल केल्याची बातमी नुसतीच पसरली. आत कोण जाणार? साहूची तडफड तडफड होत होती. आपली रेखा.. आपली रेखा आपल्या चुकीमुळे बेदम मार खात आहे अन छळ करून घेत आहे स्वतःचा! ऐकवतच नव्हते त्याला. आत जाण्याचे धाडसही होत नव्हते. आपल्या पुरुष असण्याची लाज वाटायला लागली होती. आणखीन एक जहरी वेष्टन बसले होते मन नावाच्या स्फोटकावर! साहू.. रेश्मा.. थापा .. या नावाचा बॉम्ब आता स्वरूप धारण करू लागला होता.

आपण नेहाला वाचवले याचा सात्विक आनंद त्याला घेताच येत नव्हता. कुठे गेली असेल ती? काहीच कळत नव्हते. कळले. तेही कळले. एका अज्ञात कुमारीने रेल्वेखाली जीव दिल्याची बातमी अन नेहाचे प्रेत ओळखल्याची बातमी चवथ्या दिवशी दोन तासांच्या अंतरांनी बुधवारात पोचल्या.

सूतक! जणू सूतक असल्यासारखा चेहरा झाला होता साहूचा! हाती काहीच लागले नाही. सहा तासांनी आणखीन वेगळ्या बातम्या पोचल्या. तिचा निर्घृण बलात्कार झालेला होता मरण्याआधी! आणि बहुतेक ती आत्महत्या नव्हतीच! अण्णाला अटक करावीच लागली होती उरवणेला! मुक्ती संघटनेच्या स्मिता जोशीने रात का राजाचे असली स्वरूप पेपरात जाऊन सांगीतले अन दुसर्‍या दिवशी बुधवार पेठेत युवतींचा होणारा राक्षसी छळ अख्ख्या पुण्याने वाचला.

मोर्चे आले. एक दोन पुढारी आले. पोलीस तर तैनात होतेच!

लालनबाई आणि रामनला अटक झाली. अनेक मुली विनापरवाना शरीर विक्रय करत असल्याचा आरोप आधी ठेवला. त्यानंतर रेखाने अन मंदीने स्वतःच्या झालेल्या छळाचे शहारे आणणारे वर्णन स्मिता जोशीला सांगीतले.

साहूमुळे त्या दिवशी नकळत एक गोष्ट झाली. नेहा फार वाईट पद्धतीने मेली ही घटना खरोखरच अशुभ अन अभद्र होती. पण अख्ख्या बुधवार पेठेने त्या दिवशी 'रात का राजा' वर सूड उगवला. अमानवी वागणार्‍या लालनबाई आणि रामनला बाहेर काढताना तिथल्याच पब्लिकने लाथा बुक्य्यांनी तुडवले. पोलिसांना लोक आवरेनात! गोपीने सगळ्यात जास्त सूड उगवला. अत्यवस्थ अवस्थेत दोघेही अ‍ॅडमिट झाले. आणि.. त्या गल्लीतून 'रात का राजा' हे नाव कायमचे पुसले गेले..

विनापरवाना शरीर विक्रय करणार्‍या अनेक युवतींना अन त्यांच्या कोठेवाल्यांना तात्पुरती अटक वगैरे झाली. डिस्को मात्र त्यातून पूर्णपणे वाचले. तोहफा आणि वेलकमही वाचले.

रेखासहीत काही व्हॅलीड लायसेन्स असलेल्या मुली जमाईराजा, रंगमहाल वगैरे कोठ्यांवर विभागल्या गेल्या. एकटी रेखा.. एकटी रेखा साहूच्या शिफारसीमुळे आपले अत्यंत दुखरे अंग आणि मेलेले मन घेऊन शालनदीदीचा हात धरून ...

... डिस्कोवर आली..

मुक्ती संघटनेची स्मिता जोशी आता हिरॉईन ठरलेली होती. साहूला आपले प्रेम सतत डोळ्यासमोर राहील याची खात्री पटलेली होती.

आणि पहिल्यांदाच ललिताला हे समजले होते.... की आपले चिरंजीव आता मोठे झालेले आहेत...

आईला मुलाचे काय चाललेले असते ते नुसते चेहर्‍यावरून समजले तर नवल नाही. रेखाची अन साहूची त्या पंधरा दिवसांमधली नेत्रपल्लवी ललिताला व्यवस्थित समजलेली होती. ललिताला काळजी एकच होती! ती म्हणजे रात का राजाच्या बहुतेक सर्व मुली एड्सग्रस्त आहेत किंवा काही ना काही रोग झालेल्या आहेत हे तिला ज्ञात होते. त्यामुळे ती डोळ्यात तेल घालून साहू अन रेखावर नजर ठेवत होती.

=====================================

पाच वर्षे! पाच वर्षे पसार झाली. बुधवार पेठ तशीच होती त्या पाच वर्षात! एक रात का राजा नष्ट झाले म्हणून करूण कहाण्या संपत नव्हत्या.

डिस्कोवर बरेच फरक झालेले होते त्या काळात! रेश्माबाईला आता रेश्मामौसी असे प्रमोशन मिळालेले होते. गंगाबाई मेली होती. शालन व रेश्माने स्वतः शरीरविक्रय बंद केलेला होता. गजू अन रेश्मामौसी यांचे नाते सगळ्या पेठेने स्वीकारलेले होते. रोहिणी नावाच्या वेश्येला तिच्या घरचे येऊन चक्क घेऊन गेले होते. हा प्रकार होऊ शकतो हे बघितल्यावर अनेक मुलींना आशा वाटू लागली होती. रेश्मामौसी फार उदार अन दिलदार स्वभावाची आहे अशी ख्याती पसरली होती.

गोपीने शरीरविक्रय बंद केला म्हणण्यापेक्षा त्याला आता कस्टमरच मिळत नव्हता. त्यामुळे तो कोठ्यावर बसून डिस्कोची सगळी व्यवस्था बघू लागला होता. रेश्माने त्याला हाकलले नव्हते. गोपीसाठी रेश्मा आता देवी ठरली होती.

चारू अन श्रीदेवीची जादू कधीच संपली होती. चारूला पुन्हा मुंबईला जायचे होते. पण जाता येत नव्हते.

रेखाला रोग आहे पण तो जीवघेणा नाही आणि साहू अन रेखा एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांचे संबंधही येतात ही गोष्ट ललिताने केव्हाच पचवली होती. साहूने आजवर रेखासाठी एकदाही गिर्‍हाईक आणलेले नव्हते. रेखाकडे चार चार दिवस कुणी आले नाही तरीही तिचा मुळीच पाणउतारा होत नव्हता.

आणि.. अण्णा सुटून आला होता.

आणि त्यानंतर सहाच महिन्यात अपंग झालेला रामन आणि नक्शा उतरलेली लालनबाई पुन्हा गल्लीत आले होते. आता त्या तिघांनाही कुणीही विचारत नव्हते. उरवणे जरी नोकरीवर अजूनही असला तरी स्मिता जोशीमुळे त्याची इतकी बदनामी झाली होती की लांबच्या एका आमदाराच्या हस्तक्षेपामुळेच त्याची नोकरी वाचली होती. आणि आता त्याच्याशी संबंध असण्याचा अण्णा किंवा रामनला काहीही उपयोग नव्हता. कारण त्याला तेव्हाच ट्रॅफिक ब्रॅन्चला ट्रान्स्फर केले गेले होते. त्याच्या जागी साबळे नावाचा अधिकारी आलेला होता जो कायद्याने वागणारा म्हणून प्रख्यात होता.

स्मिता जोशीने पेठेत अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणल्या होत्या. महिन्याची महिन्याला तपासणी, शिक्षण प्रसार, रुग्णालयात सेवा उपलब्ध करून देणे, गल्लीतील स्वच्छता वगैरे वगैरे!

या पाच वर्षात साहू अनेक वेळा चौकीवर या ना त्या कारणाने जाऊन आलेला होता. किरकोळ भांडणे, मारामार्‍या या व्हायच्याच! मांढरेसेठ मरून गेला होता. नाना साठे दोन, तीन महिन्यातून एकदा तरी येऊन जायचा.

तोहफाची लैला कधीच जादूहीन झालेली होती. तोहफावर आता मनीषा म्हणून एक मुलगी बोली लावण्याच्या पात्रतेची होती. मात्र, या कालावधीत डिस्को आणि तोहफा व्यवसायाच्या पातळीवर फार मागे पडले. वेलकमला अचानक अमजदने तीन मुली आणलेल्या होत्या. झरीना, कंचन.. आणि स्नेहा..

स्नेहा हे अख्ख्या बुधवाराचे आकर्षण ठरली होती. तिचा बोलबाला मुंबईच्या फोरास रोडलाही व्हावा इतकी ती आकर्षक होती म्हणे!

आणि त्या दिवशी अनंतचतुर्दशीला पहाटे संपूर्ण लक्ष्मी रोडवर किमान दोन लाख लोक असताना अन अफाट धांगडधिंगा चाललेला असताना.. वेलकमच्या मागील बाजूला झिरमीची जी इमारत होती.. ती कोसळून पाच वेश्या मृत्यूमुखी पडल्या होत्या आणि सोळा जखमी झाल्या होत्या..

.......लातूरला भूकंप झाला होता पहाटे साडे तीन वाजता.. संपूर्ण भारत हादरेल असा भूकंप!

हा भूकंप साहूच्या आयुष्यातील भूकंप असावा असा ठरला.

झिरमीची बिल्डिंग कोसळल्याचे कळताच एकमेकांमधील सगळी दुष्मनी विसरून अख्खी बुधवार पेठे तिथे धावली. डिस्कोच्या काही मुली सोडल्या तर साहू, गोपी, ललिता, शालन आणि आणखीन पाच, सहा जणी तिथे धावल्या. रेखा आली नाही. आणि कोसळलेल्या इमारतीतील आपल्या जुन्या मैत्रिणींचा आक्रोश बघताना केवळ बुधवारातील इतर वेश्याच रडत नव्हत्या तर पब्लिकचेही डोळे पाणावले होते.

कुणाचे काय चाललेले आहे हे कुणालाच समजत नव्हते. कोण कुठे आहे हे कुणाला कळत नव्हते. नुसता हाहाकार उडाला होता.

आणि कुणाला काही समजायच्या आधी शरीफा अन रमासेठने ललिताला खेचली अन वेलकमच्या तळघरात नेली. पाचच मिनिटात अमजद, कबीर आणि मुंगूस धावत धावत आले. अत्यंत घाईघाईत ललिताला लाथा बुक्यांनी मारहाण करून त्या राक्षसांनी...

... त्या पहाटे साहूच्या आईचा... ललिताचा निकाल लावला..

काळे निळे पडलेले ललिताचे प्रेत झिरमीच्या इमारतीच्या लगद्यात त्यांनी कसे ढकलले त्यांचे त्यांनाच माहीत..

आणि.. अचानक साहूला आई दिसली.. तोंडातून शब्द फुटेना.. समोर जे दिसतंय त्यावर विश्वास बसेना..

आई.. आपली आई.. ही समोर आहे ती आपली आई आहे.. बोलत नाही.. हालत नाही.. अंगावर मार लागल्याच्या खुणा... चेहर्‍यावर रक्ताचे ओघळ... आई.. आपली आई गेली...

डिस्कोची रेश्मामौसी गेली.. ललिता.. साहूची आई गेली..

मागे कुठेतरी लांबवर त्याही परिस्थिती मिरवणूक ओढणार्‍या मंडळाची रेकॉर्ड ऐकू येत होती...

लावारिसपणावर किशोरचा दर्दभरा आवाज हृदय फाटेल असे भाष्य करत होता..

अपनी तो जैसे तैसे.. थोडी ऐसे या वैसे.. कट जायेगी...
आपका क्या होगा.. जनाबे अली.. आपका क्या होगा..
आपभी मेरी तरहा इन्सानकी औलाद है..
आप मुंह मांगी दुवा.. हम अनसुनी फरियाद है..
आपका तो ये पसीना खूनसे भी कीमती..और हमारे खूनकी कीमत यहां कुछभी नही..
अपना तो खून पानी.. जीना मरना बेमानी..
अपने आगे ना पीछे.. ना कोई उपर नीचे.. रोनेवाला.. ना कोई रोने...

'ना कोई रोनेवाली' या शब्दांवर साहूच्या तोंडातून हुंदका फुटला. आणि मग त्याचा आक्रोश बुधवार पेठेला लातूरच्या भुकंपापेक्षा मोठे तडे देऊन गेला..

साहू... रेश्मा.. थापा.. ... यातील 'रेश्मा' आता नव्हती..

दिड दिवस बेशुद्ध असलेल्या साहूला तिचे अंतीम दर्शन घेता आले नाही. गजूने अंत्यविधी केला. अपघाती मृत्यू! कुणाला काही माहीतच नव्हते.

पण.. ज्या म्हातार्‍याकडे पुर्वी साहू चहाच्या दुकानावर काम करायचा त्याला आणि...

वेलकमशी आजन्म दुष्मनी असलेल्या भोलाला.. सगळे दिसलेले होते...

तिसर्‍या दिवशी घाबरत घाबरत तिघेही डिस्कोवर पोचले होते...

साहू वीस वर्षाचा असूनही शालनदीदीच्या मांडीवर डोके ठेवून रडत होता.. एक अन एक मुलगी रडत होती.. गोपीही आक्रोश करत होता... त्यावेळेस...

म्हातारा आणि भोला तिथे पोचले.. आणि त्यांनी साहूच्या वेष्टनांवर आणखीन एक भयानक वेष्टन चढवले..

भोला - अमजद और कबीर मारे रेश्माको.. भूकंपात नाही मेली ती..

चवताळलेला गजू हाताला लागलेला एक गज धरून वेलकमवर जायला धावत असताना त्याला साहूने अडवले..

साहू - मै देखलुंगा.. मुझेही देखना पडेगा... लेकिन आज नही.. अपना अपना टाईम होता है.. शालनदीदी.. डिस्कोमे आजसे कोई रोयेगा नही.. जबतक मां का बदला मै नही ले लेता..

साहूच्या डोळ्यातील थंड अंगार पाहून भोला अन म्हातारासुद्धा दचकले होते...

एक विनाशकारी बॉम्ब जवळपास तयार झालेला होता... साहू.. रेश्मा... थापा..

गुलमोहर: 

माझा पहिला प्रतिसाद..... ग्रेट... खुप सुंदर वळणा घेतेय कथा... पुढच्या भागाची खुप वाट बघतेय

बेफिकिर,
tumhi great aahat. kharach shabd nahit majahya kade.
kal lihta rao tumhi, ekhadi line kiwa max ekhada para khup hoto, vicharancha flow change karayala, bhag padta tumhi vichar change karayala.

kharach ase kahi lihita tumhi ki, comment dya chi aste he ch visarun jato manun, faqt ani faqt vichar karat asto ani manunch, aaj १st time comment deto aahe.
Tumchi Half rice ... wachali, kharach last post paryant suchale nahi comment dyala, Solapur S.. ha tar dhakach hota, me sjun hi tya war pratikiya deu shakat nahi, itke great mandlay tumhi.

tumchya punch line khup manje khupch great.

ajun khup khup lihit raha, kharach. tumcha likhanacha weg khup apratim aahe.

thanks

प्रत्येक वेळेस अप्रतिम असा प्रतिसाद देऊन..... यावेळेस अप्रतिम च्या वरचे विशेषण शोधत आहे....

पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

डॉ.कैलास