२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग ७

Submitted by बेफ़िकीर on 8 June, 2010 - 01:23

मुलाला जीवे मारावे अन नंतर आत्महत्या करावी हा विचार अतिशय स्वाभाविकपणे येत होता ललिताच्या मनात! कबीर सलोनीचा बाप नाही, त्याचा एक डोळा अ‍ॅक्सिडेंटमधे गेलेला आहे ज्यात सलोनीचाही पाय दुखावला गेलेला असून तिला जिना फार चढवत नाही म्हणून ती तळघरात राहते अन तळघरात तिच्या समोर दिसणार्‍या खोलीच्या आतमधे एक अतिशय व्यवस्थित खोली आहे. सलोनीवर अमजदचे प्रेम असल्यामुळे त्याने तिला पाळलेले आहे. सुनंदाने कधीही पळून जायचा प्रयत्न केलेला नव्हता आणि रमासेठ हा वेलकमशी किंवा अमजदशी असोसिएट असलेलाच माणूस असून पोलिसांच्या लफड्यातून वेलकमला वाचवणे हे काम तो मन लावून करतो. त्याने आजवर दिलेल्या पैशांपैकी ललिताकडील जवळपास साडे तीन हजार रुपये शरीफाने काढून घेतले.

आपली नीयत बघण्यासाठी एवढा घाट का घातला या प्रश्नाचे उत्तर तिला सहज समजत होते. यापुढे ललिता कधीच समर्थपणे वेलकममधे उभी राहू शकणार नव्हती. आणि कायम मिंधी राहणार होती. यापुर्वी त्याच मार्गाने गेलेल्या काही मुली वेलकममधे अजून होत्या ज्यांची सुटकाही होत नव्हती अन ज्यांच्या जीवावर वेलकम अजून पैसे कमवत होते.

पहिल्या भेटीत कबीरने सांगीतले होते की त्याला इथे चाळीस वर्षे झालेली आहेत. परवा म्हणाला की सलोनीला इथे दहा अन त्याला सात वर्षे झालेली आहेत. आपल्याला तेव्हाच समजायला हवे होते की गडबड आहे.

एक कॅटेगरी असते ज्यातील मुली ग्राहकाबरोबर बाहेर जाऊ शकतात. साहू ओलिस असूनही आता यापुढे ललिता कधीच बाहेर जाऊ शकणार नव्हती. आजवर गेली नव्हतीच, पण यापुढे ती शक्यताच मावळली होती.

आणि तिची ट्रान्स्फर आता कंपार्टमेंटमधे झाली होती. ग्राहक आला तरच खोली! अन्यथा प्रवेशद्वारावरील मोठ्या खोलीत बसून राहायचे अन पहाटे पाठ टेकायला अन झोपायला एखादे कंपार्टमेंट!

त्या रात्री अमजदने केलेला पाशवी अत्याचार ललिता आयुष्यात विसरू शकली नसती.

एकच मार्ग उरला होता. मरणे! आणि मरण्यापुर्वी साहूला मारणे!

अगतिकतेची परमावधी! आणि.. जगलो तर अजून कितीतरी गोष्टी बघाव्या लागणार होत्या.

साहू एक तर लहान होता आणि त्याचा स्वभाच गरीब होता. मारामारी करणे, भांडणे वगैरे गोष्टी त्याच्या स्वभावातच नव्हत्या. त्यामुळे, त्याला जिवंत ठेवून आपण मरणे ही कल्पना ललिताला सहनच होऊ शकत नव्हती.

मात्र! साहूमधून पुढे एक भयानक स्फोटक तयार होणार आहे हे भवितव्य जर तिला कुणी ऐकवलं असतं तर त्या दिवसाची वाट पाहात ती कितीही वर्षे थांबलीही असती.

शरीफाने त्यातच एक मार्केटिंगचे प्रिन्सिपल अचानक अमलात आणले. कारण नसताना!

ललिताला चारशे रुपये देऊनही आता कुणीही भोगू शकत होते. शरीफाने असे का करावे हे ललिताला समजत नव्हते. आणि समजले! वहिदा! मुंबईची वहिदा आज वेलकमला आली होती. आणि तिच्या फिगरकडे आणि चेहर्‍याकडे बघितल्यावर तोहफा आणि डिस्कोतही अशी मुलगी आजवर न आल्याचे कुणीही मान्य केले असते.

वहिदा! एक म्हणजे तिच्या चेहर्‍यावरचे भाव वेश्यावस्तीत कधीही न शोभणारे, उच्चकुलीन स्त्रीसारखे होते. इथेच ग्राहक बाकीच्या सर्व मुलींना निवडप्रक्रियेतून बाजूला करायचे. त्यात ती सुंदरही होती.

बुधवार पेठेत पहिल्यांदाच वेलकमचा भाव डिस्कोच्या पुढे गेला आणि वहिदाच्या आगमनाची बातमी कर्णोपकर्णी झाली. एकदा तर चक्क गंगाबाईच शरीफाला सहज भेटायला आले असे म्हणून वहिदाला पाहून गेली.

साहू! या सगळ्या घटना घडत असताना साहूला जे समजत होते ते फार कमी होते. एक म्हणजे आपली शाळा कायमची बंद झालेली आहे. का ते माहीत नाही. आता फक्त चहाच्या दुकानावर सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत! दुसरे म्हणजे आपण त्या गटारातून गेलो अन नंतर आपल्याला पुन्हा पकडले. याचा अर्थ इथून सुटका करून घेणे आईला अत्यावश्यक वाटत आहे आणि सुटका होत नाही आहे. तिसरे म्हणजे आपण स्वतंत्र खोलीतून बाहेर आलेलो आहोत.

साहूच्या मनावर अपमानांचे, दु:खांचे, कोंडमार्‍याचे एकावर एक थर बसत होते. या अजाण मुलाच्या मनावर होणार्‍या परिणामांकडे बघायला बुधवार पेठे म्हणजे सांस्कृतिक केंद्र नव्हते. ते होते स्वतःची नासाडी करून घेऊन पुणे शहराची संस्कृती टिकवणारे केंद्र!

साहू त्याच्या त्याच्या परीने दुकानात असताना एक एक गोष्ट समजून घेत होता. कसे पळू शकू यावर तो सतत विचार करत होता. का पळू देत नाहीत हे मात्र नीटसे लक्षात येत नव्हते. पण एकटाच असल्यामुळे व घाबरट असल्यामुळे तो प्रत्यक्ष काहीच करत नव्हता. आपण एकटेच पळून गेलो तर काय हाही विचार त्याने करून पाहिला होता पण तो लगेच रद्दही झाला होता.

आज विचित्र प्रकार झाला. ललिताचा रेट निम्मा झाल्यामुळे एक तर तिच्याकडे येणार्‍या ग्राहकांचा ओघ फारच वाढला होता. एकेकाळची डिस्को क्वीन आता केवळ चारशे रुपयात उपलब्ध झालेली होती. आणि त्या चारशेपैकी ललिताच्या हातात दिडशे, मुंगूसने ग्राहक आणला असेल तर मुंगूसला पन्नास अन्यथा उरलेले सर्व अडीचशे शरीफाबीकडे असा हिशोब होता. त्यामुळे सर्व अपमान सोडून देऊन ललिताही आता येतील तितक्या ग्राहकांना स्वीकारत होती.

मात्र आज! आज मुंगूस स्वतःच ललिताकडे आला. नुकतेच साहूला बरोबर घेऊन फिरण्यावरून त्याचा केलेला जहरी अपमान त्याच्या मनात केव्हाचा ठुसठुसत होता. मुंगूसची मागणी समजल्यावर ललिताने स्पष्ट नकार दिला. शरीफाकडे धावली ती! शरीफा नुसतीच हसली अन 'तुम लोग आपसमे देखलो' म्हणाली.

मुंगूस उर्फ दवे! एक अत्यंत हीन आणि किळसवाणे व्यक्तीमत्व! वर पुन्हा तो चारशे रुपयेही द्यायला तयार होता. वास्तविक पाहता हा माणूस ग्राहक म्हणून आला असता तर ललिताने 'न स्वीकारण्याचा' विचार जरूर केला असता पण कदाचित स्वीकारलाही असता. पण हा माणूस माहितीतला होता. त्याचे विचार, त्याची प्रवृत्ती सगळे माहीत होते. आणि मुख्य म्हणजे 'मै रेश्माके साथ सोया' म्हणत तो पेठेत हिंडला तर आपला भावच संपणार हेही ती जाणून होती. ललिताने साफ नकार दिल्यावर मुंगूस झोंबाझोंबी करायला लागला. ललिताने खवळून त्याच्या गालावर चपराक हाणली. मुंगूस क्षणभर बिचकला.

पण कबीर मधे पडला. कबीरने ललिताचे खांदे धरले अन म्हणाला..

कबीर - क्या समझती है अपने आपको? हेमामालिनी? अं? चल चुपचाप! मुंगूस, उधर जा इसको लेके.. चल ए.. चल अंदर.. देख मत.. मेरी आंख फुई है वैसे तेरीभी फोडदुंगा देखने लगी तो.. चल..

कुणीच नसते का वाचवायला? हेल्पलेसनेस किती असावा?

कबीरच्या ताकदीपुढे नमणेच भाग होते. मुंगूसने उट्टे काढले एका घाणेरड्या कंपार्टमेंटमधे! दार उघडेच ठेवले होते त्याने! कबीर दारात उभा राहून खदाखदा हसत लक्ष ठेवून होता. ललिता मृतवत नजरेने अत्याचार सोसत होती.

मुंगूसने उठल्यावर दिडशे तिच्या अंगावर फेकले अन म्हणाला..

मुंगूस - शरीफाबीने भाडा माफ किया है मेरेको.. ये तेरे डेढसौ.. मैने अपने पचास काटलिये.. आखिर मैने खुदको ग्राहक बनाकर लायाही ना तेरे पास??

जोरजोरात हसत मुंगूस बाहेर पडला अन सगळ्या मुलींना उद्देशून म्हणाला..

मुंगूस - मुर्देकी तरहा सोती है ये.. इसको फालतूमे महारानी बनाके रख्खा था..

सगळ्या हसायला लागल्या. मात्र! स्वतःचीच किळस येत उठताना ललिताने पाहिले..

कबीर! कबीर कंपार्टमेंटचे दार लावून घेत होता.... आतून!

एकटा मुंगूस कुत्ता नव्हता. कबीरपण कुत्ता होता. लचके तोडत होता. त्याचा विरोध करण्यासाठी शब्द तोंडातून काढणेही ललिताला जमत नव्हते.

एक प्रेत! श्वास घेणारे एक प्रेत आज कबीरसमोर सादर होत होते.

आणि एक अत्यंत दु:खदायक गोष्ट घडली या सगळ्यामुळे! जिला शरीफाची परवानगी मिळाली.

ललिता आता दोनशे रुपयात उपलब्ध आहे ही बातमी मुंगूसने वार्‍यासारखी पसरवली.

आजवर ज्या ग्राहकाला तिच्याकडे फक्त बघण्याशिवाय काहीही करणे शक्य नव्हते ती आता ऑब्सोलेट झालेली असल्याप्रमाणे फालतू किंमतीला उपलब्ध झाली.

बुधवार पेठ! येथे प्रमोशन होत नाही जॉबमधे! एकतर डिमोशन होते किंवा... पिंक स्लीप फ्रॉम द अर्थ!

पण.... हे सत्य ललिता स्वीकारायला अजिबात तयार नव्हती.

तिच्यामते ... एक भिन्न मार्ग होता. जो.. कबीरनेच तिला सांगीतला होता.

मौसी बनण्याचा!

रेट एक चतुर्थांश झाल्यामुळे ललिताचा येता जाता पाणउतारा चालू झालेला होता. ज्या मुली आजवर तिला वचकून असायच्या त्या आता सर्वांदेखत तिची टिंगल करू लागल्या होत्या. चोवीस तास अपमानीत होऊन जगणे काय असते हे ललिताला समजू लागले. साहूला आता पुर्वीसारखे लाडप्रेम मिळायचे नाही. रेट कमी झाल्यामुळे एकंदर आमदनी घटली हे उघडच होते.त्यामुळे ग्राहकांची संख्या वाढवणे अत्यावश्यक झाले होते. नाहीतर दोन माणसांचा खर्च शरीफा का म्हणून सहन करणार?

वहिदाच्या येण्यामुळे केवळ ललिताच मागे पडली असे नाही. शरीफाची बर्‍यापैकी धुसफुस सुनंदा अन डिम्पल यांच्याबरोबरही सुरू झाली. आजवर सुनंदा वेलकमच्या व्यवस्थापनामधे सहभागी व्हायची. कोठ्याची एकंदर स्वच्छता, किचनची स्वच्छता, येणार्‍या ग्राहकांचे गप्पा मारून मन रमवणे, विविध मुलींना समान पैसे मिळू शकतील व त्यातून त्यांचा खर्च वजा जाता वेलकमकडे बर्‍यापैकी बचत राहील ही कामे सुनंदा बघत होती. डिम्पल सरळ सरळ हिशोबच बघायची. पण आता अमजद आल्यापासून अमजद स्वतःच ही सगळी कामे करू लागला. हिशोब, दरडावणे, इतरांकडून कामे करून घेणे! त्यामुळे सुनंदा आणि डिम्पल आता नकोशा व्हायला लागल्या. दिड वर्षापुर्वी अमजद दिल्लीला गेला होता, तो जेलमधे गेलाच नव्हता. दिल्लीला अनेक लटपटी खटपटी करून त्याने एक तीन खोल्यांचा फ्लॅट घेऊन तिथे पॉश कॉलगर्ल्स ठेवल्या होत्या. हे करण्याचे कारण अगदी सरळ होते. बुधवार पेठेवर केव्हाही रेड पडायची. फार काळ हप्ते देऊन डिपार्टमेंटला खुष ठेवणे कायम शक्य झालेच असते असे नाही.

दुश्मन का दुष्मन इज अपना दोस्त! या समीकरणाप्रमाणे डिम्पल अन सुनंदा आता ललिताशी सहानुभुतीना वागू लागल्या. यात एक वेगळाच तिढा होता. त्या दोघींपेक्षा आजही ललिताकडे जास्त ग्राहक यायचे. त्या दोघींना दोनशेच्या पातळीला येऊन बरेच दिवस झालेले होते. केवळ कोठ्याचे इतरही काम करतात यामुळे त्यांना जरा महत्व होते. पण तेही काम आता न राहिल्यामुळे त्या ललितापेक्षाही कमी दर्जाच्या समजल्या जाऊ लागल्या. हे शरीफाच्या बोलण्यातून वारंवार येऊ लागले. त्यामुळे त्यांच्या मनात ललिताबद्दल अजूनही एक प्रकारचा हेवा होताच. पण तिघींचाही सतत अपमान होत असल्यामुळे तिघी बर्‍यापैकी एकत्रही आल्या होत्या. आणि.. या एकत्र येण्यातूनच ललिताला आजवर बुधवार पेठेत कधीच न मिळालेले.. मैत्रीयुक्त प्रेम आता मिळायला सुरुवात झाली होती.

सर्वात पहिल्यांदा म्हणजे सुनंदाने ललिताला हे सांगीतले की शरीफा अन कबीरच्या म्हणण्यावरून तुझ्या बाबतीत पळण्याच्या प्लॅनचे नाटक वगैरे केले. रमासेठ शरीफाला देत असलेले पैसे शरीफानेच त्याला दिलेले असतात. या नाटकानंतर तुझे तंगडे मोडून तुला रस्त्यावर सोडून देणार होते. हे नाटक करण्याचे मूळ कारण इतकेच होते की अमजदभाईची बुधवारात दहशत बसावी. तुझ्याच बाबतीत हे करण्याचे कारण म्हणजे तुला मुलगा असल्यामुळे तू पळून जाण्याचा जिवापाड प्रयत्न करण्याची शक्यता इतर मुलींहून खूपच जास्त होती. मात्र आमच्या सांगण्यावरून तुला दुखापत करण्यात आली नाही.

सुनंदा आणि डिम्पल यांच्याच सांगण्यावरून एक दिवस ललिता खिडकीत उभी राहू लागली. आजवर ती आतमध्ये बसलेली असायची. आलेल्या ग्राहकांपैकी जो रेट द्यायला तयार होईल त्याच्याबरोबर आत जायची. पण आता केवळ दोनशे रुपयातच शरीफा समाधानी होत असल्यामुळे पण दोनशेच मिळतात म्हणून ओरडतही असल्यामुळे जास्त ग्राहक मिळवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते.

त्या दिवशी ललिता दुसरी पायरी खाली उतरली तिच्या करीअरमधली!

डिस्को गाजवणारी ललिता आता वेलकमच्या खिडकीत उभी राहते हे दृष्य आता सगळेच पाहू लागले.

येणार्‍या जाणार्‍याकडे बघून हसणे, 'आत या' अशी नेत्रपल्लवी करणे, शुक शुक करणे या गोष्टी ललिता आता उघडपणे करायला लागली. फिरणार्‍या माणसांवर आशाळभूत नजरा टाकणे हा प्रकार तिने पहिल्यांदाच केला. नाही म्हंटले तरी तिच्या सौंदर्याची जादू कुणा ना कुणावर पडायचीच! एक खरे होते की खिडकीत उभे राहायला लागल्यापासून तिला दिवसातून किमान पाच ग्राहक मिळू लागले. एखादा टीपही द्यायचा. मात्र! या ग्राहकांचा दर्जा मात्र आधीच्या ग्राहकांपेक्षा फारच सुमार अन खालचा होता. त्यांचे राहणीमान अगदीच सामान्य किंवा खालावलेले होते. दोनशे रुपये काय? कुणाच्याही खिशात असतात. रेश्मा काय? कुणालाही उपलब्ध होते आता! हे गृहीत धरले जाऊ लागले.

सुनंदा आणि डिम्पल यांनी तर पुढची खालची पातळी केव्हाच स्वीकारली होती. त्या सरळ रस्त्यावरच उभ्या राहायच्या. त्यांना लोक निरखून वगैरे भाव करायचे. त्याही नखरे करत ग्राहकाला स्वतःचा अंदाज घेऊ द्यायच्या!

साहू! या सगळ्या प्रकारात साहूच्या मनात तीव्र चीड उत्पन्न होऊ लागली होती. आपल्याच आईला खिडकीत उभे राहून येणार्‍या जाणार्‍यांना पाहून खाणाखुणा करताना त्याने अनेकदा पाहिले होते. ललिताच्या मनातील लज्जा तर केव्हाच संपली होती. खरे तर तिला आता साहू काय करत असतो अन कुठे असतो हे पाहण्यातही रस राहिलेला नव्हता. तिला दोनपैकी कोणतेतरी एक गोष्ट पाहिजे होती. मृत्यू.. किंवा ग्राहक!

साहू आता आईशी फारसा बोलतही नव्हता. तिला दिवसभर भेटतही नव्हता. रात्री मात्र तिची विचारपूस केल्याशिवाय तो झोपायचा नाही. अनेकवेळा तो दुकानाबाहेरच झोपायचा.

एक नाते अत्यंत अशक्त होत होते. आई आणि मुलाचे!

तीन वर्षे बघता बघता पसार झाली. परिस्थिती अधिकच बिघडली. ललिताही आता रस्त्यावर उभी राहायची. तिला आता शिळे पाके मिळायचे. साहू त्याच्या कमाईतून मात्र काही ना काही आणून द्यायचा खायला वगैरे! आता प्रसाधने वगैरे ललितालाच नकोशी झालेली होती. सजून करायचंय काय? कोण देणार आहे पाचशे रुपये? अंगाला अत्तराचा वास आला म्हणून थोडेच कुणी पन्नास जास्त देणार आहे? आहोत तसे भेटू ग्राहकाला! नाहीतरी ग्राहक तरी काय मोठे चांगल्या राहणीसाहणीचे येतात?

साहू ज्या दुकानावर कामाला होता तेथील म्हातारा आता फक्त गल्ल्यावर बसायचा. साहू बाकी कामे पाहायचा. आणि.. ललिताला.. म्हणजे आईला अजिबात न सांगता अन म्हातार्‍याला अजिबात कळू न देता ... चहा प्यायला आलेल्यांच्या गप्पा मारणार्‍यांमधे जर कुणी शोधक वाटला तर हळूच त्याला एखादी मुलगी किंवा स्त्री सुचवायचा. लाजाळू ग्राहक असेल तर पन्नास रुपये घेऊन हळूच त्याला नेऊन एखादी खिडकी वगैरे दाखवायचा.

सुनंदा रोग झाल्यामुळे वेलकमची साफसफाई इतकेच काम करू लागली. शरीफा तिचा भयानक अपमान करायची. एकदाच सहन न होऊन सुनंदाने शरीफाला शिव्या दिल्या अन शरीफा अन कबीरने मिळून तिला असे काही मारले की तिला नक्की किती लागले आहे ही बातमीही बाहेर गेली नाही. मात्र! रॉकीची आई गेली तेव्हा कबीर एकदाच रडला. तेव्हा ललिताला समजले की रॉकीची आई ही कबीरची प्रेयसी होती. आणि रॉकी कुणाचा मुलगा होता हेच माहीत नव्हते. समोरच्या बिल्डिंगमधील पुर्वाश्रमीची डिस्कोतील प्रार्थना मरून दिड वर्ष झालेले होते. झिरमी मरायला टेकलेली होती. त्या चौकोनातील ती घाणेरडी म्हातारी केव्हाच मेली होती.

सलोनी आता कोठ्यावर बसू लागली होती. हिशोब ती बघायची. हिशोब बघणे अन अमजदला दिवसा अन शरीफाला रात्री खुष ठेवणे या जबाबदार्‍या ती पार पाडत होती.

वहिदा आता कंपार्टमेंटमधे आली होती. लवकरच तीही खिडकीत दिसू लागणार होतीच.

डिम्पल समोरच्या इमारतीत शिफ्ट झालेली होती. कारण त्या इमारतीत सगळ्या एड्सग्रस्त मुली राहायच्या. डिम्पलच्या डोळ्यांचे पाणीच खळत नव्हते.

'तोहफा'मधे लैला म्हणून कुणीतरी भन्नाट पोरगी आलेली होती. बरेच दिवसांनी डिस्को अन वेलकमच्या एकत्रित कमाईपेक्षा जास्त कमाई आता 'तोहफा' करत होते. लैलाला बघायलाच गर्दी उसळायची अशी परिस्थिती होती.

पोलीसखात्यातील उरवणे नावाचा अधिकारी बिनदिक्कत वेलकमला येऊन सेपरेट रूममधे हवी ती मुलगी घेऊन जायचा अन वर जाताना अमजदभाईकडून हप्ताही!

ललिता एकदा उरवणेबरोबर त्या खोलीत गेलेली होती. हिंस्त्र लांडग्यासारखा तो तुटून पडला होता तिच्यावर! उरवणे लांबवर दिसला तरी ललिता आता मागच्या इमारतीत दोन दोन तास लपून बसायची. उरवणे वाइल्ड अन व्हायोलंट माणूस होता. त्याच्या फँटसीज अमानवी होत्या. पण त्याच्यामुळे वेलकमला संरक्षण मिळत होते. उरवणेबरोबर एकदा गेलेली मुलगी पुन्हा जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे अमजद उरवणेला समजावून सांगायचा. कशाही असल्या तरीही या मुली माणसेच आहेत. पण तो ऐकण्याच्या पलीकडचा होता. त्याच्यासाठी मग मागच्या इमारतीतून एखादी मुलगी आणण्यात यायची. त्याला निवडीचा प्रश्न नसायचा. वय सतरा ते वय पन्नास व लिंग स्त्री! इतकीच त्याची अट होती.

दिवस फार वाईट आलेले होते. कित्येकदा तर असे व्हायचे की संपूर्ण दिवसात कुणी यायचेच नाही. मग शरीफा पहाटे झोपायच्या वेळेला दुसर्‍या दिवशीचे टारगेट देऊन धमकी द्यायची 'जमत नसेल तर मागच्या इमारतीत राहा, वेलकममधे सडू नकोस' म्हणून!

कालही तसेच झाले! गेल्या संपूर्ण दोन दिवसात केवळ.. एक??? केवळ एक ग्राहक? तोही.. दिडशेच रुपये देऊन गेला??

येता जाता शरीफा बोलत होती. मधेच मुंगूस येऊन ललिताला म्हणाला की पन्नास रुपयेवाले खूप जण यायला तयार आहेत, पण अमजदभाईला दोनशेच्या खालची मुलगी वेलकमला ठेवायची नसते. जातेस का तू मागच्या बिल्डिंगमधे?

ती मागची बिल्डिंग! तिचे दर्शनही नको असायचे ललिताला! खराखुरा नरक होता तो. आणि.. परिस्थिती अशी येत होती की जो उठेल तो 'त्या इमारतीत जा' हीच धमकी देऊ लागला होता. डिम्पल अजूनही त्याच इमारतीत होती. तिथे एकदा गेले की नसला तरिही एड्सचा शिक्का बसणारच! आणि.. नसला तरीही काय? कदाचित असेलही झालेला आपल्याला एड्स! तपासलंय कुणी?

आपल्यालाच! आपल्यालाच गिर्‍हाईक मिळवायला हवे.

ललिता आता मात्र निर्णय घेऊन रत्स्यावर वेलकमच्या पायरीवर बसली. पदर अर्धाअधिक सरकलेला. येणारा जाणारा प्रत्येक जण निरखून बघायचा. दोघे तिघे असले तर बघून एकमेकात हास्यविनोद करायचे. मग ललितापण हसायची आणि खाणाखुणा करायची. ते लोक नुसतीच थट्टा करून गेले तरी निराश व्हायचे नाही. मग समोरच्या बाजूने एखादा शोधक नजरेचा चाललेला दिसला की उगाचच पातळ गुडघ्याच्या वर घ्यायचे अन झटकल्यासारखे करायचे अन हळूच तो बघतोय का ते बघायचे. तो बघत असला तरीही ललिताने पाहिले की तो जो कोण असेल तो निघून जायचा.

काहीही उपयोग झाला नाही.

दुसरी रात्रही तशीच संपायला आली. काल दुपारी मिळालेले दिडशे रुपये आणि आजचे शुन्य रुपये या बेसिसवर शरीफाला तोंड दाखवणे शक्यच नव्हते. शरीफा पहाटे चार वाजता झोपायची म्हणून ललिता चार वाजेपर्यंत रस्त्यावरच पेंगुळलेल्या अवस्थेत बसून राहिली.

मधेच एक मोठा धक्का बसला. कोणत्यातरी वाहनाच्या आवाजाने जाग आल्यावर ललिता जागी झाली अन उगाचच तिने इकडे तिकडे पाहिले. लांबवर कुठेतरी साहू एका माणसाशी काहीतरी बोलत होता. जवळपास दहा मिनिटांनी त्या माणसाने साहूला काहीतरी नोट दिली अन साहूच्या मागोमाग तो चालू लागला. समोरच्या बाज्ला असलेल्या गल्लीत.. जी मागच्या इमारतीपेक्षाही घृणास्पद होती.. साहू त्या माणसाला गेहून गेला. ललिता उभे राहून हळूच एका झाडामागे उभी राहून ते पाहात होती. हळूच बारा वर्षाचा साहू पुन्हा दुकानावर आला.

आपला मुलगा भडवा झालेला आहे हे क्षणभर ललिताला सहनच होईना! त्याच झाडाच्या खाली बसून ती विलाप करू लागली. येणारे जाणारे कुतुहलाने तिच्याकडे पाहात होते.

बुधवारपेठेची आता रात्र होऊ लागली होती. कारण पुण्यात आता उजाडू लागले होते.

निराश मनाने अन अत्यंत जड पायांनी ललिता वर आली.. शरीफा झोपलीच नसेल हे तिच्या डोक्यातच नव्हते..

वर आलेल्या ललिताच्या शरीफाने झिंज्या धरल्या...

शरीफा - ***** तुझे फुक्कट पालनेके लिये हम पैदा हुवे है?? तेरे बापका है वेलकम?? दो दिन मे डेढसौ रुपये? यहाका हिजडा एक दिनमे ज्यादा कमाता है.. **** चल फूट..

किंचाळणार्‍या ललिताला कुठल्यातरी मुलीने वाचवले. शरीफापासून लांब केले. रडत रडत ललिता म्हणाली..

ललिता - लाती मै पैसा.. एक दिन रुको बी.. जरूर लाती मै पैसा.. मारो मत..

आणि त्याचवेळेस वर आलेला साहू सगळ्यांदेखत विचारत होता..

साहू - मै किसी और कोठेकी लडकीके लिये दलाली करके लाया हुवा पैसा चलेगा क्या मा? या वेलकमकेलियेही काम करना चाहिये???

फाडफाड त्याच्या मुस्काडात मारून स्वतः रडताना ललिताने साहूच्या हातातील पन्नासच्या दोन नोटा मात्र घेऊन शरीफाकडे फेकल्या. तिने नोटा फेकल्या म्हणून अपमानीत झालेल्या शरीफाने पुन्हा ललिताला धरताच..

साहूतील पहिले स्फोटक उडले.. चक्क शरीफाचा हात वरच्यावर धरत खर्जातल्या आवाजात अमिताभ बच्चन स्टाईलने तो म्हणाला..

साहू - मां को हाथ नही लगानेका. मै जिंदा हूं.. आपको हररोज पैसे देदिया करूंगा!

थक्क झालेल्या परंतू साहूच्या आवाजाला पहिल्यांदाच घाबरलेल्या शरीफाने आज हा अपमान गिळलेला असला तरीही लवकरच साहूचे थोबाड फोडून त्याचा आकार बदलायचा तिने निर्णय केलेला होता. मनातच!

ललिताने अक्षरशः साहूला मिठी मारली अन त्याच्या मिठीत असतानाच ती घरंगळत जमीनीवर बसून रडत राहिली. रडता रडता म्हणाली..

ललिता - बेटा.. मै भूखी हूं रे.. तुने तो कुछ खाया है ना? या तू भी भूखा है?? जो करना है वो कर बेटा.. हमको जीना तो हैही.. जो काम करना है वो कर.. लेकिन.. कुछ खानेके लिये ला रे मेरे लिये..

त्या दिवशी उगवत्या सूर्याला पृथ्वीवर एक अत्यंत विदारक आणि भयानक दृष्य दिसले..

साहू.. रेश्मा.. थापा.. या बारा वर्षाच्या मुलाने.. स्वतःच्या आईसाठी.. दोनशे रुपयांची बोली करून.. भडवेगिरीचा ऑफिशियल आरंभ केलेला होता..

आणि ते गिर्‍हाईक तासाभराने निघून गेल्यानंतर.. दोघेजण पोटभरून जेवले होते..

आई व मुलगा या नात्यातील सर्व सॅन्क्टिटी आज बुधवार पेठेने संपवून टाकली होती.

ही बातमी डिस्कोतही समजली होती केवळ अर्ध्या तासात! सगळेच क्षणभर थक्क झालेले होते. आणि....

काही क्षणांसाठी बुधवार पेठ निर्जीवच झाली होती ते ऐकून.....

आणि नवीन अन्नापासून मिळालेल्या ताकदीमुळे रात्रभर जागरण करूनही ललिता पुन्हा सकाळी आठ वाजता वेलकमच्या दारात उभी राहिलेली असताना....

रमासेठ! अचानक रमासेठ समोर आला त्या दिवशी! ललिताकडे पाहून डोळा मारून छद्मी हासला. म्हणाला..

रमासेठ - आती है क्या? चार हजार रुपये फुल्ल नाईटमे.. हा हा हा हा

ललिताच्या अंगातून अक्षरशः आग निघत होती. या माणसाचा तिथल्यातिथे मुडदा पाडावा असं तिला वाटत होते. पण ते केवळ स्वप्न होते. शक्य नव्हते तसले काहीही करणे! उलट... हा पुन्हा ग्राहक म्हणून आला तर आजच्या एकंदर टारगेटपैकी निदान काही भाग तरी कव्हर होईल अशी आशाच मनात होती. वरवर अत्यंत सेक्सी वाटेल असं पण प्रत्यक्षात वर्षानुवर्षे तसेच हसल्यामुळे त्यातला रंगच गेलेलं एक चीप अन नाटकी मादक हसू तोंडावर खेळवीत अन अगतिकतेच्या अन संतापाच्या हजारो लाटा त्या स्मिताआड दडवीत ललिता म्हणाली..

ललिता - फुल्ल नाईटके लिये तो मै तय्यारही हूं सर.. लेकिन अभी तो दिन है.. आपके लिये जान हाजिर है.. आईयेना.. बरसोंसे आपका जी बहलानेका इंतेझार था...

ललिताने हाताला धरून रमासेठला वर नेले. तोही प्रसंगाची मज घेत होता. वेलकममधे तो सगळ्यांनाच व्यवस्थित माहीत होता कारण त्याच्यामुळे लफड्यातून वेलकम सुटायचे. उरवणे या अधिकार्‍याला त्यानेच वेलकमचा चस्का लावलेला होता. रमासेठला वेलकममधे आदर मिळायचा. अन त्याच्या हाताला धरून सलोनी नाही, वहिदा नाही तर चक्क रेश्मा????

हिचं नशीब पहाटेपासून बदललं की काय??

सगळे बघतच बसले. रमासेठ त्याहीवेळेस जाग्या असलेल्या अपमानीत शरीफाकडे बघून डोळे मिचकावत हसत एका कंपार्टमेंटमधे गेला. ललिताने आतून दार लावून घेतले. रमासेठचा शर्ट तिने स्वतःच्या हाताने काढून टाकला. रमासेठला आत्ता तिच्याबरोबर काहीही करायची अजिबात इच्छा नव्हती. खरे तर ललिताला आता सगळ्यांनीच सोडून दिलेले होते वार्‍यावर! पण ही तीन चार वर्षांनंतर कशी वाटते ही एक टेस्ट घ्यायला हरकत नाही म्हणून रमासेठ उत्सुकतेने उभा होता. त्याला बेडवर आडवे केल्यावर ललिता शेजारी झोपली. नाही म्हंटले तरी रमासेठची इच्छा जागृत व्हायला लागलीच होती. हळूहळू तोही पुढाकार घेऊ लागला.

ललिता - कितने सालोंके बाद आये सर आप..
रमा - हं.. उस दिन तू भाग रही थी उसके बाद आयाही नही मै..

नको तो विषय नेमका आला होता. आता त्या विषयावर पाणी पडलेलं आहे हे भासवणं अत्यावश्यक झालेलं होतं ललिताला! नाहीतर तोच विषय डिस्कशनला येऊन हातात आलेलं गिर्‍हाईक गेलं असतं नाराज होऊन!

ललिता- जो हो गया सो हो गया सर.. मै तो आजभी आपहीकी हूं..
रमा - हा हा! और कल अमजदकी थी.. परसो मुंगूस की.. कल कबीरकी होएगी.. है ना??

रमासेठ तिची थट्टा करताना कोणताच मुलाहिजा बाळगत नव्हता. ललिता त्याच्या वाक्यावाक्याने आगीसारखी आतल्या आत उफाळत होती. पण अक्षर काढणे शक्य नव्हते.

रमासेठचे सगळे कपडे दूर केल्यावर ललिता त्याला उद्दीपित करू लागली. रमासेठही आता मूडमधे आला होता.

रमा - ये गंदे पार्टिशनमे क्या सोती है.. चल.. कमरेमे चल..
ललिता - सर.. वहिदा है कमरेमे.. सोयी है.. नाईटका कस्टमर था उसके पास..
रमा - वहिदा की ऐसी की तैसी..

कुणालाही काहीही वाटले नाही. संपूर्ण नग्न रमासेठ आणि अर्धनग्न ललिता कंपार्टमेंटमधून सेपरेट खोलीत गेले अन वहिदा त्यांनी दार वाजवल्यावर ते उघडून त्यांना पाहून जांभया देत बाहेर आली व ते दोघे आत गेले..

अर्धवट उपाशी असलेल्या अन रात्रभर जागरण केलेल्या ललितावर रमासेठ तुटून पडला. अर्ध्या तासाने त्याचा राकट प्रणय संपुष्टात आल्यावर काहीच झाले नसल्याप्रमाणे उठला अन खाली पडलेल्या पँटमधील पाकिटातील एक पन्नासची नोट शेजारी पडलेल्या ललिताच्या अंगावर फेकली..

रमासेठ - खुष??

त्याक्षणी ललिताच्या तोंडावर जे हास्य आलं ते पाहून मात्र त्याची बोबडी वळली. इतकं भेसूर अन वास्तव हास्य त्याने एखाद्या स्त्रीच्या तोंडावर पहिल्यांदाच पाहिलं होतं!

तरीही धीर करून म्हणाला..

रमा - चल्ल.. साफ कर मेरेको..

ललिता उठली. तिने हातात एक टॉवेल घेतला अन रमाचे अंग साफ करता करता..

गेल्या कित्येक वर्षातील कित्येक प्रसंगांमधून आलेला कडवटपणा, अपमानाचा सूड घ्यायची इच्छा, परिस्थितीची घृणा.. तीव्र संताप...

या सगळ्या भावना अचानक उफाळून आल्या आणि...

रमासेठला काहीही कल्पना नसताना..

ललिताने त्याचे गुप्तंग इतक्या जोरात दाबून धरले की रमासेठचे अक्षरशः डोळे पांढरे झाले..

फक्त पाच सेकंद! किती?? पाच! पाच सेकंद! अजून काही सेकंद तिने तेच केले असते तर तिच्या हातून एक खून झालेला असता. अतीव वेदनांमुळे मृत्यू!

एका नाजूक स्त्रीच्या हातात किती ताकद असते हे.. रमासेठला पहिल्यांदाच समजले होते.. आणि आणखीन एक गोष्ट त्याला समजली होती...

ती म्हणजे.. पुरुषावर जर हा वार झाला.. तर पुरुष मरायला टेकू शकतो..

तिने हात सोडल्यावर मात्र रमासेठने जीवाच्या आकांताने श्वास गोळा करून खच्चून बोंब मारली...

पोटाखाली हात दाबून धरत तो पलंगावरून पडत असताना जवळपास सगळं वेलकम त्या खोलीपाशी धावलेलं होतं...

आणि ब्लाऊज परिधान करत असलेल्या ललिताच्या कंबरेपाशी एक लोखंडी गज होता खोलीतला..

चवताळलेली नागीण म्हणत होती...

ललिता - जिंदगीमे औरतकी तरफ देख नही सकेगा ये.. रेश्मा डिस्कोमे वापस जा रही है.. अमजद को बोलना.. हिम्मत है तो इस्माईलके हाथसे उठाके वापस लायेगा मेरेको..

जाताना शरीफाच्या गळ्यातील चेन.. सलोनीच्या गळ्यातील लॉकेट .. आणि गल्ल्यातील काही नोटा हातात कोंबल्या तिने.. आणि ..

आजवर जे कुणीही पाहिलेले नव्हते ते झाले..

आत खोलीत रमासेठ अजूनही खच्चून ओरडत असतानाच... शरीफाबी त्याच्या वर ताण ओरडू लागली..

तिच्या अवाढव्य पोटात.. नुकतेच आत आलेल्या अन सगळा प्रकार पाहिलेल्या साहूने.. बुटांची लाथ घातलेली होती.. कबीर तळघरातून वर पोचायला जिन्यात आलेला असताना तीरासारखे खाली चाललेल्या ललिताला अन साहूला पाहून 'हे कुठे चालले असावेत' हा विचार सोडून 'वर कसला आरडाओरडा चाललाय ते आधी पाहावे' म्हणून तो वर निघाला..

खाली उतरलेली ललिता मागे वळून दुसर्‍या इमारतीतील डिम्पलला हाक मारून सांगत होती..

ललिता - रेश्मा जा रही है.. जानेसे पहिले रमासेठको हिजडा बनाके जा रही है.. और मेरे बेटेने शरीफाका पेट आधा कर दिया है.. हम तीनोंका बदला लेलिया मैने डिम्पल.. अब तू आरामसे मर जा..

आरामसे मर जा...

सकाळच्या शुभ वेळेला लक्ष्मी रोडवरील मुंबई विहार हॉटेलपर्यंत ते वाक्य घुमलं असावं...

दहाच मिनिटांनी...

गंगाबाईच्या समोर बसलेली ललिता म्हणत होती...

ललिता - साहूने वेलकमके शरीफाके पेटमे लाथ मारी है.. और मैने रमासेठसे बदला लेलिया.. आजसे तू आराम कर गंगाबाई.. डिस्कोका सारा काम मै करुंगी.. तेरी बेटी वापस आगयी है..

गुलमोहर: 

सही हाच शब्द आधी बाहेर पड्तो तोन्डातुन.
पण तो योग्य वाटत आणि समजत नाहि कि काय प्रतिसाद द्यावा ते.
आता हे पुढे काय वळण घेणार आहे ते माहित नाहि.
पण जे होतय ते विदारकच आहे.
साहु बद्द्ल फार सहानुभुती वाटतेय. कस नशीब असत ना एकेकाच. फार फार वाईट आणि भयानक आहे हे.
पण निदान डीस्को मध्ये ललिताला मान तर मिळेल याचिच आशा आहे.
त्या भयाण वेलकम पेक्शा डीस्को तरी थोडा चान्गला असेल का?????????????
काय होणार पुढे या दोघान्चे????????????
कसा निभाव लागेल ह्या दोघान्चा.
नुस्ता भुग झालाय डोक्याचा.
पु.ले.शु.

अरे वा! ये हुई ना बात! एवढ्या सगळ्या निगेटिव्हमधे काहीतरी पॉसिटिव्ह घडले...:)

आज तुम्ही बरीच छान छान वाक्य लिहिलीत...मनाला भिडणारी, अंगावर काटा आणणारी --
खास 'बेफिकीर टच' असलेली... त्यातली काही निवडक:

मात्र! साहूमधून पुढे एक भयानक स्फोटक तयार होणार आहे हे भवितव्य जर तिला कुणी ऐकवलं असतं तर त्या दिवसाची वाट पाहात ती कितीही वर्षे थांबलीही असती.

साहूच्या मनावर अपमानांचे, दु:खांचे, कोंडमार्‍याचे एकावर एक थर बसत होते. या अजाण मुलाच्या मनावर होणार्‍या परिणामांकडे बघायला बुधवार पेठे म्हणजे सांस्कृतिक केंद्र नव्हते. ते होते स्वतःची नासाडी करून घेऊन पुणे शहराची संस्कृती टिकवणारे केंद्र!

आई व मुलगा या नात्यातील सर्व सॅन्क्टिटी आज बुधवार पेठेने संपवून टाकली होती.

सानीला....अनुमोदन.....
खरच खुप झरझर होतय..काळ्जात........
कल्पनेच्या पलिकडील भयानक वासतव........

थोडासं गोंधळल्यासारखा वाटलय, साहू ११ वर्षांचा होताना अमजद भाई आल्यावर, मग ३-४ वर्षानंतर १२च वर्षांचा कसा काय?

बाकी नेहेमीप्रमाणे झकास्स्स्स्स!! Happy

सगळे भाग एकामागोमाग एक वाचले आणि एकदम सुन्न झाले...

भयानक वास्तव, कोणाच्याही वाट्याला येऊ नये असे. आणि तरीही ही माणसे जगत राहतात, केवळ मरण येत नाही म्हणुन... कसे काय जगतात असेही बोलवत नाहीये आता.. Sad

नवीन प्रतिसाद लिहा