२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग ८

Submitted by बेफ़िकीर on 9 June, 2010 - 07:04

साहू आणि गोपी ही जोडी मस्त जमली होती. डिस्कोतून साहू गेला तेव्हा जेमतेम आठ वर्षांचा असेल. आता चांगला तेरा वर्षांचा होता. पुन्हा डिस्कोला येऊन सहा महिने होत आले होते. डिस्कोतील प्रवेश फारच रंजकपणे झाला होता. सुरुवातीला गंगाबाईला ललिताच्या परत येण्यात काहीही इंटरेस्ट वाटला नव्हता. खरे तर तिला आता ललिता नकोच होती. संगीताचे आनि ललिताचे भांडण अन मारामारी झाल्यामुळे साडे तीन, चार वर्षांपुर्वी ललिता बाहेर पडली होती. आता तर संगीताही रस्त्यावर उभी राहू लागली होती. ललिताला पुन्हा कोठ्यावर घेण्यात गंगाबाईला इंटरेस्ट तर नव्हताच पण तिचा कडाडून विरोधही होता. इस्माईलला अजूनही ललिता हवीच होती. पण गंगाबाईपुढे तो बोलू शकत नव्हता. ललिता रमासेठला मारून आली आहे, साहूने शरीफाच्या पोटात बेदरकारपणे लाथ मारलेली आहे आणि अमजदच्या कोठ्यावरून म्हणजे वेलकमवरून एक मुलगी स्वतःच्या मुलासकट लक्ष्मी रोड क्रॉस करून पळून पुन्हा आपल्याकडे आली आहे हे कथानक मात्र तिला अविश्वसनीय वाटत होतं! कबीर आहे, मुंगूस आहे, सलोनी आहे, स्वत: शरीफा आहे तरीही ही आली कशी? तेही मुला घेऊन? आणि मुख्य म्हणजे अमजदच्या कोठ्यावरून पळून आली? अमजद त्यावेळी तिथे नसला तरी काय? हे कळल्यावर तो ताबडतोब वेलकमला येणार आणि वाघासारखा डरकाळी फोडणार हे काय ललिताला समजत नाही?

आणि गंगाबाईचे विचार तिच्या दृष्टीने अत्यंत योग्य दिशेने जात होते. खरे तर डिस्कोवर आता काहीच आकर्षण नव्हते. वहिदाच्या रुपाने वेलकमला काहीतरी होते. अर्थात आता वहिदाही बाहेर उभी राहायला लागलीच होती. पण तोहफाची लैला सोडली तर या तीन इमारतीत आता बोली लावून येण्यासारखे कुणीच नव्हते. त्यात आणखीन ही जुनाट अन मागणी संपलेली मुलगी कशी काय घ्यायची हा गंगाबाईचा विचार अत्यंत प्रोफेशनल व तिच्या दृष्टीने योग्यच होता. ललिता तिथे राहात असताना जे काय एक किरकोळ प्रेमाचे नाते निर्माण झाले होते त्याचा बेसही धंदेवाईकपणा हाच होता. धंदा नसेल तर प्रेम नाहीच!

जवळपास अर्धा तास दोघींमधे चर्चा चालली होती. ललिताचे म्हणणे असे होते की डिस्को ती सांभाळेल अन त्या बदल्यात आराम मिळतो म्हणून गंगाबाईने फक्त तिला तेथे राहायची जागा द्यावी. बाकी जगायचे कसे हे ललिता बघून घेईल आणि डिस्कोला आत्तापर्यंत मिळत असलेल्या उत्पन्नात एक पैशाचीही कमतरता राहू देणार नाही.

पण! .. एक मोठा पण होता याच्यात! उत्पन्न जर आहे तितकेच राहणार असेल तर ललिताची मुळात गरजच काय हा मुद्दा गंगाबाई सोडत नव्हती.

ललिताने परोपरीने सांगत होती ती नवीन नवीन मुली येथे ओढून आणेल पण ते गंगाबाईला पटत नव्हते.

त्यातच शालन धावत वर आली. घाबर्‍या चेहर्‍याने शालन म्हणाली की खाली कबीर आला आहे अन तो वर येतोय. ते वाक्य ऐकल्यानंतर इस्माईल तयारीत उभाच राहिला. इस्माईलला उभे राहताना हा आत्मविश्वास अजिबात नव्हता की गंगाबाई कबीरचा विरोध करेल अन ललिताला जाऊ द्यायची नाही. त्याला ललितावर इंप्रेशन मारायचे होते म्हणून तो मधे उभा राहिला होता. आणि गंगाबाईला कोठ्यावर राडा नको असल्यामुळे ती कबीरला जायला सांगण्याचे मनात ठरवत होती.

इस्माईलला मधे बघून वर आलेल्या कबीरची हिम्मत झाली नाही ललिताला हात लावायची. 'भाईको बोलता हूं मै' असे म्हणून तो तिथून सटकला अन मग मात्र गंगाबाईने इस्माईलला फैलावर घेतले.

जवळपास ललिताला हाताला धरूनच बाहेर काढण्याच्या क्षणाला नेमके सकाळी नऊ वाजता कधी नव्हे ते मांढरेशेठचे आगमन झाले.

मांढरे - अरे? ये लडकी पहिले इधर थी ना?

गंगाबाई दोनच माणसांसमोर बोलायची नाही. मांढरेसेठ आणि नानासेठ!

गंगाबाई - हां! फिर रहनेको आयी.. मै क्युं रख्खूं?
मांढरे - क्युं? अभीभी चलेगी ये तो...
गंगाबाई - अब क्या चलेगी?? सडगयी होगी अबतक.. तीन साल वेलकमपे थी..
मांढरे - वेलकम? तो ... यहा कैसे आयी?
गंगाबाई - भागी अभीच.. सुबह..
मांढरे - ये लडकी?? भागके आयी वेलकमसे??

मांढरे जोरात हसू लागला.

गंगाबाई - क्या हुवा?
मांढरे - अमजदकी तो नाक कटगयी....
गंगाबाई - अब हमारा पत्ता काटदेगा वो बुधवारपेठसे..
मांढरे - कैसे क्या?
गंगाबाई - उसको अबतक पता चलगया होगा.. खुद आयेगा और इसको उठाके ले जायेगा..

ललिता आता रडू लागली. इस्माईल मधेच म्हणाला..

इस्माईल - ऐसे कैसे लेजायेगा? मै जानेही नही दुंगा..

गंगाबाई कडाडली. पॉलिसी मॅटर्समधे इस्माईलने नाक खुपसणे मान्य नव्हते तिला. नाही म्हंटले तरी वेलकमच्या अमजदला अख्ख बुधवार घाबरत होतं!

ललिता मांढरेसेठकडे आशेने बघत रडत म्हणाली.

ललिता - मै नही जाना चाहती सर... भुखे रखते है.. इतनासा लडका है.. उसको भी भुखे रखते है.. मुझे अपाहिज बनानेवाले थे.. अब लेजायेंगे तो जरूर बनायेंगे मुझे अपाहिज.. मै नही जाना चाहती हूं गंगाबाई..

आई रडत असूनही आज साहू मुळीच रडला नाही. सकाळची बातमी गंगाबाईपर्यंत पोचलीच होती.

गंगाबाई - चूप कर.. अपनेही वबेटेको कस्टमर ढुंढनेको बोलती है ये सेठ.. इसके पास कोई आताही नही.. सौ रुपयेमे आती है ये अब..
ललिता - लेकिन.. मै.. वो काम करनेके लिये नही आयी हूं.. मै आयी हूं तुम्हारा काम करनेके लिये...
गंगाबाई - यहा बैठेगी तो अमजद आयेगा और मुझे बरबाद करदेगा.. चल.. चल्ल निकल..

मांढरेसेठ मधे पडला. गंगाबाई बिचकली.

मांढरेसेठ - देख गंगाबाई.. लडकी डिस्कोकीही है.. अमजद इसे लेगया था.. और ये वहासे भागी है इसलिये यहा आयी है..
गंगाबाई - फोकटका खानेको चाहिये इसलिये यहां आयी है..
मांढरेसेठ - तेरा दिमाग काम नही करता इसलिये आयी है..
गंगाबाई - क्या बात कर रहे है आप सेठ...

त्यानंतर मांढरेसेठने गंगाबाईची अक्कल सगळ्यांदेखत काढून दाखवली.

मांढरेसेठ - जो लडकी वेलकमसे भागके लक्ष्मी रोड क्रॉस करतीऑ है सुबहके साडे सात आठ बजे, और वो भी गहने और पैसे चुराके.. वो रिक्षेसे स्टेशन जाकर रेल्वेसे अपने गाव नही जाती थी क्या बेअक्कल...

दुधाच्या धंद्यामुळे लाभलेल्या पैशामुळे अनेक मोठ्या व्यक्तींशी संपर्क आलेल्या मांढरेसेठने डिस्कोवरचा छापा वाचवण्यात एक दोनदा केलेली मदत जर लक्षात नसती तर आपल्याच कोठ्यावर आपल्यालाच बेअक्कल म्हणणार्‍या माणसाला गंगाबाईने लाथा घातल्या असत्या.

पण ती चुपचाप बसली होती आणि अचानक उरवणे वर्दी न घालता प्रवेशला. उघड होते. शरीफा किंवा अमजदने कंप्लेंट केलेली होती.

उरवणे - ऐ बाई.. चल खाली.. अ‍ॅरेस्ट झालीय तुला.. चल चल .. थोबाड बघू नको..
गंगाबाई - मी काय केलंय साहेब?
उरवणे - ** घालू का ***? आं?? मी काय केलंय.. चल चल.. अन ती पळालेली पोरगी हीच का?? ए.. चल तू पण

उरवणेने पुढचे मागचे न बघता सरळ गंगाबाईचा दंड धरला अन तिला जवळ ओढली..

उरवणे - उधर कस्टडीमे ** लुंगा.. अभी चल..

गंगाबाई जरी मौसी असली तरीही तिच्या चेहर्‍यावर या वयात उरवणेने केलेल्या उच्चाराने सगळ्यांदेखत झालेल्या अपमानाचा धक्का सहज दिसू शकत होता.

मांढरेसेठ मधे पडला.

मांढरे - साहेब.. मी काय म्हणतो ऐकून घ्या..
उरवणे - तू कोण? आं? घरी बायका पोरे नाहीत तुझ्या?? इथे कशाला ** **** आला? आं?
मांढरे - सांभाळून बोला साहेब.. हनुमान मांढरे आहे मी..
उरवणे - गेला ***च्या **.. मांढरे..... सेकंदाच्या आत फूट नाहीतर कायद्याच्या कामात अड....

मांढरेने आपला मजबूत हात वर उचलून जे केले ते उरवणेच्या सात पिढ्यांमधे झालेले नव्हते.

पाच च्या पाच बोटे उरवणेच्या गालावर उठली. क्षणभर सुन्न झालेले डोके अन डोळ्यापुढे आलेली अंधारी बाजूला सारून समोर बघतोय तर ...

मांढरे - तुझा जो एक बाप आहे ना फरासखान्यात.. यादवाड.. तो अन मी नसरापुरच्या आमच्या झोपड्यांमधून रस्त्यावर येऊन शेजारी शेजारी **यला बसायचो सकाळचे लहानपणी.. जा.. तुझ्या बापाला सांग हनुमान मांढरेला शिवी देऊन आलो म्हणून.. तुझी मुलगी वेलकममधून पळाल्यावर नेली असतीस का रे *** फरासखान्यात .. आं???

फक्त एक रस्ता मधे! पुण्यातीलच नाही देशात गाजलेला रस्ता! लक्ष्मी रोड! एकेका चौकागणीक संस्कृती बदलत जाते या रस्त्यावर!

अलका टॉकीज चौकात सुरू होतो तेव्हा भव्य दिव्य चौकातून एका नीरस रस्त्याला लागल्यासारखे वाटते. खेळाच्या साहित्याची दुकाने, झाड कॉर्नर, पेट्रोल पंप वगैरे! दुसर्‍या चौकात आले की आणखीनच नीरस! मग नंतर उजव्या बाजूला नेपाळी लोक स्वेटर वगैरे घेऊन बसतात विकायला. तिथून पुढे आले अन एकदा का विजय टॉकीजचा चौक लागला की मग 'लक्ष्मी रोड' ही काय चीज आहे ते समजते. दुकाने.. दुकाने.. दुकाने..

उंबर्‍या गणपती चौकात आलात की उजवीकडचा रस्ता सदाशिव पेठ हौदाकडे जातो अन डावीकडचा पत्र्या मारुतीकडे! शगुनचे साड्यांचे दुकान अन कॉमनवेल्थ ओलांडून पुढे गेलो की.. पुन्हा तेच.. दुकाने.. दुकाने.. अन दुकाने..

मात्र.. अजून काही चौक ओलांडल्यानंतर..... ज्या चौकात उजवीकडचा रस्ता श्रीनाथ टॉकीज किंवा मंडईकडे जातो अन डावीकडचा नु.म.वी शाळा अन अप्पा बळवंत चौकाकडे.. तिथून मात्र पुढे गेले की सुरु होते बुधवार पेठेची ती वस्ती.. उजवीकडे सिटी पोस्ट.. डावीकडे श्रीकृष्ण टॉकीजची गल्ली.. त्या गल्लीतून आत गेले की डावीकडे श्रीकृष्ण टॉकीज आहे त्याच्याकडे पाठ करून उभे राहिले की समोर आहे बुधवार पेठेतील सर्वात महत्वाची गल्ली.. नुसता गजबजाट... आणि त्यातच होते डिस्को.. लक्ष्मी रोडने श्रीकृष्ण टॉकीजकडे वळलोच नाही अन सरळ पुढे जाऊन उजवीकडे वळलो की एक मोठा रस्ता आहे... सुरुवातीला या रस्त्याचे रुपरंग समजत नाही.. केदारी चौक.. या रस्त्याला वळलात की थोडेच पुढे गेल्यावर वेश्यावस्तीतील दोन नंबरच्या दर्जाचा विभाग.. तोहफा आणि वेलकमचा विभाग.. तिथून पुढे जाऊन उजवीकडे वळलात की पुन्हा थेट उलटा मंडईकडे येणारा रस्ता.. हा रस्ता आणि लक्ष्मी रोड या चौकोनात जायचे मात्र धाडस अजिबात करायचे नाही.. कुणीच.. किळस येणे.. घृणा येणे.. या गोष्टी आपल्यासारख्यांना तर सिटि पोस्टापाशीच होऊ शकतात.. मात्र या विभागात आपल्याला आपणही माणूस आहोत याही कदाचित लाजही वाटू शकेल..

आणि.. मगाशी म्हंटले तेच.. रस्त्याच्या उजवीकडे वळलात.. वेलकम, तोहफाकडे..... तर उरवणेकडे मान वर करून बघण्याचे धाडस रोज हप्ता देणार्‍या दलालाही झाले नसते.... मात्र..

रस्त्याच्या डावीकडे वळलात तर डिस्कोमधे उरवणेचा गाल सुजलेला होता आणि दुराभिमान कायमचा संपलेला होता...

उरवणे! यादवाडचे नाव काढल्यामुळे अत्यंत हादरलेला उरवणे! याची दोन कारणे होती. एकतर यादवाडला उरवणे हा माणूसच पसंत नव्हता. आणि दुसरे म्हणजे आपण स्वतः अत्यंत चुकीचे अन बेकायदेशीर वागतो हे उरवणेला व्यवस्थित ज्ञात होते. उरवणेचे बुधवारपेठेतील वर्तन जर यादवाडला समजले तर नक्शा उतरायला वेळ लागणार नव्हता. आणि यादवाड हा इतका वरचा अधिकारी होता की मांढरेसारख्याने आपल्या कानाखाली मारणे सहज शक्य आहे हे उरवणे व्यवस्थित जाणून होता. जड पावलांनी उरवणे लक्ष्मी रोडला लागला तेव्हा मुंबईविहारमधे अमजद आणि कबीर सोडा पीत त्याची वाट पाहात होते.

उरवंणे - रेश्मा को भूल जा..

अमजदने खाडकन बाटली टेबलवर आपटली.

अमजद - क्या बात करते हो साहब??
उरवणे - जो सुना.. वो ध्यानमे रख.. रेश्माको भूल जा.. उसको उपरसे सपोर्ट है..

मांढरे नावाच्या एका अजस्त्र माणसाने आपल्या साहेबाचे नाव घेऊन आपल्या श्रीमुखात भडकावली आहे ही बातमी तशीही काही तासातच अमजदपर्यंत पोचणारच होती. किमान पुढचा एक आठवडा एकाही मुलीकडे जायचे नाही आणि वेलकमकदे तर पाहायचेही नाही हे उरवणेने ठरवले होते. मात्र मांढरेने मारले हे अमजदला आत्ताच सांगायची गरजच नव्हती.

अमजद - उपरसे मतलब?
उरवणे - एस. आय साहब.. यादवाड साहब.. सीनियर इन्स्पेक्टर...
अमजद - कैसे क्या?
उरवणे - अब मै कुंडली बताता रहू क्या? आं? समझता नही है जितना बोला मैने???
अमजद - नही नही साहब... वैसी बात नही.. लेकिन..
उरवणे - लेकिन बिकीन भूल जा सब..

कबीरला अक्कल दाखवायची संधी वाटली ही!

कबीर - लेकिन रमासेठको और शरीफाबी को मारके गयी है वो लडकी.. और चोरी भी की..

'चोरी भी की है' या वाक्यातील है घशातून बाहेरच आला नाही. उरवणेने मांढरेसेठच्या कृत्याचा सूड कबीरवर काढला. मुंबई विहार दचकून या त्रिकुटाकडे बघू लागले.

उरवणे - ****.. शरीफा मां है क्या तेरी?? आं?? या रमा सेठ बाप है तेरा???

दहा मिनिटांनी अमजद अन कबीर वेलकमच्या रस्त्याला लागले तेव्हा दोघांच्याही मनात एकच ठसलेले होते. शरीफाचा हार अन सलोनीचे लॉकेट रेश्माने उरवणेला दिले.. त्यामुळे उरवणे फितुर झालेला आहे.

आजपासून वेलकममधील पाच माणसे केवळ ललिताला आणि साहूला एकटे पाहून अद्दल घडवण्याचा विचार करणार होती.

अमजद, शरीफाबी, कबीर, सलोनी.. आणि रमासेठ!

रमासेठच्या पोटाखालची वेदना पूर्ण नष्ट झाल्यासारखे वाटायला किमान दोन तरी दिवस लागणारच होते.

आणि मांढरेसेठच्या भयानक रुपाकडे पाहून गंगाबाई गर्भगळीत झालेली होती तर ललिताला सुखद धक्का बसला होता.

पहाटे साहूने आणलेले एक गिर्‍हाईक आणि त्यानंतर रमासेठबरोबर झालेली फेरी विसरून ललिताने त्यादिवशी मांढरेसेठवर जान कुर्बान केली. बाहेर आली तेव्हा गंगाबाईला म्हणाली..

ललिता - अंदर बैठ आरामसे... डिस्कोकी चिंता छोड.. मै चार चांद लगादुंगी मुनाफेमे..

आणि सहा महिन्यात ललिताने जादू करून दाखवली होती. पहिले म्हणजे सर्व मुलींना मिळणार्‍या उत्पन्नाशी त्यांना मिळणार्‍या वागणुकीचा संबंध तोडून टाकला. प्रत्येक मुलगी माणूस आहे अन तिला नीट वागवलेच पाहिजे हा नियम केवळ क्षणार्धात अस्तित्वात आला. आता चाळिशीची एक बाईसुद्धा डिस्कोमधे गरीबीत राहावे लागले तरीही आनंदाने राहणार होती. तसेच, मिळणार्‍या उत्पन्नापैकी एक समान बहग हा फक्त सगळ्यांच्या जेवणखाण, औषधे आणि कपडे वगैरे यासाठी वेगळा काढून ठेवण्यात येऊ लागला.

तिने मुलींनी केलेला भडक मेक अप दूर सारून त्यांना आकर्षक दिसतील इतकाच मेक अप करायला सांगीतले. उघड आहे. बघितल्या बघितल्याच किळस यावी असे अती लालभडक ओठ, सावळ्या गालांवरची खोटी लाली वगैरे गोष्टी दूर झाल्या.

एखाद्याच सुंदर किंवा नवीन मुलीला सेपरेट खोली मिळणे बंद झाले. त्या ऐवजी जिच्या गिर्‍हाईकाने त्या क्षणी जास्त पैसे देऊ केले असतील त्या मुलीला त्या क्षणि ती खोली मिळायला लागली.

एकमेकींना एकमेकींचे खोटेच चांगुलपणे सांगून अन दुसरीबद्दल खूप प्रेम वाटते असे खोटेच सांगून ललिताने अचानक पंधराच दिवसात डिस्कोतील सगळ्या मुलींचे एकमेकांवर प्रेम निर्माण करून दाखवले. त्यामुळे माझ्या आमदनीमुळे हिलाही खायला मिळते ही भावना नष्ट झाली.

गंगाबाईला कोणतेही काम पडणार नाही अन डिस्कोच्या नफ्यात एक पैशाचाही घाटा येणार नाही हे तिने पाहिले. गंगाबाई ललिताच्या व्यवस्थापनाने बेहद्द खुष झाली.

शालनला तिने डिस्कोचा हिशोब ठेवायला सांगीतला. शालन ही बाई ललिताएवढीच होती. पण तिची गिर्‍हाईकांवरची जादू अजून टिकून होती. प्रार्थना केव्हाच वेलकमच्या मागच्या बिल्डिंगमधे जाऊन मेलीही होती.

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ललिताने केवळ तीन महिन्यात विविध दलालांशी सतत संपर्क ठेवून एक मुंबईहून आणि एक औरंगाबादहून अशा दोन मुली आणलेल्या होत्या. चारू आणि श्रीदेवी!

चारू आणि श्रीदेवी मुळे तोहफाच्या लैलाचे करीअर संपुष्टात आले. आणि डिस्कोला पुन्हा पुर्वीचे दिवस आले. ललिता आणि संगीता असतानाचे.

बोली लावून येणार्‍या गिर्‍हाईकांचे येणे जाणे आता नियमीत चालू झाले. उत्पन्नाच्या काही टक्के वाटा डिस्कोतील बायकांच्या राहणीमान उंचावणीसाठी काढावा लागत असल्यामुळे चारू अन श्रीदेवीमुळे अचानक डिस्कोत पैसे वाहू लागले. त्या दोघींना आपल्या उत्पन्नाचा काही भाग द्यावा लागतो याबद्दल तक्रार नव्हती कारण तिथे माणूस म्हणून जे प्रेम मिळत होते ते मुंबई अन औरंगाबादला अजिबात मिळत नव्हते. चारू वय बावीस! श्रीदेवी.. चोवीस!

आणि साहू? दुर्दैवाने साहूची शाळा वगैरे सुरू करणे शक्यच नव्हते. अमजद आणि कबीर रस्त्यांवरून फिरत होते हे कळत होते. फक्त गोपीबरोबर श्रीकृष्ण टॉकीजपर्यंत जायची साहूला परवानगी होती. तेही गोपीच्या नजरेच्या टप्यात! आणि गोपी कस्टमरबरोबर असला तर एका भज्याच्या गाडीपाशी बसून राहायचे. दलाली करायची नाही हे ठरवण्यात आलेले होते. पण ललिताच्या कानावर मधूनच यायचे की आज साहूने एकाला हिच्याकडे पाठवले, दुसर्‍याला तिच्याकडे पाठवले वगैरे! मुलाच्या भवितव्यावरील नियंत्रण सोडून द्यावे लागण्यासारखे वाईट पालकांसाठी काही नसावे. ललिताने हे दुर्दैव मात्र स्वीकारून टाकले होते. आपणच साहूला चांगले जीवन जगायला सहाय्यभूत ठरत नाही तर त्याला कशाला दोष द्यायचा! आतल्या आत कुढायची खरी! पण आता त्या दु:खाची बोच कमी होऊ लागली होती. अनेक दलाल असेच निर्माण झालेले होते त्या भागात! हे ती जाणून होती.

परिणामतः.. साहूचे शिक्षण खुंटले! आधीच बोलण्यात वागण्यात दुर्बळ! त्यात शरीफाला मारून केलेल्या पराक्रमाचा आता उल्लेख झाला की अंगाला कंप सुटावा इतका घाबरत होता तो! आणि शिक्षणही नाही. त्यामुळे साहू हे व्यक्तीमत्व रंगहीन आणि दलाल.. इतकेच बनू शकत होते.. आणखी एकच पर्याय होता म्हणा.. तो म्हणजे बॉम्ब बनण्याचा! घटनांचे थरांवर थर आणि एक ठिणगी! इतकेच आवश्यक होते त्यासाठी!

दोन वर्षे! हा काळ तुलनेने फारच सुखाचा आणि आनंदाचा गेला. एकच गोष्ट या कालावधीत झाली ती म्हणजे इस्माईल अती मद्यपानाने मरून गेला. संरक्षण म्हणून आणलेला गजू हा दाणगट माणूस ललिताच्या मात्र शब्दात होता. त्यामुळे इस्माईलची वाटणारी भीती आता नव्हतीच! उलट गजूमुळे ललिताचीच इतरांना भीती वाटावी अशी परिस्थिती होती. गंगाबाईचे डिस्को ही टर्मिनॉलॉजी हळूहळू नष्ट होत रेश्माचे डिस्को ही टर्मिनॉलॉजी अस्तित्वात येऊ लागली होती.

या दोन वर्षात मांढरेसेठ किमान महिन्यातून एकदा तरी डिस्कोवर आलेला होता. चारू आणि श्रीदेवी यांच्यासाठी! दर वेळेस ललिताने त्याचा भरपूर मानसन्मान ठेवल्यामुळे गजूही आता मांढरेसेठला वचकून होता.

एकच माणूस मात्र गेल्या पाच वर्षांमधे.. पुन्हा कधीच दिसला नव्हता..

साहूच्या सामानातील जुना... गंजलेला बाजा पाहिला की ललिताला तो माणूस आठवायचा..

नाना साठे... नाना सेठ!

हा माणूस आहे की मेला हेही समजत नव्हते. कुठे त्याची चर्चाही ऐकू येत नव्हती.

हे सगळे सांगायचे कारण तेच आहे. आज संध्याकाळि साडे सात वाजता चक्क...

नाना साठे डिस्कोला आला... आणि.. तेच टक्कल.. तोच अवाढव्य देह.. तेच मग्रूर परंतू मिश्कील डोळे..

... आनि.. तेच प्रेमळ मन..

ललितासाठी त्याने साडी आणली होती...

साहूसाठी घड्याळ... चारूसाठी गळ्यातले.. श्रीदेवीसाठी तीन ड्रेस.. गोपीसाठी आणि इतर काही मुलींसाठी काही ना काही... आणि.. चक्क.. गंगाबाईसाठी एक साडी..

आयुष्यात पहिल्यांदाच साठ वर्षांची गंगाबाई नाना साठेच्या गळ्यात गळा गहलून घळाघळा रडली.

इस्माईल गेल्यापासून तिच्या जुन्या जमान्यातील कुणीच उरले नव्हते आता डिस्कोवर! डिस्कोही रेश्मामुळे ओळखायला जाऊ लागले होते. गंगाबाईला योग्य तो आदर अन प्रेम मिळत असले तरीही.. तो जमाना आठवला की तिला असे वाटायचेच.. कुणीतरी खास आपल्यासाठी .. काहीतरी आणावे..

पहिल्यांदाच ललिताने गंगाबाईच्या खांद्यावर हात ठेवून सांगीतले.. माझी चूक झाली.. तुला नवी साडी आणायला हवी हे.. लक्षातच राहिले नाही..

ललितामुळे डिस्को हे त्या मुलींच जणू माहेर झालेले होते..

भावना नावाची एक चीज बुधवार पेठेला जणू नव्यानेच कळली होती.

आज नाना साठे चारू अन श्रीदेवी दोघींनाही आत घेऊन जात असताना ललिताने त्याचा हात धरला अन लाडिकपणे म्हणाली..

ललिता - पुरानी यादे ताझा नही करेंगे सेठ??
नाना - तुझे मालूम है रेश्मा.. मै जिसके लिये आता हूं.. उसीके साथ बैठता हूं...

बोलयात कोणतीही तुच्छता नाही, गर्व नाही.. फक्त.. बोलल्याप्रमाणे वागणे!

नाना पाच वर्षे साऊथमधे होता. नोकरीसाठी!

बरेच दिवस झाले नाना येऊन गेल्याला! गणपती आले होते. पासोड्या विठोबा मंडळाचा गणपती रोषणाईत झगमगत होता. जणू अख्ख पुणंच काय भारत देश लोटला असावा अशी गर्दी होती बुधवारात्ल प्रत्येक गल्लीत! कोण कोणाकडे जातय, कुणाला काय दिसतय, दलालाला पैसे मिअतायत की नाही, एखादी मुलगी पळून तर जात नाही ना.. काहीही समजत नव्हते. दर वर्षीच पाहात होता साहू हे.. !

पुण्यातला गणेशोत्सव हा त्याच्यासाठी एक दुग्धशर्करा योग होता. आईचे काहीही लक्ष नाही. कुठेही फिरा. कुणालाही कुणाकडेही पाठवा. पैसेच पैसे! पोलिसांना सगळ्या पुण्यात ड्युटी! बुधवाराकडे लक्ष देत बसायला त्यांना वेळही नाही अन तेवढी एनर्जीही नाही.

मुंगळा, खईके पान बनारसवाला, जय देव जय देव श्री मंगलमुर्ती.. नुसत्या रेकॉर्ड्सच रेकॉर्ड्स! वर्षानुवर्षे त्याच रेकॉर्ड्स ऐकून साहू बधीर व्हायचा! त्याला अन ललिताला आता बरंच मराठी यायला लागलं होतं! साहू दिवसाकाठी शंभर तरी कमवत होताच! त्यातल्या पन्नासमधून खाण्यापिण्याची ऐष करून घ्यायचा. उरलेले पैसे आता तो सरळ डिस्कोच्या हिशोबात म्हणून शालनकडे देऊ लागला होता. हे ललिताला माहीत नव्हते. शालनने ते पैसे साहूसाठी वेगळे बचत करून ठेवायचे दोघांचे ठरले होते.

आणि अफाट गर्दीत एक दिवस खुद्द ललिताकडेच गिर्‍हाईक आलेले असताना.. एका खोलीत शालन जस्ट बाहेर गेलेल्या गिर्‍हाईकाने दिलेले पैसे मोजत होती. साहू अचानक आत आला हे पाहून ती दचकली. ते कंपार्टमेंट ललिताचे होते. ते उघडे असेल तरच आत जायचे अशी साहूला सूचना होती. पण आज ललिताच दुसर्‍या एका गिर्‍हाईकाबरोबर असल्यामुळे अन शालनचे गिर्‍हाईक ललिताच्या कंपार्टमेंटमधून निघून गेलेले असल्यामुळे दार उघडे होते.

शालन! आईच्याच वयाच्या या बाईला त्या अवस्थेत पाहताना साहू दचकला. शालनने काहीही न बोलता बिनदिक्कत त्याच्याकडे पाहात मिश्कीलपणे कपडे घालायला सुरुवात केल्यावर तो भानावर येऊन बाहेर जाऊ लागला. शालनने त्याला बोलावले.

शालन - बहोत साल पहिले तुने तेरे मांसे पुछा था... **ता मतलब?? याद है??

साहूने होकारार्थी मान डोलावली. शालनच्या हळूहळू झाकल्या जात असणार्‍या पूर्ण विकसित देहाकडे पाहताना त्याला पहिल्यांदाच जाणीव होत होती.

शालन - अब समझमे आया? **ता मतलब क्या?

आत्ताही साहूने निरागसपणे मान डोलावली. शालन चेकाळल्यासारखी हसत 'चल्ल भाग' म्हणत स्वतःच बाहेर निघून गेली.

इतकी वर्षे उघड्या नागड्या जगात राहूनही स्वतः अनभिज्ञ असलेल्या साहूतील पुरुष आता जन्माला आलेला होता. जागा झालेला होता. हा असला प्रकार आईला सांगायचा नसतो इतके माहीत होते. आपल्याला आत्ता जे झाले तेच सगळ्या पुरुषांना होत असते अन म्हणूनच आपल्याकडून एखाद्या बाईची खिडकी विचारून ते आपल्याला पैसे देऊन जातात हे आजूबाजूला गेले सहा वर्षे नग्नतेचे राज्य असूनही साहूला आज समजले होते.

आणि त्या खुषीत त्याने ठरवले होते. काय चालले आहे त्याकडे नाहीतरी कुणाचेच लक्ष नाही. कोणत्यातरी नवीन मुलीकडे... एकदाच.... आपणही... काय हरकत आहे??

विचारांमधे हरवलेला साहू चालत चालत श्रीकृष्ण टॉकीजकडे आला. गोपी दिसत नव्हता. बहुधा कस्टमर आला असावा किंवा मुंबई विहारमधे चहा पीत असावा.

लक्ष्मी रोडला लागलेला साहू पाव शॅम्पल आणि चहा घ्यायला मुंबई विहार मधे आला. गोपी नव्हताच!

बिल देताना मागून खांद्यावर एक मजबूत हात पडला.

"अमजदभाई बुलारहे... अभ्भी... चल्ल"

कबीरच्या जबरदस्त पकडीतून निसटणे शक्य नसलेला साहू ओळखीचे कोणी दिसते आहे का ते पाहात होता....

कुणीही नाही.. म्हणजे.. असतील शेकड्याने.. पण या गणपतीच्या अफाट गर्दीत.. कुणाला काय कळणार ओरडलो तरीही...

तरीही ओरडला.. कुणीतरी चौकशी केली तेव्हा कबीरने 'याने चोरी केली आहे.. घेऊन चाललोय आईकडे याच्या' असे सांगीतल्यावर शांतता झाली..

अती गर्दीतून वीस मिनिटांनी कबीरने चार जिने चढवून साहूला अमजदच्या खोलीत ढकलले.

साहू कबीरला मिळालेला आहे हे माहीतच नसलेला अमजद सलोनीच्या हातांनी पेग लावत बसला होता बेडवर!

अमजद - ये मच्छर कैसे मिला तेरेको
कबीर - चाय पीने आया था..
अमजद - छोडदे इसको...
कबीर - क्या?????
अमजद - सिर्फ.. जानेसे पहले सजाके भेज इसको..

पंधरा मिनिटांनी कबीरच्याच जबरदस्त पकडीमधेच बाहेर पडलेल्या साहूच्या अंगावर पिवळी झगमगती साडी होती. ओठ लिपस्टिकने रंगलेले होते.गालांवर लाली होती. हातात बांगड्या होत्या.

आणि केदारी चौकातून थेट डिस्कोच्या गल्लीत त्याला घेऊन घुसायचे धाडस कबीरला फक्त गणपतींच्या दिवसातच होऊ शकले होते.

आणि.. गल्लीत त्याला घेऊन आलेला कबीर जोरात ओरडत होता..

कबीर - रेश्माकी लडकी है ये.. पहली रात है आज.. एकदम घिसापीटा सस्ता माल.. है कोई??

आणि.. पराकोटीचा अपमानीत साहू नेमका त्याचवेळेस... कर्कश आवाजात ओरडणार्‍या अन त्याही अवस्थेत साहूकडे पाहून मदतीची अपेक्षा करणार्‍या..

नेहा.. नेहा नाव होते तिचे.. वय वर्षे चवदा.. एम.पी.मधून पळवलेली मुलगी.. आजच आली होती .. तेही डायरेक्ट पुण्याच्या बुधवार पेठेत... आणि तिचा काका म्हणवणारा माणूस पैसे मोजून निघून जात असताना ती आक्रोश करत होती... त्याचवेळेस तिच्या नजरेस साहू पडलेला होता.. आधी तिला साहू मुलगी वाटला होता.. पण जवळून जात असताना तो मुलगा आहे हे समजले होते.. आणि तेवढ्यात तिला आतून धरून ठेवणार्‍या मौसीने जेव्हा आत ओढायला सुरुवात केली..

नेहा अश्रूंच्या सरींनी न्हायलेल्या अवस्थेत कर्कश किंचाळत, ओरडत साहूला म्हणत होती.. ..

नेहा - मुझे बाहर निकालो भैय्या .. निकालो बाहर.. बाहर निकालो मुझे...

गुलमोहर: 

लेखनाचा ओघ चांगलाच आहे...
पण मला एक कळत नाही आहे, एवढ सगळ करण्यापेक्षा तीने मरणच का नाही पसंत केल.
आणि हो एक मात्र खर आहे , तिने केलेला बदल हा खरच चांगला आहे...

खरोखर ग्रेट! प्रचंड आवडला आजचा भाग... शेवटच्या भागाकडे दुर्लक्ष केलं तरच... अर्थात! बिचारा साहू... Sad

आणि हे नवीन पात्र- नेहा.... साहूला 'भैय्या' म्हणाली असली तरी तिच्या एन्ट्रीने दिपूच्या काजलची आठवण आली एकदम!

ललिताने डिस्कोचं नंदनवनात रुपांतर केलं. आता तुम्ही साहू - नेहाची जोडी जमवून आम्हाला अजून काही आनंदाचे क्षण देणार का?

भूषणराव....... तुमचा स्पीड अन कथा.... मेंदूला झिणझिण्या येताहेत.... लगे रहो..

डॉ.कैलास

जबरदस्त! तुम्हाला सलाम. अचाट कल्पनाशक्ती व लिहिण्याची शैली.
खरच एका चित्रपटाची कथा वाटतेय अथवा त्याहून जास्ती.

हा भागही मस्त.........मित्रा...सरस....

पण मला एक कळत नाही आहे, एवढ सगळ करण्यापेक्षा तीने मरणच का नाही पसंत केल.>> सोप्पंय का मरणं? आणि एकटी असती तर तोही निर्णय घेऊ शकली असती... कदाचित!
तिने केलेला बदल हा खरच चांगला आहे...>>> मोदन!

फास्ट चालू आहे कथा... नेहमीप्रमाणे ओघवती शैली, यांसाठी आपण इच्छा असूनही काही करू शकत नाही हा मनातील खदखदणारा सल, घृणास्पद वागणूकीमुळे पेटून उठलेले मन आणि त्यातून येणारे हताशपण व्यवस्थित जाणवतेय वाचताना... छान... पु.ले.शु.

देवा .....जाळ काडताय्........येऊ दे............मस्स्स्स्स्स्स्स्स्स्त.........

पण मला एक कळत नाही आहे, एवढ सगळ करण्यापेक्षा तीने मरणच का नाही पसंत केल.>> सोप्पंय का मरणं?
बरोबर आहे तुमच... पण अस किती काळ जगणार... आणि त्या साहूच काय ?