२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग ६

Submitted by बेफ़िकीर on 7 June, 2010 - 04:24

सुनंदा - शरीफा.. हफ्तेभरके लिये ये कमरा देदेना.. मै पुरानी कमाईमेसे पैसे दुंगी..

शरीफाबीने यावर विचारपुर्वक होकारार्थी मान हलवली.

साहूने वीस रुपये आणल्याला आता चौदा दिवस झाले होते. बरोब्बर दोन आठवडे!

आया कशा चुकतात किंवा कधी चुकतात ते काही आयांना स्वतःलाच समजत नाही हा प्रॉब्लेम बर्‍यापैकी मोठा आहे.

साहूने जेव्हा समोरच्या इमारतीतून ललिताला म्हणजे स्वतःच्या आईला नको त्या अवस्थेत पाहिले तेव्हा ललिताने त्याला खूप मारले. जाऊन झिरमीलाही खूप मारले. पण साहूला दोनच दिवसांपुर्वी आपणच खूप मारले आहे हे लक्षात आल्याने व त्याची कीव आल्याने साहूने जेव्हा वीस रुपये आणून दाखवले तेव्हा ललिताने त्याला अजिबात मारले नाही. उलट.. स्वतःच्याच थोबाडात मारून घेतल्या.

साहूला त्यामुळे निश्चीतपणे हे लक्षात आले नाही की त्याची चूक कोणत्या पातळीची आहे. सगळ्या मुली अत्यंत दु:खी चेहर्‍याने ललिताला धीर देत होत्या. अर्थात, ललिताही काही फार वयाने मोठी व्यक्ती नव्हती. तिच वय होते केवळ पंचवीस!

एक लक्षात घ्यायला पाहिजे की अशा स्त्रिया, ज्यांना केवळ शरीरसुखासाठी या भागात यायची इच्छा होते त्या केवळ अर्धा टक्का वगैरे असू शकतात. ज्यांना सर्व्हायवलसाठी हे करावे लागते त्या पंचवीस टक्के वगैरे असू शकतात. बाकीच्या स्त्रियांना एक तर पळवून, फसवून तरी आणलेले असते किंवा जबरदस्तीने! काही स्त्रिया अर्थातच इतर कोणत्यातरी गावात हेच काम करत असतात अन पुण्याच्या आकर्षणाने या भागात स्वतःहून येऊ शकतात. मात्र मुळात त्यांच्या या कारकीर्दीची सुरुवात अशाच कोणत्यातरी कारणाने झालेली असते.

उघड आहे! प्रत्येकीला एक इतिहास असतो. जो त्यांना मनातच गाडून टाकायचाही असतो अन टाकावाही लागतो. मात्र, क्षणोक्षणी एखाद्या भयानक वेदनेसारखा तो मनाला आतून टोचत असतोच.

यातूनच एक मानसिकता तयार होते. मला जगायचे असल्यास मला जास्तीतजास्त ग्राहक व जास्त पैसे देणारे ग्राहक मिळायला हवेत. अर्थातच, दुसर्‍यांचा हेवा यातून जन्माला येतो. केवळ पैसा हा एकमेव निकष असल्यामुळे निवडीचा वाव अजिबात उरत नाही. अर्थात, महिनोनमहिने तिथे राहिल्यानंतर काही प्रमाणात सुटी मिळतात. पण फार नाही. अत्यंत गलिच्छ वातावरणात चोवीस तास, बारा महिने असल्यामुळे चांगल्या राहणीमानाची इच्छा मर्न जाते. सतत शिवीगाळ ऐकल्यामुळे तोंडात तेच येते. व्यसन हा एकमेव मित्र लाभतो. माणूस म्हणून जगणे कठीण होऊन केवळ शरीर म्हणून जगणे उरल्यामुळे एक भयानक चीड निर्माण होते जगाबद्दल!

साहूला जवळ घेऊन खूप रडली होती ललिता. किमान पंचवीस वेळा घोकून घेतले होते की असे काम पुन्हा करणार नाही. त्यानंतर साहूने अनेक प्रश्न विचारले होते. तू काय करतेस? आपण इथे का आहोत? मी दिवसभर अन रात्रभर काय करणे अपेक्षित आहे वगैरे प्रश्न त्याने त्याच्या भाषेत त्याला जमतील तसे विचारले होते. आणि ललिताने निकाल लावून टाकला होता. शरीफाकडून परवानगी घेऊन दुसर्‍याच दिवसापासून तपकीर गल्लीतील दगडी वाड्यासमोरच्या मोकळ्या जागेतील 'मुक्ती' संघटनेच्या शाळेत साहू जाऊ लागला होता. सकाळी दहा ते सायंकाळी पाच! अक्षर ओळख, शब्द ओळख, किरकोळ व्याकरण, ढोबळ इतिहास, ढोबळ भुगोल अन भारत या देशाची माहिती असे स्वरूप होते अभ्यासक्रमाचे. हिंदी अन ओरिया भाषिक साहूला अक्षर ओळखीपासून शिकायचे असल्यामुळे विशेष अवघड जात नव्हते. पण शाळेत मुले होती बारा! पाच मुली, सात मुले! साहूच्या वयाची एकच मुलगी होती. बाकी सगळे पाच ते सात या वयोगटातील होते.

रात्री साहूने एका चहाच्या दुकानावर काम करावे अशी इच्छा होती ललिताची! चहावाल्या म्हातार्‍याने ती मान्य केली. शाळेतून साहू परत आला की सहा वाजता दुकानावर जायचा. हे एकच दुकान असे होते ज्याला पहाटे चार पर्यंत उघडे राहण्याची इव्हन पोलिसांनीही अलिखित परवानगी दिली होती. या दुकानात काम केल्याचे साहूला महिना चारशे रुपये देण्याचे म्हातार्‍याने कबूल केले होते. साहू पहाटे दोन ते सकाळी नऊ असा झोपू लागला. उठला की आवरून शाळेत जायचा. आला की दुकानावर निघून जायचा. त्यामुळे गेल्या पाच सहा दिवसात त्याचे रुटीन नीट बसले अन ललिताची एक काळजी मिटली. मुंगूस या माणसाबरोबर राहायचे नाही ही सक्त ताकीद होती.

साहूला ललिताने मारले नसले तरीही मुंगूसचा मात्र अक्षरशः नक्शा उतरवला. सगळ्यांसमोर त्याला तिने असे काही झापले की आयुष्यात परत मुंगूस लहान कुणालाही आपल्याबरोबर ठेवायला कचरलाच असता. ललिताचे ते शिवीगाळयुक्त बोलणे पाहून मुली, शरीफाबी अन मुंगूस नाही तर खुद्द साहू अन ललितालाच आश्चर्य वाटले होते. मुंगूसला आजवर कुणी असे बोललेच नव्हते. त्याने ऐकून घेण्याचे कारण एकमेव होते ते म्हणजे सध्या ललिता वेलकमची राणी होती.

आणि राणी होतीच! फक्त काही वेळा ते दाखवता येत नव्हते. जसे आज! आज रमासेठ येण्याची शक्यता होती. पण सजण्या, नटण्यामधून तसे दाखवले असते तर शरीफाबीला सहज समजले असते की कुणीतरी एक्स्पेक्टेड आहे अन ते कुणीतरी म्हणजे कोण हेही लक्षात आलेच असते.

ललिता अगदी नेहमीसारखीच बसलेली होती. साडे सात वाजत आले होते. साहू केव्हाच दुकानावर रमलेला होता. त्याला या वयात चहा देणे, कप अन भांडी विसळणे असली कामे करावी लागतात हे पाहून ललिताचा जीव अर्धा व्हायचा. पण पर्याय नव्हता. असल्या विभागात असताना निदान इज्जतीचे काम करतोय हीच जमेची बाब होती.

आणि... बरोबर पावणे आठला रमासेठ आला. शरीफाबी खरे तर मनातून हरखली. चार हजारचा आकडा पुन्हा डोळ्यासमोर नाचू लागला.

तसेही, रेश्मा अन रमा यांच्या मीलनाला उगाचच विरोध करण्याचे कारणही नव्हते. समजा प्रेम बिम बसले तरीही रेश्मा रमाबरोबर कुठे बाहेर जाणारच नव्हती. गेली असती तर साहू कोठ्यावर आणला गेला असता ती परत येईपर्यंत! आणि पळून जाण्याचा विचारही शिवणे अशक्य होते.

रेश्मा दोन, तीनदा सलोनीला भेटून आलेली आहे हेही शरीफाला समजलेले होते. पण त्यात तिला हस्तक्षेप करावा असे वाटत नव्हते. भेटायचे असले तर भेटूदेत! का भेटत असावी याचाही अंदाज आलेलाच होता. रेश्माच्या मनात सलोनीबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला असावा हे तिला समजत होते. कारण रेश्मा मनाने अजूनही बाहेरच्या जगातील बायकांसारखी चांगली व सरळ आहे हे शरीफा जाणून होती. मात्र सलोनी रेश्माला जवळच करणार नाही हे माहीत असल्याने शरीफा रेश्माच्या वागण्याचे टेन्शन घेत नव्हती. आणखीन एक कारण होते. रेश्माला आत्ता सांभाळले तर महिन्याकाठी निदान दहा एक हजार तरी कमावता येतील हा सरळ हिशोब होता. एवढे पैसे इतर पोरींची कमाई एकत्र केली तरी बरेच होते. कबीर अन सलोनी अमजदला प्रचंड वचकून होते आणि सलोनी रोज रात्री येऊन आपली सेवा करते हे शरीफाला व्यवस्थित उमगलेले होते. त्यामुळे रेश्मा अन सलोनी भेटण्यात तिला आत्तातरी धोकादायक असे काही वाटत नव्हते. एकच जराशी भीती होती. ती म्हणजे सलोनीच्या तळघराला असलेले मागच्या बाजूचे चोर दार! त्या दाराशी रेश्माचा अजिबात संबंध येऊ द्यायचा नाही ही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन होती सलोनीला शरीफाची! आणि आजवर ललिताने सलोनीला त्या दाराबद्दल अवाक्षरही विचारलेले नव्हते हे सलोनी शपथेवर सांगत होती.

रमासेठने सरळ चार हजार शरीफाच्या हातात दिले अन शरीफाने ते त्याच्यादेखत रेश्मावर ओवाळले अन म्हणाली..

शरीफा - सेठ आये है.. बैठी क्या है?? जा.. सजधजके आ..

सजधजके आ! फारच मोलाचा सल्ला होता हा! ललिताला ते हवेसे वाटत होतेच! पण आत्ता नाही. आत्ता सजत बसण्यात वेळ घालवण्यात तिला शुन्य इंटरेस्ट होता. तिला सजायचे होते मगाशीच! रमासेठ यायच्या आधीच! आता आपण नटण्यासाठी आत गेलो अन रमासेठ अन शरीफाचे काही बोलणे सुरू झाले तर ही पाताळयंत्री बाई रहस्य उलगडून काढायला वेळ लावणार नाही हे ललिता जाणून होती.

तिने सगळ्यांदेखत रमासेठच्या गळ्यात हातांची मिठी घातली अन म्हणाली..

ललिता - मुझे.. सजते हुवे देखना नही चाहते आप??

शरीफाला काहीच बोलता येईना. कारण ललिताच्या त्या स्पर्शानेच रमा पागल होऊन 'जरूर, क्युं नही' म्हणत आत गेला देखील होता.

आणि आत गेल्यावर कोण नटत मुरडत बसतंय?

एकमेकांवर प्रणयचेष्टांची अखंड बरसात चालली होती तासभर! साडे नऊ वाजता सेठने खाना मागवला.

तीन बीअर, चिकन अन पराठे! ललिताने आज पहिल्यांदाच बीअरची टेस्ट घेतली अन नाक मुरडले.

दहा वाजता पुन्हा लाईट बंद झाला तो .. लागलाच नाही रात्रभर.. कारण..

पहाटे साडे चारला रमासेठ रूममधून निघून गेला अन बाहेर झोपलेल्या साहूला ललिताने उठवून आत खोलीत आणले.

या सकाळीसारखी सकाळ आजवर गेल्या तीन वर्षात उजाडली नव्हती.

अंगावरील रोमारोमातून येणारी सुखद वेदना, रमासेठच्या शरीराचा पुरुषी गंध सर्वांगावर लगडलेला आणि..

केवळ सात दिवसात.. बुधवार पेठेला कायमचा रामराम ठोकण्याची.... जवळपास..

फॉल्टलेस योजना.. रमासेठने ऐकवलेली..

व्वा!

मात्र! अतर्क्य योजना होती ती! जितकी अतर्क्य.. तितकीच.. जवळपास हमखास ठरणारी..

रमासेठचे डोके म्हणजे डोके होते. त्याने कोकीळा नावाच्या एका तिसर्‍याच वेश्येकडून ही सगळी माहिती चारच दिवसांपुर्वी मिळवली होती. असलीच काहीतरी माहिती मिळावी म्हणून तो म्हणे एक दिवसाआड बुधवारात येत होता. एकेका नवनव्या बाईकडे जात होता. बोलताना वक्तृत्वकलेचे सर्व कौशल्य अन पैसे वापरत होता. शेवटी चार दिवसांपुर्वी कोकीळा नावाच्या तब्बल पंचेचाळिशीच्या वेश्येने तिच्या कंपार्टमेंटमधे कुजबुजत्या स्वरात सांगीतले होते.

वेलकममधे तळघर आहे. तिथे तळघरात एक पायमोडकी राहते. तिच्या तळघराला मागे एक दार असून ते सरळ एका ड्रेनेजमधे उघडते. ते ड्रेनेज केदारी चौकापर्यंत सलग आहे. त्यातूनच सुनंदा नावाच्या वेश्येला पळवायचा कबीरने केलेला प्रयत्न फसला होता. कारण मधे एका ठिकाणि रस्त्यावर असलेल्या एका झाकणातून वर उभ्या असलेल्या माणसाने सरळ सरळ एक बाई अन एक माणूस खालून चाललेले पाहून अवाक होऊन ओरडून काही जणांना सांगीतले होते. त्याचा परिणाम असा झाला की केदारी चौकात ड्रेनेजचे झाकण उघडून वर आलेल्या त्या माणसाला अन त्या बाईला लोकांनी त्या गचाळ अवस्थेत असतानाच पाहिले अन अमजद धावत आला. झालेल्या मारामारीत कबीरचा एक डोळा गेला. मुख्य म्हणजे सलोनी स्वतः त्यावेळेस तळघरातच होती. त्या तळघरातून कबीर म्हणे त्यापुर्वी तीन चार वेळा हळूच केदारी चौकापर्यंत एकटाच सहज टेस्ट म्हणून जाऊनही आलेला होता. इतके असून तयने सलोनीला पळवून नेले नाही तर सुनंदाला नेले.

याचे कोकीळाने सांगीतलेले कारण सहज पटण्यासारखे होते. जिला धड चालताही येत नाही तिने ड्रेनेजमधून चालायचे, केदारी चौकात वर यायचे अन तिथून एका टू व्हीलरवर बसून सिटी पोस्टासमोरून निघून जायचे! इतकी सुंदर पण लंगडी मुलगी कोण आहे हे तिथला बच्चा बच्चा जाणून होता. सलोनीला पळणे शक्य नव्हते. पण सुनंदाला पळवल्यास ती सलोनीची कथा एका माणसाला सांगणार होती जो राजकारणात प्रभावी होता अन तो द्रवला असता तर तो सलोनीला बिनदिक्कत सगळ्यांसमोर सोडवणार होता अन पोलीस अर्थातच बघ्याची भूमिका घेणार होते.

मात्र! सुनंदा केदारी चौकातील ड्रेनेजच्या झाकणापर्यंत पोचलीच नव्हती. त्या आधीच्याच झाकणापाशी कुणीतरी पाहून बोंब मारल्यामुळे दोघेही पकडले गेले होते.

अमजदने सलोनीच्या तळघरातील दारामागे भिंत बांधली. आधी ड्रेनेज बंद करण्याचा त्याचा विचार होता. पण सगळी घाण साठून कुठूनतरी वर आली असती असा मौलिक सल्ला कुणीतरी दिल्यामुळे त्याने सलोनीच्या दाराबाहेर एक भिंत बांधून घेतली. आता दार आतून उघडले काय अन बंद केले काय? भिंत कोण पाडणार? आणि त्याचमुळे सलोनीच्या रूममधे जायला कुणाला परवानगी नव्हती. न जाणो कुदळी वगैरे घेऊन गेले अन पाडापाड सुरू केली तर?? पण रेश्मा रिकाम्या हातांनीच जाते ना यावर लक्ष होते. आणि ते समजल्यावर रेश्माच्या सलोनीकडे जाण्यावर अजूनतरी बंधने आली नव्हती.

आणि.. रमासेठच्या म्हणण्याप्रमाणे.. तीन दिवसांपुर्वी.. त्याने दोन माणसे लावली होती.. जी केदारी चौकातून उलटी गेली होती.. भर मध्यरात्री... आणि.. त्यांनी भिंतीला एक भगदाड पाडण्यात यश मिळवले होते...

रमासेठने बुधवार पेठेच्या इतिहासात कुणी केली नसेल अशी गोष्ट केली होती. अतर्क्य कृत्य होते ते! त्या लोकांच्या अंगावर म्हणे गटार साफ करणार्‍या कॉर्पोरेशनच्या लोकांसारखा गणवेष होता. एक माणूस ड्रेनेजच्या झाकणातच रस्त्यावर डोके येईल अशा पद्धतीने उभा राहिला होता. तोपर्यंत केवळ दिड तासात दुसर्‍या माणसाने पुढे जाऊन धक्के देऊन एक माणूस निश्चीतच जाऊ शकेल इतके भगदाड पाडले होते.

आणि... बरोब्बर सात दिवसांनी रात्री दिड वाजता... सलोनी शरीफाकडे असताना.. कसेतरी ललिताने साहूसकट सलोनीच्या खोलीत प्रवेश मिळवायचा होता... हा प्रवेश कसा मिळवायचा हे ललिताने तिचे तिने ठरवायचे होते.. सलोनीच्या खोलीत आल्यानंतरचे काम रमासेठच्या अखत्यारीत होते.. केदारी चौकात टू व्हीलर वगैरे गोष्टींना फाटा देऊन एक रिक्षा उभी राहणार होती... दिडपासून अडीचपर्यंत! आणि त्यानंतर दोन दिवसाआडच्या प्रत्येक रात्री त्याच वेळेला... पहिल्याच प्रयत्नात जर ललिता येऊ शकली नाही तर अजून चार पाच वेळा प्रयत्न केले जाणार होते.. त्यातही जमले नाही तर मात्र दुसरा मार्ग शोधला जाणार होता..

सात दिवस! कसे घालवले सात दिवस हे ललितालाही समजत नव्हते. भयाण ताण मनावर! अन त्याचवेळेस सगळे काही नॉर्मल आहे हे दाखवणे! गिर्‍हाईकांशी रमणे, मुलींबरोबर नेहमीच्याच गप्पा, शरीफाशी नेहमीसारखे बोलणे! भयानक ताण होता मनावर! अन दिवसागणिक वाढतच होता ताण!

सातवा दिवस उजाडल्यावर मात्र तिला सगळी योजनाच नाकारावीशी वाटायला लागली.

कशाला हे भयंकर धाडस करायचे आपण? कबीरचा डोळा गेला आहे. सुनंदाचा येताजाता पाण उतारा होत आहे. अजून सुनंदाकडे गिर्‍हाईके येतात म्हणून! नाहीतर तिचे काही खरे नाही.

एकतर साहूला रात्री बारा वाजताच दुकानावरून आणावे लागेल. संध्याकाळी आठ नंतर येणारे गिर्‍हाईक नाकारावे लागेल. सगळा संशयाचाच मामला की! कसे काय करणार आपण हे सगळे?

आणि.. सगळ्यात महत्वाचे म्हणजे.. पुणे या शहराची काही म्हणजे काहीही माहिती नाही. मुंबईच्या जवळ कुठेतरी हे शहर आहे इतकेच माहिती! बाहेर पडलो तरी.. करायचे काय? तो रिक्षावाला म्हणे आपल्याला कॅपमधे नेणार आहे आणि दुसर्‍या दिवशी अहमदनगरच्या रेल्वेत बसवून देणार आहे. तिथून काय करायचे? रमासेठ म्हणे त्या अहमदनगरला भेटणार आहे. पुढे काय? तो आपल्याला घरी थोडाच नेणार? काहीतरी व्यवस्था लावेल म्हणा! इतके सगळे केले आहेच त्याने.. मग काहीतरी नक्कीच करेल!

विश्वास! विश्वास ठेवणे या शिवाय जेव्हा माणसाच्या हातात काहीही उरत नाही तेव्हा फार केविलवाणि मनोवस्था होते माणसाची! बघत बसावे लागते आपले काय काय होते त्याच्याकडे!

आणि.. सगळ्यार महत्वाचा प्रश्न म्हणजे.. सगळे काही मॅनेज करूनही.. ऐनवेळेस पळताच नाही आले तर? किंवा.. कुणाला तरी सुगावा लागला तर? किंवा.. असे कित्येक किंवा होते..

सकाळचे अकरा वाजले होते. मागे एकदा आपल्याच आईला मारणारा पंचवीस वर्षाचा रॉकी धावत धावत कोठ्यावर आला.

अवाढव्य शरीफाबी तुच्छ नजरेने त्याच्याकडे पाहात होती. सगळ्याच मुली पाहू लागल्या. रॉकीची छाती अक्षरशः भात्यासारखी धपापत होती. त्यातही त्याच्या आईच्या मनात काळजीच होती. आपल्या मुलाला कुणी काही केले तर नाही? पण नाही. रॉकी घाबरलेला नव्हता. तो अत्यंत आनंदात होता. दमल्यामुळे त्याला काहीही सांगता येत नव्हते.

शरीफा - क्या हुवाबे मच्छर! *डा हुवा है क्या पयली बार जिंदगीमे??

चेटकीणी हसाव्यात तशा मुली एकमेकांना टाळी देत हसू लागल्या. रॉकीची आई मात्र अत्यंत भडकली होती मनातून! आणि.. रॉकी? तो तर स्वतःच त्या जोकला हसत होता.

रॉकी - ....भाई आरहे है...

सुन्न! एक क्षणाचा सन्नाटा! अन नंतर... शरीफाबी ताडकन उठून उभी राहिली. आजवर ललिताला माहीतच नसलेली एक खोली तिने कुणालातरी उघडायला अन साफ करायला लावली. मुली एकमेकींना ही सुखद बातमी सांगायला धावल्या. केवळ दोन मिनिटात मागच्या बिल्डिंगलाही माहीत झाले.

अचानक शिक्षा कमी झाल्यामुळे.. नेमका आजच.. अमजद वेलकमवर परत येणार होता.. संध्याकाळी..

अक्षरशः सोहळा सुरू झाला वेलकमवर! कुणीतरी फटाके आणायला धावले. कुणीतरी बाटल्यांची अन कबाब्जची सोय करायला धावले. कुणीतरी लायटिंगची सोय करायला धावले. कुणीतरी संपूर्ण वेलकम स्वच्छ करायला लागले. आत्तापर्यंत डिस्कोमधेही माहीत झाले होते केवळ अर्ध्या तासात! अमजदभाई वापस आरहे है.. छुटकर!

तीनच चेहरे कोमेजलेले होते.. कबीर.. सलोनी... आणि .. सुनंदा...

आणि नेमकी त्याचवे़ळेस सुनंदा शरीफाला म्हणत होती..

सुनंदा - शरीफा.. हफ्तेभरके लिये ये कमरा देदेना.. मै पुरानी कमाईमेसे पैसे दुंगी..

सुनंदाने ललिताची खोली मागण्याचे अन तेही स्वकमाईचे काही पैसे लाच म्हणून शरीफाला देऊन.. एक महत्वाचे कारण होते. आज जर अमजदला सुनंदा त्या खोलीत गिर्‍हाईकाबरोबर आहे हे कळले असते तर त्याला सुनंदाला आल्याबरोबर काहीही शिक्षा करावीशी वाटली नसती. कमावती पोरगी आहे.. काही दिवस नखरा सहन करू अशी पॉलिसी त्याने स्वीकारली असती. आणि काही पैशांच्या लोभाने शरीफा ते स्वतःच्या अधिकारात मान्य करायला तयार झाली होती. पुढेमागे याच कारणावरून ब्लॅकमेल करून सुनंदाला आपल्या खोलीत हक्काने बोलवत येईल हा एक वेगळा स्वार्थ होता तिचा!

सलोनीने कधीच पळून जायचा प्रयत्न केलेला नसल्यामुळे अन ती शरीफाबीला रात्रीची खुष ठेवत असल्यामुळे अमजग सलोनीला काहीही करणे शक्यच नव्हते. मात्र.. कबीरला तो काय करेल या भीतीने ती घाबरलेली होती..

... आणि कबीर...

खर्रकन चेहरा उतरला होता त्याचा! आज आल्याआल्याच अमजद सूड उगवणार या भीतीने त्याला ग्रासलेले होते. आपले काही खरे नाही हे त्याला माहीत होते. एक डोळा गेलेलाच आहे. आता अमजद मागचे सगळे सोडून देणे तर शक्य नाही. मग?? त्याने काही करू नये किंवा दया दाखवावी यासाठी कबीर मार्ग शोधत होता. वेलकमला लायटिंग करणे! पार्टीचे आयोजन करणे! आल्याआल्या अमजदच्या पायांवर लोटांगण घेऊन त्याची माफी मागणे! वगैरे वगैरे!

या सगळ्या भानगडीत ललिताकडे कुणाचे लक्षच नव्हते. ती पूर्ण भांबावून गेली होती. अमजदभाई येणार म्हणजे आपल्याला पळणे सुलभ आहे की अशक्य हे तिला ठरवताच येत नव्हते.

बरोबर आहे कन्फ्युज्ड होणे! तो आल्यामुळे चाललेल्या प्रचंड पार्टीत ती दिसेनाशी झाली तर कदाचित लक्षात येणार नव्हते कुणाच्या! आणि.. जर.. अमजदने आल्या आल्या हिसाब किताब केले तर ललिता त्याच्या चांगली लक्षात राहणार होती आणि... ती इकडे तिकडे गेलेली किंवा साहू दिसेनासा झालेला सगळ्यांना लगेच समजणार होते..

पण.. एकच संधी! आज नाही तर कधीच नाही. आज प्रयत्न केला नाही तर दोन दिवसांनी करता येणार होता हे खरे आहे!

पण! अमजद आल्यानंतरच्या दोन दिवसात काय काय घडेल हे माहीत नव्हते. कदाचित कबीरला शिक्षा मिळू शकणार होती. त्यामुळे सगळ्यांवरच लक्ष ठेवण्यात येणार होते. त्यामुळे जे काय करायचे ते... आजच!

संध्याकाळी साडे पाच वाजता ललिता आपल्या खोलीत बसली होती. साहू शाळेतून आला.

ललिता - बेटा.. आज .. थोडा जल्दी आं हां!
साहू - क्युं?
ललिता - जो बोल रही हूं वैसा कर.. और.. किस्सीकिस्सीसे मत बोलना के मैने जल्दी आनेको कहा है..
साहू - लेकिन.. आज तो मै..
ललिता - क्या??
साहू - जानेवालाही नही था... अमजदचाचा आ रहे है..
ललिता - तो.. फिर तो बहोतही अच्छा! मै उसीलिये रुकनेको कह रही थी तुझे..
साहू - कितने बजे आयेंगे वो??
ललिता - सात.. तू अब नीचे जाके सडकपे बैठ बेटा..

साहू निघून गेला. सुनंदा आली. कमालीचा फटफटीत चेहरा!

सुनंदा - रेश्मा.. आजके दिन..
रेश्मा - क्या?
सुनंदा - ये कमरेमे.. मै रहनेवाली है..
रेश्मा - क्युं?
सुनंदा - शरीफाने बताया है..

पायाखालची वाळूच सरकली ललिताच्या! आता हे काय नवीन?? समजले की काय? नक्कीच! त्या शिवाय शरीफा असे कसे म्हणेल? सलोनीने.. नक्कीच पाहिलेले असणार भगदाड! दार उघडून! आणि.. रोज रात्रभर ती.. शरीफाकडे असते म्हंटल्यावर.. आज खरच अमजदभाई येणारेत की आपल्याला घाबरवण्यासाठी सगळी नाटके चाललीयत? नक्कीच पाहिलेले असणार भगदाड सलोनीने! त्याशिवाय अचानक सुनंदाला या खोलीत कसे यायला सांगेल शरीफाबी!

आपण बाहेर बसलो तर.. पळून जाणे शक्यच नाही. नुसते जागचे उठलो तरी कुणीही विचारणार! कुठेचाललीस? खोलीतून बाहेर गेलो तर निदान.. गिर्‍हाईक पाहायला गेली.. किंवा काहीतरी तरी वाटेल.. कदाचित अमजदबहई खरच येणार असतील तर... स्वागताची तयारी पाहायला जाअते असे तरी सांगता येईल.. पण.. सततच डोळ्यासमोर असलो तर.. आणि.. साहूचे काय??

या खोलीत तू आज तहंबायचे नाहीस हे सुनंदाला सांगणे पूर्णपणे अयोग्य ठरले असते. आज इथे थांबण्यात आपला काहीतरी खास उद्देश आहे असे कुणालातरी वाटले असते. तसेच, शरीफाला उलटे विचारणे की 'सुनंदाला काय म्हणून आज ही खोली' हे ललिताच्या स्वभावातही नव्हते अन तेहि चुकीचे ठरलेच असते.

ललिता - ठीक है.. ये सामान..
सुनंदा - सामान बिस्तरके नीचे रखती हूं मै..
ललिता - नहीजी.. मै बाहर रखती हूं.. कोई.. ग्राहक आरहा है आपका..

सुनंदा अचानक हमसाहमशी रडू लागली. त्यानंतर तिने सांगीतलेल्या गोष्टी ऐकून ललिताच्या मनावरील एक जळमट जरी दूर झाले .. की निदान आपली योजना कुणाला कळलेली तरी नाहीये.. तरी दुसर्‍या भीतीने तिला ग्रासलेच..

सुनंदा - काहेका ग्राहक रेश्मा.. दोसौ रुपयेमे सोती हूं मै.. अमजदभाईको क्या मालूम नही है?? सब जानते है वो.. जेलतक रिपोर्ट जाती है.. लेकिन.. आज.. आज वो आनेके खुषीमे किसीका बुरा नही करना चाहेंगे.. लेकिन... मे दिखेगी तो.. हो सकता है के.. मुझे पिटेंगे.. इसलिये शरीफाको बोलके रख्खा है.. आजके दिन ये कमरा देदे.. उससे.. कमसेकम वो ये तो सोचेंगे के मेरे पास आज.. कोई बडा ग्राहक आनेवाला है.. बादमे उनके दारू पिनेकेबाद शायद.. मै पैर पकडके माफी मांगलुंगी.. लेकिन... कबीरका पता नही..

ललिता - और.... सलोनी??

सुनंदा - ..... सलोनी क्या?

ललिता - सलोनी कहां होगी आज?

सुनंदा - आज उसके लिये अच्छा दिन है.. क्युंकी अमजदभाई आके आज पहिली रात शरीफाको बुलायेंगे कमरेमे.. तो.. सलोनी.. वहीपर बैठेंगी.. तयखानेमे..

जबरदस्त हादरा बसला होता. आपल्या किरकोळ भासणार्‍या, परंतू एक दोन महत्वाचे दागिने आणि काही रोकड असणार्‍या दोन पिशव्या हातात घेऊन ललिता खोलीबाहेर आली तेव्हा तिने सुटकेच्या सगळ्या आशा स्वतःच मालवून टाकल्या होत्या. आता फक्त काय काय होते ते पाहायचे होते. आज जर आपण केदारी चौकातील ड्रेनेजमधून बाहेर आलो नाहीत तर उद्या रमासेठ एकदा पुन्हा येणार असे ठरलेले होते... पण यावेळेस फक्त एकच तासापुरते.. विचारून जाणार होते काय झाले ते..

आणि मग... तिसर्‍या दिवशी पुन्हा.. तोच प्रयत्न करायचा होता.. हे केवळ तीन किंवा चारच वेळा करायचे ठरले होते..

बाहेर बसलेल्या ललिताच्या डोळ्यासमोर भविष्याचा अंधार पसरला होता. ती फन्क्शनमधे सहभागी होऊच शकत नव्हती. कबीर मन लावून साफसफाई करत होता. आल्याआल्या अमजदच्या पायांवर लोळण घेणार होता. शरीफा तिच्या खोलीत नटत होती. सलोनी तिला मदत करत होती. आज सलोनीचे कोठ्यावर येणे शरीफाला अपशकुन वाटत नव्हता.

अर्ध्या तासाने अचानक सलोनी बाहेर आली. ती लंगडत लंगडत जिना उतरायला निघाली तसे ललिताने निरखून पाहिले. सलोनी अफलातून सुंदर होती. आणि... पायामधे.. खरे तर ... कुठलाही दोष असेल असे वाटत नव्हते.. पण.. लंगडत होती.. बिचारी.. कसला अपघात झाला असेल काय माहिती हिला.. पण.. आता ही खाली चालली असेल तर.. मग?? पुन्हा वर येणारच नाही?? मग.. आपण कसे जायचे ही असताना तळघरात???

ललिताच्या मनात विचारांची वादळे घोंघावत असतानाच अचानक सलोनी मागे वळली. ललिताकडे पाहात लंगडत लंगडत तिच्याकडे आली. सलोनीला येताना पाहून ललिता भीतीने नखशिखांत घामेजली. ही का स्वतःहून आपल्याकडे येतीय?? आजूबाजूला कुणीच नसताना.

सलोनीला पोचायला लागलेले दोन, चार क्षण फार भयंकर गेले. मात्र सलोनीने अचानक झुकून ललिताच्या खांद्यावर हात ठेवला अन तिच्या कानापाशी तोंड नेले.

हिलाही शरीफाची सवय लागली की काय असा प्रश्न ललिताच्या मनात येत असतानाच सलोनी उद्गारली..

सलोनी - साहू तो आरामसे जा सकेगा.. तेराही प्रोब्लेम है.. लेकिन मै पीछेसे ढकेलुंगी.. एक बार उस होलसे तू बाहर गयी तो.. पुरी दुनिया तेरीही है.. और.. मै.. आज.. तयखानेका दरवाजा अंदरसे बंद नही कर रही हू,... चिंता मत कर बहन..

सलोनीने एवढे बोलून ललिताच्या ओठांवरून स्वतःची जीभ फिरवली. ललिता त्या स्पर्शाने शहारली. मात्र... सलोनीचे बोलणे ऐकून वेड लागायची वेळ आली होती तिला. सलोनीला माहीत आहे म्हणजे कबीरलाही असणार! आणि.. आपला अंदाज बरोबरच आहे. इतकी फोडाफोडी झालेली सलोनीला कळणार नाही का? दोघेही आपल्या बाजूचे आहेत ही... इश्वरकृपाच म्हणायची.

ललिताने उठून अक्षरशः सलोनीला मिठी मारली. मात्र.... सलोनीला ती मिठी वेगळ्या अर्थाची वाटली अन ललिताला अभिप्रेत असलेला अर्थ वेगळा होता. दोन्ही अर्थांमधली भिन्नता ललिताच्या लक्षात तेव्हा आली जेव्हा सलोनीने सरळ ललिताच्या ओठात ओठ गुंतवले. पुन्हा शहारून ललिता बाजूला झाली.

अमजदभाई!

अमजदभाई येणे म्हणजे इतर इमारतींसाठी जरी काहीही नसले तरी वेलकमसाठी सबकुछ होते. एक फटाक्याची माळ लावली गेली. शरीफाने दारातचे अमजदला मिठी मारली. आणि जिना चढून अमजद वर आला तेव्हा कबीरने त्याच्या पायावर अक्षरशः लोळण घेतली. बाकी सगळ्या मुली अमजदच्या अंगाला लगडल्या. अमजदने अत्यंत क्रूर चेहरा करून कबीरला उठवले अन अलगद बाजूला केले. कबीरच्या चेहर्‍यावर अतोनात दु:ख होते.

आणि अमजदची नजर ललितावर पडली. साहू ललिताच्या मांडीत बसला होता. त्याला ललिताने पटकन बाजूला ठेवले व अमजदकडे बघून मान झुकवून बसूनच हात जोडले.

अमजदभाई! वय वर्षे पंचेचाळिस! गोरापान मुसलमान! शरीफा किरकोळ वाटेल असे अगडबंब शरीर! केवळ दाढी! मिशी नाहीच! आणि डोळे हिरवेगार! डोळ्यातील भावनांचे वर्णन करणे शक्य नाही. अत्यंत भेदक नजरेने ललिताकडे पाहात होता. ललिता त्या नजरेनेच शहारली. तिने मान खाली झुकवली.

शरीफा - रेश्मा है ये... नयी आयी महिनेभरसे.. डिस्कोमे थी...

ललिता पटकन उठली अन त्या ग्रूपमधे गेली. अमजदने तिला सरळ खांद्यांना धरून जवळ ओढले अन म्हणाला..

अमजद - खूबसूरत है.. रेंज क्या है इसकी?
शरीफा - आठसो से बारासौ.. नाईटके चार हजार लिये दो बार... रमासेठ आये थे..

अमजदने सर्वांदेखत ललिताच्या ओठांचा चावा घेतला. निर्लज्ज मुली खदाखदा हसल्या. अमजदच्या पाशवी ताकदीची जाणिव होऊन ललिता गर्भगळीत झालेली होती.

अमजद - कल, परसौ भेज इसको..
शरीफा - जी..

एवढे म्हणून अमजद त्याच्या खोलीत गेला अन पाठोपाठ शरीफा!

कबीरही आत गेला. कबीर आत जाऊनही कोणताही भांडणाचा आवाज आला नाही. सगळ्याच मुली भयचकीत होत्या. बर्‍याच वेळाने कबीर समाधानी चेहर्‍याने बाहेर आला.

कबीर - भाई.. माफ किये मेरेको..

सगळ्यांनी समाधानाचे सुस्कारे सोडले. मग सुनंदा आत गेली. तरीही कोणतीही भांडणे झाली नाहीत. मात्र, सुनंदा बाहेर आलीच नाही.

चार तास! चार तास वेलकमच्या कोठ्यावर येणार्‍या गिर्‍हाईकाकडून पैसे वगैरे घेण्याचे काम दिम्पल करत होती. शरीफानंतर सुनंदा अन त्यानंतर डिम्पल असा तो क्रम होता.

आणि बरोब्बर साडे बारा वाजता...

कुणाच्याही पेंगुळलेल्या डोळ्यात आता कसलीही उत्सुकता राहिलेली नाही हे पाहून ललिता झोपलेल्या साहूला अक्षरश: उचलून तळघरात गेली. जिन्यावरील एक दोन मुलींचे लक्ष नव्हते इतके तिला समजले होते.

आत गेल्या गेल्या सलोनीने आतून दार लावून घेतले अन ललिताला संध्याकाळसारखेच पुन्हा आवळले. आता साहू जागा झालेला होता अन उभा होता. सलोनीने तिच्या हातात एक टॉर्च दिला.

सलोनीने मागचे दार उघडले. नरक बरा असा दुर्गंध आला त्या दारातून! मात्र पर्यायच नव्हता! साहूच्या कोणत्याही शंकांची उत्तरे न देता दोघींनी साहूला आत ढकलले. तो आत गेल्यावर रडू लागला. त्यानंतर ललिता कशीबशी आत घुसली.

किमान पंधरा मिनिटे घाणेरड्या लगद्यातून चालत असावेत ते!

त्यानंतर ट्रॅफिकचे आवाज जवळ आल्यासारखे वाटले. हे मधले दार असणार हे ललिताला समजले. मधेच साहू ओकला. तरीही ललिता त्याला घेऊन कशीबशी चालत राहिली. आणखीन दहाच मिनिटांनी ते एका झाकणाखाली आले. टॉर्च बंद करून ललिताने साह्ला त्याच अवस्थेत उचलून झाकण ढकलायला सांगीतले.

साहूच्या किरकोळ ताकदीने बर्‍याच वेळाने झाकण उघडले गेले आणि साहू अचानक वर उचलला गेला.

ललिता वरचे दृष्य पाहून हादरली होती. दोन बळकट हातांनी ललिताचा देहही बाहेर आला.

सलोनी, शरीफा, सुनंदा, रॉकी, डिम्पल, अमजदभाई... कबीर.. आणि.... रमासेठ....!

कबीरने तिला उचलले होते.

अमजदभाई - ये गंदगी पुरी तरहा साफ कर सुनंदा.. और जब शरीफाको ये लडकी भेजनेलायक लगेगी.. तब मेरे कमरेमे भेज दे..

गुलमोहर: 

वाचुन पोटात गोळा आला.... भयानक आहे सार काहि...ताकद नाहिये कही पुडे वाचायची.... काल च तुलशीबागे तुन आले आहे...

एक अमेरिकन सिरियल पाहिली होती 'Prison Break' म्हणून...तिची आठवण झाली एकदम. त्यातला नायक असाच तुरुंगाच्या ड्रेनेज पाईपमधून सुटायचा प्रयत्न करत असतो. प्रचंड ब्रिलियंट प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन नंतरही त्याचा प्रयत्न यशस्वी होत नाहीच...
ललिताचा तर हा पहिला प्रयत्न होता. आजच्या भागाचा हा असा शेवट त्यामुळेच मला अपेक्षित होता...पण तरीही हृदयाचे ठोके प्रचंड जलद करण्यात तुम्ही यशस्वी झालातच...
बाकी, इतक्या लवकर... लवकर का? कधीही ललिताची सुटका होईल अशी आशाच वाटत नाही. प्रकरण अवघडच आहे... आता तिचे काय हाल होणार ह्या विचारानेच थरकाप होतोय.
बाकी रमाशेठने आणि सलोनी, कबीर इ. नी तिला असा दगा द्यायचं काय कारण? हे मात्र समजत नाही. Sad

तरी विचार करत होते की अजून ट्विस्ट कसा नाही. सरळ का चालली आहे ललिताची कथा!

शेवटाला अगदी खास "बेफिकीर" टच!

तरी विचार करत होते की अजून ट्विस्ट कसा नाही. सरळ का चालली आहे ललिताची कथा!

शेवटाला अगदी खास "बेफिकीर" टच!