असा करुया आनंद साजरा!

Submitted by आशूडी on 7 June, 2010 - 03:21

समजा, आपल्याला एखादा समारंभ करायचा आहे, पण तो साजरा करण्यासाठी काय काय नवीन गोष्टी करता येतील याची मायबोलीवर चर्चा करण्याची कल्पना कशी वाटते? म्हणजे उत्सवमूर्तीसाठी काही विशेष, आमंत्रितांचे आदरातिथ्य, गिफ्ट्स इ विषयी कित्येकांच्या डोक्यात काही अभिनव कल्पना असतात, ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युलेही असतात, कधी थोडं पारंपारिक पण हटके असं मस्त मिश्रण जमून येतं मग हे अनुभव शेअर करण्याविषयी काय मत? Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गरज ही शोधाची जननी आहे. मला या धाग्याची खरंच गरज का वाटली, कारण काय हे ही सांगते.
पुढच्या महिन्यात बाबांची साठी पूर्ण होतेय. त्यासाठी आम्ही बहिणी मिळून एक सरप्राईज कार्यक्रम करायचा असं घाटतंय.. सगळ्या नातेवाईकांना बोलावून..हॉल घेऊन.. आता हा काही तसा लग्न्-मुंजी सारखा पारंपारिक कार्यक्रम नाही ना, मग काहीतरी नवं, छान असं करता येईल का, काय काय? असा विचार करत होते. म्हणजे गुरुजी वगैरे बोलावणार नाही तरीही 'तुला' करायची झाली तर त्यासाठी गूळ, डाळीशिवाय अजून काय वापरता येईल, बाबांच्या हस्ते आमंत्रितांना ज्ञानेश्वरी /दासबोध/ किंवा तसं एखादं संग्राह्य मराठी पुस्तक देण्याची कल्पना कशी वाटते? शिवाय एका बाजूला त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांचे फोटोतून कोलाज करणे छान दिसेल काय?
यावेळीस आई बाबांना न कळवता हा घाट घालतोय तेव्हा सगळं छान, सर्वांना आवडेल असं व्हावं असं वाटतंय, तेव्हा तुमच्या सल्ल्यांचे स्वागत आहे. Happy

आमंत्रितांना ज्ञानेश्वरी /दासबोध/ किंवा तसं एखादं संग्राह्य मराठी पुस्तक देण्याची कल्पना कशी वाटते?>> खूप आवडली ही कल्पना.

'थीम पार्टी' करता येईल. एक पार्टी होती- लग्नाला २५ वर्षे झाली म्हणून त्या जोडप्याच्या मुलीने अशीच आयोजित केली होती, त्यात बायकांना 'गुलाबी' आणि पुरुषांना 'निळा' असा ड्रेसकोड होता. इथे साठी आहे, सो, 'पारंपारिक' अशी थीम ठेवता येईल. किंवा तत्सम काहीतरी..

आमंत्रितांचे साधारण वय हे असेच साठीच्या आसपासचे असेल तर गाण्याचा कार्यक्रम ठेवता येईल दोन तासांकरता, त्यात बाबांना खास आवडणारी गाणी अंतर्भूत करता येतील.

बाबा जिथे काम/ नोकरी करत होते, त्या स्टाफमधले कोणी 'नोकरीच्या ठिकाणचे बाबा' ह्याबद्दल मनोगत व्यक्त करू शकतील. सहसा कामाच्या ठिकाणी व्यक्ती वेगळीच असते घरापेक्षा, त्या पैलूवर प्रकाश पडू शकेल. 'बाबांची अव्यक्त/ माहित नसलेली बाजू' ह्यावर आप्त/ मित्र/ तुम्ही मुली बोलू शकाल. आईलाही बोलायचा आग्रह करा Happy

आशुडी, मी ही माझा अनुभव सांगते.

मागच्या वर्षी आम्ही ४ बहिणींनी मिळून बाबांची ७५ साजरी केली. अगदी घरच्या घरीच. त्यांचं ७५ दिव्यांनी औक्षण केलं व ५ रुपयांची ७५ नाणी वापरून हार केला होता आणि फोटोंचं कोलाज केल होतं. अगदी सगळे जुने फोटो वापरले त्यासाठी.

फंक्शन काहीच नव्हते, पण चौघींच्या घरचे (नवरे आणि मुलं) व आई-बाबा दुपारी जेवायला एका ठिकाणी गेलो.

गूळ डाळीशिवाय साखर (पॅक केलेली) वापरता येईल.

ज्ञानेश्वरी दासबोधाची आयडिया चांगली आहे पण तुमच्या वर्तुळातील आमंत्रितांकडे हे दोन ग्रंथ आधीच असण्याची शक्यता आहे का ते पडताळून घे.

गाण्याचा कार्यक्रम पण चांगला वाटेल.

बाकी तुला लगेच विपु केली आहे.

बाबांच्या 'करायच्या राहून गेलेल्या' गोष्टींचा शोध घे. त्यातलं काही करता येतं का बघ. आर्ट अँड क्राफ्टचे बरेच क्रिएटिव्ह प्रकार बाजारात आले आहेत, ते घे, त्यांना आवडत असेल तर घे ते. त्यांचा एखादा जुना छान फोटो असेल, तर त्याची सुंदर फ्रेम कर. पोर्टेट करता आलं, तर मस्तच.

तू बाहेर राहिली नसल्यामुळे त्यांचं तुला आलेलं पत्र नसेल बहुधा. इतर कुणाला आलेलं? (खाली अश्विनीने म्हणल्याप्रमाणे त्यांच्या मित्रांना आलेलं). नॉस्टॅल्जिक होऊन जरा छान वाटेल त्यांना.

तू छान लिहितेस. काहीतरी लिही इथे मायबोलीवर (ते अगदी त्यांच्याचबद्द्ल नसलं तरी चालेल. असलं तर छानच). आणि ते इथे जाहीररीत्या त्यांना अर्पण कर. त्यांच्यावरचं तुझं मनोगत प्रिंट करून छान फ्रेम करून दे. तुझ्यासाठी ते किती महत्वाचे आहेत, आणि त्यांची तुझ्या विश्वात काय जागा आहे, ते खुलेपणाने लिही त्यात. असं खुल्या दिलानं एखाद्याला त्याच्याचबद्दल सांगून टाकायचे, भरभरून बोलायचे फार कमी प्रसंग येतात नाही? तर हा आहे प्रसंग. तो सोडू नकोस. त्यांच्यात काय चांगलं आहे, आयुष्यात त्यांनी काय चांगल्या गोष्टी केल्या आहेत हे आपल्याला बर्‍याचदा माहिती असतं. पण ते आपल्याला माहिती असल्याचं त्यांना माहिती झालं, तर कोण आनंद होतो त्यांना. लाखोंच्या भेटवस्तू दिल्यावरही त्याची तुलना होणार नाही.

आदल्या / दुसर्‍या दिवशी एखाद्या निवांत-शांत ठिकाणी जा. आणि भरपूर बोल त्यांच्याशी. त्यांचे-तुमचे मित्र, गोतावळा जमवता आला तर ठीक. पण ते त्यांना आवडत असेल तरच. बरेच लोक गर्दीत स्वतःला मिटून घेतात, आणि मग उरतो फक्त उपचार. मग कायमचं लक्षात राहून जाण्याच्या दृष्टीने त्याचं मुल्य शून्य.

शिवाय पुस्तकं. जुनं संगीत. खाणं. सिनेमा. नाटक. फिरणं. यातलं त्यांना जे आवडेल ते.

एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला गिफ्ट द्यायचे झाल्यास , मस्त एखादी कविता त्या खास दिवसाचं औचित्य साधून बनवलेली photoshop मधे devlope करुन त्याची मस्त फ्रेम करून दिल्यास...

कशी आहे माझ्या गिफ्ट्ची आयडीया..

सगळ्यांच्याच आयडिय छान आहेत.

( पूनमच्या सुचनेला अनुमोदन)
रीतीभातींबद्दल मी नाही सांगु शकणार, पण त्यांच्या आवडीनुसार काहीतरी कार्यक्रम ठेवावा असं सुचवेन.
उदा- या प्रसंगी नातेवाईकांने, मित्रमंडळींने, मुलामुलिंने त्यांच्या हृद्य आठवणी सांगीतल्या तर?
किंवा त्यांना ज्यात रस आहे असा एक छोटासा कार्यक्रम
या व्यतिरीक्त कसली तरी छोटी देणगी, त्यांच्या आवडीनुसार, कुठल्याही संस्थेला

१. स्मृतिवनात जाऊन ६० झाडं लावणे. अथवा एखाद्या टेकडीवर.
२. पुस्तकांची तुला करणे. (मला व्यक्तिशः एका विशिष्ट वयानंतर ज्ञानेश्वरी, दासबोधच वाचा, हा आग्रह आवडत नाही Happy )
३. रैना म्हणते आहे, त्याप्रमाणे खास आठवणी सांगणे.

खरंच, खूप मस्त आयडिया देताय सगळे. पूनम, आमच्याकडे ऑटोमॅटिकच पारंपरिक थीम होते. Proud
गाण्याची मैफल जमवायचं मी जवळजवळ नक्कीच केलंय... त्याने सगळ्यांनाच आनंद मिळेल.
आऊटडोअर्स, तू म्हणतेस तसाच आम्ही त्यांचा ५० वा वाढदिवस केला होता. आता जरा मोठ्या प्रमाणात करायचा आहे. Happy
मनोगतांबद्दल मला जरा धास्ती आहे कारण त्यांचं आयुष्य प्रचंड प्रचंड कष्टप्रद गेलं. त्या आठवणींनी तेच काय आम्हीही हळवेच होणार.. Sad त्यापेक्षा साजिरा म्हणतो तसं मीच काही लिहायचा प्रयत्न करते म्हणजे वातावरण प्रफुल्लित राहण्याकरता काय सांगावं आणि काय नाही हे मला ठरवता येईल. नोकरीच्या ठिकाणच्या आठवणी पण बेस्ट होतील.
अश्विनी, तुझी विपूच इथे टाक तुझ्या पोस्ट मध्ये.
चिनूक्स, मलाही तुझी पुस्तकतुला फार आवडली. त्याने निरनिराळी पुस्तके आणता येतील आणि ज्याला जे हवं ते देता येईल. ज्ञानेश्वरी वगैरे उदा. दाखल दिले होते.

अजून एक, एकसष्ठ वस्तू त्या अगदी छोट्या छोट्या सुद्धा चालतील, पण बाबांच्या दृष्टीने महत्वाच्या ,असेही गिफ्ट म्हणून देऊ शकतेस, मजा येते. जरा वेगळं!

आशूडीच्या विपुतलं इथे कॉपी करतेय ----

"बाबांच्या क्लासमेट्सपैकी / जुन्या मित्रांपैकी कुणी तुला माहित असतील तर त्यांच्याशी काँटॅक्ट कर आणि त्यांना बाबांच्याबद्दल काही मनोगत / जुन्या आठवणी लिहून द्यायला सांग. (या जुन्या मित्रांना विश्वासात घेऊन आमंत्रण द्यायचं बाबांच्या नकळत, मग बघ बाबा किती खुष होतील त्यांना अचानक समोर बघून.) अशी काही मनोगते साठीच्या आधीच काही दिवस मागवून ठेव. त्या दिवशी सगळे निमंत्रित जेवणानंतर खुर्च्यांवर विश्रांती घेत असतील तेव्हा तुम्हा कुणा बहिणींपैकी कुणीतरी वाचून दाखवा. बाबांना त्यांचे ते तरुणाईतले दिवस आठवून खूप छान वाटेल (साठीवर उतारा Wink ). तसेच तुम्हापैकी कुणीतरी त्यांना शुभेच्छा देणारी एखादी सुंदर कविता करा ज्यात त्यांनी तुमच्यासाठी जे काही केलंय त्याची कृतज्ञताही भरभरुन व्यक्त होईल.

तसेच त्यांना प्रिय असणार्‍या छोट्या छोट्या ६० वस्तू आणून छान गिफ्ट पॅक करुन सकाळी ते उठायच्या आधी त्यांच्या बेडच्या जवळ किंवा चक्क बेडवर पसरुन ठेवा. उदा. त्यांचं आवडतं पर्फ्युम, पेन, शेव्हिंग सामानाचं पाऊच (रिकामं Proud ), शेव्हिंगचं सामान, चॉकलेट, लेटरपॅड, कीचेन, थर्मास (चहा कॉफी खूप आवडत असेल आणि आईला सारखं सारखं करायला सांगत असतील तर आईचं एक दोन वेळचं काम वाचेल. अर्थात आईला तितके वेळा करुन द्यायला आनंदही वाटत असेल Happy ), चष्म्याचं छानसं कव्हर, बाबांचं नाव प्रिंट केलेला मग, एखादं पुस्तक. अशा त्यांच्या आवडीच्या वस्तूंची लिस्ट करुन मग हे करावं लागेल. पण मजा येईल.

सकाळी देवळात वगैरे जाणार असतील तर तिथूनच जवळच्या वृद्धाश्रमात भेट द्यायला जाणे. तिथल्या आजोबा/आजी, काका/काकूंना त्यांचा छोटा भाऊ आशिर्वाद घेण्यासाठी आलाय असं वाटेल हे किंवा तत्सम गोष्टी तुला मुद्दाम सांगायला खरंतर नकोतच

अजून काही सुचलं तर लिहिते."

>>>> म्हणजे गुरुजी वगैरे बोलावणार नाही <<<<<
ते का म्हणे?
ज्योतिषाप्रमाणे मनुष्याचे वय १२० वर्षान्चे कल्पिलेले आहे
पैकी ६० व्या वर्षी जन्मकालिन ग्रहस्थिती जशिच्यातशि पुन्हा येते, व त्यानिमित्तच साठी शान्त केली जाते!
जर ती करायचीच नसेल, तर बाकि गोष्टी जसे की दिव्यान्नी ओवाळणे, तुला करणे या बाबी केवळ शोभेच्या ठरतात!! अर्थात तसेच करायचे ठरले असेल तर मग सोहळा साजरा करताना अनेकानेक बाबी वर सुचविल्याच आहेत त्या कराव्यातच
पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे ५८ वा ६० वर्षी रिटायर झाल्यावर या वयातील माणसात मनाच्या कोपर्यात कुठे तरी एक पोकळी तयार होऊ लागलेली अस्ते की, सम्पले, सम्पला आता आमचा उपयोग! ही भावना अतिशय बेक्कार असते, तर याच निमित्ताने, आम्हाला तुम्ही अजुनहि खुप खुप काळ हवे आहातच, पण आम्हाला तुमचा उपयोगही प्रचण्ड आहे हे ठसवता आले तर बरे! Happy
कोलाजची आयडीया मस्तच आहे!
त्यातच, जर जमण्यासारखे असेल तर, त्यान्नी ज्या ज्या ठिकाणी आयुष्यातील महत्वाचा काळ व्यतित केला, त्या ठिकाणचे फोटो मुद्दामहून जाऊन काढून आणले तर अधिक बहार येईल.
(माझ्या एक तपानन्तर येऊ घातलेल्या भावी साठी सोहळ्याकरता, माझा मीच जाऊन, माझ्या जन्मानन्तर माझे सुरवातीचे साडेतिन वर्षान्चे बालपण जिथे गेले त्या नाशकातील रविवार कारन्ज्यापासच्या बाफना बिल्डिन्गचा फोटू काढून आणुन ठेवलाय! हो ना, उगाच पोरान्ना धावपळ करायला लागायला नको अन खर्चही नको, कसे?? Proud )

लिंबूटिंबू, काही शारिरीक कारणास्तव ते होम हवन वगैरे करायचे नाही असे ठरले आहे त्यात बुप्रावाद नाही. तुझी बहारदार आयडिया चांगली आहे.

साजिरा म्हणतो तश्या राहून गेलेल्या गोष्टी>>> एका मावसभावाच्या काकांची साठी केली होती तेव्हा त्यांची तुला केली होती ती चित्रकलेच्या सामानाने.. काका हाडाचे चित्रकार पण चरीतार्थासाठी बँकेत नोकरी करावी लागली. पण मग त्यांचा छंद, आवड लक्षात त्यांच्या सगळ्यात धाकट्या भावाने आवाहन केलं की आहेर म्हणून चित्रकलेचं तुम्हाला सुचेल ते सामान आणा आणि त्याची मग तुला केली होती. खूप छान ह्रद्य कार्यक्रम झाला होता तो. Happy

आशु, छाने कल्पना. सर्वांच्या सुचना मौलिक आहेत.
हा समारंभ शक्यतो बाबांकरता पूर्ण सरप्राईज असु द्या. म्हणजे ते निमंत्रीत असलेल्या हॉलमध्ये पोहोचेपर्यंत त्यांना कळता कामा नये. चिनूक्सची आयडीया छान आहे. तसेच बाबांच्या नावाने कुठे देणगी वगेरे देता येइल. बाबांना जे आवडते त्या गोष्टींपैकी निवड आणि तेही कोलाज केले तरी छान. कोलाज करतांना किंवा त्यांना आलेल्या भेटवस्तू-मेमरीज डिस्प्ले करतांना घर आणि ऑफिस दोन्ही वेगवेगळे मांडता येइल.

>>>>>>तुझी बहारदार आयडिया चांगली>>>>>>
तीच ना? जन्मस्थळाचा फोटू काढून आणायची??? Proud
तू पण आत्ताच काढून आणुन ठेव, न जाणो, तिथे एखादा टॉवर बिवर उभा राहिला म्हणजे मग घोळ होईल ना! Wink

मला काही ह्या आयडीया सुचल्या :

१. वडीलांच्या हस्ते एखाद्या गरजू मुलांसाठीच्या संस्थेत खाऊवाटप/ मदत

२. तुमचे सर्व सुहृदांचे, त्यांच्या जवळच्या लोकांचे वेगवेगळे फोटोज एकत्र असलेलं/ केलेलं कोलाज त्यांना भेटदाखल.

३. त्यांच्या आवडत्या मासिकाचे/ अंकाचे, अ‍ॅक्टिव्हिटीचे (जसे फिल्म क्लब, पुस्तक क्लब, सोशल ग्रुप, विज्ञान मंडळ , नेचर क्लब इ.) वार्षिक सभासदत्व त्यांना भेटीदाखल देणे.

४. बिफोर अ‍ॅन्ड आफ्टर : वीस/ तीस/ चाळीस वर्षांपूर्वीचे व आत्ताचे फोटो समोरासमोर लावून त्याची थीम वापरून शुभेच्छा पत्र, कोलाज इत्यादी....

आशूडी, माझी एक आयडिया घे.

माझे सासरे पोस्टात नोकरील असल्याने त्यानी बर्‍यापैकी भारत भ्रमंती केली आहे. लग्न झाल्यानंतर दुसर्‍या का तिसर्‍या दिवशी ते असंच मला "मी अमुक ठिकाणी गेलो होतो तेव्हाचा,..." असा काहीसा किस्सा सांगत होते. माझ्या सासूबाई मला म्हणाल्या "स्वत: गाव सगळा फिरून आले, मला कधी साधं अष्ट विनायकाच्या यात्रेला पण नेलं नाही.."

जवळ जवळ वर्षभरानंतर बाबा जेव्हा रीटायर झाले तेव्हा त्याना काहीतरी गिफ्ट देऊया असं सतिश म्हणाला.. विचार करताना सहज कल्पना सुचली आणि हा प्रसंग आठवला. मी आणि सतिशने त्याना एका ट्रॅव्हल कंपनीबरोबर अष्ट विनायकाची यात्रेची तिकिटे गिफ्ट म्हणून दिली. लग्नानंतर पस्तीस वर्षानी हे दोघं नवरा बायको पहिल्यान्दा कुठेतरी फिरायला म्हणून गेलेले. Happy त्यानी खूप एंजॉय केले. आता दरवर्षी त्याना अशाच कुठल्यातरी यात्रेची तिकिटे गिफ्ट म्हणून द्यायचा विचार आहे. (हे अर्थात त्याना दोघानाही देवधर्माची आवड आहे म्हणून!!)

साधारणपणे लग्न, मुलं त्याची शिक्षणे अशा चक्रामधे माणूस अडकला की त्याच्या छोट्या छोट्या हौशी अपुर्‍याच राहतात. मोठ्या मोठ्या भेटवस्तूपेक्षा अशीच एखादी छोटीशी हौस पुरी करता आली तर जास्त बरे वाटेल. तुझ्या बाबाशीच सहज बोलता बोलता तुझ्या लक्षात येइल की त्याची अशी हौस राहिली आहे का??

पुस्तक तुला आणि गाण्याचा प्रोग्राम हे दोन्ही कार्यक्रम छान आहेत. मला आवडले.

नन्दिनीची आयडीया झकास आहे Happy
मला काय माझ्या आईवडीलान्ची साठी, पन्चाहत्तरी, सहस्रचन्द्रदर्शन अस्ले साजरे करता आले नाही, पण एक इच्छा आहे, आई (वय वर्षे ७६) अजुन हिन्डती फिरती आहे तोवरच एकदा तिला घेऊन एखाद्या मॉल मधे न्यायचे आहे, अन चारपाच हजार रुपये देऊन, तिथे सर्व खर्च करायला लावायचे आहेत! ती पुढे, मी मागे हातगाडी घेऊन, काय घ्यायचे ते घे, अमकेच घे तमके नको अस्ल काही नाही! Happy
आयुष्यभर पै पै करत काटकसर केली, त्यान्ना काय पैसे खर्चावेसे वाटत नव्हते का? पण तेव्हा परिस्थितीमुळे त्यान्ना नाही जमले तर आत्ता आपण का जमवुन देऊ नये? अन यान्च्यावर सक्ती नाही केली, तर स्वतःहून स्वतःवर ते काडीचाही खर्च करणार नाहीत, अशी ही जुनी माणसे! Happy

माझी कल्पना थोडी अवघड आहे आणि तुमच्याकडे वेळ थोडा,पण तरीही- तुमच्या वडीलांच्या आयुष्यातील ६० सर्वात महत्वाच्या व्यक्तींना त्यांच्याबद्द्ल थोड्सं,काहीतरी लिहायची विनंती करा आणि त्याचं कलेक्शन भेट म्हणून द्या.
सर्वात महत्वाचे, तुमच्या बाबांना आम्हा सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन करायला विसरु नका Happy
मायबोलीवर केवळ वितंडवाद होतात म्हणणार्‍यांनी हा धागाही जरुर पहावा!

अगदी अगदी आगाऊ! Happy अरुंधती,नंदिनी तुमच्याही कल्पना छान आहेत. सध्याच्या त्यांच्या परिस्थितीनुसार करण्यासारख्या काही कल्पना माझ्याही डोक्यात आहेत.बघूया काय जमते ते.

त्यांच्या आवडीच्या गाण्यांची सीडी बनवून देणे.
आवडीच्या गायकाची महफिल ठेवणे.
फक्त निमंत्रितांसाठी एखादा नाट्यप्रयोग ठेवणे.
सर्व नातवंडांनी मिळून एखादा कार्यक्रम करणे.

मस्त मस्त आयडिया आहेत.
माझ्या सासुबाईंची पण या वर्षि साठी आहे.
अश्विनी म्हणाल्या प्रमाणे मि पण साठ वस्तु देण्याच म्हणते आहे, कार त्यांना कोणीतरी गिफ्ट दिलेल भयंकर आवडत. वाढदिवस सप्टेंबर मध्ये आहे. पण सुचवा ना कायकाय गिफ्ट घेता येइल.

रिमा,

केसांची मस्तशी क्लिप, नेहमी साडी नेसत असतील तर चक्क एक ड्रेस पीस, छोटी मनी पर्स, छोटी लिप्स्टीक, मॉर्निंग वॉकला जात असतील तर शूज, साडी पीन, प्रवासासाठी फॅन्सी मंगळसुत्र, ६ रुमालांचा सेट, युडी कोलन, हाताचा फॅन्सी पंखा, सुंदरसं लेटरपॅड, पेन, पेनस्टँड, नेलपेंट, पर्समधे मावेल असा छोटा टॉर्च, कीचेन, त्यांच्या तरुणपणीचा फोटो बसवून फॅन्सी फोटोफ्रेम, नेलकटर, शाल इ.

माझी कल्पना थोडी अवघड आहे आणि तुमच्याकडे वेळ थोडा,पण तरीही- तुमच्या वडीलांच्या आयुष्यातील ६० सर्वात महत्वाच्या व्यक्तींना त्यांच्याबद्द्ल थोड्सं,काहीतरी लिहायची विनंती करा आणि त्याचं कलेक्शन भेट म्हणून द्या.
>> छान छान थीम असलेले कागद विकत मिळतात.. आईच्या पन्नासाव्या वाढदिवसाला आम्ही तिच्या जवळच्या सगळ्या लोकांकडून (घरातली, घराबाहेरची) पत्रं लिहून घेतलेली - ती पत्रं आणि त्या थीम वाल्या कागदांचा वापर करून अल्बम तयार केला आणि तो आईला दिला..

फोटोंच्या कोलाज ची आयडिया चांगली आहे. तसेच फोटो स्कॅन करुन मस्त पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन तयार करायच आणि बिंतीवर प्रोजेक्ट करायच. फोटो पण बाबांचे लग्ना आधीचे, लग्नातले, नंतर मुलींबरोबर, नातवंडांबरोबर असे सगळे क्रमाने लावायचे. त्याबरोबर एखाद दोन ओळी लिहायच्या आणि एक १५-२० मिनीटांचा प्रोग्रॅम करायचा. सोबत जमल्यास बाबांचे आवडते गाणे/गाणी लावायची.

कुणी लहान नातवंड असतिल तर त्यांच्याकडुन आजोबांसाठी एखादी छान कविता पाठ करवुन घ्यायची आणि आजोबांना उठल्या उठल्या म्हणुन दाखवायची.

गेल्याच्या गेल्या वर्षी माझ्या सासर्‍यांची सत्तरी साजरी केली आम्ही अशीच त्यांना न सांगता. वर आल्यात तशाच कल्पना वापरलेल्या.
सकाळी होमहवन, शांत इ. त्यांच्या बहिणींचा आग्रह होता म्हणुन केली. ७० कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं. बर्‍याच लोकांनी ते ७० वस्तुंचे हार आणलेलेच. Happy
संध्याकाळी हॉलमधे कार्यक्रम. आंब्याचा सिझन अस्ल्याने आंब्यांची तुला केली होती. Happy त्यांच्या अगदी पुर्वीपासुनच्या फोटोंच कोलाज केलेलं. त्यांच्या मापाचे कपडे त्यांच्या नकळत शिवुन घेतलेले, त्यांचा आवडता मेनु ठरवलेला. त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने मनोगत पण लिहुन आणलेलं. खुप मजा आली.

त्याच वर्षी माझ्या बाबांची साठी साजरी केली. तेव्हाही त्यांना अगदी त्यांच्या लहानपणापासुनचे ते त्यांच्या नातवंडापर्यंतच्या फोटोंचा अल्बम बनवला होता. मी, बहिणीने नी माझ्या लेकीने त्या फोटोंच्या आजुबाजुला आपली कलाकुसर दाखवलेली. Happy आम्ही बहिणींनी मिळुन त्यांचा आवडता स्वैपाक केलेला आणि माझ्या तिन्ही आत्या नी आज्जी अचानक आलेल्या पाहुन त्यांना खुप आनंद झाला. (ही पण सरप्राईज पार्टी होती. )

हे त्या अल्बम मधल्या आई बाबांच्या लग्नातलं एक पान. Happy एक आमचं बहिणींचं पान.

100_0608.jpg100_0611.jpg

मस्त धागा!!
ज्ञानेश्वरी दासबोधाची आयडिया चांगली आहे पण तुमच्या वर्तुळातील आमंत्रितांकडे हे दोन ग्रंथ आधीच असण्याची शक्यता आहे का ते पडताळून घे.>>हो खरच. गाथा कशी वाटेल?
सकाळी ते लवकर उठत असतिल तर पुर्ण रुम दिव्यांनी उजळून टाकता येईल. उठल्या उठल्या छान सरप्राईज.

Pages