मुघल ए आझम

Submitted by Kiran.. on 6 June, 2010 - 02:55

मुघल ए आझम

08mughal2.jpg

नखशिखांत सौंदर्य !

कुणीतरी पुटपुटलं म्हणून राजकपूरनं मागं वळून पाह्यलं तर हिंदी सिनेमातला शरीफ हिरो शशीकपूर नकळत मधूबालाच्या सौंदर्याला दाद देत होता. कपूर घराण्याच्या कुठल्यातरी कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान टीव्हीवर प्यार किया तो डरना क्या हे गाणं चालू असताना घडलेला हा किस्सा...!

आजही रस्त्याच्या कडेला ब्लॅक अँड व्हाईट मधली मधूबाला रंगीतसंगीत ऐश्वर्या, प्रीती, करीना, कतरीना यांच्या जोडीने पोस्टरच्या रूपाने फूटपाथवर हटकून दिसते.. त्याकाळाची ही सौंदर्यवती.. अनारकलीच्या भूमिकेसाठी आणखी कोण योग्य होतं ?
madhubala.jpg

के आसिफसारखा दिग्दर्शक आणि सलीम अनारकलीच्या प्रेमकहाणीचा भव्य पट..

फक्त सर्वोत्तमाचाच ध्यास घेतलेल्या आणि कसलीही तडजोड मान्य नसलेल्या के आसिफकडे हा चित्रपट आला तेव्हांच एका अतिभव्य रूपेरी इतिहासाचा पाया घातला गेला होता..

*************

पंचेचाळीस वर्षांपूर्वी ' मुघल-ए-आझम ' चा प्रिमिअर मराठा मंदिरमध्ये झालेला. , ... आणि रंगीत स्वरूपात , दुसऱ्यांदा ' प्रिमिअर ' झालेला पहिला चित्रपट म्हणून मुघल ए आझम चं नाव इतिहासात कोरलं गेलं '

@ त्या काळचा सर्वात खर्चिक चित्रपट

@ या काळातला सर्वात खर्चिक संगणकीय संकलन असलेला चित्रपट

@ प्रत्येक सिनेमागॄहात सगळे खेळ सलग तीन वर्षं अखंड चालले... हा विक्रम आजवर मोडला गेलेला नाही...

@ 11 वर्षांच्या निमिर्तीकाळात आणि पुढच्या 44 वर्षांच्या ' प्रथमायुष्या ' त या सिनेमाशी जेवढ्या सुरस कथा , दंतकथा जोडल्या गेल्या , तेवढ्या खचितच दुसऱ्या कुठल्या सिनेमाशी जोडल्या गेल्या असतील...
( @ - ही माहीती लोकसत्तामधून साभार.. )
*************

त्या काळचा सुपरस्टार दिलीपकुमार सलीमच्या भूमिकेत असतांना अकबराच्या भूमिकेत पॄथ्वीराजकपूरला सन्मानाने आमंत्रित करतानाच दिलीपला तू या चित्रपटाचा नायक नाहीस हे के आसिफ सूचित करून गेला होता आणि अकबर बादशहाला एक शाही व्यक्तिमत्त्व बहाल करण्याचे काम पृथ्वीराज कपूर करून गेले..

कमावलेलं शरीर, गोरापान वर्ण, रूपेरी केस आणि खर्जातला धडकी भरवणारा आवाज यामुळे अकबर बादशहाचा वावर असताना पब्लिक टेन्शनमध्येच असायचं. विशेषतः सलीम अनारकली एकत्र असताना बहार बादशहाला चुगली करते आणि बादशहा रागारागाने एकेक दालनातून तावातावाने निघतो तेव्हाचा याचा संताप अंगावर येतो. त्या प्रसंगात आता काय होणार म्हणून गळ्यात आवंढा येतो इतका दरारा पॄथ्वीराज यांनी पडद्यावर निर्माण केलाय..

अनारकली उन्मत्त होऊन उर्मटासारखा प्रश्न विचारत असताना बादशहाच्या रागाचा पारा चढत जातो आणि शेवटी असह्य होऊन तो दाणकन आपली मूठ वज्रासारखी सिंहासनावर आपटतो तेव्हां महाराणी जोधाच्या डोळ्यातलं भय आपल्या काळजात उतरत जातं...

prithviraj.jpg
***********************

खरं तर दिलीपकुमारला आपण शाहजादा म्हणून कसे दिसू याबद्दल शंकाच होती. पण फाळणीनंतर बरेचसे कलाकार पाकिस्तानात गेल्याने दिलीपकुमार या चित्रपटात आला आणि नर्गीसने चित्रपट सोडला. चित्रपट सुरू झाला तेव्हां नर्गीसच्या स्वप्नाळू डोळ्यांची जादू देशातल्या रसिकांवर अशी काही होती कि मधूबालादेखील तोपर्यंत त्या डोळ्यांपुढे ताठ उभी राहू शकलेली नव्हती. पण राजकपूरसाठी काम करणार असल्याने दिलीपबरोबर ती काम करणे शक्य नव्हतेच आणि मग मधूबालाच्या नावावर हा चित्रपट लागला.

या चित्रपटाचा आवाका पाहून के आसिफ त्या काळाचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शापूरजी पालनजी यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी गेले होते. या धंद्यात उतरण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सुरूवातीला सांगितले पण आसिफ यांनी ही गोष्ट अशी काही रंगवून त्यांच्यासमोर "दाखवली" कि त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि ते अर्थसहाय्यास तयार झाले....

पुढच्या काळात शापूरजींना या चित्रपटापायी बराच मनःस्ताप सोसावा लागणार आहे आणि के आसिफ हा मनुष्य किती वेडा आहे हे त्यावेळी माहीत असलेली नियती मात्र शापूर्जीच्या कार्यालयाच्या आढ्यावर बसून खुदुखुदू हसत होती !

के आसिफला शीशमहाल उभारायचा होता. ३५ फूट उंच, रुंदीला ८० तब्बल ८० फूट आणि लांबी..............? फक्त १५० फूट !

चांगली दोन वर्षे लागली हा महाल उभारायला...! त्यासाठी बेल्जियमवरून आरसे मागवण्यात आले होते. शापूरजींनी त्या काळी पैसे किती मोजले असतील ? फक्त १५ लाख रूपये !!

कळतंय का १५ लाख म्हणजे किती ? सोनं चाळीस रूपये तोळा होतं म्हणे !! काढा आता हिशोब !!!
आणि तज्ञांशी चर्चा करून आशिफ म्हणाले या महालात फक्त एकच गाणं चित्रीत होणार आहे.
शापूरजींचं डोकं आउट व्हायला हे पुरेसं होतं आणि के आसिफ वि शापूरजी हे युद्ध भडकत गेलं...

शीशमहालच्या छतावर असलेल्या आरशांमुळे प्रकाश परिवर्तित व्ह्यायचा त्यामुळं कॅमेरामन चित्रीकरणास नकार देत. तर के आसिफला बादशाला तख्तपोशीकडे पाहतांना छताच्या प्रत्येक आरशात अनारकली दिसते असं दाखवायचं होतं. हे कठीण होतं. खरं तर अशक्यच शब्द योग्य होता पण आपल्यासमोर रिझल्ट आहे...

तर काय सांगत होतो....अशक्य असा निर्वाळा तंत्रज्ञांनी दिल्यावर सर्वांनी असे असेल तर हे गाणे कट करा इथपासून ते नाही दिसली मधूबाला आरशात तर कोणतं आभाळ कोसळणार आहे असे सल्ले के आसिफ ला दिले..

पण वेड्या आसिफला कलाकॄतीसाठी कोणतीही तडजोड मान्य नव्हती. त्याला त्याच्या मनःपटलावर ही कथा कशी दिसली होती तशीच ती सादर करायची होतॉ.

त्याने निर्वाणीचा इशारा दिला..
मला चित्रीकरण करता येणार नसेल तर या शीशमहालला मी माझ्या हाताने आग लावीन ..
आणि घाबरलेल्या शापूरजींनी शीशमहालचे सर्व भाग सुट्टे करून तो पॅक करून ठेवायला सांगितले..
इथून पुढे ते आसिफचे तोंडही पहायला तयार नव्हते...!
आसिफची गच्छंती जवळजवळ निश्चित होती

पण हार मानणा-यातला आसिफ नव्हता. हे प्रकरण सोहराब मोदींकडे गेलं. मोदी आणि पॄथ्वीराज कपूर हे दोघेही शापूरजींचे परिचित. ..

शापूरजींनी धंद्याचे गणित मांडले. आणि आसिफच्या त-हेवाईकपणचे सर्व किस्से सांगून अशा माणसाबरोबर मी कामकरू शकत नसल्याचे ठासून सांगितले. मोदींनी आसिफशी चर्चा केली. आसिफ काय चीज आहे हे त्यांना चांगलेच माहीत होते, पण कलंदरी वॄत्तीला असलेला शाप म्हणजे फटकळपणा...परखड म्हणा किंवा स्पष्टवक्तेपणा म्हणा...ज्याला सुनावले जाते तो मात्र फाटक्या तोंडाचा अशीच संभावना करीत असतो. कमाल अमरोहींसारखा मनुष्यही आसिफला सोडून गेला आणि वेगळ्या चित्रपटासाठी जुळवाजुळव करू लागला..चित्रपटाचे नाव अनारकली !

एस. मुखर्जीही प्रदीपकुमार आणि बीना रॉय या अप्रतिम लावण्यावतीला घेऊन याच नावाचा चित्रपट बनवायच्या तयारीला लागेलेले होते. आसिफ वर या कशाचाही परिणाम झालेला नव्हता.
कटू सत्य लोण्यात घोळवून सांगणं ही व्यापारी कला कलाकारांना अवगत नव्हती त्याकाळी...
मोदींनी यशस्वी मध्यस्थी केली. मोदींवर विश्वास ठेवून शापूरजींनी पुन्हा आसिफला एक संधी दिली...

द्यावीच लागली........... !

इंग्लंडहून आलेल्या सदस्यांनी इथे शूटींग होणार नाही असा निर्वाळा दिलेला. आसिफ ने विचार करायला सुरूवात केली.

रोज तो दिव्यांची मांडणी बदलत असे, कॅमेरा बदलत असे. पण व्हायचं काय कि आरशांच्या विशिष्ट रचनेमुळं कधी त्यात कॅमेरा तर कधी प्रकाशझोत येत...मोठी समस्या होऊन बसलेली. शिवाय मधूबाला तर प्रत्येक आरशात हवी होती...शापूरजींनी इशारा दिलेला...

शेवटी आसिफच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. त्याने जिथून त्रास होत नाही ते दिवे तसेच ठेवले व झुंबरांच्या आजूबाजूला आणि विशिष्ठ ठिकाणांवर मेणबत्त्यांचा वापर केला. आता सगळीकडूनच उजेड येत असल्याने ऑब्जेक्ट आरशात दिसू लागला आणि प्रकाशाचेही संतुलन झाले !!!

सगळ्या युनिटने नि:श्वास सोडला. हा कार्यभाग तर पार पडला आणि पुढच्या सगळे शूटींगच्या तयारीला लागले. आता विघ्न येऊ नये असंच सर्वांना वाटत होतं

आणि आसिफचे नवे खूळ सुरू झाले ...

सिनेमाला सुरूवात केल्याला आता सात वर्षे उलटून गेली होती. आणि आता रंगीत फिल्मसचा जमाना सुरू झाला होता. आसिफने रंगीत फिल्मसाठी पैसे मागितले. पुन्हा एकदा संघर्ष , पुन्हा मोदी !!

आता असे ठरले कि सरसकट रंगीत फिल्मवर शूट न करता काही भाग शूट करून तो इंग्लंडला लॅबमधे पाठवावा. तज्ञांचे मत विचारावे आणि मगच पुढचा निर्णय घ्यावा...

झालं

प्यार किया तो डरना क्या चे बोल शीशमहालात घुमले. मधूबालाचे पाय त्या बोलांवर थिरकू लागले. बादशहाला आरशात अनारकली दिसू लागली.....

हे गाणं रंगीत झालं. फिल्म टेस्ट करण्यासाठी इंग्लंडला गेली..प्रोसेसींग होऊन परत आली. तज्ञांनी अप्रतिम असा निर्वाळा दिला होता. आता पुढचा सिनेमा रंगीत होणार होता..आणि आसिफचं वेड पुन्हा उफाळून वर आलं......!

चित्रपटाचा रंगीत भाग पाहील्यावर आधी शूट केलेला भाग त्याला कमअस्सल वाटू लागला. आसिफ हे सर्वोत्तमाचे दुसरे नाव होतं.

आमीरला आपण पर्फेक्शनिस्ट म्हणतो..पण आसिफ या सच्च्या कलाकाराची तुलना कदाचित हॉलिवूडच्याच दिग्दर्शकांशीच करावी लागेल..

आता आसिफचे म्हणणे होते..चित्रपट पुन्हा पहिल्यापासून शूट करायचा..

संपूर्ण रंगीत !!

शापूरजी यांना ह्रूदयविकाराचा झटका येणेच बाकि होते...कारण आतापर्यंत या चित्रपटासाठी त्यांचे .......

दीड कोटी रूपये खर्ची पडले होते.. !!

एक हाडाचा कलाकार आणि एक हाडाचा व्यावसायिक यांच्यातलं हे युद्ध होतं. आसिफ हा हाडाचा कलाकार होता, त्यामुळंच तो मनासारखी कलाकॄती व्हावी यासाठी हट्ट धरत होता. आजचे सिनेमे पाहीले तर आसिफच्या या वेडाची महती काही औरच आहे.

पण शापूरजींच्या पदरातही त्यांच्या श्रेयाचे माप घालायला हवे. एका अट्टल व्यावसायिकाने एका खुळ्या कलाकाराला इतकी भरघोस मदत करावी हे त्यांच्या कलासक्त मनाचेच निदर्शन आहे.

११ वर्षानंतर सिनेमा पुन्हा पहिल्यापासून शूट करणे हे खरंच व्यावहारिक नव्हते. वितरकांचा दबाव वाढल्यावर असं ठरलं कि सिनेमा आहे तसा प्रदर्शित करावा. आसिफ रूसून बसलेला होता. सिनेमा बनेपर्यंतच त्याचा अधिकार होता. त्याने ती कलाकृती बनवली होती. आता शापूरजी आपले अधिकार वापरत होते. पैसा त्यांचा होता..

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिले तीन दिवस थेटर्स खाली होते. सगळे धास्तावलेले होते. पण आसिफ तरीही सांगत होता, या सिनेमाला ब्लॅक होईल..

आणि माऊथ पब्लिसिटीचा परिणाम होऊन सिनेमाकडे पब्लिक असं वळलं कि पुढचा इतिहास त्यांच्या या पावलांनीच लिहीला गेला !!!

प्रीमिअर चालू असतांना मात्र शापूरजींच्या मनातून आसिफबद्दलचा राग निवळत चालला होता. तो काय म्हणत होता हे त्यांना आता पडद्यावर कळत होते. आणि रंगीत भाग सुरू झाला मात्र..
त्यांना आतापर्यंतचा कृष्णधवल सिनेमा एकदम डावा वाटू लागला. ऐकलं असतं आसिफचं तर असं वाटून गेलं..
आणि मग त्यांनी आसिफचा हात प्रेमभरानं दाबत त्याला वचन दिला.

एक दिवस हा सिनेमा संपूर्ण रंगीत बनेल. मी हा सिनेमा तुझ्यासाठी कलरफुल करेन..!!
दोन वर्षांपूर्वी त्यांच्याच कंपनीने हा सिनेमा रंगीत अवतारात दाखल केला आणि एका अवलिया कलाकाराला एका उद्योगपतीने दिलेल्या वचनाची पूर्तता झाली ..!!

सगळंच अतर्क्य !!!

Kiran™

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. हिंदी सिनेमासृष्टीमधे ज्या सिनेमाना दंतकथेइतक्न वलय लाभलय त्यापैकी एक मुघल ए आझम.

खरंतर हा सिनेमा सलिम अनारकलीचा नाहीच, हा सिनेमा आहे भारताच्या बादशहाचा. त्याच्या न्याय्य प्रवृत्तीचा आणि त्याच्या कलासक्ततेचा, कठोरतेचा. त्यामुळे तोच या चित्रपटाचा नायक आहे. आजापर्यंत केव्हा कधीही "अकबर बादशहा" म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो पृथ्विराज कपूरच. गोवारीकरच्या जोधाअकबरमधे देखील हृथिकने कित्येक वेळा पृथ्विराजची नक्कल केलेली आहे.

ज्या वेळेला अख्खा भारत फाळणीच्या रूपाने तडफडत होता त्यावेळेला मुमताझ बेगम आणि युसुफ खान नावचे दोन कलाकार मधुबाला आणि दिलीप कुमार या नावाने भारतीय जनतेला रिझवत होते. याच सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघाच्या प्रेमाची कहाणी इतक्या वाईट वळणावर पोचली होती, नया दौर चा निर्माता बी आर चोप्राने तिच्याविरूद्ध कोर्टात केस दाखल केली होती आणि दिलीप कुमारने तिच्याविरूद्ध साक्ष दिली. असं म्हणतात की "बेकस पे करम किजिये" गाण्याच्या चित्रीकरणासाठी मधुबाला खरेखुरे साखळदंड घालायची आयडीया दिलीप कुमारनेच के आसिफला दिली होती.

आणि, मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे.. या गाण्यादरम्यान वापरलेली कृष्णाची मूर्ती खर्‍या सोन्याची होती.
या चित्रपटामधले सर्वच सीन्स भव्य आहेत, वाद नाही. पण तरीही चित्रीकरणाचा उत्तम नमुना म्हणजे यातली गाणी व युद्ध सीन्स. आणि मुकुटमणी सीन म्हणजे दिलीप मधुबालाचा रोमान्स सीन (पार्श्वभूमीवर वाजणारं प्रेम जोगन बन के)... अप्रतिम.. स्वर्गीय. आणि शब्दातीत.

किती लिहावं तितकं थोडं या सिनेमाबद्दल!!

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

एस. मुखर्जीही प्रदीपकुमार आणि बीना रॉय या अप्रतिम लावण्यावतीला घेऊन याच नावाचा चित्रपट बनवायच्या >>>>> हे वाक्य विनोदी आहे ना??? बीना रॉय आणि लावण्यवती????????? Proud

छान लेख. Happy

फिल्म्स डिविजननं 'मेकिंग ऑफ मुगले आझम' असा लघुपट तयार केला होता. कुठे बघायला मिळाला तर अवश्य पाहा. अफलातून आहे.

मस्त लिहिलय.

मी तर हा सिनेमा अक्षरशः कितीहीवेळा बघीन इतका आवडतो मला तो. मधुबाला तर अप्रतिम आहेच पण मला यातल्या दुर्गा खोटे, पृथ्वीराज कपूर यांचा काहीसा थिएट्रिकल अभिनयही खूप आवडतो. 'औलाद चाहीये हा सुहाग' चा अख्खा सीन किंवा सलीम आणि अकबर बादशहामधल्या संवादांची जुगलबंदी, यातल्या सगळ्याच गाण्यांचं टेकिंग अफलातून. अनारकली महालातून उतरुन बागेत सलिमला भेटायला जाते तेव्हा महालातले दिवे उजळायला लागलेले असतात आणि बादशहाच्या दरबारातून तानसेनने छेडलेल्या रागिण्यांचा स्वर (बडे गुलाम अली खां साहेबांचा प्रत्यक्षात) पार्श्वभूमीवर पाझरत असतो त्यानंतर जवळजवळ तीस मिनिटांचा एक दीर्घ, सलग सिक्वेन्स ज्यात दिलिपकुमार आणि मधुबालाचा तो सुप्रसिद्ध रोमॅन्टिक चेहर्‍यावरुन पिस फिरवण्याचा आणि मधुबालाच्या अंगावर चाफ्याच्या (बहुतेक) फुलांची पखरण झालेली आहे तो इतका लांबलचक सीन पडद्यावर एकही संवाद न घालता साकारण्याचे धाडस दाखवणे म्हणजे गंमत नव्हती. आसिफने जबरदस्त जुगार खेळला होता मोगलेआझम दिग्दर्शित करताना. मोगलेआझमच्या प्रिमियरला मेट्रो सिनेमामधे शृंगारलेल्या हत्तीच्या अंबारीमधून फिल्मची रिळे आणण्याचा अचाट भव्य प्रकारही मोगलेआझमचा निर्माताच करु जाणे. मला रंगित केलेला मोगलेआझमही आवडला. इरॉसच्या मोठ्या पडद्यावर हा सिनेमा पुनर्प्रकाषित झाल्यावर बघणे हा माझ्यासाठी थरारक अनुभव ठरला. आणि तरीही मोगलेआझमच्या अनेक ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट दृष्यांमधलं उदा. आफताब की रौशनी वाला मधुबालाचा मेणबत्तीच्या उजेडात उजळून निघालेला चेहरा असणारे दृष्य किंवा अनारकली जेव्हां अकबर बादशाहला एका रात्रीसाठी आपल्याला मलिका ए हिंदुस्तान बनवून सलिमची इच्छा पूर्ण केल्याबद्दल स्वतःचा खून माफ करुन टाकते त्या दृष्यात तिला पकडून नेताना आधी सलिम काचेचा खांबाला पकडत खाली कोसळतो आणि पडद्यांच्या मागून अनारकलीला पकडायला काळ्या सावल्या पुढे सरकतात अशा काही दृष्यांमधल मॅजिक रंगित पडद्यावर खूप उणावलं असं मला वाटलं.

भव्यता आणि नजाकत यामधला तोल आसिफने फार सुंदर साधला या सिनेमामधे.

नया दौरच्या दरम्यान दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्यातले संबंध विकोपाला गेले ते मधुबालाच्या पित्यामुळे , आणि या चित्रपटाशी संबंधित खटल्यात 'हो मी मधुबालावर प्रेम करतो' असे दिलीपकुमारने भर न्यायालयात सांगितले होते..असे वाचल्याचे स्मरते . (ते खरे असेलच असे म्हणता येईल का?).
प्यार किया तो डरना क्या यात अकबर बादशहाला बंदोंसे क्या डरना असे आव्हान देणार्‍या शब्दांचे तेज लता मंगेशकर या स्वरात आणि मधुबालाच्या चेहर्‍यावर अआणि डोळ्यात तळपते.
विविधभारतीवर 'खुदा निगेह्बान है तुम्हारा धडकते दिल का पयाम ले लो' हे शेवटचे गाणे वाजते तेव्हा चित्रपटात न ऐकू येणारा एक अंतरा ऐकायला मिळतो. त्यातली दुसरी ओळच आठवतेय -जरा मोहब्बतोंसे काम ले लो'

मीनाकुमारीला घेऊन काढलेला अनारकलीवरचा चित्रपट डब्यातच राहिल्याचे वाचले होते.

मस्त लिहिलंय किरण. खराच भव्य दिव्य सिनेमा हा. एक से एक क्लासिक डायलॉग्ज, सीन्स, गाणी !!
तो पीस वाला सीन तर आतापर्यन्त च्या सगळ्यात बेस्ट रोमॅन्टिक सीन्स मधे आहे माझ्या मते !!

एका मास्टर पीसवरचा दुसरा मास्टर पीस Happy मस्त लिहिलय.
या चित्रपटावर मी फक्त एकच एक लिहू शकते...
मुघल ए आझम
मुघल ए आझम
मुघल ए आझम
मुघल ए आझम
..................... Happy

लेख अतिशय सुंदर..

मी चित्रपट दुरदर्शनवर पाहिलेला आणि आता रंगीत होऊन आल्यावर परत पाहिला.. चित्रपटाबद्दल बोलायलाच नको. अ प्र ति म...

चित्रपट पाहताना मला एकाच गोष्टीचे वाईट वाटत होते. त्यातले संवाद उर्दूत आहेत आणि इतके फर्डे उर्दू मला कळत नसल्याने पडद्यावर कलाकार काय बोलताहेत याचा अंदाज यायचा पण अगदी शब्दनशब्द कळला असे मात्र झाले नाही... Sad आणि हे प्रत्येक शब्द मुळातुन कळत नाहीय, फक्त अंदाज करता येतोय याचा मला प्रचंड ताप झाला.... एवढे जोरदार जोशपुर्ण संवाद झडताहेत आणि आपल्याला मात्र त्याचा आस्वाद घेता येत नाही यापेक्षा जास्त वाईट काय असणार??? मी नवीन रंगीत चित्रपट पाहायला गेले होते तेव्हा थेटरात १०-१२ फिरंगी मंडळीही माझ्या पुढच्या रांगेत बसुन चित्रपट पाहात होती, त्यांना संवाद जेवढे कळले असतील, त्यापेक्षा फक्त थोडेच जास्त मला कळले असणार.. Sad

मस्त लेख Happy
काय जबरदस्त संवाद आहेत यात!
बडे गुलाम अली खांसाहेबांना 'प्रेम जोगन' गाण्यासाठी त्याकाळात एक लाख रुपये दिल्याचा किस्साही प्रचलित आहे.
दोन वर्षांपूर्वी त्यांच्याच कंपनीने हा सिनेमा रंगीत अवतारात दाखल केला>>> हे माहिती नव्हतं रे,सहीच.
ज्या सिनेमांची, त्यातल्या प्रसंगांची पॅरोडी सगळ्यात जास्त वेळा करण्यात येते त्यातला हा एक, त्याच्या ग्रेटनेसचाच एक पुरावा!

किरण, एका अप्रतिम महाकाव्यावरच्या तुझ्या चारोळी तितक्याच सुंदर आहेत. खूप आवडला लेख!

रंगीत 'मुघल-ए-आझम' सरस असला तरीही कृष्ण-धवल चित्रपटही तेवढ्याच ताकदीचा - आणि काही ठिकाणी रंगीत प्रींटपेक्षाही जास्त ताकदीचा - आहे. कारागीर जेंव्हा पुतळा म्हणून अनारकलीला पेश करतो तेंव्हाचा तो 'संगमरवरी सौंदर्य' हा फील कृष्ण-धवल म्ध्ये खूपच छान येतो. दुसरा प्रसंग 'घडीभर तो तेरे नजदीक आकर' या कव्वालीचा. बहार राजनर्तकीच्या वेशात नखशीखांत मढलेली आहे तर अनारकली एकदम साध्या कपड्यात आणि काळ्या दुपट्ट्यात. आणि ह्या तफावतीच्या जोरावर अनारकलीचे अस्मानी सौदर्य सलीमच्या हृदयावर कोरले जाते. रंगीत प्रींटमध्ये अनारकलीच्या कपड्यांचा तो लालसर रंग आणि त्यावरचे ते हलकेसे जरीकाम बहार आणि अनारकलीच्या वेशातली तफावतच कमी करते.

बीना रॉय आणि लावण्यवती? >> हो ती पण मधुबालाच्या तोडीचीच लावण्यवती होती - फरक इतकाच होता की ती निर्जीव होती तर मधुबाला सजीव!

मुघल-ए-आझम मास्टरपीस असला तरी एका बाबतीत अनारकली उजवा ठरतो तो म्हणजे संगीताच्या. अण्णा चितळकरांच्या 'ये जींदगी उसीकी है' आणि 'मुहोब्बत ऐसी धडकन है' ची उंची मुघल-ए-आझम मध्ये नौशादमियॉ गाठू शकले नाहीत. दोन्हीकडे लताच आहे पण परीणाम खूपच वेगळा. बहार आणि अनारकलीमध्ये जो फरक तोच या दोन चित्रपटांच्या संगीतामध्ये! अर्थात मी त्या गाण्यांच्या नीव्वळ संगीताबद्दल बोलतोय त्यांच्या चित्रीकरणाबद्दल नव्हे.

तो जो शिल्पकार असतो त्याच्यातले आणि बादशहामधले संबंध म्हणजे दिग्दर्शक आणि निर्माता यांच्यातील संबंधांवरच केलेलं भाष्य आहे असं वाटतं . बादशहाने त्याला एक बेजोड शिल्प बनवून मागणे आणि ते ही ठराविक वेळेत...

ये जिंदगी उसी की है...यावर आकाशवाणी दूरदर्शनचे निवेदक श्रीराम केळकर यांनी सांगितलेली माहिती.....बहुधा सी रामचंद्रांच्या आत्मचरित्रातून.
सी रामचंद्रंचे वडील मुर्तिमंत भीती हे गाणे गुण्गुणायचे, ते मूळ चालीबरहुकूम नाही...
त्यांचे गुणगुणणे ऐकून सी.रांआ ही चाल सुचली.

मित्रांनो,

लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल मनापासून आभार.. मुघल ए आझम पाहील्यानंतर मिळेल तिथून मिळेल ती माहीती जमा केली होती. काही किस्से ऐकलेले, वाचलेले.. लेख लिहीताना एकाच बैठकीत लिहून काढला. तरीही काही किस्से राहून गेले.

मधूबालाच्या अंगावर प्लॅस्टर ऑफ पॅरीस ओतून तिला पुतळा म्हणून उभं केलं गेलं ..आणि त्यानंतर तिला विचित्र अशा रोगानं पछाडलं. त्यातच तिला टीबी झालेला असं म्हणतात. अशा वेळी ज्याच्यावर खूप प्रेम केलं त्या युसूफखानने तिच्याकडे पाठ फिरवली आणि दोघांच्या मधे मध्यस्थी करणा-या किशोरकुमारने तिचे शेवटचे दिवस चांगले जावेत म्हणून तिच्याशी लग्न केलं. ही निखळ मैत्री होती..

नंदिनी
खरंतर बीना राय ही सौंदर्याच्या बाबतीत मधूबाला पेक्षा कितीतरी उजवी होती. मधूबाला फोटोजेनिक होती. प्रत्यक्षात तिचा चेहरा खूप रूंद आणि पसरट होता.
बॉलिवूडमधे ज्या नायिकांनी आपला जमाना गाजवलाय त्या सुंदर होत्याच, निर्विवाद पण त्यांच्यापेक्षा देखण्या बाहुल्या प्रत्येक काळी बॉलिवूडमधे होत्या..
यांनी बाजी मारली ती अभिनयाच्या जोरावर.. नाहीतर नकटी मुमताज आणि तनुजा चाललीच नसती. श्रीदेवी तर केवळ मुद्राभिनयाच्या जोरावर हॄदयावर राज्य करून गेली. जयाप्रदा ही ख-या अर्थाने सुंदर होती, पण ती मागं पडली. देहप्रदर्शन करून काहीजणी खळबळ माजवून गेल्या पण राज्य नाही करू शकल्या. झीनत अमान, मंदाकिनी यांची नावं आज आठवावी लागतात..

बीना राय देखील विम्मीप्रमाणंच अभिनयाच्या नावानं बोंबाबोंब असल्यानं मागं पडली.

आरती, किरण, योग, माधव.... सुखावणा-या प्रतिक्रिया !!!!

नंदीनी, चिनूक्स, शर्मिला, भरत, साधना आणि ...सर्वांनी छान भर घातलीय.

संध्या
तुझी प्रतिक्रिया वाचल्यानंतर मला जाणवलं ते असं...
मला असं वाटलं कि माझ्याही मनात हा विचार येऊन गेलाय, कि कुठंतरी वाचलंय त्याबद्दल ? कि आता तुझी प्रतिक्रिया वाचून मला तसं वाटायला लागलंय ? पण असं वाटतं हे खरं ..

विशेषतः कलाकारांना खरेदी करता येतं हा बादशहाचा माज उतरवतांना तर ते के आसिफचेच तर मनोगत नाही ना असा संशय यायला जागा आहे

किशोरकुमारने तिचे शेवटचे दिवस चांगले जावेत म्हणून तिच्याशी लग्न केलं. ही निखळ मैत्री होती..
>>>> किशोरकुमारने मधुबालाचे आजारपण माहित असूनही तिच्याशी लग्न केले खरे पण ते निभावून नेणे त्याला नंतर नंतर झेपले नाही. मधुबालाच्या धाकट्या बहिणीने तिच्या शेवटच्या दिवसांचे फार हृदयद्रावक वर्णन फिल्मफेअरच्या एका अंकात केले होते. किशोरकुमार त्याच्या करिअरमधे बिझी होता आणि मधुबालाकडे बघायला कोणी नाही म्हणून त्याने शेवटी तिची रवानगी बहिणींच्या घरी केली. फार एकाकी आणि नैराश्यमय असे तिचे ते दिवस होते. वॉटर रिटेन्शनमुळे मधुबालाच्या अंगावर सूज आली होती आणि तिला चालणे मुश्किल झाले होते. परदेशात तिला एकदा घेऊन गेल्यावर झालेल्या खर्चामुळे आणि मधुबालाने कमावलेले सारे पैसे तिच्या वडिलांनी आणि बहिणीनी लुबाडले आता आपल्यावर जबाबदारी म्हणून किशोरकुमार सदैव चिडचिड करायचा, पुढील उपचारांसाठी त्याने पैसे पाठवायचेच बंद केले. त्याच्या फोनची वाट बघत आपा सतत खिडकीत विचार करत बसून रहायची पण त्याचा फोन तब्येतीची चौकशी करायलाही यायचा नाही असे तिच्या बहिणीने लिहिले होते. हे वाचले तेव्हा खूप वाईट वाटले. किशोरकुमार-मधुबाला यांच्याबद्दल एक मिथ मनात होती तिला तडा गेल्यासारखं झालं.
मधुबालाचे सारे जीवनच शापित ठरले. खरं तर किती अल्पायुषी ती आणि तरीही त्यात सुख अभावानेच यावे हे दुर्दैव. असो. अर्थातच हे सर्व तिच्या बहिणीचं वर्शन झालं. दुसरी बाजूही असू शकते. कलाकारांच्या आयुष्यात मुखवट्याच्या आड नक्की काय घडत असतं हे कधीच कुणाला कळू शकत नाही हेच खरं.

२३ फेबुवारी १९६९ - मधुबालाने या दिवशी जगाचा निरोप घेतला, म्हणजेच आज ४० वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे, आणि तरीही ही एकमेव अशी अभिनेत्री आही की जिच्याबद्दल आजची पिढी तितक्यात उत्कटतेने, भावनाकुल होऊन बोलते/वाचते आणि वर आलेल्या प्रतिक्रियाप्रमाणे लिहितेदेखील. इतके प्रेम हिंदीच काय पण भारतातील कुठल्याही भाषेतील चित्रपट अभिनेत्रीला मिळालेले नाही... अगदी नर्गीस, मीना कुमारीलासुध्दा नाही. मराठी म्हणून नावाजलेल्या नूतन, स्मिता पाटील यांनाही मृत्युनंतर असे भरभरून प्रेम मिळालेले नाही.

याला काय कारण असेल तर मधुबाला ही जिवंतपणीच "लिजंड" बनून गेली होती. इथे लेखक श्री.किरण आणि त्यांना उत्तम, अभ्यासपूर्ण प्रतिसाद देणार्‍यानी तिची कारकिर्द आणि प्रापंचिक आयुष्याबद्दल सविस्तर लिहिले आहेच, त्यामुळेच तिच्याबद्दल सिनेरसिकांच्या मनात एक हळवा कोपरा तयार झाला आहे, तो कायमचाच.

"मुघल-ए-आझम" हा तर आपल्या चित्रपट इतिहासातील खर्‍या अर्थाने "माईल स्टोन". के. असिफ बद्दल सुरेख लिहिले गेले आहे इथे. त्यात एकच जादाची भर घालतो, ती म्हणजे संपूर्ण आयुष्यात के. असिफ यांनी फक्त तीन चित्रपटांची निर्मिती केली आहे ~ "फूल", "हलचल" आणि "मुघल-ए-आझम" (त्यानंतर त्यांनी लव्ह अँड गॉड सुरू केला होता, पण त्याआधीच त्यांचे देहावसान झाले.), म्हणजे के.असिफ हे नाव इथे अमर झाले ते केवळ एकमेव चित्रपटामुळे आणि तो म्हणजे या लेखाचा विषय = मुघल-ए-आझम !

या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक किस्सा फिल्म फेअरच्या श्री.राजु भारतन यांनी लिहिला आहे. एका मोठ्या नियतकालिक साखळीचे प्रतिनिधी असल्याने त्यांना सेटवर मुक्त वावर देण्यात आला होता. या चित्रपटात एक कृष्णजन्माचे गाणे आहे "मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे !" या एकमेव गाण्यात मधुबाला ही "हिन्दु स्त्री" च्या मेकअपमध्ये आहे. कपाळावर भरभक्कम असा कुंकुवाचा टिळा आणि नखशिखांत हिंदु पध्द्तीचे दागीने अंग भरून. गाण्याचे शूटिंग सुरू झाल्याची सुचना येताच ज्या दबदब्यात मधुबाला सेटवर आली ते पाहुन तिथे हजर असणारे तिच्या त्या वेशभुषेतील दैवी सौंदर्याने बेहोष झाले.

अशा बेहोष होणार्‍या अनेकात होता पाकिस्तानहुन आलेला के. असिफच्या नातेवाईकांपैकी एक तरुण, ज्याला खास पाहुणा म्हणून कॅमेर्‍याच्या शेजारील खुर्ची देण्यात आली होती == या पाहुण्याचे नाव होते "झुल्फिकार अली भुट्टो". इंग्लडला जाण्यापूर्वी के. असिफ यांच्या घरी तीनचार दिवस राहण्यासाठी आलेले भुट्टो हे मधुबालेच्या सौंदर्याने इतके पागल झाले ("पागल" हा शब्द माझा नसून राजु भारतन यांचा आहे) की, केवळ त्याच दिवशी नाही तर उरलेले तिन्ही दिवस त्यांनी त्या सेटवरच मुक्काम ठोकला.

अशी ही मधुबाला आणि असा हा मुघल-ए-आझम.

छान लेख. हा चित्रपट अनेकवेळा बघितलाय.
याच्या संगीताबद्दल पण लिहायला हवे होते. नौशाद ने अनेक राग वापरले आहेत. मोहे पनघटपे (गारा), ये दिल कि लगी कम क्या होगी (जयजयवंती) मुहोब्बत कि झुटी (दरबारी) प्रेम जोगन बन जा (सोहनी) इतकेच नव्हे तर सुरवातीचे गद्य निवेदन देखील राग दरबारी मधे आहे.
आपल्या दुर्गा खोटेंची भुमिका पण उत्तम वठली होती.

"....मोहे पनघटपे (गारा),...."

राग "गारा" : प्रथमच लेखी स्वरूपात कुणीतरी याचा उल्लेख केलेला वाचले आणि आनंद झाला. इतका दुर्मिळ राग आहे हा. खूप छान छान गाणी गुंफली गेली आहेत या अविट रागामध्ये.

या विषयावर स्वतंत्रपणे लिहिण्याची गरज आहे.

वावा ..क्या बात है.. मुघले आजम ,रंगीत झाल्यावर जेंव्हा प्रदर्शित होणार होता तेंव्हा सिनेमाचा फर्स्ट डे चा फर्स्ट शो पाहायला आम्ही मुंबईला धाव घेतली होती.. आणी तिकिटं मिळवलीही होती Happy अशी आहे या सिनेमाची जादू..अजून पर्यन्त टिकून असलेली..

मधुबालावरचे पुस्तक आहे, त्यातही तिच्या शेवटच्या दिवसांचे वर्णन असेच काहीसे आहे. किशोरकुमार भयंकर लहरी होता. कधी यायचा, तासनतास बसायचा. तो येणार, आला की मधुबाला आजारपण विसरून त्याच्याशी बोलायला बघायची, तो तिला हसवेल याची अपेक्षा करायची. पण आजारपणामुळे तिची गेलेली रया पाहून किशोरकुमारचा मूडच जायचा आणि तो तिच्याशी अजिबातच नीट वागत नसे Sad कधी हे टोक, तर कधी तिच्यापाशी पश्चाताप झालाय असे म्हणे, ढसढसून रडे आणि नीट वागे, त्यामुळे मधुबालाच्या मनस्तापात भरच पडली. एकटेपणाने पुरती वेढली गेली ती. भरभरून प्रेम, 'टूटके' प्रेम ज्याला म्हणतात, एवढं द्यावं-मिळावं अशी एकच अपेक्षा होती तिची, पण ती काही पूर्ण झाली नाही.

त्याच पुस्तकात वर केलेलं सर्व वर्णन आहे 'मुघले आझम'च्या तयारीचं, शीशमहालाचं, पैशाचं, के असिफच्या वेडाचं वगैरे.

दिलीप कुमार मुळ चित्रपटाच्या प्रिमीयरला खटल्याच्या वादामुळे गेला नव्हता. हल्ली चित्रपट रंगीत केल्यावर जो प्रिमीयर झाल्या त्याला मात्र तो आवर्जुन गेला. तो पर्यंत त्याने हा सिनेमा पाहिला नव्हता. प्रिमीयर संपल्यावर त्याची एक प्रतिकीया: पडद्यावर दिसते त्यापेक्षा प्रत्यक्षात मधुबाला दसपट सुंदर दिसायची. ...... दिलीप कुमारची कुठेतरी वाचलेली मुलाखत.

प्रतिक देसाई, नक्की लिहा वाचायला आवडेल.

मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे>>> या गाण्यात मधुबाला अप्रतिम सुंदर दिसते. गाणं पण तितकंच सुंदर आहे.

त्यातले संवाद उर्दूत आहेत आणि इतके फर्डे उर्दू मला कळत नसल्याने पडद्यावर कलाकार काय बोलताहेत याचा अंदाज यायचा पण अगदी शब्दनशब्द कळला असे मात्र झाले नाही..>>> साधना, नविन मुघले आझमची डीव्हीडी नक्की विकत घे. त्यात इंग्लिश सब्टायटल्स आहेत.

Pages