मुघल ए आझम

Submitted by Kiran.. on 6 June, 2010 - 02:55

मुघल ए आझम

08mughal2.jpg

नखशिखांत सौंदर्य !

कुणीतरी पुटपुटलं म्हणून राजकपूरनं मागं वळून पाह्यलं तर हिंदी सिनेमातला शरीफ हिरो शशीकपूर नकळत मधूबालाच्या सौंदर्याला दाद देत होता. कपूर घराण्याच्या कुठल्यातरी कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान टीव्हीवर प्यार किया तो डरना क्या हे गाणं चालू असताना घडलेला हा किस्सा...!

आजही रस्त्याच्या कडेला ब्लॅक अँड व्हाईट मधली मधूबाला रंगीतसंगीत ऐश्वर्या, प्रीती, करीना, कतरीना यांच्या जोडीने पोस्टरच्या रूपाने फूटपाथवर हटकून दिसते.. त्याकाळाची ही सौंदर्यवती.. अनारकलीच्या भूमिकेसाठी आणखी कोण योग्य होतं ?
madhubala.jpg

के आसिफसारखा दिग्दर्शक आणि सलीम अनारकलीच्या प्रेमकहाणीचा भव्य पट..

फक्त सर्वोत्तमाचाच ध्यास घेतलेल्या आणि कसलीही तडजोड मान्य नसलेल्या के आसिफकडे हा चित्रपट आला तेव्हांच एका अतिभव्य रूपेरी इतिहासाचा पाया घातला गेला होता..

*************

पंचेचाळीस वर्षांपूर्वी ' मुघल-ए-आझम ' चा प्रिमिअर मराठा मंदिरमध्ये झालेला. , ... आणि रंगीत स्वरूपात , दुसऱ्यांदा ' प्रिमिअर ' झालेला पहिला चित्रपट म्हणून मुघल ए आझम चं नाव इतिहासात कोरलं गेलं '

@ त्या काळचा सर्वात खर्चिक चित्रपट

@ या काळातला सर्वात खर्चिक संगणकीय संकलन असलेला चित्रपट

@ प्रत्येक सिनेमागॄहात सगळे खेळ सलग तीन वर्षं अखंड चालले... हा विक्रम आजवर मोडला गेलेला नाही...

@ 11 वर्षांच्या निमिर्तीकाळात आणि पुढच्या 44 वर्षांच्या ' प्रथमायुष्या ' त या सिनेमाशी जेवढ्या सुरस कथा , दंतकथा जोडल्या गेल्या , तेवढ्या खचितच दुसऱ्या कुठल्या सिनेमाशी जोडल्या गेल्या असतील...
( @ - ही माहीती लोकसत्तामधून साभार.. )
*************

त्या काळचा सुपरस्टार दिलीपकुमार सलीमच्या भूमिकेत असतांना अकबराच्या भूमिकेत पॄथ्वीराजकपूरला सन्मानाने आमंत्रित करतानाच दिलीपला तू या चित्रपटाचा नायक नाहीस हे के आसिफ सूचित करून गेला होता आणि अकबर बादशहाला एक शाही व्यक्तिमत्त्व बहाल करण्याचे काम पृथ्वीराज कपूर करून गेले..

कमावलेलं शरीर, गोरापान वर्ण, रूपेरी केस आणि खर्जातला धडकी भरवणारा आवाज यामुळे अकबर बादशहाचा वावर असताना पब्लिक टेन्शनमध्येच असायचं. विशेषतः सलीम अनारकली एकत्र असताना बहार बादशहाला चुगली करते आणि बादशहा रागारागाने एकेक दालनातून तावातावाने निघतो तेव्हाचा याचा संताप अंगावर येतो. त्या प्रसंगात आता काय होणार म्हणून गळ्यात आवंढा येतो इतका दरारा पॄथ्वीराज यांनी पडद्यावर निर्माण केलाय..

अनारकली उन्मत्त होऊन उर्मटासारखा प्रश्न विचारत असताना बादशहाच्या रागाचा पारा चढत जातो आणि शेवटी असह्य होऊन तो दाणकन आपली मूठ वज्रासारखी सिंहासनावर आपटतो तेव्हां महाराणी जोधाच्या डोळ्यातलं भय आपल्या काळजात उतरत जातं...

prithviraj.jpg
***********************

खरं तर दिलीपकुमारला आपण शाहजादा म्हणून कसे दिसू याबद्दल शंकाच होती. पण फाळणीनंतर बरेचसे कलाकार पाकिस्तानात गेल्याने दिलीपकुमार या चित्रपटात आला आणि नर्गीसने चित्रपट सोडला. चित्रपट सुरू झाला तेव्हां नर्गीसच्या स्वप्नाळू डोळ्यांची जादू देशातल्या रसिकांवर अशी काही होती कि मधूबालादेखील तोपर्यंत त्या डोळ्यांपुढे ताठ उभी राहू शकलेली नव्हती. पण राजकपूरसाठी काम करणार असल्याने दिलीपबरोबर ती काम करणे शक्य नव्हतेच आणि मग मधूबालाच्या नावावर हा चित्रपट लागला.

या चित्रपटाचा आवाका पाहून के आसिफ त्या काळाचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शापूरजी पालनजी यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी गेले होते. या धंद्यात उतरण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सुरूवातीला सांगितले पण आसिफ यांनी ही गोष्ट अशी काही रंगवून त्यांच्यासमोर "दाखवली" कि त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि ते अर्थसहाय्यास तयार झाले....

पुढच्या काळात शापूरजींना या चित्रपटापायी बराच मनःस्ताप सोसावा लागणार आहे आणि के आसिफ हा मनुष्य किती वेडा आहे हे त्यावेळी माहीत असलेली नियती मात्र शापूर्जीच्या कार्यालयाच्या आढ्यावर बसून खुदुखुदू हसत होती !

के आसिफला शीशमहाल उभारायचा होता. ३५ फूट उंच, रुंदीला ८० तब्बल ८० फूट आणि लांबी..............? फक्त १५० फूट !

चांगली दोन वर्षे लागली हा महाल उभारायला...! त्यासाठी बेल्जियमवरून आरसे मागवण्यात आले होते. शापूरजींनी त्या काळी पैसे किती मोजले असतील ? फक्त १५ लाख रूपये !!

कळतंय का १५ लाख म्हणजे किती ? सोनं चाळीस रूपये तोळा होतं म्हणे !! काढा आता हिशोब !!!
आणि तज्ञांशी चर्चा करून आशिफ म्हणाले या महालात फक्त एकच गाणं चित्रीत होणार आहे.
शापूरजींचं डोकं आउट व्हायला हे पुरेसं होतं आणि के आसिफ वि शापूरजी हे युद्ध भडकत गेलं...

शीशमहालच्या छतावर असलेल्या आरशांमुळे प्रकाश परिवर्तित व्ह्यायचा त्यामुळं कॅमेरामन चित्रीकरणास नकार देत. तर के आसिफला बादशाला तख्तपोशीकडे पाहतांना छताच्या प्रत्येक आरशात अनारकली दिसते असं दाखवायचं होतं. हे कठीण होतं. खरं तर अशक्यच शब्द योग्य होता पण आपल्यासमोर रिझल्ट आहे...

तर काय सांगत होतो....अशक्य असा निर्वाळा तंत्रज्ञांनी दिल्यावर सर्वांनी असे असेल तर हे गाणे कट करा इथपासून ते नाही दिसली मधूबाला आरशात तर कोणतं आभाळ कोसळणार आहे असे सल्ले के आसिफ ला दिले..

पण वेड्या आसिफला कलाकॄतीसाठी कोणतीही तडजोड मान्य नव्हती. त्याला त्याच्या मनःपटलावर ही कथा कशी दिसली होती तशीच ती सादर करायची होतॉ.

त्याने निर्वाणीचा इशारा दिला..
मला चित्रीकरण करता येणार नसेल तर या शीशमहालला मी माझ्या हाताने आग लावीन ..
आणि घाबरलेल्या शापूरजींनी शीशमहालचे सर्व भाग सुट्टे करून तो पॅक करून ठेवायला सांगितले..
इथून पुढे ते आसिफचे तोंडही पहायला तयार नव्हते...!
आसिफची गच्छंती जवळजवळ निश्चित होती

पण हार मानणा-यातला आसिफ नव्हता. हे प्रकरण सोहराब मोदींकडे गेलं. मोदी आणि पॄथ्वीराज कपूर हे दोघेही शापूरजींचे परिचित. ..

शापूरजींनी धंद्याचे गणित मांडले. आणि आसिफच्या त-हेवाईकपणचे सर्व किस्से सांगून अशा माणसाबरोबर मी कामकरू शकत नसल्याचे ठासून सांगितले. मोदींनी आसिफशी चर्चा केली. आसिफ काय चीज आहे हे त्यांना चांगलेच माहीत होते, पण कलंदरी वॄत्तीला असलेला शाप म्हणजे फटकळपणा...परखड म्हणा किंवा स्पष्टवक्तेपणा म्हणा...ज्याला सुनावले जाते तो मात्र फाटक्या तोंडाचा अशीच संभावना करीत असतो. कमाल अमरोहींसारखा मनुष्यही आसिफला सोडून गेला आणि वेगळ्या चित्रपटासाठी जुळवाजुळव करू लागला..चित्रपटाचे नाव अनारकली !

एस. मुखर्जीही प्रदीपकुमार आणि बीना रॉय या अप्रतिम लावण्यावतीला घेऊन याच नावाचा चित्रपट बनवायच्या तयारीला लागेलेले होते. आसिफ वर या कशाचाही परिणाम झालेला नव्हता.
कटू सत्य लोण्यात घोळवून सांगणं ही व्यापारी कला कलाकारांना अवगत नव्हती त्याकाळी...
मोदींनी यशस्वी मध्यस्थी केली. मोदींवर विश्वास ठेवून शापूरजींनी पुन्हा आसिफला एक संधी दिली...

द्यावीच लागली........... !

इंग्लंडहून आलेल्या सदस्यांनी इथे शूटींग होणार नाही असा निर्वाळा दिलेला. आसिफ ने विचार करायला सुरूवात केली.

रोज तो दिव्यांची मांडणी बदलत असे, कॅमेरा बदलत असे. पण व्हायचं काय कि आरशांच्या विशिष्ट रचनेमुळं कधी त्यात कॅमेरा तर कधी प्रकाशझोत येत...मोठी समस्या होऊन बसलेली. शिवाय मधूबाला तर प्रत्येक आरशात हवी होती...शापूरजींनी इशारा दिलेला...

शेवटी आसिफच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. त्याने जिथून त्रास होत नाही ते दिवे तसेच ठेवले व झुंबरांच्या आजूबाजूला आणि विशिष्ठ ठिकाणांवर मेणबत्त्यांचा वापर केला. आता सगळीकडूनच उजेड येत असल्याने ऑब्जेक्ट आरशात दिसू लागला आणि प्रकाशाचेही संतुलन झाले !!!

सगळ्या युनिटने नि:श्वास सोडला. हा कार्यभाग तर पार पडला आणि पुढच्या सगळे शूटींगच्या तयारीला लागले. आता विघ्न येऊ नये असंच सर्वांना वाटत होतं

आणि आसिफचे नवे खूळ सुरू झाले ...

सिनेमाला सुरूवात केल्याला आता सात वर्षे उलटून गेली होती. आणि आता रंगीत फिल्मसचा जमाना सुरू झाला होता. आसिफने रंगीत फिल्मसाठी पैसे मागितले. पुन्हा एकदा संघर्ष , पुन्हा मोदी !!

आता असे ठरले कि सरसकट रंगीत फिल्मवर शूट न करता काही भाग शूट करून तो इंग्लंडला लॅबमधे पाठवावा. तज्ञांचे मत विचारावे आणि मगच पुढचा निर्णय घ्यावा...

झालं

प्यार किया तो डरना क्या चे बोल शीशमहालात घुमले. मधूबालाचे पाय त्या बोलांवर थिरकू लागले. बादशहाला आरशात अनारकली दिसू लागली.....

हे गाणं रंगीत झालं. फिल्म टेस्ट करण्यासाठी इंग्लंडला गेली..प्रोसेसींग होऊन परत आली. तज्ञांनी अप्रतिम असा निर्वाळा दिला होता. आता पुढचा सिनेमा रंगीत होणार होता..आणि आसिफचं वेड पुन्हा उफाळून वर आलं......!

चित्रपटाचा रंगीत भाग पाहील्यावर आधी शूट केलेला भाग त्याला कमअस्सल वाटू लागला. आसिफ हे सर्वोत्तमाचे दुसरे नाव होतं.

आमीरला आपण पर्फेक्शनिस्ट म्हणतो..पण आसिफ या सच्च्या कलाकाराची तुलना कदाचित हॉलिवूडच्याच दिग्दर्शकांशीच करावी लागेल..

आता आसिफचे म्हणणे होते..चित्रपट पुन्हा पहिल्यापासून शूट करायचा..

संपूर्ण रंगीत !!

शापूरजी यांना ह्रूदयविकाराचा झटका येणेच बाकि होते...कारण आतापर्यंत या चित्रपटासाठी त्यांचे .......

दीड कोटी रूपये खर्ची पडले होते.. !!

एक हाडाचा कलाकार आणि एक हाडाचा व्यावसायिक यांच्यातलं हे युद्ध होतं. आसिफ हा हाडाचा कलाकार होता, त्यामुळंच तो मनासारखी कलाकॄती व्हावी यासाठी हट्ट धरत होता. आजचे सिनेमे पाहीले तर आसिफच्या या वेडाची महती काही औरच आहे.

पण शापूरजींच्या पदरातही त्यांच्या श्रेयाचे माप घालायला हवे. एका अट्टल व्यावसायिकाने एका खुळ्या कलाकाराला इतकी भरघोस मदत करावी हे त्यांच्या कलासक्त मनाचेच निदर्शन आहे.

११ वर्षानंतर सिनेमा पुन्हा पहिल्यापासून शूट करणे हे खरंच व्यावहारिक नव्हते. वितरकांचा दबाव वाढल्यावर असं ठरलं कि सिनेमा आहे तसा प्रदर्शित करावा. आसिफ रूसून बसलेला होता. सिनेमा बनेपर्यंतच त्याचा अधिकार होता. त्याने ती कलाकृती बनवली होती. आता शापूरजी आपले अधिकार वापरत होते. पैसा त्यांचा होता..

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिले तीन दिवस थेटर्स खाली होते. सगळे धास्तावलेले होते. पण आसिफ तरीही सांगत होता, या सिनेमाला ब्लॅक होईल..

आणि माऊथ पब्लिसिटीचा परिणाम होऊन सिनेमाकडे पब्लिक असं वळलं कि पुढचा इतिहास त्यांच्या या पावलांनीच लिहीला गेला !!!

प्रीमिअर चालू असतांना मात्र शापूरजींच्या मनातून आसिफबद्दलचा राग निवळत चालला होता. तो काय म्हणत होता हे त्यांना आता पडद्यावर कळत होते. आणि रंगीत भाग सुरू झाला मात्र..
त्यांना आतापर्यंतचा कृष्णधवल सिनेमा एकदम डावा वाटू लागला. ऐकलं असतं आसिफचं तर असं वाटून गेलं..
आणि मग त्यांनी आसिफचा हात प्रेमभरानं दाबत त्याला वचन दिला.

एक दिवस हा सिनेमा संपूर्ण रंगीत बनेल. मी हा सिनेमा तुझ्यासाठी कलरफुल करेन..!!
दोन वर्षांपूर्वी त्यांच्याच कंपनीने हा सिनेमा रंगीत अवतारात दाखल केला आणि एका अवलिया कलाकाराला एका उद्योगपतीने दिलेल्या वचनाची पूर्तता झाली ..!!

सगळंच अतर्क्य !!!

Kiran™

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल साऊंड ऑफ म्युझिकची डिवीडी घेतली, ४० वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त काढलेली, तेव्हा तिथे मुगलेआजमची डिवीडी पण होती... चित्रपट पुर्ण असेल तर घेईल

(मोसेरबायेरने एक थिम घेऊन त्यावर ६ डिविडिंचा संच असे काढलेय (म्हणजे व्ही शांताराम, कॉमेडि मुवी, गुरुदत्त, नर्गिस व्.व.) , त्यातले ३-४ संच मी घेतले, पण डिवीडीत मुळ चित्रपटातले काही भाग कापलेले आहेत.. Sad )

माझ्या मते मधुबाला फक्त अवखळ भूमिकेतच चपखल बसते. मुघले आझम मधे ती अप्रतीम दिसली आहे, रोमन्टिक सीन मधे शोभून दिसली आहे, पण इतर ठिकाणी तिच्या चेहर्यावर कायम एक अवघडलेपणा आहे. पल्लेदार उर्दू बोलणे तर तिला अजिबात झेपले नाहीये. एकसुरी भाव तर अकबराबरोबरच्या सीन मधे तर अगदीच जाणवतात. अकबराच्या चेहर्याच्या रेशा रेशा भाव व्यक्त करतात आणी ही एकाच पट्टीत निर्वीकारपणे बोलत असते. इतके छान सम्वाद, पण अगदी वाया गेले आहेत तिच्या तोन्डी. तिच्या पेक्शा तिच्या बहिणीचे काम केलेली नटी, किवा बहार चे काम केलेली निगर सुलताना जास्त expressive वाटतात. काही गाण्यामधे (मोहे पनघट, प्यार किया) मधुबालाने अभिनयही छान केला आहे पण एकुणच tragic, sorrowful scene मधे ती खूपच कमी पडली आहे असे मला वाटते. कदाचित अनारकलीच्या रोल साठी रूप हा प्रमुख निकश असावा. पण तिच्या जागी एखादी अभिनयनिपुण नटी असती (वैजयन्तीमाला, नुतन) तर चित्रपट अजून उन्चीवर जाउ शकला असता.

"पण इतर ठिकाणी तिच्या चेहर्यावर कायम एक अवघडलेपणा आहे"
बादशाह समोर कनीजच्या चहर्‍यावर आणखी कोणते भाव असायला हवेत?
प्यार किया तो डरना क्या या गाण्यातला प्रत्येक शब्द तिच्या चेहर्‍यावर वाचता येतो.
जळून जाणे हेच माझे तकदीर आहे हे पक्के माहित असलेल्या शमेसारखी अनारकली मधुबालाच्या रूपत दिसते.
पृथ्वीराज कपूरचा लाउड अभिनय आणि दिलीपकुमारचा अंडरप्ले यात मधुबाला बॅलंसिंग इफेक्ट देते.
तिच्या सौंदर्यापुढे अभिनय झाकोळला जायचा असेच वाटते. इतर चित्रपटांत ओठ मुडपून बोलायची स्टाइल मुघल-ए-आझम मधे दिसत नाही.
के आसिफने १९४०च्या दशकात जेव्हा मुघल ए आझमचा डाव मांडला तेव्हा चंद्रमोहन (अकबर) सप्रू (सलीम) व नर्गिस (अनारकली) अशी स्टार कास्ट होती.

अ प्र ति म लेख!!!

मुगल ए आझम तर माईलस्टोन ठरला बॉलीवुडमधे!
उण्यापुर्‍या ३६ वर्षांचं आयुष्य लाभलेली मधुबाला..तिची अखेर इतक्या दुर्दैवी रितीने झाल्याचे वाचुन वाईट वाटले. Sad हे अस्सल अलौकीक सौंदर्य शापित का असेल?
तिच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलत. क्षणात अवखळ खळखळुन हसणारी मधुबाला क्षणार्धात असहाय्य, व्यथित ...आतुन कोसळलेली, दिसत असे. चित्रपटात शेवटी शेवटी सलीमला फुल सुंगवण्याच्या वेळेसची तिची तगमग पराकोटीची.
<<प्यार किया तो डरना क्या या गाण्यातला प्रत्येक शब्द तिच्या चेहर्‍यावर वाचता येतो.<<< अनुमोदन!!

कृष्णधवल सिनेमांची जादुच वेगळी होती पण! तशी चित्रपटातील प्रत्येक फ्रेम जपुन ठेवण्यासारखी.... 'मुर्तिकाराचा' तो सीन उच्च होता. पृथ्वीराज, दुर्गा खोटे, बहार, सगळेच कलाकार आपापल्या जागी फीट होते...इतके की त्यांच्या जागी आता दुसर्यांची कल्पनाच करु शकत नाही. (हीच गोष्ट 'शोले' ची आहे)
बाकी के. आसिफच्या पर्फेक्शनला सलाम!!!

आर्या +१
लेखन खूप आवडले. Happy
नौशाद यांच्या आत्मचरित्रात या चित्रपटाबद्दल बरीच माहीती वाचनात आली.
के असिफना या चित्रपटाने अगदी झपाटून टाकले होते. प्रचंड मेहनत केली, प्रसंगी वाद घातले, कर्जे काढली.. पण अखेर सार्थक झाले कष्टांचे.

किरण
आभार आभार!
लिंक दिल्याबद्दल आणि ही कलाप्रेमी लोकांची भारावलेली कहाणी वाचायला दिल्याबद्दल...
माझ्या निवडक १०त!
खरचं आसिफ, शापूरजी आणि मोदींना हॅट्स ऑफ, असे वेड बाळगणे आणि अशा सोनेरी स्वप्नांना पूर्ण करणे हेच लोक जाणोत!
पुन्हा आभार, मित्रा!

जियो! Happy

माझ्या मते मधुबाला फक्त अवखळ भूमिकेतच चपखल बसते. मुघले आझम मधे ती अप्रतीम दिसली आहे, रोमन्टिक सीन मधे शोभून दिसली आहे, पण इतर ठिकाणी तिच्या चेहर्यावर कायम एक अवघडलेपणा आहे.

ते अवघडलेपण नाही तर निराशा आहे. मुघल ए आझम च्या वेळी मधूबाला आणि दिलीपकुमार यांच्यातले संबंध पराकोटीचे वाईट होते. दोघे एकमेकांशी बोलतही नव्हते. या जन्मात दिलीप आपला होऊ शकणार नाहि हे वास्तव अधुबालाने स्विकारलेले होते, त्याची उदासी तिच्या चेह-यावर होती. याच सिनेमाच्या शूटींगदरम्यान नया दौर सुरू झाला होता. त्यात निर्मात्याच्या वतीने दिलीपने मधुबालाच्या विरूद्ध कोर्टात साक्ष दिल्याने तिला निर्मात्याला साइनिंग अमाउंट परत करावी लागली होती आणि तिची प्रचंड मानहानी झाली होती. तिला सर्वात जास्त धक्का बसला होता तो दिलीपने साक्ष दिल्याचा..

या प्रसंगानंतर दोघांतले संबंध कधीही ठीक म्हणण्याइतपर्यंतही चांगले झाले नाहीत. मात्र बागेतल्या प्रणयप्रसंगात दोधांमधले प्रेम अद्याप कायम असल्याचे दिसून आले होते.

हा चित्रपट मी दोन्ही कृष्णधवल आणि रंगीत अशा प्रकारात पहिला आहे. पहिल्यांदा जेंव्हा हा चित्रपट पाहिला तेंव्हा लक्षात राहिली ती मधुबाला (अकबराच्या शब्दात हसीन लौंडी), दुर्गा खोटे आणि कमळातून प्रेमपत्रे पाठवलेला प्रसंग. तयार होण्यास सर्वात जास्त वेळ लागलेल्या दोन चित्रपटापैकी (पाकीझा आणि मुघल ए आजम) एक चित्रपट. सहज उत्सुकता ताणावली म्हणून गुगलून बघितले. सर्वत्र एकसारख्याच माहितेचे दुवे येत गेले. त्याच दरम्यान खातीजा अकबर या लेखिकेने इंग्रजीतून लिहिलेले मधुबालाचे आत्मचरित्र (Madhubala- Her Life Her Films) वाचायला मिळाले. त्यात ह्या चित्रपटाच्या निर्मिती विषयी बरीच माहिती मिळाली. आणि नंतरही बरीच माहिती मिळत गेली त्याच माहितीचे हे संकलन आहे. इथे ते दिले तर अगदीच अस्थानी होणार नाही असे वाटते.

असे सांगितले जाते कि इम्तियाझ अली ताज ह्या नाटककाराचे अनारकली ह्या विषयाचे नाटक पाहून के. असिफ ला ह्या चित्रपटाची कल्पना सुचली पण अनारकली हा विषय भारतीय चित्रपट सृष्टीसाठी नवा नव्हता. कोणतेही ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध नसलेली ही कथा, लाहोर (पाकिस्तान) मध्ये मात्र अनारकली ची कबर आणि दर्गा आहे (मी पाहिलेली नाही. Madhuba- her life her films ह्या इंग्रजी आत्मचरित्ररूपी पुस्तकात संदर्भ आहे) . मुघल ए आजम च्या आधी कमीत कमी ५ चित्रपट अनारकली ह्या विषयावर येऊन गेलेले होते त्यातील दोन चित्रपटात तर सुलोचनाने अनारकलीची भूमिका केली होती. त्यानंतर बीना रॉयचा अनारकली (प्रसिद्ध गाणे - ये जिंदगी उसीकी है). खुद्द के. असिफ नेही १९४४ च्या दरम्यान अनारकली सुरु केला होता यात चंद्रमोहन, सप्रू आणि नर्गिस हे अनुक्रमे अकबर, सलीम आणि अनारकली असे होते. के. असिफ च्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने फाळणी नंतर ह्या चित्रपटाचा निर्माता शिराज अली पाकिस्तानात गेला आणि चंद्रमोहन ही मरण पावला त्यामुळे थोडा तयार झालेला हा चित्रपट डब्यात गेला.

के. असिफ माणूस जिद्दीचा. त्याचे आयुष्य ही चढ उताराचे. मुंबईत त्याला त्याचा मेव्हणा नझीर (तेंव्हा तो चित्रपटात लहान मोठा भूमिका करायचा)घेवून आला, नझीर ने त्याला शिलाई चे दुकान काढून दिले. नंतर नझीर च्या लक्षात आले कि शिलाई पेक्षा असिफ चे लक्ष शेजारच्या शिलाई च्या दुकानातील एका मुलीकडे जास्त लक्ष आहे. तेंव्हा ते दुकान बंद झाले. याच दरम्यान के असिफ ने "प्रभात" फिल्म कंपनी मध्ये ही शिंप्याचे काम केले. खिशाने फकीर असलेल्या या माणसाची स्वप्ने मात्र भव्य दिव्य होती. परत नझीरच्याच ओळखीने के. असिफने चित्रपट दिग्दर्शन सुरु केले. आता कपडे शिवणे ते एकदम चित्रपटदिग्दर्शन हा प्रवास कसा झाला याची माहिती मात्र कुठे मिळत नाही. त्याने दिग्दर्शित केलेला हलचल चित्रपट चालला आणि परत के. असिफ च्या मुघल ए आजम च्या स्वप्नाला परत सुरुवात झाली आणि ह्या वेळेस मात्र चित्रपट पूर्ण करायचाच ह्या इराद्याने त्याने काम सुरु केले.

अंधेरीच्या मोहन स्टुडीओचे दोन स्टेज १९५१ पासून १९६० पर्यंत ९ वर्षे बुक राहिले. अकबराच्या भूमिकासाठी ह्या वेळेस त्याने पृथ्वीराज कपूर यांना घेतले, सलीम साठी के. असिफ नि दिलीपकुमार ला निवडले, बरेच जण या निवडीबाबत साशंक होते. खुद्द अजित ज्याने सलीम च्या निष्ठावंत मित्राची भूमिका केली त्यालाही दिलीपकुमार सलीम च्या भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हता. अनारकली मात्र ठरत नव्हती. मोठमोठ्या शहरांमध्ये ऑडिशन झाल्या. पण अनारकली मिळाली नाही. त्यावेळी के. असिफलाच मधुबाला या भुमिके साठी एकमेकाद्वितीय आहे असे वाटले. यथावकाश शुटींग सुरु झाले. मधुबाला शुटींग साठी स्टेज वर पहिल्या दिवशी आली तिच्या नेहमीच्या चुलबुल्या मूडमध्ये. कॅमेरा, लाईटस लागले आणि के. असिफ ने प्याक अप केले. असे ५ दिवस होत राहिले. शेवटी मधुबाला चा चुलबुला मूड जाऊन ती ही विचारात पडली आणि शुटींग ला पोहोचली. तिचा मूड बघताच के. असिफ खुश झाला आणि शुटींग सुरु झाले.

दिल्लीहून वेशभूषे साठी खास शिंपी बोलावले गेले, सुरतहून जरदोशी करणारे कलाकार आले, कोल्हापूरच्या कारागिरांनी मुकुट व तत्सम दागिने, राजस्थानी कारागिरांनी हत्यारे तर आग्र्याच्या कारागिरांनी खास त्या काळी लागणारी पादत्राणे बनवायला सुरुवात केली. युद्धाच्या शॉट साठी २००० उंट, ४००० घोडे आणि ८००० सैनिक मागविले गेले त्यापैकी बरेचसे सैनिक भारतीय सेनेतून मागविले गेले.

मोहे पनघट पे या गाण्यासाठी अस्सल सोन्याची कृष्णाची मूर्ती तयार करून घेण्यात आली.
लवकरच शीश महालची उभारणी सुरु झाली (एकूण २ वर्षे ह्या महालाची उभारणी सुरु होती) जयपूरच्या अंबर किल्ल्यातील एका महालाची प्रेरणा या कामामागे होती. पण त्यासाठी लागणारी त्या दर्जाची रंगीत काच भारतात उपलब्ध नव्हती. ही काच बेल्जियम वरून मागवावी लागणार होती. पण चित्रपटाचा निर्माता शापूरजी पल्लोनजी जो त्यावेळी भारतातला सगळ्यात मोठा बिल्डर होता, त्याला असे वाटू लागले कि पैशाचा अपव्यय होतोय कि काय. त्याने के. असिफ च्या बेल्जियम काचेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. लवकरच ईद आली आणि शापूरजी पल्लोनजी के. असिफ च्या घरी इदी घेऊन पोहोचला. एका ताटात १ लाख रोख आणि काही सोन्याची नाणी अशी इदी त्याने आणली होती. के. असिफ ने मात्र त्या कशालाही हात न लावता एक सोन्याचे नाणे उचलले आणि उरलेल्या सगळ्या इदीतून बेल्जियमवरून शीश महाल साठी काचा आणा असे फर्मावले. आणखी एका शॉट साठी ज्यामध्ये दुर्गा खोटे दासीच्या ओट्यात मोती टाकते आणि नंतर जमिनीवर मोती पडत राहतात यासाठी के. असिफ ला पुढच्या इदी ची वाट पहावी लागली कारण ह्या शॉट साठी त्याला खरे मोतीच हवे होते.

पृथ्वीराज कपूर दुपारच्या भर उन्हात वाळवंटात चालला. असे ठरले होते कि जेंव्हा तप्त वाळूचे चटके सहन होणार नाहीत त्यावेळी पृथ्वीराज कपूर कॅमेरामेन ला विशिष्ट खुण करतील आणि तिथे शॉट कट होयील. नैतिक धैर्य म्हणून के असिफ ही त्या वाळवंटात पायात काहीही न घालता थांबले होते. शॉट सुरु झाला पृथ्वीराज कपूरांच्या खुणेची वाट कॅमेरामेन बघत राहिला आणि एका शॉट मध्ये सीन ओके झाला. असिफने पळत जाऊन पृथ्वीराज कपूरना मिठी मारली तो पर्यंत दोघांच्याही पायाला फोड आले होते.

तसेच कैदेत असलेल्या चित्रीकरण दरम्यान मधुबालाने खरेखुरे साखळदंड लावूनच सगळे शॉट दिले. अभिनेत्री नादिराच्या म्हणण्यानुसार मधुबालाचा हृदयाचा विकार हेच जड साखळदंड वापरून वाढला. एका प्रसंगात मधुबाला दोन महालाची दालन पळत जाते, खरं तर ह्या शोट साठी तीची डमी वापरावी असा सल्ला होता (तिच्या हृदयविकारामुळे) पण जास्तीत जास्त अस्सलसाठी मधुबालाने स्वतःच हा शॉट दिला आणि शॉट कट होतो तेथे बेशुद्ध होऊन पडली.

सलीम आणि अनारकलीवर उत्कट पण सोज्वळ प्रणयदृश्य चित्रित करायचे असे ठरले.
के असीफ ने चित्रपटाचा संगीत दिग्दर्शक नौशाद ला बोलावले आणि सांगितले की ह्या काळात तानसेन सारखा गाणारा कोण भेटेल. (गाणे – प्रेम जोगण बन के) नौशादनी सुचवले की बडे गुलाम अली खान साहेबच ह्या गाण्याला पुरेपूर न्याय देऊ शकतील. पण बडे गुलाम अली खान साहेब चित्रपटासाठी गात नव्हते, चित्रपटासाठी गाणे त्यांना कमीपणाचे वाटायचे म्हणून त्यांनी नौशाद ला नकार कसा द्यायचा यासाठी एका गाण्याचे २५,००० रुपये मागितले, त्याकाळात लता आणि रफी ही ४०० किंवा ५०० रुपये एका गाण्याचे घ्यायचे (विकीपेडीयाची माहिती, काही ठिकाणी हाच आकडा ४००० ते ५००० असा आहे). के असीफ ने एका मिनिटात मागणी मान्य केली. आणि ह्या चित्रपटात राग सोहनी आणि रागेश्री वर आधारित दोन गाणी प्रत्येकी २५,००० रुपये देऊन गाऊन घेतली.

तसेच प्यार किया तो डरना क्या ह्या गाण्याच्या वेळी हवा तसा प्रतिध्वनी (एको) रेकॉर्डिंग मध्ये येईना म्हणून हे गाणे रेकॉर्डिंग स्टुडीओच्या बाथरूममध्ये लता कडून नौशाद ने गाऊन घेतले (हा किस्सा विकिपीडियावर आहे, प्रत्यक्ष गायिका किंवा संगीत दिग्दर्शकाने सांगितल्याचे ऐकिवात नाही). हे गाणे १०५ वेळा, पसंत पडेना म्हणून परत परत लिहून घेतले होते. तसेच शीश महल मध्ये शुटींग करणार असल्याने कुठे न कुठे कॅमेरा दिसायचाच सरतेशेवटी ५-६ तासाच्या मेहनतीनंतर अशा काही जागा सापडल्या की जेथून कॅमेरा दिसत नव्हता. पुढे वेगळीच समस्या आली, लाईट्स काचेवर चमकायचे योग्य चित्रीकरण व्हायचे नाही. तेव्हढ्यात कॅमेरामन ला एक जागा अशी दिसली की जिथे प्रकाश परावर्तीत होत नव्हता शोध घेतल्यानंतर असे कळले की त्या ठराविक जागी मेणाचा पातळ थर आला आहे त्यामुळे प्रकाश तर परावर्तीत होत नाही आणि शीश महालाच्या सौंदर्यात ही बाधा येत नाही. सर्व काचावर मेणाचा पातळ थर लावला गेला. चित्रपट कृष्ण धवल असला तरी हे गाणे मात्र रंगीत होते. के असीफ ला नवीन रंगीत तंत्रज्ञान आल्यानंतर सर्व चित्रपट रंगीत करायचा होता पण निर्माते परत पैसे घालायला तयार नव्हते आधीच ३ चित्रपट तयार होतील एवढी फिल्म १ चित्रपटासाठी वापरली होती तेंव्हा ८५ % चित्रपट कृष्ण धवल तर १५% चित्रपट रंगीत बनवला गेला.

हे गाणे कथ्थक ह्या नृत्य प्रकारात करायचे ठरले, डान्स डायरेक्टर लच्छू महाराज त्याप्रमाणे मधुबाला ला शिकवू लागले पण साहजिकच लच्छू महाराज कथ्थकमध्ये मधुबाला पेक्षा अधिक पारंगत होते तेंव्हा के. असीफ ने बी. आर. खेडकर नावाच्या मूर्तीकाराला बोलावले, हे गृहस्थ मुखवटे करण्यात पारंगत होते. बी. आर. खेडकरानी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे लच्छू महाराजानी मधुबालाचा मुखवटा वापरून सर्व दृश्ये चित्रित झाली. आवश्यक तेथे मधुबालाचा क्लोज अप वापरला गेला. खरंतर हा किस्सा ऐकून मला मधुबालाच्या ऐवजी दुसरे कोणी आहे हा विचार कसातरी वाटला, पण तेच खरे आहे. गाण्यात कोठेही कळून येत नाही की पूर्णवेळ मधुबाला नाचत नाही.

मुघल ए आझम चे उत्कट प्रेम दृश्ये पाहताना अशी शंका हि येत नाही त्या वेळेस मधुबाला आणि दिलीपकुमार एकमेकांशी बोलतही नव्हते. चित्रपटाला एवढा वेळ लागलेला पाहून अताउल्ला खान सतत के. असीफ ला धमकावयाचा की मधुबालाला आता चित्रपटातून काढून घेतो, नया दौरच्या वेळी मधुबालाच्या वडिलांनी (अताउल्ला खान) केलेला आततायीपणा पाहून के. असीफ ही शहाणा झाला होता. (मला सतत असा वाटतं की मांग के साथ तुम्हारा या गाण्याची वेळी मधुबाला कशी दिसली असती, याचा अर्थ असा नाही की वैजयंतीमालाने वाईट काम केलंय). अशा वेळेस के. असीफ अताउल्ला खानला चित्रपटाचे तयार झालेले रशेस दाखवून त्याला शांत बसवायचा.

चित्रपट निर्मितीस लागणारा वेळ आणि पैशाचा विचार करून निर्माता शापूरजी अनेकवेळा अस्वस्थ होत, प्यार किया तो डरना क्या ह्या गाण्याच्या चित्रीकरणाआधी असेच ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी सोहराब मोदीला सेट वर पाठवून दिले. सोहराब मोदी सेट वर गेले तेथे प्रत्येक गोष्ट अति चौकसपणे चाललेली पाहून ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी के असीफ ला विचारले , प्यार किया तो डरना क्या ह्या गाण्याच्या चित्रीकरणाला किती वेळ लागेल? के असीफ म्हणाला ९ दिवस. सोहराब नी हुकुम केला ३ दिवसात हे गाणे झाले पाहिजे, के असीफने शांतपणे उत्तर दिले “क्षक्षक्ष” याला बोलवा तो २ दिवसात शुटींग पूर्ण करेल. तोपर्यंत मधुबालानेही जाहीर केले, दिग्दर्शक बदलणार असेल तर ती यापुढे या चित्रपटात काम करणार नाही. सोहराब मोदीने शापूरजीना जाऊन सांगितले की के. असीफ चा भरपूर पैसे मिळवयाचा इरादा दिसतो म्हणूनच इतका वेळ आणि पैसा लागतोय हे ऐकल्याबरोबर सोहराब कडे दिलेले काम शापूरजीनी काढून घेतले, कारण त्यांना माहित होते वेळ आणि पैसा लागतोय पण के. असीफ प्रामाणिक आहे.

युद्ध प्रसंग चित्रित करताना मात्र वेगळीच समस्या निर्माण झाली, अधिकतर सैनिक भारतीय सेनेतून चित्रीकरणासाठी वापरले होते पण जोशात येऊन बरेच सैनिक एकमेकांना नकळत इजा करायचे त्या नंतर अतिशय जपून चित्रीकरण करण्यात आले. पृथ्वीराज कपूर आणि दिलीपकुमार दोघानाही घौडदौड करण्याची भीती वाटायची ह्यासाठी खऱ्यासारखे दिसणारे कागदी लगद्याचे खोटे दोन घोडे केले गेले आणि चित्रीकरणात ट्रिक फोटोग्राफीचा वापर करून असे प्रसंग चित्रित झाले की चुकुनही वाटत नाही की ते घोडे खोटे आहेत. हे घोडे ही बी. आर. खेडकरानी बनवले होते.

तब्बल ९ वर्षानंतर अनेक समस्या, संकट पार करीत हा चित्रपट ५ ऑगस्ट १९६० ला रिलीज झाला. मुघल राजे जसे फर्मान काढायचे तशाप्रकारच्या लांब वाटोळ्या उर्दू आमंत्रण पत्रिका काढल्या गेल्या. अॅडव्हान्स बुकिंग साठी ३ दिवस आधीच रांगा लागल्या होत्या, चित्रपट रिलीज झाल्यानंतर ही ह्या रांगा बरेच दिवस अशाच राहिल्या. चित्रपटाची पहिली प्रिंट हत्तीवरून आणली गेली. एकूण १.५ कोटी खर्च आलेल्या (त्याकाळी ए ग्रेड चित्रपट फार फार तर १० लाखात तयार होत) ह्या चित्रपटाने त्या काळी बॉक्स ऑफिसवर ५.५० कोटी चा धंदा करून रेकॉर्ड केले जे पुढे शोलेने मोडले.

नोव्हेंबर २००४ मध्ये मूळ निर्माता शाप्पुरजी पल्लोनजी यांच्या नातवाने नवीन तंत्रज्ञान वापरून सर्व चित्रपट रंगीत करून पुन्हा रिलीज केला, त्यावेळी रिलीज झालेल्या इतर नव्या चित्रपटांच्या तुलनेत ह्या जुन्या पण नवीन कपडे परिधान केलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर २५ आठवडे चांगला धंदा केला.

के. असीफ ने असाच आणखी एक भव्य रंगीत चित्रपट तयार करण्याचे ठरविले त्याप्रमाणे गुरु दत्त आणि निम्मी ला घेऊन त्याने चित्रपट सुरु केला पण आकस्मिक गुरु दत्तचा मृत्यू झाला त्यानंतर संजीव कुमार ला घेऊन हा चित्रपट परत सुरु केला पण १९७१ साली वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी के असीफ चा मृत्यू झाला. हा अर्धवट चित्रपट १९८६ मध्ये लव्ह अॅड गाॅड या नावाने रिलीज झाला असे म्हणतात, कुठे मिळाला तर बघायची इच्छा आहे.

मला मिळालेली माहिती इतकीच आहे.

(इतरत्र लेख स्वरुपात मी ही माहिती दिली आहे)

प्रसाद प्रसाद
अप्रतिम पोस्ट.

बाथरूम मध्ये गाऊन घेण्याचा किस्सा अनेकांनी टीव्हीवर सांगितलेला आहे. आशाजींनी बहुतेक एका रिअ‍ॅलिटी शो (कलर्स) च्या दरम्यान सांगितल्याचं आठवतंय. अनेक किस्से आहेत या सिनेमाचे. दिलीपकुमारला मधुबालाचे वडील सेटवर असले कि अस्वस्थ व्हायचं. ते जास्त जवळीक होणार नाही हे पहायचे. यावर के आसिफने एक ट्रीक काढली. अताउल्लाखानला जुगार आणि दारुची सवय लागली होती. सेटवर मग एक माणूस पत्ते पिसायचा आणि अताउल्ला खानला जिंकू द्यायचा. या दरम्यान हळूच दारु सर्व केली जायची. पत्त्याचा डाव रंगात आला कि त्यादरम्यान इकडे प्रणयदृश्यांच चित्रीकरण उरकून घेतलं जायचं.

लोकसत्तामधे सध्या मधुबालावर लेखमालिका सुरु आहे त्यात या चित्रपटाविषयी बरेच डिटेल सांगितले आहेत. मला हा चित्रपट खूप आवडतो पण काही चित्रपट कसे शेवटात मार खातात त्याचे हा उत्तम उदाहरण आहे असं वाटतं Sad
प्यार किया तो डरना क्या असं भर दरबारी अकबराला ठणकावून सांगणारी, पर्दा नही जब कोई खुदासे तो बंदोंसे परदा करना क्या म्हणत सर्वांसमोर सलीमवरील प्रेमाचा इजहार करणारी, त्याच्यावरील प्रेमापोटी कारावास, साखळदंड आनंदाने सहन करणारी, मरणही स्वीकारणारी अनारकली शेवटी अकबर तिला मुक्त करून नगरातून दूर निघून जायला सांगतो, सलीमला तू जिवंत आहेस हे कळता कामा नये अशी तंबी देतो तेव्हा तीच अनारकली एका शब्दाचाही विरोध न करता निमूटपणे चालती होते. एवढं प्रेम सच्चं आहे तर ठणकावून सांगायचं ना की तू मला खुशाल मार पण हे मला मान्य नाही, माझ्या आईला दिलेल्या वचनपूर्तीसाठी तुझे हे उपकार मी स्वीकारणार नाही. चित्रपटातील अनारकलीच्या व्यक्तिरेखेशी सर्वस्वी विसंगत वर्तणूक इथे दिसते. आत्तापर्यंत सर्वांगसुंदर चित्रपटाला उगीचच हे गालबोट लागतं हे माझं वैयक्तिक मत Sad

खऱ्या स्टोरीत अनारकली भिंतीत गेलेली आहे आणि पिक्चर मध्ये सौम्य करायला हे बाहेर निघून जा वाल्या ऑफर चं घातलंय असं काहीतरी आहे ना?

ना की तू मला खुशाल मार पण हे मला मान्य नाही, माझ्या आईला दिलेल्या वचनपूर्तीसा>>>>>>
It was not about her, it was about Saleem.
उठाव केल्याच्या आरोपाखाली सलीम ला पकडलेले असते,
त्याला वाचवायची किंमत म्हणून अनारकली स्वतः ला गाडून घ्यायला तयार होते,
ती मरायला तयार होते म्हणून तिची शेवटची इच्छा, एक रात्रीसाठी सलीम ची राणी होणे, बादशाह पूर्ण करतो
तिची आई जाऊन अकबर कडे दयेची भीक मागते, म्हणून अकबर तिला जिवंत ठेवतो, पण सलीम साठी अनारकली भिंतीत चिणली गेली असते.
* जे आठवतंय त्या वरून, चू भु द्या घ्या

त्या शेवटच्या सीनमध्ये अनारकलीची आई भीक मागते. अनारकलीला काही शुद्ध नसते.

चित्रपटाचं नाव 'मुगल-ए-आझम' आहे, अनारकली नाही. त्यामुळे त्याला क्रूर दाखवायचा नसेल.

Pages